एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात काल संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. आपापसात मधेमधे यथेच्छ इंग्रजी वाक्य पेरत आणि अधेमधे अतीव कष्टाने बोललेल्या मराठीवाक्यांवरही आपल्या तथाकथित हायफाय कल्चरची इंग्रजी छाप सोडत त्यांचं आपापसात आणि सेल्सगर्लशी संभाषण सुरू होतं. त्यांचे संभाषण ऐकून मलाच जाम कानकोंडं झाल्यासारखं झालं. कारण आपल्याच कुटुंबियांना भर दुकानात किती उद्धटपणे आणि काय बोलावं याचं तारतम्य साफ सुटल्यागत झालं होतं.
आजींना नवीन चष्मा/चष्मे करायचे होते. चष्म्यांची संख्या आणि फ्रेमचा दर्जा या दोन मुद्द्यांवर तावातावाने खल चालू असताना जावई हातात जुनी फ्रेम नाचवत एक मस्त आयडीयाची कल्पना सुचल्याच्या आनंदात म्हणाला, "एक स्पेअर करायचाअसेल तर यातच नवीन काचा टाकूया की".
यावर त्याची बायको, म्हणजे त्या जख्ख दांपत्याची मुलगी फटकन् म्हणाली, "तू गप्प बस, my father is paying for it." आणि मग सेल्सगर्लला उद्देशून, "तुम्ही दाखवा हो, don't listen to my husband". तो बिचारा मंत्र्यालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेला टवटवीत चेहरा एकदम महापालिकेतला चतुर्थ श्रेणी सारखा करत, फॉर द एन्टायर ड्युरेशन ऑफ द खरेदी, बारा वाजलेले भाव घेऊन स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करत निमूट बसून होता.
खरं तर अशा वातावरणात मला गुदमरायला होतं. पण ही मुक्ताफळं ऐकल्या नंतर कानावर पडलेली अहंगंड, उद्धटपणा, अरेरावी, आणि श्रीमंतीचा माज यांनी ओतप्रोत भरलेली वाक्य मी एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून दिली. पण दुर्दैवाने एक वाक्य अक्षरशः कुणीतरी वितळलेलं गरम शिसं ओतावं तसं कानात शिरलं.
कुठली फ्रेम घ्यावी यावर अजूनही खल चालूच होता. आजींना जरा भारीतली फ्रेम घ्यावी असं त्यांच्या मुलीचं मत पडलं. अर्थात, तिचं काहीच जाणार नव्हतं...after all, her father was paying for it.
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे).
आता मी त्या कुटुंबाला ओळखत नव्हतो. त्यामुळे कोण जाणे, त्या म्हातारीला काही असाध्य आजारही झालेला असू शकत होता. अर्थात हा माझा त्या बाईच्या मुक्ताफळावरुन काढलेला अंदाज आहे. पण काहीही झालं असेल, कुठलाही आजार झालेला असेल, वय कितीही जास्त असेल, तरी "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा", असं जाहीर बोलणं सोडाच, मनात तरी विचार येतोच कसा? इथे मात्र आजींची एक्स्पायरी डेट माहीत असल्यागत ती मुलगी बोलत होती.
तेवढ्यात मी मागवलेला चष्मा आला, आणि तो घेऊन मी घाईने तिथून बाहेर पडलो.
घरातल्या म्हातार्या माणसांनी जरी कधी, "आता काय आमचं राहिलंय", "आता सगळं झालं आता आम्ही डोळे मिटायला मोकळे", असं सहज जरी म्हणाली तरी आपण हेलावतो, आणि असं न बोलण्याबाबत त्यांना प्रेमाने दटावतो.
कालपासून विचार करतोय, त्या आजींना असं प्रेमाने कुणी दटावत असेल का?
--------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशितः http://mandarvichar.blogspot.in/2015/10/blog-post.html
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७
प्रतिक्रिया
6 Oct 2015 - 5:25 pm | बाबा योगिराज
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे)
..
बाब्बो, साष्टांग दंडवत.
6 Oct 2015 - 5:40 pm | फुलथ्रॉटल जिनियस
त्यात काय चुकीचं बोलली, काही माणसं खूप प्रक्टीकल असतात.अशीच माणसं आयुष्यात खूप यशस्वी होतात आणि आपल्यासारखे मध्यमवर्गीय पांढरपेशे हळवेपणाला ग्लोरीफाय करत आयुष्य घालवतात ,मृत्युश्य्येवर पडल्यानंतर त्यांच्या लक्षात येते , की आपल्या हातात बाबाजीच्या ठुल्लूशिवाय काहीच पडले नाही.याचा अर्थ माणसाने संवेदनशील असू नये असा नव्हे, पण संवेदन्शिलता आणि हळवेपणा यातला फरक समजून घेतला पाहिजे.
