व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो.
व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं.
या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER)
ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे.
जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन.
१९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी.
हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?!
फोटो आभारः विकीमीडिया
बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू.
त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते:
-रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट.
-याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी.
बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः
- रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही.
- रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे".
- आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते.
MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे.
बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी.
जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं.
या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं.
वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते.
कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये.
रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत.
अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः
शक्यतासंच एकः
- जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे.
- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत.
- अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं)
- हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्या दोषामुळे नाही.
शक्यतासंच दोनः
-या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो.
पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा.
या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो.
कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल.
.........
जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही.
या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.
आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.
फोटो आभारः विकीमीडिया.
प्रतिक्रिया
11 Mar 2014 - 2:23 pm | दिव्यश्री
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.>>>...काटा आला वाचताना ... :(
आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.>>> विमान प्रवास म्हटलं कि आता हे आठवणार . :(
11 Mar 2014 - 2:24 pm | स्पा
:(
11 Mar 2014 - 2:25 pm | पिलीयन रायडर
बातमी ऐकली तेव्हा तुमचीच आठवण झाली..
का कोण जाणे..वाट बघत असणार्या नातेवाईकांची जास्त काळजी वाटतेय..
11 Mar 2014 - 2:28 pm | इरसाल
तुमच्याकडुन किंवा नॅशनल जिओग्राफिक यांच्या कडुन हे अपेक्षित करतच होतो.
11 Mar 2014 - 2:29 pm | यसवायजी
चांगली माहिती. धन्यवाद.
ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स वगैरे माहित नव्हतं.
पायलट्सनी स्वतः काही घातपात घडवायचा ठरवला तर हे असं होणं शक्य आहे का?
11 Mar 2014 - 2:35 pm | यसवायजी
आय मिन, काही ट्रेसेस न सोडता??
11 Mar 2014 - 2:37 pm | गवि
हो. ती सुद्धा एक दाट शक्यता आहे आणि आधीच चर्चेतही आहे.
इजिप्तएअरच्या एका कोपायलटने मुख्य पायलट टॉयलेटमधे गेला असताना इंजिन्स बंद करुन टाकली आणि ईश्वरी मंत्र म्हणत विमान नोज डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. व्यक्तिगत मानसिक खळबळीतून त्याने असं केलं असं नंतर समजलं.
11 Mar 2014 - 2:41 pm | यसवायजी
मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं
हो. ते वाचलंच.
पण हे घडताना खाली काहीच कळलं नाही? नो ट्रेसेस?? का तिथेसुद्धा पुरावे नष्ट करावे लागले असतील??
11 Mar 2014 - 2:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
विमानाला समुद्रावर अपघात झाला तरी त्यात पाण्यावर तरंगण्यासारख्या हजारो वस्तु असतात त्या वस्तु तरी सापडायला हव्या होत्या. लो फ्लाय फ्लाईट हायजॅकची शक्यता नाकारता येत नाही.
फ्लाईट नं. १९ च्या गोष्टीची आठवणं झाली.
11 Mar 2014 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
@केवळ पार्थिव देह दिसला नाही,म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.>>> याई गं! :(
11 Mar 2014 - 2:50 pm | छोटा डॉन
:(
समयोचीत लेख तरीही उत्तम आहे असे म्हणवत नाही.
- छोटा डॉन
11 Mar 2014 - 2:54 pm | बेकार तरुण
खूपच विचित्र प्रकार आहे एकुण.
त्या आप्तांची मनस्थिति तर विचार करण्यापलिकडे आहे. त्यात काहिंचे म्हणणे असेहि आहे कि प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे पण कोणि उचलत नाहिये.
11 Mar 2014 - 6:37 pm | आत्मशून्य
कारण विमानात फ्लाईट मोड़ वर मोबाइल ठेवला जातो. रिंग वाजते आहे हे कसे शक्य आहे ? बरे फ्लाईट मोड़ ऑफ़ केला पण कोंल केला / घेतला नाही हे अशक्य.
तरीही हे सत्य मानले तर फोन लोकेशन ट्रेस करून ठिकाण केंव्हाच हुड़कलं असत.
11 Mar 2014 - 11:31 pm | श्रीरंग_जोशी
>> प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे
या बातमीत त्यावर स्पष्टीकरण मिळेल.
http://www.usatoday.com/story/news/world/2014/03/11/malaysia-airlines-37...
11 Mar 2014 - 3:16 pm | विटेकर
खास गवि..
यू नेवर नो >>>
च्यायला आम्ही आधीच घाबरट .. त्यात ही आणखी एक भर !
11 Mar 2014 - 3:21 pm | रेवती
इतक्या उत्तम सोयी सुविधा असूनही काहीतरी झालय हे वाचून आणखी वाईट वाटतय. देव करो आणि काहीतरी बातमी हाती येवो.
11 Mar 2014 - 3:22 pm | सुहासदवन
विमान जसे अलगद हेलकावे घेते... अगदी तसाच लेख आहे.
आधी विमानाची आणि झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती आणि नंतर .....
असं लिहायचं.....
