- प्रेरणा क्र. १: फस्ट साईट लव....
- प्रेरणा क्र. २: घालमेल : हे प्रेम होतं की आकर्षण ?
सांप्रत वरील दोन धागे मिपावर प्रचंड लोकप्रियता मिळवत असल्याचे पाहोन प्रस्तुत लेखकासही त्याचे पहिलेवहिले प्रेम आठवले आणि त्या उमाळ्यात/ऊर्मीत/उकाळ्यात मागचापुढचा विचार न करता हरहमेश जैशे येक हाडाचा मिपाकर करतो तैशेच प्रस्तुत लेखकाने (येथून पुढे प्र. ले.) आपलेही स्मरणरंजन थोडासा मालमसाला व फोडणी लावोन येक अनोखे व्यंजन म्हणून येथे टाकण्याचे ठरौले आहे. येथपरेंत बोअर झालेल्यांनी पुढचा धागा स्किप मारला आणि निव्वळ प्रीतीक्रियांवर नजर फिरविली तरीही बहोत मनोरंजनाची ग्यारंटी आहे.
तर मी काय सांगत होतो? हां! तर तेव्हा प्र. ले. 'बालवाडी' नावाच्या येका रम्य ठिकाणी दररोज जात असे. (दररोज म्हणजे रविवार सोडून. आले लगेच छिद्रान्वेषीपणा करायला!) आमची बालवाडी येका मोठ्ठ्या खोलीत भरत असे आणिक येक छोट्याश्या बाई ती चालवीत असत. बाई एकंदरीतच चांगल्या होत्या आणि अस्मादिक त्यांचे फार्फार लाडके विद्यार्थी होतो असे आम्हांस आठवते. त्या काळी 'बालवाड्या'च होत्या आणि 'के. जी. - बी. जी.' आसले लाड कुठेच नव्हते. तेव्हां फकस्त 'केजीबी' आणि 'शीआयये' असायच्या. दोहोंचे प्र. ले. वर बरीक लक्ष होते आणि आमच्या सहाध्यायी बालमित्रांमध्ये त्यांचे येजंट्ट भरलेले असणार असा प्र. ले. ला बारीक डौट असल्याने प्र. ले. स्वतःचा कंपू बनवून सौंशयास्पद पोराटोरांना बदडून काढण्यात मग्न असे. याबद्दल तत्कालीन संमं ऊर्फ बाईंनी प्र. ले. ला प्र. ले. च्या आऊसाहेबांसमोर समजही दिल्याचे स्मरते.
बालवाडी ही नेमकी आळोखेपिळोखे देऊन परत एकदा अंथरुणात गुडूप होण्याच्या वेळेतच (पक्षी: सक्काळीसक्काळी) भरे आणि आम्हां मुलांची पकडापकडी अगदी रंगात आलेली असतानाच सुटे. अर्थात दोन्ही वेळेस प्र. ले. हा अनुक्रमे आई आणि बाईंवर प्रचंड नाराज असे. सकाळी एकदाचा तो मारूनमुटकून बाळराजेंना आंघोळ घालण्याचा आणि तयार करून मग राजांच्या घशात दूध ओतण्याचा कार्यक्रम पार पडला की आऊसाहेब आम्हांस बखोटीला धरून बालवाडीत सोडून येत. पाठीला लावलेले लाल-पिवळ्या-गुलाबी-हिरव्या रंगाचे दप्तर, त्यात येक दगडी पाटी, दर दोनेक दिवसांनी घ्यावी लागणारी पेन्शिल आणि दप्तराला अजिबातच म्याच न होणार्या रंगाची पाण्याची बाटली असा येकंदर सगळा जामानिमा घेऊन आमची स्वारी आईचे बोट पकडून रस्त्याने चालत असे तेव्हा रस्त्यावरचे समस्त भू:भू: उत्सुकतेने आमच्याकडे पाहत असत. त्यामुळे अस्मादिक जगात सर्वात हॅण्डसम मुलगा आहोत असा आमचा समज होण्यात वेळ मुळीच लागला नाही.
हां आता ते वयच असं असतं त्याला प्र. ले. काय करणार? 'वयम् मोठ्ठम् खोट्टम्' या नाटकाचे नाव आमच्यावरूनच स्फुरले असणार याबद्दल प्र. ले. ला यत्किंचितही डौट नाही - ते नाटक काही का असेना. तरीच पहिलीच्या शाळेत प्र. ले. ला घालायला गेलेल्या प्र. ले. च्या आबासाहेबांस त्या बाईंनी 'याचे वय अजून बसत नाही. बालवाडीतच राहू द्या अजून एक वर्ष!' असे म्हणल्यावर प्र. ले. ला कोण आनंद झालेला. कारण चाणाक्ष वाचकांनी वळखलंच असेल. कारण 'ती' अजूनही 'त्याच' जुन्या शाळेत (पक्षी: बालवाडीत) जात होती. (लहान होती ना! म्हणून.)
