पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
पाटण्याचा तो अवाढव्य बंगला, अत्याधुनिक सजावट सोयीसुविधा यांच्यात अकलिप्ता हरवून गेली. तिला सगळेच नवे होते. आई काही दिवस राहिली अन पुन्हा पुण्याला गेली.
शांतन्यच्या गहिऱ्या प्रीतीने तिच्या आयष्यात जादूमय रंग भरले. सोनेरी दिवस फुलपाखरे होऊन उडू लागले. गृहोपयोगी अशी सगळी अत्याधुनिक उपकरणे फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन वापरणे जरी तिला नवीन होते तरी तिने लीलया आत्मसात केले. ती मूळची अत्यंत बुद्धिमान असल्याचे शांतन्यच्या लक्षात आले. नवीन विषयांचे ज्ञान आकलन होण्याची तिची गती आणि क्षमता कल्पनातीत होती. सामान्य व्यवहारातलेच नाही तर तांत्रिक विषयसुद्धा ती हा हा म्हणता आत्मसात करीत असे. पण ती स्वत:हून फारच कमी विषयात रस दाखवीत असे.
आणखीही काही काही शांतन्यच्या लक्षात आले, तिला गर्दीची ठिकाणे आवडत नसत. नटणेमुरडणे याची विशेष आवड तिला नव्हती. एकांतात ती रमे. स्वत:च्या ठायी शांत प्रसन्न असे. काही उपभोगणे यापेक्षा काही देणे, दुसऱ्यासाठी काही करणे तिला आवडे. लहान मुलांमध्ये ती विशेष रमत असे.
तिचा अन शांतन्यचा एक छंद समान होता. गंगाकिनारी तासनतास निवांत बसणे किंवा फिरणे. दोघांच्या बऱ्याचशा गुजगोष्टी गंगाकिनारी होत. कदाचित गंगेच्या साक्षीने पहिली भेट झाल्यामुळे असेल, पण गंगेला त्यांच्या आयुष्यात एक अनन्य स्थान होते. गंगाकिनारी जाणे ही तर अकलिप्तासाठी एक अनिवार्य गोष्ट होती. त्या जलप्रवाहाकडे पाहताना कित्येकदा तिची जणू समाधी लागत असे.
आपल्या आवडीला अनुसरून तिने बालगटाला शिकवण्याचे काम स्वीकारले. गरज नव्हती पण छंद अन रिकामा वेळ जाण्याचे साधन.
दोघांनाही आता नव्या छोट्या पाहुण्याची आस लागली होती...
..**..**..
सांकेतिक संदेशन योग्य त्या ठिकाणी रवाना झाले अन पुन्हा एकदा फिकट करड्या अवकाशाच्या गाभ्यात रंग झळाळू लागले. अनाहत नाद खंडित झाले अन अव्यक्त संवाद सुरु झाला.
‘क्लोव्तार आला आहे ?’
‘होय महाराज’
‘ती येते आहे ना ?’
‘’नाही महाराज.’
‘नाही... ??? ....ती नाही म्हणाली ?’
‘तिने संदेशनाचे सर्व मार्ग बंद केले आहेत. ज्लुस्तर कोष कार्यान्वित केला आहे. त्यात स्वत:ला गुरफटून घेतले आहे. त्यामुळेच क्लोव्तारला तिच्याशी संदेशन शक्य झाले नाही.’
‘असे का केले तिने ? ‘
‘.....’
‘हे चालणार नाही. ब्रम्हउत्पात होईल ! तुला माहिती आहे, तिचे कार्य फार वेगळे आहे. तिचा वंश आपल्यातला आहे. ती आणि एक मानव..???’
‘महाराज यापूर्वीही अशी उदाहरणे झाली आहेत..’
‘होय, पण ती प्रस्तावित अन नियोजन-बद्ध होती. सर्व लहान-मोठ्या धोक्यांची अन शक्यतांची पुरेशी काळजी घेऊन आखलेली...’
‘तशी आताही घेता येईल..’
‘घ्यावीच लागेल. अन्यथा स्वामींना उत्तर देणे शक्य होणार नाही तुला अन मला !’
‘वृत्तारांना पाठवावे असे मला वाटते..’
‘एकदम आठजण ?’
‘एक पुरेसा झाला तर चांगलेच आहे.’
‘पण ते तरी तिच्याशी संदेशन कसे करणार ?’
‘तिचे विचार जेव्हा त्यांच्या दिशेने वळतील तेव्हा कोष भेदित होईल आणि संदेशन शक्य होईल. एकदम प्रत्यक्ष पातळीवर उतरून चालणार नाही. कल्पनातीत उर्जापव्यव होईल. आधी ४-#तर्ष-$ पातळीवरील तरल सूचक संदेशन करावे. ’
‘चालेल. पण एका वेळी एकालाच पाठव. आणि स्थळ-काळ पटाचा कमीत कमी भाग यात गुंतला जाईल याची काळजी घे. आधीच पुरेसा गोंधळ माजलेला आहे...’
