नुकताच शाळेचा ब्लॉग वाचला... आणि एकदम शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मित्र-मैत्रीण आठवले, मैदान आठवलं, आपण केलेली मस्तीही आठवली. पण प्रकर्षाने आठवण आली, ती शिक्षकांची... आपल्या आवडत्या, चांगल्या शिक्षकांची आणि काही विनोदी शिक्षकांची सुद्धा.
आम्हाला पहिली ते चौथी पराडकर बाई वर्गशिक्षिका होत्या. आमच्या वर्गाला चित्रकला सोडून बाकी सगळे विषय त्याच शिकवायच्या. सगळ्यात कमी गृहपाठ देणा-या आणि सगळ्यात कमी मारणा-या या आमच्या लाडक्या बाई होत्या. चित्रकलेला इंदुलकर बाई होत्या. ब वर्गाला मोर्जे बाई होत्या. त्यांच्या हातात कायम पट्टी असायची. त्या अख्ख्या वर्गाला रोज पाच ओळी शुद्धलेखनाचा गृहपाठ द्यायच्या. वरच्या वर्गाच्या सावंत बाई आणि परूळेकर बाईंना त्यांच्या वर्गातल्या मुलांना चोपताना पाहिलं की आपण किती नशीबवान आहोत हे कळायचं. आमच्या बाई फक्त 'वर्गपाठ गृहपाठात करा' असं काहीतरी दैनंदिनीत लिहून द्यायच्या. मला गृहपाठ म्हणजे नेमकं काय हे तिसरीत कळलं. पराडकर बाई खूप कमी मारायच्या. मुलांना मारण्याच्या सुद्धा दोन पद्धती होत्या - धम्मक लाडू आणि चप्पट पोळी. म्हणजे हलका बुक्का किंवा चापटी... तेही फक्त पाठीवर... बाकी सगळ्या वर्गातल्या बाईंना मुलांना पट्टीने, डस्टरने, थोबाडीत, टपलीत मारतानासुद्धा आम्ही पाहिलं होत. कोणताही पालक कुठल्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाही. सगळे पालक 'खुशाल बदडा' असं म्हणायचे. माझ्या आईने तर पराडकर बाईंना, 'तुम्ही याला खूप कमी मारता हो' असं ब-याचदा म्हटलं होतं. पण एक होतं, या सगळ्या शिक्षिका, कितीका मारकुट्या असेनात, शिकवायला सगळ्या चांगल्या होत्या. आम्ही सगळ्यांनाच बाई म्हणायचो. प्राथमिक शाळेत कोणीही पुरुष शिक्षक नव्हता, नाही.
बाईंच्या मॅडम झाल्या, त्या पाचवीत गेल्यावर. तेव्हापासून प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक होते. 'सर' लोक सुद्धा आले. आणि एकूणच आनंदीआनंद सुरु झाला. आम्हाला गणिताला चं. ग. पाटील नावाचे शिक्षक आले. ते 'दोन' ला नेहमी 'दॉन' म्हणायचे. मराठीला माहिमकर मॅडम आल्या. नवीन होत्या. त्या शिकवायल्या चांगल्या होत्या. त्या मारकुट्या नव्हत्या, उगाच ओरडायच्या सुद्धा नाहीत. पण मी त्यांना खूप घाबरायचो. कारण त्यांना उल्लू बनवणं खूप कठीण होतं. माझी गणित आणि इंग्लिश सोडून कोणतीच वही कधीच पूर्ण नसायची. माहिमकर मॅडमना कोणतंही निमित्त द्या, त्या माझ्याकडे बघून अशा काही हसायच्या, की 'बेट्या, आता तुला भोपळा मिळालाच म्हणून समज.' पण चांगल्या होत्या. पाचवीत एकदा शाळेत साज-या होणा-या रक्षाबंधनाच्या दिवशी 'आता तुम्हाला हवं त्याला राखी बांधा.' असं त्या मुलींना म्हणाल्या. वर्गात चाळीसेक मुलगे होते. पण ब-याच मुली माझ्या एकट्याच्या दिशेने धाऊन आल्या. मी लाजेने लाल झालो होतो. तेव्हा कुणी मित्राने चिडवलं नसेल एवढं माहिमकर मॅडमनी चिडवलं होतं मला... फक्त नजरेतून. त्यामुळे मी जास्तच ओशाळलो होतो.
