आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
17 Dec 2008 - 2:59 am


परीक्षा

आपण रणजी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात बघतो ते अंपायर कसे तयार होतात ? प्रथम स्थानिक असोसिएशनची परीक्षा द्यायची, पास झाले की स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करायची, काही विशिष्ट पंधरा की वीस सामने झाले की तुम्ही त्या असोसिएशनच्या पॅनलवर येणार. मग पुढची परीक्षा द्यायला पात्र ठरणार.या सगळ्या परीक्षा दर वर्षी होत नाहीत. चार पाच वर्षांतून एकदा होतात. पुढची परीक्षा विभागीय. पण त्यासाठी प्रत्येक असोसिएशनकडून पाचच अंपायरना परवानगी.मग आपल्या असोसिएशनमध्ये पहिल्या पाचात येण्यासाठी परीक्षा द्यायची.त्यानंतर विभागीय परीक्षा पास व्हायचे. प्रथमश्रेणी मॅचेस करायच्या. त्याच्या राष्ट्रीय पॅनलवर यायचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परीक्षा द्यायची , पास झाल्यावर प्रथम एकदिवसीय मॅचेस करायच्या आणि मग तुम्ही कुठेही माती खाल्ली नाहीत तर कप्तानांच्या गोपनीय रिपोर्टप्रमाणे तुमची आंतरराष्ट्रीय टेस्ट पॆनलवर निवड होणार...

यात तुम्ही ज्या पातळीवरचं क्रिकेट खेळला असाल तिथली परीक्षा देऊन अंपायरिंगला सुरुवात करता येते. प्रथमश्रेणी खेळलेला खेळाडू नंतर थेट झोनल परीक्षेला बसू शकतो आणि रणजी अंपायरिंग करू शकतो.( उदा. वेंकटराघवन टेस्ट खेळले असल्याने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरची परीक्षा पास होऊन कसोटी करू शकले)
सध्याच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट पॆनलवर भारताचा एकही अंपायर नाही.

( गेली तीन वर्षे बेस्ट अंपायर किताब मिळवणारा सायमन टॊफ़ेल हा आपला फ़ेव्हरिट अंपायर)

क्रिकेट खेळणं आणि त्यावर चर्चा करणं ( बाष्कळ गप्पा मारत वेळ वाया घालवणं) हा माझा कायम आवडीचा भाग होताच. पण चला अंपायरिंग करूया, असं कधी वाटलं नव्हतं... अंपायर म्हणजे सामना संपल्यावर घरी जाताजाता शिव्या घालायचा बकरा अशीच समजूत बराच काळ टिकून होती.

आमच्या भागात एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग केलेले पंच राहत होते, त्यांच्याकडून कळालं की आता पुण्याच्या एमसीयूए (महाराष्ट्र क्रिकेट अंपायरिंग असोसिएशन) तर्फ़े पंचनिवडीसाठी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा तेव्हा चार वर्षांतून एकदा होत असे.माझी बारावी नुकतीच संपली होती. रिझल्ट आणि ऍडमिशनचा गोंधळ, मेडिकल इन्जिनियरिन्गच्या प्रवेशपद्धतीवर कोर्टाचा स्टे चालू होता. काहीच काम नव्हतं. म्हटलं बसून टाकावं परीक्षेला... जमेल तशी पंचगिरी करू. मग पुस्तकं आणली. तेच सर रोज शिकवणार होते.
हे ते मुख्य ४२ लॉज असलेलं पुस्तक....

आणि ते खालचं पुस्तक आहे एक्स्पेरिमेन्टल लॉजचं...

रोज एखादा दुसरा लॉ शिकत महिनाभर हसतखेळत क्लास चालला.
त्यानंतर पुष्कळ प्रश्नपत्रिका सोडवल्या. सरांनी अगदी वेगवेगळ्या असोसिएशनच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आणल्या होत्या.एकदम भारी चाललं होतं काम.

