एका नव्या इतिहासाची सुरुवात ( अंतिम )

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
3 Dec 2014 - 3:03 pm

पूर्वसूत्र :
एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
एका नव्या इतिहासाची सुरुवात -२
एका नव्या इतिहासाची सुरुवात -३
एका नव्या इतिहासाची सुरुवात -४

नऊ महिने अगदी सुरळीतपणे पार पडले. तणावाच्या छायेखालूनही तिच्या गौर तनूचे असामान्य गर्भतेज लपत नव्हते.
काळोखाचा पडदा दाट झाला आणि ज्या क्षणाची दोन्ही पातळ्यांवर उत्कंठापूर्ण प्रतीक्षा होती, तो अखेर येऊन ठेपला !
अकलिप्ताला प्रसववेदना सुरु झाल्या. शांतन्यने गाडी काढली आणि आईच्या सोबतीने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर अन नर्सेसची धावपळ उडाली.
प्रसववेदना हा अनुभव तिला नवीन होता. वेदनांचे लोळ कोसळत आले..एक एक कळ आकांत माजवून जाऊ लागली.
सर्वच ‘मानवी’ अनुभव जरी तिला नवीन असले, तरी या वेळी तीव्रपणे जाणवणारी, पायाखालचा आधार सुटल्याची भावना तिलाही हादरवून गेली !
...आणि एक क्षण असा आला की तिला सर्व सृष्टीचक्राचा तोल गेल्यासारखे वाटले. डोळे उघडले तरी अंधार मिटेना. जणू ती तारका-चक्रातून अनंत अवकाशाच्या पोकळीत दूरवर भिरकावली जात होती. काही आकार तिच्या आसपासच्या आसमंतातून जवळ येत होते. त्या दीप्तिमान मुद्रा...कुठे बरं पाहिल्या आहेत.... ?
बुद्धी, स्मृती, धैर्य काम करेनाशी झाली अन तिने हताश होऊन सर्व प्रयत्न सोडून दिले !
...ते चेहेरे, ती प्रकाशांकित अस्तित्वे, तिला काहीतरी सांगू पाहत होती. वेदेनेच्या कल्लोळातूनही तिला ते जाणवले. पुन्हा एकदा सर्व शक्ती एकवटून तिने त्या संवेदनांना मन खुले केले आणि त्यांचे शब्द ( ? ) तिच्या मनात उमटू लागले.
‘अकलिप्ता, तुला आणखी एक संधी दिली जात आहे..’
‘होय, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तू आणि वृत्तार-८ नव्या इतिहासासाठी निवडले गेले आहात...’
‘मी, यास्थज्ञ, युगशास्ता , तुला तुझ्या विहित कार्यात यश चिंततो..!’
...ताण जणू असह्य झाला आणि त्याच क्षणी अवकाशाच्या दूरवरच्या एका टोकावर एक नि:शब्द स्फोट झाला.
...तिने एका दैदिप्यमान पुत्राला जन्म दिला !

--**--**--

कसलीही जीवसृष्टी अन सृजनाची क्षमता नसलेल्या दूरवरच्या त्या ताऱ्याच्या, एका प्रलयकारी स्फोटासरशी अगणित ठिकऱ्या झाल्या आणि अनंत अवकाशात दूरवर भिरकावल्या गेल्या. त्या स्फोटाची कुठल्यातरी पातळीवर सूक्ष्म नोंद घेतली गेली.
..करडा अवकाश आता यशाची शुभ्र धवल, समाधानाची सोनेरी, संतोषाची गहिरी निळी, अशा अनेक विस्तृत छटांनी झगमगू लागला.
‘योजना यशस्वी झाली आहे, महाराज !’
‘हम्म.. ! ती आता येणार नाही तेव्हा काही प्रहर पर्यंत तिचे इथले कार्य अंगिराकडे सोपवा...’
‘होय, महाराज.’
‘..वृत्तार-८ चेही कार्य काही काळ इतरांमध्ये विभागून द्या. ’
‘होय’
‘पुढची छेदरेषा आणखी सुमारे नऊ प्रहरांनी म्हणजे तिथल्या पंचेचाळीस वर्षांनी आहे. तोपर्यंत अकलिप्ताचे तिथले कार्य पूर्ण होईल. वृत्तार-८ ला मात्र आणखी सात प्रहर व्यतीत करावे लागतील, महाभारताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ! त्यांनतर त्याच्या पुनरागमनासाठी छेदरेषेची योजना आणि उर्जानिर्मितीची व्यवस्था आतापासूनच करावी लागेल.’
‘जशी आज्ञा, महाराज ! ’
‘मी आता स्वामींना याचा वृत्तांत देण्यासाठी प्रस्थान करत आहे.’
अवकाशातले रंग, गंध, नाद निमाले. करड्या मेघाच्या अंतरंगात खोलवर एक समाधानाची सोनेरी छटा विलसली अन विरून गेली. काही तारका झोपेतून जाग्या झाल्याप्रमाणे लुकलुकल्या. कृष्णमेघांमध्ये सोनेरी सूर्यकिरणांचे कवडसे लकाकले . फुलपाखरांना रंगीत स्वप्ने पडली.
....काही पळे थांबलेले एक अव्याहत चक्र पुन्हा सुरु झाले.