मग आम्हीही शिंगं फुटलेल्या गोर्ह्याप्रमाणे जे उधळलो ते डायरेक्ट आमच्या त्या रम्य बालवाडीत घुसून तिच्याच शेजारी बसकर हातरून बसलो एकदाचे. काय आहे, तिची पेन्शिल हरवली होती ना, रोजच्यासारखीच. मग तिला पेन्शिल कोण देणार? आम्हीच. (दुसरा कोण देतोय बघूच. 'शीआये कुठचे!' शी आली की 'आये, शी आये, शी आये' अशी केविलवाणी हाक मारत बसणारे!) तर मग ती प्र. ले. ला बघून दात विचकून हसली. आणि प्र. ले. ने पण दप्तरातली नवीनचक पेन्शिल काढून तिला देह्ली. ती लय भारी पेन्शिल होती. एका साईडला गेरूसारखी लाल होती. पाटीवर बाईंनी शिकवलेले 'एकं, दोनं..' काढले की प्र. ले. अशा पेन्शिलीच्या गेरूच्या साईडने दोन अंकओळींमध्ये छान रेषा मारून पाटी सजवत असे आणि पळतपळत जाऊन बाईंना दाखवत असे. बाईंनी हसून शाबासकी दिली की परत आपल्या जागेकडे येताना प्र. ले. च्या चेहर्यावर जग जिंकल्याचा आविर्भाव असे.
तर पुढे झाले काय, की प्र. ले. ला आऊसाहेब येका वेगळ्याच ठिकाणी येके दिवशी घेऊन गेल्या. तिथे येक मोठ्ठा मंडप हुभारला होता आणिक बरीच मोठी माणसे (मोठी म्हणजे तेव्हाच्या प्र. ले. च्या वयाच्या मानाने मोठी) उगाचच इकडून तिकडे फिरत होती. लाऊडश्पीकरवर मोठ्ठ्या आवाजात कायकाय गाणीपण सुरू होती. आणि त्या समस्त गोंधळाकडे दुर्लक्ष करत आम्हां बाळगोपाळांची लपाछपी, पकडापकडी, आणि अजून कायकाय खेळ सुरू होते. तेवढयातही मातोश्रींनी आम्हांस पकडून त्यांच्या मोठ्या माणसांच्या कंपूत नेले आणि दोन्ही पायांत आम्हांस पकडून ठेवून त्या इतर कंपूबरोबर गफ्फा मारण्यात पुनश्च दंग जाहल्या. आता काय पर्यायच उरला नसल्याने मगाशी मांडवाबाहेर मिळालेली गारेगार खातखात प्र. ले. समोर काय सुरू आहे हे पाहू लागला. तर पुढे येक श्टेज आणि श्टेजवर सग्गळ्यांपेक्षा वेगळीच कपडे घातलेले दोघेजण होते. येक माणूस आणि येक बाई. मग त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले. तेव्हाच आम्हांला डौट आला की हा वरती पण येक कंपूकट्टा सुरू असणारेय. पण थोडक्याच वेळात तिथला गोंधळ सुटला आणि त्या बाबाने आणि बाईने येकामेरीच्या गळ्यात फुलांचे मस्तमस्त अशे हार घातले. मग उपस्थित सर्वजनसमुदाय टाळ्यांचा कडकडाट करता जाहला. हे सगळे प्र. ले. डोळे मोठ्ठे करून पाहत होता. तर बाजूच्या येक काकू हसून प्र. ले. ला म्हणाल्या, ' काय मग? उरकायचे का तुझेपण ह्याच मांडवात?'
प्र. ले. निरागसपणे म्हणाला, 'काय उरकायचे?'
तर अजून येक काकू चित्कारल्या, 'अरे लग्न उरकायचे का तुझे?' बघ, ह्याच मांडवात बर्याच पोरी खेळताहेत. त्यातलीच एक छानछान पोरगी करू तुला. बोल, करतोस का लग्न?'
खोटे का बोला? अस्मादिकांसही हा नवा खेळ खेळायची चांगलीच हुक्की आली होतीच.
'होऽऽऽऽ.' तोंडातली गारेगार न काढताच प्र. ले. उद्गारला तसे सर्व काकूमंडळी खो खो करून हसली.
आमच्या वयपरत्वे वेगाने विस्तारणार्या सामान्य ज्ञानात त्या प्रसंगाने 'लग्न', 'नवरा', 'बायको' या नवीन संज्ञांची अमूल्य भर पडली. आणि त्या वयात नवीन काही शिकायला मिळाले की लगेच 'प्रॅक्टिकल' करायची सुरसुरी ह्याही बाबतीत अंगात आणि इवल्याश्या मेंदूत खेळू लागली.
