कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
5 Mar 2015 - 12:38 am

एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.

आपण कालाचे/वेळेचे व्यवस्थापन (time management) करू शकतो या लोकांच्या दाव्याबद्दल मला फार पूर्वीपासून आश्चर्य वाटत आले आहे. जरा नेहमीचा पूर्वग्रह बाजूला ठेवून असे का होते त्याचा विचार करता या अपसंज्ञेचे मूळ, "वेळ एक साधनसंपत्ती (resource) आहे" असा केलेला आणि आंधळेपणे स्वीकारलेला विचार आहे असे वाटते. पण ही खरी वस्तुस्थिती नाही!

वेळ साधनसंपत्ती नाही

कोणत्याही साधनसंपत्तीचे मूलभूत गुणधर्म काळ/वेळ याबरोबर ताडून पाहिल्यास खालील सत्ये पुढे येतात :

१. साधनसंपत्ती बनवता, साठवता व खर्च करता येते; तिच्यावर हक्क प्रस्थापित करता येतो. वेळेच्या बाबतीत यातले काहीच शक्य नाही. वेळ काढणे, खर्च करणे, इ केवळ वाक्प्रचार आहेत... म्हणजे एक प्रकारे त्याही अपसंज्ञा आहेत!

२. ताब्यात असलेली साधनसंपत्ती वाचवून (कमी खर्च करून) भविष्यातल्या उपयोगासाठी राखून ठेवता येते. तसे वेळाच्या बाबतीत शक्य नाही. वेळ वाचवणे ही हातातल्या 'काम भर्रकन करणे' अथवा 'काम न करणे' या कृतींची अपसंज्ञा आहे.

३. साधनसंपत्तीला गुणधर्म असतात आणि त्यांची एक पातळी मानदंड (benchmark अथवा specifications) ठरवून साधनसंपत्तीचा दर्जा (quality) अथवा बरे-वाईटपणा ठरवता येते. वेळ बरी/वाईट असणे ही "परिस्थिती बरी/वाईट असणे" या वस्तुस्थितीची अपसंज्ञा आहे!

४. साधनसंपत्ती विकत/उसनी/भेट दिली/घेतली जाऊ शकते. तुम्ही आपल्या दिवसातल्या २४ तासातले २ तास वेगळे करून दुसऱ्याला देऊन तुमचा दिवस २२ तासाचा आणि दुसऱ्याचा दिवस २६ तासाचा करू शकत नाही. दुसऱ्याला वेळ देणे ही "दुसऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असणे अथवा दुसऱ्याला काम उशीरा आटपण्याला संमती देणे" या कृतीची अपसंज्ञा आहे!

५. साधनसंपत्ती आपणहून स्वतःला वापरून घेत नाही. त्यामुळे न वापरलेली साधनसंपत्ती तशीच राहते किंवा नाशवंत असल्यास ती कमी दर्जाची/नष्ट होते. आज न वापरलेले १०० रुपये (एक प्रकारची साधनसंपत्ती) उद्या वापरता येतात. वेळ ना कमी दर्जाचा ना नष्ट होतो /करता येतो. याविरुद्ध, वेळ पुढे जातो ही पण एक सं/कल्पनाच आहे. त्यामुळेच, आजच्या २४ तासातील १० मिनिटे उद्या वापरायला शिल्लक ठेवून उद्याचा दिवस २४ तास १० मिनिटांचा करता येत नाही. एखाद्या गोष्टीसाठी वेळ वापरणे ही "एखादी गोष्ट करणे" यासाठी वापरलेली अपसंज्ञा आहे!

