रविवारची एक शांत सकाळ, सकाळची सातची वेळ, आमच्या कॅम्पमध्ये (आमच्या वसाहतीला कॅम्प' म्हटले जायचे.) कॅम्पाच्या एका टोकाकडून 'कचकच' असा आवाज ऐकायला आल्याबरोबर बाबांनी माझ्या धाकट्या भावाला झोपेतून उठवले. डोळे चोळत भाऊ उठून बसला. दूरवरचा 'कचकच' आवाज त्याच्याही कानावर पडला.आज आपल्या समोर काय वाढून ठेवले हे कळायला त्याला वेळ लागला नाही. नेहमीचीच सवय झाली होती, परंतु नेहमी तो त्या आवाजाला घाबरायचा. प्रत्येक चाळीतील कोणत्या न कोणत्या मुलाच्या वाटेला हा रविवारचा प्रसंग महिन्याभरात एकदातरी यायचाच. प्रत्येक चाळीतील एखादी वडीलधारी व्यक्ती त्या आवाजाची रविवारी आतुरतेने वाट बघत असे...
आपल्या मुलाचे केस जरा कुठे वाऱ्याने उडू लागले की त्या मुलाचे वडील बेचैन व्हायचे व रविवारी त्या मुलाच्या केसांवर संक्रांत यायची. दर रविवारी बरोबर सकाळी ७ वाजता रजाक नावाचा न्हावी आमच्या कॅम्पमध्ये यायचा (आम्ही त्यांना रजाककाका म्हणायचो). कॅम्पाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या चाळीतील लोकांचे केस कापायला ते प्रत्येकाच्या दारात येत असे. केस कापायचे काम संपायला कधीकधी दुपारचे दोनही वाजायचे. रजाककाकांचा चेहरा भीती वाटावा असाच होता. काळा रंग, तांबूस डोळे, पान खात असल्यामुळे झालेले लालसर दात आणि जीभ. त्यामुळे लहान मुले त्यांना घाबरत असत. स्वच्छता, टापटीप आणि कुशलतेमुळे त्यांच्याशिवाय दुसरा कुठलाही न्हावी कोणालाही चालत नसे. रजाककाका कमी बोलायचे. ते दारात येण्यापूर्वी घरातील खुर्ची किंवा स्टूल अंगणात ठेवून पाण्याचे तपेले गरम करायला ठेवले जायचे. रजाक काका आले कि प्रथम गुलाबाच्या फुलाचे रंगीत चित्र असलेला, कडीचा पत्र्याचा डबा अलगदपणे ओट्यावर ठेवायचे. त्या डब्याची झाकणे वरून दोन बाजूनी कपाटा सारखी उघडली जायची. कापडी पिशवीतून एका स्वच्छ छोटा कपडा छोटी घडी घालून डब्याच्या बाजूला ठेवायचे.फुलाच्या आकाराची प्लास्टिकची वाटी हातात द्यायचे ज्यात घरातून गरम पाणी भरून आणायला पिटाळायचे.कंगवा,कैची,वस्तरा,पावडरची वाटी, व केस बारीक कापायचे दोन पायाचे, कंगव्यासारखे दात असलेले यंत्र व्यवस्थित कपड्यावर मांडून ठेवायचे. दात असलेल्या यंत्राला चाळीतील लहान मुले टरकून असत, त्या यंत्राला मुलांनी 'खटमल' असे नाव दिले होते.
रजाककाका आमच्या दारात आल्याबरोबर माझ्या धाकट्या भावाने भोकाड पसरले. मोठ्या भावाने त्याला बकोटीला पकडून रजाककाकांच्या ताब्यात दिले. एकदा का त्यांनी ताबा घेतला कि रडण्यास बंदी असे. कोणी प्रयत्न केलाच तर पाठीत धपाटा ठरलेलाच. पिशवीतून पांढरा शुभ्र पातळ कपडा रजाककाकांनी भावाच्या गळ्याभोवती बांधला. केस कापायला सुरवात केली, रडून रडून घामाघूम लाल झालेल्या चेहऱ्यावर केस चिकटू लागले, भावाचे हात कपड्यात अडकले होते त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. भावाने थोडी हालचाल केली आणि रजाककाकांनी त्याला जोरात टपली मारली. मला कीव आली अगदी कोकरासारखा दिसत होता माझा भाऊ. सर्वात शेवटी रजाक काकांनी 'खटमलनी' केस बारीक करायला घेतले. ते यंत्र मानेला लावल्या लावल्या भावाने अंगात शिरशिरी आल्याप्रमाणे अंग आकसून घेतले. आंबट चिच खाल्यासारखे भाव त्याचा चेहऱ्यावर उमटले, ते बघून मला हसू आले. रजाककाकांनी गोंडेदार सफेद पफने वाटीतील सफेद पावडर भावाच्या मानेला लावली. मानेभोवती गुंडाळलेल्या कपड्याची गाठ सोडली तशी भावाने धूम ठोकली ती थेट बाथरूमध्येच.
