.
३० सप्टेंबर २०१५
पापा !
ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा ..
ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी..
फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले :)
.
.
२ ऑक्टोबर २०१५
वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो.
हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो.
आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही :)
.
.
५ ऑक्टोबर २०१५
मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात.
शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो. गर्मीने हैराण परेशान झालो होतो. सुदैवाने प्लॅटफॉर्मवरचा फॅन चालू होता. परीला घेऊन त्याखाली उभा राहिलो आणि म्हणालो, चल बाबड्या थोडी हवा खाऊया. तसे तिने वर पंख्याकडे पाहिले, तोंडाचा आ वासला आणि हॉप हॉप करत जमेल तितकी हवा खाऊन टाकली ;)
तरी नशीब आम्हाला तसे करताना कोणी पाहिले नाही. नाहीतर हवा खाण्यावर सुद्धा टॅक्स बसायला सुरूवात झाली असती :)
.
.
८ ऑक्टोबर २०१५
काल परीशी खेळून दमलो आणि बिछान्यावर पडलो. गर्मीचा सीजन म्हणून उघडाच वावरत होतो, तरी अंगमेहनतीने आपला जलवा दाखवलाच. छातीला घामाच्या धारा लागल्या होत्या. परीने ते पाहिले आणि माझेही लक्ष वेधले. मी तिचा हात झटकला आणि दुर्लक्ष केले, तशी गायबली आणि दोन मिनिटात पुन्हा उगवली. यावेळी मात्र तिच्या हातात लॅपटॉपची स्क्रीन पुसायचा छोटासा नॅपकीन होता. का, तर माझा घाम पुसायला :)
'जो पेट देता है वही रोटी भी देता है' या उक्तीचा प्रत्यय आला. घाम काढणारीही तीच आणि घाम पुसणारीही तीच :)
.
.
१० ऑक्टोबर २०१५
डोळे मिचमिचे करत आम्ही बोटांच्या चिमटीत पकडतो तेव्हा आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा असतो. ही हुक्की रात्रीचे दोन वाजताही येऊ शकते किंवा संध्याकाळी पप्पा दमूनभागून घरी आल्यावरही येते. बरं आम्ही कुठेही फोटो काढत नाही, तर बेडरूम हाच आमचा फोटो स्टुडीओ आहे. तिथेच जावे लागते. दिवस असो वा रात्र, फोटो काढायच्या आधी बेडरूमच्या सर्व लाईट्स लावाव्या लागतात. कारण त्यामुळे फोटो चांगला येतो हे क्षुल्लक ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे. फोटो देखील मोबाईलच्या कॅमेर्याने नाही तर डिजिटल कॅमेर्यानेच काढावा लागतो. कधी एकामध्येच काम भागते तर कधी सात-आठ काढावे लागतात. प्रत्येक वेळी फोटो काढून झाल्यावर तिला कॅमेरा हातात घेत फोटो कसा आला हे बघायचे असते आणि त्यावेळी कॅमेरा जपणे ही सर्वस्वी पप्पांची जबाबदारी असते.
एकीकडे पप्पांचा असा छळ चालू असताना दुसरीकडे परीची आई मात्र ‘आय अॅम लविंग ईट’ म्हणत खदखदून हसत असते. कारण एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या मॉडेलिंगची हौस तिच्या हातात कॅमेरा थोपवून भागवायचो.
तर, या जन्मात केलेल्या कर्माची फळे याच जन्मात मिळतात ती अशी :)
.
.