11 Mar 2014 - 3:27 pm | आदूबाळ
पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये
- चेतना, स्वानंद आणि विनोद कोळेकर
- चंद्रिका शर्मा
- क्रांती शिरसाट
अशी भारतीय नावं आहेत. :(
11 Mar 2014 - 3:33 pm | आयुर्हित
या विमानातून दोन प्रवासी चोरलेल्या पासपोर्टवर प्रवास करत होते. त्यामुळे या विमानाच्या बेपत्ता होण्यामागे काही घातपात असल्याची शक्यता वाढली आहे. मलेशिया आणि अमेरिका या विमान दुर्घटनेचा दहशतवादाच्य अंगानेही तपास करत आहेत.
विविध देशांची शोधपथके या विमानाचा शोध घेत होती. तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स, अनेक जहाजे या कामी तैनात करण्यात आली. व्हिएतनामच्या ताफ्याशिवाय मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, चीन आणि अमेरिकेने २२ विमाने आणि ४० जहाजे या कामी पाठवली. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेले शोधकार्य रविवारीही सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या विमानाचा शोध लागू शकला नव्हता.
साभार:बेपत्ता विमानाचे गुढ कायम
सॅन फ्रान्सिस्कोमधुन ७० भारतीय पासपोर्ट चोरले
11 Mar 2014 - 3:36 pm | मदनबाण
विमान अचानय गायबले आह! सगळे सुखरुप असावे हीच प्रार्थना करु शकतो.
11 Mar 2014 - 3:38 pm | सुहासदवन
६० कोलेकर / चेतना वय ५५
६१ कोलेकर / स्वानंद वय २३
६२ कोलेकर / विनोद वय ५९
११८ शर्मा / चंद्रिका वय ५१
१२० शिरसाट / क्रांती वय ४४
12 Mar 2014 - 4:02 am | स्पंदना
हो. त्यांची वाट पहाणारा एकमेव भारतिय चेहरा पाहिला की कळवळत मन.
11 Mar 2014 - 3:44 pm | शिद
धन्यवाद संपुर्ण माहीतीबद्दल... बरेच दिवस पेपरात ह्या बातम्या वाचत होतो पण काही कळायला मार्ग नव्हता... तुमच्या ह्या लेखामुळे व त्यातील साध्या-सोप्या भाषेमुळे ज्ञानात बरीच भर पडली...
देव करो सगळेच प्रवासी सुखरुप असो आणि लवकरच त्यांच्या आप्तेष्टांबरोबर गळाभेट होवो...!
13 Mar 2014 - 6:48 am | पाषाणभेद
आपण म्हणता तसेच होवो. सगळे प्रवासी सुखरूप असोत.
लेख माहितीपुर्ण आहे. गवि म्हणजे काय, प्रश्नच नाही!
11 Mar 2014 - 3:46 pm | सानिकास्वप्निल
नातेवाईकांची काळजी वाटतेय, बिचारे आपल्या आप्तांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.
अजुनही काही माहिती नाही त्या विमानाचे काय झाले, त्या बातम्या, ते नातलगांचे फोटो बघून मन सुन्न झालेय :(
11 Mar 2014 - 3:48 pm | मृत्युन्जय
उत्तम माहिती. बर्म्युडा ट्रँगल सारखा काही प्रकार असु शकतो का?
11 Mar 2014 - 4:11 pm | आंबट चिंच
हेच म्हणतोय बर्म्युडा ट्रँगल सारखं वाटतंय किंवा योग्य आखणी करुन दहशतवाद्यांनी केलेलं अपहरण असावं.
11 Mar 2014 - 4:16 pm | अत्रन्गि पाउस
त्या विशिष्ट भागातली पहिलीच घटना असेल तर ह्या दृष्टीकोनातून बघायला हवे ...
12 Mar 2014 - 10:38 am | गवि
बर्म्युडा ट्रँगल हे एक तयार केलं गेलेलं गूढ आहे. तो एक नेहमीच्या वापरातल्या सागरी आणि हवाई मार्गाचा भाग आहे आणि त्यात अर्थातच स्टॅटिस्टिकली जास्त अपघात होतात. पण त्याच संख्येने वर्दळ असलेले इतर जागतिक मार्ग पाहिले तर बर्म्युडा ट्रँगलमधे काही जगावेगळ्या अधिक संख्येने जहाजं किंवा विमानं गायब होत नाहीत. मूळ ठिकाणापासून अवशेष दूर जाण्यामागे पाण्याखालचे तीव्र प्रवाहही असतात.
त्यामुळे बर्म्युडा ट्रँगल असं काही शास्त्रीय कोडं किंवा अमानवीय इफेक्ट नाहीच आहे की जो इथे लागू ठरावा.
13 Mar 2014 - 5:31 pm | अत्रन्गि पाउस
म्हणजे तिथून रीतसर हवाई/जल वाहतूक नियमित चालू आहे ????
मग इतके गूढ का आहे/होते ??? विजय देवधरांच्या पुस्तकात वाचून तर काय काय समज झालेत !!!
11 Mar 2014 - 4:34 pm | आत्मशून्य
चोरलेले पासपोर्ट वापरुन दोन प्रवासी प्रवास करत होते ही गोष्ट प्रचंड संशयास्पद आहेच. परंतु जर अजुन कोणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला तोंडही उघडले नसेल तर मात्र...
11 Mar 2014 - 5:22 pm | माहितगार
चोरलेल्या पासपोर्टावर प्रवास केलेल्यांची बिबिसी वृत्तात सारवा सारव करणारी माहिती आली आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार त्या दोन तरूणांना युरोपात सेटल व्हायचे होते. तसे समजा असले तरीही खोट्या पासपोर्ट्वरील दोघांना जर्मन पासपोर्ट दाखवून जर्मन अथवा युरोपीय भाषा उतरल्यावर बोलणे सहज शक्य झाले नसते पण युरोपीय वृत्तसंस्थाच सारवासारवीची बातमी देते आहे.
