कालच्या दिवसाच्या निमित्ताने!
नेहमी कामानिमितानी
शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा?
सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो! एकानी कडेनी दुध ओतावे..आणि कुणी दुसर्यानी पंचामृत टाकावे..त्यातच अजुन साखर/शेंगादाणे/गूळ/धान्य/मध केळी ... अरारारारा... अहो आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल? भक्तिमार्गात स्वच्छतेची भावना लोप पावलीच पाहिजे असा काही संकेतच आहे का?
या मंदिरवाल्यांचं तर सोडा,पण ज्या संघटना हल्ली स्वतःला धर्माभिमानी म्हणवतात,त्यांनी तरी आंम्हाकारणी सहकार्या यावे. पण त्यांनाही "हे" नको आहे. त्यांचा सारा आवेश गाभार्यात सोवळी-घालुन शिरावे का शिरू नये! असल्या फालतू कारणातच संपतो. नाहि म्हणता गेली ५ वर्ष ठणाणा केल्याचे फलित म्हणजे- फक्त एका मंदिराने..भक्त मंडळींना नीट मॅनेज करायचा प्रयत्न या वर्षी केला आणि मी सुचवलेली "गाभार्याबाहेर धान्य/दुधासाठी-बादल्या-भांडी योजना" एका निरिक्षक माणसासह राबवायला सुरवात केली. (तरी काल आमचा लघुरुद्र संपेपर्यंत लोकांना थोपवणं जड गेलच!) एरवी दुसर्या दिवशी अनेक मंदिरात शंकराची पिंडी आणि भोवतीचा परिसर नारळाच्या घासण्या घेऊन साबणसोड्यानी धुवायची वेळ येते. मला नेहमी प्रश्न पडतो,की जगातल्या प्रत्येक समाजाला आपल्या धर्मातली ही अश्या प्रकारची घाण साफ करायचा कंटाळा का??? वास्तविक याच कामात या धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्या समाजातल्या सज्जनांन्नी (मग ते धार्मिक असोत,अथवा नसोत!) या संघटनांच्या मागे यासाठी तगादा लावायला पाहिजे. माझ्या मते "हे" घडेल तो खरा सुदिन!
शिवरात्र जागवोनी जन शांत झोपलेले
कावून रात्र सारी पोळतो शंभू...स्व-भावे॥धृ॥
देवळात भोवती त्या पडलाच बेल सारा
दहिभात ही सुखाने करी पिंडि पाशी राडा
किती घाण अंतरी या,तरि शंभू शांत आहे॥१॥
भरला नाकात त्याच्या पन्हाळीतला सुगंध
माश्या.. तिथे भणाणा करितात अंदा-धुंद
गोमुखा समोर पुढती साक्षात गटार आहे॥२॥
काहूर अंतरीचे स्वमनात चोप देई
भक्तांसी सांगताना मन हे दमून जाई
भक्तीत माज सारा हे दिव्य(?) रूप आहे.॥३॥
================
मूळ रचना:-मधुकर जोशी
"आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे"
==========================
प्रतिक्रिया
28 Feb 2014 - 8:31 pm | साती
आत्मागुरूजी, आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे.
आपल्या सारख्या लोकांनी पुढाकार घेऊन याबाबत मंदिरव्यवस्थापनाचे प्रबोधन करताय हे उत्तम.
सोनाराने कान टोचण्यासारखे आहे.
आमच्यासारख्या नास्तिकांनी असेकाही बोलल्यास 'तुम्हाला याबाबतीत बोलण्याचा अधिकार नाही' असे ऐकावे लागेल.
28 Feb 2014 - 9:37 pm | कवितानागेश
पटतंय. :)
28 Feb 2014 - 9:39 pm | प्रचेतस
पूर्णपणे सहमत.
28 Feb 2014 - 10:07 pm | सर्वसाक्षी
पण लोकांना समजावणे कठीण!
28 Feb 2014 - 10:33 pm | किसन शिंदे
याच्याशी १००० वेळा सहमत. हे असं काही आलं की मग भक्तांची भक्ती बघायलाच नको. :)
28 Feb 2014 - 10:42 pm | आयुर्हित
खूप छान विचार आहेत.पूर्ण सहमत.
मी पाहिलेले एक मंदिर आहे "कोदंडधारी रामाचे" नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल च्या आवारातील, जेथे कोणाही दर्शनार्थीला कोणतेही फुल,पाने,फळ, नारळ, हळदी/कुंकू चढवण्यास मनाई आहे.
सर्वांनी याचा बोध घ्यावा व अपव्यय आणि दुरुपयोग(होय दुरुपयोगच म्हणतो)टाळावा
28 Feb 2014 - 10:47 pm | पैसा
लोक काय म्हणतील याचा विचार न करता देवळांच्या व्यवस्थापनाकडे ठणाणा केल्याबद्दल अभिनंदन!
28 Feb 2014 - 11:06 pm | मुक्त विहारि
सहमत
28 Feb 2014 - 11:05 pm | मुक्त विहारि
बेलाची पाने किंवा फुले वाहायची असतील तर एखादेच वाहतो आणि ते परत माझ्यापाशीच ठेवतो.