बास, बास, बास. आता दुसर्या दिवशी लग्न का काय ते 'उरकूनच' टाकायचं हे अस्मादिकांनी ठरवून टाकलं. पण लग्न करायचं कसं? प्रत्येक गोष्टीत 'आई, मी हे करू?', 'आई, मी ते करू?' असे आज्ञाधारकपणे आधी विचारायची सवय (पक्षी: आऊसाहेबांना भंडावून सोडण्याची खोड) लागलेली होती ना!... पण त्या दिवशी मला तयार करताना आऊसाहेबांचा मूड काही ठीक दिसत नव्हता. नळाला पाणी का काय ते आले नव्हते वाट्टे. त्यामुळे एरवीसारखे घंघाळ्यात मला बुचकाळून काढण्याऐवजी आज फक्त दोन तांबे भसाभसा ओतले गेले, खसाखसा केस व अंग पुसले गेले आणि आमच्या भोकाडाकडे दोन रट्टे घालत कंप्लीट दुर्लक्ष करून शेवटी एकदाचे आम्हांला आमच्या बालवाडीत पोहोचवले गेले. आज बाईंनीही खेळबिळ न घेता आमच्याकडून नुसतेच पाटीवर काहीतरी गिरवून-गिरवून घेतले. काय तो कंटाळवाणा दिवस. आणि अशा त्या रटाळ वातावरणात प्र. ले. चे प्रेम कसे काळेकाकूंच्या कुंपणाच्या टणटणीच्या नारिंगी-जांभळ्या फुलांप्रमाणे फुलत होते. सरतासरता शेवटी बालवाडी त्या दिवसापुरती संपायला आली. बालवाडीच्या बाहेर आपापल्या दिव्यांची वाट बघत समस्त माऊली थांबलेल्या आतून प्र. ले. ला दिसत होत्या. त्यात अजून आमची माऊली नव्हती अन् तिचीपण नव्हती. इकडे बाईंनी मग एकेका मुलाला त्या-त्या आयांकडे सोपवायला सुरूवात केली. ज्याची आई आली होती, ते बालक जात असे. बाकीचे थांबत होते. असा निम्मा वर्ग रिकामा झाला. मग आत्ता कुठे प्र. ले. ला त्याच्या टणटणीच्या फुलाशी बोलायची संधी मिळाली.
आता इथून पुढचा संवाद प्र. ले. ला जसा आज आठवतो आहे तसा दिलेला आहे. कृपया या क्षणाचे साक्षीदार असलेले प्र. ले. चे सौंगडी (पक्षी: केजीबी/शीआयये) इथे असतील तर कृपया मजकुरात दुरूस्ती करणे. कसंय, 'आयतिहाशिक' तपशीलात कानामात्रावेलांटीचाही फरक नको व्हायला. नाहीतर आमराठी-आसाहित्य-आखजिन्यात (आ = अखिल) खडूने लिहिला गेलेला हा अनमोल ठेवा समीक्षकी गाळणीतून कायमचा गाळला जायचा!
प्र. ले. (दप्तर व चड्डी एकाच वेळी सावरत): "ए!"
टणटणीचे फूल (अंगठा चोखत) : "अं?"
प्र. ले. : "उम्म, मला ना, मला ना, तुझ्याशी ना लग्न करायचंय."
टणटणीचे फूल (नजर दाराकडे, तिच्या आईला शोधत) : "हूं."
प्र. ले. (निराश न होता) : "ए, चल ना! आपण ना, लग्न करू."
टणटणीचे फूल (मान फुल डावीकडे आणि तिकडून फुल उजवीकडे हलवत आणि फ्रॉक एका हाताने पकडत) : "नक्को!"
प्र. ले. : "करू ना, चल ना!"
टणटणीचे फूल : "मला घरी जायचेय!" (आणि जाऊन दारापाशी उभी राहते.)
अशा रीतीने पहिल्यावहिल्या प्रपोज मारण्याच्या प्र. ले. च्या आकांक्षांना मिळालेल्या वाटाण्याच्या अक्षता पाहून प्र. ले. त्याच्या तत्कालीन बालसुलभ स्वभावानुसार प्रचंड नाराज झाला आणि धुसफुसतच एका हाताने दप्तर ओढत बाईंकडे गेला.
"बाई, बाई!" (बाईंच्या साडीचा पदर ओढून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत.)
"काय रे? थांब जरा. तुझी आई आल्याशिवाय तुला सोडणार नाही."