6 Oct 2015 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले
फुजि , उगाच खुस्पट काढायला दिलेला प्रतिसाद आहे हा !
आपल्या माणसांच्या बाबतीत कोणीही सर्वसामान्य संवेदनशील मनुष्य हळवा होणारच ! होत नसेल तर तो एक तर जीवनमुक्त आहे किंव्वा दगड आहे!
मंदार , लेख आवडला , भावना पोहचल्या .
7 Oct 2015 - 4:43 pm | मंदार दिलीप जोशी
धन्यवाद प्रगो
6 Oct 2015 - 10:40 pm | शित्रेउमेश
इथे प्रॅक्टीकल असण्याचा मुद्दा नाहीये....
असं चार चौघात बोलण म्हणजे....जरा अतीच झालं.....
7 Oct 2015 - 11:08 am | नाखु
गोबर गॅसच्या शेणाच्या टाकीत एक पेला दूध टाकल्याने काय फरक पडत नाही.
त्याच न्यायाने हंडाभर्/डेराभर दूधात पेलाभर शेणकाला टाकल्याने काहीही फरक पडणार नाही असे ब्रम्ह्ज्ञान द्यायचे आहे.
तुम्ही-आम्हीच करंटे, इतक्यात ईतीहासाची लक्तरे (फाडलेली) विसरलात ते!!!
याचकांची पत्रेवाला नाखुस चिंधी फाड
मूळ लेख विचार प्रवृत्त करणारा, पण त्यांना हे शिक्षण देणारेही ग्यानी असावेत असा सौंशय आहेच.
6 Oct 2015 - 7:19 pm | सौंदाळा
पुर्वी एका धाग्यावर दिलेला प्रतिसाद परत देतो.
आजी आजारी असताना कंपनीतला एक जण डेथ सर्टीफिकेटबद्दल माहिती विचारत होता.
काही लोकांचे वागणे बघुन डोक्यात तिडीक जाते.
आमच्या समोरचे कुटुंब पहिल्यापासुन चिंचवड आणि तळेगाव इथे राहिलेले आहे. सर्वजण मराठी आहेत. घरात मराठीच बोलतात पण बाहेर एकमेकांशी पण इंग्रजीमिश्रीत हिंदीत बोलतात. (सुनबाई आणि सासुबाई इंग्लिश बोलु शकत नाहीत म्हणुन हिंदीची फोडणी) मराठी बोलायला काय कमीपणा वाटतो कळत नाही.
6 Oct 2015 - 8:34 pm | रातराणी
:(
6 Oct 2015 - 10:09 pm | आदूबाळ
काहो एवढा जळफळाट?
7 Oct 2015 - 4:54 pm | अनुप ढेरे
अगदी!
6 Oct 2015 - 10:18 pm | जव्हेरगंज
:-(
6 Oct 2015 - 10:42 pm | टवाळ कार्टा
ते शेवटचे वाक्य फालतूच आहे......पण उरलेला लेख म्हणजे "लुळी पांगळी श्रीमंती....." टैप आहे
7 Oct 2015 - 11:13 am | द-बाहुबली
तुम्ही फार विचार करता बुवा म्हटलो असतो.. पण.. कसे आहे, विचार खरच केला असता तर लक्षात येइल कोणीही कोणतीही गोष्ट फटकन बोलत नसतो... आनी जे बोलत असतो त्याची ऐकणार्याला नक्किच सवय असावी, जर ते कुटूंबात राहणारे अथवा जवळचे नातेवाइक असतील तर. त्यांच्या आतल्या गोष्टी त्यांनाच माहीत. तेंव्हा इतके हळवे होउ नका.
मी चेस.काँम वर एकाला nukatech फ्रेंड म्हणुन अॅड केले होते. १ मिहिन्याने तो उगवला व माझ्याशी एक डाव खेळला. ती तारीख २ जानेवारी २०१५ वेळ ९.३० पी एम, आय एस टी. मी सहज बोलता बोलता त्याला बोलुन गेलो Happy new year... May the wind always be at your back and the sun upon your face. And may the wings of destiny carry you aloft to dance with the stars. (हा जॉनी डेपच्या ब्लो चित्रपटामधील दारु पिण्यापुर्वीचा चिअर्स क्वोट मी बरेचदा लोकांना गंमत म्हणून शुभेछा पध्दतीने देत असतो) पुन्हा म्हटले. यावर्षी कोठल्याच गोष्टीमधे हार मानु नका. जोमाने प्रयत्न करा यश तुमचेच आहे. पलिकडून रिप्लाय आला Well I am 83 year old. And by the end of 2015 probably I might be dead... so let me play one more game with you than thinking about your wishes seriously :)
7 Oct 2015 - 11:46 am | अभ्या..
Wow
7 Oct 2015 - 11:55 am | प्यारे१
Wishes मस्त आहेत आणि चेस मेट चा रिप्लाय देखील.
