रामराम मंडळी. इच्छा असूनही कामाच्या गडबडीत गेल्या काही दिवसात 'मिसळपाव'ची चव घेता आली नाही. म्हटलं जरा वेळ मिळाला की मिसळीच्या ३-४ प्लेटी मस्त उडवून येऊ. आत्ताशी कुठं जरा सवड मिळाली. गिऱ्हाइकांची वर्दळ बघून बरं वाटलं.
आता जरा विषयाकडे वळू. सर्वप्रथम सभ्य लोकांसाठी खुलासा: ढापलेली = चोरलेली. तर विषय आहे चोरलेल्या किंवा उचललेल्या गाण्यांचा. जगात अनेक भाषांमधले संगीतकार गाणी चोरतात हे जरी खरे असले तरी तूर्तास हा विषय सगळ्यांच्या लाडक्या अशा 'हिंदी चित्रपटसंगीता'पुरता मर्यादित ठेवला आहे. (अस्मादिकांचे ज्ञान एवढ्यापुरतेच आहे). शिवाय मराठी संगीताला असे 'उसने' मागायची सवय जरा कमीच आहे (असली तरी अाम्हाला माहीत नाही). खाली दिलेल्या काही 'उचल्या' संगीतकारांवर वैयक्तिक सूड उगवायचा आमचा हेतू नाही; पण त्यांचे पितळ उघडे करणे आवश्यक आहे.
मला अजून आठवतंय. मी लहान असताना मला सुभाष घईच्या 'त्रिदेव'मधलं 'ओएऽ ओएऽ' हे गाणं आवडायचं. आम्ही लहान मुलं अगदी बेंबीच्या देठापासून मनसोक्त ओरडत हे गाणं म्हणायचो (म्हणायचो कसले.. किंचाळायचो!). नंतर मोठा झाल्यावर कधीतरी ग्लोरिया एस्टेफानचं 'Rhythm is gonna get you' हे गाणं ऐकल्यावर एकदम ट्यूब पेटली.. आयला, हे गाणं डिट्टो 'त्रिदेव' मधल्या गाण्यासारखं आहे. थोडी छानबीन केल्यावर कळलं की विजू शहानं ह्या गाण्यातलं बरंचसं संगीत चक्क उचललंय. गूगलिंग करता-करता एक भारी साइट सापडली 'आय्-टू-एफ्-एस्' (www.itwofs.com). हे संकेतस्थळ म्हणजे भारतीय चित्रपटसंगीतात आढळणाऱ्या अशा प्रेरणांचे भलेमोठे भांडार आहे. काही प्रेरणा या सूक्ष्म पण खूबीने वापरलेल्या तर बऱ्याचशा उघडउघड चोरलेल्या.
बहुतेक सगळयांना 'कर्ज' मधलं 'एक हसीना थी' हे गाणं माहीत असेल. मी आजपर्यंत समजत होतो की ह्या गाण्यातली गिटारची लोकप्रिय धून (आठवली का?) ही ओरिजिनल आहे. खरंतर ही धून वाजवायला मला खूप आवडते. पण जॉर्ज बेन्सनचं 'We as Love' ऐकल्यावर खात्रीच पटली की लक्ष्मीकांत-प्यारेलालनी ही ट्यून जशीच्या तशी ढापली आहे. 'जो जीता वही सिकंदर' म्हणजे तर जतिन-ललितच्या संगीताचा मुकुटमणी. त्यातल्या 'यहॉं के हम सिकंदर' या गाण्यातल्या अंतऱ्याची धून Pinball Wizard वरून चोरलेली आहे. 'धूम मचाले' या 'धूम' मधल्या गाण्याने तर गणपतीउत्सवापासून ते नाईटक्लबपर्यंत (निशा-मंडळ?) सगळीकडे धूम माजवली होती. संगीतकार 'प्रीतम'ने हे गाणे दोन वेगवेगळ्या गाण्यांची ठिगळे जोडून बनवले आहे ('Mario takes a walk' आणि इजिप्शियन गाणे 'Enta ma oltesh leh'). अशी शेकडो गाणी (आणि त्यांचे 'उगमस्थान' असलेली मूळ गाणी) itwofs.com वर दिलेली आहेत. मला यापूर्वीही काही ढापलेली गाणी माहीत होती. पण ही लिस्ट हनुमानाच्या शेपटीसारखी लांब असेल याची कल्पना नव्हती. या 'उचल्या' संगीतकारांना कधी असे वाटत नाही की मूळ गाण्याच्या संगीतकाराला काही श्रेय द्यावे. संगीतातल्या प्रताधिकारानुसार (copyright) मूळ गाण्याचा उल्लेख करणे अभिप्रेत आहे. पण कसले काय.