28 Feb 2014 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि ते परत माझ्यापाशीच ठेवतो. >>> फुलं/पानं वाहाण्याबद्दल तक्रार नाहीच. आणि देवळातली पुजारी लोकं अधुन मधुन वाहिलेली फुलं हार काढत असतातच. माझा आक्षेप देवावर मूर्ती खराब करणारी द्र्व्य टाकण्यावर आहे. दूध वगैरे नक्की वहावे..पण नंतर वरतून त्याच्या पाचपट पाणी घालून पिंडी पुसावी..तीला गंध लावावे,फुलं वहावी. दाणे/साखर/केळी पेढे इत्यादीचा नैवेद्य लांबून पाणि फिरवून दाखवावा. दोन मिनिटानी उचलावा. ही पद्धती लोक आचरत नाहीत. यायचं... देवावर वरील वस्तू लडबडवायच्या आणि निघुन जायचं हे वाइट आहे. आणि तसे वागू नका सांगणार्यावर डाफरायचं याला तर तोड नाही.
1 Mar 2014 - 12:14 am | मुक्त विहारि
छे छे असे वेडे वाकडे वागू नका.
"ध्वनी प्रदूषण्,धूर प्रदूषण आणि गेला बाजार वायू प्रदूषण करणे, हा आपल्या भारतीयांचा जन्म सिद्ध अधिकार आहे."
असे मानणारी बरीच माणसे आहेत.
रोज ५ वेळा लावूड स्पीकर लावतोस काय? ..... ओके. मी बघ रोज सत्यनारायण घालतो की नाही.
असे मानणारी जमात इथे कमी नाही.
तुमच्या आमच्या सारखे वेडेच ठरणार की हो ह्या जगांत.
ते काही लावूड स्पीकरचा आवाज कमी करायचा सोडत नाही आणि आम्ही सत्यनारयणाच्या पूजेचा आवाज कमी करत नाही. मग प्रार्थनासमाजाच्या स्थळाचा आवाज काय घंटा कमी होणार?
जावू द्या हो.
ह्या घंटेला आणि लावूड स्पीकरला भोकात जावू दे.
आपण आपली मस्त लेणी वगैरे बघू या,
28 Feb 2014 - 11:15 pm | अवतार
धर्म पाळणे आणि धर्माचा अभिमान बाळगणे ह्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो ह्यावर भक्तांची श्रद्धा बसेल तो सुदिन!
28 Feb 2014 - 11:19 pm | खटपट्या
१००% सहमत
हा रोग आता परदेशातही पोचला आहे. कैलिफोर्निया मधील एका देवळात पिंडीजवळ जाण्यासाठी चक्क डॉलर मोजावे लागत होते.
28 Feb 2014 - 11:36 pm | सांजसंध्या
सहमत.
( शेअर चं बटण शोधत होते..)
28 Feb 2014 - 11:57 pm | दिव्यश्री
मस्त विचार ...देवाला दोन हस्तक आणि एक मस्तक इतकेच पुरे आहे खरे तर. असो .
आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल?>>>हम्म डोळ्यासमोर चित्र येउन हसू आले . :D
अवांतर :Oh My God आठवला
1 Mar 2014 - 12:35 am | रेवती
हम्म....
1 Mar 2014 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
अआंच्या भावनेशी १,०००% सहमत !
1 Mar 2014 - 1:42 am | मधुरा देशपांडे
सहमत.
अशा ठिकाणी देवाचे दर्शन घेऊन शांत आणि प्रसन्न वाटण्याऐवजी त्रासच जास्त होतो. शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात जी स्वच्छता पाहिली तेवढी इतरत्र फार कमी ठिकाणी दिसली. अशा मंदिरातून बाहेर आल्यावर खऱ्या अर्थाने दर्शन झाल्याचे समाधान मिळते. असे सगळीकडे का होऊ शकत नाही हा नेहमी प्रश्न पडतो.
1 Mar 2014 - 7:36 am | अत्रन्गि पाउस
+१०००००
3 Mar 2014 - 1:48 pm | कुसुमावती
फक्त स्वच्छताच नाही तर मंदीरातल्या दर्शनाच्या रांगा देखील सुनियोजित. चेंगराचेंगरी, गोंधळ, गोंगाट कुठेही नाही. दर्शनाच्या रांगांच्या जवळ्च स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय. स्वच्छता व सुनियोजनामुळे मंदीरातलं वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं.
1 Mar 2014 - 7:47 am | यशोधरा
सहमत.
1 Mar 2014 - 9:09 am | विनायक प्रभू
मार्केट इकॉनॉमी वरच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
असो.
अहो आत्मुबाबा, असे वादळात मुताय्चे नस्ते.
असो.
5 Mar 2014 - 12:17 pm | अत्रुप्त आत्मा
@अहो आत्मुबाबा, असे वादळात मुताय्चे नस्ते.>>> लागते हो ..मुतायलाच लागते. नायतर वादळांना काय आपणहून बदलायची इच्छा होत असते होय??? :)
1 Mar 2014 - 2:09 pm | परिंदा
चांगला मुद्दा उपस्थित केलात तुम्ही.
हे लोक देवाची पूजा करायला देवळात जातात की निंदा करायला तेच कळत नाही.
साधे शनिवारी शनिला तेल वाहायला जातात नि तेलाच्या रिकाम्या पुड्या शनिच्या पायाशीच टाकून देतात. या अश्या लोकांनी शनिला तेल वाहिल्यावर पीडा कमी करायची की कचरा केल्याबद्दल पीडा द्यायची हे शनिदेवच जाणे!