लेखाबद्दल नो कमेंट्स.
7 Oct 2015 - 12:03 pm | तर्राट जोकर
चेसमेटचा भारी चेकमेट....!
7 Oct 2015 - 5:01 pm | कपिलमुनी
ह्या डायलॉगची प्रेरणा येथून
May the road rise to meet you,
May the wind be always at your back.
May the sun shine warm upon your face,
The rains fall soft upon your fields.
And until we meet again,
May God hold you in the palm of his hand.
May God be with you and bless you:
May you see your children's children.
May you be poor in misfortune,
Rich in blessings.
May you know nothing but happiness
From this day forward.
May the road rise up to meet you
May the wind be always at your back
May the warm rays of sun fall upon your home
And may the hand of a friend always be near.
May green be the grass you walk on,
May blue be the skies above you,
May pure be the joys that surround you,
May true be the hearts that love you.
8 Oct 2015 - 9:16 am | असंका
_/\_
कुणाचंय?
8 Oct 2015 - 12:18 pm | कपिलमुनी
आयरीश प्रार्थना / आशिर्वाद आहे
8 Oct 2015 - 9:07 am | अभिजीत अवलिया
आपल्या मित्राचा रिप्लाय आवडला.
7 Oct 2015 - 11:49 am | अजया
:)
7 Oct 2015 - 5:25 pm | जगप्रवासी
भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७>>>>तारीख लिहायची पद्धत आवडली.
7 Oct 2015 - 5:49 pm | बॅटमॅन
ही 'तारीख' नसून 'तिथी' किंवा 'मिती' असावी. ;)
7 Oct 2015 - 5:55 pm | प्रसाद गोडबोले
तिथी मागुन तिथी , तिथी मागुन तिथी , तिथी मागुन तिथी मिळत राहिली न्यायाधीश महोदय परंतु न्याय मिळाला नाही , हन्त हन्त !
=))
7 Oct 2015 - 6:06 pm | बॅटमॅन
ठोठ्ठोठठठ्ठो ठठठोठठोठो =)) =)) =))
8 Oct 2015 - 9:33 am | आदूबाळ
लोल! माझ्या डोल्यांसमोर शेंडी उडवत कडाडणारा सनी आणि मख्खपणे जानव्याने पाठ खाजवणारे जजसाब आले!
8 Oct 2015 - 9:36 am | नाखु
चढ्ढा काय उपरणे घेऊन फिरणार काय ?
ह ह पु वा नाखु
8 Oct 2015 - 12:51 pm | बॅटमॅन
खी खी खी =))
7 Oct 2015 - 5:56 pm | प्रचेतस
बाकी 'शालिवाहन शके' असे म्हणून आपण एक प्रकारे परकियांचानीच सुरु केलेले संवत्सर साजरे करतो असं नै वाटत का? :)
7 Oct 2015 - 6:07 pm | कपिलमुनी
गौतमीपुत्राच्या जन्मापासून हा शक सुरू झाला ना ?
की त्यानेच सुरू केला?
- कंफ्यूज मुनी
7 Oct 2015 - 6:13 pm | प्रचेतस
नै.
बहुतेक अभ्यासक कुषाणवंशीय कनिष्काने हे संवत्सर सुरु केले असे मानतात आणि त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी हे संवत्सर निष्ठेने पुढे चालवले म्हणून याचे नामाधिमान 'शक' असे झाले.
7 Oct 2015 - 6:08 pm | बॅटमॅन
तो शालिवाहन राजाने सुरू केलेला प्रकार आहे. उगीच प्रत्येक गोष्टीवर 'शक' घेऊ नका, संस्कृतिद्वेष्टे कुठले ;)
7 Oct 2015 - 6:14 pm | प्रचेतस
खी खी खी. =))
बाकी हा शलिवाहन राजा म्हणजे नेमका कोण?
7 Oct 2015 - 6:17 pm | बॅटमॅन
शालिवाहन म्हणजे सातवाहनांपैकीच एक. तो कोण, कुठला हे विचारून तुम्ही संस्कृतीद्वेषच प्रकट करताहात. याचा निषेध म्हणून आज काय करावे याबद्दल एसेमेस मागवणार आहोत. ;)
7 Oct 2015 - 6:20 pm | प्रचेतस
काय सांगताय?
पण आमच्या माहितीत सातवाहन कुलात असंख्य राजे होऊन गेले त्यापैकी नेमका कुठला म्हणे हा?