कोरिया सर सगळ्यांचेच फेव्हरेट. त्यांना सतत पँट वर ओढावी लागायची. त्यांचं पोट मोठं होतं. सरळ चष्म्यातून न बघता मान खाली झुकवून सगळ्या वर्गाकडे खुल्या डोळ्यांनी नजर फिरवायचे. विनोदी वाटायचं. बास!! एकवेळ बाकी सगळ्या शिक्षकांची हवी तेवढी खिल्ली उडवू शकतो पण कोरिया सरांबद्दल एका विद्यार्थ्याच्या नात्याने एवढंच वाईट बोलू शकतो. त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता, आहे. फक्त मलाच नाही, सगळ्यांनाच. आम्हाला ते पाचवी-सहावीत विज्ञानाला आणि सातवीत गणिताला होते. मुलांचे एकदम लाडके. त्यांनी कधीही पुस्तक उघडून विज्ञान शिकवलं नाही. बाकी सगळे शिक्षक धडा वाचून शिकवायचे. कोरिया सरांची स्टाईल वेगळीच होती. भन्नाट एकदम..!! पण ते पाचवी ते सातवीच्याच वर्गांना शिकवायचे. आठवी ते दहावी, आम्हाला सतत 'यार कोरिया सर आपल्याला असायला हवे होते यार' असं सारखं वाटायचं.
हिंदीला पाचवीत मगरे सर होते. एकतर त्यांचा आवाज कधी नीट ऐकूच आला नाही. त्यात ते मुलींमध्येच फिरायचे. त्यामुळे आम्हाला काहीच ऐकायला यायचं नाही. त्यांच्या गालावर गोलाकार खड्डा असल्याने वरच्या वर्गातली मुलं त्यांना 'गोळी' म्हणायची. आमच्या वर्गातल्या मुली चाप्टर होत्या. हातावर डस्टरवरची खडूची पूड मारून घ्यायच्या. मगरे त्यांच्यातून फिरायला लागले की त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पँटवर नेम धरून मुली हातावर फुंकर मारायच्या. तासाच्या शेवटी पँट पाठून पांढरी झालेली असायची. मगरेंना पत्ताच नाही. काहीजण शिक्षकाच्या खुर्चीवर डस्टर साफ करायचे. म्हणजे शिक्षक बसला की त्याच्या पाठी पांढरं लागेल. सहावीत हिंदीला गजभीये सर आले. आमच्याशी हिंदीत बोलायला लागले, 'युकी मै हिंदी का शिक्षक हु मै आपसे मराठी के बजाय ज्यादातर हिंदीमें बात करुंगा... आय विल ट्राय टू टॉक इन हिंदी' पहिल्याच दिवशी बोलण्यातला हा विरोधाभास जाणवल्याने, आणि गजभीये काय प्रकार आहे हे शाळेतून पास आऊट झालेल्या दादाने सांगितल्याने मी त्यांच्या तासाला बिनधास्त झोपा काढायला लागलो.
आम्हाला सातवीला मराठीला संखे बाई होत्या. त्यांनी पाचवीत आम्हाला भूगोल शिकवला होता. त्यांना पश्चिम नीट म्हणता येत नसे. पच्चीम म्हणायच्या. सातवीत संधी शिकवत असताना त्या 'संबंध' म्हणायच्या ऐवजी 'सबंध' म्हणायच्या. मला आगाऊपणा करुन शिक्षकांची चूक काढायची अशी आयती संधी मिळाल्यावर मी सोडायचो नाही.
'मॅडम सबंध की संबंध?? संबंध ना?'
'अरे हो त्याचं काय झालंय, मला सर्दी आहे ना म्हणून मला नीट उच्चार करता येत नाहीये.'