मारवाडी लोक मारुतीला मंगळवारी बुंदीच्या लाडवांचा नैवैद्य दाखवतात. कसा? तर मिठाईचा पुडा देवासमोर ठेवायचा आणि एखादा लाडू कोचुन थोडी बुंदी मारुतीच्या तोंडात कोंबायची. अरे त्या मूर्तीच्या तोंडात लाडू ठासला तर काय त्याच्या पोटात जाणार आहे काय?
या लोकांना आपला लाडू मारुतीने खाऊन ढेकर देणे अपेक्षित आहे का?
आमच्या इथे युपीवाले शिवलिंगाला खीर-पूरीचा नैवैद्य कसा दाखवतात? तर दोन पुर्या नि त्यावर चमचाभर खीर टाकायची नि हे पिंडीच्या डोक्यावर ठेवायचे. नैवैद्य तो ही देवाच्या डोक्यावर?
अन्नाधान्याची नासाडी तर होतेच, पण या उपचारांनी देवाची उपासना तर नाहीच पण विटंबना मात्र निश्चितच होते.
1 Mar 2014 - 2:49 pm | स्पंदना
आत्मुस तुमच्याबद्दल अगदी आदरभावनेने मन भरुन गेलं.
असा एक तरी पुजारी आहे की जो कर्मकांड करतानाही भान सांबाळुन सामाजिक बांधिलकी राखुन करतो, अन तो आमच्या ओळखीचा आहे.
नतमस्तक!
4 Mar 2014 - 10:36 pm | पाषाणभेद
क्या बात है. सहमत.
5 Mar 2014 - 6:06 am | चौकटराजा
आत्मूस बाबा बरोबर तासा तासाच्या गप्पा केल्यात. तो एक विलक्षण वेगळा भटजी आहे.पौरोहित्य पोटापाण्याचा व्यवसाय आहे त्यांचा पण ..... एरवी यजमानांचे, समाजाचे ,लोकांच्या अर्धडोळस श्रद्धांबद्द्ललचे त्यांचे निरिक्षण जबर आहे.
संक्षी यांचे सारखेच माझे देवाबद्द्लचे मत आहे. मी देवळात आवर्जून कधी जात नाही पण गेलो की .. मी चिकित्सकाची नजर काही वेळ बाजूस ठेवतो.
1 Mar 2014 - 3:30 pm | संजय क्षीरसागर
देव ही भंकस बंद करा असं मी पूर्वीच (काय अनेकदा) बोल्लेलो पण त्यावेळी सगळे आंगावर धावून आलेले. आणि आता नियोजनच्या गप्पा!
हे म्हणजे फुल्ल लेकुरवाळ्या बाईनं, `एवढी मुलं कशी होतात बाई काही समजतच नाही' म्हणायचं आणि मग आता झालीचेत तर `मॅनेज करायला नकोत का'? असे लेख लिहून स्वतःचं कौतुक करुन घेणं आहे.
यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना आहे हे लोकांना सांगा. सगळा डोलारा एका झटक्यात खाली येईल.
1 Mar 2014 - 4:05 pm | बॅटमॅन
बिना अनुभवाचे बोल कसे असतात याचे प्रत्यंतर या वाक्याने नीटच येते. धन्यवाद!
1 Mar 2014 - 4:17 pm | संजय क्षीरसागर
यांना देवाचा अनुभव आहे!
2 Mar 2014 - 6:55 pm | बॅटमॅन
=))
नक्की मुद्दा काय आहे तो पाहणेचे करावे.
2 Mar 2014 - 11:33 pm | संजय क्षीरसागर
.
3 Mar 2014 - 4:58 pm | बॅटमॅन
धृतराष्ट्र म्हाराज की जय!!!!!
आज आपण कर्णशक्तीचेही धृतराष्ट्र असल्याचे दाखवून दिलेत त्याबद्दल स्पेशल आभार =))
4 Mar 2014 - 2:25 am | संजय क्षीरसागर
हे आकलनावरुन दाखवून दिलेत. लेखकाचा प्रतिसाद वाचा.
5 Mar 2014 - 12:00 pm | बॅटमॅन
धृतराष्ट्र महाराज की जय!!!
3 Mar 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा
@देव ही भंकस बंद करा असं मी पूर्वीच (काय अनेकदा) बोल्लेलो पण त्यावेळी सगळे आंगावर धावून आलेले. >>> हे सांगणारा आपण कोण???
@आणि आता नियोजनच्या गप्पा! >>> एखाद्याचं व्यसन थांबत नाही,तेंव्हा ते किमान नियोजित करावं लागत हे आपल्याला कळेल काय? ...जेणे करून त्यापासून समाजालाच होणारा अतिरिक्त त्रास तरी थांबविता येइल.
@हे म्हणजे फुल्ल लेकुरवाळ्या बाईनं, `एवढी मुलं कशी होतात बाई काही समजतच नाही' म्हणायचं आणि मग आता झालीचेत तर `मॅनेज करायला नकोत का'? असे लेख लिहून स्वतःचं कौतुक करुन घेणं आहे. >>> किति वेळा आपण आपला अविवेकीपणा पुराव्यानी शाबित करणार आहात.??? किती वेळा?????
