पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
एका नव्या इतिहासाची सुरुवात -२
अपयशाची काळी झाक अवकाशाच्या करड्या अंतरंगातून ठळक झाली.
.. ‘वृत्तार -४ पण परत आला ?’
‘होय महाराज.’
‘तिला इथे यायला प्रवृत्त करण्यात त्या सर्वांना अपयश यावे हे अनिष्ट आहे..’
‘...’
‘सापेक्ष कालगतींचा आलेख घे पाहू...’
करड्या गाभ्याच्या अंतरंगात काही त्रिमित प्रकाशमान रेषा अवतीर्ण झाल्या. त्यांच्या छेदबिंदूंवर प्रकाशवलये लवलवत होती. आलेखाच्या एका एका भागाचे परीक्षण केले जाऊ लागले. परीक्षण केला गेलेला भाग टप्प्याटप्याने गडद होत गेला. अखेर तीन छेदबिंदूच काय ते प्रकाश वलयांकित दृग्गोचर झाले.
‘इथे उर्जेचा उतार तीव्रतम आहे. आपल्याला तीनच संधी आहेत. त्यापैकीच एक साधली गेली पाहिजे...’
‘बरोबर आहे, महाराज’
‘...आता पाचवा अन सहावा वृत्तार दोघांना एकदम पाठवा.’
‘होय महाराज’
..**..**..
पाचव्या खेपी पण तेच अभद्र समोर आले.
...याखेपेस जुळे होते !
सहाव्या खेपेस तो अघोरी संबंध अकलिप्ताच्या लक्षात आला. कुणीतरी तिला साद घालत होते अन तिच्याकडून प्रतिसाद आला नाही की तिचे बाळ नाहीसे होत होते !
हे काहोतरी वेगळे होते ! इथे डॉक्टरी उपाय चालत नव्हते.
हा काय प्रकार होता ? तिने शांतन्यला सांगितले. त्याचीही तशीच अवस्था झाली.
अखेर तिनेच एक ठरवले. ‘त्या’च्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा...!
पण कधी ? ती ‘त्या’ ला बोलावू शकत होती का ?
....जणू तिचा निश्चय हाच एक संकेत होता. त्याच रात्री ‘तो’ हजर झाला. पुन्हा तीच गूढ हाक..
‘अकलिप्ता, चल तुला यायचे आहे माझ्यासोबत .’
सर्व मनोबल एकवटून तिने मनातच शब्द आणले , ’थांब ! कोण आहेस तू ? नेहमी नेहमी का येतोस ? मला कुठे न्यायचे आहे ? मी येणार नाही ! मुळीच नाही !’
त्या आकृतीच्या मुद्रेवर (?) आश्चर्य उमटले . ( तिला शंका आली, त्यात काहीसा समाधानाचा अंश होता काय ?)
‘अकलिप्ता, तू विसरली आहेस ? सिंबन १२-र-७ पातळी ? तुझे विहित कार्य ? यास्थज्ञ महाराजांचे अनुशासन ? ‘
‘तू काय बोलतो आहेस मला कळत नाही...पण मी येऊ शकत नाही. तू जा .’
‘तू आठवण्याचा प्रयत्न केलास तर सगळे आठवेल. अजूनही वेळ आहे. परत ये अकलिप्ता, परत ये.’
आणि तिला जाग आली.
शांतन्यला काय अन कसे सांगावे तिला समजेना. तिच्याच मनात विचारांचा इतका गोंधळ झाला होता !
...पुन्हा तीच वेदना. दवाखाना . तेच सोपस्कार.
ती हताश अन निराश. तो वैफल्यग्रस्त.
छे ! याचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे आता !
..तिने विचार केला.
..**..**..
....रंग, गंध, नाद, रस यांची अवकाशात सरमिसळ झाली.
‘महाराज, चांगली बातमी. ती संदेशन करू पाहते आहे.’
‘छान. आणखी प्रयत्न करा. आता काळ फार थोडा उरला आहे.. एकाच संधी ! आणि यशच हवे.’
‘वृत्तार-८ सिद्ध आहे, महाराज !’
..**..**..
