स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
मी व्ह. फा. चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर मला पुढे इंग्रजी शाळेत घालायचे ती. आई,वहिनी आणि आजोबांनी ठरवले. माझे चुलतभाऊ ती. अण्णा मुंबईस होते. व्हेळातून पोटासाठी बाहेर पडलेले आमच्या कुटुंबातले पहिले म्हणजे अण्णा. एका किराणा मालाच्या दुकानात २,३ वर्षे नोकरी करुन आता त्यांनी गिरगावात स्वतःचे किराणा आणि स्टेशनरीचे दुकान काढले होते. अण्णा मला मुंबईस नेण्यास तयार झाला त्याप्रमाणे वाकेडच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला घेऊन १९४४ साली मी अण्णाबरोबर मुंबईला येण्यास निघालो. मला झालेले मुंबईचे ते पहिलेच दर्शन! त्याकाळी व्ह. फा. नंतर इंग्रजी १ली,२री,३री असे ७वी पर्यंत यत्ता असत. इंग्रजी ७वी म्हणजे मॅट्रिक! व्हफा झालेले असले तर इंग्रजी १ली,२री,३री एका वर्षात करून घेत आणि पुढच्या वर्षी एकदम इंग्रजी ४थीत बसवित असत.
आंग्रेवाडीतल्या हिंद विद्यालयात माझे नांव घातले आणि शाळा सुरू झाली. घरापासून दूर रहायची सवय जरी वाकेडास असताना झाली होती तरी त्या बिर्हाडात प्रभाकर आणि वहिनी होती, शिवाय ४ मैलच दूर असल्याने शनिवार, रविवारी घरी जाता येत असे; पुन्हा वाकेड आणि व्हेळाच्या वातावरणात फारसा फरक नव्हता,त्यामानाने मुंबई झकपक होती. व्हेळासारख्या लहानशा खेड्यातून आलेला मी मुंबईच्या मुलांपुढे अगदीच गावंढळ दिसत असे मी आपला एका बाकावर एकटाच बसून राही. पुढे इंग्रजी लिपी वगैरे शिकवायला सुरुवात झाली. इतर मुले पटापटा उत्तरे देत पण मला बुजायला होत असे. मला त्यांच्या मानाने काहीच येत नाही हा ग्रह दृढ होत चालला त्यात आणि घराची ओढ मन व्याकूळ करू लागली. मला तेथे अजिबातच करमेनासे झाले. कशीबशी सहामाही परीक्षा झाली आणि दिवाळीच्या सुटीच्या आदल्या दिवशी आमचा 'निक्काल' लागला. शंभरात १६ गुण मिळाले. अण्णास किवा इतर कोणासही ते न सांगता मी कोकणात जायची तयारी करू लागलो. श्रीराम ठाकूरदेसाईंच्या सोबतीने व्हेळात आलो. सुटी संपली तरी माझे मुंबईला जायचे नाव नाही. काहीतरी निमित्य काढून मी मुंबईस जाणे पुढे ढकलत राहिलो. शेवटी शाळेत न गेल्यामुळे माझे ते वर्ष फुकट गेले. तो पर्यंत प्रभाकर वाकेडच्या शाळेतून ६वी पास झाला होता त्यामुळे वाकेडासारखेच राजापुरास बिर्हाड करुन आम्हा भावंडाना घेऊन वहिनीने तेथे रहायचे ठरले.
माझी आई आणि वहिनी शाळेत गेल्या नव्हत्या पण त्यांना पांडवप्रताप वगैरे पोथ्या वाचता येत असत. लिहिता मुळीच येत नसे.सही देखील करता येत नसे. अंगठा! पण दोघींनाही शिक्षणाचे महत्त्व समजले होते. आम्ही मुले व्ह. फा. नंतर गावात किवा आजूबाजूच्या खेड्यात प्राथमिक मास्तर होऊन शेतीला मदत करीत राहिलो असतो तर घराचा गाडा बर्यापैकी सुरळीत चालला असता, पण दोघींनीही पोटाला चिमटा घेऊन,प्रसंगी स्त्रीधन विकून आम्हा मुलांना शिकवले. आई तर आपल्या मुलांसाठी खस्ता काढतेच पण वहिनी? ती सुध्दा सावत्र,पण तिने कधीच सावत्रपणा केला नाही. लग्नाचा अर्थ न कळताच तिच्यावर वैधव्याची कुर्हाड कोसळली होती. वडिलांनी तिचा दुसरा विवाह लावून देण्याचे ठरवले, परंतु माघारपणाला गेली असता तिच्या माहेरच्यांनी तिचे वपन करुन सोवळी केली. त्यानंतर मात्र ती माहेरी न जाता आमच्या घरी चंदनासारखी झिजत राहिली. पुढे वडिल गेल्यावर आईच आमचे वडिल होऊन राहिली. आईने व्हेळात राहून शेती सांभाळली तर वहिनी आमची आई होऊन वाकेडास,राजापुरास राहिली.