जुनी हिंदी गाणी तरी ओरिजिनल असतील म्हणावं तर त्याचीही १००% खात्री नाही. मग ते एस्. डी. बर्मनचं 'एक लडकी भिगी-भागी सी'(चलती का नाम गाडी) असो किंवा ओ.पी.नय्यरचं 'ये है बॉम्बे मेरी जान' (सी.आय.डी.) असो. जुन्या गाण्यांमध्येही हा कर्करोग जाणवतो. मात्र एक गोष्ट नक्की. जुन्या काळी गाण्यांमध्ये आजच्याइतकी 'बनवा-बनवी' नव्हती. काही ठराविक गाणी सोडली तर जुन्या काळचे बरेचसे चित्रपट-संगीत हे मधुर (melodious) होते. आजकालची गाणी मधुर नसतात असे बिल्कुल नाही. पण 'चोराचोरी'चे प्रकार जास्त वाढलेत (कुणीतरी पोलिसांना जाऊन हे सांगितले पाहिजे. म्हणजे पोलिस ह्या चोरट्या संगीतकारांकडूनही हप्ते घेतील :)).
ए.आर.रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्यासारखे थोडेफार सन्माननीय अपवाद वगळले तर बाकीचे नुसते पाट्या टाकायची कामे करतात. घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे. बरोबर आहे म्हणा. गाणी चोरायला पण किती कष्ट सोसावे लागतात. सगळ्यात पहिल्यांदा, जी गाणी चोरायची ती ४-४ वेळा ऐकायला लागतात. मग त्यातली चांगली वाटणारी गाणी बाजूला काढायची. त्या धूनेच्या स्वरांचे नोटेशन काढायचे. ती गाणी गायकाला/गायिकेला झेपतील की नाही हे बघायचे (हो. नाहीतर एखादा गायक गाता-गाता आडवा व्हायचा!). गाणे चोरलेले आहे हे कुणाला कळू नये म्हणून त्यावर स्वत:च्या स्टाइलमधले थोडे संगीत थापायचे. म्हणजे थोडक्यात गाण्याची अजून वाट लावायची. या सगळ्या अथक प्रयत्नांतून ते गाणे तयार होणार. आहे की नाही हार्डवर्क! बरं... हे लोक फक्त इंग्रजी गाणीच चोरतात असे नाही. ग्रीक, इजिप्शियनपासून ते बंगाली, मल्याळी गाण्यांपर्यंत यांना काहीही 'चालते'. (जसे चायनीज लोकांना खायला काहीही चालते तसे)
आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, प्रीतम् वगैरे मंडळी तर दिवसाला तीन या हिशोबाने चोरलेल्या गाण्यांची चळत रचतात. हे म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनसारखे झाले - सकाळी एक गोळी, दुपारी जेवणानंतर एक आणी रात्री झोपायच्या आधी एक! पण ते तरी काय करणार बिचारे. बॉलिवूडच्या फास्ट जमान्यात त्यांना बूंदी पाडल्यासारखी गाणी 'पाडावी' लागतात. मग इतक्या कमी वेळेत क्रिएटिव्ह संगीत देणार तरी कुठून? आपल्याकडे एक म्हण आहे बघा - उचलली जीभ, लावली टाळ्याला. तशीच या महारथींसाठी एक नवी म्हण - उचललं गाणं, लावलं स्वत:च्या नावाला! ('म्हणी रिमिक्स्' या धाग्यात टाकायला काही हरकत नाही). माझी बऱ्याच दिवसापासून एक सूप्त इच्छा आहे - अन्नू मलिकचं एकतरी ओरिजिनल गाणं ऐकायला मिळावं. जरा अतिशयोक्ति होतीय मान्य आहे. कारण मलापण अन्नू मलिकची बरीच गाणी आवडतात उदा. काही चित्रपटांचे संगीत: 'विरासत', 'फिर तेरी कहानी याद आयी' (त्यात पण 'तेरे दर पर सनम' मधलं सुरवातीचं संगीत 'Theme from summer of 42' मधून ढापलं आहे).
काही काही गाणी मात्र 'उचललेली' असली तरी छान वाटतात. उदा. शंतनु मोईत्राचं 'पल पल' (लगे रहो मुन्नाभाई) हे गाणं क्लिफ रिचर्डच्या 'Theme for a dream' वरून उचललं असलं तरी मला ते आवडतं. पंचमदा (आर.डी.बर्मन) या बाबतीत खूप कुशल होते. त्यांची काही गाणी इतर भाषेतील संगीतावरून 'स्फुरलेली' असली तरी ऐकायला मस्त वाटतात. उदा. फिर वही रात है ('घर'), एक मैं और एक तू ('खेल खेल में'), दिलबर मेरे ('सत्ते पे सत्ता') वगैरे. म्हणूनच जुन्या चित्रपटातली जी चोरलेली गाणी आहेत, तीसुद्धा श्रवणीय वाटतात.
इथे एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. जे ऐकायला सारखे वाटते ते सगळेच 'ढापलेले' आहे असे मुळीच नाही. एखाद्या संगीतापासून किंवा गाण्यापासून प्रेरणा घेणे आणि एखादे संगीत खुल्लम्-खुल्ला चोरणे यात फरक आहे. समजा एखाद्या चित्रकाराने साकारलेले सूर्यास्ताचे अप्रतिम चित्र पाहून दुसऱ्या चित्रकाराने स्वत:च्या शैलीत सूर्यास्ताचे छान चित्र काढले. आणि त्याच चित्राचा एखाद्याने फोटो काढून 'हे मी काढलेले चित्र' असे सगळ्यांना सांगितले. ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तोच 'प्रेरणात्मक गाणे' आणि 'चोरलेले गाणे' ह्यात आहे.