11 Mar 2014 - 7:23 pm | प्रदीप
त्या तरूणांना युरोपात 'सेटल' व्हायचे नव्हते, तिथे जाऊन त्यांना आश्रय (asylum) मागावयाचा होता. तसे करण्यासाठी तिथली भाषा येणे अजिबात जरूरीचे नाही. तिथे जाऊन, इमिग्रेशन काउंटरवर 'हात वर' केले (लाक्षणिक अर्थाने) की झाले, असा काहीसा बेत असावा. हे करतांना अर्थात पासपोर्टाचा खोटेपणा उघडकीस येतो, परंतु पाश्चिमात्य देशांत आश्रितांचे कौतूक असते, तेव्हा ह्या बाबीचा फारसा विचार होत नसावा,
श्रीलंकेचे यादवी युद्ध सुरू असतांना अनेक तामिळ तरूणांनी पाश्चिमात्य देशांत अशाच काहीश्या पद्धतीने asylum घेतला होता, अजूनही अनेकानेक आफ्रिकन देशांतील माणसे असल्या पद्धती अवलंबित असतात.
ह्यात सारवासारव नक्की कोण करत आहे, व कशासाठी, हे समजले नाही.
11 Mar 2014 - 8:02 pm | माहितगार
नाटो देशांना मदत करणारे तरूणही असू शकतात. व्यवस्थीतपणाची सवय असलेल्या युरोपियनांचे पासपोर्ट एवढ्या सहज हरवतात ते ऐनवेळी बर्याच कालावधी नंतर उपलब्ध होतात. विदाऊट व्हीसा इमिग्रेशन मधून मंडळींना एंट्री मिळते पासपोर्टची डुप्लिकसी ओळखली जात नाही. इराणी आहेत म्हटल्यावर तर नाटोदेशांनी संशय नाट्य भरपूर रंगवता आल असत उलटपक्षी त्यांचा संबंध नसल्या बद्दलही अत्यंत वेगानी सांगीतल जातय. अर्थात खरेच असायलम सिकर ही असू शकतील
11 Mar 2014 - 8:17 pm | प्रदीप
ही कॉन्स्पिरसी थियरी नव्हती आली माझ्या लक्षात.
युरोपियनांत बॅकपॅकर्स नावाची एक 'जमात' असते. सदर पासपोर्ट्स पताया/ फुकेत येथून चोरले गेले. तिथे जाणारे अनेक युरोपियन्स ह्या जमातीचे असतात.
रॉयटर्सच्या बातमीनुसार, आग्नेय आशिया स्मगलर्स, अवैध मार्गांनी इतरस्त्र प्रवेशिणारे लोक, व आश्रितेछू ह्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यासाठी एक प्रमुख केंद्र {hub) आहे.
त्या दोन इराणी मुलांविषयी इंटरपोलने माहिती प्रस्तुत केली होती, त्यानुसार ते दहशतवादी नसावेत, असे त्या संस्थेच्या प्रमुख श्री. रोनाल्ड नोबल ह्यांनी म्हटले आहे.
11 Mar 2014 - 8:48 pm | माहितगार
श्री. रोनाल्ड नोबल यांनी इम्तरपोलच्या यादीतली नाव तपासून "अबकड हा आमच्या यादीत नाही एवढ म्हणण" आणि "अबकड दहशतवादी नसावेत" असा तर्क करण यात तफावत नाही ना ? (अर्थात मला त्यांच नेमक स्टेटमेंट माहित नाही. पण काय एवढ्या वेगाने सर्टीफाय करण्यासाठी जगातली प्रत्येक व्यक्ती एवढीही माहिती असणार नाही)
अर्थात माझा उद्देश संशयवादा पेक्षा अधिक शक्यता पडताळून पहाण्याचा असतो. आणि संशयाच नात जेवणातल्या चिमूटभर मीठा पलिकडे असू नये असा आग्रही असतो.
प्रतिसादांकरीता धन्यवाद
11 Mar 2014 - 5:25 pm | माहितगार
इन एनी केस ह्या बातम्या वाचून विदाऊट व्हिसा भारतीय विमानतळावर परदेशी प्रवाशांना भारतात येऊ देण्याचा भारत सरकारचा बेत सेफ्टीच्या दृष्टीने आणि एकुणच योग्य वाटत नाही.
11 Mar 2014 - 4:55 pm | स्वप्नांची राणी
गवि, या लेखामुळे चौफेर माहिती मिळाली. एयर क्रॅश ईन्वेस्टिगशन पहात असल्यासरखे वाटले.
>>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..
11 Mar 2014 - 5:02 pm | थॉर माणूस
>>>विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट)
hail strike किंवा meteoroid strike?
आपल्या कडे सध्या जसे micro clouds आणि त्यामुळे होणारी गारपीट दिसते आहे तसं काही विमानाच्या आजूबाजूला अचानक घडलं तर? टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांनी विमानाला कितपत नुकसान होऊ शकेल?
अवकाश कचरा किंवा meteoroids जे आपल्या पृथ्वीवर सतत येतच असतात अशापैकी काहींचा आघात? हे छोटे दगड रडारवर पण दिसणार नाहीत आणि पुंजक्यात येत असतील तर चुकवताही येणार नाहीत.