६. वास्तविक जीवनात साधनसंपत्तीचे वितरण कधीच आपोआप समसमान नसते. मात्र दिवसाचा २४ तास वेळ हा सगळ्यांसाठी तेवढाच तंतोतंत २४ तासच असतो. त्यामुळे या जगात कोणीही वेळेच्या बाबतीत श्रीमंत अथवा गरीब असू शकत नाही. कितीही श्रीमंत अथवा (कोणत्याही अर्थाने) कितीही ताकदवान असलेल्या माणसाला दिवसाच्या २४ तासातले ना एखादे मिनिट वाढवता/कमी करता येते आणि ना मिनिटातला एखादा सेकंद जास्त/कमी करता येतो.

७. व्यवस्थापनामध्ये साधनसंपत्ती संपादन करणे, योग्य रितीने तिचे वितरण करणे आणि ती योग्य तऱ्हेने वापरून अपेक्षित परिणाम साधणे हे करायचे असते. वेळेच्या बाबतीत यातले काहीच करता येत नाही... कारण ती केवळ एक संकल्पना आहे!

थोडक्यात

कालव्यवस्थापन ही एक अपसंज्ञा आहे आणि त्याचबरोबर हे पण स्पष्ट होते की कालव्यवस्थापन या अपसंज्ञेच्या वापरामुळे तिच्यामागे अपसंज्ञांची एक लांबच लांब साखळी निर्माण झाली आहे.

मग वेळ आहे तरी काय?

वेळ ही केवळ एक संकल्पना आहे. ही संकल्पना एका स्वच्छंद (arbitrary) मापकांच्या नियंत्रक चौकटीमध्ये (framework) बद्ध केलेली आहे... ज्यांना आपण सेकंद, मिनिट, दिवस, महिने, वर्ष, इ नावांनी ओळखतो. या एककांचे आकारमान (आपण पृथ्वीवर राहत असल्याने) पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण आणि त्यामुळे पृथ्वीवर होणारे प्रकाश-अंधाराचे बदल जमेस धरून केले आहेत... ते ना अचूक आहेत, ना त्यांची विभागणी समान अथवा शास्त्रीय आहे! उदा. वर्ष अचूक ३६५ दिवसांचे नसते त्यामुळे आपल्याला लीप वर्षाचा उठाठोप करावा लागतो. दिवसात १२ तास उजेड व १२ तास अंधार ही अवस्थाही पृथ्वीवरच्या काहीच ठिकाणी आणि तीही एका वर्षात एखादाच दिवस असते.

वेळ या संकल्पनेचे आपल्या जीवनातले महत्त्व आणि उपयोग

अश्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर "वेळ" नावाच्या संकल्पनेची सर्वमान्य शास्त्रीय व्याख्या आजपर्यंत होऊ शकली नाही यात काहीच आश्चर्य नाही. म्हणून जे मोठमोठ्या शास्त्रज्ञांना आजपर्यंत जमले नाही ते करण्याच्या प्रयत्नाऐवजी ती संकल्पना काय आहे आणि तिचा आपल्याला व्यवहारात काय आणि कसा उपयोग करून घेता येईल हे पाहूया.

काळाचे वर्णन

काळाची नक्की व्याख्या करता येत नसली तरी तिचे स्वरूप समजावून घेण्यासाठी त्याचे ढोबळ वर्णन जरूर शक्य आहे.
"काल ही एक रैखीक (linear);
सलग (continuous, वेळ खंडीत होत नाही);
एकदिशा (unidirectional, वेळ केवळ पुढे जाऊ शकतो, मागे फिरू/बाजूला वळू शकत नाही);
निर्गुण (काळाला गुण/दर्जा नसतो);
अपरिवर्तनीय (un-modifiable, काळात चांगला/वाईट बदल होत नाही अथवा करता येत नाही); आणि
एकमितीय (uni-dimensional)
संकल्पना (concept) आहे. "

काळ या संकल्पनेचे उपयोग

काळाचा खालीलप्रमाणे उपयोग आपण करतो / आपल्याला करून घेता येतो:

१. कालबिंदूधारक विशिष्ट वेळ (Timing किंवा Time as a single Placeholder) : एखाद्या कृतीतील विशिष्ट बिंदू वेळेचा उपयोग करून सगळ्यांना समजेल अश्या प्रकारे सांगता येतो.
उदा : दुपारी पाच वाजता सभा सुरू होईल; कार्यालयाचे काम सकाळी ९ वाजता सुरू होते; इ.

२. कालमान ( Duration) : हा कोणत्याही दोन कालबिंदूधारक विशिष्ट वेळांच्या मधला कालास कालमान म्हणतात. याचा उपयोग आपल्याला दोन कृतीतील समानता/भिन्नता ताडून पाहायला आणि त्यातली जास्त योग्य कृती निवडण्यास होतो. प्रत्येक कालमापनामध्ये वापरली जाणारी साधनसंपत्ती कोणत्या प्रकाराची, किती व कशी वापरली जाते याच्या विश्लेषणावर ही निवड अवलंबून असते.

कालमानाचे अनेक प्रकार आहेत. ते नीट समजून घेतल्यास त्यांचा व्यवहारात चपखल उपयोग करून फायदा करून घेता येतो :
२. १. साधे कालमान (Simple duration) : हे कालमापनाला वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या एककांमध्ये (सेकंद, मिनिट, तास, दिवस, इ) व्यक्त केले जाते. यात परत दोन उपप्रकार आहेत
२. १. अ) सुरुवातीचा आणि अखेरची कालबिंदूधारक विशिष्ट वेळ (start time व the end time) निश्चित केलेले कालमान : या प्रकारात कृतीची सुरुवात आणि अखेरीची निश्चिती असते आणि त्यावरून दोन वेगळ्या कृतींची एकमेकाशी तुलना करणे शक्य असते किंवा कोणत्याही एका कृतीची मानदंडाशी तुलना शक्य असते.
उदा : हे काम वेळ २१ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता सुरू करून २४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी संध्याकाळी ३ वाजता संपवायचे आहे.
२. १. आ) सुरुवातीचा आणि अखेरची कालबिंदूधारक विशिष्ट वेळ (start time व the end time) अनिश्चित असलेले कालमान : सुरुवातीची अथवा अखेरची कालबिंदूधारक विशिष्ट वेळ नक्की न केल्यामुळे या प्रकारचे कालमान संदेहकारक असते आणि कृती करणाऱ्यावर नियंत्रण नसल्याने कृती योग्य परिणाम साधेलच अशी खात्री देता येत नाही.
उदा : हे काम तीन तासांत पूर्ण झाले पाहिजे.

२. २. कालबद्ध अनूसूची अथवा कार्यसूची (Schedule) : या प्रकारात सुरुवातीचा आणि अखेरची कालबिंदूधारक विशिष्ट वेळ असलेली अनेक सलग कालमाने आणि त्या कालमानांत अपेक्षित असलेल्या कामाची यादी असते. एकामागून एक अनेक कामे करणे अपेक्षित असताना कालबद्ध अनूसूची उपयोगी पडते.

२. ३. कार्य-काल सारणी (Work-Time Matrix) : कार्य-काल सारणीचा उपयोग एक अथवा अनेक कार्यसूचींत एकाच वेळेस अनेक प्रकारच्या साधनसंपत्ती कश्या वापरल्या जाता येऊ शकतील हे दाखवण्यासाठी केला जातो. यामुळे साधनसंपत्तीच्या वापराचे अंतर्गत परस्परविरोध (conflict) टाळता येऊन साधनसंपत्तीचा सर्वोत्तम / इष्टतम (optimum) उपयोग करता येतो.

थोडक्यात

वरच्या निवेदनावरून असे दिसून येते की काळ ही संकल्पनेचा स्वतंत्र उपयोग नाही. मात्र, तिचा साधनसंपत्तीच्या वाटणीसाठी आणि उपयोगासाठी केल्यास खालील गोष्टी करता येतात :
अ) साधनसंपत्तीच्या परिमाण आणि दर्जांची मोजमाप आणि तुलना (To measure and compare dynamics [qualitative / quantitative change or lack of it] of resources).
आ) साधनसंपत्तीच्या वापराने मिळणाऱ्या परिणामांचे मोजमाप आणि तुलना (To measure and compare [qualitative / quantitative] outcomes resulting from the dynamics of resources).
इ) प्रत्येक व्यक्तीच्या साधनसंपत्तीच्या वापराबद्दलची आणि अपेक्षित परिणाम मिळवण्याच्या पात्रतेचे मोजमाप आणि तुलना ( To measure and compare an individual’s [qualitative / quantitative] competency to manage the dynamics of resources and get expected outcomes).

काळ या संकल्पनेचे महत्त्व : जरा अजून सोपे करून...

१. कालबिंदूधारक विशिष्ट वेळ आणि कालमान (Timing आणि Duration) यांचा मापन आणि तुलना करण्यासाठी उत्तम मानवी उपयोग मानवी कारवाईने केल्याशिवाय साधनसंपत्तींचा इष्टतम उपयोग शक्य नाही.

२. काळ स्वतःहून काहीच करत नाही... करू शकत नाही.

३. याचा सरळ सरळ अर्थ असा की कालबिंदूधारक विशिष्ट वेळ आणि कालमान वापरून मानवाने स्वतःची करणी सुधारणे अपेक्षित आहे.

म्हणजे जेव्हा "कालव्यवस्थापन" म्हटले जाते तेव्हा खरे तर "स्व-व्यवस्थापन" म्हणायचे असते.
म्हणजेच, कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा आहे आणि स्व-व्यवस्थापन ही खरी संज्ञा आहे, असायला पाहिजे.

स्व-व्यवस्थापन

स्व-व्यवस्थापन म्हणजे योग्य कालबिंदूवर काम सुरू करून, उपलब्ध असलेल्या कालमानातील योग्य कालबिंदूंवर आवश्यक ती आणि तेवढी साधनसंपत्ती मिळवून ती योग्य तेव्हा, योग्य प्रकारे वापरून अपेक्षित परिणाम साधणे. हे करताना वेळ केवळ कृतीच्या मापनासाठी वापरायचे क्रियाशून्य परिमाण असते... कार्य करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच सर्व कार्य करायचे असते.

व्यवस्थापनाचे एक सर्वात महत्त्वाचे तत्त्व असे की ज्या गोष्टींवर आपला ताबा असतो त्याच गोष्टींचे व्यवस्थापन करता येते; इतर गोष्टींकडे लक्ष देण्याने फायदा तर होत नाहीच पण अपव्यय जरूर होतो. हे एकदा ध्यानात आले की मग वेळेच्या पारिमाणीक आणि/अथवा गुणात्मक (quantitative and/or qualitative) कमीबाबत तक्रार करत बसण्यात फार अर्थ नसतो हे लक्षात येते आणि आपण खर्‍या साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करू लागतो... आणि साहजिकच जास्तीत जास्त यशाची शक्यता निर्माण होते. हे सत्य कायमस्वरूपी अंगीभूत करणे आपल्या कृतीतील अपव्यय (waste generation) थांबवण्यासाठी उपयोगी पडते... आणि हे कृतीच्या इष्टतमकरणासाठी (optimization) आवश्यक आहे.

आता हे सर्व व्यवहारात कसे आणायचे याबाबत खूप लिहिले गेले आहे. तरीसुद्धा वर इतके विश्लेषण झाल्यावर एक त्रोटक रूपरेखा इथे अस्थायी होणार नाही. ती अशी...

१. करायच्या सर्व कृतींची एक सूची बनवा आणि कार्यांच्या "आवश्यकता", "त्वरित करण्याची निकड" आणि "स्वतःची जबाबदारी असणे" या निकषांवर त्यांचे वर्गीकरण करा. अर्थात या निकषांचे उत्तर जितके अधिक ठोसपणे हो असे असेल तितके ते कार्य सूचीत वर असेल हे सांगायला नकोच.

२. प्रत्येक कृतीची सर्व सबंधितांनी (stakeholder) मान्य केलेली अंतिम फलनिष्पत्ती (outcomes) आणि तिचे विनिर्देश (specifications) लेखी स्वरूपात आणि शक्य असल्यात स्वाक्षरींकीत तयार करा. हा दस्त तुमच्या पुढच्या सर्व कृतीचे समर्थन करण्यास / न करण्यास वापरला जावा. ही पायरी व्यवहारात बर्‍याचदा गाळली जाते, मतभेदांना जन्म देते आणि त्यामुळे अक्षम्य दिरंगाई व अपव्ययाचे कारण बनते.

३. अंतिम फलनिष्पत्ती मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या पायर्‍या लिहून काढा. या दस्ताला आपण सर्वसाधारणपणे अनुसूची (schedule) म्हणतो.

४. अनूसूचीतल्या प्रत्येक पायरीसाठी खालील गोष्टी निश्चित करा:
अ) पायरीच्या शेवटी आवश्यक अंतरिम फलनिष्पत्ती
आ) सुरुवातीचा आणि अखेरची कालबिंदूधारक विशिष्ट वेळ (start time and end time) आणि कालमान (duration)
इ) पायरीला लागणारी साधनसंपत्ती आणि तिचे विनिर्देश
असे केल्यावर कामाचे व्यवस्थापन करण्यास उपयोगी कार्य-काल सारणी तयार होते.

५. काम वर ठरवल्याप्रमाणे करण्यात काय अडथळे येऊ शकतात आणि ते आल्यास काय करायचे, कोणी करायचे, का आणि कसे करायचे, कोणाला विश्वासात घेऊन करायचे, घटनेची माहिती कोणाला द्यायची, इ सर्वांचा विचार आणि सर्वमान्य दस्त "काम सुरू होण्याअगोदर" तयार असणे जरूरीचे असते. हे गोष्ट सुरुवातीला जरी वेळखाउ व कठीण वाटली तरी व्यवहारात बर्‍याच गोष्टी वारंवार केल्या जात असल्याने जलद होणारी बनते. मुख्य म्हणजे अवघड परिस्थितीत सर्वांना आपले योगदान माहीत असल्याने धोक्यातून सावरण्याची शक्यता वाढते आणि सर्व प्रकारचा अपव्यय टाळून काम ठरवलेल्या वेळी, ठरवलेल्या फलनिष्पत्तीत पुरे होण्याची शक्यता वाढते.

६. प्रत्येक पायरीच्या अंतरिम फलनिष्पत्तीची तुलना वरच्या मुद्दा ४ मध्ये मान्य केलेल्या फलनिष्पत्तीबरोबर करण्याची प्रणाली कामाच्या बरोबरीने आणि त्याला समांतर चालू असणे जरूर आहे.

असो. हा विषय खूप मोठा आहे. पण या लेखात इथेच थांबूया.

शब्दार्थविचारमतमाहिती

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

5 Mar 2015 - 12:52 am | बहुगुणी

कालव्यवस्थापन आणि स्व-व्यवस्थापन यांमधील फरक नेमका विषद करून सांगितला आहे. पुढील भागांत (क्रमशः टाकायला विसरला असलात तरी ही लेखमाला असेल असं गृहीत धरतोय) स्व-व्यवस्थापन सुधारावं कसं याविषयी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

आयुर्हित's picture

5 Mar 2015 - 12:53 am | आयुर्हित

इए यांचे मिपावरील लिखाण म्हणजे एक प्रकारे इंद्रधनुष्यच!
या लेखाद्वारे मिपावर अजुन एक नवीन रंग भरला गेला आहे.

अभिनंदन.

कंजूस's picture

5 Mar 2015 - 4:36 am | कंजूस

आयुर्हित +१
"आपल्या ताब्यात जे आहे त्याचेच---" +१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2015 - 8:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्का काका मस्तं लेख...!! :)

आनन्दा's picture

5 Mar 2015 - 10:20 am | आनन्दा

अंशतः असहमत आहे. सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

ओके.. एकेका मुद्द्यावर बोलतो -

वेळ साधनसंपत्ती नाही

डिक्शनरीनुसार रिसोर्स या शब्दाची व्याख्या अशी आहे -
resource
rɪˈsɔːs,rɪˈzɔːs/
noun
noun: resource; plural noun: resources

1.
a stock or supply of money, materials, staff, and other assets that can be drawn on by a person or organization in order to function effectively.
या बाजूने विचार केला असता टाईम, किंवा वेळ नक्कीच साधनसंपत्ती आहे. वेळ वापरता येतो, खर्च करता येतो, फुकट जातो. बनवता आणि साठवता येत नाही, पण म्हणून तो साधनसंपत्तीच नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

ताब्यात असलेली साधनसंपत्ती वाचवून (कमी खर्च करून) भविष्यातल्या उपयोगासाठी राखून ठेवता येते. तसे वेळाच्या बाबतीत शक्य नाही. वेळ वाचवणे ही हातातल्या 'काम भर्रकन करणे' अथवा 'काम न करणे' या कृतींची अपसंज्ञा आहे.

वेळ वाचवणे याचा अर्थ उपलब्ध वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे असा देखील होऊ शकतो. साधनसंपत्ती खर्च करणे म्हणजे एक संपत्ती खर्च करून दुसरी संपत्ती निर्माण करणे (अ‍ॅसेट). वेळाच्या बाबतीत देखील हे शक्य आहे. वायफळ वेळ खर्च करणे हे देखील शक्य आहे, जसे आपण पेट्रोल जाळतो तसे लोक वेळ पण जाळतात :)

साधनसंपत्तीला गुणधर्म असतात आणि त्यांची एक पातळी मानदंड (benchmark अथवा specifications) ठरवून साधनसंपत्तीचा दर्जा (quality) अथवा बरे-वाईटपणा ठरवता येते. वेळ बरी/वाईट असणे ही "परिस्थिती बरी/वाईट असणे" या वस्तुस्थितीची अपसंज्ञा आहे!

गुणधर्माचे महीत नाही, पण आपण वेळेचा दर्जा नक्कीच ठरवू शकतो. आपण दिलेल्या वेळेतून नेमके किती अ‍ॅसेट तयार झाले आहेत यावर वेळेचा दर्जा ठरतो. टाईम मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी वेळाचे रूपांतर जास्तीत जास्त अ‍ॅसेट मध्ये करणे, या न्यायाने जे इतर साधनसंपत्तीला लागू होते, ते वेळेला पण लागू होते.

साधनसंपत्ती विकत/उसनी/भेट दिली/घेतली जाऊ शकते. तुम्ही आपल्या दिवसातल्या २४ तासातले २ तास वेगळे करून दुसऱ्याला देऊन तुमचा दिवस २२ तासाचा आणि दुसऱ्याचा दिवस २६ तासाचा करू शकत नाही. दुसऱ्याला वेळ देणे ही "दुसऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असणे अथवा दुसऱ्याला काम उशीरा आटपण्याला संमती देणे" या कृतीची अपसंज्ञा आहे!

अ‍ॅक्च्युअली जेव्हा आपण एखाद्याला २ तास उसने देतो तेव्हा आपल्याकडे २२ तासच शिलक असतात. कारण ते २ तास जरी तुमचे दिसत असले, तरी त्या २ तासांवर, आणि त्या २ तासांतून निर्माण झालेल्या अ‍ॅसेटवर ते तास उसने घेणार्‍याचीच मालकी असते. आणि आपल्याला आपले काम करायला २२ तासच मिळतात. जसे मित्राला ५००० रु. उसने दिल्यावर आपल्याला महिनाअखेरीस ५०००रु कमी पडतात तसेच.

