परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
27 Aug 2015 - 12:03 am

...

परीकथेचे सव्वा वर्ष .. - http://misalpav.com/node/32062

.....

२० जुलै २०१५

लहान मुले खरंच किती निरागस असतात..
जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात,
फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात,
अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो,
तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते.
खरंच., लहान मुले किती निरागस असतात :)

.
.

२२ जुलै २०१५

कधी तिला शांत करणे अशक्य होते, तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही तिला जेली देण्याची लालुच दाखवतो. फ्रिज उघडून, झाकण सरकवत डबा तिच्यासमोर धरतो. रंगीबेरंगी जेली तिच्यासमोर लखलखत असतात. प्रत्येक रंगाची, प्रत्येकी एक वेचावी असा मोह कित्येकदा खुद्द मला होतो. पण ती मात्र जराही हावरटपणा न दाखवता एक आणि एकच जेली उचलते. किती कौतुक वाटते तिचे..
पण आज मात्र जेलीचा रिकामा होत जाणारा डब्बा पाहून सहज जाणवले, नेमकी एकच जेली उचलणे ही तिची स्ट्रॅटेजी तर नसावी?
कारण तिने पहिल्याच वेळी जर मूठ मारली असती, तर कदाचित जेली जेली हा खेळ आम्ही तिथेच थांबवला असता :)

.
.

२ ऑगस्ट २०१५

मॉलच्या गजबजाटात फिरण्याची मला फारशी आवड नाही, पण परीबरोबर मॉलमध्ये फिरणे एक धमाल असते. चावी दिलेले खेळणे जसे चावी सोडताच तुरूतुरू पळते, तसे तिला मोकळीक देताच क्षणार्धात सुसाट सुटते. कानात वारे शिरलेले वासरूच जणू. त्यानंतर जो दंगा घालते त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच. त्यासाठी मॉलमधील सीसीटीव्ही फूटेजच बघावे लागेल.

तिच्यापाठी पळताना आपलीही दमछाक होत असली, तरी यातही एक फायदा आहेच. तिला रोज फिरायला घेऊन गेल्यास तिच्या आईला वेगळ्या डाएटींगची गरज भासणार नाही. वजन असेच अर्धे होईल.
माझा तर आज जीव अर्धा झाला... :)

.
.

४ ऑगस्ट २०१५

चप्पल म्हणजे खाऊ नसतो,
हे कसे बसे समजावून झालेय..

चप्पल म्हणजे खेळणे नसते,
हे देखील मोठ्या मुश्किलीनेच समजावलेय..

सध्या आपल्या पायात आपलीच चप्पल घालायची,
मम्मी किंवा मावश्यांची नाही, हे समजवायचे प्रयत्न चालू आहेत..

तर टेडीला चप्पल घालायची गरज नसते, हे कसे समजवायचे आम्हालाच समजत नाहीये..

काही का असेना.. एक मात्र समजून चुकलोय,
चप्पल म्हणजे खजिना नसला तरी त्याला कडीकुलुपातच ठेवणे योग्य आहे.. :)

.
.

५ ऑगस्ट २०१५

एखादी गोष्ट तिच्या मनात नाही तर ती आपल्या बापाचेही ऐकणार नाही.
एखादी गोष्ट तिला करायचीच असेल तर 'नाही' म्हणायचीही सोय नाही.
तरीही कश्याला नाही म्हटलेच,
तर हट्टीपणा दाखवत ते आणखी जास्त करणार.

कधी कधी या हट्टीपणाची परीसीमा आणि आपल्या सहनशक्तीची मर्यादा एकाच वेळी ओलांडली जाते, की तिला धरून बदडून काढावेसे वाटते.

पण काय करणार, गधडी अजून बोलायला लागली नाही,
तर 'मुक्या प्राण्यांवर दया करा' तत्वाला अनुसरून काही करताही येत नाही. :)

.
.

