२६ ऑगस्ट २०१३
माझा चार दिवसांचा आजार आणि तिचा चार दिवसांचा आळस... पाचव्या दिवसाला झटकून, श्रावणी सोमवारचा मुहुर्त साधून आमचे देवदर्शनाला जायचे ठरले.. अर्थातच.. तिनेच ठरवले.. कारण ती जेवढी आस्तिक तेवढाच मी नास्तिक.. त्यामुळे नेहमीसारखेच, ‘जाणे गरजेचे आहेच का??’ इथपासून वादाला सुरूवात.. घरापासून चालतच पंधरा-वीस मिनिटांवर महादेवाचे मंदीर असल्याने माझी नकारघंटा वाजवायला जास्त वाव नव्हताच.. आजारपणाचा फायदा उचलून सकाळपासून टाळलेली आंघोळ.. नाईलाजाने जेव्हा संध्याकाळी उरकावीच लागली, तेव्हा आता अखेर जाणे निश्चितच हे समजून चुकलो.. तरीही तिचे हे देवदर्शन सुकर घडू देणार्यातला मी अजिबात नव्हतो.. अन पहिली चकमक उडाली, जेव्हा मी स्वच्छ आंघोळ करून माझ्या निर्मळ झालेल्या शरीरावर जुनीपुराणी कळकट मळकट जीन्स चढवली..
"जीन्स आणि तंबाखू.., मळल्याशिवाय मजा येत नाही" .... या माझ्या युक्तीवादाचे तिच्या भक्तीवादापुढे काही एक चालले नाही आणि ती मला बदलावी लागलीच.. पण लागलीच.. मी दुसरा मुद्दा उपस्थित केला की छत्रीचे ओझे मी बरोबर घेणार नाही आणि पाऊस आला तर तिथूनच टॅक्सीने परत येणार.. तिने हसतच याला मान्यता दिली आणि गेले चार दिवस पावसाची रिपरिप फारशी नव्हतीच हे आठवल्यावर मला तिच्या या हसण्यामागचे रहस्य उलगडले.. तसे चालत जायचा ना तिला फारसा उत्साह ना मला फारसा आळस, त्यामुळे जाताना चालत जायचे आणि येताना टॅक्सीने यायचे याला दोघांनीही मान्यता दिली.. देवदर्शनाला चालत गेल्याचे तिला समाधान आणि एकवेळचे टॅक्सीचे भाडे वाचवल्याचे मला.. चालताना तिचा वेग असा होता, की जणू ‘चलो बुलावा आया है..’, त्यामुळे निरुत्साहाने रेंगाळत चालणार्या माझी फरफटच होत होती.. पण मला खरी चिंता होती ती देवदर्शनासाठी लागलेल्या रांगेची.. आपली कसलीही श्रद्धा नसताना वा कुठलाही स्वार्थ साधला जाणार नसताना त्या रांगेत उभे राहणे म्हणजे आयुष्यातील वेळ फुकट गेल्यासारखेच मला वाटते.. त्यातही एक नास्तिक म्हणून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो रांगेतील आजूबाजुच्या लोकांनी मलाही आस्तिक समजण्याचा.. पण सुदैवाने रांग नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.. मात्र पुरेशी वर्दळ होती.. इतर कुठल्याही सोमवारापेक्षा श्रावणी सोमवार जास्त स्पेशल असल्याने हाराफुलांची दोनचार दुकाने जरा जास्तच उठून दिसत होती.. त्यात रचून ठेवलेली ताटेही तशीच भरगच्च भासत होती.. आजूबाजूला कोणाला ऐकू न जाईल अश्या आवाजातच बायकोच्या कानात कुजबुजलो, छोटेवालेच घे हं .. पण ते काही होणे नव्हते हे अनुभवानेच ठाऊक होते.. नेहमीचे नारळ-फूल-फुटाणे-अगरबत्ती व्यतिरीक्त दुध की दहयाची थैली आणि उमलायच्या आतच खुडलेले कमळाचे एक फूल पाहून समजलो कि हे नेहमीच्या बजेटमधील प्रकरण नाही.. मागाहून किंमत समजली तेव्हा अंदाजलेले बजेटही गोंधळले होते.. त्यातल्या त्यात एकच दिलासा वाटला कि कमळाचे फूल पुर्ण उमललेले नव्हते अन्यथा पैशाचे पाकीट खालीच होते.. हो खरेच खाली होते, कारण एटीएम कार्डच्या भरवश्यावर राहायची सवय लागल्याने आता केवळ टॅक्सीच्या भाड्यापुरतेच पैसे उरले होते..