१३ ऑक्टोबर २०१५
काल डोके जरा पित्ताने चढले म्हणून बिछान्यावर झोपलो होतो. बायको उशाशी बसून डोक्याला बाम चोळत होती. परीने ते पाहिले आणि तिला ढकलत माझ्या छाताडावर बसली. नको नको तुझे हात बामने खराब होतील म्हणे म्हणे पर्यंत तिने माझ्या डोक्याला हात घातलाही. थोडे पापण्यांच्या वर, थोडे कानशिलांच्या बाजूला, डोके देखील असे चेपू लागली जसे नेमके मला अपेक्षित होते. जे या आधी बायकोला कित्येकदा समजवल्यानंतर जमले होते, ते परीने पहिल्या निरीक्षणातच जमवले होते. थोडी ताकद तेवढी कमी पडत होती. पण मग त्याची तशी गरजही नव्हतीच, डोके असेच हलके झाले होते :)
काही म्हणा! कितीही धिंगाणा घालो! तरी पोरीत एक श्रावण बाळ लपला आहे. फक्त आता तो कुठवर टिकतो हे बघायचे आहे :)
.
.
१७ ऑक्टोबर २०१५
आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची एक सिस्टीम असते. आमचा नाच धिंगाणाडान्स असला तरी त्याचा एक ठराविक सेट अप असतो. गाणे पप्पांच्या मोबाईलवरच लावले जाते. मोबाईल बेडवर एका ठराविक जागीच ठेवावा लागतो. बेड हाच आमचा स्टेजही असतो. सध्या आमच्या घरातील रॉकस्टार परी असल्याने स्टेजवर नाचायचा बहुमान तिलाच मिळतो. पप्पा स्टेजसमोर पब्लिकच्या भुमिकेत असतात. पण तरीही त्यांनाही नाचावे लागतेच. ते देखील चांगले अन व्यवस्थितच नाचावे लागते. कारण परी एक स्टेप कतरीनाची बघून करते, तर दुसर्या स्टेपला पप्पांना फॉलो करते.
बरं यातून सुटकाही सहज होत नसते. एकच गाणे पाच-सहा वेळा लावले जाते, आणि पप्पांनी थकल्यावर बेडवर बसून नाचायची आयडीया केली, तर त्यांना पुन्हा स्टेजच्या खाली ढकलले जाते. जोपर्यंत आमच्या बसंतीचे पाय थकत नाहीत तोपर्यंत पप्पांनाही नाचावे लागते.
या आधी मी एक कमालीचा उत्कृष्ट बाथरूम सिंगर होतो. परीने तितक्याच ताकदीचा बेडरूम डान्सर बनवलेय :)
.
.
२० ऑक्टोबर २०१५
पोलिस कंट्रोल रूम १००
फायर ब्रिगेड १०१
परीने डायल केला १११
वाचले आजोबा .. फोन त्यांचा होता :)
.
.
२१ ऑक्टोबर २०१५
या जनरेशनला फसवणे ईतके सोपे नाही. माझा स्वत:चा बरेचदा पोपट झाला आहे. एखादी वस्तू भुर्र फेकल्याचे नाटक करावे, आणि तिने त्याला न फसता, इथे तिथे शोधून ती हुडकून काढावी असे कित्येकदा झालेय.
काल जेवणानंतर तिने पाणी प्यावे म्हणून आम्ही तिची मनधरणी करत होतो. पण तिच्या हातात दिलेली पाण्याची बाटली ती आम्हाला पुन्हा पुन्हा रिटर्न करत होती. शेजारच्या दादाने मग आयडीया केली. 'दिल चाहता है' स्टाईल आमीर खान जसा खोटा खोटा मासा खातो, तसेच खरेखुरे भासवून खोटे खोटे पाणी प्यायचे नाटक केले. आणि 'आता तू पी' म्हणत, पुन्हा तिच्या हातात बाटली सोपवली.
मग काय, तिनेही लगेच ती बाटली घेतली, तोंडापासून दोन सेंटीमीटर अंतरावर धरली, आणि ओठांचा चंबू करत खोटेखोटेच पाणी प्यायला सुरुवात केली :)
अश्याप्रकारे पुन्हा एकदा तिच्या निरीक्षण शक्ती आणि लबाडवृत्तीचा अनोखा संगम बघून आज्जीने हसत हसत कपाळावर हात मारून घेतला :)
.