८ ऑगस्ट २०१५

फादर्स डे आऊट..!
स्थळ आपले तेच, गेल्यावेळचाच मॉल.
पण फरक हा की आज परी फक्त तिच्या पप्पांनाच घेऊन फिरायला गेली होती. नुसते फिरायला घेऊन नाही गेली तर फिरव फिरव फिरवला. परी पुढे पुढे, आणि खांद्यावर सॅक लटकवलेले पप्पा मागे मागे. जिथे कठडा दिसेल तिथे आम्ही चढायचो, जिथे बसकण मारावीशी वाटेल तिथे आम्ही बसायचो. आपल्या सोबत पप्पांनाही बसवायचो. आईसक्रीम म्हणजे आमचा जीव की प्राण! त्याचा पोस्टर दिसताच ते हॉप हॉप करत खाऊन टाकायचो.
सुसभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या मॉलमध्ये, एवढे गंडलेले एटीकेट आणि मॅनर्स बघणे दुर्मिळच. पण तक्रार तरी कोण कोणाकडे करणार, कारण आम्हाला बसायला अडवले की आम्ही लोळण घ्यायला तयार..
एक तक्रार कम विनंती मात्र मॉलच्या मॅनेजमेंटला करावीशी वाटली. आम्ही जेव्हा जेव्हा मॉल मध्ये येऊ तेव्हा तेव्हा एसीचे कूलिंग जरा वाढवून ठेवा. तेवढाच आम्हाला घाम कमी येईल :)

.
.

११ ऑगस्ट २०१५

ती हसते तेव्हा सेलिब्रेशनला सुरुवात होते, ती रडते तेव्हा सेलिब्रेशन संपते.
सर्वांना आपला बर्थडे केक तिच्या हातूनच कापून घ्यायचा असतो, केकचा पहिला तुकडा तिलाच भरवायचा असतो.
ईतकेच नव्हे तर पहिला घासही तिच्या हातूनच खायचा असतो.
मेणबत्त्यांना फुंकर मारायचे काम ती मोफत करते.
ती, आणि आपले नशीब आपल्यावर खुश असेल, तर सोबत फोटोलाही उभी राहते.
आजकाल आमच्या घरात सारे बर्थडे असेच सेलिब्रेट होतात., आजचा माझाही त्याला अपवाद नव्हताच :)

- हॅपी बड्डे परीज फादर :)

.
.

१६ ऑगस्ट २०१५

खादाडी करायची झाल्यास, बंदिस्त हॉटेलपेक्षा आम्हाला मोकळाढाकळा मॉलच परवडतो. पण आज तिच्या मावश्यांच्या भरवश्यावर हॉटेलमध्ये नेण्याची चूक नाईलाजाने हातून झाली.
आता मॉलमध्ये बागडणार्‍यांना हॉटेलचे नियम कुठे ठाऊक. आम्ही चढलो नेहमीसारखे टेबलवर, आणि पायातले सॉक्स काढायची संधीही न देता, कोणाला काही समजायच्या आतच, पार्टीशन ओलांडत शेजारच्या टेबलवर पोहोचलो.
झालं, अपेक्षेप्रमाणे पायातल्या सॉक्सने दगा दिला आणि धाडकन सोफ्यावर कोसळलो.

पण पडल्यावर, लागल्यावर, हट्टाने आम्हाला तेच करायचे असते हा आमचा नियम पडला.
आमचे डोके कुठे आपटले, की रडून झाल्यावर आम्ही पुन्हा हळूच त्या जागी डोके आपटून, ते आपटलेच कसे हे चेक करतो.
तर कुठल्या भोकात बोट अडकून, मोठ्या मुश्कीलीने सुटका झाल्यावरही, पुन्हा त्याच बोटाने त्या भोकाचे माप काढतो.

तर आजही आम्हाला कुठल्याही परीस्थितीत त्या टेबलवर स्वारी करायचीच होती. सुदैवाने हॉटेल रिकामेच असल्याने लागून असलेले चारही टेबल आमचेच झाले होते. या टेबलवरून त्या टेबलवर, आमच्यासोबत खेळायला सोबत हॉटेलचे वेटरही आले होते.
तब्बल तास-दिड तास दंगा घातल्यावर कसेबसे आम्ही सूप आणि स्टार्टर संपवून बाहेर पडलो. कारण मेन कोर्स म्हणजे आणखी तास-दिड तासांचा दंगा, आणि तो तिच्या आईबापाच्या स्टॅमिन्यात येत नसल्याने ते पार्सलच करून घेतले.

हॉटेलातून बाहेर पडताना, टिप द्यायला कंजूषी करतोस म्हणत बायकोने मला नेहमीसारखाच टिपचा योग्य आकडा सांगितला.
पण आज मात्र सर्विस टॅक्समध्ये को-ऑपरेशन आणि एंटरटेनमेंट टॅक्स जोडत मी आधीच जास्तीची टिप ठेवली होती :)

.
.