जे उदाहरण आपण देताय त्यातलीच वस्तुस्थिती ही धार्मिक समाजाची मूलभूत समस्या आहे हे तरी कळतय का? "लेकुरवाळ्या बाईला एकही मूल होऊ द्यायचं नाही" असा आपण दिलेल्या उदाहरणाचा विलक्षण निष्कर्ष निघतो हे तरी भावना आवेगात लिहितांना लक्षात येतय का? जे जे धर्माचरण सामाजिक दृष्ट्या घातकतेकडे वाटचाल करतं ते कडकपणे आणि कायदे करून थांबवावं लागतं.. पण जे तसं नाही त्यासाठी समाजमन सांगून समजावून "मॅनेज"च करावं लागतं आणि त्यामुळेच ते हळूहळू बदलतं हा इतिहास आहे. मनुष्यबळी कायद्यानी थांबविले गेले,पण पशूबली (जे अजुनही चालू आहेत..) ते अं.नि.स सारख्या संघटनांनी शांततामय आंदोलन घडवून पशू ऐवजी खीरपुरीचा नैवेद्य दाखवणं भक्तांच्या गळी उतरवून थांबविले आहेत. हे जरा "तुंम्हाला-हवं" असेल तर डोळसपणे पहा!
@यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना आहे हे लोकांना सांगा. सगळा डोलारा एका झटक्यात खाली येईल. >>> तुंम्हाला काय वाटतं??? धार्मिकमनोवृत्तीच्या लोकांना हे माहित नसतं काय? त्यांच्या असंतुलित व्यक्तित्वामुळे त्यांना हे सत्य व्यवहारात आचरणं जमत नाही हे आपण समजून घ्यायला नको काय? या बाबतीत मला एक चांगलं उदाहरण अठवतं...
असं समजावत असतो,पण पोर काही आईची अठवण विसरत नाही,आणि रडणेही थांबत नाही. तेव्हढ्यात त्याची बहीण येते.त्याला अजोबांकडून घेऊन त्याच चंद्राची छानशी गोष्ट सांगायला लागते-
अश्या तर्हेची कथा सांगून त्याला हसवते आणि झोपविते देखिल... हे सगळ बघत असलेला आणि नुस्ता'च वृद्ध-झालेला तो अजोबा त्या मुलिला म्हणतो, अगं मी चंद्राविषयीचं इतकं शास्त्रशुद्ध रूपक याला सांगितलं आणि तरीही हा रडत राहिला,मग तुझ्या कथेत काय अशी जादू होती की हा नुस्ता रडायचा थांबलाच नाही,तर झोपला देखिल!
त्या मुलाची-बहिणबाई-म्हणते,"अजोबा..तुंम्हाला लहानमुलांचं मन आणि त्यांची-भाषा समजत नाही,त्यामुळे 'हा' मार्ग तुमचा नाही,एव्हढच सध्या तुम्ही समजून घ्या!"
4 Mar 2014 - 2:25 am | संजय क्षीरसागर
लोक धार्मिक आहेत म्हणून मूर्ती आहेत, देवळं, पुजारी आणि कर्मकांडं आहेत. जर देव ही कल्पना आहे हे लोकांच्या लक्षात आलं तर सगळं संपेल. वस्तुस्थिती समजायला पायरी-पायरीनं शहाणं होण्याची गरज नाही.
लेकुरवाळ्या बाईचा ज्योक तुम्हाला बाऊंसर गेलायं. त्याचा अर्थ बाईला मुलं होऊ नाहीत असा नाही, तर आधी भारंभार मुलं काढून नंतर पसारा आवरण्यात अर्थ नाही. अर्थात धार्मिक मंडळींची दुकानंच देवाच्या कल्पनेवर चालतायंत तर ते कश्याला स्वतःच्या पोटावर लाथ मारुन घेतील? पुजारी कसा म्हणेल देव दगडाचा आहे, तो कुणाचं भलं-बुरं काही घंट्या करु शकत नाही.
सगळा पसारा धार्मिक मंडळींनीच घातलायं आणि मूर्ख भावूकता हा सगळ्याचा बेस आहे. त्यामुळेच तर लोक असा वेडगळपणा करतात :
कारण त्या कल्पनेत त्यांची भावनिक गुंतवणूक आहे. `देव आहे' हा त्यांचा गैरसमज सगळ्याचा बेस आहे. लोक शहाणे झाले तर मंदिराकडे फिरकतीलच कशाला? मग पुजारी काय करणार? (आणि घंटीचंद कुणाच्या आरत्या म्हणणार?) खरं तर मूर्ती गेली की मंदिरंच संपली!
4 Mar 2014 - 7:30 pm | प्यारे१
संक्षी,
मोठे व्हा! :)
4 Mar 2014 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा
@मोठे व्हा! >>> प्रशांत..तुझा हा सल्ला निरर्थक खर्ची पडणार...! कारण विवेकहीन व्यक्तिंची, वाढ - ही अशक्य कोटीतील गोष्ट असते. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं आयुष्य सत्कारणी लावावं हे उत्तम! :)
1 Mar 2014 - 4:05 pm | बॅटमॅन
आत्मासाहेबांशी पूर्णपणे सहमत. देवळे किमान स्वच्छ राहिली तरी लै झाले.