शिक्षकांच्या चुका काढायची खोड वर्गात ब-याच जणांना होती. त्यात अग्रेसर मी होतो. आठवीत सेमी-इंग्लिशच्या वर्गाला सायन्स शिकवायला चौधरी नावाची टेम्पररी शिक्षिका पाठवली होती. या बाईला जराही शिकवता यायचं नाही. शिकवता येणं सोडा, हिला सायन्स मधलं काही कळायचं सुद्धा नाही. मी आणि वर्गातली अजून दोन-चार मुलं मुद्दामून या ना त्या फाल्तू शंका तिला विचारायचो. तिच्या तोंडावरूनच हिला त्यांचं उत्तर येत नाहीये, हे कळायचं. मग, 'कोण सांगेल, याचं उत्तर?' वर्गात शांतता. मग ती एक दोन हुशार पोरांना उठवायची. त्यांना उत्तर माहित असूनसुद्धा ते बोलायचे नाहीत. 'कोणालाच नाही येत? ठीक आहे. तुम्हाला हा होमवर्क आहे. याचं उत्तर शोधून आणा. नाहीच जमलं, तर मी उद्या सांगेन.' दुस-या दिवशी पुन्हा तीच शंका विचारायच्या फंदात आम्ही पडायचो नाही, आमच्याकडे नवीन शंका असायच्या. सेमी इंग्लिशचं पहिलंच वर्ष असल्याने सायन्स मधले बरेच इंग्रजी शब्द अडायचे. मुलं क्लासला जायची, तिथल्या शिक्षकांनी सांगितलेले अर्थ शब्दापुढे पेन्सिलने लिहून ठेवायची. बाजुच्या मित्राचं पुस्तक घेऊन मी असे बरेच शब्द तिला सारखा विचारायचो. तिने कधीही योग्य अर्थ सांगितल्याचं आठवत नाही. एकदा मी तिला jaggery चा अर्थ विचारला. तिने खूप मोठ्ठा पॉज घेतला, एकदा पुस्तकात, मग माझ्याकडे असं बघत राहिली. शेवटी म्हणाली, 'आर्द्रता'!! मी उडालोच. गायी-गुरांना जे आंबोणं खायला देतात त्यात jaggery म्हणजे आर्द्रता मिक्स करतात असा त्या वाक्याचा अर्थ होत होता!!! एखादी शिक्षिका खुशाल एवढी मोठ्ठी थाप कशी काय मारू शकते या विचाराने मी तसाच तिच्याकडे बघत उभा राहिलो. हसू दाबून मी खाली बसलो. मग तिची तक्रार केली. काही दिवसांनी आमच्या वर्गाला शिकवत असताना तिचं पर्यवेक्षण झालं. तेव्हा कधी नव्हे ते तिने इंग्रजीत शिकवायला सुरुवात केली. एरव्ही मराठीतच बोलायची. फळ्यावर तिने चक्क नोट्स काढल्या. (अर्धी स्पेलिंग्स चुकलेली होती. मला तिची चूक सुधारायची खूप इच्छा होत होती. पण 'आज हिची लायकी दाखवायला आपल्या आगाऊपणाची गरज नाही' हे मला कळलं होतं म्हणून मी गप्प बसून राहिलो. बाकी सगळ्यांनीही असाच विचार केला असावा. लौकरच चौधरीला काढून टाकलं आणि आम्हाला पाटील मॅडम शिकवायला आल्या. त्या मस्तच शिकवतात.
आठवी ते दहावी आम्हाला मराठीला वनमाळी मॅडम होत्या. खूप चांगल्या होत्या. त्यांचा तास म्हणजे किर्तनाची वेळ असायची. कारण त्या त्याच सुरात बोलायच्या, शिकवायच्या. 'गोकुळ'चा धडा शिकवताना सुद्धा 'विनोद केला इथं लेखकानं' असं म्हणून त्या विनोदाची मजा घालवून टाकायच्या. त्यामुळे मुलं त्यांच्या किर्तनात तल्लीन होऊन बसल्या जागी डुलक्या काढायची. मला बसल्याबसल्या मान अधांतरी लटकावून झोपता येत नाही, त्यामुळे मी बेंचवर डोकं ठेऊन झोपायला जायचो. पण मॅडमचं बरोब्बर लक्ष असायचं. त्या मी बेंचवर डोकं टेकल्या टेकल्या मला उठवायच्या. एकतर खिडकीतून येणारा प्रकाश त्यांच्या चष्म्यावर पडायचा त्यामुळे त्या कोणत्या वेळी कुठे बघतायत हे कळायचं नाही. त्यामुळे त्यांना चकवून दुसरा काहीतरी टाईमपास करणं खूप अवघड होतं.