अर्थात, हे कितपत शक्य आहे किंवा विमानात या सर्वांपासून वाचण्यासाठी काही सोय असते का हे माहिती नाही त्यामुळे बॅक टू गवि.
12 Mar 2014 - 10:46 am | गवि
उल्केचा तडाखा ही शक्यता अशाकरिता चुकीची ठरते कारणः
बोईंग ७७७ विमानाला जागीच डिसइंटिग्रेट करु शकणारी उल्का ही जबरदस्त आकाराची असायला हवी. बहुतांश उल्का जमिनीवर पोचतच नाहीत त्या खूप उंचावर वातावरणाशी घर्षण होऊन झिजून नष्ट होतात. एखादी उल्का जमिनीपर्यंत पोचली तरी तिचा आकार छोटा असतो. विमानाची उंची ३५००० फूट म्हणजे उल्कांच्या हिशेबात जवळजवळ जमिनीवर पोचल्यासारखंच आहे.
त्या उंचीपर्यंत जर एखादी उल्का इतक्या मोठ्या आकाराची राहिली असेल तर तिचा जमिनीवरचा इम्पॅक्ट महाप्रचंड असणार. अगदी समुद्रात जरी कोसळली तरी त्सुनामीसदृश इफेक्ट निश्चित दिसणार. ते फक्त विमानाला नष्ट करुन शांत होणार नाही.
11 Mar 2014 - 5:04 pm | स्वप्नांची राणी
प्रतिसाद अर्धाच पोस्ट झाला.. :(
>>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट).<<< पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..
11 Mar 2014 - 5:10 pm | गवि
दुरुस्त करुन प्रकाशित केले आहे. angled bracket वापरु नयेत. त्यामुळे टेक्स्ट हे एचटीएमएल टॅग समजले जाऊन दिसेनासे होते.
धन्यवाद.
11 Mar 2014 - 5:40 pm | स्वप्नांची राणी
ओह्ह....कळलं आता..! असं बरेचदा होत होतं. एखाद्याला कोट करताना angled bracket वापरायचे मी त्यामुळेच नक्की.
11 Mar 2014 - 5:19 pm | सूड
>>आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.
अगदी !!
11 Mar 2014 - 5:21 pm | रायनची आई
खूप माहितीपूर्ण लेख...
11 Mar 2014 - 5:22 pm | मुक्त विहारि
खूप म्हणजे खूप दिवसांनी विमान अपघातावरचा गविंचा लेख वाचायला मिळाला.
गवि साहेब, आता थांबू नका.असेच अजुन माहितीपुर्ण लेख येवू द्यात.
11 Mar 2014 - 5:29 pm | वेताळ
बर्म्युडा ट्रँगलच्या बाजुने पण ह्या गोष्टीची उकल करावी लागेल. अशी अचानक हवेतुन विमान गायब होण्याची हि मला वाटते ३ खेप आहे.कुठेतरी वाचनात आले होते. नक्की काय ते देवाला माहित. पण इतकी विमाने ,बोटी व उपग्रह शोधत अशुन देखिल विमानाचा तुकडा पण न सापडणे आश्चर्यकारक गोष्ट आहे.
11 Mar 2014 - 6:19 pm | कंजूस
गविंच्या माहितीपूर्ण लेखाने स्तिमित व्हावे की 'त्या' बातमीने कावरेबावरे व्हावे अशा मनस्थितीत लिहितो आहे .
सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहाता माझा तर्क याप्रमाणे
१)हे काम चोख करण्यासाठी योग्य माणूस पायलट असणार .
२)त्या पायलटला अगदी ऐनवेळी ब्लैकमेल करण्यात आले असावे.
३)जमिनीवरच्या माणसाने अशी अट घातली असेल की अमुक अमुक गोष्ट मी मिळवतो आणि (ती मिळाल्यास जमिनीवरून या ठिकाणी इशारा येईल) ती नाही मिळाल्यास तू विमान पाण्यात बुडवायचे .
४)सर्व पायलटचे मोबाईल संपर्क आणि दोन तीन दिवस अगोदरच्या हालचाली पाहाव्या लागतील .
५)मलेशियात काही राजकीय गोष्टी संशयास्पद आहेत का ?
६)कुठेतरी विमान उतरवून बोलणी करत बसण्याचे तंत्र मागे पडले वाटतं .
11 Mar 2014 - 7:15 pm | चिगो
:-(
11 Mar 2014 - 7:18 pm | विकास
माहितीपूर्ण आणि समयोचीत लेख.
या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे.
अगदी, तेच वाटते....
बाकी तुम्ही शक्यता लिहील्या आहेतच. त्यात प्रामुख्याने स्फोट घडवणे आणि चाचेगिरी या दोन शक्य आहेत. दोन्ही असल्या तरी चीन आणि त्याहूनही अमेरीकेस काहीच कसे कळलेले नाही याबद्दल कुतुहल वाटत आहे. सीएनएनवर सांगितल्याप्रमाणे, अमेरीकेचे सुपरसिक्रेट उपग्रह कवच संपूर्ण भूतलाचे कधीही कुठेही चित्रिकरण करू शकतात. त्या उपग्रहांचा उद्देश हा हेरगिरीपेक्षा केवळ संभाव्य अणूबाँब धोके टाळण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी आहे. त्या उपग्रहांकरवी अधिक नक्कीच समजू शकते. पण तसे जाहीर केले तर पंचाईत होऊ शकेल (सुपरसिक्रेट - ओपनसिक्रेट होईल) म्हणून काही माहिती देण्याचे टाळले जाऊ शकते.
