स्मृतीगंध-९ " शुभमंगल"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
20 Mar 2009 - 12:25 pm

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
स्मृतीगंध-७
स्मृतीगंध-८

काही दिवसांनी अण्णाने वत्सुसाठी एक स्थळ आणले. गायवाडीतल्या मुळ्यांचा मुलगा लग्नाचा होता. मी पत्रिका घेऊन त्यांचेकडे गेलो. त्यांनी सर्व चौकशी केली. कोण? मूळचे कुठले? राहता कुठे? घरी कोण कोण असते ? इ. इ. आणि २ दिवसांनी परत येण्यास सांगितले.मी परत २ दिवसांनी त्यांचेकडे गेलो. त्या दिवशी शनिवार होता. घरात मुलगा व वडिल दोघेही होते. पत्रिका जमत असून मुलीस दाखवावयास केव्हा येता? असे त्यांनी विचारले. डोंबिवलीचा पत्ता मी देऊ लागलो असता त्यांनी गिरगावातच येण्यास सुचवले. अण्णाकडे मांगलवाडीतल्या घरी दुसर्‍या दिवशी पहायचा कार्यक्रम ठरला. घरी डोंबिवलीला येऊन तसे वहिनीस सांगितले आणि दुसर्‍या दिवशी दुपारी वत्सुला घेऊन अण्णाकडे गेलो. सौ. वहिनींनी चहापोहे इ. ची तयारी ठेवली होती. रीतीप्रमाणे पाहण्याचा कार्यक्रम झाला. अण्णावैनीलाही मुलगा चांगला वाटला. २ दिवसांनी मुळ्यांचा, मुलीला घेऊन ठाण्याला साधल्यांकडे म्हणजे त्यांच्या मुलीकडे या असा अण्णाकडे निरोप आला. त्याप्रमाणे साधल्यांकडे वत्सुला घेऊन मामा आणि मी गेलो. तेथे परत एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही डोंबिवलीला घरी परतलो. पुढे मुळ्यांचा अण्णाकडे मुलगी पसंत असल्याचा निरोप आला.परंतु एकच मुलगा,त्याचे लग्न व्यवस्थित हुंडा देऊन,मानपान करुन थाटात करुन द्यावे अशी त्यांची इच्छा होती. अण्णा, मी, मामा असे बैठकीसाठी त्यांचेकडे निघालो असता मुळ्यांच्या मुलीचा चुलत दीर म्हणजेच झावबाच्या वाडीत राहणारे साधले भेटले. २०००रु हुंडा,मानपान आणि लग्न करुन देणार असलात तर बैठकीला या असे त्यांच्याकडून ऐकताच आम्ही परत आलो. आमचेकडे २०००रु तर नव्हतेच, शिवाय मानपान आणि लग्नाचा खर्च हे सारे आवाक्याबाहेरचे वाटत होते. ही गोष्ट साधल्यांनी दादा मुळ्यांच्या कानावर घातली. हे लग्न काही जमत नाही असे आम्ही समजून चाललो.