2 Mar 2014 - 3:16 pm | सुहास झेले
ह्येच बोलतो.... :)
3 Mar 2014 - 12:25 pm | शिल्पा नाईक
मी अस ऐक्लय की दक्शिनेकडे देवळं खुप स्वछ असतात. गोव्यात पाहिलीत. ते लोक कशी काय पुजा वगरे करतात?
3 Mar 2014 - 12:49 pm | धन्या
देव आहे की नाही हा विचार बाजूला ठेवून समाजाच्या एका खुप मोठया हिश्श्याची देवावरील श्रद्धा ही मानसिक, भावनिक गरज आहे हे वास्तव स्विकारलं पाहिजे. किंबहूना "आपल्या पाठीशी देव आहे" ही भावना काहींच्या जगण्याचा आधार आहे हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे , मंदीरे आणि देव आपल्या घराप्रमाणेच स्वच्छ असायला हवीत.
हे वास्तव गाडगेबाबांसारख्या समाजसुधारकानेसुद्धा स्विकारलं होतं. आपण कितीही समजावलं तरी लोक तिर्थयात्रांना जाणारच म्हणूनच "देव देवळात, मंदीरात नाही" हे सांगत असतानाच त्यांनी पंढरपूर, नाशिक अशा ठीकाणी धर्मशाळा उभारल्या, त्यांच्या हयातीत यात्रांच्या वेळी स्वच्छता ठेवली.
3 Mar 2014 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा
बास धन्या...माझं काम केलस.. तुझा हा एकच प्रतिसाद पुरेसा आहे. आपण स्वतः नास्तिक अधार्मिक विज्ञाननिष्ठ पुरोगामी सेक्युलर काहिही असलो..तरी ज्यांचा देव हा भ्रम आपल्याला दूर करायचा आहे. त्यांचेविषयी मनामधे करुणेचा झरा अखंड असायला हवा.आणि लबाड सोडून उरलेल्या धार्मिकांना..अंधःश्रद्ध..सश्रद्ध सगळ्यांना आपण त्यांच्या भ्रमासह समजून घेऊन काम करायला हवं हेच तर व्यापक समाजसुधारणेचं मूल्य आहे. म्हणूनच समस्त अं.नि.स. गाडगेबाबांना अश्या संत परंपरेला आपला आदर्श मानते. आणि श्याम मानव नेहमी म्हणतातच की आमची चळवळ संत परंपरेवर आधारलेली आहे. खरे सुधारक हे लोकं... हे वरचे .... नव्हेत!!! यांना ज्यांच्यात सुधारणा व्हावी असं वाटतं..(म्हणजे तसं ते दर्शवितात..) त्यांच्याविषयीच २५ किलो राग आहे. तेंव्हा यांचा तात्विक..निर्विकार..मरणासन्न बुद्धिवाद हा त्यांच्या स्वतःपुरताच रहाणार. आणि समाजमनाविषयीच्या धारणासुद्धा खुळ्या रहाणार हे नक्की!
3 Mar 2014 - 4:45 pm | नाखु
असा अगोचर पणा (पाने-फुले-अक्षदा) फेकणे प्रकार दक्षीण भारतात जरा कमीच आहे..बेंगलूरात भर वर्दळीच्या रस्त्यावर्च्या "नेट़कलप्पा " मीदिरात प्रसाद आणलेल्या माणसांनी सोता सगळ्या उपलब्ध आणि उपस्थित भाविकांना वाटायचा आणि साफ-सूफ करूनच (साली-कागद) ऊचलून मगच चालू पडायचे असा प्रकार मी पाहिला आहे..
त्यामुळे ना देवाला तरास ना भक्ताला वास..
3 Mar 2014 - 5:00 pm | बॅटमॅन
जण्रल भारतातली लोकं अडगी म्हटली तर सौथमध्ये तुलनेने स्वच्छता कशी काय असते हे कोडं मलाही उलगडलेलं नाही. अर्थात हे देवळांतील स्वच्छतेबद्दल बोलतोय, बाकी जण्रल सोडाच.
4 Mar 2014 - 2:50 am | संजय क्षीरसागर
तेच तर सांगतोय!
लोकांची बात सोडा. तो तुमचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. तुम्हाला देव ही कल्पना आहे हे मान्य झालं की संपलं! (अर्थात तुमच्या आतापर्यंतच्या वैचारिक बैठकीवरुन ते महाकठीण दिसतंय.) इथे अवाहन करुन काहीही परिणाम होणार नाही हे लेखकाला समजलेलं दिसत नाही (कारण ते लोक कश्याला वाचतायंत यांचे लेख? इथले सदस्यच वाचणार!) त्यामुळे इथल्या सदस्यांचा दृष्टीकोन बदलला तर उपयोग आहे. आणि इथला सदस्यवर्गही नगण्य नाही. इतक्या मोठ्याप्रमाणावर बदलला एकदा सुरुवात झाली तरच समाजिक बदलाची अपेक्षा रास्त ठरेल.
3 Mar 2014 - 5:02 pm | अनन्न्या
एकदा ओटी भरताना मला हा अनुभव आलाय, मी कापड खाली ठेवून नारळ तांदूळ त्यावर ठेवेपर्यंत कापड गायब! पूर्ण ओटी भरण्याआधीच कापड एका बाजूला आणि नारळ ठेवताच नारळ दुसय्रा बाजूला फेकला गेला. नमस्कार करे पर्यंतही वस्तू समोर राहिल्या नाहीत. त्यानंतर आजपर्यंत मी तिथे ओटी भरत नाही. मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते.