१७ ऑगस्ट २०१५

तिने आपल्या हातात मोबाईल द्यावा आणि आपण तिला हवा तो विडिओ लावून द्यावा हा काळ केव्हाच ईतिहासजमा झाला आहे.
हल्ली ती मोबाईल खेचून घेते आणि स्वत:च अनलॉक करते. मेनूमध्ये जाऊन विडिओप्लेअर उघडत, त्यातून योग्य त्या फोल्डरमध्ये शिरून, आपल्याला हवा तो विडिओ लावते. नाही आवडला तर नेक्स्ट विडिओ किंवा बॅकचे बटण दाबत वेगळ्या फोल्डरमध्ये शिरण्याची सोय आहेच. तेच ते विडिओ बघायचा वैताग आला की यू टर्न घेत यू ट्यूबकडे आपला मोर्चा वळवते. आमचा अर्धा डेटा प्लान तीच खर्च करते. नुसता पप्पांचाच मोबाईल नाही तर आईचा, आज्जीचा, आजोबांचा, मावश्यांचा, नाना-नानीचा, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, विडिओ कुठे सापडतात आणि ते कसे बघायचे हे तिला ठाऊक.
आपल्या काळी बाबा या वयात टीव्हीचे चॅनेल कसे चेंज करायचे हे देखील आम्हाला माहीत नव्हते, अश्या तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. कारण ही नुसती स्मार्ट जनरेशन नाही तर स्मार्टफोन जनरेशन आहे.
...... तरीही लहान मुलांना मोबाईलची सवय फारशी चांगली नाही असे वाटते खरे,
पण पप्पांच्या पोटावर बसून छाताडावर मोबाईला ठेवत जर ती विडिओ बघणार असेल, तर अश्या अनुभवाला नाही तरी कसे म्हणावे :)

.
.

१८ ऑगस्ट २०१५

जांभई आली की झोप येते असेच लहानपणी वाटायचे. पुढे कधीतरी समजले की शरीराला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा जांभया येतात. हल्ली या शास्त्राची अनुभुती घेतोय.

अकरा साडेअकरा वाजता आम्ही जांभया द्यायला सुरुवात करतो. लोकांना वाटते की आता झोपेल ही पोरगी. मग झोपेल ही पोरगी. पण आम्ही मात्र ऑक्सिजनची टाकी फुल्ल करत असतो. एकदा ती झाली की तिच्या जिवावर बारा साडेबारापर्यंत दंगा घालतो. त्यानंतर पुन्हा जांभया द्यायला सुरुवात.. असे करता करता रात्री दोन अडीजच्या आधी काही आम्ही झोपत नाही. पण आमचे डोळे कधी मिटताहेत याकडे जे डोळे लावून बसलेले असतात, त्यांच्या झोपेचे मात्र खोबरे करतो.

कॉलेजात असताना मला निशाचर, रातकिडा, घुबड, वटवाघूळ अशी बरीच नावे पडायची. कारण टाईमपास असो वा अभ्यास, माझ्या आयुष्यात जे काही घडायचे ते रात्रीच!
तर आमची परी रात्रभर जागतच नाही, तर तिच्या बाबांना पडलेल्या नावांनाही जागतेय :)

.
.

२४ ऑगस्ट २०१५

पिक्चरमध्ये पहिला व्हिलन हिरोला मारतो, मग हिरो व्हिलनला धोपटून काढतो... आज ट्रेनची पाळी होती.
वाशी ते कुर्ला, ट्रेन आम्हाला हलवत होती. कुर्ला ते डॉकयार्ड, आम्ही ट्रेन हलवून सोडली. :)
आमचे नशीबही नेहमी एवढे चांगले असते की प्लेग्राऊंड आम्हाला नेहमी रिकामेच मिळते. त्याचा फायदा उचलत आज आम्ही या सीटवरून त्या सीटवर मून वॉल्क करत होतो.
पायात शूज घातले की आम्हाला सीटवर उभे राहायचे असायचे आणि काढले की ट्रेनमध्ये फेरफटका. शेवटी या मस्तीवर उतारा म्हणून घरी जाऊन आंघोळ करावी लागली. सोबत पप्पांचीही झाली.
पप्पांनी शेवटचे एका दिवसात दोन आंघोळी केव्हा केल्या होत्या हे त्यांनाही आठवत नाही. पण यापुढे बरेचदा होतील असे वाटतेय. :)

.
.