.
२२ ऑक्टोबर २०१५
काल डोळ्यात काहीतरी कचरा गेला. बिछान्यावर पडलो आणि बायकोला डोळ्यात फुंकर मारायला सांगितले. परीचे लक्ष गेले. मग काय, एखादा वेगळा प्रकार पाहिला तर तो आम्हाला करायचाच असतो. त्यातही ती पप्पांची सेवा असेल तर तो आमचा हक्कच असतो.
ओठांना अगदी जवळ आणून माझ्या डोळ्यांवर हळूवार फुंकर मारू लागली. तिचे ते प्रेम बघून पडल्यापडल्याच गहिवरून गेलो. टच्चकन डोळ्यात पाणी आले, आणि कचरा त्यातच वाहून गेला :)
.
.
२४ ऑक्टोबर २०१५
ऑक्टोबर हिट आणि गर्मीची पण आपलीच एक मजा आहे.
मी आणि परी दोघे उघडबंब होतो. फॅन फुल्ल ऑन करतो. खिडक्या उघडतो पण पडदे लावतो. ती मम्मीची ओढणी कंबरेला बांधते. मी माझी बनियान माझ्या कंबरेला गुंडाळतो. अफगाण जलेबी गाणे लावतो. आणि दोघे मस्त घाम येईपर्यंत नाचतो :)
.
.
२६ ऑक्टोबर २०१५
फायनली चांदोमामा आवडायच्या वयात आम्ही पोहोचलो आहोत. गेले दहा-बारा दिवस त्याला कलेकलेने वाढताना बघत आहोत.
कधी बेडरूमच्या खिडकीतून, तर कधी हॉलच्या खिडकीतून. दर दहा मिनिटांनी, पडदा सरकवत, तो आहे ना जागेवर हे चेक करत आहोत.
कधी खिडकीवरच उशी ठेऊन त्यासमोर ठाण मांडून बसत आहोत. तर कधी तो दिसावा म्हणून सायकलवर चढायचा स्टंट करत आहोत.
जरा ढगाआड गेला की आम्ही बेचैन होतो. पण दिसताच क्षणी, चांsदोमामाss करत, ये ये म्हणत त्याला बोलावत राहतो.
आज तर काय कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे जणू चांदोमामाचा हॅपीबड्डेच :)
पण सेलिब्रेट करायला, नेमका आज आमचा बाबड्या घरी नाहीये :(
काही हरकत नाही, उद्या बीलेटेड साजरा करूया :)
- तुमचा अभिषेक
परीकथा ० - http://misalpav.com/node/27398
परीकथा १ - http://misalpav.com/node/32062
परीकथा २ - http://misalpav.com/node/32553
परीकथा ३ - http://misalpav.com/node/32999
प्रतिक्रिया
27 Oct 2015 - 11:27 am | Gayatri Muley
नेहमी प्रमाणेच मस्त...!!!
पुभाप्र
28 Oct 2015 - 1:31 am | तुमचा अभिषेक
धन्यवाद :)
28 Oct 2015 - 1:50 am | इडली डोसा
हलकं फुलकं छान लिहिलये. परीची दंगामस्ती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो.
28 Oct 2015 - 5:32 am | योगी९००
मस्त..
लहान मुलांबरोबरचा हा काळ सर्वोत्तम असतो. तुमची परी तुमच्याकडून शिकत असताना तुम्हाला बरेच काही शिकवत असेल. मजा घ्या.
परीची दंगामस्ती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो.
28 Oct 2015 - 8:19 am | टवाळ कार्टा
:)
28 Oct 2015 - 8:23 am | अजया
मजा येते वाचायला :)
28 Oct 2015 - 9:47 am | चांदणे संदीप
सुरेख लिहिलय. माझाच अनुभव शब्दांतून इथे अवतरल्यासारखा वाटतोय. लिहित रहा.