प्रत्येक रविवारी चाळीत शिकेकाईचा घमघमाट सुटायचा. आई माझे व माझ्या थोरल्या बहिणीचे केस शिकेकाईने धुवायची. ही शिकेकाई देखील आईने घरीच बनवलेली असे. शिकेकाई, नागरमोथा, आवळ कंठी, कपूरकाचरी,गवलाकाचरी, वाळा आणि काय काय सामान आणून आई ते उन्हात वाळवून खलबत्त्यात कुटत असे. (आम्ही त्यातील आवळ कंठी हळूच पळवायचो, खाण्यासाठी) आम्हा बहिणींचे केस कमरेपर्यंत लांब होते. त्यामुळे धुतल्यावर वाळायला वेळ लागायचा. आम्ही अंगणात केस वाळवायचो. शिकेकाइने मउ रेशमासारखे झालेले केस आई मोठ्या दात्याच्या कंगव्याने विंचरत असे त्याने केस ओढले जावून तुटत नसत व गुंताही होत नसे. सर्वात शेवटी बारीक दातांच्या फणीने केसातील उवा काढल्या जायच्या. उवा होऊ नये म्हणून आई सिताफ़ळाचा पाला वाटून आमच्या केसांना लावून ठेवायची. त्यामुळे उवा कमी व्हायच्या परंतु शाळेत गेले की पुन्हा वाढायच्या. तेंव्हा शाळेत मुलांना खरुज व मुलींच्या डोक्यात उवा असायचेच कदाचित तेव्हाचे खेळ व 'दाट' मैत्री हे कारण असावे.
शाळेत जाण्यासाठी आम्हाला सकाळी सहाला उठावे लागायचे. आमच्या वेण्या आईच घालायची. आमची वेणीफणी,डबा करताकरता आईची तारांबळ उडायची. त्यात आमचे हे दाट लांब केस व त्यातील जनावरे ह्यानेही आई वैतागली होती. बाबांकडे आईने बऱ्याचदा ह्याबद्दल तक्रारही केली होती. एक दिवस बाबांनी बाजारातून 'लायासिल' नावाचे उवा मारण्याचे औषध आणले. एके रविवारी आम्हा बहिणींच्या केसांना ते औषध लावले. औषधाचा वास खुपच उग्र होता वासानेच मला चक्कर आली. बाबांनी तेथील डॉक्टरांना बोलावले. मी व्यवस्थित झाले. त्याच दिवशी आईने ते औषध फेकून दिले.
पुढच्या रविवारी बाबांनी स्वतःच्या हाताने माझे व माझ्या बहिणीचे केस घरीच कापले. छानपैकी बॉबकटचा आकार दिला. मस्त हलके अलके वाटू लागले. आरशा समोर उभे राहून आम्ही 'दो कलिया' अकडत मकडत होतो. आईही खुष होती. आंघोळ करून कधी मैत्रीणीना दाखवू असे झाले होते तेवढ्यात बाबा म्हणाले आंघोळीची घाई नका करू रजाककाका येईपर्यंत थांबा.
रजाककाका आले, नेहमीप्रमाणे वाटीत गरम पाणी दिले. मला खुर्चीत बसवले, गळ्याभोवती पांढरा कपडा बांधला, छान सुगंधी वास येत होता त्याला. मानेला गरम पाणी लावले व वस्तार्याने मानेवरील बारीक केस व लव काढून टाकली. झालं बेटा असे म्हणून पावडरीचा पफ मानेला लावणार तोच धाकट्या भावाने त्या यंत्राने हिचे केस कापा असा हट्ट धरला. ठीक आहे बेटा असे म्हणत त्यांनी ते मशीन माझ्या मानेला लावले. आई ग ! त्या थंडगार,गुळगुळीत स्पर्शाने मानेला असह्य अशा गुद्गुल्या झाल्या, अगदीच ब्रम्हांडच आठवले मला. मी मान आकसून घेतली, रजाककाकानी ते मशीन हळूच मानेवर फिरवले त्याचे बारीक दात मानेला चावतायेत असे वाटत होते. चाळीतील लहान मुले ह्या मशीनला' खटमल ' का म्हणायचे ते तेव्हा कळाले. केस कापल्यानंतर आम्ही बहिणी खूप खुष होतो. सकाळी आई आमच्या वेण्या घालताना आम्ही डुलक्या घेत असू मग एक टपली बसल्यावर तात्पुरती झोप उडे. आता त्या टपल्या बंद झाल्या आणि पाच मिनिटे उशिरा उठलो तरी चालत असे. वेगवेगळे हेअर बँड वापरता येऊ लागले. 'लव्ह इन टोकियो' लावून केसांचा बो बांधता येऊ लागला. (त्या वेळी केसांना लावायचे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे मण्यांचे रबर मिळायचे.) लव्ह इन टोकियो सिनेमात आशा पारेखने वापरले होते म्हणून त्या रबरांना हेच नाव पडले.