निफाडकर मास्तरांच्या घरात दरमहा १ रुपया भाड्याने खोली घेऊन आम्ही राजापुरास बिर्हाड केले. मी इंग्रजी ४थी , प्रभाकर मराठी ७वी,वत्सु तिसरीत तर बाळ पहिलीत असे सारेच जण राजापुर हायस्कूल मध्ये शिकू लागलो. वहिनी आईच्या मायेने आमचे सारे करू लागली तर आई व्हेळात राहून शेती राखू लागली. दोघींनीही मुलांच्या चांगल्या शिक्षणाचा ध्यास घेतला होता. घरात पिकलेले भात कधीकधी वर्षभर पुरत नसे, अशा वेळी पावसाळ्यात सावकाराकडून सवईने भात घ्यावे लागे. सवई म्हणजे पावसाळ्यात ४मण भात घ्यायचे आणि २,३ महिन्यांनी पाच मण भात त्यास परत करायचे. भाताच्या गिरण्या त्यावेळी नव्हत्या. घरीच आई आणि वहिनी भात घिरटीवर भरडून काढीत त्यामुळे टरफले निघत असत, मग सुपात पाखडल्यावर टरफले बाजूला होत; नंतर ते दाणे वाईनात म्हणजे उखळीत घालून कुटत असत, त्यामुळे कोंडा बाहेर येत असे. परत सुपात पाखडून तो कोंडा आणि तांदळातल्या कण्या निराळ्या काढून कणीकोंडा एकत्र दळून त्याची भाकरी करीत असत. कण्या नसलेल्या तांदळाचा रोजच्या भातासाठी वापर होई. तांदूळ वर्षभर पुरावा म्हणून आई न्याहारीला पातळ भात करत असे. भात इतका पातळ असे की मूठभर तांदूळ किवा कण्यांमध्ये तांब्याभर पाणी घालून शिजवित असे. बाळ म्हणायचा ," आई, किती पातळ आहे हा भात! एकदा बुडी मारली की एक शीत मिळते." असे दिवस चालले होते.
अशात माझी मॅट्रिकची परीक्षा आली. पुन्हा वासू चहावाल्याकडेच (विहार हॉटेलवाले) माझे बस्तान ठोकले. पेपर्स बरे गेले होते. रिझल्ट लागून मला ५१% मार्क मिळाले. आमच्या घराण्यातला पहिला मॅट्रिक झालेला पाहून आई आणि वहिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी आता जाणता झालो होतो. त्यांचे पांग फेडायला आणि घरचा मोठा म्हणून आता मला नोकरी शोधणे आवश्यक वाटू लागले. अण्णाला पत्र पाठवून मी नोकरीसाठी येतो अशी विचारणा केली परंतु कदाचित मागच्या अनुभवावरुन त्याचे उत्तर आले नाही. इकडे पावसाळा सुरू झाला होता. शेतीची बरीच कामे होती. लावण्या करायच्या होत्या पण आमचेकडे जोतासाठी एकच बैल होता,दुसरा म्हातारा झाल्यामुळे जोताला चालत नसे.दुसरा तरणा बैल घ्यायला पैसा आणायचा कोठून? आणि बैलजोडी नसेल तर जोत धरणार तरी कसे? मोठाच प्रश्न उभा राहिला.पाऊस पडायला सुरुवात झाल्याने लोकांनी पेरे करायला सुरुवात केली होती. वेळ फुकट जात होता, आम्ही सारे चिंतेत होतो.
अशातच एका रात्री कंदिल घेऊन हरिभाऊ आमचे घरी आले आणि म्हणाले," माझाही एक बैल निकामी झाला आहे. आपण वारंगोळे करुया." वारंगोळे म्हणजे एक आमचा आणि एक त्यांचा बैल बांधून जोत करायचे आणि पेरणी करायची. एक दिवस त्यांच्या शेतात तर एक दिवस आमच्या शेतात जोत फिरवून शेत नांगरत असू. सगळीकडेच नांगरणी चालू असल्याने गडीमाणसांचा तुटवडा असे. मी मग वेळेला जोत धरत असे. अशा रीतीने भाताचे पिक घेतले. दिवाळीच्या सुमारास भातझोडणी झाली आणि उन्हाळी कुळिथ करण्यासाठी पुन्हा वारंगोळे करायचे ठरवले. हरिभाऊंनी कुळथाच्या आलेल्या पिकातून बियाणापुरते बाजूला ठेवून उरलेले कुळिथ निम्मे निम्मे वाटून घेऊ असे ठरले आणि कामाला सुरुवात झाली.