धन्यवाद!
Sandy
29 Oct 2015 - 11:49 am | Pain6
लेख फार आवडला.
मुले अतिशय आवडत असूनही स्वतःचे मूल-बाळ नसल्याने विषण्णही वाटले.
30 Oct 2015 - 12:34 am | तुमचा अभिषेक
ओह्ह हे ऐकून खूप वाईट वाटले :(
तरीही प्रामाणिकपणे दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
3 Nov 2015 - 10:05 pm | मनिम्याऊ
सेम हीयर. स्वत:ची मुले-बाळे नसलीत की असे लिखाण अजुनच मनाला भिडत जात. लिहीत रहा अभिषेक. परीचे कौतुक आणखी येउदेत. (रच्याक- मला अभिषेकची ओर्कुट कारकीर्द चांगल्या प्रकारे माहिती आहे. ओर्कुटवीर होता तो.)
15 Nov 2015 - 4:10 am | तुमचा अभिषेक
हा हा, माझी ऑर्कुट कारकिर्द माहित आहे असे कोणी म्हटले की खूप टेंशन च येते, नक्की ती व्यक्ती मला काय म्हणून ओळखत असेल याचे. कारण विविध रंग दाखवलेत तिथे. पण आपल्या या आयडीवरून आपण नक्की कोण याची कल्पना येत नाही. खरडही करतो आपल्याला जमल्यास तिथे उत्तर द्या :)
3 Nov 2015 - 10:16 pm | टवाळ कार्टा
मग दत्तक घ्याकी*
*प्रतिसाद वैयक्तीक खाजगीपणा ओलांडणारा वाटला तर सोडून द्या
3 Nov 2015 - 10:18 pm | प्यारे१
टक्या. प्लीज.
29 Oct 2015 - 12:02 pm | अभ्या..
अभिषेक भाऊ.
तुम्ही तुमच्या परीवर लिहिताय मस्त.
पण एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचे लिखाण चांगलेच असते. त्यात जरा बंबईय्या तडका असल्याने मज्जा येतेच वाचायला. पण गेले तीन भाग सतत परीचे कौतुक वाचायचे म्हणजे माझ्या एका मित्राची आठवण येते. त्याच्याकडे कधीही गेले कि त्याचा फोटो अल्बम बघायची तयारी ठेवावी लागते. जीवावर येते हो दर वेळेला तेच कौतुक करायचे. आता तुम्हाला कौतुक आहे परीचे. असणारच. पण एका भागात ठिक. दर वेळेला त्याच स्टैलने तेच ते म्हणले की कंटाळा येतो.
इतर विषय घ्या. मस्त लिखाण करा. जमते तुम्हाला ते.
बाकी फेस्बुक स्टेटस हेच लेखन आहे असा सध्याचा सार्वत्रिक समज असल्यास क्षमस्व.
29 Oct 2015 - 12:57 pm | आतिवास
अभिषेक भाऊंना हे चांगल्या शब्दांत कसं सांगावं (त्यांच्या भावना न दुखावता आणि त्यांच्या बापलेकीच्या नात्याचा आदर ठेवून) हा एक प्रश्न होता, तो तुम्ही माझ्यापुरता सोडवलात अभ्या..भाऊ
धन्यवाद.
29 Oct 2015 - 3:10 pm | प्रसाद१९७१
मला तर पहिल्या भागा पासुन हेच म्हणायचे होते, पण टाळत होतो
सर्वांचीच सर्व मुले थोड्या फार प्रमाणात अशीच असतात आणि अशीच वागतात. त्यात सांगण्यासारखे पण काही नाही. त्यात दवणे टाईप, गुडीगुडी, सेंटी वगैरे वाचायला तर जाम बोर होते.
तसेही आपले वैयक्तीक आनंद अश्या प्रकारे मांडणे पण आवडत नाही.
अभ्या भाऊ - बरे झाले तुम्ही बोललात.