(परत एकदा अॅक्शन रिप्ले) "बाई, बाई!"
"काय?"
"मला तिच्याशी ना लग्न करायचेय!"
"क्काय? काय म्हणालास? काय करायचेय?"
"उम्म्, ल-ग्न."
(आश्चर्याने हसून) "कोणाशी करायचेय?"
"तिच्याशी..." (टणटणीच्या फुलाकडे बोट दाखवून)
"अच्छा? थांब हा, तुझी आई आली ना की तिला विचार हां हिच्याशी लग्न करू का म्हणून."
झालं, आली का पंचाईत! आमच्या आऊसाहेब कुठल्या देताहेत परवानगी? पण हे आमच्या बाईंना कसं समजावणार? ठीक आहे, जीवाचा हिय्या करून आज मातोश्रींकडे विषय काढायचाच असे प्र. ले. ने ठरवले.
आणि हे काय, आल्याच मातोश्री!
आऊसाहेब दिसल्यावर एरवी नव्वदच्या स्पीडने बुंगाट सुटून त्यांना बिलगणारा प्र. ले. आज मात्र मान खाली घालून हळूहळू चालत गेला आणि आऊंसमोर उभा राहिला. आऊसाहेबांनी ओळखले की आज बाळराजांचे काहीतरी बिनसलेले दिसतेय.
"काय रे?"
शक्य तितका चेहरा पाडून - "ऊं..."
"काय झाले? काय भांडणबिंंडण केले की काय ह्याने आजही?" बाईंच्या दिशेने पाहत.
"नाय!"
"मग?"
हळूच वर आईच्या चेहर्याकडे पाहून "आई, मला ना लग्न करायचंय तिच्याशी."
एका दमात धाडकन बाळराजे वदले.
"हा! आलाय मोठ्ठा लग्न करायला. बघितलं का ओ बाई!"
झालं, आईला काहीतरी शिक्रेट सांगायला जावं तर तीही सोय नाही.
बाई आईकडे येत प्र. ले. कडे बघून परत एकदा मोठ्याने हसल्या.
प्र. ले. परत एकदा, "ऊम्म्, जा काय. मला लग्न करायचंय म्हणजे करायचंय."
आणि असे म्हणून प्र. ले. त्याच्या टणटणीकडे जाऊन तिचा हात हातात घेऊन शेजारी उभा राहिला.
अवाक आऊसाहेब दोन्ही हात कंबरेवर ठेऊन, "कोण, ही? हिच्याशी लग्न करायचंय तुला?"
"हो! तीपण करणारेय माझ्याशी लग्न!"
आऊसाहेबांची नजर आता माझ्या टणटणीच्या फुलाकडे.
भुवया उंचावून, "तू पण?"
यावर आमचं टणटणीचं फूल परत एकदा अॅक्शन रिप्ले करत उद्गारलं, "नाय काय."
एवढ्यात त्या रंगमंचावर टणटणीच्या मातोश्रींचेही आगमन झाले. आणि प्र. ले. ने हातात घेतलेला हात झुरळासारखा झटकत टणटणी स्वतःच्या आईकडे पळाली. हा प्र. ले. ला एकाच दिवसात एकाच प्रपोजलला एकाच मुलीने दिलेला दुसरा नकार!
बास! प्र. ले. आता चिडला. सगळ्यांनीच असे झटकले तर चिडणार नाही तर काय? आणि प्र. ले. ने बाहेर काढले आपले आईच्या पोटातून सोबत घेऊन आलेले ब्रह्मास्त्र. सुरुवातच एकदम दप्तर-बाटली आदळून, फदकन् खाली बसून आणि हातपाय आदळून झाली. रणदुदुंभीची गर्जना बालवाडीच्या गगनावरी पोचोन उपस्थित प्रेक्षकांच्या कानांवर आदळली. "आंऽऽऽऽऽऽऽऽ, अँऽऽऽऽऽऽऽऽऽ, ह्यियांऽऽऽऽऽऽऽऽ..." मंद्रसप्तकातून तारसप्तकात पोहोचायला आमच्या गळ्याला जराही वेळ लागला नाही. तीन्ही माऊल्या स्तंभित, चकित. आणि मग सुरू झाले मांडवली करण्याचे प्रयत्न. शिष्टाईला पुढाकार घेतला तो आमच्या लाडक्या बाईंनी.
"अरे होऽऽऽऽ. करू हां लग्न आपण तुझे. पण तू अजून लहान आहेस की नाही बाळा. अजून तुला टाईम आहे पुष्कळ."
"नाऽऽऽऽ!"
आता टणटणीच्या मातोश्री.
"अग्गो बाई! काय झालं याला रडायला?"
"ह्याला तुमच्या पोरीशी लग्न करायचंय. ते पण आत्ताच्या आत्ता!"