सातव्या खेपी दोघांची मानसिकता इतकी तीव्र झाली होती, की दोघांनीही निर्णय घेतला. बस. काही व्हायचे असेल तर आत्ताच.. यांनतर पुन्हा प्रयत्न नाही.
अकलिप्तानेही स्वत:च्या मनाशी एक निर्धार केला होता...!
याखेपी तिचे तेज काही वेगळेच होते. तिच्या शांतगंभीर मुद्रेतून अन नजरेतून एक वेगळाच निर्धार ओसंडून वाहत होता. जणू काही ती स्वत:मधले सर्वस्व एका अटळ क्षणासाठी एकवटत होती. सर्व मानसिक बळ एका कुपीत साठवत होती.
पाचवा महिना लागला. पहाटेच्या पहिल्या भरात रात्र प्रवेश करतानाच तिला ती आता ओळखीची झालेली हाक ऐकू आली.
‘अकलिप्ता...’
तिने सर्व बळ एकवटले. ‘हे पहा, मला सर्व काही स्पष्ट झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. मला सांगा. मी कोण आहे ? तुम्ही कोण ? इथे का येता ? माझी बाळे कुठे आहेत ?’
दिलाशाचे एक स्निग्ध स्मित त्याच्या मुद्रेवर उमटले. त्यात सहानुभूतीचाही काही अंश होता.
‘अकलिप्ता, आपले विश्व वेगळे आहे. या आणि इतर पातळीवरच्या काही विश्वांवर नियंत्रण करणे हे आपले काम आहे. तू या पातळीवर आलीस आणि इथेच रमली आहेस. त्यामुळे स्थळकाळपटात एक भोवरा निर्माण झाला आहे. तो सरळ झाला नाही तर या पातळीवर उत्पात होईल. हे विश्व उधळले जाईल. जीवन उद्ध्वस्त होईल. हे टाळण्यासाठी तुला तिकडे आले पाहिजे.’
‘पण मग शांतन्यचे काय ?’
‘त्याचे काय ? तो काही काळाने तुला विसरून जाईल...’
‘तुम्ही प्रत्यक्ष न येता स्वप्नात का बोलता ?’
‘आपली पातळी वेगळी आहे. तू आहेस त्या पातळीला छेदरेषा म्हणजे प्रचंड शक्तीचा निर्यास हवा. ते या परिस्थितीत परवडणार नाही.’
‘मग मी तिकडे कशी येणार ?’
‘ती उतार-रेषा आहे. तुला बिलकुल प्रयास पडणार नाहीत. तू ‘इकडची’च आहेस ‘
‘नाही..! मला विचार करायला काही अवधी द्या. माझ्या बाळाला नेऊ नका...’
‘बाळ ? ओहो ! तुझ्या लक्षात नाही आले ? तो मीच आहे. तुझ्याशी संदेशन शक्य व्हावे म्हणून या मार्गाने आलो आहे.’
‘काय ?’ तिला आता काही काही उमजू लागले होते..
‘ठीक आहे तुला अवधी हवा आहे ना ? दोन पळे, म्हणजे या जगतातले सात दिवस अवधी तुला देण्याचे स्वातंत्र्य मी घेतो. बरोबर सातव्या दिवशी मी पुन्हा येईन. तुझा बाळ तोपर्यंत तुझ्यापाशीच राहील.’
तिला जाग आली. तिने शांतन्यला जागे केले. पण सगळे नाही सांगितले. काही भाग सांगितला. त्याचे समाधान अर्थातच झाले नाही. पण त्याचा तिच्यावर इतका विश्वास होता की डोळे मिटून त्याने मृत्युमुखात सुद्धा उडी घेतली असती !
तो स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करत शांत राहिला.
दिवस जातील तसतसे तिला काहीकाही आठवू लागले. मधूनच डोळ्यावर अंधारी येई आणि ‘त्या’ जगातली दृश्ये समोर येत. आणि या जगाची (तिच्यासाठी असलेली ) अवास्तवता प्रकर्षाने जाणवू लागली.
