मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 3:00 pm

काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे. पण मराठी विकिपीडियाच्या बर्‍याच वाचकांना विकि प्रकल्पांच्या परिघाची नेमकी जाण नसते आणि म्हणूनच मराठी विकिपीडियाच्या चर्चा:मुंबई पानावर एका मागून एक मुंबई विषयी गाणी दाखल होण्याचा अंदाज दिसतो आहे.

सी आई डी (C.I.D.) चित्रपटात गायक - मोहम्मद रफ़ी गातात

ऐ दिल है मुशकिल जीना यहाँ
ज़रा हट के ज़रा बच के
ये है बम्बई मेरी जान
- कवी = ?

लावणीकार पठ्ठे बापुराव त्यांच्या लावणीत म्हणतात

मुंबई ग नगरी सदा तरनी
व्यापार चाले मनभरुनी
दर्याच्या गो वरुनी
वरुनी जहाजे फिरती

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचीही लावणी आहे

मुंबईत उंचावरी मलबार हिल चंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती
परळात राहणारे रातदिस राबणारे
मिळेल ते खाऊन घाम गाळती //धृ //

बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर यांची मुंबईबद्दलची कविता अशी

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती
.....

मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानावरील अनाम लेखक/लेखिकाच्या मते बा. सी. मर्ढेकरांची ही मुंबईवरील कविता शालेय अभ्यासक्रमात कधीतरी होती (बहुतेक ९वी \ १० वी). 'पिपांत मेले'सारख्या दुर्बोध कविता लिहिणारे मर्ढेकर आणि अशी विलक्षण जिवंत कविता लिहिणारे मर्ढेकर हे दोन वेगवेगळे कवी वाटावेत इतक्या या कविता भिन्न आहेत.

अर्थात मराठी विकिपीडियावर या विषयावर साहित्यिक आस्वादात्मक चर्चा अधिक रंगण्याच्या आधी कॉपीराईट फ्री साहित्य मराठी विकिस्रोतावर स्थानांतरीत करणे, कॉपीराइटॅड काव्य वगळणे असे ज्ञानकोशातील संपादकीय क्रौर्य दाखवून ही साहित्य मराठी विकिपीडिया चर्चा पानावरुन केव्हातरी अलगद उडवली जाईल. अर्थात त्याच वेळी मिसळपाव आणि अन्य संस्थळांवर याच विषयावर चर्चा आणि लेखन झाले तर त्या बद्दल मराठी विकिपीडियावर येथे यणार्‍या माहितीची दखल घेऊन लेख निश्चीत लिहिता येईल.(येथील प्रतिसादांचा संदर्भ घेऊन मराठी विकिपीडियावर सुरु केलेला नवा लेख [[काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई]] येणे उद्देशाने आमच्या धाग्याच्या माहितीत अधिक भर घालणेसाठी सर्व मुंबई प्रेमी मराठी रसिक वाचक लेखकांना सप्रतिसाद आमंत्रण आहे.

आपले स्वतःचे या लेखासाठीचे प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकतात म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील.
प्रतिसादांसाठी आभार

संस्कृतीवाङ्मयआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

ललित अ‍ॅज़ सच नव्हे पण त्या लेव्हलचे असणारे एक अप्रतिम पुस्तक म्ह. "मुंबई शहराचें वर्णन" हे होय, १८६१ च्या आसपास प्रथम प्रकाशित झालेले आहे. लेखक गोविंद नारायण माडगावकर हे होत. अलीकडे ५० रु. प्रति पुस्तक अशा रेटने बरीच जुनी पुस्तके प्रकाशित केली जातात त्यांतच हेही प्रकाशित झालेय, तरी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2015 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त पुस्तक आहे.

-दिलीप बिरुटे

भाऊ पाध्ये यांनी राडा वगैरे कादंबरीत मुंबई मस्त दाखवली आहे.

तसंच "अधांतर" हे गिरणगावावरचं नाटकही फार छान आहे.

शरद's picture

9 Sep 2015 - 8:05 am | शरद

१८८९ साली प्रकाशित झालेल्या "मुंबईचा वृतांत" या पुस्तकाचे लेखक आहेत बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे अतिशय वाचनीय अशा पुस्तकातील एक महत्वाचा भाग म्हणजे त्यात दिलेली मुंबईची छायाचित्रे. १९८० साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने पुनर्मुद्रित केले आहे..
शरद