तेव्हा काही कामधंदा नव्हता त्यामुळे भरपूर अभ्यासही केला. महिनाभर रोज सरांकडे माझ्यासारख्या बारा पंधरा जणांचा क्लास भरत असे ( यात वयवर्षे १२ पासून ४८ पर्यंतच्या लोकांचा समावेश होता.)...त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. जुलै १९९३ मध्ये कधीतरी नेहरू स्टेडिअमच्या एमसीएच्या ऒफ़िसमध्ये लेखी परीक्षा झाली. त्यात पहिल्या पाउण तासात ५० (एका वाक्यात उत्तरवाले) फ़टाफ़ट प्रश्न सोडवायचे आणि पुढल्या सव्वादोन तासात दीर्घोत्तरी १०० मार्कांचे प्रश्न. पहिला पार्ट थोडा अवघड होता. पुढचा मोठ्या उत्तरांचा अभ्यास बरा झाला होता त्यामुळे एल्बीडब्ल्यू, नो बॉल वगैरे प्रश्न मजबूत लिहिले...
लेखी परीक्षेत ८० % ला पासिंग होतं.थिअरी पास होणार्याला प्रॆक्टिकलसाठी बोलावणं येणार होतं.

प्रॆक्टिकल :

थिअरी पास झालो... प्रॆक्टिकल परीक्षा काय असणार आहे अंदाज येत नव्हता. सरांनी सांगितलं होतं की यात खेळाच्या नियमांच्या ज्ञानाबरोबरच मुख्यत: तुमचं लक्ष, तुमची खेळावरील पकड आणि स्थितीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता हे तपासणार. त्यासाठी अभिरूप सामना खेळला जातो . मॉक मॅच. सगळे सीनियर अंपायरच खेळतात, परीक्षार्थी अंपायर म्हणून उभा राहतो. त्याच्यामागे दोन परीक्षक... आजूबाजूला क्षेत्ररक्षकांची फ़ौज. मग विचित्र अपील करणे, बोलरने बॆट्समनला शिव्या देणे,धमक्या देणे, टोपीत कॆच पकडणे,हेल्मेट फ़ेकणे, पिचवर फ़ील्डर्स येणे, बॆट्समनने गार्ड घेताना पिच खराब करणे, हाताने स्टंप पाडून अपील करणे, क्रीजच्या मागून बोलिंग टाकली म्हणून हा नो बॊल द्या असे बॆट्समनने अंपायरला आग्रह करणे असले वाट्टेल ते प्रकार करतात. मग आपल्या ऎक्शनबद्दल परीक्षक मागून लगेच प्रश्न विचारणार आणि त्यावर नियम सांगून उत्तर द्यायचं. अशी पंधरा वीस मिनिटं प्रॆक्टिकल परीक्षा चालते.

माझी परीक्षा सुरू होताना एक बोलर तिथेच शूज बदलायला बसला, त्याच्याशी बोलून त्याला या गोष्टीची परवानगी नसल्याचे सांगितले. नाहीतर मैदानाबाहेर होऊन शूज बदला असे सांगून मी येतोय तोपर्यंत बॅट्समन म्हणाला, तेवढं माझं हेल्मेट धरा." मी नाही म्हणालो.. मग म्हणाला, "त्याला काय होतंय ? धरा की थोडा वेळ"... मी शक्य तितक्या ठामपणे नाही म्हणालो. मग म्हणाला, " इथेच ठेवतो कडेला." मला वैताग आला, मी ओरडलो, " ते बाहेर ठेवा मैदानाच्या." तो भारी होता, म्हणाला," न्या की तुम्हीच"... मला हसायलाच आलं.. मग परीक्षक मागून म्हणाले, " आता काय करणार?" मी म्हणालो, " त्यांच्या बाराव्या खेळाडूला बोलवून ते बाहेर न्यायला लावणार, किंवा बॆट्समनच्या डोक्यावरच ठेवणार... पण ते हेल्मेट मैदानावर ठेवणार नाही किंवा मी धरणार नाही" ...

