चित्रपट परिक्षण - टिंग्या

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 5:57 am

ऑस्कर साठी चर्चिला गेला असल्याने श्वासप्रमाणे अपेक्षा ठेऊन मंगेश हडवळेंचा टिंग्या बघायला घेतला. ज्वलंत विषय, उत्तम स्थळ निवड, चपखल भाषा, खोलवर उतरणारे पार्श्वगीत तसेच योग्य वातवरण निर्मिती मुळे पहिल्या पाच-दहा मिनिटात या अपेक्षा अजूनच वाढू लागतात. परंतू दुर्दैवाने चित्रपट पुढे सरकने हळूहळू बंद पडते की काय येवढा संथ होतो. काही वेळाने तर पुढे काय घडणार, कशा प्रकारचे संवाद ऐकायला मिळणार याचा सुद्धा अंदाज बांधता येऊ लागतो. अन टिंग्या ऑस्कर साठी का निवडला गेला नाही याची एक एक करत कारणे समोर येऊ लागतात.

शरद गोयेकर या बालकलाकाराने टिंग्याच्या व्यक्तिमत्वाला खूप चांगला न्याय दिला आहे. निरागस खेडवळ भाषा, बोलके डोळे, तुडतुडीत देहयष्टी व कमालीची भेदक संवादफेक यामुळे तो तारे जमीं पर च्या दर्शील सफारी पेक्षाही उजवा ठरला आहे. तरण्णून पठाण व अजित गावंडे या बालकलाकांचे कामही सफायीदार झाले आहे. पण बाकी कलाकार निवड कथेला न्याय न देणारी आहे. कर्जबाजारी व कष्टकरी शेतकर्‍याच्या भुमिकेत सुनिल देव टिंग्याचा बाप केवळ देहयष्टीनेच नव्हे तर चित्रपटाच्या आशयामुळे सुद्धा वाटत नाही. डोळे बंद करुन तुम्ही पाहिलेले, तुमच्या माहितीतले कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी आठवा व पुन्हा या कलाकाराच्या देहयष्टीकडे बघा म्हणजे मग मी काय म्हणतो आहे ते समजेल. गाल बसलेले आहेत? डोळे खोल चिंतेत आहेत? पोट पाठीला चिटकलेले आहे? नव्हे ना? म्हणून तर हे पात्र कथेला शोभत नाही. टिंग्याची आई, तसेच शेजारच्या कुटुंबातील प्रमुख पात्रे काही कमतरता सोडता बर्‍यापैकी चांगली जमली आहेत.

आता कथे बद्दल. कथेचा गाभा आहे एका मुलाचे त्याच्या बैलावरील प्रेम व त्याला या प्रेमाला मुकायला लावणारी त्याच्या कर्जबाजारी शेतकरी बापाची हालाखिची परिस्थिती. ही कथा दोन-तीन तास धगधगत जिवंत ठेवायला पुरेशी आहे. पण दिग्दर्शकाने अवास्तव व असंबद्ध विषय विनाकारण मध्ये आणून ताणले आहेत. जसे की मुंबईत दंगल सुरु असल्याने शेजार्‍याचा भाऊ तिकडे आडकला असल्याची घटना ही कथेचा केंद्रबिंदू असणार्‍या शेतकर्‍याला होणारा कर्जाचा तगादा या घटनेपेक्षा कितीपरी प्रखर करण्याचा प्रयत्न केला आहे. सावकार म्हणजे अगदी मनमोकळा माणूस आहे व हा कर्जबाजारी शेतकरी कसल्याही तगाद्यविना ते कर्ज फेडता येत नाही म्हणून जीवन संपवायला निघाला आहे हे पचने जरा जड होते. एक शेतकरी कुटुंबात वाढलेला असल्याने मला तरी असे वाटते की दिग्दर्शकाला हा भाग हाताळताच आलेला नाही. बैलाला विकण्याचा भाग मात्र फार छान जमवला आहे. कथेचा जास्त संबंध नसतानाही उगीच एका भटाच्या माध्यमातून हिंदूंच्या भक्तिप्रकारावर ताशेरे ओढलेले आहेत तर मुस्लिम धर्मावर जास्त श्रद्धा असल्याचा भाव निर्माण केला आहे. पिडीत शेतकरी भक्तिभावाने अंगारा आणन्यासाठी देवळात जातो तेव्हा भट समोरच्या नदीत धुणे धुणार्‍या बाईसोबत चावट नजरा नजरी करत असतो. मात्र त्याच वेळी मुस्लिम शेजारणीने ताईत देण्याची घटना खूप आदराने सादर केली आहे. यामुळे कथेला राजकारणाचा पिंड मिळाल्या सारखा वाटतो.