..**..**..

पुत्रजन्माचा आनंद शांतन्यच्या नजरेत मावत नव्हता. आई तर नातवाचे आगळेवेगळे तेजस्वी रूप पाहून भान हरपून गेली.
...नुकतीच शुद्धीवर आलेल्या अकलिप्ताने एकवार आपल्या, त्रिभुवनात एकमेव असलेल्या सानुल्याला डोळे भरून पाहिले अन छातीशी लावले. एका आगळ्या वेगळ्या मंगल भावनेने तिचे हृदय भरून गेले. बाळाच्या परिचित भासणाऱ्या चेहेऱ्याकडे ती अतीव हर्षाने पाहू लागली. त्याच्या निळ्या नितळ डोळ्यात ओळख शोधू लागली.
त्याचा तेजस्वी चेहेरा मन भरून पाहताना सहजच तिच्या ओठावर शब्द आले...
'देवव्रत असताना तुला घडवू शकले नाही आणि ते अनर्थकारी महाभारत घडले. पण आता अकलिप्ता होऊन त्या चुकीची भरपाई करणार आहे, रे राजसा ! तू आणि मी एक नवा इतिहास घडवणार आहोत...तयार आहेस ना वृत्तार-८ .. ?'
...एक नवा इतिहास घडवण्याचे त्याचे सामर्थ्य अन त्यासाठी 'त्याला' घडवण्याचे, तिला दिले गेलेले आव्हान तिने स्वीकारले होते !
( समाप्त )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सगळे भाग वाचले.
आवडली कथा...

स्पा's picture

3 Dec 2014 - 4:42 pm | स्पा

जल्ला कायच कल्ला नाय :(

संजय क्षीरसागर's picture

3 Dec 2014 - 11:52 pm | संजय क्षीरसागर

पण आधी शेवटचा भाग वाचला... म्हणून वेळ वाचला.

स्पंदना's picture

4 Dec 2014 - 5:05 am | स्पंदना

गंगा आणि देवव्रत किंवा ज्याला त्याच्या भिष्म प्रतिज्ञेसाठी ओळखल जातो तो भिष्म यांची पुनरावृत्ती आहे या लेखात.
आता काही समजतय का पहा.

स्पा's picture

4 Dec 2014 - 11:09 am | स्पा

ओह असंय होय

प्रचेतस's picture

3 Dec 2014 - 5:05 pm | प्रचेतस

कथा आवडली पण शेवट थोडासा अनपेक्षित आणि त्रोटक वाटला.

सस्नेह's picture

4 Dec 2014 - 10:54 am | सस्नेह

आपल्याला 'शेवट गुंडाळल्यासारखा वाटतो' असे म्हणावयाचे आहे काय ? *biggrin*

प्रचेतस's picture

4 Dec 2014 - 10:57 am | प्रचेतस

हो. :)

कथा आवडली. कथाबीज उत्तम आहे.
पण थोडी लांबली असं माझं मत.
शिवाय 'महाभारत' पुन्हा न घडू देण्यात ''त्यांना' इतका रस का असावा हे कळलं नाही.
अवांतरः कथा कोणत्या काळातली आहे ते माहिती नाही, पण इतक्या वेळा गर्भपात होऊन पुन्हा गर्भातूनच मूल जन्माला घालण्याचा खटाटोप कालबाह्य वाटला. म्हणजे आगापीछा माहिती नसलेल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय जितका आधुनिक, तितकाच हा प्रतिगामी.

अधिक अवांतरः मी गंमत म्हणून अशी एक कथा लिहिली होती (प्रकाशित केली नाही), सापडल्यास व्यनि करते ती. तुलना नाही, सहज आठवलं म्हणून म्हणतेय.