‘होय महाराज.’
‘काळाचा हिशेब काटेकोरपणे पाहावा लागेल. त्यांची पाच वर्षे म्हणजे आपला एक प्रहर. सगळा घटनाक्रम पूर्ण होण्यास चार पळांपेक्षा जास्त काळ दवडता येणार नाही. आणि प्रत्येक घटनेनंतर मला संदेश आवश्यक आहे.’
‘अर्थात..!’
संदेशांची विद्द्युल्लता निमिषार्धात निमाली अन अवकाश पुन्हा करड्या रंगाचे आवरण घेऊन सुस्त झाला.
..**..**..
नव्या छोट्या पाहुण्याची चाहूल लागली अन त्या दोघांच्या सुखाला पारावार राहिला नाही. सगळे संवाद अन कृती आता त्या एकाच परिमाणात होऊ लागले.
डॉक्टर, चेकअप, सुयोग्य आहार यात अकलिप्ता गुरफटून गेली. काही दिवस शांतन्यची आई येऊन राहिली.
चौथा महिना लागल्यानंतर आठेक दिवसानंतरची गोष्ट. पोटातल्या जिवाची आताशी इवली चाहूल जाणवू लागली होती. शांतन्यच्या मित्राने संध्याकाळी जेवायला बोलावले होते. गप्पा होता होता जरा उशीरच झाला. अंथरुणावर पडलेली अकलिप्ता झोपेच्या प्रतीक्षेत सैलावलेली. निद्रेचा अंमल अजून पुरता ठसलेला नव्हता. मनात विचार साहजिकच नव्या जिवाचे. पोटातला तो इवलासा जीव..कसा दिसत असेल तो ? मिटलेल्या डोळ्यांपुढे येणाऱ्या असंबद्ध चित्रांचा अर्थ लावायला गाफील मन असमर्थ होते.
...आणि एकाएकी मिटल्या डोळ्यांसमोर ती आकृती धुराच्या लोटासारखी उसळून आली ! ओळखीचीशी वाटणारी.
‘अकलिप्ता..’
ती हाक खरोखरच तिच्या कानांनी बाहेरून ऐकली की आतून ? तो आवाज मानवीच आहे का ? झाडातून जाणाऱ्या वाऱ्याच्या शीळेसारखा, समुद्राच्या गाजेसारखा, पडत्या पावसासारखा तो आवाज...
आणि ती डोळ्यांपुढची आकृती ? ती इतकी परिचित का वाटत आहे ? अरे, याच्यासोबत कितीतरी काळ गेला आहे आपला !
‘तुला परत यायचे आहे, अकलिप्ता.’ तो आवाज पुन्हा मनाच्या पोकळीत घुमून उठला.
‘तुझे स्थान इथे नाही, तिकडे आहे. यास्थज्ञ महाराजांची आज्ञा मी तुला ऐकवतो आहे. तू परत ये ! ताबडतोब परत ये...!’
एक लहानसा धक्का बसून ती पूर्ण जागी झाली. दरदरून फुटलेल्या घामानं ती निथळली होती. पोटात बारीक कळ उठत होती.
ते स्वप्न होते काय ? असलेच तर इतके वास्तवसदृश्य स्वप्न कुणी अनुभवले नसेल. विचार करता करता ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण पोटातली कळ वाढतच चालली होती. काही मिनिटांनी काही एक शंका येऊन तिने शांतन्यला उठवले. तोही घाबरून गेला. त्वरेने कपडे करून त्याने गाडी काढली.
...दवाखान्यात जाईपर्यंत उशीर झाला ! बाळाने पोटातच, न पाहिलेल्या जगाचा निरोप घेतला होता ! !
..**..**..
नेहमीच्या करड्या रंगाने प्रदीप्त झालेल्या अन्तरिक्षात अस्वस्थतेच्या जांभळ्या छटेने संक्रमण केले.
‘वृत्तार-१ जाऊन आला, महाराज..’
‘ती आली ?’
‘......’
‘आपण तिला तसेच आणू शकत नाही ?’
‘तिच्या मानसिक प्रतिक्षेपांमुळे स्थळकाळात निर्माण होणारी पोकळी भविष्यात अनर्थ माजवू शकेल. तिच्या मानसिक शक्ती आपल्या अधीन नाहीत, महाराज !’
‘हम्म. वृत्तार-२ ला तयारी करायला सांग...’
‘होय महाराज.’
..**..**..
त्या दु:खातून सावरायला शांतन्यला अन तिला काही महिने लागले. डॉक्टरांनी धीर दिला. अजून काही दोघांचं वय झालं नाही, प्रकृती उत्तम आहेत, भविष्यात संधी नक्की येईल.
काही महिन्यातच पुन्हा अकलिप्ता गर्भतेजाने तळपू लागली. या खेपी सर्वांनी काटेकोर काळजी घेतली. आईने मुक्काम पाटण्याला हलवला. घरच्या कामासाठी शांतन्यने दोन मोलकरणी लावल्या. चौथा महिंना सुखरूप पार पडला.