व्यावसायिक संगीतक्षेत्रात music loops (संगीत-आवर्तने किंवा ताल-आवर्तने) हे कायदेशीररित्या वापरता येतात. जसे आपल्या शास्त्रीय संगीतातला 'त्रिताल' हा कोणत्याही गाण्यात वापरता येतो (त्याला आपण त्रिताल 'चोरला' असे म्हणत नाही); तसेच, व्यावसायिक संगीतात टेक्नो, हिप-हॉप असे बरेच तालाचे loops उपलब्ध असतात. जर दोन गाण्यात वापरलेले हे loops सारखे वाटले तर ते चोरले आहेत असे म्हणता येत नाही. उदा. 'सपने' मधल्या 'आवारा भवरें' या गाण्यात ए.आर.रेहमानने वापरलेला ताल (beats-loop) हा 'Rhythm of of pride lands' सारखा असला तरी गाण्याची धून मात्र रेहमानची स्वत:ची आहे. त्यामुळे या दोन्ही गाण्यातला फक्त ताल सारखा आहे. पण गाण्याची (किंवा संगीताची) धून जर दुसऱ्या गाण्यासारखी असेल तर त्या संगीतकाराच्या कल्पनाशक्तीला ग्रहण लागलंय असे समजावे. नदीम-श्रवणच्या 'आशिकी' मधलं 'तू मेरी जिंदगी है' हे आख्खं गाणं (आणि गाण्याचे शब्दही) पाकिस्तानी सिंगर तसव्वूर खानूमच्या 'तू मेरी जिंदगी है' या हुबेहूब गाण्यावरून उचललं आहे. त्यामुळे 'स्फूर्ती' आणि 'चोरी' या दोन्हीतला फरक लक्षात घेऊन सृजनशील संगीतकार कोण आणि 'बाजारू' संगीतकार कोण हे ओळखणे महत्त्वाचे.
असो. रात्रीबेरात्री चोरी करणाऱ्या चोरांना तुरूंगात टाकतात; पण दिवसाढवळ्या कलेचा घात करणाऱ्या काही संगीत-तस्करांचा मात्र 'फिल्मफेयर' (आणि अजून कोणतातरी) पारितोषिक देऊन गौरव करतात. अशी ही अजब 'माया'नगरी!
राहूल
--
चोरावर मोर...
प्रतिक्रिया
25 Sep 2008 - 5:56 am | भाग्यश्री
सहीच लेख.. आवडता विषय असल्याने खूपच आवडला! पल पल हे गाणं ढापलेलं आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा अती वाईट वाटलं होतं! :(
असो.. मी आय-ई वरून दोन वेळा भली मोठा प्रतिसाद लिहीला.. का कोण जाणे गाळला गेला. तेव्हा आता परत तितकं नाही लिहीत बसत.. तुनळीच्या लिंक्स नंतर देईन..
मैने प्यार किया .. आते जाते -> आय जस्ट कॉल्ड..
मेरे रंग मे -> फायनल काउंटडाऊन..
अकेले हम अकेले तुम... दिल मेरा चुराया क्युं - > लास्ट ख्रिसमस..
26 Sep 2008 - 2:55 am | टग्या (not verified)
त्यातलीच मधली एक 'आरोळी' 'टारझन बॉय' नामक गाण्यातून ढापली आहे असे वाटते.
25 Sep 2008 - 6:57 am | बबलु
राहूल, छान लेख.
हिंदी चित्रपटसंगीत हा माझा आवडता विषय असल्यानं सॉलिड आवडला हा लेख.
लगे रहो राहूलभाई....
....बबलु-अमेरिकन
25 Sep 2008 - 8:16 am | आजानुकर्ण
हे बघा धक धक करने लगा चे ओरिजिनल.
आपला,
(गुल्टी) आजानुकर्णगारू
25 Sep 2008 - 8:28 am | रामपुरी
मालवून टाक दीप -> (गझल) अब के हम बिछडे
सहि सहि चोरली आहे अगदी सुरवातीची धून सुद्धा...
25 Sep 2008 - 10:33 am | मनिष
ही गाणी भूप रागात (अब के हम बिछडे हे भुपेश्वरी मधे - कोमल "ध") आहेत म्हणून तसे वाटते. हृद्यनाथ मंगेशकर स्वतः शास्त्रीय संगिताचे उत्तम जानकार आहेत...त्यांनी धून चोरली असेल हे म्हणणे कितपत योग्य आहे?
भूप ची सुरावट वाजवून बघा -
"सा रे ग प ध सा"
25 Sep 2008 - 5:27 pm | रामपुरी
सन्गीतकाराचे नाव मोठे आहे म्हणुन त्याने चाल चोरलिच नाहि असे म्हणू शकत नाहि. त्यान्चे "जीवलगा.." हे गाणे श्रीगौरी रागातील चीजेवर आधारीत आहे. ते चोरलेले नाही. वरिल गाणे मात्र चोरलेलेच आहे. भूप रागातील इतरही गाणी आहेत जी पूर्ण वेगळी आहेत. धून, ताल, चाल सर्वकाही सारखे असेल तर ती चोरी नव्हे का? कि ते फक्त मन्गेशकर आहेत म्हणुन त्याना सर्व माफ आहे?
