युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ५
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ६
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ७
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ८
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ९
हा विजयोन्माद जपानी जनतेच्या नसानसातून भिनत चालला होता. त्या उन्मादात त्या जनतेने त्यांच्यातील दूरदृष्टी असलेल्या राजकारणी व लष्करी तज्ञांच्या इशार्यांकडे दुर्लक्ष केले. हे विचारी पुढारी त्यांना पुढे काय वाढून ठेवले आहे याची वारंवार कल्पना देत होते पण त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी ना सामान्य जनतेला वेळ होता ना वृत्तपत्रांना. ‘जपान आता गरीब देश नाही’ (हे म्हणजे भारत आता सुपर पॉवर आहे कारण काय म्हणे तर आपल्याकडे अणू बॉंब आहे असे जाहीर केल्यासारखेच आहे) ‘जपान आता इतिहास घडविणार आहे’ ‘एक कोटी वीर’ अशा अनेक मथळ्यांनी वृत्तपत्रांची मुखपृष्ठे सजू लागली. निचीनिचीने लिहिले, ‘आमच्या फौजा अजिंक्य आहेत’. इतके दिवस जपानमधे लष्कराला जो मान मिळत होता त्यात आता एक वाटेकरी आला ‘नौदल’. त्यांची लोकप्रियता एका दिवसात शिगेला पोहोचली.
२२ डिसेंबरला नागुमोचे आरमार त्यांच्या २७ दिवसांच्या मोहिमेनंतर जेव्हा जपानला परतले तेव्हा तर सगळीकडे विजयोत्सव साजरा करण्यात आला. मेजवान्या, भाषणे यांना ऊत आला. अॅडमिरल नागानो ज्याने या मोहिमेला प्रथमपासून विरोध केला होता त्यानेही एका भाषणात या मोहिमेचे कौतुक केले ‘योकु याट्टा ! योकु याट्टा ! (धन्य ! धन्य !) या सर्व विजयोन्मादापासून एका माणूस मात्र अलिप्त होता तो म्हणजे स्वत: अॅडमिरल यामामोटो. जरी तो या मिळालेल्या यशाने आनंदीत झाला असला तरीही तो त्याने हुरळून गेला नव्हता. त्याची दृष्टी भविष्याचा वेध घेण्यात व्यस्त होती. त्याने सुरवातीलाच आपल्या आधिकार्यांना व वैमानिकांना बजावले होते, ‘तुमचा पर्ल हार्बरवरचा विजय हा दैदिप्यमान होता यात शंका नाही पण त्या विजयाने तुम्ही बेसावध रहाता कामा नये. पुढे अशी अनेक युद्धे आपल्याला लढावी लागणार आहेत.’
कमांडर फुचिडा अर्थातच या उत्सवाचा उत्सवमुर्ती होता. त्याच्या वारंवार मुलाखती घेण्यात आल्या व त्याला सिंहाची उपमा देण्यात आली. अखेरीस कुठल्याही शिंटोला जो सर्वोच्च मान मिळावा असे वाटत असते तो त्याच्या वाट्याला आला. खुद्द सम्राटाने त्याला भेटायची इच्छा प्रदर्शित केली. त्या सर्व मोहिमेचा आखो देखा हाल सम्राटांना प्रत्यक्ष त्याच्या तोंडून ऐकायचा होता. अॅडमिरल नागानो नागुमो, फुचिडा व शिगेकाझु शिमाझाकी या तिघांना घेऊन दरबारात हजर झाला. याच शिमाझाकीने हल्ल्याच्या दुसर्या फेरीचे नेतृत्व केले होते.
शिगेकाझु शिमाझाकी.........
