माझ्या म्हातारीची इष्टेट..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 Sep 2008 - 12:55 am

राम राम मंडळी,

आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन!

खरं सांगायचं तर आजचा दिवस उजाडल्यापासून, आज ५ सप्टेंबर म्हणजे 'शिक्षक-दिन' आहे इतकीच माहिती मला होती. 'तसे अनेक दिन असतात त्यापैकी हा एक' एवढीच माझी भावना होती. परंतु आजच्या दिनाचं माहात्म्य काय, मोल काय, हे मला समजायला, किंबहुना अनुभवायला संध्याकाळ उजाडावी लागली!

अर्थात, अद्याप माझी पिढी तेवढी मुर्दाड बनली नाहीये हेही तितकंच खरं! प्रांजळपणे सांगायचं तर आज सकाळी उठल्यापासून मला माझ्या कोणत्याही शिक्षकाची याद आली नाही, आठवण झाली नाही. परंतु त्याचसोबत हेही तितकंच खरं की 'शिक्षक' नावाच्या माणसावर माझी खूप श्रद्धा आहे. सुदैवाने माझ्या पिढीला अगदी चांगले, डिव्होटेड शिक्षक मिळाले की ज्यांचं नांव घेतलं किंवा आठवण निघाली की मनामध्ये आजही केवळ आदरभाव उत्पन्न होतो. इथे मिपावर माझ्या पिढीतले अनेक जण आहेत त्यांनाही कमीअधिक फरकाने हा अनुभव येत असणार, त्यांना लाभलेल्या डिव्होटेड शिक्षकांची आठवण येत असणार! हे सगळं लिहायचं कारण इतकंच की आजच्या पिढीत शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी नातं हे तेवढंच सेन्सेटिव्ह आहे का हो? मला तरी शंका आहे! आजची दुनिया खूप फास्ट आहे, इन्स्टंट आहे, कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही, जी काही नाती आहेत ती केवळ सर्व प्रोफेशनल आहेत ही सर्व या शंकेमागची कारणं आहेत! असो, या विषयावर आजही दोन्ही बाजूंनी लिहिता येईल तेव्हा आजचा शिक्षक-विद्यार्थी संबंध हा या लेखाचा हेतू नाही!

मग या लेखाचं कारण काय? तर ते असं, की आज अचानक आमच्या घरी 'शिक्षक-दिन' साजरा झाला. एका निवृत्त शिक्षिकेच्या आयुष्यात कृतकृत्य वाटावं, आयुष्याचं सार्थक वाटावं असा आजचा दिवस होता!

माझी म्हातारी (आमच्याकडे आईस 'म्हातारी'च म्हणायची पद्धत आहे बरं का!) वैदेही अभ्यंकर ही निवृत्त शिक्षिका. आयुष्याची २९-३० वर्ष ती एका प्रामाणिक, डिव्होटेड आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचं आयुष्य जगली आणि निवृत्त झाली. तिच्या शिक्षकी पेशाची सुरवात तिने भिवंडी येथील छबिलदास समुहाच्या प रा विद्यालयापासून केली. आमच्या म्हातारीनं शिकवलेले १९६८ सालचे, म्हणजे आजपासून बरोब्बर ४० वर्षांपूर्वीचे ३ विद्यार्थी आणि १ विद्यार्थीनी आज पत्ता शोधत शोधत शिक्षक दिनानिमित्त 'अभ्यंकर बाईं'ना भेटायला आले होते, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले होते!

आता ४० वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे चेहेरे माझ्या म्हातारीस थोडेच आठवणार? परंतु त्या विद्यार्थ्यांनीच माझ्या म्हातारीला आपापली ओळ्ख करून दिली आणि "बाई, तुम्ही आम्हाला भिवंडीच्या प रा विद्यालयात १९६८ साली 'मराठी' हा विषय शिकवायला होतात!" अशी आठवण करून दिली. सर्वांनी अभ्यंकर बाईंना वाकून नमस्कार केला!

गप्पांच्या ओघात एका विद्यार्थ्याने (आज तो विद्यार्थी एक चांगला डॉक्टर आहे!),

"बाई, आजही माझ्या डोळ्यासमोर तुमचा मराठीचा तास जसाच्या तसा आहे! तुम्ही कविता इतकी सुंदर शिकवायचात!"

अशी आठवण करून दिली आणि माझ्या म्हातारीच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू उभे राहिले! मी ते सर्व दृष्य नि:शब्द होऊन पाहात होतो!

थोड्या वेळाने त्या विद्यार्थी-विद्यार्थींनींनी आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या शिक्षिकेचा निरोप घेतला!

"बाई, तब्येतीची काळजी घ्या बरं का! आम्ही सर्व तुम्हाला पुन्हा भेटायला अगदी नक्की येऊ! आमच्या बॅचचे अजूनही दोघंतिघं जण आहेत जे आज काही कारणांनी येऊ शकले नाहीत!"