25 Sep 2008 - 8:34 am | सुचेल तसं
छान लेख.
सध्या अन्नु मलिकचा वारसा प्रीतम चालवतोय. त्याची जवळजवळ सर्व गाणी कोरियन गाण्यांवरुन ढापलेली असतात.
मूळ कोरिअन गाणं - http://www.youtube.com/watch?KgPqN85xc5M
मूळ इंडोनेशियन गाणं - http://www.youtube.com/watch?=mVNMiW2wPb4&feature=related
मूळ इंडोनेशियन गाणं http://www.youtube.com/watch?v=N2GUjDhzIHc&feature=related
मूळ कोरिअन गाणं - http://www.youtube.com/watch?v=HXmLDDkMukU&feature=related
मूळ कोरिअन गाणं - http://www.youtube.com/watch?v=1Cfxbb0Rnn8&feature=related
प्रीतमचं संगीत उत्तम आहे ह्यात वाद नाही. पण त्याने गाणं चोरताना त्याच्या मूळ संगीतकाराचा नामनिर्देश करायला नको?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
25 Sep 2008 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे
.
वा क्या बात है. मजकुराची कॉपी करता येते. गुणवत्तेची नाही. पण परिक्षेत पास झाल्यानंतर तुम्ही गुणवत्तेच्या जोरावर पास झालात कि कॉपीच्या जोरावर हे कुणी विचारत नाही. मार्केट मध्ये फक्त लेबल पाहिले जाते.
प्रकाश घाटपांडे
25 Sep 2008 - 9:34 am | मनस्वी
काल रेस्टॉरंटमध्ये "WorldSpace Satellite Radio" वर गाणं ऐकलं. तेलुगु का कन्नड होतं नीट कळलं नाही. चाल तंतोतंत "त्या तिथे, पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे.."
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
25 Sep 2008 - 9:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान लिहिलाय लेख!
मस्त विषय आणि थोडाशी दुखरी नसही! मूळ संगीतकाराला त्याचं श्रेय देऊन मग "प्रेरणा" घेण्याला या लोकांचा का विरोध असतो मला समजत नाही.
आर. डी. बर्मनचं, "गँबलर"मधलं, "दो लफ्जोंकी" हेपण अस्सल त्याचं नाही, तेपण त्यानी कुठल्यातरी लॅटीन गाण्यावरुन घेतलं आहे.
ए.आर.रहमानचं "साथिया"मधलं, "ओ हमदम सुनियो रे"पण कुठूनतरी 'प्रेरीत' आहे, आता मला मूळ गाणं आठवत नाही, पण ते अजिबातच चोरलेलं वाटलं नाही जेव्हा मूळ गाणं ऐकलं तेव्हा! तसंच "युवा"मधल्या "फना"चे बीट्स कोणत्या गाण्याचे आहेत... आता विसरले.
(हिंदी चित्रपट संगीतप्रेमी) अदिती
25 Sep 2008 - 11:45 am | ऋचा
ओ हमदम सुनियो रे=back street boys
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Sep 2008 - 9:44 am | विजुभाऊ
अजून काही ढापलेल्या चाली
मूळ मराठी गाणे : हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
चाल लावलेले हिन्दी गाणे : तु कल चला जायेगा तो मै क्या करु ...
मूळ मराठी गाणे : धुन्दीत गंधीत प्रीतीत सजणा
चाल लावलेले हिन्दी गाणे : ओ मारीया ओ मारीया
मूळ मराठी गाणे : मालवुन टाक दीप
चाल लावलेले हिन्दी गाणे : चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा
ही गाणी पेटीवर वाजवताना हे पटकन समजते.
ईंग्रजी : हनी हनी ( आबा)
चाल लावलेले हिन्दी गाणे : तेरे लिये जमाना तेरे लिये.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
25 Sep 2008 - 10:51 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मला वरिल जोडि बद्दल खुप आदर आहे. पण त्यांनि सुधा एक चोरी केली आहे. फारशी कोणाला माहित नसावी. हॉलीवूड चा १९४० च्या आसपासचा सिनेमा. फॉरेवर यंग. कानामात्रेचा फरक नकरता बॅक्ग्र्राऊंड म्युझिक चोरले. गाणे - जाने कहां गये वो दिन
25 Sep 2008 - 11:10 am | ऋचा
ह्या पिक्चर मधली गाणी पण ढापलेली आहेत,
ह्यात ऋषी कपूर आणि तो हीरो (नाव माहीत नाही) ह्यांची जी जुगलबंदी आहे ती पुर्ण ढापलेली आहे.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Sep 2008 - 12:56 pm | स्वाती दिनेश
तारीक त्याचे नाव..
25 Sep 2008 - 4:08 pm | विजुभाऊ
ते गाणे
मिल गया हम को साथी मिल गया
मूळ गाणे
मामा मिया ( आबा)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
25 Sep 2008 - 11:12 am | मनीषा
चित्रपट बहूतेक मनपसंद (देव आनंद, टीना मुनीम) यातील पंख बिना उडू .. खुषी मिली ऐसी हे गाण My Fair Lady मधील एका गाण्यावरुन घेतले आहे.