नागुमोची दरबारातील सम्राटासमोरच्या उपस्थितीत विशेष नव्हते कारण तो एक अॅडमिरल होता परंतु फुचिडा आणि शिमाझाकी हे कनिष्ट आधिकारी असल्यामुळे दरबारी रितिरिवाजाचा पेचप्रसंग निर्माण झाला. त्या दोघांनाही बढती देऊन तो सोडविण्यात आला. ही भेट फक्त १५ मिनिटे चालणार होती. (प्रत्यक्षात ती ४५ मिनिटे चालली). या मुलाखतीदरम्यान सम्राटाने विचारलेल्या एका प्रश्नाला फुचिडाने सम्राटाशी डोळे भिडवून उत्तर दिले. हा दरबारी रितिरिवाजाचा भंग मोठ्या मनाने चालवून घेतला गेला. हिरोहितोने संभाषणादरम्यान जखमी सैनिकांची मोठ्या आत्मियतेने चौकशी केली. त्याने शत्रूच्या नागरीवस्तीवर काही बॉंब पडले का व त्यात काही जिवितहानी झाली का ? याची वारंवार चौकशी केली. ‘पर्ल हार्बरवर इस्पितळाची जहाजे होती का? त्याच्यावरही बॉंब पडले का?’ अशी चौकशी करण्यात आली. अर्थात फुचिडाने तसे काही झाले नसल्याची सम्राटाला खात्री दिली. या सर्व भेटीदरम्यान फुचिडा दडपणाखाली होता. त्याला बोलताना शब्द सुचत नव्हते व तो त्याच्या बोटांची सतत चाळवाचाळव करत होता. भेट संपल्यावर त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याने नंतर कबूली दिली की सम्राटला या हल्ल्याविषयी सांगण्यापेक्षा पर्ल हार्बरवर हल्ला चढविणे केव्हाही सोपे होते.
जपानी संस्कृतीचे एक विशेष आहे. त्यात रितिरिवाज काटेकोरपणे पाळला जातो तसेच प्रतिकात्मकतेला खुपच महत्व दिले जाते. मला वाटते ते अजूनही तसेच आहे. पारंपारिक रिवाजानुसार नववर्षाच्या स्वागतासाठी सम्राटाने त्याच्या रयतेसाठी कवितेचा विषय दिला ‘डोंगरावरील ढग’. या विषयावर लिहिताना जपान टाईम्सने लिहिले, ‘शिखरावरील ढग हे नवीन दिवसाचे प्रतिक आहेत. हेच ढग सूर्याचे प्रथम किरण पकडतात.........उष:कालाचे प्रथम दर्शन या ढगांनाच होते. नवीन वर्षाची सुरुवातही अशीच होणार आहे. नववर्षात जपान एशियाची नवीन घडी बसवणार आहे याबद्दल आमच्या मनात शंका नाही’. खरेच होते ते! जपानची भूमी तिच्या भूमीपुत्रांच्या पराक्रमात न्हाऊन निघत होती व तिचे डोळे आता पूर्ण पॅसिफिकवर खिळले होते. हे वर्ष शोवा घराण्याचे सतरावे वर्ष होते. (कालगणनेची एक पद्धत) त्याचा अर्थ होता ‘साक्षात्कारी शांती’ अर्थात शांततेचा साक्षात्कार शेवटी कसा झाला हे आपणा सर्वांना माहितच आहे..........
युद्धाची घोषणा राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या आवाजात......
शिखरावरील ढगांना उतरती कळा लागणारच होती, ती अर्थातच एकदम लागली नाही. पर्ल हार्बरचा जुगार यशस्वी झाला पण त्यानंतर एक भीषण युद्ध छेडले गेले. त्यात जपानी सैन्य व नौदल त्यांच्या प्रतिष्ठेला जागत लढले, त्यांनी पराक्रमही गाजवले व कृरतेचे दर्शनही घडविले पण पर्ल हार्बर इतके यश त्यांना कुठेही मिळाले नाही. पर्ल हार्बरच्या विजयानंतर जपानी नौदलाने पॅसिफिकमधे हैदोस घातला परंतु मिडवेच्या युद्धात जपानच्या चार, अकागी, कागा, सोर्यु, व हिर्यु या विमानवाहूनौका बुडविण्यात आल्यावर त्या नौदलाची रया गेली. मिडवेच्या युद्धाला तर केवळ पाच मिनिटात कलाटणी मिळाली. या लढाईनंतर पॅसिफिकमधील जपानची दादागिरी संपुष्टात आली. त्यानंतरचे साईपान व लेटेच्या युद्धाने तर जपानच्या एकेकाळचे बलवान नौदल एखाद्या डबक्यातील खेळण्यातील बोटींसमान भासू लागले.