पार्श्वसंगित सुरुवातीला घेतलेला पगडा टाकून देऊन शेवटी शेवटी रटाळ वाटू लागते. "माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला दे" हे तेच तेच ऐकवत ऐकवत चित्रपटाचे पार्श्वसंगित गुंडाळले आहे. चित्रिकरण मात्र चांगले झाले आहे. कोठेही विसंगती नाही वा चकचकाट दाखवण्याच्या मागे लागून मूळ स्थळांपासून दूर रम्य स्थळे दखवून सवंगपणा आणलेला नाही.

चित्रपटाचा शेवट काय होणार याची झलक सुरुवातीच्या दोन्-चार मिनिटांत दाखवलेली असल्याने शेवट कळलेला असतोच. परंतू दिग्दर्शकाने विषेश लक्ष घालून शेवटचा भाग बनवताना ताळमेळ घातलेला असल्याने शेवटच्या टप्प्यात चित्रपट पुन्हा रुळावर येतो व शेवट गोड होतो.

कलाचित्रपटप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

5 Nov 2008 - 8:01 am | भाग्यश्री

प्रथमच टिंग्याबद्दल निगेटीव्ह वाचलं. :)
गमतीचा भाग म्हणजे,तुम्हाला ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्याच मला आवडल्या! हे असंच माझं वळू च्या बाबतीत झालंय, लोकांना जे आवडलं ते मला नाही आवडलं..

मला टिंग्या प्रचंड आवडला.. अनेकदा डोळ्यात पाणी काढलं,तो बालकलाकार्,माझं आभाळ तुला, सगळं आवडलं! :)
पसंद अपनी अपनी..

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:29 pm | भास्कर केन्डे

अगदी खरे!

कदाचित लहानपणापासून अशाच वातावरणात वाढलेला असल्याने पुन्हा तेच पडद्यावर पाहताना मला जास्त कुतुहल वाटले नसेल. देशाच्या येवढ्या प्रगती नंतरही आज आमच्या गावचा शेतकरी उपाशीच आहे ही जाणीव फार वेदना देऊन जाते हो.

आपला,
(गावकरी) भास्कर

अभिजीत's picture

5 Nov 2008 - 8:10 am | अभिजीत

चित्रपटाची कथा/अभिनय वगैरे पेक्षा शेतकर्‍यांच्या आत्महत्या याविषयाची सहानुभूती इथे परिणाम करुन गेली.
'वळु' मधे दाखवलेलं खेडेगाव यापेक्षा नक्कीच सरस होतं.

असो.
असे वेगळे विषय आता पडद्यावर येत आहेत आणि आपण इतक्या दिवसांनीही या चित्रपटांची चर्चा करतोय हेच या चित्रपटांचे खरे यश. :)

- अभिजीत

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:31 pm | भास्कर केन्डे

व्वा अभिजितराव, याला म्हणतात पॉझिटिव्ह दृष्टीकोन.

आपला,
(यश शोधनारा) भास्कर

भाग्यश्री's picture

5 Nov 2008 - 8:33 am | भाग्यश्री

आजच कुठेतरी वाचलं, बहुतेक इसकाळवर.. मंगेश हडवळेला हा चित्रपट काढताना ४१ निर्मात्यांनी नकार दिला, आणि शेवटी ४२व्या निर्मात्याने हो म्हटले आणि शेवटी पिक्चर अस्तित्वात आला..

लिंक सापडली.. इथे वाचा..

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:26 pm | भास्कर केन्डे

खरेच वाईट परिस्थिती आहे. पण आता सुधारत आहे. महाराष्ट्रातला कानाकोपर्‍यातला प्रेक्षक जर मराठी सिनेमे बघायला लागला तर पुन्हा सोनियाचे दिवस येतील.

आपला,
(आशावादी) भास्कर

मला टिंग्या प्रचंड आवडला.. अनेकदा डोळ्यात पाणी काढलं,तो बालकलाकार्,माझं आभाळ तुला, सगळं आवडलं!
पसंद अपनी अपनी..

जबर्दस्त पहिला चित्रपट तो सुध्दा एव्हडा हि
लगे रहो मंगेश
लगे रहो शरद (टिंग्या)

एक जुन्नरचा कोतवाल?

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 12:07 pm | विनायक प्रभू

काही क्लीप्स बघितल्या. आवडल्या. भास्करांनी किरणे टाकल्यावर तर आवर्जून बघायला हवा.
जय महाराष्ट्र.

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:24 pm | भास्कर केन्डे

प्रभू साहेबांनी काही टंकिले आणि त्यात वैशिष्ट्यपूर्ण काही न सापडले तरच नवल. :)

आपला,
(चाहता) भास्कर

इनोबा म्हणे's picture

5 Nov 2008 - 12:24 pm | इनोबा म्हणे

टिंग्याच्या बाबतीतली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे टिंग्या ऍनिमेटेड स्वरुपात पुन्हा पडद्यावर येणार आहे. मराठी चित्रपट पहिल्यांदाच ऍनिमेटेड स्वरुपात येतो आहे. मराठीबरोबरच आणखी काही भारतीय भाषांमध्ये ही तो डब होणार आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:04 pm | भास्कर केन्डे

ही बातमी नव्हती माहित. आनंदाची गोष्ट आहे. मराठी चित्रसृष्टी चांगलच बाळसं धरत आहे.

ही आनंदाची बातमी दिल्याबद्दल आभार!

आपला,
(आनंदी) भास्कर

नंदन's picture

6 Nov 2008 - 2:45 am | नंदन

सहमत आहे. मराठी चित्रपटांसाठी आशादायक चिन्ह आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

झकासराव's picture

5 Nov 2008 - 12:25 pm | झकासराव

मला तर टिन्ग्या जब्बरदस्त आवडला.
कित्येक प्रसंग असे होते की डोळ्यातुन पाणी निघण आपोआपच झाल.
नाही म्हणायला मला त्यांच्या शेजारी राहत असलेली टिन्ग्याची ती मैत्रीण आणि त्याच्यातील भावविश्व हे थोडस प्रेमाच्या वळणाने जातय अस वाटुन खटकल.
तसच त्या नानीच उपकथानक अनावश्यक वाटल. इतरवेळी मात्र चित्रपट एकदम फोकस्ड आहे. अजिबात बाजुला जात नाही त्याच्या केन्द्रापासुन.
भास्कर यानी लिहिलेल त्या शेतकर्‍याची शरिरयष्टी मजबुत वाटुन आधी खटकली होतीच. पण आधी ते कुटुम्ब शेतीमुळे खाउन पिउन सुखी असेल त्यामुळे परत तो मुद्दा दुर्लक्षित केला मी. :)
ऍक्टिन्ग सगळ्यानी छान केली आहे.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:21 pm | भास्कर केन्डे

झकासराव,

ऑस्करला जाण्यासाठी चित्रपटात कमीत कमी उणीवा असाव्या लागतात.

नाही म्हणायला मला त्यांच्या शेजारी राहत असलेली टिन्ग्याची ती मैत्रीण आणि त्याच्यातील भावविश्व हे थोडस प्रेमाच्या वळणाने जातय अस वाटुन खटकल. तसच त्या नानीच उपकथानक अनावश्यक वाटल.
-- ही कथेतली, दिग्दर्शनातली व एकंदरीत चित्रपटातलीच खूप मोठी उणीव आहे.