शिवाय 'महाभारत' पुन्हा न घडू देण्यात ''त्यांना' इतका रस का असावा हे कळलं नाही

या प्रश्नाचे उत्तर तिसऱ्या आणि चौथ्या भागात मिळेल.
या आणि इतर पातळीवरच्या काही विश्वांवर नियंत्रण करणे हे आपले काम आहे

इतक्या वेळा गर्भपात होऊन पुन्हा गर्भातूनच मूल जन्माला घालण्याचा खटाटोप कालबाह्य वाटला.

तसाच काही जननविषयक प्रॉब्लेम असल्याशिवाय निदान भारतात तरी सामान्य लोक इतर पर्यायांचा विचार करीत नाहीत अशी माझी संकल्पना होती. *smile*

मलाही कथा आवडली पण शेवटचा भाग त्रोटक आटोपल्यासारखी वाटली.

कपिलमुनी's picture

3 Dec 2014 - 5:57 pm | कपिलमुनी

कथेमधली भाषा खूप छान आहे . एकदम वेगळी शैली !

एकूणच कथा आवडली , फार टेक्निकल न होता छान मांडणी केलीत.

अर्धवटराव's picture

3 Dec 2014 - 11:37 pm | अर्धवटराव

कथा आवडली, कथेची मांडणी, भाषा विशेष आवडली... ३डी अवतार मधल्या चमकणार्‍या फुलपाखरांसारखी.

मुक्त विहारि's picture

4 Dec 2014 - 12:17 am | मुक्त विहारि

खरे तर लिहीण्यासरखे अजुन काही नक्की असावे...

असो,

पसंत अपनी अपनी

स्पंदना's picture

4 Dec 2014 - 5:08 am | स्पंदना

सुरेख कथा!
लेखनशैली, पुर्वीच्या कथेवर आधारित कथाबीज, सगळच अतिशय सुरेख. तरल भावदशा अन त्या भावनेची नविन जगात पुनरावृती मस्तच.

जुन्या कथेवरुन नवं कथाबीज फुलवुन पाहाण्याची कल्पकता आवडुन गेली.

कवितानागेश's picture

4 Dec 2014 - 7:51 pm | कवितानागेश

पुढे काय, असे वाटत असतानाच कथा थांबली.

सस्नेह's picture

4 Dec 2014 - 8:10 pm | सस्नेह

थांबली नाही, सुरू झाली.
नवे महाभारत वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे ! *smile*

वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे...>>
बर्याच काळापासुन माझ्या डोक्यात कल्की फिरतोय.
ईथे संबध जुडेल काय?

सस्नेह's picture

4 Dec 2014 - 9:58 pm | सस्नेह

लिवा की हो मग ! *smile*

जेपी's picture

5 Dec 2014 - 6:31 am | जेपी

सध्यातरी वाचनखुण
साठवतो. पुढे वेळ मिळाल्यावर लिहीन.
:-)

(लिवा) जेपी

satari godava's picture

4 Dec 2014 - 10:48 pm | satari godava

खुप छान.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Dec 2014 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली.

जे पी ना +१

वा खु साठवली आहे.

पैजारबुवा,

कथेच्या सर्व भागांचे वाचक प्रतिसादक यांचे आभार, ही काहीशी वेगळी कथा वेळ काढून वाचली अन आवर्जून प्रतिसाद दिला याबद्दल !
पुष्कळांना कथेचा अर्थ न लागल्याचे लक्षात आले म्हणून काही संदर्भ.
या कथेचे बीज महाभारताच्या आरंभ-कथेतून आले आहे. गंगा, शंतनू आणि आठवा वसु देवव्रत यांच्या कहाणीवर ही कथा बेतली आहे. महाभारत कथा पहिल्यांदा वाचली तेव्हापासूनच एक पर्याय मनात आला होता की कदाचित गंगा तान्ह्या देवव्रताला सोडून स्वर्गात गेली नसती तर शंतनू-मत्स्यगंधा विवाह, त्यातून निपजलेली संतती, त्यांची शोकांतिका हे सगळे फार फार वेगळे झाले असते. याच कल्पनेतून ही कथा जन्मली.
इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. कुणी जगन्नियंता जर असेल, तर महाभारताची पुनरावृत्ती होताना या शोकांतिकेचा नक्कीच विचार करेल आणि घटनांना वेगळे वळण मिळू शकेल, या आशावादी विचारावर ही कथा आधारित आहे.
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम’ असे असूनही या ‘महा’ कथेला हात लावला याबद्दल द्वैपायनमहर्षींची क्षमा मागून ही कथा लिहिण्याचे धाडस केले आहे !

अनन्न्या's picture

5 Dec 2014 - 3:29 pm | अनन्न्या

आवडली कथा!