आमची आतेबहिण आणि मुळे यांचे काही नाते होते. दादा तिच्याकडे गेले असता मुलगी पसंत आहे पण हा एकटाच मुलगा .. तेव्हा त्याचे लग्न थाटात,व्यवस्थित व्हायला हवे असे बोलले. तिने ऐकून घेतल्यावर वत्सुसाठीचेच हे स्थळ असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दादा मुळ्यांना जरा टोकलेच," पैसा ,हुंडा काय करत बसला आहात? गरिबी-श्रीमंती काय कोणाच्या हातात आहे का? भरल्या घरात,३ भावात वाढलेली मुलगी आहे, तिला सर्व घरकाम येते. तुम्ही बापलेक दोघेच घरात, श्रीमंताघरची लाडाची लेक आणलीत तर पोळ्या करून घालेल का तुम्हाला? ही मुलगी संसार चांगला करेल. आता सांगते,माझी मामेबहिणच आहे ती. माझा मामा खूप लवकर गेला म्हणून त्यांची आज परिस्थिती गरिबीची आहे. पण स्वाभिमानी मुले आहेत. काबाडकष्ट करुन,शिकून मार्गाला लागत आहेत. त्यांच्यापाशी हुंड्यासाठी अडून बसू नका." दादा मुळ्यांनी तिचे म्हणणे ऐकले आणि एक दिवस अण्णाकडे त्यांचा लग्न ठरवायला ते तयार असल्याचा निरोप आला. ५००रु. हुंडा आणि नवर्‍यामुलाच्या पोषाखाचे ५००रु अधिक दोन्ही अंगचे लग्न करून द्या ह्या त्यांच्या म्हणण्यावर अण्णा तयार झाला. मी बँकेतून कर्ज काढले. चित्त्पावन ब्राह्मण संघाच्या हॉलमध्ये लग्न करण्याचे ठरले. व्याहीभोजनासाठी मुळ्यांनी आम्हाला बोलावले असता अण्णावहिनीचाही मान केला तेव्हा सौ. वहिनीने आपणास दिलेले पातळ आईचा मान म्हणून तिला देण्यासाठी मजजवळ दिले परंतु तो वहिनीचाच मान असल्यामुळे मी ते तिच्याकडेच राहू दिले. अण्णावहिनीनेच पुढाकार घेऊन, आपल्याजवळचे पैसेसुध्दा खर्च करून लग्न लावले.कन्यादानही अण्णावैनीनेच केले. ती. आई आणि गंभा. वहिनीला ह्या लग्नाने समाधान वाटले.पुढे हेच दादा मुळे आमच्याकडे ४,४ दिवस मुक्कामाला येत असत आणि आनंदात राहत असत. हुंड्यासाठी अडून बसलेले दादा मुळे हेच का? असा आम्हाला प्रश्न पडत असे.

वत्सुचे लग्न झाले आणि एक मोठी जबाबदारी पार पडल्यासारखे वाटले. वहिनी डोंबिवलीतच असल्याने आमच्या तिघांच्याही जेवणाखाणाचा प्रश्न सुटला होता पण आता अण्णा वैनी माझ्या लग्नाचे मागे लागले. लोकही विचारत होते. मुली सांगून येत होत्या. पत्रिका द्यायला कोणी आले की आमच्या वहिनीचा पहिला प्रश्न असे मुलगी नोकरी करणारी आहे का? जरा अजून स्थिरस्थावर झाले की मग लग्न करु हे माझे मत अण्णावैनीला पटत नसे. योग्य वेळी सारे व्हायला हवे , एकदा वय वाढले की मग चांगल्या मुली सांगून येणार नाहीत, असे ते दोघे म्हणत.आमची वहिनी पण त्या दोघांची री ओढे. माझ्या मनात मात्र इच्छा होती, लग्नाआधी आपले स्वत:चे घर व्हावे. अण्णाने वत्सुच्या लग्नात खर्च केला होता. सवडी सवडीने मी अण्णाला विचारुन त्याचे पैसे दिले तसेच मी मुंबईत आल्यावर अण्णांनी माझा खानावळीचा व इतरही खर्च केला होता. तो मी वेळोवेळी लिहून ठेवला होता.ते ८००रु झाले होते. मी ते पैसे द्यायला अण्णाकडे गेलो तेव्हा तो घरात नव्हता,वहिनीजवळ पैसे देऊ लागलो. वहिनी पैसे घेईना. अण्णाला हे पैसे दे असे सांगून मी घरी परत गेलो. पुढे ४ दिवसांनी अण्णाची ,माझी गाठ पडली असता अण्णाने मी कसले पैसे दिले? असे विचारले. माझ्याजवळचा हिशोबाचा कागद मी त्यास दाखवल्यावर अण्णा म्हणाला, "यशवंता,नानासाठीही मी वेळोवेळी खर्च केला पण एकानेही त्याबद्दल कधी विचारले नाही.तू मात्र सर्व हिशोब ठेवलास.धन्य आहेस." त्याचे चार कौतुकाचे शब्द ऐकल्यावर मला बरे वाटले.

