मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही.
तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात.
काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५ फूट बाय ४० फूटचा तर नुसता हॉलच होता.माजघर्,कोठीची खोली,स्वैपाकघर्,वरच्या ४ खोल्या,शिवाय २५ बाय ४० फुटाची गच्ची.आता ह्या घराची बाथरूम किती मोठी असावी? तर १२ बाय १८ फुटाची बाथरूम होती.त्यातच दगडी हौद आणि तांब्याचा आगीचा बंब.
जळगावचा उन्हाळा खूपच कडक, विशेषतः आम्हा मुंबई करांसाठी,त्यामुळे दसरा-दिवाळीच्या सुमारास जळगावला फेरी व्हायचीच्,शिवाय आमच्या कडे गोंधळासकट नवरात्र असल्याने,नवरात्रात जळगावच्या आजी कडे जाणे होत असे.(त्यावेळी शाळेत नाही गेले तरी चालत होते.उंदरांची शर्यत अद्याप सुरु व्हायची होती.)घरचे नवरात्र म्हटल्यावर बर्याचशा आत्या आणि काका-काकू सहकुटुंब हजर असायचे.५०/६० माणसे घरांत असून पण कधी जागेची टंचाई जाणवत न्हवती.
एके वर्षी असेच नवरात्रात गेलो असतांना विटी-दांडू ह्या खेळाची आवड निर्माण झाली.मुळात मारामारी करण्याचाच स्वभाव असल्याने, हा खेळ मला जाम आवडला.ह्या खेळातील माझे प्राविण्य बघून एका मुलाने मला त्याच्या घरी संध्याकाळी आरतीला ये, असे आमंत्रण दिले.
संध्याकाळी त्याच्या कडे गेलो तर बरीच माणसे जमलेली.थोड्यावेळातच त्यांनी गाणी म्हणायला सुरुवात केली.त्या गाण्यांना एक जबरदस्त लय होती आणि समूहगाना मुळे त्यांना एक वेगळीच खूमारी पण चढली होती.गाणी गायल्या नंतर देवीची आरती झाली.
आणि मग प्रसाद वाटप.
हे एक वेगळेच प्रकरण असते.आधी एका बंद डब्यातून तो प्रसाद आणल्या गेला आणि हा नक्की कुठला पदार्थ आहे?हे ओळखायचे काम मुलांना दिल्या गेले.(आम्हाला कूट ओळखायचे वेड बहुदा इथेच सुरु झाले असावे.)तो पदार्थ ओळखल्याशिवाय प्रसाद वाटप होत न्हवते.
मी आणि माझ्या इतर भावंडांनी पण घरी हट्ट करून एक दिवस आमच्या घरी ही गाणी म्हटली.
पुढे आमच्या घरांत पण भाऊ बंदकी झाली आणि जळगावच्या घराची विक्री करण्यात आली.काल-परवाचा तो धागा बघीतला आणि भुलाबाईने आमच्या मेंदूत ठाण मांडले.आता मी हिची गाणी म्हटल्याशिवाय, ही प्रसन्न होणार नाही.
कुणीतरी मला भुलाबाईची गाणी पाठवू शकेल का?
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 11:21 am | आत्मशून्य
भोंडला नामक प्रकरणाशी साधर्म्य आहे.
वाक्ये नक्किच वेगवेगळी आहेत पण याचा एकमेकाशी काही संदर्भ जसे गाणी म्हटली आणी पुढे भाउबंदकी झाली असा नसावा.
3 Mar 2014 - 11:29 am | जेपी
भुलाबाई आणी भुलई हा एकच प्रकार आहे का ?
3 Mar 2014 - 11:57 am | आरोही
सा बाई सु सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू ,
पांढऱ्या रंगीला हार गुंफिला चांदणीचे फुल माझ्या महादेवाला
सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू '
लाल रंगीला हार गुंफिला गुलाबाचे फुल माझ्या महादेवाला
सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू
पिवळ्या रंगीला हार गुंफिला शेवंतीचे फुल माझ्या महादेवाला ....
3 Mar 2014 - 11:57 am | आरोही
अजून आठवल्यावर नक्की सांगेन ....बाकी तुम्ही खरच जुन्या आठवणी जाग्या करून दिल्यात ..अगदी याच भावना आहेत ....फरक एवढाच कि १-२ वर्षातून गावाकडे जाने होत असल्याने आम्हाला काही सुखद क्षण अजून मिळतात ...पण काहीही म्हणा तो आधीसारखा जिव्हाळा आता कुठे दिसत नाही
3 Mar 2014 - 12:23 pm | त्रिवेणी
वा मुवि काका
तुम्ही आमचे गाववालेच की. आम्ही गुलाबाई म्ह्णत असु.
माझ्या आठ्वणीत थोडीशीच गाणी आहेत.
सुरुवात- पहिली ग गुलाबाई देव देव---- या गाण्याने होत असे.
२) कारल्याच बी पेरल हो सासुबाई....