युद्ध संपण्याच्या काळात तर जपानी नौदलाची परिस्थिती कोणीही कींव करेल अशी झाली. नौदल मुख्यालयाची पडझड झालेली लाल रंगाची इमारत त्या पराक्रमाची साक्ष देत कशीबशी तग धरुन उभी होती. तीही थोड्याच काळात जमिनदोस्त झालीच. जपानच्या ताकदीची साक्ष देणारी अवाढव्य नौका नागाटो आता योकोसुकाबेमधे गंजत पडली. याच नौकेवरुन तिच्या अॅडमिरल यामामोटोने अनेक योजना आखल्या होत्या...............
गेंडा.....
गेंडा युद्धनंतर जपानच्या वायुदलाचा चीफ-ऑफ्-स्टाफ झाला. त्यानंतर तो जपानच्या लोकसभेचा सदस्यही झाला. गेंडा नंतर अमेरिकेचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाऊ लागला.
फुचिडा..........
फुचिडा मिडवेच्या युद्धात जखमी झाला खरा पण वाचला. युद्धानंतर इतर अनेक जपानी आधिकार्यांप्रमाणे त्यालाही जपानी सैन्याच्या अत्याचारांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी बोलाविण्यात आले होते. फुचिडा याला कडवटपणे जेत्यांचा न्याय म्हणत असे. अमेरिकेनेही जपानी युद्धकैद्यांनाही क्रुरतेने वागविले असणार असे जमेस धरुन त्याने अधिक माहिती गोळा करण्यासाठी अनेक परतणार्या युद्धकैद्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातील त्याच्या एका मित्राने तसे काही झाले नसून उलट एका कॉव्हेल नावाच्या म्हातारीने त्यांची कशी काळजी घेतली याचे वर्णन केले. ते ऐकून फुचिडा भांबाऊन गेला. त्याला हे काहीतरी भयंकर वेगळे वाटत होते. शत्रूशी अशी वागणूक त्याने पाहिली नव्हती. या प्रकाराने त्याची ख्रिश्चन धर्माविषयीची उत्सुकता चाळवली गेली. पुढे त्याने तो स्वीकारुन त्याच्या प्रसाराला वाहून घेतले. असे काही जण सोडल्यास पर्ल हार्बरवरील भाग घेतलेल्या इतरांच्या नशीबी मरणच लिहिले होते. त्यातील जवळ जवळ सगळेच नंतरच्या युद्धात ठार झाले.
शिगेरु इताया.........
ले. कमांडर शिगेरु इताया ज्याने पहिल्या हल्ल्यात झिरो विमानांचे नेतृत्व केले होते तो कुरिलेस बेटांवर ठार झाला. अमेरिकन विमान समजुन त्याच्यावर जपानी तोफांनीच मारा केल्यावर त्याचे विमान पडले व त्यात तो ठार झाला.
ले. क. ताकाहाशी.........
ले. कमांडर काकुइचि ताकाहाशी ज्याने डाईव्ह बॉंबर्सचे नेतृत्व केले होते तोही कामिकाझे हल्ल्यात ठार झाला.
शिमाझाकी......
शिमाझाकी ज्याने दुसर्या हल्ल्याचे नेतृत्व केले होते तो ९ जानेवारी १९४५ला फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळला व ठार झाला.
एगुसा..........
ले. कमांडर ताकाशिगे एगुसा जो पुढे फारच प्रसिद्ध झाला, तो सैपानच्या लढाईत ठार झाला.