२६ ऑगस्ट २०१५

लांबलचक तिखट शेव!.. किंवा जिलेबीचा एखादा तुकडा, पप्पा आपल्या तोंडात ठेवतात आणि दुसरे टोक खात खात, परी जवळ येते..
तिच्या बोटाला काही ईजा झाल्यास, ते चोखायला म्हणून पप्पांच्या तोंडासमोर धरते..
पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर, कपाटातील ढिगारा उपसून एक टीशर्ट काढते. पप्पांना मग तेच घालावे लागते..
पप्पांना खोकला आल्यास, खोटा खोटा खोकला तिलाही येतो.. तिला शिंक आल्यास, एक खोटी खोटी शिंक पप्पाही काढतात..
गळ्यात पडणे, लाडात येणे.. गालाला गाल चोळत, पप्पांची दाढी कुरवाळत.. चुंबनांचा वर्षाव करणे.. या सर्वांची तर मोजदादच नाही..
नवरा बायकोच्या नात्यापेक्षाही आगळावेगळा,
बापलेकीच्या नात्यातही, आपलाच असा एक रोमान्स असतो :)

.
.

डायरीतील एक नोंद :-
तारीख - विस्मरणात टाकलेली ..

आयुष्य खूप सुंदर आहे..
फक्त मुलगी आजारी नाही पडली पाहिजे.

- तुमचा अभिषेक

बालकथालेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

27 Aug 2015 - 12:52 am | श्रीरंग_जोशी

लोभस आहे तुमची परी.
सर्व प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहिले.

माझी २० महिने वय असलेली भाचीही अशीच आहे.

कालचाच प्रसंग - काल ती तिच्या बाबा व भावाबरोबर आमच्याकडे आली होती. मी हापिसातून घरी पोचेपर्यंत ती क्रोमबुकवर निवांत चुचु टिव्ही पाहत बसली होती. मी दिसताच माझ्याजवळ आली अन माझ्या मांडीवर बसायचे म्हणून सोफ्यावरचे तिने रिमोट्स, मोबाइल्स बाजूला केले. मला बसायला लावले अन मग क्रोमबुक माझ्या हातात दिले अन त्यानंतर मांडीवर बसली.

*क्रोमबुक ११ इंची असल्याने ती सहजपणे उचलू शकते.

आता ती व्हिडिओतली नर्सरी र्‍हाइम्स स्वतःच्या उच्चारांत गुणगुणू लागली आहे.

माझे व तिचे आवडते नर्सरी र्‍हाइम - बेबी बलुगा. नंतर सांग सांग भोलानाथ हे गाणेही तिने मन लावून पाहिले.

बहुगुणी's picture

27 Aug 2015 - 12:53 am | बहुगुणी

Keep them coming!
गधडी अजून बोलायला लागली नाहीJust wait and watch, एकदा का non-stop मुक्ताफळं बाहेर पडायला लागली की तुमची रोजनिशीची पानं पुरणार नाहीत!

(परी मोठी होईल तेंव्हा तिने हे वाचलं की मग ती 'ती किती publicly मोठी झालीये' हे जेंव्हा कळेल तेंव्हा तिची reaction काय असेल याचं क्षणभर कुतुहल वाटलं...)

तुमचा अभिषेक's picture

28 Aug 2015 - 12:22 am | तुमचा अभिषेक

मुक्ताफळं बाहेर पडायला लागली की तुमची रोजनिशीची पानं पुरणार नाहीत!>>> खरंय ..
प्रत्येक स्टेज हळूहळूच अनुभवायची आहे, सध्याची मिमिक्री स्टेज सुद्धा भारी आनंद देतेय.. :)

उगा काहितरीच's picture

27 Aug 2015 - 12:55 am | उगा काहितरीच

अभिषेकभाऊ, अतिशय सुंदर !
-तुमच्या परीला भेटायची इच्छा असलेला.

तुमचा अभिषेक's picture

28 Aug 2015 - 12:25 am | तुमचा अभिषेक

मुंबईत असाल तर कधीही, नसाल तर जेव्हा याल तेव्हा.. :)

पद्मावति's picture

27 Aug 2015 - 1:18 am | पद्मावति

मुलीचं हे वय खूप एन्जॉय करा. ही मुलं इतकी सटासट मोठी होतात नं, की मग काही आपल्या हातात येत नाहीत. त्यांचा अभ्यास, मैत्रीणी त्यांचं एक वेगळंच जग तयार व्हायला लागतं.

नीलमोहर's picture

27 Aug 2015 - 12:20 pm | नीलमोहर

वयाच्या १ त ६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाललीला अनुभवायलाच ह्व्यात, त्यानंतर ते थोडे थोडे हातातून निसटू लागतात. राहिलेल्या त्या गोड आठवणी मात्र आयुष्याभराचा आनंदाचा ठेवा देऊन जातात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2015 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेकीच्या बापाचं भावविभोर मनोगत खूप भावलं !