"अय्या, हो? हीहीहीही!"
"बघा बाई, पसंत असेल तुम्हांला जावई तर आत्ताच घेऊन जा तुमच्याकडे घरजावई म्हणून." इति स्वमातोश्री.
"हाहाहा! चांगलाय की तुमचा पोरगा! माझ्या मुलीला अगदी नीट सांभाळेल हो... लावू हो बाळ तुमचं लग्न. पण आधी जरा मोठा हो, शिक चांगला, कमव, मग करा लग्नबिग्न."
प्र. ले. "नाही काय. मला आत्ताच्या आत्ता लग्न करायचंय हिच्याशी."
आता आऊसाहेब शरमिंंद्या होत, "काय लावलंय हे तू आज. मार खायचाय का?"
प्र. ले. "ऊंऽऽऽऽऽऽऽऽ."
"थांब, तुझ्या बाबांनाच सांगते. खूपच लाडाला आलाय आज. कुठे शिकलास रे हे लग्नबिग्न?"
प्र. ले. " ते, ते नाय का आपण गेलेलो तिकडं. तिथं काय म्हणालेल्या त्या काकू माझं लग्न उरकायचं म्हणून?"
आऊसाहेब कपाळाला हात लावत, "अरे देवा! काय ही आजकालची पोरं! कुठूनही काहीही शिकून येतात."
यावर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे आणि माना डोलावत त्यांच्या मैत्रिणीला अनुमोदन.
"आई, कर ना माझं लग्न हिच्याशी! ऊंऽऽऽऽऽऽऽऽ"
"आता बास हा! खूप झालं तुझं. चूप. एकदम चूप. नरड्यातनं आवाज निघाला तर बघच."
यावर ब्रह्मास्त्राचे पुढचे आवर्तन सुरू होणार तितक्यात मातोश्रींनी जो काही जोरात रट्टा घातला की बास! प्र. ले. ग्गारच.
यानंतर पुढील घटना ज्या क्रमाने घडल्या त्याच क्रमाने दिल्या आहेत.
१. आऊसाहेबांनी बाळराजेंना बखोटीला धरून घराकडे चालवले.
२. बाई व टणटणीच्या मातोश्री जोरजोरात हसायला लागल्या.
३. टणटणी जणू या गोंधळाशी तिला काही घेणेदेणेच नसल्यासारखी अंगठा चोखत तिच्या मजनूच्या अवस्थेकडे बघत राहिली.
४. ...
अरे अजूनही वाचताय की काय? दुष्ट कुठले.
********************************************************************************
(उपसंहार : त्या सगळ्या हातघाईत आमची पाटी आमच्या(च) पायावर पडून फुटली. त्या जखमेचा व्रण अजूनही आमचे डाव्या पायाचे करंगळीनजदीक दृष्टीस पडते. लोक हृदयावर व्रण घेऊन फिरतात, आम्ही...)
(उप-उपसंहार : नंतर बर्याच वर्षांनी एकदा बाजारात ही मुलगी (पक्षी: बाई) तिच्या लेकासह भेटली. तिला पाहून फक्त एक आणि एकच शब्द पुटपुटलो...
"वाचलो!"
********************************************************************************
ढिस्क्क्लेमर्र: काल्पनिक आहे हो! नाहीतर मिपावरचे येजंट (तेच ते केजीबी-शीआयेवाले) आमच्या टणटणीला चेपुवर शोधायला जायचे. ;-)
प्रतिक्रिया
21 Aug 2015 - 8:52 pm | जडभरत
हाण तिच्या मायला! चाबरट कुठला!!!
महाचाबरट पोरगा हाय ह्यो!!!
21 Aug 2015 - 10:12 pm | जडभरत
गंमतीत घ्या भौ!!!
21 Aug 2015 - 8:56 pm | पैसा
=)) =)) =))
मेले हसून!
21 Aug 2015 - 9:01 pm | यशोधरा
=)) =)) =)) =)) =))
21 Aug 2015 - 9:03 pm | कोमल
ह्या ह्या ह्या.. धमाल आली वाचतांना.. :)) :)) :))
लैच मस्त..
तुमचं बालवाडी मध्ये व्हतं आमचं जर्रा लेट झालं.. २रीत.. ;)
21 Aug 2015 - 9:17 pm | आदूबाळ
लोल! मस्त लिहिलंय!
21 Aug 2015 - 9:24 pm | स्रुजा
अरे देवा.. खरंच हसुन हसुन पोटात दुखलं आज.
21 Aug 2015 - 9:31 pm | अजया
=)) मस्त!
21 Aug 2015 - 9:38 pm | अस्वस्थामा
हा हा हा... भारीच मज्जाय..