मात्र केस कापल्यामुळे आमचे गजरे घालणे बंद झाले. आम्ही बहिणी आमच्या कॅम्पात गणपतीतील कार्यक्रमात नाच, नाटक फॅन्सी ड्रेस सगळ्यात भाग घ्यायचो. एकदा तर गंमतच झाली एका नाटकात मला बाळ धृवाची भुमिका करायची होती व एका नाटकात परीची भुमिका करायची होती. पहिल्या भुमिकेत छोट्या केसांमुळे काही अडचण नव्हती परंतू परीसाठी केस लांब व मोकळे हवे होते. शाळेच्या बाईंना काही पर्याय सुचत नव्हता. पर्यांना लागणारे पंख माझ्या बाबांनी जाड तार व ट्रेसिंग पेपर वापरुन तयार केले होते. आमचा मेक अप व वेशभूषेचे कामही माझ्या बाबाकडेच दिले होते. बाबानी आमच्या शाळेच्या बाईंना सगळे सुरळीत होइल असे आश्वासन दिले. सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी माझे धृवाची भुमिका असलेले नाटक झाले. तिसर्या दिवशी परीची भुमिका असलेले नाटक झाले. कँपात माझ्या नाटकापेक्षा माझ्या लांब रेशमी केसांचीच चर्चा जास्त झाली. त्याकाळी केसांचा विग वापरण्याइतके बजेट नसायचे. त्यामुळी आदल्या दिवशी छोटे असलेले माझे केस दुसर्या दिवशी हातभर लांब कसे झाले ह्याचे चाळीत सर्वांना कुतुहल होते. माझ्या बाबांनी मुंबईला जाऊन माझ्या व माझ्या बहिणीच्या कापलेल्या केसांची दोन छान गंगावने बनवून घेतली होती, एक अंबाड्यासाठी, मोकळ्या केसांचे आणि वेणीला जोडण्यासाठी तीन पेडांचे. तेच गंगावण बाबांनी माझ्या परीच्या केसांकरीता वापरले होते.
हो, या गंगावनावरून आठवले, आमच्या आईचेही केस लांब होते. त्यावेळच्या फॅशन प्रमाणे ती सुद्धा ही गंगावने लावून हेअर स्टाईल करायची. ते पाहून आमच्या चाळीतील शेजारणी तीचा हेवा करायच्या. मात्र कधीतरी सिनेमाला जाताना नटायचे असल्यास गंगावन मागूनही घ्यायच्या. आईदेखील मोठ्या मनाने त्यांना देत असे. मात्र परत आणल्यावर स्वच्छ धुवून विंचरून काढत असे. न जाणो गंगावनाबरोबर एखादी 'पाहुणीही' यायची. केसांनी गळा कापण्याऐवजी आमची ह्या केसांमुळे चाळीत अनेकाशी 'गळा मैत्री' झाली होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
16 Aug 2015 - 11:21 pm | जडभरत
छान लिहिलंय!!! खूप जुन्या आजकाल विस्मृतीत गेलेल्या अनेक गोष्टींना उजाळा मिळतोय या लेखमालेमुळे.
16 Aug 2015 - 11:30 pm | मधुरा देशपांडे
मस्त आठवणी. छान लिहिताय भिंगरीताई.
17 Aug 2015 - 12:29 am | पद्मावति
खूपच मस्तं लिहिलय. एकदम खुसखुशीत.
17 Aug 2015 - 12:55 am | उगा काहितरीच
छान चालू आहे . पुढील भाग कृपया लवकर लवकर येऊ द्या. रच्याकने कोणता कालखंड हा ?
18 Aug 2015 - 3:23 pm | भिंगरी
सध्या लिहितेय त्या आठवणी १९६५ ते १९७० दरम्यानच्या.
18 Aug 2015 - 3:23 pm | भिंगरी
सध्या लिहितेय त्या आठवणी १९६५ ते १९७० दरम्यानच्या.
17 Aug 2015 - 1:35 am | प्यारे१
मस्त गोड निरागस आठवणी!
17 Aug 2015 - 5:15 am | स्पंदना
बॉबकट आणि रंगीत रबरबँडस!!
मस्त लिहिता आहात. लहाण मुलाच्या नजरेतून जग बघायला मिळत आहे.
17 Aug 2015 - 7:32 am | यशोधरा
वाचते आहे..
17 Aug 2015 - 8:06 am | सस्नेह
मजेदार आठवणी आणि खुसखुशीत लेखन.
17 Aug 2015 - 9:15 am | के.पी.
अतिशय सुंदर भाग झालाय भिंगरीतै!
17 Aug 2015 - 11:24 am | एस
हाहाहा! मलाही लहानपणी केस कापून घेणे म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा वाटे. ते यंत्र भयानक होतेच, पण वस्तर्याने खराखरा केस खरवडून काढले जात तेव्हा अंगावर जी शिरशिरी यायची ती भयानक असे. केव्हा एकदा ह्या नाव्ह्याच्या ताब्यातून सुटतोय असे होत असे. पण वडिलांच्या धाकाने गपगुमान डोके खाली आणि डोळ्यांत केव्हाही फुटेल असा पूर घेऊन आमचे ध्यान त्या खुर्चीत बसून राही.
17 Aug 2015 - 1:53 pm | मीता
मस्त मस्त!
18 Aug 2015 - 3:31 pm | जेपी
वाचतोय.
आवडल.