कॉलेजचे शिक्षक तर बापरे बाप!! अकरावीत व्हनमराठे म्हणून अकाऊंट्स शिकवायला आले होते. आम्ही मराठी वर्गातले असल्याने अडचण नव्हती पण हिंदीच्या वर्गालासुद्धा ते अकाऊंट्स आणि ओसी मराठीतूनच शिकवायचे. मराठीला सोलंकुरकर मॅडम होत्या. शिकवायल्या चांगल्या होत्या. पण पहिल्या बेंचवर बसूनसुद्धा त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कान टवकारावे लागायचे. सगळ्यात कहर म्हणजे मॅथ्स १ ला आलेला काकडे हा महापुरुष!! त्याच्या तासाला आम्ही त्याच्या तोंडावर सटकायचो. १२० मुलांच्या वर्गात त्याच्या तासाला मोजून ६ मुली बसायच्या. आम्ही मुद्दामून तो येईपर्यंत बसून राहायचो आणि तो आला की बेंच वाजवून, शिट्या मारून गोंधळ करायचो. आमचा सहा-सात मुलांचा ग्रुप होता. आम्ही मस्ती करायला लागलो, की तो ओरडायचा, 'ऑल मेल बॉय्ज, गेट आऊट ऑफ द क्लास' आता फिमेल बॉय्ज आम्ही तरी कधी पाहिले नव्हते. आम्ही मोठ्याने हसत हसत 'बाय सर' असं म्हणत निघून जायचो.
शाळा-कॉलेजचे दिवस जसे मित्र-मैत्रीण, कँटीन, मैदान, सँडविच, गोळेवाला ही मंडळी विसरू देत नाहीत, तसेच शिक्षकही शाळा कॉलेज मुलांच्या लक्षात ठेवायला कळत-नकळत हातभार लावतात. काहीजणांचा आदर वाटतो म्हणून, काहीजणांची गम्मत वाटते म्हणून... पण आपल्याला घडवण्यात आज कोणीही कितीही नाकारलं तरी त्यांचा मोठा वाटा असतोच... त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम!!
प्रतिक्रिया
30 Nov 2013 - 11:58 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहे! :)
30 Nov 2013 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतकं सगळं शिक्षकांच्या नावासकट लक्षात ठेवल्याबद्दल __/\__
30 Nov 2013 - 12:56 pm | मृत्युन्जय
मस्त जमला आहे लेख. झक्कासच. शाळेच्या खुप आठवणी जाग्या झाल्या.
आमच्या राजे मॅडम "च्यायला" असे काही झोकात म्हणायच्या आहे की ती शिवी आहे असे कधी वाटलेच नाही. शिकवायच्या देखील सुंदर. त्यांच्या आख्ख्या कारकीर्दीत गणित शिकवण्यासाठी त्यांना माझ्याएवढा माठ विद्यार्थी सापडला नसावा.
११-१२ वी तले नगरकर सर सुद्धा असेच लक्षात राहिलेत. शिकवायचे चांगलेच. पण मूळ लक्षात राहिले ते त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे. वर्गातल्या अटेंडन्स बद्दल ते नेहमी म्हणायचे "बसलात तर उत्तम, नाही बसलात तर अतिउत्तम" :).
सुदैवाने मराठीच्या शिक्षिका नेहमी चांगल्याच होत्या. घोरपडे बाई, अवचट बाई, काळे बाई.
चौथीत असताना एक मारकुटे दामले बाई होत्या. सगळ्यांना मारायच्या. "माझी शेवटची दोने वर्षे राहिली आहेत. त्यामुळे मी मुलांना मारणारच" असा काहीसा अजिबात युक्तिवाद होता त्यांचा. एकदा वर्गातला एक मुलगा एका विषयात नापास झाला तर इतर सगळ्यांना त्यांनी त्या मुलावर हसायला सांगितले. प्रचंड राग आला मला त्यांचा.