पाचव्यात अकलिप्ताचे मूळचे तेजस्वी रूप आणखी झळाळून उठले.
बेडरूममध्ये छोट्या बाळाचे एक सुरेख चित्र शांतन्यने आणून लावले.
त्या दुपारी तो ऑफिसात गेला होता अन आई तिच्या खोलीत वामकुक्षी घेत होती. पडल्या पडल्या अकलिप्ता चित्र निरखत होती. आपला बाळ असाच असेल का ? नकळत तिचे विचार पोटातल्या गर्भावर केंद्रित झाले...
...अन क्षणार्धात काहीतरी झाले. डोळ्यापुढे वीज चमकल्यासारखी तिला एकदम अंधारी आली.
आणखी एकदा एक चिरपरिचित वाटणारी आकृती तिचे अस्तित्व व्यापून वर उसळली.
पुन्हा तोच घनगंभीर आवाज ! मात्र यावेळी काहीसा वेगळा पोत ल्यालेला.
‘अकलिप्ता, तू तयार आहेस ना ?’
स्वप्नात जशी एक जखडलेली अवस्था येते तशी तिची अवस्था झालेली.
‘नाही, नाही, कोण तुम्ही ?...’ तिची बोलण्याची इच्छा होती, पण शब्द बाहेर पडू शकत नव्हते. शरीरावर एक अदृश्य बंधन..जखडलेली अवस्था.
‘फार वेळ नाहीये आपल्याकडे, अकलिप्ता, स्वामींचे आगमन दूर नाही.. त्वरा कर...परत ये ’
एकाएकी अंधार झाला अन ती जागी झाली. पुन्हा घामाघूम. ..पुन्हा तीच वेदना !
....याही खेपी मागचीच पुनरावृत्ती झाली. बाळ गर्भातच जग सोडून गेले.
सलग चार वेळा हेच झाले आणि ते दोघे चिंतेच्या काळोखात बुडून गेले. तपासण्या, औषधे सगळे काही ओके. कुठे दोष नाही, काही कमतरता नाही. पण व्हायचे ते असेच.
‘अकलिप्ता, इथून पुढे आपण हे होऊ द्यायचे नाहीये.’ एके दिवशी शांतन्य म्हणाला.
‘काय ?’
‘नको मला बाळ, तुझे हाल पाहवत नाहीत. आपण विसरून जाऊ तिसऱ्या जिवाला.’
‘अरे पण माझे हाल होताहेत हे तुला कोण म्हटलं ?’
‘म्हणजे ?’
‘मी खंबीर आहे शरीराने अन मनाने सुद्धा. आणि मला मूल हवं आहे.’
‘मला फक्त तू सुखी अन समाधानी राहिलेली हवी आहेस !’
‘ती तर तुझ्या सहवासात आहेच रे...’
काही दिवस तरी दोघांनी थांबायचे ठरवले अन पुन्हा दिनक्रमात बुडून गेले.
काळाच्या दिशेचा अंदाज न आल्यासारखी नियतीही जणू स्तब्ध झाली ..
( क्रमश: )
प्रतिक्रिया
24 Nov 2014 - 1:54 pm | एस
वाचतोय.. अजिबात न हलता. ;-)
24 Nov 2014 - 3:03 pm | कपिलमुनी
मस्त वेग आणि कथासूत्र
24 Nov 2014 - 4:48 pm | दिपक.कुवेत
ते सॉल्लीड आहे. अजुन पुर्ण अंदाज आला नाहिये पण वाचायची उत्सुकता शीगेला पोहचली आहे. पटापट पुढिल भाग टाक एवढेच म्हणतो.
24 Nov 2014 - 5:43 pm | प्रचेतस
मस्त मस्त मस्त...!!!
पुभाप्र
24 Nov 2014 - 7:52 pm | बोका-ए-आझम
भारीच! पुभाप्र!
24 Nov 2014 - 8:33 pm | स्वप्नज
वाचतोय...
24 Nov 2014 - 9:31 pm | प्यारे१
वाचतोय...
(क्रमशःच्या नानाची टांग.)
24 Nov 2014 - 9:48 pm | अगोचर
सुंदर पकड जमवलिये कथेवर आणि इतिहासावर !!
:)
25 Nov 2014 - 2:49 am | मुक्त विहारि
पुभाप्र
25 Nov 2014 - 3:26 am | स्पंदना
हा भाग थोडा मनाला भावला नाही. :(
अर्थात कथा मनाला रुचेल अशीच लिहावी असं कुठे आहे?
लेखन अतिशय मनोवेधक.
25 Nov 2014 - 3:50 am | अर्धवटराव
भन्नाट चालली आहे कथा.
25 Nov 2014 - 9:27 am | अजया
वाचतेय..पुभाप्र
25 Nov 2014 - 4:20 pm | सविता००१
पुभाप्र
5 Dec 2014 - 8:22 pm | पैसा
मस्त! वाचते आहे!