26 Sep 2008 - 2:50 pm | विजुभाऊ
तो आख्खा चित्रपटच "माय फेयर लेडी" वरुन उचलला आहे
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
25 Sep 2008 - 1:13 pm | विसोबा खेचर
छान धागा सुरू आहे! :)
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
25 Sep 2008 - 1:31 pm | मराठी_माणूस
मोझार्ट च्या 4oth सिंफनी वर आधारीत (सरळ सरळ कॉपी नव्हे) "ईतनाना मुझसे तु प्यार बढा ... " हे छाया मधिल गाणे सिंफनी पेक्षा जास्त गोड वाटते
25 Sep 2008 - 4:10 pm | विजुभाऊ
त्यावर् आधारीत अजून हे गाणे
अंदाज मेरा मस्ताना; मांगे दिल का नजराना ( चित्रपटः दिल अपना प्रीत परायी)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
25 Sep 2008 - 1:57 pm | भडकमकर मास्तर
एक गंमतशीर ओब्झर्वेशन...
इथे गाणी ढापणार्या नवीन संगीतकारांना जास्त शिव्या पडताहेत...
जुन्यांनीही गाणी उचललेली होतीच...
तसे सर्वच जमान्यात ढापणारे लोक होते , पुढे असणार आहेत....
पण प्रीतम आणि अनु मलिकला शिव्या घालणे पोलिटिकली करेक्ट....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 8:57 am | सुचेल तसं
>>पण प्रीतम आणि अनु मलिकला शिव्या घालणे पोलिटिकली करेक्ट....
ह्याची कारणं...
१) आज आंतरजालाच्या प्रसारामुळे ढापाढापी केलेली लगेच उघडकीला येते.
२) जुन्या संगीतकारांनी केलेली जेवढी ढापाढापी समोर आली आहे त्याचं प्रमाण त्यांनी संगीतबद्ध केलेल्या एकूण गाण्यांच्या प्रमाणात अगदी नगण्य आहे.
३) आता प्रीतमच उदाहरण घ्या. जुम्मे जुम्मे चार दिवस नाही झाले इंडस्ट्रीत येऊन, पण ढापलेल्या गाण्यांची संख्या बघा.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
25 Sep 2008 - 2:06 pm | विसोबा खेचर
अवांतर -
वरील सर्व चर्चा पाहता आमच्या भारतीय अभिजात संगीताचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो!
आमचा यमन हा आमचा आहे, आमचा मारवा हा आमचा आहे. आम्ही तो कुठुनही ढापलेला नाही..!
तात्या.
26 Sep 2008 - 11:40 am | विजुभाऊ
आमचा यमन हा आमचा आहे, आमचा मारवा हा आमचा आहे. आम्ही तो कुठुनही ढापलेला नाही..!
हिन्दुस्तानी संगीतावर पर्शीयन /अरबी संगीताचा बराचसा प्रभाव आहे.
यमन हा ऐमन( येमेन) देशातल्या लोकगीतांवरुन प्रचलीत झाला.
शास्त्रीय संगीतावर लोकसंगीताचा प्रभाव असतोच ती ढापाढापी नसते.
लोकसंगीतातल्या अनेक चाली जशाच्या तश्शा उचललेल्या आहेत. अगदी मंगेशकरानीही
उदा : आज गोकुळात रंग खेळतो हरी गाण्याची चाल गरब्याची आहे
: जांभूळ पिकल्या झाडाखाली ही पंजाबी लोक गीताची चाल आहे .
मंगेशकरानी ही चाल "ओ होली आयी " या अनील कपुर अभिनीत गाण्यासाठी वापरली आहे
: "दयाघना..." ची चाल "रसूल अल्लाह.." या बंदिशीची आहे.
लेकीन चित्रपटात ही बंदीश सुद्धा त्याने वापरलेली आहे
: लेकीन चित्रपटातील " केसरीया बालमा...." हे गीत राजस्थानी लोकगीत गायक लांगा बन्धूंच्या त्याच मुखड्याच्या गाण्यावर
आधारीत आहे
: निम्बुडा निम्बुडा.. हे गाणे ही त्याच मुखड्याच्या राजस्थानी गीतावर आधारीत आहे
अजून एक
जुने हिन्दी गाने : चलो सजना जहां तक घटा साथ दे ( संगीतकार : मदन मोहन)
नवे हिन्दी गाणे : जमाने के देखे है रंग हजार ( संजय दत्त / पूजा भट्ट अभिनीत चित्रपट आठवत नाही
आरडी बर्मन स्वतःच्याच काही चाली पुन्हा वापरल्या आहेत
उदा: जुने गाणे : "हमे रासतो की जरुरत नही हैं" ( चित्रपट :नरमगरम )
तीच चाल "सागर किनारे दील ये पुकारे"( चित्रपट सागर) या गाण्यासाठी वापरलेली आहे
गम्मत : "टाळ बोले चिपळीला" या ओळी नन्तर "निगाहे मिलाने को जी चाहता है" ही ओळ म्हणुन पहा. मीटर चाल या सगळ्यात परफेक्ट बसते
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
26 Sep 2008 - 12:29 pm | सर्किट (not verified)
अगदी बरोबर.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
26 Sep 2008 - 2:57 pm | राहूल
>> गम्मत : "टाळ बोले चिपळीला" या ओळी नन्तर "निगाहे मिलाने को जी चाहता है" ही ओळ म्हणुन पहा. मीटर चाल या सगळ्यात परफेक्ट बसते.