4 Mar 2014 - 2:29 am | संजय क्षीरसागर
याला म्हणतात समंजस पणा.
4 Mar 2014 - 5:32 am | रामपुरी
काही जणांना "मी देव मानत नाही" याची फक्त शेखी मिरविण्याचीच हौस असते. तुम्हीही त्यातलेच दिसताय. जे देव मानतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मानत नाही ना? मग ते गप तुमच्याजवळ ठेवा. उगा तडतड कशाला? याला म्हणतात दुराग्रहीपणा. तो जरा कमी केलात तर भलं होईल... तुमचंच.
(वरच्या प्रतिसादात निम्मे प्रतिसाद तुमचेच दिसत आहेत. ते सुद्धा विषयाला सोडून. त्यामुळे न राहवून शेवटी प्रतिसाद टंकला. तुमच्या प्रतिसादांना एवढी किंमत द्यायची गरज नाही हे माहीत असून सुद्धा)
4 Mar 2014 - 8:47 am | नाखु
जाल जगात सध्या "मी देव मानत नाही" हेच सतत (ओ)रडून सांगण्याची क्रेझ आहे.
तेव्हा
बोला जय जय राम कृष्ण हरी!
पोपटपंची दुर्लक्षी रामपुरी!!
4 Mar 2014 - 9:58 am | जवाहरलाल रामचन्...
मृत्युंजय मंदिर ,कोथरुड येथे स्वच्छता आसते
4 Mar 2014 - 1:36 pm | पिलीयन रायडर
परवा कमला नेहरू पार्क जवळच्या दत्त मंदिरात गेले होते. मी कधीही मंदिरात आपणहुन जात नाही आणि गेलेच तर पाया पडत नाही कारण मनातुन तसं काही करावं असं वाटत नाही.. पण हे मंदिर इतकं प्रसन्न आहे की का कोण जाणे मनापासुन पादुकांवर डोकं ठेवावं वाटलं.. शांत वाटत होतं एकदम.. दत्त महाराज येऊन लगेच माझं भलं करतील असं काही मला वाटत नाही.. पण जर २ मिनिटं सगळे तर्क बाजुला ठेवुन पाहिलं, तर शांत वाटलं..
मला अजुनही वाटत नाही की कुणी येऊन माझी संकटं दुर करणारे, पण मनाचा झगडा थांबवला तर जी शांतता मिळते त्यातुन बहुदा संकटांना सामोरं जायची ताकद मिळत असावी (किंवा दुसर्या शब्दात मनाचा झगडा चालु असताना जी शक्ती वाया जात असते, ती वाया जाणं थांबतं म्हणुन की काय..)
एरवी मी देव मानत नाही, पण त्यात काही विषेश नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात सगळ्यात अवघड प्रसंग आला होता.. माझा मुलगा जीवन मरणाशी झगडत होता.. तेव्हा माझ्या मनाशी माझा हाच झगडा चालु होता. मी देव मानत नव्ह्ते त्यामुळे उपास तापास, नवस करण्याचा प्रश्नच नव्हता. पण शेवटी जेव्हा खुप खुप रडुन झालं.. तेव्हा फायनली मी "रामाला काळजी.." म्हणुन गप्प बसले.. माझी चिंता त्या क्षणी संपली असं म्हणता येणार नाही पण अचानक मी ह्यात काहिही करु शकत नाही हे उमजलं.. ते मला आधीही कळत होतच, पण तरीही मी "डिनायल मोड" मध्ये होते. एका क्षणी मी ती काळजी दुसर्याच्या उरावर टाकली.. रामाच्या.. आता तो पाहुन घेईल म्हणुन मी शांत बसले.. खरच राम येणार होता का?... नाही.. नव्हताच येणार.. हे मला तेव्हाही समजत होतच.. पण जर राम आहे असं मानुन माझं गणित सुटत होतं तर का सोडवु नये मी ते?
आपण मणुस आहोत.. आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत.. आपलं डोकं एका मर्यादे पलीकडे ताण सहन करु शकत नाही.. तेव्हा माणुस काही ना काही उपाय शोधतोच.. सर्व्हायवल साठी.. त्यातलाच एक मार्ग म्हणजे देव आहे..
कर्मकांड आणि देव ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.. बहुतेकांचा विरोध हा कर्मकांडाला असतो..पण तो देवावर निघत असावा..
बाकी देव ही कल्पनाच आहे.. पण फार उत्तम कल्पना आहे.. सर्व सामान्य लोकांसाठी.. महान लोकांनी सत्य कवटाळावीत.. त्यांच्यात ती पचवण्याची ताकड असते.. पण समाज हा ९९% सामान्य माणसांनी बनलेला असतो.. आणु त्यांच्यात तणावाच्या प्रसंगाना सामोरे जाणयची ताकद नसते.. त्यामुळे त्यांच्या पुढे "देव नाही" हे ओरडण्यचा काही फायदा नाही.. खर तर महान लोकांना आपणहुन हे उमजलं पाहिजे..
जाता जाता..