स्फोट झाला असला तर तुकडे नक्की मिळाले असते आत्तापर्यंत. नोजडाईव्ह करून समुद्रात बुडवले असले तरी ते आत्ता पर्यंत मिळू शकले असते. सीएनएन वर म्हणल्याप्रमाणे जर दहशतवादी कृत्य असेल तर कदाचीत ते विमान अजूनही असेल कारण ही ड्राय रन (तालीम) असू शकेल. एकूण हॉलीवूड्ने पण असल्या ड्राम्याचा विचार आत्तापर्यंत केला नसेल...
काही असो. अस्वस्थ करणारा प्रकार आहे. जर सदीच्छांमुळे काही चांगले घडायला मदत होणार असेल तर प्रवाशांसाठी मनोमन सदीच्छा आणि प्रार्थना. मात्र त्यांच्याबाबतीत अटळ घटना घडली असेलच तर किमान हे कोडे सुटण्यासाठी सदीच्छा!
11 Mar 2014 - 7:46 pm | प्रदीप
लेख आवडला.
मलेशियन एयरलाईन्स्च्या विमानात घातपात घडवण्यामुळे नक्की कुठल्या दहशतवादी संघटनेस काय मिळणार आहे, ह्याविषयी मी साशंक आहे. तेव्हा ही शक्यता मलातरी कमी वाटते. राहता राहिल्या तीन, ज्या गविंनी लेखात उल्लेखिलेल्या आहेत-- पहिली तांत्रिक बिघाड, दुसरी विमानचालक क्रूमधील कुणीतरी हे मुद्दाम करणे (१९९७ मधे सिल्क एयरच्या विमानाचा इंडोनेशियामधे झालेला अपघात ह्या कारणामुळे होता, असे म्हटले जाते. ह्याविषयी जाणकारांचे एकमत मात्र नाही). तिसरी ते विमान कुठेतरी इतरस्त्र गेले असावे-- तसे असल्यास आतापर्यंत त्याविषयी काहीतरी समजले असते, तेव्हा ही शक्यता अंधूक वाटते.
विमानाच्या प्रवाश्यांच्या व क्रूच्या नातेवाईकांवर अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवला आहे. चिनी व मलेशियन प्रवाश्यांचे नातेवाईक/ आप्तेष्ट निदान तिथल्या तिथेच आहेत, पण मुळच्या मुंबईच्या कोळेकर कुटुंबियांपैकी मोठ्या मुलाच्या मनस्थितीची कल्पनाच करवत नाही. परवा मुंबईच्या एका वर्तमानपत्रात म्हटले होते, की कोळेकर पति- पत्नि, व त्यांचा दुसरा मुलगा, बीजिंगमधे दोन वर्षांपासून स्थाईक झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाकडे चालले होते. हा मुलगा तिथे एकटाच असणार!
11 Mar 2014 - 7:19 pm | बंडा मामा
उत्कृष्ट लेख! तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने फार आवडला लेख.
काही वर्षापुर्वी बहुतेक रिओ डी जनेरो वरुन फ्रान्सला जाणारे असेच एक बोइंग बेपत्ता झाले होते. जवळ्पास २-३ वर्षानी त्याचा शोध लागला होता. त्यावेळीही अनेकांना कोड्यात टाकले होते.
त्याच्याशी ह्या घटनेचे साधर्म्य किती आहे ह्यावर काही माहिती देऊ शकाल का?
11 Mar 2014 - 7:35 pm | प्रदीप
गवि सविस्तर उत्तर देतीलच. पण आजच New York Times मधे ह्या दोन दुर्घटनांची तुलना करण्यात आली आहे, त्यानुसार एयर फ्रान्सचे ते विमान एका क्षणी गायब झाले तेव्हा ते अटलांटिकवर होते, त्या भागाची समुद्रखोली सुमारे ४,००० मीटर्स इतकी आहे. ह्याउलट सदर विमान जिथून गायब झाले, त्या येथील समुद्र बराच उथळ आहे (बातमीनुसार सुमारे ८० मी.). ह्यामुळे एयर फ्रान्सच्या विमानाचे अवशेष सहजी वर आले नाहीत. इथे, उथळ समुद्रामुळे असे होणार नाही, विमान त्या समुद्रात बुडले असते तर आतापर्यंत अवशेष दिसू लागले असते.
12 Mar 2014 - 11:51 am | कुसुमावती
एअर फ्रान्स चे विमान अटलांटिक महासागरावरून उडताना गायाब झाले, जिथे पाणी खोल आहे त्यामुळे विमानाची दुर्घटना कळायला, विमानाचे अवशेष मिळायला वेळ लागला. इथे तसे नाहिये, विमान ज्या समुद्रावरून उडत होत तो उथळ आहे.
त्यामुळे विमान समुद्रात पडले असते तर,विमानचे अवशेष एव्हाना मिळायला हवे होते.
13 Mar 2014 - 8:14 am | श्रीरंग_जोशी
काल एका बातमीमध्ये एका तज्ञाचे मत वाचले की केवळ तेथील समुद्राची खोली कमी असणे हा घटक शोधकार्य सोपे करेलच असे आवश्यक नाही. नेमका तो दुवा आता पुन्हा मिळाला नाही. पण नॅशनल जिऑग्राफिक मधील ही बातमी वाचून या विषयावर बरीच माहिती मिळत आहे.