सहीच. भारी शोध. आवडलं आपल्याला!
राहूल.
27 Sep 2008 - 5:17 am | चतुरंग
संगीतातली देवघेव व्यवस्थित टिपली आहे विजूभौ!
संगीत हे वैश्विक असतं, 'आपलं- त्यांचं' असं ह्यात काही नसतं.
(पण ढापाढापी वेगळी आणि मुळात आवाका नसेल तर ते फार काळ टिकतही नाही.)
चतुरंग
27 Sep 2008 - 5:32 am | केशवराव
' चलो सजना जहा तक घटा चले. . .' हे गाणे धर्मेंद्र - शर्मीला च्या 'मेरे हमदम मेरे दोस्त' मधले आहे. संगीत : लक्ष्मीकांत- प्यारेलाल.
27 Sep 2008 - 9:50 pm | देवदत्त
जमाने के देखे है रंग हजार ( संजय दत्त / पूजा भट्ट अभिनीत चित्रपट आठवत नाही)
चित्रपट: सडक :)
25 Sep 2008 - 2:26 pm | राहूल
मी अगोदर म्हटल्याप्रमाणे, 'प्रेरणा' कोणती व 'चोरी' कोणती हे ओळखणे महत्वाचे. व्यावसायिक संगीतात rhythm loops हे वापरावेच लागतात. किंबहुना, ते न वापरता संगीत देणे (मग ते कोणत्याही भाषेतले असो - हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश) जवळपास अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक गाणे हे दुसर्या कोणत्यातरी गाण्यासारखे 'भासणे' हे नैसर्गिक आहे (त्यातल्या तालाच्या लूप्समुळे). हे लूप्स व्यावसायिकरित्या विकत घेता येतात (Sony Music सारख्या कंपनीकडून). त्यामुळे हे लूप्स एखाद्या गाण्यात वापरले तरी कुणाला श्रेय देण्याची गरज नसते; कारण ते विकत घेतलेले असतात. आणि ते वापरल्याने संगीतकाराची क्रिएटिव्हीटी कमी झालीय असे म्हणता येत नाही. त्यामुळे असे तालाचे साधर्म्य आढळल्यास वाईट वाटून घेऊ नका.
बर्याचदा गाण्यांचा 'राग' सारखा असल्याने ती गाणी सारखी वाटतात. मला तर 'भैरवी' रागातली सगळीच गाणी आवडतात. पण म्हणून ती सगळी सारखीच आहेत असे नसते. कधीकधी मात्र गाण्यातला 'राग' आणि 'धून' दोन्ही सारख्या असतात. त्यावेळी मात्र चोरी पकडली जाते.
जाता जाता...
'मिपा'करांनी वर दिलेल्या गाण्यांपैकी बरीचशी गाणी itwofs.com वर ऐकायला मिळतील. ती ऐकण्यासाठी तुम्हाला RealPlayer हे सॉफ्टवेअर वापरावे लागेल.
राहूल.
--
डेविड बेकहॅमची स्टाईल 'चोरण्या'पेक्षा गांधीजीच्या सत्याग्रहाची 'प्रेरणा' घ्या!
25 Sep 2008 - 4:11 pm | आनंद घारे
सारेगमपधनी हे सूर ढापल्याखेरीज संगीत निर्माण होत नाही. ते ढापावे लागतातच. हा लेख आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यांमधील एकूण एक अक्षरे आणि शब्द ढापलेले आहेत असेसुद्धा म्हणता येईल कारण कोणी ना कोणी ती आधी वापरलेली आहेत.
एकाद्या गाण्याची चाल ओरिजिनल आहे की नाही यापेक्षा ती कानाला किती गोड लागते हे महत्वाचे आहे. जर कोणी चिनी, जपानी, कोरियन वगैरे संगीत आपले म्हणून ऐकवत असेल आणि ते कानाला गोड लागेल तर ते चांगलेच आहे. नाही तर आम्ही कधी ती ओरिजिनल गाणी ऐकणार आहोत?
26 Sep 2008 - 8:10 am | सुचेल तसं
आम्ही कुठे म्हणतोय की ढापून तयार केलेलं संगीत गोड नसतं....मुद्दा एवढाच आहे की ज्या संगीतकाराच्या मूळ गाण्यावरुन संगीत ढापता (किंवा स्फुर्ती घेता) त्याच्या नावाचा उल्लेख करावा, बस!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
25 Sep 2008 - 4:31 pm | झकासराव
छान लिहिलय.
प्रीतम देखील ह्या चोरीत आहे :(
एक गाण होत विन्ग्रजी असेल. भलतच फेमस झालेल त्याकाळात.
"मार्गारीटा" बहुद्धा. चाची ४२० मध्ये ती छोटी कमल हसन कडे ते गाण ऐकण्याचा हट्ट करते.
त्याच गाण्याची दोन हिन्दी गाण्यासाठी चोरी झाली आहे.
एक "औजार" नावाचा चित्रपट.