एस's picture

5 Dec 2014 - 3:54 pm | एस

वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली.

पैसा's picture

5 Dec 2014 - 8:42 pm | पैसा

अनेक शक्यतांपैकी एकीचा विचार करून लिहिलेली कथा! मस्तच!

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 11:50 am | दिपक.कुवेत

लिहितेस छानच तू त्याबद्दल वादच नाहि पण ज्या ताकदिने लिहिली आहेस ते मात्र स्मितीत करतं...

स्पंदना's picture

7 Dec 2014 - 4:19 pm | स्पंदना

स्तिमीत?

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 6:14 pm | दिपक.कुवेत

शब्द चुकला वाटतं

पैसा's picture

7 Dec 2014 - 4:31 pm | पैसा

एक लिहायचं राहिलं. "देवांच्या" बोलण्यात जी काही वैज्ञानिक वाटणारी परिभाषा आहे, त्यात ज्या संस्कृत संज्ञा वापरल्यास (त्यांना मुळात इंग्लिश प्रतिशब्द नक्कीच असतील आणि आम्हाला तेच माहीत असतील.) त्यासाठी आणि एकूणच डौलदार भाषेसाठी शाब्बास!

आपल्याला 'मराठी' प्रतिशब्द असे म्हणायचे आहे काय ? *biggrin*

शिरीष फडके's picture

10 Dec 2014 - 4:18 pm | शिरीष फडके

छान

किसन शिंदे's picture

12 Dec 2014 - 2:34 am | किसन शिंदे

आत्ता एकत्रच सगळे भाग वाचून काढले, कथा म्हणून एकदम हटके प्रकार वाचायला मिळाला, पण त्यातल्या त्या दुसर्‍या जगाबद्दल आणि विचित्रपूर्ण नावांबद्दल काहीच बोध झाला नाही.

सस्नेह's picture

12 Dec 2014 - 9:52 pm | सस्नेह

दुसऱ्या जगाची संकल्पना काहीशी अशी .
त्रिमित भौतिक जगतात जर काळ ही चौथी मिती मानली तर पाचवी किंवा सहावी मिती ही उर्जेच्या पातळीवर किंवा प्रमाणावर अवलंबून असेल. जसे की अणूची रचना. यात प्रत्येक इलेक्ट्रॉन वेगळ्या पातळींवर असतो आणि तयाची उर्जा इतरांपेक्षा भिन्न असते. केंद्राजवळच्या इलेक्ट्रॉनची उर्जा सर्वात जास्त असते. तर प्रोटॉन त्यापेक्षा अधिक उर्जा धारण करून असतात.केंद्रातल्या उर्जेने इतर सर्व इलेक्ट्रोन्सच्या हालचाली नियंत्रित होतात.
विश्वाची, सूर्यमालेची रचनाही एखाद्या अणूसारखीच आहे. कदाचित आपल्यापेक्षा जास्त उर्जा असलेल्याही पातळ्या असतील. तिथे भौतिक, अभौतिक अस्तित्वे असतील, जी आपल्या विश्वाचे नियंत्रण करत असतील. स्वर्ग, नरक या अशाच पातळ्या असतील काय ?
कथेमध्ये मी जास्त तपशीलात जाण्याचे टाळले कारण त्यामुळे कथानकाचे मूळ , जे महाभारत कथेशी संलग्न आहे, ते बाजूला राहिले असते आणि कथा जास्त तांत्रिक झाली असती.
शेवटी ही संकल्पना आहे, शास्त्रीय सिद्धांत नव्हे, एवढेच लक्षात घ्यावे.
नावांना फारसे महत्व नाही. वेगळेपणा दर्शवण्यासाठी वेगळी नावे.
धन्यवाद किसन.

ओक्के. वाचले सगळे भाग! समजून घेतीये. कथा भारी जमलिये.

किसन शिंदे's picture

12 Dec 2014 - 10:53 pm | किसन शिंदे

समजावून सांगितल्याबद्दल धन्यू रे.

पुन्हा एका नव्या इतिहासाची सुरुवात...

लवकरच..

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2018 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!!!

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 5:12 pm | श्वेता२४

कथा विषय अत्यंत वेगळा व त्याचे महाभारताशी असलेला संबंध हा प्रयोगच वेगळा आहे. खूपच आवडली कथा

कांदा लिंबू's picture

8 Jul 2024 - 10:31 am | कांदा लिंबू

ही कथा कशी काय वाचण्यातून राहिली बरे!

कथा आवडली हं, सस्नेह.

सस्नेह's picture

31 Jul 2024 - 10:37 pm | सस्नेह

धन्यवाद __/\__