"नक्की या रे...!"

आमची म्हातारी चुकून "नक्की या रे बाळांनो!" असं म्हणणार होती! परंतु समोर उभ्या असलेल्या ५०-५५ वयाच्या आता अनोळखी झालेल्या विद्यार्थ्यांना 'बाळांनो' तरी कसं म्हणायचं हा तिला प्रश्न पडला होता! :)

एक छानसा पुष्पगुच्छ आणि एक उत्तम महागाईची साडी देऊन त्या विद्यार्थ्यानी आमच्या म्हातारीचा निरोप घेतला!

उजवीकडे दोन विद्यार्थी, डावीकडे एक विद्यार्थीनी आणि एक विद्यार्थी आणि मधोमध त्यांची शिक्षिका! माझी म्हातारी, वैदेही अभ्यंकर! :)

विद्यर्थ्यांनी 'अभ्यंकर-बाई'ना कौतुकाने घेतलेली नारायणपेठ साडी आणि पुष्पगुच्छ! :)

ते विद्यार्थी गेल्यावर माझी म्हातारी मला इतकंच म्हणाली,

"मला आयुष्यात लाखो कऱोडो रुपये काही मिळवता आले नाहीत परंतु ही साडी आणि हा जो पुष्पगुच्छ आहे ना, त्याची किंमत माझ्याकरता करोडो रुपायांपेक्षाही अधिक आहे, अनमोल आहे!"

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयशिक्षणअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

6 Sep 2008 - 2:03 am | भाग्यश्री

वा.. फार छान वाटलं असेल नं असे जुने विद्यार्थी भेटून? आम्ही पण जायचो काही शिक्षकांना भेटायला.. पण पूर्वीचे शिक्षकही वेगळे अन विद्यार्थीही!
बाकी, साडी एकदम सुरेख आहे! :)

विजुभाऊ's picture

6 Sep 2008 - 12:09 pm | विजुभाऊ

शिक्षकाना जुने विद्यार्थी भेटायला येणे हाच एक सुंदर अनुभव असतो.
आणि यशस्वी विद्यार्थी हे गुरुचे स्वप्न असते. गुरुचे तेच यश असते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री's picture

6 Sep 2008 - 2:18 am | आनंदयात्री

सुंदर अनुभव तात्या. तुमचा उर पण आईबद्दलच्या अभिमानाने फुलुन आला असेल.
या वयात असे आठवण ठेउन आले की फार आनंद होतो वयस्कर लोकांना, अहो म्हातारपणी आपला काही उपयोग नाही, आपले आता वय झाले अश्या काही विचारांनी त्यांना वाईट वाटत असते. असे क्षण म्हणजे आयुष्यातल्या कर्तुत्वाची आठवण करुन देणारी सध्याच्या दु:खाला विसरवणारी अन मनावर अलगद फिरणारी मोरपिसंच !

खादाड_बोका's picture

6 Sep 2008 - 2:10 am | खादाड_बोका

मलाही माझ्या शाळेत असलेल्या "मुळे" बाईंची आठवण आली.
त्याही अत्यंत प्रेमळ होत्या, व खुप छान शिकवायच्या.
आजही आठवण आली की डोळे पाणावतात.:( :(

गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णु ,
गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रंम्ह ,
तस्मैसी गुरु देवता....

शितल's picture

6 Sep 2008 - 2:16 am | शितल

तात्या,

>>>"मला आयुष्यात लाखो कऱोडो रुपये काही मिळवता आले नाहीत परंतु ही साडी आणि हा जो पुष्पगुच्छ आहे ना, त्याची किंमत माझ्याकरता करोडो रुपायांपेक्षाही अधिक आहे, अनमोल आहे!"

निशब्द्च केले
:)
मनाला हर्षित करणारा अनुभव.

मला अजुन ही आठवते, शाळा सोडुन खुप वर्ष झाली तरी रस्त्यात अचानक आमच्या ८ वी. तील वर्गशिक्षिका भेटल्या होत्या, आणि त्यांनी मला खांद्यावर हात ठेवुन विचारले होते काय ग, कशी आहेस.?
तेव्हा मी त्यांना विचारले होते तुम्हाला मी आठवते अजुन :)
आणि मा़झे डोळे भरून आले होते. :)

प्राजु's picture

8 Sep 2008 - 2:10 am | प्राजु

अतिशय सुखद आहे हे.
एका शिक्षेकेला ४० वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची गुरूदक्षिणा मिळणं म्हणजे शिक्षकी पेशाचा हा सन्मान आहे.
हा सन्मान आपल्या आईंना लाभला. धन्य ती शिक्षिका आणि धन्य ते विद्यार्थी.. :)

आवांतर : काल प्रतिसाद लिहिला होता. पण त्याचे बहुतेक नुसतेच पूर्वपरिक्षण केले गेले .. प्रतिक्रिया प्रकाशित करा..केलेच नाही असे वाटते.. असो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

6 Sep 2008 - 3:08 am | बेसनलाडू

(अनुभवी)बेसनलाडू

लिखाळ's picture

6 Sep 2008 - 3:21 am | लिखाळ

खरेच! तुमच्या आईंसाठी फारच संस्मरणीय दिवस.
वाचुन आनंद झाला.
--लिखाळ.