दुवा - Why It's Taking So Long to Find Missing Malaysia Airlines Plane
11 Mar 2014 - 7:21 pm | दिव्यश्री
http://www.loksatta.com/desh-videsh-news/malaysia-military-tracks-missin...
11 Mar 2014 - 7:56 pm | प्रदीप
ह्या दुर्घटनेनंतर काही भारतीय वर्तमानपत्रे बेजबाबदारपणे बातम्या देतांना दिसून आल्या.
दुसर्या दिवशीच त्यांनी 'हे विमान व्हिएतनाम व मलेशिया ह्यांमधील सामुद्रधुनीत कोसळले आहे' असे वृत्त प्रसिद्ध केले. इतरस्त्र (बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स इ.) जबाबदार वर्तमानपत्रे ह्यावेळी असे म्हणत नव्हती.ती आताही तसे म्हणत नाहीत.
आताच थोड्या वेळापूर्वी सदर वर्तमानपत्रांनी 'काही बातमीस्त्रोतांचा हवाला देत, विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीमधे असल्याची बातमी दिली'.(तश्या मथळ्यासकट). पुन्हा इतर जबाबदार साईट्स असे अजूनही म्हणत नाहीत, तसे ध्वनितही करीत नाहीत.
मी 'मिड-डे', 'हिंदूस्तान टाईम्स' व मटा ह्या तीन साईट्स पाहिल्या तिथे वरील अनुभव आले. तिन्ही साईट्स एकाच प्रकारे, जवळजवळ एकसदृश्य शब्दरचना करीत होती, तेव्हा ती कुठल्यातरी भारतीय वृत्तसंस्थेवरून ह्या 'बातम्या' घेत असाव्यात.
12 Mar 2014 - 12:22 am | चिन्मय खंडागळे
सी एन एन ने ही बातमी आता कन्फर्म केली आहे.
जबाबदार वृत्तसंस्था पूर्ण शहानिशा झाल्यावरच बातमी देतात.
पण ही म्हणजे आश्चर्याची हद्द झाली. विमान मागे वळून मलेशियाची भूमी पार करून पलिकडच्या सामुद्रधुनीवरून उडू लागलं,
आणि हे एअरलाईनच्या लक्षातदेखिल आलं नाही,
आणि आता तीन दिवसांनी समजलं???
12 Mar 2014 - 12:29 am | चिन्मय खंडागळे
दुरुस्ती. सी एन एन ने फक्त विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून उडताना शेवटचं ट्रेस झाल्याचंच लिहिलं आहे, सापडल्याचं नाही.
12 Mar 2014 - 10:52 am | गवि
सेकंडरी रडारचा विमानातला ट्रान्स्पाँडर बंद करुन ते अदृश्य करणं शक्य आहे आणि तसं झालं असेलही. पण प्रायमरी रडार मात्र थेट वस्तूवरुन परावर्तित होणार्या सिग्नल्सवरुन माहिती मिळवत असल्याने त्यात हे दिसत राहणार. नेव्हीचे रडार प्रायमरी असल्याने त्यांनी मूळ संपर्क तुटण्याच्या ठिकाणानंतरही सव्वा तास ते विमान ट्रॅक केलं अशी बातमी आल्याने खरोखर वेगळंच वळण लागलं होतं. कारण जिथे मुळात संपर्क तुटला तिथून पुढे वेगळ्याच दिशेत उलटे वळून तब्बल साडेतीनशे किलोमीटर्स अंतर या विमानाने पार केल्याचं यावरुन सिद्ध झालं असतं. म्हणजेच तांत्रिक बिघाड किंवा जागीच डिसइंटिग्रेट हे दोन्ही ऑप्शन्स निकालात निघाले असते. शिवाय प्रायमरी रडारवर विमानाची उंची कळत नाही. त्याउपर, विमान एका विशिष्ट उंचीच्या खाली नेले तर प्रायमरी रडारपासून मुक्त होते. तर या मलाक्का सामुद्रधुनीतल्या पॉईंटनंतर ते अगदी जमिनीलगत उडवले गेले (पाण्यावर) असाही अंदाज करता आला असता.
पण...
आता मलेशियन नेव्हीने असे मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ट्रॅक केलं असल्याचा इन्कार केला आहे.
त्यामुळे हा सर्व अँगलच नष्ट झाला आहे.
11 Mar 2014 - 8:09 pm | डँबिस००७
ह्या विमानाचा पायलट एक टेक गीक होता, त्याने स्वता:च्या घरी ह्या विमानाचा कॉकपीट उभारला होता,
सिम्युलेशन सिस्टीम सकट.
जर वैमानीकच ह्यात सामिल झाला असला तर आणि तरच ईतक मोठ विमान नाहीस होऊ शकत.
दुसरी शक्यता, आजकाल परग्रहावरचे लोक(एलियंस) ईथे पृथ्वीवर येत आहेत आणि त्यातल्याच कोणी तरी
हया विमानाच अपहरण केलेल असाव !! हलकेच घ्या.
11 Mar 2014 - 8:18 pm | कंजूस
प्रगत
तंत्रातही काही त्रुटि आहेत हे महाशक्तीँना मान्य करावे लागेल अथवा
त्यांना जे कळले आहे ते प्रकरण त्यांवरच शेकणारे असेल .या दोनपैकी पहिली
गोष्ट लोकांना सांगणे कमी त्रासाचे असावे .