तिच्या विश्वाच्या अन या जगताच्या उर्जापातळीमध्ये असलेला प्रचंड फरक तिच्यामागे काळ बनून उभा होता. उंचावर नेलेल्या दगडात साठवलेल्या स्थितीजन्य उर्जेप्रमाणे तिच्यामागे ती काल-उर्जा साठून राहिली होती, दिवसेंदिवस वाढत होती. काल-रेषेच्या केसासारख्या अतिसूक्ष्म ताणलेल्या धाग्यावर चालावे, तशी ती या जगतात परिभ्रमण करत होती. त्या उर्जेचा रेटा अखंड मानवजात सहन करू शकली नसती, तिथे शांतन्यचा काय पाड ? ती इथेच राहिली तर शांतन्यचे आणि संपूर्ण मानवजातीचे जीवन धोक्याच्या रेषेवर लटकत राहिले असते. आणि कधीतरी तिचा तोल गेला, तर प्रचंड विनाशाची लाट निर्माण झाली असती !
...तिचे जाणे किती अपरिहार्य आहे हे तिला अखेर कळून चुकले !
( क्रमश: )
प्रतिक्रिया
27 Nov 2014 - 12:08 pm | अगोचर
आणि मी पयला !
27 Nov 2014 - 12:25 pm | एस
वाचकांचीही उत्कंठता अतिसूक्ष्म ताणलेल्या धाग्याप्रमाणे ताणली गेली आहे!
27 Nov 2014 - 12:52 pm | कवितानागेश
हे सगळे "ओळखीचे" का वाटतंय?? :)
27 Nov 2014 - 2:31 pm | बाबा पाटील
अवांतर : कोणी तरी ए.सी.पी. प्रद्युम्न आणी दयाला बोलवा रे ? साला केमिकल लोचा झालाय,जरा इस्काटुन तरी सांगतील.
27 Nov 2014 - 5:04 pm | सस्नेह
इस्काटून सांगायच्या आधीच 'सुंदर' म्हटल्याबद्दल धन्यवाद ! *biggrin*
27 Nov 2014 - 4:37 pm | अजया
वाचतेय.छान चाललीये कथा.जुना साबण इन नविन रॅपर असला तरी छानच आहे! ^_~
27 Nov 2014 - 5:24 pm | प्रचेतस
दमदार कथानक आहे.
उत्कंठा वाढतीय प्रत्येक भागागणिक.
27 Nov 2014 - 7:18 pm | दिपक.कुवेत
काय योग्य क्षणी क्रमशः केला आहेस गं!!! टाक बाबा पुढचा भाग लवकर....
27 Nov 2014 - 7:26 pm | आतिवास
वाचतेय.
27 Nov 2014 - 8:43 pm | प्यारे१
लई उत्सुकतेनं वाचिंग आणि पुढचा भाग येईपर्यंत थांबिंग . :-/
28 Nov 2014 - 5:07 am | मुक्त विहारि
असु दे....
चलता हय..
28 Nov 2014 - 5:38 am | स्पंदना
ह्या! ह्या!! ह्या!!!
कायतरी मार्ग काढा राव! ठेवा तिला जिमिनीवरच!!
28 Nov 2014 - 7:06 am | स्वप्नज
मस्त चाललीय कथा...पण 'शोकांत' तर नाही ना होणार??
अकल्पिताला सांगा शांतन्यचा विचार करुन निर्णय घ्यायला. आणि तरीही तू 'यायचे' ठरवलेसच तर शांतन्यलापण घेऊन ये गं.बिच्चारा त्या विश्वात एकटा काय करेल...
-तुझा बालमित्र इस्कोट इश्कार
(ऊर्जागट- सरस५क४५%/५६७*२२!)
28 Nov 2014 - 8:49 am | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही चांगला जमला आहे. कथा पुढे कशी जाणार याची थोडीशी कल्पना या भागात आली.
पुभाप्र.
पैजारबुवा,
29 Nov 2014 - 1:34 pm | सस्नेह
पुढच्या भागानंतर कल्पना बरोबर होती की चूक हे सांगणे !
29 Nov 2014 - 4:08 pm | अनन्न्या
काय होणार, ती जाईल की थांबेल? लवकर टाक पुढचा भाग!
30 Nov 2014 - 5:38 pm | इशा१२३
सगळे भाग एकदम वाचले आणि उत्कंठा प्रचंड वाढली.लवकर पुढचा भाग टाक.
5 Dec 2014 - 8:33 pm | पैसा
आता सगळे एकदम वाचते आहे!