लहानपणी गुलाबाई बसणार त्या दिवशी सकाळी सकाळीच वडिलांबरोबर जावुन ८-१० दुकान फिरल्यावर मग मुर्ती घेतली जायची.
आणि संध्याकाळी घरोघरी जावुन गाणी म्हणायचो तेव्हा लहान भाऊ मागे लागायचा मी पण येणार म्ह्णुन, पण मैत्रिणींमध्ये मला त्याला न्यायचे नसायचे, मग त्याचे आणि माझे भांड्ण. त्यावर आई म्ह्णणार अग ने की त्याला पण लहान आहे तो. मग आमची वरात निघायची घरोघरी. बहुतेक मैत्रिणींचे भाऊ यायचे आणि आमच्यात लुड्बुड करुन खेळायचे. मग जो काय धिंगाणा घातला जायचा प्रत्येक घरात की विचारता सोय नाही.
3 Mar 2014 - 12:32 pm | आरोही
अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई
खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई
सपीठी दळावी
अश्शी सपिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई
माहेरी धाडावा
अस्सं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं..
अस्सं सासर द्वाड बाई
कोंडोनी मारितं..
3 Mar 2014 - 1:48 pm | आत्मशून्य
नावाचे पुस्तक आपण अवश्य वाचावे ही आपणास प्रेमाची सक्ती...!
बाकी हे माझे चार आणे...!
3 Mar 2014 - 1:55 pm | अजया
ही तर भोंडल्याची गाणी! आम्ही हत्तीचे चित्र, रांगोळी किंवा मूर्ती मध्ये ठेवुन सभोवती फेर धरुन ही गाणी म्हणायचो! शेवटी शिवाजी आमुचा राणा आणि आडाचे गाणे असायचे! नंतर खिरापत ओळखायची असे!
बरीचशी गाणी अजूनही पूर्ण पाठ आहेत! लिहीन सवडीने.
3 Mar 2014 - 3:00 pm | गिरकी
बहुधा यालाच आम्ही कोल्हापूर वाले हादगा म्हणतो…. हस्त नक्षत्राच्या सुमारास हदगा बसतो …. घरांमध्ये आणि आम्ही तर आमची मुलींची शाळा होती त्यामुळे शाळेत पण हादग्याचं चित्र भिंतीवर लावायचो. त्याला मस्त चिरमुऱ्याचे , शेंगदाण्याचे हार घालायचो… शाळेत रोज कुणीतरी २-४ जणी अख्या वर्गासाठी खिरापत म्हणून खाऊ आणायच्या…. कुणाला न ओळखता येणारा खाऊ आणायसाठी केवढी भुण भुण असायची घरी :)
शाळा सुटल्यावर गोल करून गाणी म्हणून मग घराकडे कूच आणि घरी जाऊन परत तेच आणि ते पण दोघा चौघांच्या घरी :) चंगळ असायची …
आमची गाणी - एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू …. , कृष्ण घालितो लोळण …. यशोदा आलीय धावून, अस कसलं वेद माझ्या कपाळी आलं … खूप आहेत …
भुलाबाई म्हणजे हेच का ते माहीत नाही पण त्यानिमित्तानी हदगा आठवून नॉस्टेल्जिक व्हायला झालं …. :)
-जयंती
3 Mar 2014 - 3:22 pm | मधुरा देशपांडे
मस्त. आम्ही पण भुलाबाईच म्हणतो. आता गाणी आठवत नाहेत सगळी पण खिरापत ओळखायला भारी मजा यायची. बहुधा हादगा, भोंडला आणि भुलाबाई हे थोड्याफार फरकाने एकच. गाणी तीच आहेत पण काही पद्धती वेगळ्या. चुभूदेघे.
3 Mar 2014 - 4:26 pm | स्मिता चौगुले
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याच्या बायकोने केले होते लाडू
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
चक्र चक्र म्हणून त्याने खेळायला घेतले
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याच्या बायकोने केली होती शेव
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
आळ्या आळ्या म्हणून त्याने फेकून दिले
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या ,
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
होड्या होड्या म्हणुन त्याने पाण्यात सोडीले "
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याची बायको एकदा झोपली होती
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकली"
श्रीकांता कमलकांता असे कसे झाले
असे कसे झाले माझ्या नशिबी आले
3 Mar 2014 - 5:00 pm | शिद
=)) =)) =))
3 Mar 2014 - 7:44 pm | नेत्रा वैद्य
भोंडल्याचं अजून एक गाणं
हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली
त्यातलं घेतलं एवढंसं पीठ
त्याचं केलं थालीपीठ
नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली
त्यातला घेतला थोडासा पाक
त्याचा केला साखरभात
नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली
बिघडलेल्या पदार्थ फुकट न घालवता नवा पदार्थ जन्माला घालणं पूर्वंपार चालत आलेलं आहे.