आम्हा तिघा भावांच्या नोकर्‍या, बाळचे कॉलेजचे शिक्षण चालू होतेच. जागा घेण्याचा माझा विचार पक्का होत चालला. आमच्या वहिनीचे वडिलही जागा घेण्याच्या मताचे होते. त्यांच्या मुलाला,बाबूला त्यांनी आमचेकडे पाठवला. एव्हाना गोखलेवाडीचे मालक,तात्या टेंगुळवाले गोखले यांचेशी माझी ओळख झाली होती. ते लहानमोठे प्लॉट दाखवित असत पण कोठे व्यवहार जमत नव्हता. एकदा गोखल्यांनी दोन लगतचे प्लॉट दाखवले. एक १००० वारांचा आणि दुसरा ६०० वारांचा. मी ६०० वारांचा तो प्लॉट ३९०० रु. ना १९६१ साली विकत घेतला तर बाबूने शेजारचा १००० वारांचा प्लॉट घेतला. घरात १९०० रु जमवले होते आणि २०००रु चे मी परत कर्ज काढले. तिघांच्या पगारात घर चालत असे ,कोकणात आईला पैसे पाठवावे लागत आणि कर्जाचे हप्तेही पगारातून जायला लागले. अजून त्या जागेवर घर बांधायला काही जमत नव्हते. असेच वर्ष,दीड वर्ष उलटले. एक दिवस गोखल्यांनी मला त्या प्लॉटवर घर बांधणार आहात की विकणार आहात? अशी विचारणा केली. प्लॉट विकल्यास दुप्पट किंमत येणार होती. बाबूला मात्र त्याच्या जमिनीवर घर बांधायचेच होते. शेवटी मी ७००० रु ना तो प्लॉट विकला आणि बाबूच्या १००० वारातला ३०० वाराचा प्लॉट ३०००रु देऊन त्याचेकडून विकत घेतला. आता ४०००रु हातात होते. घर बांधायचे स्वप्न आवाक्यात आल्यासारखे वाटत होते.

इकडे अण्णावैनी आता थांबायला तयार नव्हते. त्यांनी देवध्याची एक मुलगी दाखवली. मुलगी पसंत करुन मी आणि मामा डोंबिवलीला आलो तो स्टोव्हचा भडका उडून वहिनी भाजली होती. तिला के इ एम मध्ये ऍडमिट केले. तिच्या आजारपणात १०,१२ दिवस गेले पण देवध्याची मंडळी पुढची बोलणी करायची किती दिवस थांबणार? अण्णा सुध्दा मुहुर्त वगैरे ठरवू असे बोलायला लागला. मला मनातून त्या मुलीशी लग्न करावे असे वाटत नव्हते.अण्णाला आपले मी दिवाळीनंतर पाहू वगैरे सांगून वेळ मारुन नेली. एक दिवस ऑफिसात देवध्याची मंडळी आली .पुढची बोलणी कधी करायची ते विचारु लागले. मी थातूरमातूर काहीतरी सांगून वेळ मारून नेली आणि हिय्या करुन काही कारणामुळे मला लग्नकर्तव्य नाही,तरी माझ्यावर अवलंबून राहू नये असे त्यांना पत्र लिहिले. अण्णावैनीला हे समजल्यावर दोघांनी माझ्यावर तोंडसुख घेतले पण लग्नासाठी मी अजून तयार झालो नव्हतो.

पुढे १९६३ च्या मे महिन्यात ठाण्याच्या पालवणकर मास्तरांचे त्यांच्या मुलीसाठी विचारणा करणारे तिच्या पत्रिकेसहित पत्र आले. मुळेदादा पत्रिका पाहत असत. त्यांनी वहिनीस पत्रिका जुळत असल्याचे सांगितले. मुलगी शाळेत नोकरी करत असल्याने वहिनीस आधीच ,न पाहताच पसंत होती. अण्णा त्यावेळी कोकणात गेला होता. पत्रिका जुळत असल्याचे आम्ही पालवणकरांना कळवले. एक दिवस आमच्या त्या पत्रासहित मास्तर आमच्या घरी आले व सर्व चौकशी केली. वहिनीस पाहून ते ही आई का? असे विचारते झाले. आई कोकणात शेतीसाठी राहिली आहे आणि ही आमची आईसारखीच असलेली वहिनी आहे हे ऐकून आणि कोकणात शेती वगैरे असल्याचे ऐकून त्यांना बरे वाटलेले दिसले. अण्णा कोकणातून आले की मुलगी पहावी असा माझा विचार होता पण मास्तरांनी आम्हाला आधी मुलगी पाहून घ्या.तुम्हाला बरी वाटली तर अण्णा कोकणातून आले की त्यांना परत दाखवू असे सुचवले. मामा आणि मी ठाण्यास जाऊन मुलगी पाहून आलो. आम्हाला एकंदरीत स्थळ ठीक वाटले. पुढे अण्णा कोकणातून आल्यावर वत्सुकडे त्यांनी पालवणकरांना बोलावले. मी नव्हतो पण घरातले इतर सर्वजण होते. सर्वांना मुलगी पसंत होती .पुढे लग्न ठरले तेव्हा मुलीकडच्यात घाटेमास्तरांना पाहून आम्ही दोघेही चकित झालो. गोरेगावच्या नानाकडच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला. ५३,५४ च्या सुमारास गोरेगावात शाळा नव्हती. त्यावेळी अंबाबाईच्या देवळाजवळ शाळा बांधण्याचे ठरले. घाटेमास्तरांच्या पुढाकाराखाली आम्ही सर्व लहानमोठी मंडळी तेथे श्रमदानास जात असू. गोरेगावकर अभिनव दिद्यालय ही ती शाळा! घाटेमास्तर आमच्या हिच्या मोठ्या बहिणीचे यजमान होते. हे नवे नाते समजताच आम्हा दोघांना फार आनंद झाला. अण्णावैनींनीच पुढाकार घेऊन माझे लग्न लावले. २५ जून १९६३ रोजी आमचे शुभमंगल झाले.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 12:48 pm | श्रावण मोडक