11 Mar 2014 - 8:24 pm | कंजूस
जो पायलट उघडपणे खाजगी यंत्र ठेवतो तो प्रामाणिक असावा .परंतु यासाठीच याला टार्गेट करून हे वाईट काम करवून घेतले असेल .
12 Mar 2014 - 10:57 am | गवि
फ्लाईट सिम्युलेटर हे अत्यंत कायदेशीर उपकरण असून ते पायलट प्रशिक्षणासोबतच गेम/ छंद म्हणूनही कोणी ठेवू शकतो (परवडत असल्यास). या पालयटचा उड्डाणानुभव १८ हजार तासांच्या वर होता आणि तो १९८१ पासून मलेशिया एअरलाईन्ससोबत नोकरी करत होता.
त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण दिसत नाही हे मान्य. उलट तो आपल्या कामावर अत्यंत प्रेम करणारा होता हेच त्या सिम्युलेटरवरुन सिद्ध होतं.
11 Mar 2014 - 8:42 pm | भाते
सुमारे २० वर्षांपुर्वी बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल हि विजय देवधर आणि बाळ भागवत (बहुदा अनुवादित) यांची पुस्तके वाचलेली असल्यामुळे याची थोडीफार माहिती आठवत आहे.
बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल पद्धल गविंकडुन सविस्तर माहिती जाणुन घ्यायला आवडेल.
MH370 संबंधी दहशतवाद्यांकडुन अपहरण किंवा कदाचित बर्म्युडा ट्रँगल सारखे काहीतरी असण्याची शक्यता आहे.
11 Mar 2014 - 9:35 pm | सुहास झेले
अगदी परवाच मला माझ्या मित्राने विचारलेलं, गविंना विचार ना त्याचं काय मत आहे ह्या फ्लाईटच्या गायब होण्याबद्दल. आता येऊन खरडवहीत लिहायला जाणार आणि हा लेख दिसला... काय कारणे असावीत की काहीच अवशेष किंवा ट्रेस सापडत नाहीत. तिथे गर्द रेन फॉरेस्टसुद्धा आहेत.... काही दैवी चमत्कार होऊ देत हीच प्रार्थना _/|\_
आणि गवि लिहित रहा हो :)
11 Mar 2014 - 9:44 pm | एस
प्रचंड अस्वस्थ करणारा लेख... :-(
11 Mar 2014 - 10:53 pm | सखी
वर बंडामामाने म्हटल्याप्रमाणे तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने ब-याच गोष्टी कळल्या, मुख्य म्हणजे यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत हे माहीती नव्हते.
त्यांच्या घरच्या लोकांची अवस्था किती कठीण असेल याची फक्त कल्पना करु शकतो आपण. खरचं काहीतरी चमत्कार घडु दे आणि ते सर्व जीव सुखरुप असु देत.
11 Mar 2014 - 11:15 pm | पिवळा डांबिस
गविंच्या लिखाणाबद्दल वादच नाही.
बाकी अन्य काय लिहिणार अशा धाग्यावर?
विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!! :(
12 Mar 2014 - 4:08 am | स्पंदना
विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!!
11 Mar 2014 - 11:28 pm | विकास
आत्ता सीएनएनवर आलेल्या बातमीप्रमाणे विमानातून आलेला शेवटचे कम्युनिकेशन हे कुठून आले यासाठी ट्रेस केले. त्यावरून असे लक्षात आले आहे की शेवटच्या संवादाच्या वेळेस हे विमान त्याच्या नेहमीच्या उड्डाणमार्गापेक्षा शेकडो कोस/योजने दूर असलेल्या एका लहान बेटाजवळ होते. "If the Malaysian Air Force data cited by the source is correct, the aircraft was flying the opposite direction from its scheduled destination and on the opposite side of the Malay Peninsula from its scheduled route."
सध्या या शोधकार्यात अमेरीका-चीन-मलेशिया व्यतिरीक्त थायलंड, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलीया, सिंगापूर, न्यूझीलंड हे देश देखील सामील आहेत. त्यातील अमेरीका-ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड यांच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. शोधकार्याचे नेतृत्व मलेशियाकडे आहे.
त्या व्यतिरीक्त डिजिटल ग्लोब हे उपग्रहावरून मिळणार्या छायाचित्रांवर काम करणारी सेवा सामान्यांच्या मदतीने उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे. कुणास उत्सुकता असल्यास येथे लॉगईन तयार करून सामील होऊ शकता.
12 Mar 2014 - 12:15 am | पिवळा डांबिस
बिजिंगकडे निघालेलं विमान इतकी अद्ययावत यंत्रणा असूनदेखील बँकॉकच्या दिशेने उडालं?
म्हणजे मग "गल्ली चुकलं काय वो हे, पीयेल?"
बघा, कदाचित येव्हाना मद्रासमध्ये लॅन्डपण झालं असेल! आणि आपल्याला पत्ताच नसेल!!!
12 Mar 2014 - 12:28 am | आनन्दा
ख्खिक्क!!
12 Mar 2014 - 4:16 am | स्पंदना
बरीच माहिती मिळाली जी कन्फ्युज करत होती.