मंदीराच्या दारात चपला काढून पायर्या तर चढलो, पण नेहमीसारखे नजरेआड होईपर्यंत मागे वळून वळून बघत माझी नजर चपलांवरच अडकली होती.. बूट असते तर हारवाल्याकडेच ठेवले असते पण फ्लोटर्स असल्याने पुढेच काढूया असा विचार केलेला.. मात्र जवळपासच्या चपला पाहता तुलनेने माझ्याच नवीन वाटत असल्याने चूक केली की काय असे आता वाटू लागले होते.. तिला यातले काही सांगायची सोय नव्हतीच अन तशीही ती गाभार्याच्या जवळ पोहोचली देखील होती.. आता मागे रेंगाळत बसून शिव्या खाण्यापेक्षा पटकन देवदर्शन उरकून आपल्या चपलांकडे परत येऊया असा विचार करत त्वरेने निघालो.. इथून माझी भुमिका न सांगता सांगकाम्यासारखी..! ज्या देव्हार्यावर ती डोके टेकवेल त्या देवाचे चरणस्पर्श आपणही करायचे.. जिथे ती स्तोत्र म्हणने सुरू करेल तिथे क्षणभरासाठी हात आपणही जोडायचे.. मात्र क्षणभरासाठीही गर्दीत तिच्यापासून वेगळे व्हायचे नाही.. कधी कुठचे फूल उचलून माझ्या डोक्याला लावायला म्हणून मला शोधेल हे सांगता येत नाही आणि तेव्हा आपण चुकूनही तिच्यापासून लांब असता कामा नये, नाहीतर........
तर हो नाही करता एकंदरीत हे सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही गाभार्याबाहेर पडणार इतक्यात तिला अग्ग बाई नंदीचे पाया पडायचे राहिलेच की हे आठवले.. मी शांतपणे माझ्याही वाटणीचे आता तूच पडून ये असे सांगून बाहेर पडलो आणि तुलनेने एका मोकळ्या जागेत येऊन थांबलो. थोड्याच वेळात गर्दीतना वाट सारत पाठोपाठ ती देखील आली. आजूबाजुच्या कोलाहलाकडे दुर्लक्ष करत निवांत बसलेल्या आसपासच्या भाविकांकडे बघून तिलाही दोन घटका बसायचा मोह झाला.. ज्याची विचारणा होताच मी तात्काळ परवानगी दिली.. एवढी पायपीट करून आल्यावर याची गरज खरे तर दोघांनाही होतीच.. जिथे उभे होतो, तिथेच फतकल मांडली.. तिने तेवढे आपले तोंड देवाच्या दिशेने राहील याची काळजी घेतली.. आम्ही दोघे एकत्र असूनही आमच्यात जेमतेम बोलणे होते असा हा एक दुर्मिळ योग.. ती आपल्या देवभक्तीत चूर तर मी आजूबाजुच्या भाविक जोडप्यांचे निरीक्षण करण्यात मग्न.. काही विवाहित तर काही अविवाहित प्रेमी युगुलं.. पण वरकरणी पाहता त्यातील एकही आस्तिक-नास्तिकाची जोडी वाटत नव्हती.. प्रत्येक जोडीतील दोहोंच्या चेहर्यावर सात्विकच भाव दिसत होते.. त्यातील मुलगा वा पुरुष अगदी डोक्याला रूमाल गुंडाळून वा किमान कपाळाला लालसर टिका लाऊन तरी दिसत होता.. ते पाहता हि माझ्यासारख्या दाढीची खुंटे वाढवून अन जीन्स टी-शर्ट मध्ये खोचून फिरणार्या मुलाबरोबर देवळात यायला चिडते यात काही वावगे वाटण्यासारखे नव्हते.. किंबहुना तश्याही अवस्थेत का होईना न संकोचता मला बरोबर घेऊन येते याचे मला कौतुकच वाटायला लागले.. अन आज माझी फरफट करत, माझ्यावर दमदाटी करत, मला मंदीरात घेऊन यायचे कारण म्हणजे माझाच लांबलेला आजार होता हे न समजण्याएवढा मी बावळट नव्हतो..