लेखनाचा साधेपणा इथंही टिकवून धरलात. धन्य आहे तुमची. आपल्याच लग्नाच्या वर्णनातही हा साधेपणा टिकवून धरणे, थोडा तटस्थपणा कायम राखणे अवघड असावे. वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात. अभिनंदन कसे करू? आनंद वाटला हे नक्की.
तुमच्या जुन्या हाडातल्या प्रामाणिकपणाला सलाम.

विसुनाना's picture

20 Mar 2009 - 12:54 pm | विसुनाना

कोणताही आव न आणता केलेले सुगम लेखन. पण 'अनुभवविश्वाचे ऐतिहासिक महत्त्व' खूप आहे.
समस्त मध्यमवर्गाची वाटचाल त्याकाळी थोड्याफार फरकाने पण याच पद्धतीने होत असे हे माझ्या ऐकीवातील हकीकतींप्रमाणे माहित आहे.
हे लेखन त्याच वाटचालीचे प्रतिक आहे. आजच्या/पुढच्या मध्यमवर्गीय पिढ्यांना कधीकाळी 'सर्वसामान्य जीवन असे होते' हे समजण्यासाठी लिखित पुरावा आहे हा.
(दहा बाय दहाच्या दोन खोल्यात आठरा माणसे रहात होतो... मतिमंद भावाचा संसार तुझ्या आजोबांनी चालवला होता... असे अनुभव सांगणारी माणसे आता कमी आहेत.)

म्हणूनच वाचनीय!

शिप्रा's picture

20 Mar 2009 - 1:15 pm | शिप्रा

एकदम सहमत ..मस्त लिहिले आहे

अवलिया's picture

20 Mar 2009 - 2:28 pm | अवलिया

पूर्णपणे सहमत.

--अवलिया

वत्सूचे लग्न अगोदर, घरजावई व्हायला नकार इ. गोष्टी आवडल्या. भाग क्र. ८ मधील बाळचा फॉर्म भरणें वगैरे गोष्टी पण छानच. अगदी टाईम मशीनमधून प्रवास केल्यासारखे वाटलें. सुरेख.

सुधीर कांदळकर.

दिपक's picture

20 Mar 2009 - 1:18 pm | दिपक

आरस्पानी, प्रवाही आणि चित्रदर्शी लेखन.....

असेच म्हणतो :)

(लग्नानंतर सुरु झालेल्या तुमच्या दुसर्‍या ईनींगच्या प्रतिक्षेत)दिपक

पक्या's picture

20 Mar 2009 - 1:11 pm | पक्या

फारच छान अनुभवकथन केले आहे. वाचनीय लेखमाला.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 1:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त हाहि भाग सुरेख जमला आहे

(वामन सुतांचा पंखा) घाशीराम कोतवाल

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2009 - 1:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एकदा सुंदर लेखन, नव्हे कथन. आता चटक लागली आहे स्मृतीगंधाची.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

नंदन's picture

20 Mar 2009 - 1:23 pm | नंदन
मैत्र's picture

20 Mar 2009 - 3:13 pm | मैत्र

काहीतरी वेगळीच शैली आहे. तो सहजपणा अगदी धरून ठेवतो...

सहज's picture

20 Mar 2009 - 1:23 pm | सहज

चटक लागली आहे स्मृतीगंधाची.

