===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================
मॅनी माझा शेजारी, त्याचा एक दिवस टेक्स्ट मेसेज आला, "घरी केंव्हा येशील ते कळव, माझा दूरचा भाचा भारतात जाणार आहे, त्याला जायच्या आधी तुला भेटायचं आहे." मी मीटिंगमध्ये होतो, त्याला 'After 9pm' इतकंच उत्तर दिलं. घरी पोहोचेपर्यंत १० वाजले होते, तोवर थांबून त्याचा भाचा निघून गेला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी तो आफ्रिकेत काही दिवस राहण्यासाठी निघून गेल्याने भेट वा बोलणं झालं नाही, पण इ मेल करेल असं कळलं. मुंबईत दोन दिवस राहून तो काश्मीर-लेह वगैरे ठिकाणी फिरायला जाणार होता, म्हणून त्याने 'मुंबईत काही मदत लागलीच तर संपर्क करता यावा' म्हणून संपर्कासाठी काही नाव-पत्ते देण्याची मला विनंती केली होती. मी मॅनीला माझ्या एका जवळच्या मित्राचा संदर्भ दिला, आणि त्या मित्रालाही या भाच्याचं नाव कळवलं आणि फोन येऊ शकण्याविषयी कळवलं.
हा मॅनीचा भाचा दक्षिण अमेरिकेत ब्राझील मध्ये अकाऊंटंट आहे, आणि त्याला दर-वर्षी सुटी काढून देश-विदेश भटकायची हौस आहे हे मला कळलं होतं. मॅनीच्या बोलण्यातून तो कदाचित पुण्याजवळ कोरेगाव पार्क पाशी ओशो आश्रमातही जाईल, असं कळलं, तेंव्हा मी मॅनीला म्हंटलं, "अरे, हवं असेल तर त्याची पुण्यात नातेवाईकांना विचारून रहाण्याची व्यवस्था मी करू शकेन'". यथावकाश, हा भाचा पुण्याला गेलाच नाही.
असो, तर या मॅनीच्या लाझ नामक दूरच्या भाच्याची ही संक्षिप्त भारत भ्रमण-कथा. खरं तर दोन-तीनच ठिकाणांचं वर्णन इथे आहे. त्याने कुटुंबियांना पाठवलेल्या ४-५ ई-मेल्स द्वारा ही भ्रमण-कथा माझ्यापर्यंत पोहोचली. लाझच्या निवेदनात मी कुठेही माझे शब्द घातलेले नाहीत. (काही ठिकाणी तो अपूर्ण माहिती असलेला परदेशी म्हणून काही चुका करतो, उदाहरणार्थ, लद्दाखला तो राज्य म्हणतो, पण मी ते तसंच ठेवलं आहे.) त्याला दिसला तसा भू-भाग आणि तिथले अनुभव त्याच्याच शब्दांत - फक्त मराठीत रुपांतरित करून- मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्याची अर्थातच परवानगी घेतलेली आहे. फक्त, त्याने पाहिलेली बहुतांश ठिकाणं भारतीय असूनची मी स्वत: अजून पाहिलेलीच नाहीत, तेंव्हा निदान माझ्या स्वत:च्या संदर्भासाठी असावं म्हणून 'गूगल अर्थ' चा वापर करून मी काही ठिकाणं शोधली आणि तिथले फोटो आंतर्जालावरून शोधून इथे टाकलेले आहेत. (लाझने मला त्याचे iPhone वर घेतलेले फोटो आणि व्हिडिओज यासाठी iCloud चा दुवा दिला, पण माझ्या कडे iPhoneचा अकाऊंट नसल्याने मला ते पहाता आले नाहीत.) जिथे त्याच्या विधानांशी संबंधित अधिक माहिती शोधणं शक्य झालं, तिथे अशी माहिती त्याच्या त्या-त्या-दिवशीच्या इ-मेल नंतर मी वेगळी देत आहे.
भारतभेटीला प्रथमच येणार्या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून हा प्रयत्न. वेळेअभावी आजचा पहिला भाग लहान आहे. शीर्षकाचा संदर्भ पुढील एका भागात येईल....