30 Oct 2015 - 12:37 am | तुमचा अभिषेक
इतर विषय घ्या. मस्त लिखाण करा. जमते तुम्हाला ते.
>>>
प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
पण खरे सांगायचे तर मी काही प्रोफेशनल लेखक नाही की मला लेखक म्हणून नावही कमवायचे नाही. बस्स जे जगतो ते लिहितो. आणि सध्या आयुष्यात जी भुमिका जगतोय त्यावर लिहितोय :)
29 Oct 2015 - 12:22 pm | द-बाहुबली
आपल्याला अनाहीता अॅक्सेस दिला जावा विषेश्बाब* म्हणून अशी माझी संस्थळाच्या जबाबदार सदस्यांस नम्र विनंती आहे. कृपया कार्यवाही करुन जनतेला सुखी करावे.
* मिपाकरांबद्दल कणव म्हणून.
29 Oct 2015 - 12:38 pm | धोणी
बोर होतोय आता हे कवतिक वाचून
29 Oct 2015 - 12:39 pm | धोणी
अक्ख्या जगात तुम्हालाच काय ती परी आहे असे वाट्याला लागलेय
29 Oct 2015 - 1:12 pm | नाव आडनाव
सरकार, एव्हढं काय झालं वैतागायला?
30 Oct 2015 - 12:41 am | तुमचा अभिषेक
हा हा, नाही तसे काही नाही.
पण माझ्या अख्ख्या जगात परीच आहे हे नक्की :)
29 Oct 2015 - 1:00 pm | प्यारे१
नो कमेंट्स.
आपलेपणाची जाणीव माणसाला एखाद्यावर प्रेम करायला भाग पाडते. बापाचं प्रेम किंवा आईची माया हा विषय अनुभवण्याचा विषय आहे. त्याला फोटो मध्ये जपणं, शब्दात बांधणं, सुरांनी सजवणं, कुंचल्यानी रंगवलं म्हणून ते वाढतं असं नाही मात्र अशा व्यक्त होण्यानं कालानुरूप ते समोरच्या व्यक्तीला समजतं.
हे सगळं करता आलं नाही तरी भावना त्याच असतात हे मात्र विसरु नये.
सध्या लिहायला इतर विषय नसणं साहजिक आहे. लिखाण पोस्ट करत राहा. आम्ही लाइक करत राहू. पण फ़क्त लाईकच बरं का!
31 Oct 2015 - 2:28 am | तुमचा अभिषेक
सध्या लिहायला इतर विषय नसणं साहजिक आहे.
>>>>>>
काल वेळेअभावी याला रिप्लाय देता आला नव्हता. पण इतर विषय नाहीत किंवा ईतर काही मी लिहित नाहीये हा समज चुकीचा आहे.
एकेकाळी ऑर्कुटवर माझे 80 ते 90 प्रोफाईल होते. मग मराठी संकेतस्थळांवर 7-8 तरी असतीलच.
तर इतर आयडी मधून इतर विषयांवर लिखाण व्यवस्थित चालू आहे. तुर्तास हा आयडी जो ओरिजिनल नावाने आहे तो या लिखाणासाठी राखीव ठेवला आहे ईतकेच :)
3 Nov 2015 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी
कुतूहल म्हणून विचारत आहे. उत्तर दिलेच पाहिजे असे नाही.
उत्तर मिळाले तर वेळेचे व्यवस्थापन या विषयावर काही क्लृप्त्या कळतील.
स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून, लोकलसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करून, घरी असताना बाळाला सांभाळून तुम्ही इतक्या सार्या आयडींनी लेखन करायला वेळ कसा मिळवता?
मला माझ्या एका आयडीनेच मिपावरचेच आवडते लेख अथवा लेखमालिका वाचायला मिळत नाही, वाचणे शक्य झाले तर प्रतिक्रीया लिहिणे जमत नाही. स्वतःचे लेखन लिहून प्रकाशित करणे तर खूपच लांबची गोष्ट आहे.