3 Mar 2014 - 7:55 pm | मुक्त विहारि
आमच्या कडे भोंडल्याच्या वेळी, पाटावर हत्तीचे चित्र काढून, त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हटली जातात.शक्यतो मुलीच जास्त असतात.मुलांना घेतच न्हवते.
पण
जळगावला, भुलाबाईची मुर्ती घरी आणून मग समूहगाणी म्हटली जायची.मुले-मुली असा भेदवाव न्हवता.
आजकाल होतात की नाही माहीत नाही.कारण बर्याच घरांत, येड्या खोक्यात तोंड घातल्याशिवाय, तोंडांत अन्न पण जात नाही.
3 Mar 2014 - 11:14 pm | भ ट क्या खे ड वा ला
भोंडला असाच काहीसा असतो.
सरोजिनी बाबर यांचे एक पुस्तक लोक संस्कृती विषयी वाचल्याचे आठवते.
उजव्या हाताला "जेवण्या " हात अस म्हणतात का हो खानदेशात ,मला असे शब्द फार आवडतात.
4 Mar 2014 - 2:47 am | आनन्दिता
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी
गळ्यांत हार बाई वाकूं कशी
पायांत पैंजण चालूं कशी
बाहेर मामाजी बोलूं कशी
दमडीचं तेल मी आणूं कशी
दमडीचं तेल बाई आणलं
सासूबाईचं न्हाण झालं
वन्सबाईंची वेणी झाली
मामांजींची दाढी झाली
उरलेलं तेल झांकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
येशीपातूर ओघळ गेला
त्यातन हत्ती वाहून गेला
==============
वाजे चौघडा रुण झुण
आला ग हादगा पाहुणा
दारीं तुळसा दऊणा
जाईजुई शेवंती दुपारी
फुलें ग नाना परी
हार गुंफीतें कुसरी
वहात मी हादग्या परी
हादगा देव मी पूजीतें
लवंगा सुपार्या वेलदोडे
करून ठेवले विडे
आणखीन् दुधांतले दुधपेढे
वहातें मी हादग्यापुढें
हदगा देव मी पूजीते
============
माझी वेणी मोकळी
सोनीयाची साखळी
साखळी देऊं देवाला
देवा, दे मला अंगारा
अंगारा देऊं आईला
आई, दे मला साडी
साडीच्या पदरीं रुपाया
भाऊ माझा शिपाया
=============
आला चेंडू गेला चेंडू, राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं
राम ग वेचीतो कळया
सीता ग गुंफिते माळा
आल्या ग लगीन वेळा
आकाशी घातीला मंडप
जरतारी घातीलं बोहलं
जरम्जरती बसले पति
पतीन् पती तिरूबाई राळा
तिरूबाई राळा मुंजाबाळा
मुंजा बाळीचा मुंजक दोरी
तीच दोरी सावध मारी
सावधा सावधा सर्वतकाळ
सर्वतकाळाचा दोर
आणा दोर बांधा चोर
बांधा चोर बाई झाडाशीं
झाड झपकं, फूल टपकं
तें बाई फूल मीं तोडीलं
बहिणा माथां खोवीलं
बहिणा तुझी वेणी ग
सोनीयाची फणी ग
बहिणा तुझा खोपा ग
उंदीर घेतो झोपा ग...
4 Mar 2014 - 3:15 am | स्पंदना
आनन्दिता मस्तच.
4 Mar 2014 - 8:29 am | मुक्त विहारि
धन्यवाद
4 Mar 2014 - 8:34 am | मुक्त विहारि
महाराष्ट्राला लोकगीतांची फार मोठी परंपरा आहे.
उंदीर शर्यत्,येडे खोके आणि वेळेचा होणारा अनावश्यक प्रवास खर्च, ह्यामुळे माणसांना एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही.आणि त्यामुळेच मग हे असे पारंपारीक खेळ किंवा समूहगाणी मागे पडतात आणि एक दिवस विस्म्रुतीत जातात.
4 Mar 2014 - 1:52 pm | आत्मशून्य
.
4 Mar 2014 - 3:21 pm | सदासुखि
छान गाणी आहेत .
आम्ही भुलाबाइला गुलाबाइ म्हणत असू .
आमची काही गाणी
१>
अडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो बाई ..धोबी धुण धुतो
गुलाबाइच्या साडीला लाल रंग देतो बाई...लाल रंग देतो
लाल रंगावर पडली शाई .............
२>
शिंक्या वरच लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं
आता माझे दादा येतील येतील
दादांच्या मांडीवर बसेन बसेन
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
आणा काठी घाला पाठी
३>
भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला चला हो अमुच्या माहेराला
माहेरी जाता पाट बसायला विनंती करू यशोदेला
टिपर्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेउनि घरी जाऊ.
४>प्रसाद ओळखाण्याआधी हे गाणे म्हणायचो..................
गुलाबाइ गुलाबाइ खाऊ काय खाऊ काय,
जिंकला नाही तर देऊ काय देऊ काय .
4 Mar 2014 - 4:07 pm | पैसा
बरीच गाणी जमा झाली इथे!