सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.
सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only. WEB 2.0 च्या तांत्रिक क्रांतीतून निव्वळ वाचनाचा आनंद न घेता आता इंटरनेटवर लिहिताही येऊ लागले. 'ब्लॉग' नावाचे माध्यम तमाम लिखाळ लोकांना उपलब्ध झाले आणि इंटरनेटवर माहितीचा पूर येऊ लागला. त्यात 'Wikipedia' आणि 'Google Search' ह्या सर्वात मोठ्या अलीबाबाच्या गुहा ठरल्या. 'अनंत हस्ते इंटरनेट देता, किती घेशील दोन कराने' अशी अवस्था झाली. अनेक विचारवंत आणि हौशी लेखक 'Wikipedia' आणि 'Google' च्या मदतीने माहितीचे संकलन करून लिखाण करू लागले. बर्याच जणांनी त्यात कौशल्य मिळवून यश प्राप्त केले. बऱ्याच जणांची पुस्तकेही प्रकाशित झाली. खास करून मराठी भाषेतल्या मराठी संस्थळांवर चांगले लेखन मराठी भाषेत उपलब्ध होऊ लागले. इंटरनेट ह्या माध्यमातही 'मराठी पाऊल पडते पुढे' अशी परिस्थिती निर्माण झाली.
पण एक माशी शिंकली. ह्या यशस्वी झालेल्यांना 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' असे हिणवले जाऊ लागले. माहिती आणि त्यावर आधारित ज्ञान हे त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावे? ह्या प्रश्नाचे उत्तर न देताच हिणकस शेऱ्यांनी त्या लेखनकर्त्यांची खिल्ली उडवली जाण्यात धन्यता मानली जाऊ लागले. 'सोशल नेटवर्किंग' ह्या इंटरनेटच्या दुसऱ्या अपत्याच्या माध्यमातून आपले कंपू तयार करून त्या लेखनकर्त्यांविषयी चकाट्या पिटल्या जाऊ लागल्या. आजतागायत हे प्रकार चालले आहे. पण 'माहिती आणि त्यावर आधारित मांडल्या गेलेल्या ज्ञानाचा दर्जा हा त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावा?' ह्या प्रश्नावर ह्या खिल्ली उडवणाऱ्यांनी कधीही विचार केला नाही.
ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka). अमेरिकेतील मेरीलॅंड राज्यातील क्राउन्सविले येथील एका शाळेत शिकणारा 15 वर्षाचा शाळकरी मुलगा. ह्याने 15 व्या वर्षीच संशोधन करून स्वादुपिंड (pancreatic), अंडकोष (ovarian) आणि फुफ्फुस (lung) यांच्या कॅन्सर शरीराला लागण झाली आहे का ह्याचे निदान करणाऱ्या तपासणीची एक कमी खर्चिक पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीत डिपस्टीक पद्धतीचा एक 'सेंसर पेपर' (लिटमस पेपर सारखा) त्याने शोधला आहे. हा पेपर कॅन्सरचा प्रादुर्भाव दर्शविणारी, रक्तात किंवा लघवीत असणारी प्रथिने शोधतो आणि अगदी लवकरच्या स्टेजवर कॅन्सरचे निदान होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.
जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka)
शाळेत असल्यापासूनच विज्ञानात रस असलेला हा धडपड्या जॅक नववीत असताना त्याचा एक अतिशय जवळचा नातेवाईक स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान लवकर न झाल्यामुळे दगावला आणि जॅकचे आयुष्य त्याने बदलून गेले. त्याने ह्यावर 'निदान तपासणी' शोधायचा मनाशी निर्धार केला. शाळेत जीवशात्रात त्याला 'प्रतिजैवके' आणि 'कार्बन नॅनोट्यूब्जचा तपासणीच्या पद्धतींमध्ये वापर' ह्या विषयांची तोंडओळख झाली होती. त्यांचा वापर करून स्वस्तातली निदान पद्धती शोधता येऊ शकेल असे त्याला तेव्हा वाटले. शाळेतल्या लायब्ररीत जाऊन त्याने पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. पण शाळेतल्या लायब्ररीतल्या पुस्तकांच्याही पुढची माहिती आणि ज्ञान त्याला त्यासाठी हवे होते.