अर्थातच आपण निर्गुण वेळेची गोष्ट करत आहात, तर माझ्यासाठी वेळ म्हणजे काळ मोजण्याचे एक एकक आहे, त्यामुळे थोडासा घोळ झालेला असू शकतो. आणखीन आठवेल तसे लिहीनच. असो, प्रथमच तुमच्याशी असहमत व्हायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2015 - 7:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला वाटते आहे की जर तुम्ही लेख परत एकदा वाचू शकलात तर बराच फरक पडेल :)

चौकटराजा's picture

5 Mar 2015 - 11:13 am | चौकटराजा

वेळ ही सामग्री नव्हे हे एकदम मान्य. हालचाल आली की वेळ आली. विश्वात दोन प्रकारच्या हालचाली असतात. एक निसर्गाची स्वता: ची हालचाल. पूर्णपणे अहेतूक , निरर्थक असलेली. उदा. ग्रहानी तार्‍याभोवती फिरणे. ॠणकणानी अणकेंद्राभोवती फिरणे.पण प्राणीमात्रांचा उदय उत्कांतीत झाल्यावर हालचाल ही सहेतूक पणे होउ लागली असणार. उदा. पाणवठ्याच्या शोधासाठी गुरानी फिरणे . मानवी जीवन अधिक उक्रांत झाल्याने ते अधिकच व्यामिश्र होत गेलेले दिसते. मग वेळेचे महत्व अतीच वाढले. कालच्या पिढीपेक्षा आजची व आजच्या पेक्षा उद्याची पिढी ही वेळ या संकल्पनेची अधिकाधिक गुलाम होत जाणार आहे.

एक एकटा एकटाच's picture

5 Mar 2015 - 12:44 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

म्हणजे जेव्हा "कालव्यवस्थापन" म्हटले जाते तेव्हा खरे तर "स्व-व्यवस्थापन" म्हणायचे असते.

मला वाटलं होतं की हे अध्याहृत आहे.

म्हणजे, जेव्हा कोणी म्हणतो "टाईम मॅनेजमेंट केली", तेव्हा "स्वतःला उपलब्ध वेळ भागिले करायची कामं" हा रेशो त्याने स्वतःबाबत सांभाळला असंच म्हणायचं असतं.

एस's picture

5 Mar 2015 - 11:05 pm | एस

वेळ या संकल्पनेला तुम्ही लावलेले निष्कर्ष स्वतः या संकल्पनेला लावले असता तीही साधनसामग्री ठरत नाही. या अनुषंगे स्वव्यवस्थापन हीदेखील अपसंज्ञा ठरते. इथे मोठाच परस्परविरोध आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्व म्हणजे मानव संसाधनाचे एकक. स्वव्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या शारिरीक, बौधिक, इ ताकदीचे व्यवस्थापन. मानवाची स्वतःची जबाबदारी असलेले अपेक्षित परिणाम साधायला याच साधनसंपत्तीचा (मानव संसाधन, human resource) उपयोग केला जातो.

मानव संसाधनाकडे इतर कुठल्याच साधनसंपत्तीत नसणारा एक खास गुणधर्म असतो. इतर साधनसंपत्ती स्वत:चे व्यवस्थापन करू शकत नाहीत, त्यासाठी मानव संसाधन लागते. मात्र मानव संसाधन स्वतःसह इतर सर्व साधनसंपत्तींचे व्यवस्थापन करू शकते. म्हणून मानव संसाधनाचे एकक म्हणजे "स्व"ने स्वतःचे व्यवस्थापन करणे हा कळीचा मुद्दा आहे ! हा मुद्दा स्वतःच्या / संस्थेच्या व्यवस्थापनात किती समजून-उमजून वापरला जातो यावर स्वत:ची / संस्थेची उपयुक्तता आणि परिणामकारकता अवलंबून असते.*

स्वव्यवस्थापनाला काहीजण स्वशिस्त (self discipline) असेही म्हणतात, पण माझ्या मते तो शब्द अपेक्षित असलेला संपूर्ण अर्थ व्यक्त करण्यास स्वव्यवस्थापन या संज्ञेच्या मानाने तोकडा आहे.