30 Nov 2013 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळ बदलला आहे हेच खरे, असे म्हणावेसे वाटते.
ह्या ओळीच्या वरच्या ७५ ते ८० ओळींचा भार, ही ओळ पेलू शकत नाहीए असं जाणवलं
30 Nov 2013 - 5:17 pm | पैसा
लेख आवडला.
30 Nov 2013 - 5:41 pm | सुहास..
ओके ओके !!
सरांच्या / मॅडमस च्या आठवणी भरपूर आहे ..मुळात कॉमर्स करताना लेक्चर्स कोण अटेन्ड करत ?? उत्तर असेल ' गरजच नाही " क्लास लावायचा अकाऊन्ट चा आणि बाकी सगळी रट्टेबाजी ..मी अकरावी पासुन नेस ला होतो .....५ वर्षे क्लास लावला नाही, त्याला कारण होत दंडवते सर !! विषय शिकवायचा हातखंडा असा होता की अकाउटसी सारखा किचकट विषय सोप्पा वाटायचा .. त्यांच एकही लेक्चर बुडविले नाही ...मीच काय कोणीच नाही बुडविले ....कुठला देव पावला होता काय माहीत मला ? फायनल ला कॉलेजमध्ये टॉपर होतो ...पुढे चालुन एफ.टी. च्या एन्टरन्स क्लियर करे पर्यंत ही वॉज विथ अस ......नगर रोड ला अपघातात गेले ...माझ्यासकट अर्ध नेस वाडिया होत अंत्य सस्काराला ...माणुस जगला उणीपुरी ४२ वर्षे ...पण लाईक अ किंग !! .... खुप मोठ्या प्रॉपर्टीचे मालक होते ...सध्या औ.बाद जी एम.आय. डि.सी. आहे , त्त्यातली ६० % जागा ह्यांची होती ...एकुलता एक मुलगा ..आयुष्यभर बसुन खाल्ल असते........खुप रिच माणुस ...पण पेशा म्हणुन शिक्षकी स्विकारलेली.....त्यांच्याकडे जावा होती ...मॉडिफाय केलेली ...त्या काळी हा माणुस बाईकवर दर आठवड्याला पुणे ते औ.बाद पर्यंत बईकवर जायचा.. ...कपड्यांपासुन ते शुज पर्यंत सगळ रिच असायचे ....त्यांनी कधी प्रायव्हेट क्लास सुरु केला नाही ...त्यांच ते वाक्य शेवटपर्यंत आठवणीत रहाणार ( अर्थात ते वाक्य आहे लिंकनच !, पण त्याचा अर्थ नीट त्यांनी सांगीतला होता. )..
If something goes wrong Have abilty to take action, and take responsibility to take action !!!
30 Nov 2013 - 6:18 pm | परिंदा
तु विद्यामंदीरकर आहेस?
मागे काही पोस्ट वाचुन तु दहिसरचा आहेस हे कळले होते. पण विद्यामंदीर सेमी इंग्लिश वाचुन आश्चर्याचा(सुखद) धक्का बसलाय.
कोणती बॅच?
1 Dec 2013 - 9:10 am | ज्ञानव
वनमाळी बाई मुलांना संबोधून "बादशा" (बादशहा नाही)आणि मुलींना "भवाने किंवा महाराणी" म्हणायच्या
वाघ सर गप्पा मारणाऱ्या किंवा मस्ती करणार्यांना "गर्दी करतोस? गर्दी करतोस?" असे ओरडून म्हणायचे आणि मला कळायचे नाही की सगळे व्यवस्थित सुट्टे सुट्टे बसले आहेत आणि गर्दी करतोस काय?
पण एक जोशी सर होते हे फक्त जुन्या १९८३ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आठवत असतील ते काय शिकवत आठवत नाही कारण ऑफ पिरियडला ते आम्हाला गोष्ट सांगायला येत असत पण त्यांनी विनोद आणि कारुण्याचा तोल सांभाळत मुलांना हसवत थोडे डोळे ओले करत सांगितलेल्या बर्याच गोष्टी आजही आठवत असतात. मंत्रमुग्ध म्हणजे काय ते त्यावेळी काळत नसे पण आता त्या भावनेचा अर्थ कळतो.
शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे बाई "नमस्ते" इतक्या सुरात म्हणायच्या की सकाळ सुरेल व्हायची.
उपमुख्याध्यापिका तावडे बाई माझ्या आईच्या क्लासमेट त्यामुळे माझ्याकडे विशेष लक्ष. आई आणि त्या बाजारात भाजी घेताना भेटल्या हे मला दुसर्यादिवशी कळायचे कारण माझा एकट्याचाच सर्व विषयांचा क्लास सर्वांसमोर व्हायचा आणि.... (पण देशमुख आणि तावडेबाई ह्यांच्यामुळे मला इंग्रजीची गोडी लागली आणि आज मुलांना इंग्रजीचे व्याकरण समजावताना खूप आठवण येते त्यांची )
माझी बहिण (अनिता ठाकूर) हिने अभ्यासात,वक्तृत्वात, शुद्ध लेखनात भरपूर बक्षिसे घेऊन तेव्हा शाळेचे नाव मोठे केले (अकरावी MATRICK ) तसेच दादा (प्रभाकर पेठकर) ह्याने नाटक, स्नेहसंमेलने ह्या मध्ये भरपूर बक्षिसे (तीही पहिल्या क्रमांकाची)मिळवली त्या मुले साहजिकच त्यांच्या काळातल्या शिक्षकांना मीही काही करीन असे वाटले होते पण मी शाळेत खूपच दडपणात (इथे एक स्वतंत्र धागा उघडेल तेव्हा का दडपण ते जाऊ देत), लाजून, कुणाशी न बोलता, शाळा ते घर इतकाच मर्यादित राहिलो.
पण मला गोळेबाई, तावडेबाई, देशमुखबाई,(कोरिया नवीन होते तेव्हा हस्तकला शिकवत असत आणि एक्स्ट्रा क्लास मध्ये गणित (एक्स्ट्रा क्लासेस मोफत घेतले जात),मालपाणी सर विज्ञान (कडक माणूस)शिंदे सर पी टी (प्रचंड भीती वाटायची पण तितकेच प्रेमळ)हे सर्वजण आठवतात.
शिक्षक ह्या शब्दाला जगणाऱ्या पिढीचा अस्त आणि व्यवहारी शिक्षकांच्या पिढीचा उदय(?)जवळून पाहणाऱ्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. ण चा न झाला आणि "आमचा णाणा म्हणजे दिसायला अगदी ब्राम्हनच" असे म्हणणारे शिक्षक पहिले की वाटते खरच तुम्हाला घडवणाऱ्यात आता शिक्षकांचा सहभाग आहे?
बाकी शालेय जीवनातले शिक्षक वगळता जीवनात येणारे आणि आलेले जे काही शिकवतात त्याने स्वतःला घडवण्याचा प्रयत्न अजून सुरु आहेच.....
1 Dec 2013 - 12:19 pm | एम.जी.
सद्ध्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे मला नववीला वर्गशिक्षक होते [ नूमवि..पुणे].
मी आणि माझ्या शेजारी धन्या गोडबोले बसायचा. आमच्या नशिबी एक जुनाट बाकडे आले होते. बसायची फळी तुटलेली.. त्याची कुसळं नको तिथे बोचायची. लिहायच्यी फळेसुद्धा आधीच्या वर्षीच्या मुलांनी कोरीवकाम करून वाट लावलेली. त्यामुळे अभ्यंकरांच्या कृपेने आम्हाला णवीन बाकडे मिळाले.
शाळेचा शिपाई नवीन बाकडे घेऊन येताना दिसला. मी आणि धन्या... आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही लगेच नेहेमीचा गणपतीतला नृत्यप्रकार चालू केला.म ते नेमके शंकररावांनी बघितले आणि आम्हाला दोघांना भूतो ना भविष्यती बडवले. पाठीत गुद्दा घालायचे.. मग आम्ही वाकलो की गुढगा हाणायचे...
आजही शंकर अभ्यंकर दिसले की डोक्यात जातात...विद्यावाचस्पती असतील तर घरचे...
1 Dec 2013 - 2:51 pm | शैलेन्द्र
प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला :) :)