सोर्युचा कप्तान व ज्यानी यामामोटोची कायमच पाठराखण केली त्या यामागुचीने मिडवेच्या सागरी युद्धात नौकेबरोबर जलसमाधी पत्करली.
यामागुची...
व त्याची शेवटची भेट - एक काल्पनिक तैलचित्र.......
व्हाईस अॅडमिरल नागुमोने सैपानच्या युद्धात पराजयानंतर आत्महत्या केली. अमेरिकन सैनिकांना त्याचे अवशेष नंतर एका गुहेत सापडले. त्याला मरणोत्तर बढती देण्यात आली.
अॅडमिरल नागुमो......
ग्वाडलकॅनॉलच्या युद्धात यामामोटो पॅसिफिकमधील जपानी तळांना भेटी देण्याचा कार्यक्रम ठरवत असताना त्याचा पूर्ण कार्यक्रम अमेरिकेच्या गुप्तहेरखात्याने एका संदेशात पकडला. त्यात १८ एप्रिलला त्याचे विमान कुठे असणार आहे, त्याच्या बरोबर कुठली विमाने असणार आहेत ही माहिती हाती लागल्यावर स्वत: रुझवेल्टने यामामोटोचा काटा काढण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे १६ लढाऊ विमानांनी यामामोटोच्या ताफ्याला सॉलोमन बेटांजवळ अडवले. त्या दरम्यान झालेल्या हवाई लढाईत यामामोटो ठार झाला.
यामामोटो..........
पर्ल हार्बरवर जर तिसरा हल्ला चढवला गेला असता तर पॅसिफिकमधील युद्धाला वेगळेच वळण लागले असते हे निश्चित. बर्याच अमेरिकन तज्ञांचेही हेच म्हणणे आहे. अर्थात युद्धाचा अंतिम निर्णय हाच लागला असता हेही निश्चितच होते. अमेरिकेचे आरमार पर्ल हार्बरवर नांगरुन ठवले ही पहिल्यांदा चूक वाटली होती पण एका दृष्टीने त्याचा फायदाच झाला. या बोटी उथळ पाण्यात बुडाल्यामुळे त्या लगेचच दुरुस्त करण्यात येऊन त्यातील बर्याच युद्धात वापरत्या आल्या. या नौका जर खोल समुद्रात बुडाल्या असत्या तर कायमच्या हातच्या गेल्या असत्या.
गेंडाने नागुमोला कधीच क्षमा केली असेल असे वाटत नाही. ‘आम्ही जर तिसरा हल्ला चढवला असता, इंधनाच्या टाक्या नष्ट केल्या असत्या व लेक्झिंग्टन व एंन्टरप्राईज या विमानवाहू नौका बुडविल्या असत्या तर.............आम्ही अजून एकदाच नाही तर वारंवार हल्ले करुन पर्ल हार्बर ताब्यात घ्यायला हवे होते’. अनेक अमेरिकन नौदलाच्या आधिकार्यांचेही हेच मत पडले. अॅडमिरल निमिट्झ ज्याने अॅडमिरल किमेलची जागा घेतली म्हणाला, ‘नौदलाच्या पॅसिफिकमधील युद्धाच्या अभ्यासकांना शेवटी हेच म्हणावे लागेल की जपानी नौदलाने फार मोठी संधी हातची घालविली. त्यांचा पर्ल हार्बरच्या युद्धाची योजना ही तात्कालिक व फार संकुचित विचाराची होती’. कधी कधी वाईटातूनही चांगले होते असे म्हणतात ते उगीच नाही. अमेरिकेच्या कित्येक नौदल आधिकार्यांनी जपानने त्यांची भिकारडी, जुनाट जहाजे बुडविल्याबद्दल आभारच मानले आहेत. ‘जपानमुळे आम्हाला समुद्रावर आता विमानवाहू नौकाच राज्य करणार आहेत याची खात्री पटली’. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या हल्ल्याने अमेरिकन अलिप्ततेचे धोरण सोडून युद्धात उडी घेतली. त्यामुळे काय झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे.