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चित्रमय लेखन पुन्हा एकदा आवडलं. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
15 Mar 2009 - 12:38 pm | प्रमोद देव
चालू द्या. वाचताना मजा येतेय.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
15 Mar 2009 - 9:26 pm | शितल
सहमत.:)
15 Mar 2009 - 12:42 pm | प्राची
वामनसुत काका,
नेहमीप्रमाणे खूप छान लेख.अनेक जुने शब्द कळत आहेत(उदा.वारंगोळे,जोत,इ.).
पु.ले.शु.
15 Mar 2009 - 12:43 pm | श्रावण मोडक
वळणाचे आत्मकथन. हल्ली क्वचित असे वाचायला मिळते.
15 Mar 2009 - 1:37 pm | क्रान्ति
जुन्या मराठी चित्रपटाची आठवण येतेय. ओघवती भाषा आणि चित्रमय शैली यामुळे सगळे तपशील डोळ्यांपुढे येतात.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
15 Mar 2009 - 3:10 pm | मदनबाण
मस्त लिहीत आहात... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
15 Mar 2009 - 3:25 pm | सुनील
चारही भाग आताच वाचले. सरळसोट कथा आणि सहज भाषा यामुळे अतिशय सुंदर झाले आहे. त्याकाळात कोंकणातूम मुंबईत आलेल्या असंख्य कुटुंबाची एक प्रातिनिधिक कथा असे याचे वर्णन करता येईल (अपवाद भाऊबंदकीच्या उपकथानकाचा!).
पुलेशु
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2009 - 3:40 pm | अवलिया
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.... :)
--अवलिया
15 Mar 2009 - 3:46 pm | लवंगी
काका, नेहमीप्रमाणे खूप छान लेख.
15 Mar 2009 - 7:25 pm | प्राजु
मस्त. खूप जुन्या दिवसाचं वर्णन आहे हे.
आवडलं. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Mar 2009 - 7:52 pm | प्रदीप
मुक्तसुनीत ह्यांनी लिहील्याप्रमाणे सर्व काही जे जे आयुष्यात येत होते (आणि ते बहुतांश दुखःदच होते), ते लेखक अगदी अलिप्तपणे सांगत गेले आहेत. मला वाटते, एका वाक्याला वाचकाच्या डोळ्यातून तीन चमचे टिपे काढण्याचा हव्यास नाही, हे खरे तर ह्या लेखनाचे मर्मस्थळ आहे.
लेखकाच्या वहिनींप्रमाणे कोकणात अनेक मोठ्या घरात अशाच वहिन्या असतात, माझ्याही काही पहाण्यात आहेत, अगदी चंदनाप्रमाणे घरासाठी झिजणार्या. जयवंत दळवींनी त्यांची आई व दोन काक्या ह्यांबद्दल लिहीलेल्या 'त्या तिघी' लेखाची आठवण झाली.
15 Mar 2009 - 9:49 pm | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो...
"बघा बघा मी कष्टाची गोष्ट कशी सांगतो" असा अजिबात अभिनिवेश नाही म्हणूनच हे लेखन खूप आवडतेय..
येउदेत ..वाचतोय...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Mar 2009 - 1:02 pm | आंबोळी
सहमत
प्रो.आंबोळी
16 Mar 2009 - 7:44 am | सुक्या
वामनसुत ... खुप सुंदर लेखन आहे. वाचताना थेट तुमच्या जुण्या काळात घेउन जाते.
पुढचे भाग लवकर येउदेत.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
16 Mar 2009 - 9:43 am | घाशीराम कोतवाल १.२
मस्त ओघवती भाषा शैली सुंदर कथा
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
16 Mar 2009 - 10:12 am | शारंगरव
खुपच मस्त आहे तुमचे लेखन. अगदी डोळ्यासमोर चित्र उभ राहत =D>
16 Mar 2009 - 12:55 pm | वामनसुत
तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळे लिहिता झालो आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद.
21 Oct 2013 - 6:58 am | स्पंदना
स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा"