ये रे माझ्या मागल्या........

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
10 Dec 2014 - 3:11 pm

"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील..... चार पोरांच्यात फील्ड पोझिशन्स काय बघतील......"कॅप्टन" मिडऑनला काय उभा राहील... काही विचारू नका. "कुंबळेच्या अ‍ॅक्शनपेक्षा वॉर्नच्या अ‍ॅक्शननी स्पिन जास्त होतो" हे देखील ह्यांना कळतं....ड्राईव्ह करताना बॉटम हॅन्ड सैल सोडला नाही तर कॅच उडू शकतो हे ही कळतं. सांगायचं काय..... की ही पिढी अक्षरशः क्रिकेट कोळून प्यायलेली आहे.

आता जरा मुद्द्यावर येऊ. ढगाळ वातावरणात बॉल स्विंग होतो जे जर शनिवार पेठेतल्या त्या ढोपराएवढ्या शेंबड्या क्रिकेट तज्ञाला कळतं तर पिचकडून काही सहाय्य मिळत नसताना बोलर्सनी जास्त घाम गाळायला हवा.... खांद्यातून जास्त जोर लावून त्याच टप्प्यावरून बॉल जास्त बाउन्स करावा.... आपला बोलिंगचा वेग सतत कमी-जास्त करून बॅट्समनला सेटल होऊ देऊ नये...... त्याचबरोबर विचित्र आणि आक्रमक क्षेत्ररचना करून फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करावा ह्या गोष्टी आमच्या महान होऊ घातलेल्या कर्णधाराला आणि गेली सात वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या ६ फूट ४ इंच उंचीच्या वेगवान गोलंदाजाला कळू नयेत?

आता तुम्ही म्हणाल हा जेप्या आता कट्ट्यावरच्या क्रिकेटतज्ञागत बोलायला लागला. चला... धरून चाला घटकाभर - नाही कळत आपल्याला क्रिकेटमधलं काही. पण माणसातली जिंकायची, लढायची "भूक" तर कळते! ऑस्ट्रेलियात भारताने आजपर्यंत ४० कसोटींपैकी फक्त ५ जिंकलेल्या आहेत.... साला गावस्कर तेंडल्या द्रविडला जमलं नाही ते आपण करू रे... ह्यावेळी २-० नी ठोकू ह्या #$@ ऑझीजना. ईशांत आधी तिकडे खेळलेला आहे.... यादव, अ‍ॅरन, भुवी, शमी पंचविशीतली पोरं आहेत. ह्यांनी जीव तोडून गोलंदाजी नाही करायची तर कुणी? जेमतेम तिशी पार केलेले एका हाताच्या बोटावर मोजता येणारे खेळाडू असलेल्या संघानी देशासाठी खेळताना चवताळून खेळायला नको? अरे जर जगज्जेता असताना ऑस्ट्रेलियन संघ "फायनल फ्रंटियर" म्हणून भारतात येऊन त्वेषानी खेळू शकत असेल तर आपण जिथे आजतागायत एकदाही मालिका जिंकलेलो नाही अश्या ठिकाणी खेळताना अजून कोणत्या मोटिव्हेशनची गरज तरी आहे का? मग तुमचे चेहरे असे सुतकी आणि देहबोली अशी आजारी का?

Close-in

हे छायाचित्र मी काढलेलं असतं तर मिपाच्या स्पर्धेत "भूक" विषयासाठी हीच एंट्री पाठवली असती! त्या हपापलेल्या सिडलची आणि क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज बघा! बाबांनो आम्हाला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पण जीव तोडून केलेला प्रयत्न नक्कीच कळतो. तुम्ही वर्षातले तीनशे दिवस क्रिकेटच खेळत असता, प्रेशर असतं सगळं मान्य.... आयपीएल खेळा, जाहिराती करा... आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यासाठी आम्ही क्रिकेट बघतो ती मजा नका हिरावून घेऊ! तुम्ही पण लाइव्ह कार्यक्रमात lip synch करणार्‍या त्या चिर्कुट महागायकांसारखे आयपीएलच्या तमाश्यात नाचण्यात खुश असाल तर लक्षात ठेवा.... अजून ५ - ७ वर्षांत ते खूळ उतरेल आणि दुसर कुठलंतरी वेड लागेल क्रिकेटला. पण अजून दोन पिढ्यांनी तेव्हाचे आजोबा त्यांच्या नातवंडांना क्रिकेटच्या गोष्टी सांगतील तेव्हा तुम्ही त्यात असाल का हा विचार करा. हरायला आमची ना नाही... पण हरलात तरी अभिमानाने दाखवण्यासारखे घाव तरी अंगावर असले पाहिजेत रे! पहिल्या कसोटीत पहिल्या दोन दिवसातच माना नका टाकू! डोळ्यांला डोळे भिडवून लढा रे....दात ओठ खाऊन तुटून पडा....धीरोदात्तपणे त्यांच्या आक्रमणाचा सामना करा.....नवे डावपेच लढवा.... झोकून द्या स्वतःला.

बाकी काही नाही... तुम्ही असं केलंत ना तरच मी माझ्या पोराला सांगू शकीन "लेका ठेव ते पुस्तक बाजूला.... आपली लोकं बघ काय लढताहेत! ह्यांच्याकडून जास्त शिकशील!"

क्रीडाविचारलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

10 Dec 2014 - 3:22 pm | किसन शिंदे

तुमच्या दु:खात सहभागी आहे जेपी साहेब.

शलभ's picture

10 Dec 2014 - 3:26 pm | शलभ

सहीच लिहीलयं..

हे छायाचित्र मी काढलेलं असतं तर मिपाच्या स्पर्धेत "भूक" विषयासाठी हीच एंट्री पाठवली असती

आणि पहिला लंबर पण मिळाला असता..:)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2014 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

क्या लिख्खा है रे.... येकच नंबर!

सिरुसेरि's picture

10 Dec 2014 - 3:42 pm | सिरुसेरि

दगडावर डोके आपटून काय उपयोग . आणि , शेवटी रिमोट आपल्याच हाती आहे .

जे.पी.मॉर्गन's picture

10 Dec 2014 - 3:58 pm | जे.पी.मॉर्गन

सिरुसेरि,

>>शेवटी रिमोट आपल्याच हाती आहे<<

इतकं सोपं नाहिये हे. ही काही पटकथा असलेली सास-बहू सीरियल नाही की नाही आवडली तर बंद करा. अहो आवर्जून बघण्या - दाखवण्यासारख्या फार कमी गोष्टी उरल्या आहेत. ह्या लोकांनीसुद्धा माती खाल्ली तर पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील.

जे.पी.

प्यारे१'s picture

10 Dec 2014 - 5:06 pm | प्यारे१

@ जे पी,
>>> पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील.

तुमची क्रिकेटची पॅशन जाणून आहे.
पण ह्या धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे?
की पोरांना शिकवण्यापेक्षा जास्त आपल्या करंट्या टीमचा नेहमीचा नतद्रष्टपणा जास्त त्रास देतो आहे?
(अर्थात एखादी गोष्ट माझी म्हटलं की त्रास होणं स्वाभाविकच म्हणा)

स्पा's picture

10 Dec 2014 - 5:42 pm | स्पा

असेच म्हणतो

धडपड करणं, झुंजणं वगैरे शिकण्या शिकवण्यासाठी फक्त क्रिकेट हाच एक मार्ग आहे

हा सगळ्यात भिकार मार्ग आहे
क्रिकेट कडे फक्त एक खेळ म्हणून पाहावे त्रास कमी होईल

बोका-ए-आझम's picture

10 Dec 2014 - 4:03 pm | बोका-ए-आझम

परफाॅर्मन्स खराब असला तरी पैसे मिळणारच असतात त्यामुळे कुणालाही काहीही पडलेली नाही. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि क्रिकेटबाह्य गोष्टींनी भारतीय क्रिकेटपटूंएवढी कमाई होत नसेल म्हणून ते खेळतात. असल्या लोकांच्या परफाॅर्मन्सने आपला मूड खराब करुन घेण्याएवढे ते महत्वाचे आहेत का हा खरा प्रश्न आहे. आता काल चँपियन्स ट्राॅफीमध्ये भारताने १८ वर्षांनंतर नेदरलँडला हरवलं. पण हाॅकीपटूंना जिंकल्यावर मिळणारा मोबदल्यापेक्षा क्रिकेटपटूंना गेल्यावर मिळणारा मोबदला जर जास्त असेल तर कोणाच्याही मनात जिंकण्याची इच्छा निर्माणच नाही होणार. मी तर हायलाइट्स बघतोि आणि तेही आपण मॅच जिंकली असेल तरच. Nobody is that important that I should lose my happiness because of their performance!

सिरुसेरि's picture

10 Dec 2014 - 6:04 pm | सिरुसेरि

आपल्या लोकांच्या जुन्या मॅचेस यु ट्युब वर आहेत . त्यांतून धडपड करणं, झुंजणं अशा बरयाच गोष्टी शिकता येतील . उदाहरणासाठी - सचिन चे डेसेर्ट स्टोर्म , शोएबला मारलेली सिक्स , राहूलने अ‍ॅलन डोनाल्ड्ला मारलेली सिक्स , कैफची नेट्वेस्ट मधली लगान खेळी , कपिल , कुंबळे , जवागल , प्रसाद यांनी काढ्लेल्या विकेट्स ...

पिंपातला उंदीर's picture

10 Dec 2014 - 8:19 pm | पिंपातला उंदीर

सचिन , द्रविड , कुंबळे , श्रीनाथ इ नक्कीच मोठे खेळाडू असतील . पण भारताला क्रिकेट मध्ये सगळ्यात मोठे बहुमान कोणी मिळवून दिले ? २०-२० विश्व कप कुणी जिंकला ? कसोटी क्रिकेट मध्ये क्रमांक १ कुणी मिळवला ? १९८४ नंतर एकदिवसीय विश्व कप कुणी जिंकला ? पोरा सोरानीच ना ? धोनी , कोहली , इशांत शर्मा , रोहित शर्मा यांनी . वैयक्तिक performance मध्ये बिग ४ भारी असतील पण टीम जिंकण्यासाठी नवीन दमाची पोर लागतात . जी १९८४ च्या टीम मध्ये होती , जी २०-२० विश्व कप मध्ये होती आणि २०११ मध्ये होती . आता पण टीम मध्ये नवीन रक्त आहे . ते धड्पद्तिल कदाचित हारतील पण . पण एक दिवस ते ऑस्ट्रेलिया ला धोबीपछाड देतील . ते पण त्यांच्या घरात . थोडा वेळ द्यावा लागेल पण एक दिवस नक्की . अजून तर पहिली कसोटी च बाकी आहे . पुढे बघुयात काय होते . नाही तरी वैयक्तिक performance ने आतापर्यंत काय भल केल होत ?

प्यारे१'s picture

10 Dec 2014 - 8:24 pm | प्यारे१

बीसीसीआयचा ह्या सगळ्या विजयांमध्ये काहीही हातच नव्हे तर बोट देखील नाही.
असा निरागसपणा हवा प्यारे! कधी शिकणार तू?

नाखु's picture

18 Dec 2014 - 10:34 am | नाखु

मी आपला उगाच समजायचो वरच्या चार लोकांनी केलेल्या धावा आणि घेतलेले बळी संघाच्या यशात धरतात असा भाब्डा समज करीत होतो!!

शिद's picture

10 Dec 2014 - 8:23 pm | शिद

अजूनपण बरीच लोक क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळात भावनिकदृष्ट्या गुंतून आहेत हे पाहून मौज वाटते.

पोरांना धडपड म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, पराभव पचवणं म्हणजे काय हे सगळं कसं शिकवायचं? प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा सुद्धा खेळातले रोल मॉडेल्स बघूनच त्यांची क्षितिजं विस्तारतील.

फारच आशावादी अपेक्षा. शुभेच्छा. :)

बाकी चालू द्या.

स्पंदना's picture

11 Dec 2014 - 6:23 am | स्पंदना

लाज वाटुन राह्यली ना भावा टीव्हीकडे पहायची!!
लय म्हण्जे लय वाटतं, आरं जरा हला, जरा हला!!
ह्यांच काय न्हाय, हितली ठोकताहेत, आन ही आपली मेंगळटागत बॉलच्या मागन मागन, अंदाज घावतोय का न्हाय करत .....जाउ दे
कोण डोकं पिकवणारं?

>>>क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळात <<<

तूने तो पी ही नही ;)

इतकंच !

जे.पी.

सिरुसेरि's picture

11 Dec 2014 - 11:20 am | सिरुसेरि

आपण तर बाबा सचिन रिटायर झाल्यावर क्रिकेट बघणेच सोडून दिले .

प्यारे१'s picture

11 Dec 2014 - 4:20 pm | प्यारे१

भारतीय फलंदाजांनी किमान आज तरी बरा स्कोअर करुन 'ये रे माझ्या मागल्या' खोटं ठरवलेलं दिसतंय.

पिंपातला उंदीर's picture

11 Dec 2014 - 5:05 pm | पिंपातला उंदीर

काय पण ! यात बीसीसीआयचा हात आहे. लैच निरागस बुवा तुम्हि

प्यारे१'s picture

11 Dec 2014 - 6:03 pm | प्यारे१

;)

असण्याची शक्यता आहेच.

बॅटमॅन's picture

11 Dec 2014 - 6:14 pm | बॅटमॅन

बीसीसीआय????

नीट बघा, आरेसेसचा हात असण्याची शक्यता जास्त आहे.

किसन शिंदे's picture

11 Dec 2014 - 11:23 pm | किसन शिंदे

=))

स्पेशल दिक्षा घेतली का रे बॅट्या? ;)

अहो, पिपातले उंदीर ऊर्फ अमोल उदगीरकरांना तोच एक हात माहितीये त्याला काय करायचं. =))

जे.पी.मॉर्गन's picture

12 Dec 2014 - 9:40 am | जे.पी.मॉर्गन

पुन्हा जुनाच शो चाललाय. उद्या आपली बॅटिंग बघायला मजा येईल.

जे.पी.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2014 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा

झालं..संपली म्याच..जिंकू असे वाटत असताना..फिरली..आणि हरली..
पण लढली आणि हरली...हाराकिरी नै केली हे विशेष

सिरुसेरि's picture

13 Dec 2014 - 5:49 pm | सिरुसेरि

एरवी शेन वोर्नलाही दाद न देणारया भारतीय फलंदाजांनी लायोन समोर नांगी टाकली .

जेप्या, फ्रस्ट्रेशन दिसतंय रे पण कोहलीनं आशा चेतवलीन लेका. विंडीजसमोर ७०-७५ का किती त्या धावा हव्या असतानाचा तो गेम आठवा आणि आज बेट्यानं काय केलंन ते बघा तोलूनमापून. रिकी पॉण्टिंगची आठवण आल्यावाचून राहत नाही. तोच खडूसपणा, तोच आगाऊपणा, वही जझबा इ. बॅटिंगमध्येही नि कॅप्टन्सीमध्येही. माझ्यामते धोन्या काही टेस्ट खेळत नाही या मालिकेनंतर.

आज हरलो खरे तू म्हणतोस तसं डोळ्यांला डोळे भिडवून नडले तरी. माझ्यामते कोहलीच्या सेनापतीपदाचा यात महत्त्वाचा भाग असावा. कोहली आणि विज्याला फुल मार्क्स, रहाणे दुर्दैवी पण त्या साहानं विकेट फेकली नाही तर काय म्हणायचं? अननुभव आड आला शेवट. पण सोडून नाही दिली म्याच तिसर्‍याच दिवशी हे महत्त्वाचं. नाहीतर २०११ इंग्लंड-ऑझी दौरे आपण पहिली म्याच हरल्यावरच (आणि यंदाचा इंग्लंड दौरा साउदम्प्टनला जाड्याने कूकचा कॅच टाकल्यापासून) सोडून दिले होते.

पैसा's picture

17 Dec 2014 - 10:56 pm | पैसा

पण क्रिकेटचा सगळा खेळखंडोबा बघून मुलं आता क्रिकेट सोडून दुसरीकडे वळायला लागली. माझा मुलगा शाळेत असताना राज्य स्तरावर प्रशिक्षण घेत होता. पण त्याने आता क्रिकेट बघणेही जवळपास बंद केले आहे आणि फूटबॉल सुरू केला आहे.

खटपट्या's picture

17 Dec 2014 - 11:24 pm | खटपट्या

चांगलंय !!

- जिल्हा स्तरापर्यंत जाउन आलेला !!