एसेमेसचा कौल आम्हास जरुर कळवा :)
7 Oct 2015 - 7:30 pm | बॅटमॅन
अहो तोच तो, त्याच्या आईवडिलांचा मुलगा. त्याच्या अगोदरच्या राजाच्या जरासा नंतर आणि नंतरच्याच्या जरासा आधी सत्तेवर आला. ("पंधरावे शतक हे चौदाव्या शतकाच्या काहीसे नंतर आणि सोळाव्या शतकाच्या काहीसे आधी आले" च्या चालीवर वाचावे.) ;)
7 Oct 2015 - 8:01 pm | प्रचेतस
ओह्हो.
तो सालाहण कुलातील राजा होय.
8 Oct 2015 - 9:16 am | नाखु
पण दुसरीकडे कौले फोडणे (पक्षी) पाडणे हा बॅट्याचा तोंडचा "घासु" नाही हे नम्रपणे नमूद करतो.
कौले पडताना अंगणात दूर उभा राहणारा
नाखु सिमेंट स्लॅबवाला
7 Oct 2015 - 6:18 pm | प्रसाद गोडबोले
ज्याच्या नावाने शालिवाहन शक प्रसिध्द आहे तो . खे खे खे =))
7 Oct 2015 - 6:33 pm | तर्राट जोकर
--दुडदुडी मोड ऑन--
ह्या प्र्श्नाचे उत्तर असे मिपासारख्या उथळ विचाराच्या लोकांनी इथास संकल्पनांचा उकिरडा मांडलेल्या संस्थळावर मिळणार नाहि. त्यासाठी योग्य गुरु(जी)ची आवश्यकता आहे. ते लेण्या-दर्यांमधे, डोंगररांगांमधे फिर्वऊन फ्रिअवुन तोंडास फेस येउस्तोवर दर्पणसुंदर्ञांच्या म्रूर्तींमधून अध्यात्मिक इथास पाझ्लत असतात. त्याम्च्या उत्तरांना समजून घ्याला अति अति अति हुच्च साधना लागते. मुंबै च्या लेण्या, दक्षिणेतल्या फण्या, पठारवरच्या गोण्यांचा अस्चिंत अभ्यास लागतो. इथल्या मुजोर माकडांना काय अक्कल, तेव्हा असले प्रश्न आपण स्पेस्यल बैथकी कट्त्यात मांडावे अह्सी मी तुम्हाला इन्मंती करते.
--दुडदुडी मोड ऑफ--
----सगळ्यांनी थोडे 'लाइट लाइट' घ्या----
7 Oct 2015 - 6:49 pm | दिवाकर कुलकर्णी
शकि इन्सानो ,या धाग्या वर पण तुम्हीं विक्रमी शके कि शतके हाणू शकताय
किंवा शके सोडून आता विक्रमी पकडा सोडू नका
तुमच्या तील प्रतिभेला साष्टांग दंडवत
विक्रमी संवत्सर (........ )
7 Oct 2015 - 7:55 pm | पद्मावति
फटकळपणा आणि स्पष्ट वक्तेपणा मधला फरक न कळणे हा प्रॉब्लेम आहे त्या मुलीचा. ती मुलगी मनाने वाईट असे अजिबात नसणार/ नसावे पण कुठे, कोणासमोर आणि काय बोलावे याचं तारतम्य नाही, फिल्टर नाही ही समस्या आहे.
8 Oct 2015 - 9:19 am | असंका
+१
बोलायचा सेन्स अंमळ कमी. बाकी काही नाही.
8 Oct 2015 - 11:43 pm | विवेक ठाकूर
हीच घेऊ, चांगली आहे म्हणजे मुलगी आईसाठी उत्तम फ्रेम घेतेयं. आणि इंग्रजी वाक्याचा त्या अनुषंगानं अर्थ असा होतो की, (इतकी चांगली फ्रेम) तिला शेवटपर्यंत सुखाची ठरेल.
9 Oct 2015 - 12:55 am | तर्राट जोकर
---- आता हिकरं विंग्रजीचे कल्लास क दादूस ---
9 Oct 2015 - 10:35 am | टवाळ कार्टा
हेही असू शकते :)
9 Oct 2015 - 11:54 am | dadadarekar
अरारा .... मंदार जोशी इंग्लिश मेडियमातून शिकूनही काही ज्ञान नाही.
शिक्शान घ्या शिक्शान.
9 Oct 2015 - 12:40 pm | असंका
सर्वामुखी मंगल बोलवावे...
(पण मग आफ्टर ऑल म्हणायचे कारण काय?)
9 Oct 2015 - 12:47 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. आफ्टर ऑल मुळे अर्थाचा अनर्थ वगैरे वाटत नाही.
9 Oct 2015 - 1:21 pm | विवेक ठाकूर
आफ्टर ऑल ही इंग्रजीत सहज होणारी शब्द योजना आहे.
मुलीचा हेतू आईसाठी चांगली फ्रेम घेणं आहे हे लक्षात न आल्यानं लेख हुकला आहे.