पकडून ठेवा हे क्षण व्हिडिओत... हे क्षण फार भरभर जातात हे ते गेल्यावरच ध्यानात येतं !

भिंगरी's picture

28 Aug 2015 - 1:08 am | भिंगरी

चप्पल म्हणजे खाऊ नसतो,
हे कसे बसे समजावून झालेय..

चप्पल म्हणजे खेळणे नसते,
हे देखील मोठ्या मुश्किलीनेच समजावलेय..

सध्या आम्ही हे पालवीला(आमच्या परीला) समजावण्याचा चिकाटीने प्रयत्न करतोय.

मुक्त विहारि's picture

28 Aug 2015 - 7:31 am | मुक्त विहारि

एकदम खूमासदार...

तुमच्या परीकथा वाचणं हा एक आनंददायी अनुभव आहे.परीला अनेक आशीर्वाद आणि तुम्हाला होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नाव आडनाव's picture

28 Aug 2015 - 12:03 pm | नाव आडनाव

:) भारी लिहिलंय.
मी अश्या दोन पर्‍यांचा बाप आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तश्याच थोड्या फरकाने आमच्याकडे आहेत. पण तुम्ही जितक्या चांगल्या शब्दांत लिहिलंय तसं मला जमलं नसतं. त्यामुळं तुम्ही लिहिलेलं वाचतांना चित्र मात्र जसंच्या तसं उभं राहिलं :)

तुमचा अभिषेक's picture

28 Aug 2015 - 11:41 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद.. त्या त्या क्षणाला लिहिलेय म्हणून असावे .. पहिल्या वर्षात बरेच काही मिसलेय, ते आता आठवून लिहायचे म्हटल्यास याच्या ईतकेच चांगले लिहिले जाणार नाही याची कल्पना आहे.

सुधांशुनूलकर's picture

29 Aug 2015 - 6:46 pm | सुधांशुनूलकर

पहिल्या भागासारखाच खुमासदार.
पहिली पाच वर्षं तर अगदी अविस्मरणीय असतात. आमची परी आता कॉलेजात आहे, तरी तिची पहिली पाच वर्षं आम्ही दोघं अजून विसरलो नाही. तिच्या वाढण्याबरोबर आपणही वाढणं हा संगोपनाचा कृतकृत्य अनुभव वाटतो.
शुभेच्छा.

पैसा's picture

29 Aug 2015 - 8:43 pm | पैसा

लिहीत रहा. वाचतानाही कित्येक वर्षांनी पुनःप्रत्यय घेते आहे. मुलांबरोबर आईबापही खूप काही शिकतात खरंच!

द-बाहुबली's picture

29 Aug 2015 - 8:46 pm | द-बाहुबली

परिकथा भोजन परवडी विस्तार, करोनि प्रकार सेवूं रुची |
अभि म्हणे होय जनासी संवाद आपुलीची दाद आपणांसी... ||
:)

बॅटमॅन's picture

31 Aug 2015 - 2:12 pm | बॅटमॅन

मस्त रे गजोधरा....

बाकी परीकथा तर छानच!

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 3:33 pm | द-बाहुबली

धन्यवाद दमामि.

तुमचा अभिषेक's picture

30 Aug 2015 - 12:36 am | तुमचा अभिषेक

अरे बापरे .. नाही समजले
पण अभि आणि परी ही दोन्ही नावे एका श्लोकात जोडलीत त्याबद्दल धन्यवाद :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Aug 2015 - 8:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास :)

स्पंदना's picture

31 Aug 2015 - 6:21 am | स्पंदना

लुटु लुटु चाल
त्याला पैंजणांचा ताल
गोबर्‍या गालांवर हसू आणि आसू
सोफे गाद्या तक्के सोडून जमिनीवर बसू.

बाप आखीर बाप होता है!!

हे फार गोड आहे!! अजून येऊ द्या :-)

मांत्रिक's picture

31 Aug 2015 - 10:50 am | मांत्रिक

अगदी गोग्गोड परिकथा! छानच लिहिलंय. मी पण सध्या हेच अनुभवतोय.

असेच लिहित रहा. परी मोठी झाल्यावर तिला हि एक अमूल्य भेट असेल.
पुढील लिखिणाची वाट बघत असलेला...

तुमचा अभिषेक's picture

1 Sep 2015 - 12:11 am | तुमचा अभिषेक

धन्यवाद प्रतिसाद :)