तिची देवावर श्रद्धा आहे जी देवावरच्या विश्वासातून आली आहे आणि माझी तिच्या विश्वासावर श्रद्धा आहे जी माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमातून आली आहे.. कितीही गुंतागुंतीचे वाटले तरी हेच एक कारण आहे जे मी कितीही लंगड्या सबबी बनवल्या तरी आजवर तिच्या देवदर्शनाच्या आड आलो नाही... परतताना तिने समोर धरलेला प्रसाद त्याच विश्वासाने आणि त्याच श्रद्धेने प्राशन करत, ठरल्याप्रमाणे टॅक्सीला हात दाखवला..
गाडीभाडे, हारफुले, अन इकडतिकडचे खाणे.. नेहमीसारखेच आज तू मला कितीला कापलेस याचा हिशोब मी तिला मांडून दाखवत असतानाच कुशीत शिरून ती मला ‘थॅंक्स’ म्हणाली.. जे कधी तिला पाचशे रुपयांचे जेवण खाऊ घातले तरी म्हणत नाही, वा कधी पाच हजारांची शॉपिंग करवून दिली तरी म्हणेलच याची खात्री नसते... ते असे थोडक्यात आले.. ते ही अगदी मनापासून.. खर्रंच, स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते..
- तुमचा अभिषेक
---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://misalpav.com/node/24985
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://misalpav.com/node/25031
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://misalpav.com/node/25051
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://misalpav.com/node/25068
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५) - http://misalpav.com/node/25116
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
27 Aug 2013 - 6:48 pm | तिरकीट
तिची देवावर श्रद्धा आहे जी देवावरच्या विश्वासातून आली आहे आणि माझी तिच्या विश्वासावर श्रद्धा आहे जी माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमातून आली आहे.
नेमकी भावना!!! :)
27 Aug 2013 - 9:28 pm | भटक्य आणि उनाड
नेह्मीसारखेच मस्त......
27 Aug 2013 - 10:54 pm | उगा काहितरीच
+1
27 Aug 2013 - 11:13 pm | स्नेहानिकेत
मस्त!!!!!!
28 Aug 2013 - 1:33 am | प्रभाकर पेठकर
आमच्या घरीही वेगळे चित्र नाही. माझी पत्नी दर देवळातील देवाला 'मी आले आहे बरं का!' सांगत फिरते आणि मी दिवारच्या अमिताभसारखा देवळाच्या कट्यावर बसून राहतो. आजूबाजूच्या वृद्ध, विकलांग आणि असहाय्य भिकार्यांना आर्थिक मदत करण्यापुढे माझी ईश्वरसेवा कधी जात नाही.
मी अश्रद्ध नाही पण श्रद्धेचा अतिरेक माझ्या डोक्यात शिरतो. असो. मी काही वाद घालत बसत नाही.
28 Aug 2013 - 10:14 pm | विजुभाऊ
घरोघरी मातीच्या चुली.
28 Aug 2013 - 5:52 am | स्पंदना
अगदी घरच चित्र डोळ्यासमोर उभे राहीले, मात्र तो हारफुलांचा अट्टाहास मात्र खरच कधी चालत नाही माझा, त्या ऐवजी एक लिटरभर दुध विकत घेउन समोरच्या पोराला दे, अस अगदी कडक आवाजात सुनवल जातं.
हं. उगा दर मुद्द्याल कुठे गुद्दे म्हणुन गप बसायच झाल.
28 Aug 2013 - 10:03 am | दादा कोंडके
आमच्याकडे असले गोग्गोड दवणीय प्रसंग देवदर्शनाला जाताना घडत नाहीत. वर टॅक्सी करून देवदर्शनाला जाण्याची आणि कमळाची कळी असलेलं फुलांचं ताट घेण्याइतकी आपली औकात नाही. :(
28 Aug 2013 - 10:12 am | Mrunalini
नेहमी प्रमाणेच हा भाग पण मस्त!!
28 Aug 2013 - 1:53 pm | तुमचा अभिषेक
सर्वांचे धन्यवाद...
आणि हो, हा एक धागा सुखाचाच आहे.... आस्तिक नास्तिक वाद तर वर्षानुवर्षे चालत आलेत आणि चालत राहणार :)
28 Aug 2013 - 2:02 pm | पेस्तन काका
फक्कड जमलय :-)
-------------------------------------------------------
28 Aug 2013 - 4:42 pm | विटेकर
खरतरं सुख- सुख असे बाहेर नसतेच .. ते असतं आत .. आपल्यात ! आपण ठरविले की आपण सु़खी होतो !