ते त्याने कसे मिळवले? त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याने "a teenager's two best friends: Google and Wikipedia" यांचा वापर करून त्याला हवी असलेली माहिती मिळवली. त्याच्या आधारे त्याचा 'संशोधन प्रकल्प' सुरू करून तो Intel International Science and Engineering Fair मध्ये सादर केला आणि त्याबद्दल पारितोषिक मिळवले. त्यानंतर केंब्रिज ऑक्सफर्ड हार्वर्ड ह्या सारखी विद्यापीठे त्याला अॅडमिशन द्यायला पायघड्या घालून तयार आहेत.
आतापर्यंत करोडो डॉलर्स, अत्याधुनिक लॅब्ज मध्ये संशोधनासाठी खर्च करून जे जमले नव्हते ते ह्या लहानग्या जॅकने एका छोट्या आणि साध्या प्रयोगशाळेत साध्य करून दाखवले. त्यासाठी त्याने 'विकिपीडिया' आणि 'गूगल' ह्यांचा सढळ हाताने उपयोग केला आणि त्याच्या मुलाखतींमध्ये तसे सांगायलाही तो विसरत नाही.
तर, 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' अशी हेटाळणी करणाऱ्यांनी आता ह्यातून बोध घ्यावा आणि माहिती ही माहिती असते आणि योग्य प्रकारे वापरल्यास त्यातून मानवजातीवर उपकारच होतात हे समजून घ्यावे.
प्रतिक्रिया
21 Oct 2013 - 3:41 pm | चौकटराजा
माणसाने लावलेला सर्वात महत्वाचा शोध म्हणून सर्वात जास्त मते "वीज" या विषयाला मिळतील. दुसरा क्र. संगणकाचा न
लागता माहिती जालाचा लागेल व फारतर तिसरा संगणकाचा. पहा पटतं का !
21 Oct 2013 - 3:46 pm | मुक्त विहारि
एकीकडे गवि आणि एकीकडे सोत्री....
आज तो मजा आयेगा...
बाकी
मुद्दाम गहन विचार करुन ट्रोलिंग करणार्यांपेक्षा हे 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' घंटा पटीने उत्तम...
21 Oct 2013 - 3:48 pm | धन्या
मराठीत सर्वच विषयांवर लिहिणार्या एका आवृती जायंट लेखकाची आठवण झाली. :)
21 Oct 2013 - 8:26 pm | प्रचेतस
=))
लैच गोडबोले लेखक रे.
21 Oct 2013 - 10:29 pm | धर्मराजमुटके
नव्हे, जे कोणत्याही टीकेने आपल्या धेय्यापासून च्यूत होत नाहित असे लेखक.
21 Oct 2013 - 11:42 pm | बॅटमॅन
च्यूत नव्हे साहेब च्युत. दोहोंत फरक न केल्याने अनेकांना अच्युत हे नावही अश्लील वाटायचे.
21 Oct 2013 - 11:46 pm | धर्मराजमुटके
नाही हो !
मुळ मालकांच्या परवानगीने आम्ही सुद्धलेखनाला / व्याकरणाला फाट्यावर मारायला शिकलो आहोत.
22 Oct 2013 - 12:32 am | बॅटमॅन
हॅ हॅ हॅ. मोकलाया वाचून अन वरील प्रतिसाद वाचूनही असेच मत असेल तर असूदे बापडे.
21 Oct 2013 - 10:36 pm | मुक्त विहारि
एक अज्ञानी बालक..
जमल्यास व्यनी करा...
21 Oct 2013 - 10:39 pm | धर्मराजमुटके
जाऊ द्या ना ! अज्ञानातच सुख असते.