.मग मी बोलरला विचारले, " कशी बोलिंग टाकणार?" तो म्हणाला," कशीही टाकेन ... मला दोन्ही हाताने टाकता येते." असले विनोदी प्रकार चालले असले तरी न हसता तिथे उत्तर द्यावंच लागतं...मग तिथे नियम शिकवून आलो..... माझी जागा घेतली, बॆट्समनला साईड आणि आर्म सांगितला.... परीक्षक म्हणाले, " करायचं का सुरू?" ... तेवढयात माझे लक्ष समोरच्या स्टंपवरच्या बेल्सकडे गेले... मी परीक्षकांना म्हणालो, " अहो इथल्या बेल्स कुठे गेल्या?" मला लक्षात आलं की मी बोलरकडे गेलो असताना कोणीतरी बेल्स मुद्दाम ढापल्या होत्या. मग तिथेच फ़िरून आवाज दिला की ज्याने कोणी बेल्स घेतल्या असतील तर परत द्याव्यात. मग पलिकडेच आमचे एक वृद्ध आणि अनुभवी अंपायर मिस्किल चेहर्‍याने उभे होते, त्यांनी बेल्स परत दिल्या. मी म्हणालो, " तुम्ही खेळाडू आहात ना? मग पुन्हा अशा बेल्स उचलू नका" त्यांनी हसून मान डोलावली....

नंतर नॊनस्ट्रायकर बॆट क्रीजमध्ये ठेवून पण पार्श्वभागाला बॅट टेकवून हाताची घडी घालून नुसताच क्रीजबाहेर उभा होता. त्याला मी रन आउट दिल्यावर ( कारण बॅट नुसती शरीराला स्पर्श करून चालत नाही तर हातात धरावी लागते. )त्याने ठणाणा केला, मला "तू बाहेर ये तुला बघतो" अशी धमकी दिली.... मग मी तुला रिपोर्ट करेन असे म्हणालो... वगैरे वगैरे गोंधळ नुसता.... अशी परीक्षा झाली. मला वाटले बरी झाली असावी ... पण एकाच वेळी तिथे इतक्या गोष्टी चालू होत्या... या सगळ्या गोंधळात काही गोष्टींकडे दुर्लक्षही झाले असेल...

मग दुपारच्या सत्रात तोंडी परीक्षा झाली. प्रत्येकाला सेम २५ प्रश्न विचारले गेले... . हे प्रश्न म्हणजे थिअरीमधल्या एका वाक्यात उत्तरे लिहा सारखे प्रश्न होते. त्यातले बरेचसे मला आले....एकूण परीक्षा बरी गेली होती.पास होण्याची बरीच आशा होती. पण तीन चार महिने परीक्षेच्या निकालाबद्दल काहीच कळेना.... मधल्या काळात डेन्टिस्ट्रीला प्रवेश मिळाला. कॉलेज सुरू झालं. थोडंफ़ार इन्टरकॉलेज क्रिकेट खेळलो. तेव्हाच अंपायरिंग परीक्षा पास झाल्याचं पत्र आलं.
माझा आनंद गगनात वगैरे मावेनासा झाला.... त्या पत्रावर मी कॉलेजात पुष्कळ शायनिंग मारल्याचे स्मरते.
असो... पुढे पुष्कळ मॅचेस करायच्या होत्या.... मग कळणार होती खरी गंमत.

क्रमश:

क्रीडामौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

17 Dec 2008 - 3:57 am | संदीप चित्रे

अंपायरिंगच्या परीक्षेबद्दल मस्त माहिती दिलीत मास्तर...
अजून येऊ द्या !

नंदन's picture

17 Dec 2008 - 6:17 am | नंदन

लिहिलंय, मास्तर. खासकरून प्रॅक्टिकल परीक्षेतील अनुभवांबद्दल. (ह्या परीक्षेचा अनुभव मराठी संकेतस्थळांवरील संपादकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे वाटले ;).)

पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच लिहिलं आहेत मास्तर! (खरी बॅटींग इथे झाली म्हणायची पिच्चरचं परीक्षण सोडून!)

(ह्या परीक्षेचा अनुभव मराठी संकेतस्थळांवरील संपादकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे वाटले Wink.)
=))

सहज's picture

17 Dec 2008 - 7:25 am | सहज

प्रॅक्टिकल परीक्षेतील अनुभव वाचायला मजा आली.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