पण वाचताना आम्हाला आमचे ते बालवाडीचे दिवस आठवले. आमचा तर लव्ह ट्रॅन्गल होता राव.. ;)
21 Aug 2015 - 9:40 pm | जेपी
=))=))=))
21 Aug 2015 - 9:49 pm | बहुगुणी
मस्त जमलंय! एखादी comic strip तयार होईल इतकं चित्रदर्शी वर्णन आहे. ("स्वॅप्स" या नावाला जागून मिपावर comic strip हा एक कलादालनात नवीन असा साहित्यप्रकार जन्माला घालू शकाल, बघा जरा मनावर घेता आलं तर.)
21 Aug 2015 - 10:37 pm | एस
हेहेहे! तेवढी प्रतिभा मजपाशी नाही! :-)
21 Aug 2015 - 9:52 pm | राजकुमार१२३४५६
"वाचलो" म्हणजे नक्की काय? ...."टणटणी"चा भोपळा झाला होता काय.
21 Aug 2015 - 9:53 pm | प्यारे१
ख्या ख्या ख्या ख्या
एक लंबर ल्हिवलंय
21 Aug 2015 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
प्र ले लहानपणापासूनच असा असणार असा आमचा अंदाज होताच... म्हणतात ना की मुलाचे पाय... ;) :)
21 Aug 2015 - 10:01 pm | प्रचेतस
=))
जबरा.
21 Aug 2015 - 10:12 pm | नाव आडनाव
:)
शेवटचा "वाचलो!" चा रेफरंस
[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो!
च्या प्रतिसादात होता का? :)
हुश्श! जुन्या दिवसांची आठवण झाली. असा बर्याचदा वाचलोय! ;-)
तसं असलं, तर "बर्याचदा" वाले बाकिचे किस्से पण येऊ द्या :) भारी लिहिलंय :)
21 Aug 2015 - 10:25 pm | एस
सापडला!
येक केजीबी येजंट घावला बगा! :=)) अता बाकीच्यांची वाट बगतू!
21 Aug 2015 - 10:29 pm | पैसा
21 Aug 2015 - 10:32 pm | एस
तो 'प्रीती-ट्रॅप' आहे. ;-)
(गुरुवर्य बोकोबांकी जय)
21 Aug 2015 - 10:17 pm | पद्मावति
एकदम क्यूट वाली प्रेमकहानी.
21 Aug 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कलिवलयं कलिवलयं. सिक्सर पे सिक्सर. अगदी डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग ;)!!
26 Aug 2015 - 6:15 pm | मी-सौरभ
_/\_ लै ब्येस
21 Aug 2015 - 10:29 pm | एस
हायला!
इतुक्या लोकांनी आमुची कथा वाचल्याचे पाहून आम्हांस अगदी भरून आले हो! ;-) दुष्ट कुठले. :=))
21 Aug 2015 - 10:33 pm | नूतन सावंत
सहमत.अशी प्रेमकहाणी सगळ्यांच्या नशिबी असावी.हहपुवा.
21 Aug 2015 - 10:38 pm | तुमचा अभिषेक
हाहा वाचलो..
सही लिहिलेय :)
21 Aug 2015 - 10:51 pm | सटक
क्या बात क्या बात, फारच भारी लिहिलय!! असे कोपरखळ्या मारत लिहिणे विरळा!!
21 Aug 2015 - 11:03 pm | चौथा कोनाडा
हसुन हसुन गडाबडा लोळायला लागलो.
ह्ये स्वॅप्स आता काय ऐकत न्हाय गड्या !
:-)))))
21 Aug 2015 - 11:16 pm | जव्हेरगंज
बाकी टणटणीचं फूल जाम आवडलय....:-D
21 Aug 2015 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा
@ टणटणी जणू या गोंधळाशी तिला काही घेणेदेणेच नसल्यासारखी
अंगठा चोखत तिच्या मजनूच्या अवस्थेकडे बघत राहिली.>>
@अरे अजूनही वाचताय की काय? दुष्ट कुठले. >> दुत्त दुत्त
22 Aug 2015 - 12:25 am | एस
काल्पनिक आहे हो! नाहीतर मिपावरचे येजंट (तेच ते केजीबी-शीआयेवाले) आमच्या टणटणीला चेपुवर शोधायला जायचे. ;-)
22 Aug 2015 - 12:46 am | रातराणी
हा हा कसलं भारी लिहलय :)
22 Aug 2015 - 1:38 am | मधुरा देशपांडे
कहर. हहपुवा. :)
22 Aug 2015 - 2:15 am | रेवती
काय रे बाबा! धन्य आहात!
आणि हे सगळे आठवतेय म्हणजे कहर आहे.