त्यातल सल्लु आणि संजय कपुर ह्या (अ)अभिनेत्या जोडीवर चित्रीत झालेल "अरे बाबा अरे बा लडका दिवाना"
हे गाण. दुसर आठवत नाहिये.
रेहमानच होत ते "मुकाबला मुकाबला लैला"
आणि अक्षयच्या एका खिलाडी + अजुन काहितरी नाव ज्यात (अ)अभिनेत्री आहे ममता कुलकर्णी.
त्यातल एक गाण "मुकाबला मुकाबला होगा"
दोन्ही सेम. कुठल ओरिजिनल कुठल खोट???
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
25 Sep 2008 - 4:40 pm | विजुभाऊ
"मार्गारीटा"
नाही ते गाणे "ओ मा करेना"
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
25 Sep 2008 - 5:34 pm | झकासराव
ह्म्म.
ते मला लिहितानाच वाटल चुक असेल अस.
अहो इथे मला आजकाल हिन्दी गाणी नीट ऐकु येत नसतात तर हे इन्ग्रजी कुठल ऐकु येणार.
तुम्ही लिहिलेलच बरोबर असेल. धन्यवाद सांगितल्याबद्दल
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
25 Sep 2008 - 5:53 pm | घाटावरचे भट
'आओ ट्विस्ट करें' हे गाणं पूर्णपणे एका विंग्रजी गाण्यावर आधारित आहे...चबी चेकर हे त्या गायकाचे नाव. हा पाहा व्हिडीओ
तसंच पंचमदांचं शोले मधलं गाजलेलं गाणं 'मेहेबूबा ओ मेहेबूबा' हे सुद्धा असंच एका विदेशी गाण्यावरून उचललेलं आहे. हा पाहा त्याचा व्हिडीओ. वरिजिनल गाणं 'ता रियालिया', बहुधा तुर्की अथवा ग्रीक भाषेत आहे...जाणकारांनी अधिक खुलासा करावा
पंचमदांनी अशी अनेक विदेशी गाणी ढापलेली आहेत, परंतु अस्सल हिंदुस्थानी रागदारीवर आधारित त्यांच्या वरिजिनल गाण्यांनादेखील तोड नाही हेच खरे....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
25 Sep 2008 - 6:37 pm | अनिल हटेला
मराठी गाणे
अंधाराची रात ,धूंद बरसात .... साडे माडे तीन ..
मूळ गीत ....
दिलबरा ओ दिलबरा आपून की तु अपून तेरा .....धूम ~~~
हिमेश भाईच
या अली रहम अली...
मूळ अरबी गीत आहे ......तु नळी वर ऐकल होत एकदा.......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Sep 2008 - 8:45 pm | देवदत्त
छान...
Cotton Eye Joe -> किमत मधील कोई नही तेरे जैसा
'बाजी' मधील आमिर खानचे 'डोले डोले दिल डोले' हे व 'राजा' मधील 'नजरे मिली, दिल धडका' एकाच चालीवर. मूळ गाणे (इंग्रजी की इतर) कोणते माहित नाही. पण एकदा एक जुना (कृष्णधवल) सिनेमा पाहात होतो, बहुधा जॉय मुखर्जी चा, त्यात शेवटी एका हॉटेलात बँडवर हेच संगीत वाजताना ऐकले होते.
मला आठवणारी इतर गाणी लिहिनच. अर्थात itwofs.com न पाहता जेवढे जमेल तेवढे ;)
एखाद्या संगीतापासून किंवा गाण्यापासून प्रेरणा घेणे आणि एखादे संगीत खुल्लम्-खुल्ला चोरणे यात फरक आहे.
शंकर एहसान लॉय ह्यांनी असे काही न करता थेट Pretty Woman गाण्याचे हक्क विकत घेऊन 'कल हो ना हो' मध्ये 'मैने जिसे अभी अभी देखा है' गाणे बनविले. हा प्रकार विरळाच. :)
आणि चाली चोरणे हे फारच जुने आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. योगायोगाने आजच 'गाये चला जा' पुस्तक वाचत होतो. त्यात ओ. पी. नय्यर ह्यांनीही त्याची कबुली व उदाहरणे दिली आहेत. त्यावरूनच लोकगीतांवर बनविलेली गाणी ही उचलेगीरी नाही असे म्हणणे आहे.
25 Sep 2008 - 8:48 pm | देवदत्त
एक सांगायचे राहिले.
तुम्हालाही ए. आर. रहमान प्रमाणे संगीत बनवायचे असेल तर विंडोज च्या .wav फाईल वापरूनही करता येईल.
कसे ते इथे पहा ;)
25 Sep 2008 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> 'बाजी' मधील आमिर खानचे 'डोले डोले दिल डोले' हे व 'राजा' मधील 'नजरे मिली, दिल धडका' एकाच चालीवर.
ते गाणं Come September आहे.
25 Sep 2008 - 11:44 pm | भाग्यश्री
नींद चुराई मेरी(इष्क) - सेंडींग ऑल माय लव्ह..