सलाम तुमच्या या सुखी रहाण्याच्या वृत्तीला ! असेच रहा !
Happyness is state of Mind,it has hardly anything to do with outside world ! ( असं कुणीसं म्ह्ट्लय .. आणि कुणी म्हट्ल नसेल तर मी म्हणतो .. आत्ता ! )
30 Aug 2013 - 12:03 am | तुमचा अभिषेक
जे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेय ते मी मागे एका प्रतिसादात मराठीत म्हणालो होतो.. सुख दुख हि मनाची स्थिती असते असे काहीसे .. आधीही कोणीतरी म्हणाले असेलच.. कारण अर्थातच शतप्रतिशत खरे आहे ते :)
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.. ते वाचणेही एक सुखच असते.. :)
30 Aug 2013 - 5:49 pm | जिन्गल बेल
सगळे भाग वाचले....एक नम्बर आहेत...हा तर....फारच छान.....
1 Sep 2013 - 6:12 am | संजय क्षीरसागर
तिच्या वाढदिवसाला सकाळीसकाळी तिला म्हणतो, "आज तुला दोन ऑप्शन्स आहेत. सारसबागेतल्या गणपतीला जाऊ. मस्त निवांत ठिकाण आहे, नंतर नैवेद्यला ब्रेकफास्ट करू, मग पुढची पानं जशी उलगडतील तशी".
"दुसरा ऑप्शन काये?"
"तुझ्या आवडत्या दगडू हलवाईला जाऊ "
खरं तर कुणी काय वाट्टेल ते केलं तरी त्या गर्दित जायला मन राजी नसतं. पण आमची ओळख होण्यापूर्वी तिथे जसराजजींच्या मैफिलित तिनं मैत्रिणीला, मला दुरुन दाखवलेलं असतं! आणि तिचं ते आराध्य दैवत असतं.
"आपण दगडू हलवाईला जाऊ "
तिथे पोहोचल्यावर निमूटपणे मी चप्पल स्टँडजवळ थांबतो, "तू ये जाऊन "
"आत तर चला, मूर्ती सुरेख आहे"
भाविकांच्या शिस्तबद्ध रांगेतनं वाट काढत मी सरळ सिक्युरिटी गार्डच्यामागे जाऊन उभा राहतो.
"सर, रांगेतनं या, तुम्हाला दर्शन नाही का घ्यायचं?"
"नाही, बायको आहे रांगेत, मी तिची वाट पाहतोय"
समोर मूर्ती दिसते. अप्रतिम घडण, लखलखणारे दागिने, डोक्यावरचा दिमाखदार मुकुट, सभोवतालची देखणी महिरप, जीवंत वाटणारी शांत नजर आणि आजूबाजूचं भाविकांच्या श्रद्धेनं भारलेलं वातावरण. "साली काय दुनिया आहे, मस्त टाईमपास चालूये सगळ्यांचा" मी मनात म्हणतो.
"प्रसाद घ्या" पुजार्याशी सुहास्यवदनानं बोलून, रांग पार करत ती आलेली असते.
मी पेढा खातो.
"काय मागितलंस आज?"
"काही नाही. त्याला म्हटलं होतं, कमालीचा नास्तिक माणूस आहे, पण एक दिवस नक्की घेऊन येईन दर्शनाला, आज इच्छापूर्ण झाली"
माझ्या डोळ्यात कधी नव्हे ते पाणी येतं.
"सखे, तू अशीच सश्रद्ध राहा. मी काफिर असलो तरी हरकत नाही, तुझीही श्रद्धा अशीच राहू दे"
साला, सुख, सुख म्हणजे अजून काय असतं?
___________________________
अभिषेक, मस्त झालीये पोस्ट. पण इतक्या दिलखुलास पोस्टवर नुसती आवडली लिहून उपयोग नव्हता म्हणून प्रतिसादाला वेळ लागला. या दुनियेत एक तरी माणूस इतका संवेदनाशिल आणि धागे जुळवून जगतो याचा आनंद आहे. जिओ!
4 Sep 2013 - 9:45 pm | तुमचा अभिषेक
मस्तच संजयजी.. त्या दिवशीच पाहिली होती आपली पोस्ट.. घरून प्रतिसाद टंकावा म्हटला तर तोपर्यंत मिपाच गंडलेले..
5 Sep 2013 - 12:35 am | संजय क्षीरसागर
माझ्या कथेतलं एक वाक्य तुला सांगावसं वाटतं :