हा भाग देखील अतिशय वाचनीय.

शैलेन्द्र's picture

20 Mar 2009 - 1:32 pm | शैलेन्द्र

सहज, साधे आणि सुंदर..

ढ's picture

20 Mar 2009 - 1:46 pm |

अतिशय साध्या सोप्या भाषेत जुन्या काळ अक्षरशः डोळ्यांपुढे उभा करताय आपण.

आतापर्यंतचे सर्व भाग उत्तम. पुढील लेखांची वाट पहायला लावणारी लेखमाला आहे ही.

राजा's picture

20 Mar 2009 - 1:47 pm | राजा

," पैसा ,हुंडा काय करत बसला आहात? गरिबी-श्रीमंती काय कोणाच्या हातात आहे का? भरल्या घरात,३ भावात वाढलेली मुलगी आहे, तिला सर्व घरकाम येते. तुम्ही बापलेक दोघेच घरात, श्रीमंताघरची लाडाची लेक आणलीत तर पोळ्या करून घालेल का तुम्हाला?

पण नेमके हेच लोकाना समजत नाहि.

चतुरंग's picture

20 Mar 2009 - 3:58 pm | चतुरंग

लिखाणात कोणताही डामडौल नसला तरी चालते किंबहुना तसेच लिखाण भावते हे तुमच्या लिखाणाने सिद्ध केले.
तुमच्या भाषेत एकप्रकारचा आपलेपणा जाणवतो. हे अनुभवकथन व्हावे असे तुमच्या मनात बरीच वर्षे असेल का? आणि त्या तळमळीने हे असे लिहिले गेले असेल का? असे प्रश्न पडतात.
एवढ्या वर्षांनंतर सुद्धा इतके तारीखवारासह संगतवार लिखाण पाहून आश्चर्य वाटते. तुमच्या स्मरणशक्तीची दाद देतो! :)

चतुरंग

शितल's picture

20 Mar 2009 - 6:19 pm | शितल

हा भाग ही सुंदर. :)

रेवती's picture

20 Mar 2009 - 6:34 pm | रेवती

किती साधं, सोपं लेखन आहे आपलं!
त्यावेळी आयुष्य इतकं सोपं नव्हतं म्हणूनच लेखन साधं असेल.
आजकाल त्यावेळच्या मानाने पैसा बर्‍यापैकी असतो,
आणि बाकी सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसल्यात.

रेवती

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 6:41 pm | लिखाळ

फार छान.
वरच्या प्रतिसादांत अनेकांनी कौतूक+अभिनंदन केले आहे. त्या सर्वांशी सहमत आहे.

-- लिखाळ.

मदनबाण's picture

21 Mar 2009 - 9:25 pm | मदनबाण

हेच म्हणतो... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:30 pm | क्रान्ति

पूर्ण स्मृतिगंध एकत्र प्रकाशित झाल तर एका बैठकीत वाचून संपवील कुणीही! त्याशिवाय हातून सोडणारच नाही! सहज साध आणि सुरेख शब्दचित्र!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

20 Mar 2009 - 9:11 pm | प्राजु

इतकी साधी लेखणी... ! सुरेख.
शब्दांच अवडंबर नाही कि, अलंकारांनी मढलेली वाक्य नाहीत..
साधे सरळ .. तरीही मनाचा ठाव घेणारे लेखन.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

21 Mar 2009 - 1:57 am | दिपाली पाटिल

तुमचे लेखन खुप च छान आहे.

दिपाली

लवंगी's picture

21 Mar 2009 - 5:09 am | लवंगी

अंबाबाईच्या देवळाशेजारची शाळा म्हणजे अ. भी. गोरेगावकर शाळा का? मी त्याच शाळेची विद्यार्थिनी होते.

वामनसुत's picture

21 Mar 2009 - 3:16 pm | वामनसुत

आपणा सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

21 Mar 2009 - 5:13 pm | विसोबा खेचर

वामनसुतराव,

वरील सर्वांशी सहमत..

इतकी सुरेख लेखमाला मिपावर लिहिल्याबद्दल मी व्यक्तिश: आपला अत्यंत आभारी आहे. असाच लोभ असू द्यावा..

तात्या.

नरेश_'s picture

22 Mar 2009 - 11:00 am | नरेश_

संपूर्ण आत्मकथा लिहा.
आवडेल वाचायला.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.