राही's picture

9 Sep 2015 - 9:21 am | राही

एकोणिसाव्या शतकापासून आधुनिक मुंबईचे उल्लेख मराठी साहित्यात सापडतात. अरुण टिकेकरांचे यावर एक सुंदर पुस्तक आहे. त्याही आधी सास्टीची बखर आणि महिकावतीची बखर यात तत्कालीन ठाणे जिल्हा म्हणजे सध्याची मुंबई उपनगरे यांची वर्णने आहेत. एकोणिसाव्या शतकात मुंबईची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने चौफेर वाढ झाली. त्याचे आलेख सर्वच क्षेत्रांतील साहित्यात उमटले आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी, वि.ना. मंडलिक यांची चरित्रे, न.र. फाटक यांचा मुंबईचा इतिहास, हे तर आहेच. शिवाय कविता, कादंबर्‍या, लघुलेख यातूनही ते उमटते. ना.सी.फडके यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍या, अनंत काणेकरांचे लेख, अगदी ह.ना. आपटे यांचे 'पण लक्षात कोण घेतो' किंवा रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील आठवणी' मध्येही मुंबई येते. भाऊ पाध्ये, मधु मंगेश कर्णिक, अनंत सामंत, श्री.ना.पेंडसे, अशोक शहाणे यांनी मुंबईवर आणि मुंबईच्या पार्श्वभूमीवर लिहिले आहे. जयंत पवारांचे एक नाटक गिरणीकामगारांच्या संपाने झालेल्या वाताहतीवर आहे. नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे ह्यांची एक वेगळीच मुंबई. ललित मासिकाच्या एका बर्‍याच जुन्या दिवाळी अंकात श्री.ना. पेंडसे यांचा एक सुंदर लेख होता. शिवाय गंगाधर गाडगीळ यांचे एक पुस्तक आहे. आणि इथे-तिथे विखुरलेले संदर्भसाहित्य तर विपुल आहे.
या सर्वात माहितीसाठी अरुण टिकेकर 'मस्ट' आहेत.

आदूबाळ's picture

9 Sep 2015 - 10:55 am | आदूबाळ

जयंत पवारांचे एक नाटक गिरणीकामगारांच्या संपाने झालेल्या वाताहतीवर आहे.

हेच ते "अधांतर". भरत जाधवच्या अभिनयासाठी नक्की पहावं. पुढे भरत जाधवगिरी करायला लागायच्या आधी केलेला सुन्दर अभिनय.

मासिकाच्या एका बर्‍याच जुन्या दिवाळी अंकात श्री.ना. पेंडसे यांचा एक सुंदर लेख होता.

याचे आणखी तपशील देता येतील का?

सायकलस्वार's picture

9 Sep 2015 - 8:54 pm | सायकलस्वार

हेच ते "अधांतर". भरत जाधवच्या अभिनयासाठी नक्की पहावं. पुढे भरत जाधवगिरी करायला लागायच्या आधी केलेला सुन्दर अभिनय.

भरत जाधव, ज्योती सुभाष आणि इतरांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेलं हे नाटक युट्युबवर उपलब्ध आहे. सोडू नका.
(यानिमित्ताने हेही लक्षात येईल की बरेच मराठी कलाकार मुळात अत्यंत टॅलेंटेड असतात. पण चांगल्या कथानकांचा अभाव, त्यांचा वापर करून घेण्याची क्षमता नसलेले सुमार दिग्दर्शक, आणि आचरटपणातच रमणार्‍या मराठी प्रेक्षकाची (म्हणजे आपली) हीन अभिरुची, यामुळे या लोकांचं पुढे माकड बनतं)

राही's picture

9 Sep 2015 - 11:40 pm | राही

ललित या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या मासिकाच्या जुन्या दिवाळी अंकात हा लेख वाचला होता. नायगाव (दादर पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सर्व मासिकांचे गट्ठे सुमारे पाच वर्षांपूर्वींपर्यंत होते. आताची स्थिती माहीत नाही. हा लेख दादर परिसराच्या झालेल्या स्थित्यंतरावर होता. नक्की वर्ष आठवत नाही पण खूप जुना असावा. (तीस वर्षे किंवा आधी.) इथे खूप जुने अंक होते. कदाचित मॅजेस्टिक प्रकाशनाकडेदेखील मिळू शकेल.
अलीकडे तलाश या चित्रपटात मुंबईचे सुंदर चित्रण होते. जुन्या चलतीका नाम गाडी मध्येसुद्धा होते. हार्बर रेल्वेच्या काळोख्या जिन्यांचे चित्रण गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर किंवा पाठलागाच्या दृश्यात हमखास असायचे. मराठीमध्ये मुंबईचा जावई आणि अलीकडचा डबल सीट, डोंबिवली फास्ट, अनेक आहेत. अवधूत गुप्तेचा गणपती उत्सवावरचा सिनेमा (मोरया?).. अनेक.

माहितगार's picture

9 Sep 2015 - 11:06 am | माहितगार

@ राही

रोचक प्रतिसाद !

आपल्या प्रतिसादाने म.वि काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई लेखातील परिचय परिच्छेदाचे कामही झाले. आभार

चलत मुसाफिर's picture

9 Sep 2015 - 10:02 am | चलत मुसाफिर

१. ऐ दिल है मुश्किल गाण्याचे कवी मजरूह सुल्तानपुरी.

२. मुंबईवरील काही अप्रतिम इंग्रजी पुस्तके:

Maximum City (Suketu Mehta)
Behind the Beautiful Forevers (Catherine Boo)
Black Friday (S Hussain Zaidi)

चलत मुसाफिर's picture

9 Sep 2015 - 10:08 am | चलत मुसाफिर

नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणावरचं "Murder in Mumbai" हे मुंबई मिररच्या संपादक मीना बाघेल यांनी लिहिलेलं पुस्तक मुंबईचा एक्सरेच काढतं.

सुनील's picture

9 Sep 2015 - 10:13 am | सुनील

हुसेन झैदी यांच्या डोंगरी टू दुबई ह्या पुस्तकाचादेखिल समावेश इथे योग्य ठरावा.

माहितगार's picture

9 Sep 2015 - 10:27 am | माहितगार

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

अर्थात हे साहित्य ललित अथवा ललितेतर आहे, वर्णनात्मक-काल्पनिक आहे अथवा वर्णनात्मक-वस्तुनिष्ठ, संशोधनात्मक-वस्तुनिष्ठ इत्यादी बद्दल जाणकारांनी ढोबळ माहिती जेथे शक्य तेथे देत गेल्यास मराठी विकिपीडियातील नोंदींना अधिक नेमकेपणा देता येईल.

ऐ दिल है मुश्किल गाण्याचे कवी मजरूह सुल्तानपुरी.

माहिती बद्दल आभार. खाली मी पोस्ट देताना आपला संदेश पाहण्यात नव्हता आला

माहितगार's picture

9 Sep 2015 - 10:20 am | माहितगार

ये है बम्बई मेरी जान चे रचनाकार कवी कोण आहेत ? इंग्रजी विकिपीडियावर संगीत ओ.पी. नय्यर असल्याचे लिहिले आहे.

सुनील's picture

9 Sep 2015 - 10:26 am | सुनील

गाणे नीट ऐकले तर गायक 'बंबई' असे उच्चारत नसून 'बॉम्बे' असे उच्चारतो, असे वाटते.

माहितगार's picture

9 Sep 2015 - 10:32 am | माहितगार

ओह असंय का ? मी हिंदी गाणी मुंबई विषयक साहित्य हा माझ्या व्यक्तीगत परिघात कमी येतात म्हणून या धाग्या प्रमाणे आपल्या प्रमाणे इतर सर्वांनी माहितगार होऊन अशीच माहिती द्यावी. :)

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 8:04 pm | बोका-ए-आझम

यांनी हे गाणं गायलेलं आहे. त्यात रफीसाहेब (पडद्यावर जाॅनी वाॅकर) बंबई असाच उच्चार करतात. गीताजींच्या आवाजात (पडद्यावर कुमकुम ) खालील ओळी आहेत -
बुरा दुनिया को है कहता
ऐसा भोला तू न बन
जो है करता वो है भरता
है यहांका ये चलन
दादागिरी नही चलनेकी यहां
ये है बाँबे ये है बाँबे ये है बाँबे मेरी जान
ऐ दिल है आसान जीना यहां
सुनो मिस्टर सुनो बंधू ये है बाँबे मेरी जान

गायक नाही, गायिका बाँबे असं उच्चारते.

सिरुसेरि's picture

9 Sep 2015 - 7:27 pm | सिरुसेरि

देव आनंदच्या "टॅक्सी ड्रायव्हर" व इतर अनेक चित्रपटांत त्या काळातील मुंबई शहराचे सुरेख दर्शन घडवले आहे .
देव आनंदच्या आत्मचरित्रातही त्या काळातील मुंबई शहराचे सुरेख वर्णन आहे .

रात के बारा बजे दिन निकलता हय, सुबाके छे बजे रात होति है
दरिया किनारोवाली फिल्मी सितारोंवाली ये है.. आमची मुम्बै.. आमची मुम्बै.. आमची मुम्बै..

माहितगार's picture

9 Sep 2015 - 9:33 pm | माहितगार

गीतकार कोण आहेत ?

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 7:57 pm | बोका-ए-आझम

ही अरुण साधूंची मुंबईवर असलेली राजकारणाच्या पार्श्वभूमीवरची अप्रतिम कादंबरी. शिवाय सुकेतू मेहता यांनी लिहिलेलं Maximum City ही छान आहे. अरुण साधूंचीच झिप-या, भाऊ पाध्यांची वासूनाका, याही मुंबईची पार्श्वभूमी असलेल्या काही छान कादंब-या आहेत.

चलत मुसाफिर's picture

9 Sep 2015 - 10:09 pm | चलत मुसाफिर

जयंत पवार यांचा 'फीनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा जबरदस्त कथासंग्रह म्हणजे १९७० ते ९० या काळातील मुंबईचं जणू जिवंत आत्मचरित्र आहे. यातली प्रत्येक कथा पुनर्वाचनातही तितकीच प्रत्ययकारी भासते. कधीतरी या पुस्तकाचं मिपावर विस्तृत रसग्रहण करण्याचा प्रयत्न करीन.