काल गाडी मध्ये एक आजी भेटल्या.. ७३ वर्षाच्या.. ओळखपाळख नसताना अगदी आपुलकीनं बोलत होत्या..." तु अशी एकटी प्रवास नको करत जाउ रात्रीची.. माणसं फार वाईट आहेत ग राणी.. आता माझि गोष्ट वेगळी, मी इथेच रहाते.. तुला खर वाटणार नाही माझं वय ७३ आहे.. वाटतं का वाटतं?? मला कॅन्सर झाला होता.. पण माझे केस पहा.. सोडुन दाखवु? दाखवु? "
आजी बाईंचा खरच मोठ्ठा अंबाडा होता.. पण त्यांचा स्टॉप २ मिनिटावर आला होता आणि ह्या मला केस सोडुन दाखवु का म्हणुन विचारत होत्या..
"अगां काल डांबराचा रस्ता बनवायला आले.. अचानक गाडी माझ्या अंगावर आली.. मला उडवलं ना तिनी.. पण मी एकदम ताठं उभीच.. देव लय भारी आहे.. माझी काळजी घेतो.."
असं म्हणुन पोराच्या न माझ्या डोक्यावर हात फिरवुन निघुन गेली..
आता का आपण ह्या म्हातारीला सांगायचं की बाई तुझा देव बिव काही खर नाहीये.. सगळी कल्पना आहे.. जर तिची ही एक कल्पना तिला ७३व्या वर्षी कॅन्सर मधुन उठुन काही बाही उपक्रम करायला बळ देत असेल तर खरच तिला "सत्याची" गरज आहे का?
मुळात आपल्याला तरी "सत्य" नीटसं माहिती आहे का?
4 Mar 2014 - 4:38 pm | मधुरा देशपांडे
प्रतिसाद मनापासून आवडला. सुंदर लिहिलंय.
4 Mar 2014 - 7:14 pm | पैसा
ज्या गोष्टीने दुसर्याला त्रास न देता मनाला काही शांतता मिळत असेल अशी कोणतीही गोष्ट वाईट असू शकत नाही. यावरून एकदा रेल्वेत भेटलेल्या एका अल्पशिक्षित माणसाची आठवण आली. तोही म्हणाला होता, "आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."
6 Mar 2014 - 3:40 am | स्पंदना
दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."
__/\__!!
6 Mar 2014 - 10:38 am | डॉ सुहास म्हात्रे
"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."
मानवी स्वभावाचं खरेपण उघड करणारं वाक्य ! हा माणूस "लोकमान्यतेने अल्पशिक्षित" असला तरी "खरा सुशिक्षित आणि बुद्धिमान" आहे.
6 Mar 2014 - 12:48 pm | पैसा
म्हणून ते वाक्य जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे! तो बेळगावजवळच्या खेड्यातला एक साधा शेतकरी माणूस होता. एस एस सी पर्यंत शिकलोय म्हणालेला!
7 Mar 2014 - 4:04 pm | चौकटराजा
अन उदबत्तीचा पुढा पसंत करायला देवाला कुठे बोलावतो ?
5 Mar 2014 - 12:03 pm | बॅटमॅन
अतिशय जब्री प्रतिसाद. आवडला अन बह्वंशी सहमत आहे.
5 Mar 2014 - 12:55 pm | अनन्न्या
मस्त!
4 Mar 2014 - 3:53 pm | म्हैस
उत्तम लेख. महाराष्ट्रा एवढी घाणेरडी देवळ दुसरीकडे कुठेही नसतील.
बाकी देव नाही अशी ज्यांची धारणा असते त्यांनी ती स्वतापुतीच ठेवावी उगीच दुसर्यांना misguide करण्याचा प्रयत्न करू नये.
4 Mar 2014 - 7:50 pm | भ ट क्या खे ड वा ला
काही वर्षापूर्वी शंकराच्या पुत्रावर सुद्धा हि वेळ आली होती अचानक. पुरोगामी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा असल्या आचरट पणाला साथ देत होते. त्यावेळची एक आठवण
खेडला सिद्धिविनायकाचे एक मंदिर आहे, ते खासगी मालकीचे आहे. गावातील बरेच लोक त्याचे दर्शन घेऊन आपला दिनक्रम सुरु करतात. गणपती दूध पीत आहे हे समजताच भक्तांचा जथा दुध पाजायला निघाला. या वास्तूचे मालक आणि पूजारी यांनी गाभारा बंद करून हा आचरट पणा थांबवला, आणि तो सुद्धा अगदी योग्य आणि सौम्य शब्दात प्रबोधन करून.
5 Mar 2014 - 12:13 pm | साती
त्या वास्तूच्या मालकांना आणि पूजार्यांना दंडवत सांगा.
5 Mar 2014 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
6 Mar 2014 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
6 Mar 2014 - 3:01 am | कंजूस
असं होण्याचं कारण
१) बरीच देवळे खाजगी आहेत .
२)दक्षिणेकडच्या देवळात मूर्तीजवळ जाऊ देत नाहीत आणि आयोजन ट्रसटचे लोक करतात .
३)प्रसाद ,नैवेद्य ,दर्शन ,तोडगे या कल्पनांचे डोंगर पोखरणे कठीण आहे आणि फक्त दुसरा डोंगर तयार होतो .
४)टीव्ही चानेलवर सतत तोडगे सांगत असतात .शनि ,देवी ,शिव आणि मारूती ही मुख्य शांत करण्याची दैवते असतात .अमुक अमूक घ्या डाळ तांदूळ तेल दही वगैरे करा अर्पण मूर्तीवर नाहीतर सोडा नदीत .