22 Aug 2015 - 7:01 am | फारएन्ड
सांप्रत शब्दाने लेखाला सुरूवात करणारी व्यक्ती कधी प्रेमाबिमात पडली असेल असे अजिबात वाटत नाही. इतक्या संतुलित विचाराने उर्वरित(!) लेख वाचतो व आवडला तर कळवतो.
22 Aug 2015 - 7:06 am | फारएन्ड
जबरी :). बालवाडी भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेचे वर्णन महान :)
22 Aug 2015 - 8:26 am | माझिया मना
हहपुवा.. प्रत्येकाला त्याचे बालवाडीचे दिवस आठवले असणार याची फुल्ल ग्यारंटी!
22 Aug 2015 - 8:34 am | श्रीरंग_जोशी
पहिल्या प्रेमाची कथा खूप आवडली.
दुप्रेकप्र.
22 Aug 2015 - 9:08 am | अजया
तिप्रेकप्र.
22 Aug 2015 - 10:50 am | खेडूत
हा हा हा...!
भारी. :)
22 Aug 2015 - 11:30 am | संजय पाटिल
ह ह पु वा. बाकी पाठीत एक रपटा आणि मॅटर खल्लास? अगदीच हे बुवा तुम्ही.
22 Aug 2015 - 11:31 am | उगा काहितरीच
हाहाहाहा जबरी !
22 Aug 2015 - 12:03 pm | मित्रहो
जबरी
चला आता टाइमपास ३ येणार म्हणजे.
22 Aug 2015 - 12:51 pm | बाबा योगिराज
हहपुवा...... मस्त जमलय............
22 Aug 2015 - 1:35 pm | मृत्युन्जय
लय भारी लिहिलय
22 Aug 2015 - 1:44 pm | सस्नेह
लवली लवष्टोरी !!
प्र लेने पुढच्या यत्तांमधे काय प्रगती केली ते वाचण्यास उत्सुक
-- स्नेहांकिता
22 Aug 2015 - 2:28 pm | प्यारे१
अरेच्चा, तुम्ही कधीपासून अशा गोष्टीत उत्सुक ओ?
काही विशिष्ट 'क्लासिक' आयडी ठाऊक आहेत असे गॉसिप करणारे!
(तिसरा क्लास सुद्धा क्लासच असतो की! ;) )
22 Aug 2015 - 5:43 pm | सस्नेह
सगळ्या 'क्लासां'ची खबर ठेवणे हेच की आमचं काम !
तुमच्याबी क्लासात येणार हावोत...
22 Aug 2015 - 2:09 pm | माम्लेदारचा पन्खा
आता काढा लेको ह्याचं विडंबन !
22 Aug 2015 - 2:22 pm | अभ्या..
+१
मस्त
22 Aug 2015 - 3:01 pm | तिमा
मजा आली वाचून, आणि आमचं प्रेम आठवलं. अहो, तुम्ही वर्गातल्या मुलीला तरी मागणी घातली होती! मी तर चक्क, आमच्या बाईंनाच मागणी घातली होती. पुढे काय झालं ते विचारु नका.
25 Aug 2015 - 11:23 am | नाखु
खत्री गुरु"दक्षीणा"
मूळ अवांतर "मजकूर" प्र.ले. महोदयांनी पुढील वर्गातील प्रगती आढावा लेखमालावा ही विनंती.
अखिल मिपा बालवाडी ते बालेवाडी व्हाया औंध नकारहोकार्स्वीकार संघ
25 Aug 2015 - 5:19 pm | एस
प्रेमबिम सगळं झूठ असतं हो! ;-)
26 Aug 2015 - 1:11 pm | नाखु
इथे लेखकु खयाली पुलाव खयाली पुलाव बनवतायत आणि तुम्ही रसिक आर्जव धुडकावताय !!!
आयुष्यात कसे "दिवे" लावणार तुम्ही तो "श्रीराम"च जाणे !!!!!
26 Aug 2015 - 1:48 pm | एस
बाप रे! अहो आम्हांला आषाढ-श्रावण सारखाच! त्यामुळे भाद्रपदी खुळाचा आणि आमचा काही संबंध येत नाही. ;-)
बाकी ते खयाली पुलाव कसे बनवायचे हे शिकून घ्यायला पाहिजे. :-)
अमिपाश्रावणीपांढरेसोम्वारकरीखयालीपुलावहटावसंघ..!
22 Aug 2015 - 3:25 pm | अनिवासि
मस्त !!!
22 Aug 2015 - 3:32 pm | एक एकटा एकटाच
जबरा लिवलय
22 Aug 2015 - 5:47 pm | बाबा योगिराज
धग्यानी पन्नाशी गाठली......