अमेरिकेत जे दोन तट पडले होते ते नष्ट होऊन जनतेची प्रचंड अभेद्य अशी एकजूट झाली. एक जपानी कमांडर म्हणाला ‘यासाठी तरी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी आम्हाला पदके दिली पाहिजेत’ यातील निराशा सोडल्यास या हल्ल्यामुळे दोस्त राष्ट्रांचा अतोनात फायदा झाला हे नाकारता येणार नाही.
पर्ल हार्बरच्या हल्ल्यातून सध्याच्या अणूबाँबच्या युगात काय धडे घ्यावेत हे मी सांगण्यात अर्थ नाही. तेवढी माझी पात्रताही नाही पण एक गोष्ट मी निश्चितच सांगू शकतो...............
युद्धात काहीही अशक्य नाही..........................
जयंत कुलकर्णी.
समाप्त.
यात भाग घेतलेल्या जपानी आधिकार्यांचे काय झाले हे संक्षिप्तपणे वर आलेले आहेच. या युद्धाचा अभ्यास करताना मला ती जहाजेही जिवंत असल्याचा भास होत होता. त्यांचे काय झाले हे लिहिले नाही तर ही कहाणी अपूर्ण राहील. पण ही कहाणी सध्या अपूर्णच ठेवतो...............यातील बरीचशी जहाजे मिडवेच्या सागरी युद्धात नष्ट झाली. हे युद्ध जिंकल्यावर चर्चिल काय म्हणाला हे वाचल्यावर आपल्याला जपानच्या नौदलाचे महत्व कळेल...........चर्चिलने वॉर कॅबिनेटमधे सांगितले –
‘‘समुद्रावरील या पराभवाने जपानच्या मनात भय निर्माण झाले आहे. जपानचे नौदल हे नुसते नौदल नाही तर त्या देशात ती एक राजकीय शक्ती म्हणून ओळखली जाते हे लक्षात घ्या. या भयामुळे ते कदाचित विचारपूर्वक पावले टाकतील. कदाचित सागरावर लढण्याऐवजी ते पाणबुड्यांचे हल्ले वाढवतील...किंवा चँग-काय शेकच्या फौजांना पराभूत करायचा प्रयत्न करतील. मला वाटते की ते आता इंडिया व ऑस्ट्रेलियावर आक्रमण करायच्या योजनांच्या वाटेला जाणार नाहीत. आपल्याला आता चीनच्या मदतीला जावे लागेल. जर चीन जिंकला गेला आणि आपल्या बाजूचे सरकार जर तेथे सत्तेवर राहिले नाही तर मोठा गंभीर प्रसंग ओढवेल यात शंका नाही. जर जपानच्या नुकसानीचे आकडे खरे असतील तर त्यांच्या उतरत्या ताकदीचा अभ्यास करायला पाहिजे. जर त्यांनी बचावाचे धोरण स्वीकारले तर त्यांचा लचका तोडायची ही नामी संधी आहे.’’
-माझ्या आगामी पुस्तकामधून्............
आता भेट हंपीच्या लेखात किंवा एखाद्या लघूकथेत........:-)
जयंत कुलकर्णी..
प्रतिक्रिया
15 Jun 2013 - 4:12 pm | पैसा
युद्धाचा शेवट असाच सर्वसंहारक असतो का?
लेखमाला उत्तमच झाली. पुढच्या मालिकेची वाट पहात आहे...
15 Jun 2013 - 7:54 pm | अमोल खरे
असेच म्हणतो. खुप सुंदर लेखमाला होती.
21 Jun 2013 - 8:49 pm | मुक्त विहारि
तुमच्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत..
21 Jun 2013 - 10:15 pm | पाषाणभेद
छान लेखमाला.
एक आठवण. आमच्या शाळेत एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. एकदा त्यांनी टोरा टोरा टोरा हा चित्रपट एका व्हिडीओ थेटरमध्ये दाखवला होता. त्यावेळी एका मुलाने काहीतरी चिड येण्यासारखे वर्तन केले होते. नक्की आठवत नाही. पण त्या सरांनी संतापाच्या भरात त्याला खुप मारले होते. आता तो चित्रपटही निट आठवत नाही.