आपला,
(चोखंदळ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अभिरत भिरभि-या's picture

5 Nov 2008 - 1:40 pm | अभिरत भिरभि-या

संथपणाबद्दलचा आक्षेप मान्य वाटतो.
पण भास्कररावांना दृष्टीतल्या इतर उणिवाच मला या चित्राची बलस्थाने वाटली.
या चित्रातली ही जुन्नरी बोलीभाषा म्हणजे आमची घरातली मुळ भाषा. पण बोली मी घरी कधीही ऐकली नव्हती. शुद्ध पुणेरी तुपात जन्मभर घोळल्यावर हा चित्रपट वडलांसोबत बघताना "ही आपल्या गावाची भाषा" हे ऐकणे माझ्यासाठी एक मोठाच धक्का होता.
भाषेचे मरणे इतक्या जवळून मी प्रथमच पाहिले.

आता माझ्या नंतरच्या पिढीला "This was our language - Marathi" असे ऐकायला मिळाले नाय म्हणजे मिळवली :T

म्हणूनच की काय माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे हृदयातली ठेव आहे.

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:11 pm | भास्कर केन्डे

मराठी खूप झपाट्याने बदलते आहे. तुम्ही पुण्यात राहिलात म्हणून तुम्हाला जुन्नरी माहित नाही. पण आमच्या गावात राहणारी मुले आम्ही लहानपणी बोलायचो तसे बोलत नाहीत. आम्ही मकरंद आनसपुरे "कायद्याचं बोला" मध्ये बोलतो ना अगदी तसे बोलायचो.

कात टाकताना वेदना होतात. पण जीवन पुढे चालू ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. तेव्हा उगीच मनाला वेदना करुन घेऊ नका. मराठी जीवंत आहे व राहिल. तिची वेगवेगळी रुपे कदाचित नष्ट होतिल.

आपला,
(बदलानुरुप राहणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

गणा मास्तर's picture

5 Nov 2008 - 1:35 pm | गणा मास्तर

मला तर टिंग्या मोप आवडला.
एक हंगाम खराब गेला म्हणुन टिंग्याच्या बापाची शरीरयष्टी खालवणार कशी?
या चित्रपटातली भाषा आमच्या खेड, आंबेगाव, जुन्नरकडची भाषा. त्यामुळे तर हा चित्रपट अधिकच भावला.
टिंग्याविषयी इथे वाचा

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:17 pm | भास्कर केन्डे

आमच्या गावातच नव्हे तर पंच क्रोशित ९९% कुटुंबे शेतकरी आहेत. मला आठवते तसे दर पाच वर्षात जास्तीत जास्त १ ते २ हंगाम चांगले जातात. त्याच्या जिवावर आम्ही लोकं थोडेफार कर्ज उतरवतो. माझ्या पाहण्यात तरी कोणीही शेतकरी टिंग्याच्या बा च्या देहयष्टीचा नाही. बरं त्यांच्या कुटुंबाची व्यक्तिरेखा पाहता त्यांना पूर्वी खूप चांगले दिवस होते असे अजिबात वाटत नाही. कलाकार निवडण्यात निश्चितच चूक झाली आहे.

आपला,
(खपट्या पोटाचा शेतकरी) भास्कर

यशोधरा's picture

5 Nov 2008 - 2:41 pm | यशोधरा

मला आवडला टिंग्या. अतिशय सुरेख सिनेमा आहे.

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:23 pm | भास्कर केन्डे

एक साधारण प्रेक्षक म्हणून टिंग्या नक्कीच आपल्याला आवडतो. तसाच मलाही तो आवडला. पण ऑस्कर साठी पाहताना जास्त चोखंदळ व्हावे लागते.

आपला,
(चोखंदळ) भास्कर

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 3:29 pm | विसोबा खेचर

टिंग्या पाहिला पाहिजे बा एकदा..

तात्या.

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:19 pm | भास्कर केन्डे

हो तात्या, पाहिलाच पाहिजे. आपल्या सारख्या मराठी प्रेमी लोकांनी चांगले मराठी सिनेमे नक्की पाहिले पाहिजेत. हिंदी टाळले पाहिजेत.

आपला,
(कटाक्षाने हिंदी चित्रपट टाळणारा व इंग्रजी सिनेमे न पाहणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Nov 2008 - 9:34 pm | ब्रिटिश टिंग्या

>>हिंदी टाळले पाहिजेत.

:O

केन्डेसाहेब,
आपला हिंदी चित्रपट टाळण्याचा मुद्दा समजला नाही!

मराठी चित्रपट आवर्जुन पहावेत परंतु याचा अर्थ हिंदी चित्रपट टाळावे असे होउ नये! काहीही झालं तरी हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे!

आणि हो करीना, बिपाशा अन् कत्रीना मराठीत चित्रपटात काम नाही करत. (त्याच कशाला, आपली माधुरी अन् उर्मिला तरी कुठे आहे मराठीत) ;)

त्यामुळे हिंदी चित्रपट टाळणे जरा अवघडच वाटते.......

- आपला
टिंग्या

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:55 pm | भास्कर केन्डे

मस्तच प्रतिसाद!

तुम्ही नशिबवान दिसताय. लेकराबाळावाल्या संसाराचा रहाट चालू असताना आम्हाला तरी मराठी तसेच हिंदी सिनेमे बघण्याची चंगळ करण्या येवढा वेळ मिळत नाही. या वर्षी पहिल्यांदाच १०० पेक्षा जास्त मराठी सिनेमे आले आहेत. त्यातले निवडक १०-१५ बघायचे म्हटले तरी वर्षभराचा कोटा संपतो.

हिंदी सिनेमे टाळतो हे खरे असले तरी ते बघावे लागतात. आम्ही काही वर्तमानत्रांसाठी चित्रपट समिक्षा करतो. आमचा नंबर आला की आम्हाला नवा कोरा हिंदी सिनेमा बघायला मिळतो व त्यावर तोंडसुख घ्यायला पण.

बाकी हिंदी राष्ट्रभाषा कधी झाली बॉ??? घटने नुसार बावीस अधिकृत भाषांपैकी हिंदी एक आहे. भारताला राष्ट्रीय भाषा वा राष्ट्रीय धर्म नाही हे लक्षात घ्या.

आपला,
(हिंदीचे राष्ट्रभाषा म्हणून लादने झुगारणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

इनोबा म्हणे's picture

5 Nov 2008 - 10:54 pm | इनोबा म्हणे

बाकी हिंदी राष्ट्रभाषा कधी झाली बॉ??? घटने नुसार बावीस अधिकृत भाषांपैकी हिंदी एक आहे. भारताला राष्ट्रीय भाषा वा राष्ट्रीय धर्म नाही हे लक्षात घ्या.
कळलं का हो टोपीकर :B

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Nov 2008 - 2:03 am | ब्रिटिश टिंग्या

खरचं की!

राष्ट्रभाषा नाहीये ती! मात्र भारत सरकारची अधिकृत भाषा आहे!
गैरसमज दुर करण्याबाबत धन्यवाद!

आपला
(टोपीकर) टिंग्या

अवांतर - मला टिंग्या चित्रपट मनापासुन आवडला वला!

प्राजु's picture

5 Nov 2008 - 9:38 pm | प्राजु

बरिच गंभिर चर्चा झालेली दिसते आहे टिंग्यावर.
पहायलाच हवा. भास्करराव, आपण आता ज्या काही गोष्टी लक्षात आणून दिल्यात त्याच्या पार्श्वभूमीवर आता टिंग्या पाहिन. बघूया कसा वाटतो ते.. :)
परिक्षणासाठी धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 9:57 pm | भास्कर केन्डे

प्राजू ताई, पुढच्या वेळी मराठी चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही सहकुटुंबा आमच्या घरी या. आत्ताच आमंत्रण! :)

आपला,
(मराठी सिनेमे बघण्याचा नाद लागलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.