या दोन्ही कविता मी बर्याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.
आज तो सावरलाय पण त्यावेळचा त्रास सहन करणे त्याच्या सहनशक्ती पलिकडचे झालेले होते.
कसे रोधावे मनास, कसा सांभाळावा ध्यास..
मिणमिणता उजेड अन् अंधाराची कास.
दुःख सर्वत्र गर्दले, कोण कुणाचे कळेना..
तुझ्या सोबतीच्या जागी, दगा करतोय वास.
कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..
डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास.
दिन-रात एक सारे, विश्व निमाले क्षणात..
काळ थांबला कधीचा, नुरे जगण्याची आस.
-------------------------------------
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.
प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
घाव पेलण्या दग्याचा जणू घडला अभ्यास.
वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.
काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.
मुमुक्षु
प्रतिक्रिया
2 Oct 2008 - 4:48 pm | विसोबा खेचर
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.
सुरेख...!
आपला,
(मुमुक्षूच्या कवितांचा फ्यॅन) तात्या.
2 Oct 2008 - 11:24 pm | प्राजु
वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.
मस्त... खूप आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Oct 2008 - 9:59 am | क्षितिजा
खुप सुन्दर आहे!!! लगे रहो!!!
3 Oct 2008 - 10:30 am | ऋषिकेश
दु:ख आणि सुखाची साईन वेव्ह मस्त मांडली आहे. कविता आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
3 Oct 2008 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मस्तच रे .... अशाच आशादायक कविता लिही रे! छान वाटतं वाचून.
(औरंगजेब) अदिती
3 Oct 2008 - 10:59 am | फटू
काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.
हे तर खुपच छान... अगदी मोजक्या शब्दांत "वेळ" महात्म्य...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
3 Oct 2008 - 11:00 am | मनीषा
चांगली आहे , आवडली
काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास....सुंदर !!!
3 Oct 2008 - 11:02 am | मनिष
फार आवडली. अजून लिही!
- मनिष
3 Oct 2008 - 11:21 am | सहज
मुख्य म्हणजे जरा दोन ओळी गद्य ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
(मुमुक्षूच्या कवितांचा फ्यॅन)
तात्यांशी सहमत
3 Oct 2008 - 11:53 am | भाग्यश्री
खूप मस्त कविता!! फार आवडली!
3 Oct 2008 - 3:28 pm | राघव
तुम्हा सर्वांस कविता आवडली बघुन खूप आनंद झाला. :)
(प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या) सगळ्यांचे मनापासून आभार.
आपला
मुमुक्षु
9 Oct 2008 - 5:34 pm | vinod
खरच अप्रतिम आहे !!!!!!!!!!!
11 Aug 2020 - 10:23 am | प्राची अश्विनी
क्या बात!
11 Aug 2020 - 5:19 pm | राघव
खोदकाम? :-)