तुमच्यासारख्यांकडून प्रेरणा घ्यावीशी वाटते पण तुम्हाला हे कसे जमते ते कळल्याशिवाय नुसती प्रेरणा घेऊन त्याचा प्रत्यक्ष उपयोग शून्य म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
मी देखील दोन महिन्यांपूर्वी प्रथमच बाप बनलोय अन तुमच्या अनुभवांसारख्याच अनुभवांमधून जाऊ लागलो आहे.
15 Nov 2015 - 4:01 am | तुमचा अभिषेक
सॉरी फॉर लेट रिप्लाय, आपला हा प्रतिसाद चुकून नजरेतून निसटला होता.
वेळेचे व्यवस्थापनाबद्दल काही विशेष नाही, म्हणजे तुम्हाला काही सल्ला द्यावा असा मी मॅनेजमेंट गुरू नाही. छंद म्हटले की आपण प्रायोरीटीने वेळ काढतोच.
ऑर्कुट फॉर्मला असताना लग्न झाले नव्हते. त्यामुळे दिसामाजी लिहावे काही हा छंद जपायला अडचण यायची नाही. लग्नानंतरही मुलगी होईस्तोवर वेळ काढायला अडचण नाही व्हायची. बायकोला म्हटले की मला काहीतरी मस्त सुचतेय की ती तासभर डिस्टर्ब नाही करायची, त्याबदल्यात लिहून झाले की तिला एक्स्ट्रा टाईम द्यायचा. मुलगी झाल्यावर मात्र हेच मुलीला सांगू शकत नाही. त्यामुळे वेळ मिळेल तसा लिहितो. मोबाईलवर देखील लिहितो. ट्रेनमध्ये, टॉयलेटमध्ये, चहा पिता पिता, सुचेल तेव्हा कच्चेपक्के लिहून घेतो. परिणामी सारेच काही एकाच टाईपचे आणि एकाच दर्जाचे नाही लिहिता येत, म्हणून विविध प्रोफाईल.
पण तरीही सांगायचे झाल्यास एक गोष्ट मी कटाक्षाने पाळतो. ऑफिसमध्ये असताना आधी काम करायचे मग वेळ मिळेल तसे ऑनलाईन यायचे. तसेच घरीही आधी फॅमिलीसाठी वेळ द्यायचा, मग उरलेल्या आपल्या वेळात छंद मॅनेज करायचा. कारण काम आणि संसार या दोन गोष्टींना आधी प्रायोरीटी दिली कि या दोन्हीकडून आपल्याला सपोर्ट मिळतो. तसेच वातावरण आनंदी आणि टेंशनफ्री असेल तर सुचतेही चांगले.
आपण दोन महिन्यांपूर्वी बाप बनला असाल, आणि पहिलाच अनुभव असेल तर वर्षदिड वर्षे त्यालाच छंद बनवून बघा. आयुष्याचा अनुभवच न घेता कोणी नुसते लिहायचेच ठरवले तर लिहिणार तरी कश्यावर. आणि जबाबदारीचा काळच बरेच काही शिकवून जातो :)
29 Oct 2015 - 1:03 pm | नीलमोहर
नेहमीप्रमाणे सुंदरच !!
29 Oct 2015 - 11:07 pm | उगा काहितरीच
हा पण भाग आवडला! पण खरं सांगू ? पहिले सारखी उत्स्फुर्तता नाही वाटत .
30 Oct 2015 - 12:43 am | तुमचा अभिषेक
सर्व प्रतिसादांचे धन्यवाद,
नेहमीपेक्षा थोडे वेगळे प्रतिसाद आले त्यांचेही धन्यवाद, त्यामुळे मलाही थोडे वेगळे प्रतिसाद देता आले. अन्यथा प्रतिसाद म्हणून नुसते धन्यवाद धन्यवाद लिहून मी सुद्धा बोअर झालो असतो :)