५)प्रत्येक पोथीत आडून अथवा स्पष्टपणे सज्जड पण काव्यात्मक दम दिलेला असतो हे नाही केलेल्यांचं काय वाईट्ट झालं .
६)वरच्या दोन मुद्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मूर्तीने मन दगडाचं करून सर्व अंग अभिषेकाने माखून घेणे आणि त्रस्त भाविकांची करूणा "यांचे भले कर रे देवा" सांगणाऱ्याचे ऐकत राहाण्या शिवाय गत्यंतर नाही .
७)या सर्वाँतून नारायण कसे सुटले ?ज्यांचे सध्या भले होत आहे असेच भक्त इकडे येत असतात त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित असते .एकतर हे पहुडलेले असतात अथवा छप्पन भोग खाऊन आनंदात बासरी वादन करत असतात .
7 Mar 2014 - 12:34 pm | संजय क्षीरसागर
वाक्य नीट पाहा :
१) दगडाच्या किंवा मनातल्या देवाला दिव्याची आवश्यकता नाही,
२) दिव्याची आवश्यकता आपल्यालाच आहे
३) कशाला? तर काळोखात देव दिसावा म्हणून!
याचा नक्की अर्थ असायं : दिव्याची (किंवा अडचणीतून मार्ग दिसण्याची आवश्यकता) आपल्याला आहे. आणि देव हे काही सल्यूशन नाही (म्हणजे तो दिसून काही उपयोग नाही). आता अडचणीतून मार्ग दिसण्याला कुणी `देव दिसणं' म्हणत असेल तर तो व्यक्तिगत दृष्टीकोन आहे. पण त्यासाठी देवासमोर दिवा लावण्याची आवश्यकता नाही!
इथला अनन्याचा एक प्रतिसाद मात्र लक्षवेधी आहे :
आणि पुढे ती म्हणते :
तुम्ही जे देवासाठी म्हणून करता ते पुजार्यापाशी जातं कारण देव असं काहीही नाही. इतरांना हे दिसत नाही किंवा कळत नाही असं नाही, फक्त मंजूर होत नाही. आपण आपली धारणाच फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं जस्टीफाय करत राहातो, पाहा :
म्हातारीला सांगायचा प्रश्न कुठे येतो? पण तुम्ही जर असं म्हणत असाल:
तर देव हा तुमच्यासाठी प्लासेबो इफेक्ट आहे, म्हणजे :
देव या विषयावर अनेकांगांनी चर्चा झाल्यात.
त्याच्या प्लासेबो इफेक्ट वरून इथे सॉलिड चर्चा झालीये ( त्यामुळे `तोतया प्रेसिडेंट' माझ्यावर खवळून आहेत. आणि शॅटमॅन तिथे सहमत आहेत पण इथे बिथरले आहेत (असो, नांवातच सगळं आलं)
ती धारणा सघन करणार्या प्रणाली म्हणजे आरती किंवा चमत्कार (गच्छितानंदबाबांची गोष्ट) यावरनं इथे आणि इथे तुफानी चर्चा झाल्यात. (त्यावरुन घंटीचंद सतत उसळलेले असतात आणि कायम गोंधळात असलेले त्यांचे मित्र `सायकॉलॉजीवर लेख टाकून' (माझा) `अॅनॅलिसिस' करण्याचा प्रयत्न करतात!)
तर तुमच्या धारणा तुमच्यापाशी. इथली एकूण मानसिकता पाहता देव हा विषय भावनिक होतो आणि पब्लिक तारतम्य करु शकत नाही. तस्मात पुन्हापुन्हा तोच विषय घेऊन जनजागृती करण्यात अर्थ नाही.
मला नवल याचं वाटलं की पुजारी हा देव या कल्पनेचा समाजमनावर पगडा कायम ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. देवाचा धंदा तेजीत असण्याचं मूळ कारण हे की लोक भावभोळे आहेत. जर लोक भावविभोर झाले नाहीत तर धंदा बसेल. आणि लेखात मात्र लोकांना सूज्ञपणा आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे! लोक (अनन्यासारखा) समंजसपणा शिकले तर बुवांचं कठीण होईल. या विरोधाभासाची मजा वाटल्यानं प्रतिसाद दिलेत. बाकी बोथटसुरी नेहमीच कावलेले असतात (आणि केवळ माझ्या लेखनावरच प्रकट होतात!) त्यांच्यात वैचारिक बदलाची अपेक्षा नाही तस्मात त्यांना वेगळं उत्तर देण्यात अर्थ नाही.
7 Mar 2014 - 12:57 pm | संजय क्षीरसागर
आय अॅग्री! म्हणून प्रत्येकानं आपला देव `मनात' ठेवावा. (नाही तरी मनाशिवाय तो आहेच कुठे?) फार तर मनःशांतीसाठी त्याची `मानसपूजा' करावी. पण लोच्या तिथेच आहे! मग मंदिरं संपली, मशिदी संपल्या, गुरुद्वारं संपली, पुजारी आणि बडव्यांचा धंदा बसला, परिक्रमा आणि तिर्थयात्रा नामशेष झाल्या. आणि हो मुख्य म्हणजे धर्माधिष्ठित राजकारण संपलं... धर्माच्या नांवाखाली विभक्त असलेली सगळी मानवता एक झाली!