या आधी एक विमान इंडोनेशियाच्या जवळ्पास कोसळल होतं. अन फक्त एका खुर्चीच्या हातासह तरंगणारा मानवी हात एव्हढच मिळु शकल होतं त्याची आठवण झाली. बरेच नातेवाईक समुद्र किनार्यावर जाउन फुले वाहून येत होते. तेंव्हा सुद्धा असच अस्वस्थ वाटल होतं.
http://en.wikipedia.org/wiki/Adam_Air_Flight_574 येथे अधिक माहिती मिळेल.
12 Mar 2014 - 9:09 am | आयुर्हित
मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला.
मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे.
जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे.
साभार:बेपत्ता विमानाचा गुंता सुटेना
12 Mar 2014 - 1:12 pm | चिरोटा
को पायलट फरिक अब्दुल हमीद लहान मुलांना,प्रवाशांना(विशेष करून तरूण मुलींना) कॉकपीट पाहण्याची परवानगी देत असे कळले आहे.विमान चालू असताना सिगरेट पीत गप्पा मारणे असे प्रकारही चालायचे. ह्याचा घटनेशी संबंध असेलच असे नाही पण हमीद ह्यांच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जावू शकतो?
hameed
12 Mar 2014 - 3:07 pm | निनाद मुक्काम प...
माझा भाऊ भारतात टुर लीडर आहे , तो महिन्यातून एकदा मलेशिया किंवा चीन आणि जगभरात टुर घेऊन हिंडत असतो.
ह्या लेखाचा शेवटची वाक्ये वाचली आणि माझे हात पाय गार झाले.
ह्या लेखाच्या आधारावर आता आमच्या जर्मन लोकांमध्ये
ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलता येईल
जय लखू रिसबूड
12 Mar 2014 - 3:34 pm | vrushali n
http://mh370lost.tumblr.com/?og=1,अस घडलेले असु शकते कय
12 Mar 2014 - 7:44 pm | प्रदीप
सदर विषयातील माहितगाराने लिहीलेले दिसते. सुंदर माहिती व उहापोह.
12 Mar 2014 - 4:20 pm | थोर्लेबजिराव
विमनत कोनि महत्वचि व्यकि होति का? कोनि शास्त्रज्ञ व्यक्ती
12 Mar 2014 - 8:44 pm | तिमा
बातमी वाचल्यापासून अस्वस्थ आहे. आता गविंचा माहितीपूर्ण लेख वाचल्यावर आणखीनच अस्वस्थ!
13 Mar 2014 - 6:08 am | गवि
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही.
या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात.
आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.
13 Mar 2014 - 11:05 am | मदनबाण
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही.
जर असं असेल तर... चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? असा विचार करतोय.
13 Mar 2014 - 11:53 am | चिरोटा
ते अवशेष विमानाचे नाहीत म्हणत आहेत्.चीनने १० उपग्रह त्या दिशेने वळवल्याची बातमी होती. चीनने क्षेपणास्त्र डागले असेल तर ते पुढाकार घेणार नाहीत संशोधनाच्या कामात.
China will not give up
13 Mar 2014 - 12:07 pm | वेताळ
असा खोडसाळपणा करणार नाहीत... अन ते लपणार पण नाही.
13 Mar 2014 - 1:49 pm | सुहास झेले
ही शक्यता कमी असली, तरी चिनी सरकारला त्यांच्या नागरिकांची इतकी चिंता नसावी... एक अपघात म्हणून पण सांगायला ते कमी करणार नाहीत.. पण आपण प्रार्थना करत राहूच की चांगली बातमी येवो...
13 Mar 2014 - 7:51 am | नांदेडीअन
Oil rig worker says he saw Malaysia Airlines Flight MH370 burst into flames
http://mobile.news.com.au/world/oil-rig-worker-says-he-saw-malaysia-airl...
13 Mar 2014 - 9:42 am | कुसुमिता१
या मलेशिया एअर लाइन्स ने २-४ वेळा प्रवास केला आहे..अत्यंत वाईट अनुभव..दर वेळेस फ्लाईट डीले, चेक-इन बॅग न मिळण, व्हेज फूड सांगितलेल असताना ते न मिळण अस काही ना काही घडल होतं..तेव्हापासुन मी सगळ्यांना ही एअर लाईन अजिबात घेऊ नका असा सल्ला देते..एकदा तर टोकीयोला जात असताना फ्लाईट तब्बल १८ तास डीले झाली. क्वालालंपूर मधे मुक्काम करावा लागला होता आहे त्या कपड्यांनिशी..माझा नवरा देखील त्या वेळी असच "फ्लाईट डीले" स्टेटस पहात बसला होता..विमानातल्या त्या प्रवाश्यांच काय झाल असेल कोणास ठावूक?? सुखरुप असावेत ही एक वेडी अपेक्षा!
13 Mar 2014 - 12:07 pm | गवि
आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अॅनलिसिससाठी लागतो.
तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं.
या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं.
या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.)
हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.
13 Mar 2014 - 12:55 pm | योगी९००
तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं.
या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं.
कोणत्याही दिशेला...?? म्हणजे खालती समुद्रात पण असू शकेल काय? अपघातामुळे विमान एका जागी पडून इंजिन चालू राहीले असेल अशी शक्यता असू शकेल काय? एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत?
http://www.flightradar24.com ह्या वेबसाईटवरून प्रत्येक flight ची real time position दिसते. असे असेल तर ब्लॅक बॉक्स किंवा विमानाचे last GPS co-ordinates मिळाले नसतील काय?