22 Jun 2013 - 8:42 am | प्रचेतस
जबरदस्त लेखमाला आणि समर्पक शेवट.
मिडवेच्या युद्धाबद्दल पण एक लेखमाला येऊ द्यात.
22 Jun 2013 - 10:16 am | सुहास झेले
जबरदस्त.... !!!
आता पुढची लेखमाला कुठली?
23 Jun 2013 - 3:05 pm | अप्पा जोगळेकर
अप्रतिम लेखमालिका. मिडवेच्या युद्धाबद्दल देखील लिहिले तर मजा येईल.
23 Jun 2013 - 4:41 pm | सौंदाळा
माहितीपुर्ण लेखमाला.
25 Jun 2013 - 4:30 pm | मनराव
मस्त........
1 Jul 2013 - 12:52 am | एस
सर्व दहाच्या दहा भाग एका दमात वाचले. मुद्दाम बाजूला ठेवले होते. युद्धस्य कथा रम्या हे कितीही खरे असले तरी त्याहीपेक्षा रंजक (इन्टरेस्टिंग, मनोरंजक नव्हे) भाग म्हणजे त्या सर्व घडामोडींचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मनोवैज्ञानिक अंगाने केलेले विश्लेषण. आपली लेखमाला दोन्ही निकषांवर उजवी ठरली आहे. धन्यवाद.
2 Jul 2013 - 3:49 am | रामपुरी
नवीन माहीती मिळाली. आत्तापर्यंत फक्त एवढंच ठाऊक होतं की पर्लहार्बरमुळे अमेरीका अणुबाँब टाकण्यास उद्युक्त झाली. या लेखमालेमुळे तपशिल समजले. धन्यवाद...
2 Jul 2013 - 5:45 am | कंजूस
फारच छान लेखमाला झाली जयंतराव.
6 Aug 2015 - 1:08 pm | हेमंत लाटकर
जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला जरी धाडसी होता तरी आत्मघातकी होता. जपानला त्याची किमंत हिरोशिमावव नागासकी अणुबँाब संहाराच्या रूपाने मोजावी लागली. बाकी लेख छान लिहला आहे.
6 Aug 2015 - 1:08 pm | हेमंत लाटकर
जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला जरी धाडसी होता तरी आत्मघातकी होता. जपानला त्याची किमंत हिरोशिमावव नागासकी अणुबँाब संहाराच्या रूपाने मोजावी लागली. बाकी लेख छान लिहला आहे.
7 Aug 2015 - 8:57 pm | अभिजित - १
अमेरिकेला हल्ला होणार हे त्याना आधिच माहित होते. पण त्यांनी होऊ दिला. कारण या प्रचंड मोठ्या हल्ल्याचे निमित्त करून त्यांना जपानवर अणुबॉम्ब टाकता आला.
calling मदनबाण !!
https://en.wikipedia.org/wiki/Pearl_Harbor_advance-knowledge_conspiracy_theory
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/northamerica/usa/8932197/Pearl...
7 Aug 2015 - 9:13 pm | गॅरी ट्रुमन
मजाच म्हणायची. म्हणजे जानेवारी १९४२ मध्ये न्युक्लिअर वेपन साठीचा मॅनहटन प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी डिसेंबर १९४१ मध्येच अध्यक्ष रूझवेल्ट यांना अमेरिका नक्की कधी बॉम्ब बनवू शकेल, तो नक्की किती क्षमतेचा असेल, आणि त्यातून किती विध्वंस होईल हे सगळे माहित होते तर.
बाकी चालू द्या.
(हिरोशिमावर हल्ला करायचा निर्णय घेणारे अमेरिकन अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा अडनावबंधू) गॅरी ट्रुमन
9 Aug 2015 - 3:30 pm | विवेकपटाईत
सुन्दर लेखमाला आवडली