********************
लाझ केप टाऊन वरून निघून मुंबईत पोहोचला आणि एक दिवसच थांबून त्याच्या इतर आंतरराष्ट्रीय मित्रांबरोबर काश्मीरला रवाना झाला, त्यामुळे माझ्या मित्राशी संपर्क करायची वेळ त्याच्यावर आलीच नाही. तेंव्हा हे प्रवासवर्णन सुरू होतंय ते लेह पासून.
********************
Greetings from Leh in Ladakh India!
मी भारताच्या उत्तर भागात हिमालयात पोहोचलो आहे. या शहराचं नाव आहे लेह. लद्दाख राज्याची ही राजधानी. आंतर्जाल आणि फोन सेवा दुर्मिळ आणि बेभरवश्याची आहे. काल मी लेह पासून १०० किलोमीटर्स वर असलेल्या जगातल्या सर्वोच्च अशा motorable pass वर mountain biking साठी गेलो होतो. साडेपाच हजार मीटर्स उंचीवर हे Marsimik La नावाचं ठिकाण आहे. एका जीपने आम्ही सायकल्स घेऊन वर गेलो आणि येतांना ४० किलोमीटर mountain bikes घेऊन उतरलो. माझ्याकडे GoPro Camera ने घेतलेले काही अप्रतिम व्हिडिओज आहेत, ते मी नंतर पाठवेन. अर्थात गो-प्रो ने व्हिडिओ घेण्याच्या नादात मी काही वेळा धडपडलो, पण काळजी करण्यासारखं काही नाही, थोडंसं खरचटलं इतकंच! आणि मला माझ्या उतारावर handle-bar वर एक हात धरून दुसऱ्या हातात GoPro ने शूटिंग करण्याच्या आचरटपणाची शिक्षा मिळायलाच हवी होती :-)
उद्या आम्ही white water rafting साठी जाऊ. माझी हे करण्याची पहिलीच वेळ असेल, त्यामुळे मी खूप उत्साहात आहे आणि आतुरतेने वाट पहातो आहे.
ही जागा अभूतपूर्व निसर्ग-सौदर्याने नटलेली आहे. पर्वत, दऱ्या, नद्या, आणि तलाव… नजर ठरत नाही! परवापासून आम्ही चार दिवस आणि तीन रात्रींसाठी विपश्यनेला (mediation retreat) जाऊ. चार दिवस मौन, आणि पर्वतामध्ये योगासनं. तुमची सर्वांचीआठवण येतेच. आम्ही निदान आणखी आठवडाभर इथे असू. इतकं काही पहाण्यासारखं आहे इथे, आम्ही खूप मस्तीत आहोत. इथून निघालो की मुंबईकडे जायला निघेन, शक्य झालं तर वाटेतल्या काही शहरांना भेट देईन.
- लाझ
मार्सिमिक ला या ठिकाणाचा फोटो अंतर्जालावर शोधायला गेलो तर या दुव्यावर खालील काही उल्लेखनीय माहिती मिळाली. भारताच्या सीमा-सुरक्षिततेच्या संदर्भात ही टिप्पणी महत्वाची वाटली.
http://www.passzwang.de/highroadsinhalteng.php: Some 100 kilometers east of Leh the Marsimik La is located in Ladakh. Respective elevation figures of that passroad vary in different sources between 5,582 and 5,680 meters. Satellite images report an altitude of some 5,600 meters / 18,373 ft and pictures on the internet show that this pass is accessible by 4WD all-terrain vehicles and motocross bikes. However, the dirt track was said to be prohibited in the past to foreign nationals as the pass is situated near the cease fire line between India and China. Current situation is unclear. However, an increasing number of reports of foreign motocross bikers having reached the pass summit can be found on the internet. Thus, given facts argue for Marsimik La being currently the highest actually accessible pass road for cyclists in the Himalayas.
आजच्या भागाच्या शेवटी, लद्दाखच्या निसर्ग-सौंदर्याविषयी यू-ट्यूबवर ही सुंदर time lapse चित्रफीत सापडली:
प्रतिक्रिया
1 Sep 2015 - 5:27 am | स्पंदना
बहूगुणी!!
कोणत्याही स्वतःच्या मतांचा स्पर्श सुद्धा न होउ देता एका प्रवाश्याकडून भारताबद्दल ऐकाय्ला मिळण ही एक पर्वणीच!!
मस्त!
(मॉरीशस मधल्या पंचतारांकित रोझॉर्ट च्या वर्णनाबरोबर भारतिय लोकांच्या स्लम संस्कृतीची वर्णने ऐकून हिरमुसलेली)
1 Sep 2015 - 6:01 am | श्रीरंग_जोशी
एका परदेशी माणसाच्या भारतभेटीचे अनुभवकथन थेट जसेच्या तसे मराठीतून वाचायला मिळणे ही एक पर्वणीच असणार. सुरुवात उत्तम झाली आहे. पुभाप्र.
अवांतर - माझा इथला शेजारीही त्याच्या नोकरीतून भारतभेटीवर जाऊन आलेला आहे. तो बंगळुरू व म्हैसुरु येथे राहिलेला आहे तसेच विना रिझर्वेशन भारतीय रेल्वेने फिरला आहे. त्याला वाटले संपूर्ण भारतात हवामान एकदम दमट असेल (कारण त्याचा अनुभव बंगळुरूचा). त्यावर आम्ही त्याला सांगितले की आमच्या राज्यात मुंबई सोडल्यास हवामान एकदम आल्हाददायक असते (अपवाद केवळ उन्हाळ्याचा) :-) .
1 Sep 2015 - 6:44 am | रेवती
पहिला भाग आवडलाय. स्पंदना व श्रीरंगपंतांशी सहमत. चित्रफित बघताना पार्श्वसंगीतही आवडले.
1 Sep 2015 - 6:49 am | पुण्याची दीपी
त्याने केलेलं कौतुक ऐकून खुप छान वाटला.
पण!
माझ्या मुलीच्या शाळेत एक खेळ पाहिला परवा . सर्व देशांचे पत्ते बनवलेले आणि त्यावर काही प्रसिद्ध स्थळांची चित्रे व खाली माहिती होती . फ्रांस चा आईफेल टोवर तर इंग्लंडच्या राणीचा कसला तरी सोहळा. असा प्रत्येक देशाचा सुंदर सुंदर वर्णन. मी उत्सुकतेने भारताचे पत्ते शोधले, वाटला ताजमहाल नक्कीच असणार. किव्वा काश्मिरचा कुठल्याही ऋतूत, कुठल्याही ठिकाणी घेतलेला फोटो तरी. पण कसला काय ! एक फोटो होता मुंबई च्या रस्त्यांवर खात बसलेला एक लहान भुकेला, कळकटलेला मुलगा. खाली वर्णन : असे कितीतरी भिकारी भारतामध्ये जागोजागी असतात.
दुसरा फोटो होता खरखरीत उन्हामध्ये सुकलेल्या विहिरीतून पाणी शोधणाऱ्या काही गावाकडच्या बायका. खाली वर्णन : भारतामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी पण झगडावे लगते.
अक्षरश: जीव तुटला हे पाहुन. जरी हे थोड्या अंशी खरं असला, तरी हेच म्हणजे भारत अशी ओळख लहान मुलांना करून देणं कितपत योग्य आहे?
1 Sep 2015 - 7:13 am | श्रीरंग_जोशी
हरकत नसल्यास ही गोष्ट कुठल्या देशात घडली आहे ते सांगावे.
यावरून Thomas Friedman यांचे हे विधान आठवले.
When I was growing up, my parents used to say to me: "Finish your dinner -- people in China are starving." I, by contrast, find myself wanting to say to my daughters: "Finish your homework -- people in China and India are starving for your job."
1 Sep 2015 - 7:33 am | पुण्याची दीपी
ऑस्ट्रेलिया
1 Sep 2015 - 7:46 am | श्रीरंग_जोशी
उत्तरासाठी धन्यवाद.
खरं तर ऑस्ट्रेलिया अन भारत हे भौगोलिक अंतर एवढेही नाही. तसेच ब्रिटिशांचे राज्य व क्रिकेट हे दोन्ही सांस्कृतिक दुवेही आहेत. हा प्रकार कुणा एका व्यक्तिचा खोडसाळपणा असण्याचीच शक्यता वाटते.
1 Sep 2015 - 9:23 am | पुण्याची दीपी
काश ऐसा होता !
पण तो खराखुरा गेम होता (प्रिंटेड कार्ड्स). मी प्रयत्न करते त्याचे फोटो काढुन इथे टाकायचा.
1 Sep 2015 - 11:42 am | तात्या
या प्रकाराचा निषेध नोंदवा.
छायाचित्रे असल्यास भारतीय वकिलातीला ईपत्र करा. ही गोष्ट सार्वजनिक पटलावर येउ द्या.
बर्या वाईट गोष्टी प्रत्येक देशात असतात पण ती त्या देशाची ओळख होउ शकत नाही.
2 Sep 2015 - 5:08 am | स्पंदना
मी पण आहे ऑस्ट्रेलियात दिपी!!
कोठे घडल हे? सिडनी? मेलबर्न? की अॅदेलेड?
17 Sep 2015 - 6:25 am | पुण्याची दीपी
मेलबर्न.
मोठ्या मेहनतीने फोटो मिळवले, पण त्यापेक्षा जास्त मेहनत इथे टाकायला लागतेय असा दिसतंय, कोणी सांगेल का, इथे कसे attach करू?
17 Sep 2015 - 6:07 pm | बहुगुणी
गणपा यांनी दिलेली माहिती
1 Sep 2015 - 6:52 am | अजया
परदेशी व्यक्तीच्या नजतरेतला भारत मराठीतून वाचणे छान अनुभव असणार आहे याची चुणूक पहिल्याच भागात दिसतीये.पुभाप्र.
1 Sep 2015 - 7:52 am | जुइ
सुरवात खूपच छान झाली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
1 Sep 2015 - 8:51 am | एस
पुभाप्र!
1 Sep 2015 - 9:30 am | अविनाश पांढरकर
परदेशी व्यक्तीच्या नजतरेतला भारत मराठीतून वाचणे छान अनुभव असणार आहे.
1 Sep 2015 - 10:35 am | यमन
मेजवनी मिळणार अस दिसतय
1 Sep 2015 - 10:45 am | मांत्रिक
खूपच मस्त! अगदी रोचक संकल्पना आहे. मजा येणार पुढील भाग वाचायला.
1 Sep 2015 - 11:20 am | प्रशांत
पुभाप्र
1 Sep 2015 - 2:34 pm | पद्मावति
पुढील भाग वाचायची उत्सुकता लागली आहे.
1 Sep 2015 - 8:20 pm | यशोधरा
वाचते आहे..
1 Sep 2015 - 8:54 pm | निनाद मुक्काम प...
चांगली सुरवात
भाग थोडा मोठा असायला हवा होता बुआ
4 Sep 2015 - 4:54 pm | पैसा
एकदम नवीन प्रकार!
11 Sep 2015 - 11:01 pm | बहुगुणी
17 Sep 2015 - 6:54 pm | एस
वा! हा कोण कुठचा लाझ, भारतात येतो काय, हिंडतो काय, मौजमजा करतो काय, आयुष्यातला थरार अनुभवतो काय! मी भारतात जन्मलो असून देखील यातल्या एक टक्का गोष्टीही केल्या नाहीत. एक प्रकारचा हेवा वाटतो लाझचा.
तुम्ही हे अनुभववर्णन आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
17 Sep 2015 - 7:11 pm | बहुगुणी
लाझने मलेशियातून पुढच्या प्रवासाचा विरोप पाठवला आहे. वाचकांना उत्साह असेल तर जमेल तसे पुढील विरोपही रुपांतरित करीन.