अवलिया's picture

17 Dec 2008 - 9:34 am | अवलिया

लय भारी

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार

>>विचित्र अपील करणे, बोलरने बॆट्समनला शिव्या देणे,धमक्या देणे, टोपीत कॆच पकडणे,हेल्मेट फ़ेकणे, पिचवर फ़ील्डर्स येणे, बॆट्समनने गार्ड घेताना पिच खराब करणे, हाताने स्टंप पाडून अपील करणे, क्रीजच्या मागून बोलिंग टाकली म्हणून हा नो बॊल द्या असे बॆट्समनने अंपायरला आग्रह करणे
== आम्ही जेव्हा नेहरु स्टेडियम वर सरावाला जायचो तेंव्हा या पंचांच्या परिक्षेसाठी आम्हाला बर्‍याचदा दंगा करायला बोलावले जायचे ;) मग काय विचारुच नका, जो धुडगुस घालायचो आम्ही. फलंदाजाच्या माता भगिनीची 'आदराने' विचारपुस करणे, उजव्या हाताच्या मधल्या बोटाचे 'विविध गुणदर्शन' , स्टंप्स ना लाथा मारणे, रागारागानी हाततली बॅट फेकुन देणे हे सर्व काही अगदि उत्साहाने करायचो. जे खर्‍या सामन्यात करायची बर्‍याचदा इच्छा व्हायची पण करता यायचे नाहि ते सर्व काही इकडे करायचो ;)
मस्त लिहिले आहे गुर्जी ! लै भारी बघा !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

17 Dec 2008 - 2:36 pm | भडकमकर मास्तर

जे खर्‍या सामन्यात करायची बर्‍याचदा इच्छा व्हायची पण करता यायचे नाहि ते सर्व काही इकडे करायचो
वावा... आपल्या परीक्षेच्या आठवणी वाचून आनंद वाटला...
...मीही पास झाल्यावर तीन चार वर्षांनी पुढच्या परीक्षेत उत्साहात असा दंगा करायला गेलो होतो... तिथे एका बॅट्समन आणि बोलरने हाणामारी केली, अंगावर धावून जाऊन एकमेकांना खाली पाडले वगैरे... परीक्षार्थी जरा गांगरलेच...बाकीच्यांना कळेना , एवढे उत्साहात युद्ध का करायला लागले हे दोघे? नंतर दोघे म्हणाले की आम्ही ठरवूनच आलो होतो... :)
फार करमणूक झाली त्या वेळी.....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बबड्झम्बू's picture

17 Dec 2008 - 2:17 pm | बबड्झम्बू

आम्ही एकदा काही मित्र क्रिकेट चा सुंदर खेळ खेळत असता...प्रती पक्षा मधील एक खेळाडू पायचीत झाला असे आमचे सगळयांचे मत झाले...जोरदार अपील आणि सर्वांचाया नजरा अंपाइयर कडे .....तथापि त्यांनी ठामपणे नाही असे संगितल्याने फारच वाद झाला. यावर आम्पायर महाशय यांनी जे मत दिले ते ऐकून आम्ही विस्मित झाले बुवा...

पायचीत का नाही...तर म्हणे बॅट्समन ने पॅड्स घातलेले नाहीत...

ही ही ही....हसवे का रडावे हे कळात नवते तेव्हा....त्यामुळे मॅच रद्द झाली आणि अम्म्पायर ला आमच्या संघा कडून मस्त मसाज करण्यात आला...

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 2:35 pm | मनस्वी

प्रॅक्टीकल परिक्षा मजेशीरच होती!
मस्त!
पु.भा.ल.टा.

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 2:31 pm | विसोबा खेचर

मस्त लिवलंय मास्तुरे..

माझा एक अक्षय मराठे नावाचा मित्र आहे. तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पंच झाला आहे..

नुकतीच तो ती परिक्षा पास झाला आहे..

आपला,
(पंच) तात्या गोठोस्कर.

--

तसे हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल कबड्डी, इत्यादी अनेक मैदानी खेळ अनेक आहेत. परंतु क्रिकेट ते क्रिकेट! त्या खेळाची शान, त्या खेळाचा रुबाब काही वेगळाच! क्रिकेटची सर इतर कोणत्याच खेळाला नाही असे आमचे व्यक्तिगत मत आहे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 3:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर मस्त लिहिलंय ! मलाही लै हौस आहे क्रिकेटचा पंच म्हणून उभे राहायची.
लोकलच्या सामन्यात आहे त्या ज्ञानावर सामना पार पाडतो :)

पुढील सामन्याचे अनुभव वाचण्यास उत्सुक !

-दिलीप बिरुटे