23 Aug 2015 - 11:04 am | चाणक्य
जबरा लिहीलय. 'लवशिप देते का?' असं नाही विचारलत का? ते आमच्या शाळेत फेमस होतं. आणि 'लवशिप' नाही दिली तर मग 'निदान फ्रेंडशिप तरी दे' हे मागायचं
23 Aug 2015 - 11:44 am | माम्लेदारचा पन्खा
मा झा एक धाकटा मावसभाऊ शाळेत चौथीत असताना एक मुलीला त्याने प्रपोज केलं.....तीही हो म्हणाली आणि त्यानंतर ते एकमेकांशी बोललेही नाहीत....
हे त्यानं नंतर मला कधीतरी सांगितल्यावर तोच म्हणाला....ह्याच्या पुढे काय करायचं ते मला माहितच नव्हतं !!
23 Aug 2015 - 3:46 pm | एस
असल्या 'जहाजां'चे प्रकार नंतर निघाले. आमच्या वेळी सगळे पायीच हिंडायचे.
23 Aug 2015 - 11:36 am | यशोधरा
आणि 'लवशिप' नाही दिली तर मग 'निदान फ्रेंडशिप तरी दे' >> LOL!!
23 Aug 2015 - 4:40 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =))
23 Aug 2015 - 7:31 pm | कंजूस
शशकच्या रानातला काजवा आता पाहिला.
दोन दिवस मुकलो ना 'वाचलो'ला!
23 Aug 2015 - 8:43 pm | असंका
फारच मजेशीर...अगदी अप्रतिम वातावरणनिर्मिती!!
23 Aug 2015 - 8:59 pm | बोका-ए-आझम
बेदर्द ज'मा'ना क्या जाने हा पिक्चर याच ष्टुरीवरुन बनला म्हणे!
23 Aug 2015 - 9:22 pm | एस
बघा ना! आम्हांस रॉयल्टीच्या नावाखाली या दू दू लोकांनी एक छदामही आजपावेतो पाठवलेला नाही! :-)
24 Aug 2015 - 10:47 am | नीलमोहर
मस्त !!
25 Aug 2015 - 2:50 pm | मोहनराव
मस्त लेख...
बालवाडीत असताना एका कार्यक्रमात मला बाळकृष्ण केल्याचं आठवतंय.
'आज गोकुळात रंग खेळतो हरी' या गाण्यावर नाच केला होता. राधा अजुनही आठवते.
आता ओळख पण देत नाही. :(
26 Aug 2015 - 1:38 pm | एस
तुमची राधा तुम्हांला ओळख देत नाही. प्र. ले. त्याच्या राधेला ओळख देत नाही. :-D
26 Aug 2015 - 1:55 pm | प्यारे१
क्या प्र ले के पास गर्द लाल रंग का पाँच लीटर वाला डिब्बा है?
26 Aug 2015 - 3:28 pm | एस
क्यूं भाई?
26 Aug 2015 - 3:51 pm | प्यारे१
प्र ले (बघा कस्सला भारी आहे) त्याच्या राधेला ओळख देत नाही असं 'लालेलाल' वर्णन वाटलं.
26 Aug 2015 - 4:29 pm | एस
अहो प्र.ले. ला राधेची भीती वाटते! :-)
26 Aug 2015 - 6:26 pm | यशोधरा
प्र. ले ची राधा, रुक्मिणी वगैरे सगळं नख्यावाली बोचकारणारी मनी आहे ना? मग?
26 Aug 2015 - 7:58 pm | एस
अजून एक एजंट सापडला! स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे तुमची! :-) आमच्य मनीला सांगू नका फक्त; नाही हे नाही, ते नख्याबिख्यांचं!
:-P
26 Aug 2015 - 12:50 pm | gogglya
शकेल यावर...
26 Aug 2015 - 1:16 pm | इशा१२३
हहपुवा...मस्त लिहिलय.
26 Aug 2015 - 2:06 pm | शरभ
मस्त.. खुमासदार.
26 Aug 2015 - 4:19 pm | माधुरी विनायक
आवडलं.
26 Aug 2015 - 6:01 pm | बबन ताम्बे
खूप विनोदी. खूप म्हणजे खूप आवडले.
26 Aug 2015 - 6:19 pm | मी-सौरभ
तुम्ही तुमचा आय डी बदलून प्र. ले. असा का करत नाही??
26 Aug 2015 - 7:30 pm | एस
प्र. ले. हे एक पात्र आहे कथेतील. स्वतः मी नव्हे. कथा काल्पनिक आहे हो. (सासंमंनी क्रुप्या वर्ल्या येका पर्तिसादात्ला ढिस्क्क्लेमर्र कथेत शेवटाला घुसवने ही इणंती!)