एकंदरीतच खालची साईट पाहून किंवा लेखात दिलेली साईट पाहून कळतं किती गाणी ढापलीएत.. ओ पी नैय्यर्,आर.डी, सारख्या लोकांनीही प्रेरणा घेतली आहे! :( अज्ञानात सुख असतं ते हे..!
http://www.angelfire.com/music4/sangeet/copiedsongs.html
26 Sep 2008 - 2:51 am | टग्या (not verified)
जुन्या काळच्या चोर्यांबद्दल म्हणाल तर बनवाबनवी नव्हती म्हणण्यापेक्षा मूळचं चोरलेलं गाणं आपल्याकडे बहुतांशांना माहीत नसल्यामुळे मुळात चोरी झाली आहे हेच फारशा कोणाला लक्षात येत नसावं. आणि जुन्या काळचं (ढापलेलंसुद्धा) संगीत हे मधुर असण्याबद्दल म्हणाल, तर जे ढापायचं ते मधुर असलं तर ढापलेला मालसुद्धा मधुर होणार. नाहीतर आडात नाही ते पोहर्यात कुठून येईल?
जुन्या काळातल्या ढापलेल्या गाण्यांचं एक क्लासिक मराठी उदाहरण म्हणजे (आमच्या लहानपणी बर्यापैकी लोकप्रिय असलेलं) 'पप्पा सांगा कुणाचे'. मूळ गाण्याचे शब्द नक्की माहीत नाहीत, पण ढापलेलं आहे हे निश्चित, कारण धुन कधीतरी ऐकलेली आहे.
बाकी भारतीय भाषांमध्येसुद्धा अंतर्गत ढापाढापी ही सनातन असावी. पूर्वीच्या काळच्या 'ये रे घना येरे घना' किंवा 'डोलकर डोलकर' मधली 'वल्हव रे नाखवा'ची ओळ किंवा 'ओ सजना बरखा बहार आयी' पासून ते आजच्या (किंवा खरं तर मध्यंतरीच्या) 'नीले नीले अंबर पे' पर्यंत च्या धुना विविध भारतीय भाषांतून रीसायकल झालेल्या आहेत. नेमकं कोणी कोणापासून ढापलं सांगणं कठीण आहे.
26 Sep 2008 - 3:06 am | धनंजय
वा!
"इतना ना मुझसे तू प्यार बढा" गाण्यात सलिल चौधरी यांनी इतके काही बदल केले आहेत की मोत्झार्टच्या जी-मायनर सिंफनी (क्र.४०)ला स्वयंभू प्रतिभेसाठी स्फूर्तिस्थान म्हणता येईल.
26 Sep 2008 - 11:45 am | विजुभाऊ
अजून काही गाणी
चित्रपट मैने प्यार किया
गाणे " आते जाते ...हसते गाते ...मैने प्यार किया"
मूळ गाणे : आय जस्ट कॉल टू से आय लव्ह यू
गाणे " मेरे रंग मे रंगनेवाली परीयों की रानी"
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
26 Sep 2008 - 11:52 am | भाग्यश्री
विजुभौ, पहीलाच प्रतिसादात लिहीले की मी ते.. :)
वर दिलेला प्रतिसाद बेस्ट आहे पण! इतक्या सेम चाली आहेत? कधी विचार नाही केला..
26 Sep 2008 - 3:06 pm | विजुभाऊ
नुसरत फतेह अली खाना यांच्या
"दम मस्त कलंदर दम मस्त कलंदर" या भक्तीगीतावरुन
य वरुन "तू चीज बडी है मस्त मस्त" उचललय
नुसरत फतेह अली यांच्याच
"मेरा पिया घर आया " वरुन
मेरा पिया घर आया ( माधुरी या गाण्यावर नाचलीये)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
26 Sep 2008 - 4:23 pm | झकासराव
राज हिदुस्तानी मधल एक गाण जसच्या तस नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्यासारखच आहे.
विसरलो मी गाण्याचे शब्द.
बाय द वे विजु भाउ तुम्ही वरच्या एका प्रतिसादात उल्लेख केलेला चित्रपट संजय दत्त आणि पुजा भट चा सडक आहे.
(कधी कधी कैच्या कै लक्षात राहत राव. :))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
27 Sep 2008 - 3:38 am | भाग्यश्री
कितना प्यारा तुझे रबने बनाया(राजा हिंदुस्थानी) - किन्ना सोना तेनु रबने बनाया(नुसरत फतेह अली खान)
27 Sep 2008 - 5:09 pm | झकासराव
हा बरोब्बर भाग्यश्री.
तेच गाण.
पण ते ऑफिशियली घेतल की नाही ते माहीत नाही.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
27 Sep 2008 - 10:20 pm | देवदत्त
तसेच 'ऐसी भी क्या जल्दी है' सिनेमातही विवेक मुशरान व सृष्टी बहल वर चित्रित ह्याच चालीवर त्याच शब्दांचे गाणे आहे.
किन्ना सोना तुझे रबने बनाया.
26 Sep 2008 - 4:36 pm | विजुभाऊ
सी रामचंद्रानी संगीत दिलेल्या "बाजे पायल छम छम हो के बेकरार"
गाण्याची चाल "अरेबीयन नाईट्स " या म्युझीक रेकॉर्ड वरुन घेतली आहे.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
27 Sep 2008 - 5:20 am | केशवराव
' बाजे पायल छमछम . . . . ' हे गाणे जुन्या 'छलीया' मधले आहे. संगीत : कल्याणजी - आनंदजी.