21 Oct 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि
आता खुद्द धर्मराजांची आज्ञा म्हणजे, पाळणे आलेच
26 Oct 2013 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले
काहीही म्हणा पण त्यांची मनात आणि अर्थात ही २ जबरदस्त पुस्तके आहेत ... ( लहानपणी मला उत्तर हवय ( बहुतेक निरंजन घाटे ) अशा नावाची पुस्तक वाचायचो अन काहीतरी शिकावे अशी प्रेरणा मिळायची त्या पुस्तकांनंतर मोटीव्हेट करणारी मराठीतली पुस्तके हीच !!)
26 Oct 2013 - 11:18 pm | मुक्त विहारि
मग इतर .....
वर्षातून ३/४ वेळातरी बोर्डरूम वाचणे होतेच होते....
21 Oct 2013 - 3:55 pm | कवितानागेश
आवडला लेख. :)
21 Oct 2013 - 4:24 pm | मदनबाण
लेखन आवडले. :)
21 Oct 2013 - 4:51 pm | स्पंदना
मस्त माहीती सोत्रीजी.
21 Oct 2013 - 6:41 pm | विजुभाऊ
सोत्रीजी जालावरील एका इतिहास तज्ञ विदुषींची आठवण झाली
21 Oct 2013 - 8:17 pm | पाषाणभेद
सोत्रीजी कशाचीतरी आठवण झाली.
21 Oct 2013 - 8:25 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला!
22 Oct 2013 - 11:06 am | चतुरंग
भन्नाट आहे पोरगा.
22 Oct 2013 - 11:43 am | प्रसाद१९७१
काही कोटी लोकां मधले हे एक उदाहरण. त्याच्यावरुन काही निष्कर्ष काढू नका.
जॅक ऍन्ड्राका चे विकि किंवा गूगल नसते तर काही अडले नसते, त्याला ध्यास होता आणि त्यामुळे त्याने ही माहीती पुस्तकातुन शोधुन काढली च असती.
बाकीच्या गूगल/ वीकी पंडीतांना हे लागू होत नाही.
बील गेटस ने कॉलेज सोडुन दिले म्हणजे सर्व कॉलेज सोडणारी किंवा कॉलेजातुन काढली जाणारी मुले बिल गेटस होत नाहीत.
22 Oct 2013 - 11:59 am | सोत्रि
परफेक्ट!
काहीही करु नका! 'ठेविले अनंते तैसेची रहावे',शोल्लीट!
- (भारावलेला) सोकाजी
22 Oct 2013 - 2:20 pm | अग्निकोल्हा
जॅक तुसी ग्रेट हो...!
नोबेल द्या त्याला.
22 Oct 2013 - 2:27 pm | मुक्त विहारि
हा प्रश्र्न विचाराधीन आहे.
"सध्या मिपावर धागा आहेच.हे त्याला नोबेल पेक्षा पण जास्त आनंददाई असेल..."
असे माझे मत आहे...
23 Oct 2013 - 7:36 am | मन१
पोरगं भारिये!
23 Oct 2013 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला.
अजून येऊ द्या असेच.
-दिलीप बिरुटे
25 Oct 2013 - 7:16 pm | पैसा
हजार तर्हांची माहिती उपलब्ध असतेच. तिचा कसा वापर करायचा आणि किती विश्वास कशावर ठेवायचा हे वपरणार्यावर अवलंबून असते. त्या पोराची शाबास!
25 Oct 2013 - 8:03 pm | आनंदी गोपाळ
पुस्तकांत छापलेलेच ऑथेंटिक अन करेक्ट ज्ञान, अशी आयडिया पचायला जरा कठीण आहे.
आजकाल अनेक पिअर रिव्ह्यूड संशोधने जालावर उपलब्ध आहेत, गूगलून सापडतात.
अनेक मूळ लेख सरळ जालावरच प्रकाशित केले जातात.
तेव्हा पांडित्यासाठी पुस्तकांवरच विश्वास ठेवायचा, तर ससून समोर एक पुस्तकांच्या टपर्यांची रांग पूर्वी असे, त्याची आठवण झाली ;)