=========

* हा पण एक मोठा आणि रोचक विषय आहे. पण इथे अवांतर करण्याऐवजी वेळ होईल तेव्हा त्यावर काही लिहावे असे मनात आहे.

'व्यवस्थापन' ह्या संज्ञेची तुम्हांला अपेक्षित असलेली व्यापकता ही केवळ संसाधनांपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात व्यवस्थापन हे जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला लागू होते. त्यामुळे लेख व्यवस्थापन ह्या संज्ञेची परिमाणे व्यक्त करणारा हवा होता. ह्या संज्ञेकडे साधनसामग्रीच्या बंदिस्त दृष्टिकोनातून पाहिल्याने तिची व्यापकता पुरेशी ठसत नाही असे वाटते.

याच प्रश्नाचा दुसरा पदर भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही तपासता येईल. पण ते इथे गरजेचे नाही.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 1:54 pm | पॉइंट ब्लँक

चांगला तर्क वितर्क चालू आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2015 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखाचे शिर्षक पाहिल्यास त्याचा नेमका कोणता आवाका (उद्देश) ठरवला आहे व त्यावरून हा लेख व्यवस्थापनावर नाही, हे ध्यानात यावे.

कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा कृतीच्या अपयशाचे/दोषाचे खापर चुकीच्या जागी (पक्षी : कालावर) फोडायला मदत करते अथवा तशी मानसिकता निर्माण करते. तो (मानसिक) दोष योग्य संज्ञा वापरून दूर केल्यास, "वेळ हे संसाधन नसून इतर सर्व संसाधनांच्या व्यवस्थापनाचे केवळ परिमाण म्हणून वापरले जाते, हे समजून-उमजून वागले तर व्यवस्थापनात लक्षणीय मदत होते." हा लेखाचा मूळ गाभा आहे. जेव्हा कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा वापरली जाते तेव्हा साधारणपणे त्यातले "स्व(तः)" हे मानव संसाधनाचे एकक गृहीत धरले जाते म्हणून त्यावर थोडी टिप्पणी केली, इतकेच.

संस्था-व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले तर, "अनेक स्व मिळून बनलेल्या संस्थेच्या संपूर्ण मानव संसाधनासकट इतर उपलब्ध संसाधने वापरण्याचे, त्याच मानव संसाधनातील प्रत्येक स्व चे स्वतःचे आणि सांघीक कौशल्य (individual and team skills) संस्थेच्या यश/अपयशाचे महत्वाचे गमक असते". अर्थात हा मुद्दा लेखाच्या शिर्षकाच्या मूळ उद्देश्याच्या बाहेर असल्याने येथे अवांतर आहे, म्हणून त्याचा उल्लेख लेखात मुद्दाम टाळला आहे.

व्यवस्थापन हा फार मोठा विषय आहे आणि त्याचे त्रोटक विश्लेषण करायलाही लेखमालाच लिहायला लागेल. तो ह्या लेखाचा विषय नाही.

रेवती's picture

6 Mar 2015 - 1:30 am | रेवती

लेख आवडला.

सतिश गावडे's picture

6 Mar 2015 - 1:31 pm | सतिश गावडे

सुंदर लेख.
लेखातील बरेचसे मुद्दे हे सखोल वाचन आणि त्यावर केलेले चिंतन यातून स्फुरलेले आहेत असे वाटते.

अन्या दातार's picture

6 Mar 2015 - 3:51 pm | अन्या दातार

उत्तम लेख व चर्चा.