केशवसुमार's picture

6 Sep 2008 - 1:53 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
खरेच! तुमच्या आईंसाठी फारच संस्मरणीय दिवस.
वाचुन आनंद झाला.
(_/\_)केशवसुमार
बाकी तुम्ही म्हणता ते खरय आपली पिढी खरोखरच नशिबवान..आपल्याला डिव्होटेड शिक्षक लाभले
(कृतज्ञ)केशवसुमार

सर्किट's picture

6 Sep 2008 - 3:40 am | सर्किट (not verified)

सुंदर अनुभव. अत्यंत ओळखीचा अनुभव !

-- सर्किट

मदनबाण's picture

6 Sep 2008 - 7:05 am | मदनबाण

सुंदर अनुभव.....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रियाली's picture

6 Sep 2008 - 7:58 pm | प्रियाली

सुंदर हृदयस्पर्शी अनुभव.

तूर्तास इतकेच
(घाईत) प्रियाली

आजानुकर्ण's picture

6 Sep 2008 - 5:11 am | आजानुकर्ण

लेख आवडला. सुंदर अनुभव.

किंबहुना यामुळेच 'कुपुत्र जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' असे संस्कॄत सुभाषितकार म्हणून गेले आहेत.

आपला,
(असंस्कॄत) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 5:48 am | विसोबा खेचर

किंबहुना यामुळेच 'कुपुत्र जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' असे संस्कॄत सुभाषितकार म्हणून गेले आहेत.

या लेखात पुत्र आणि माता हा संदर्भ नसून विद्यार्थी आणि शिक्षक हा संदर्भ आहे!

आपला,
(मनोगतींना पुरून उरलेला!) तात्या.

आजानुकर्ण's picture

6 Sep 2008 - 5:59 am | आजानुकर्ण

शीर्षकातील म्हातारी या शब्दाचा अर्थ काय? विद्यार्थी की शिक्षक?

आपला,
(अर्थवाही) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 6:21 am | विसोबा खेचर

शीर्षकातील म्हातारी या शब्दाचा अर्थ काय? विद्यार्थी की शिक्षक?

तो माझ्या म्हातारीचा अनुभव आहे म्हणून तसे शीर्षक फक्त ठेवले आहे!

लेखाचा विषय हा 'विद्यार्थी - शिक्षक' असाच आहे हे एकतर आपण बेअक्कल असल्यामुळे आपल्याला समजले नसावे किंवा आपण एक नंबरचे मिसळपावद्वेष्टे मनोगती असल्यामुळे तसे आपल्याला समजून घ्यायचे नसावे! आणि म्हणूनच आपण मुद्दाम खोडी काढण्याकरता ते संस्कृत सुभाषित टाकले आहे!

असो, मी फालतू मनोगतींशी कुठलाही वाद घालू इच्छित नाही. आपली संस्कृतची ट्यँव ट्यँव ट्यँव तिकडे मनोगतावर जाऊन करा!

यापुढील या संदर्भातले आपले सर्व प्रतिसाद उडवले जातील!

तात्या.

कुपुत्रो जायेत ह उल्लेख शंकराचार्यांच्या देव्यपराधक्षमापन स्तोत्रात आहे.हे स्तोत्र गेय आहे.
आईला(जगन्मातेस) उद्देशून केलेली केलेली आळवणी छान आहे.
अर्थात या लेखासाठी हा संदर्भ किती योग्य आहे अथवा नाही हा विसोबा आणि आजानुकर्ण यांचा आपापसातला वाद चालू द्या.
या स्तोत्राचा शेवट फार छान आहे.
मत्समं पातकी नास्ती
पापघ्नीं त्वत् समा नही
एवं ज्ञाता महादेवी
यथा योग्यं तथा कुरु.
चूभू धोंडोशास्त्रीं सारख्या पंडीतांनी दुरुस्त करावी.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

आनंद's picture

6 Sep 2008 - 10:03 am | आनंद

अहो दुधात साखरे सारखे मिसळुन जा. मिठाचा खडे का टाकताय?

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 2:35 pm | विसोबा खेचर

अहो दुधात साखरे सारखे मिसळुन जा. मिठाचा खडे का टाकताय?

जाऊ द्या हो आनंदराव, सोडून द्या!

आम्हीही यापुढे आजानुकर्णाचे प्रतिसाद एक मानसिक आजार समजून सोडून देऊ. मनावर घेणार नाही..!

४० वर्षांपूर्वीचे काही विद्यार्थी त्यांच्या शिक्षिकेला भेटतात, हातात हात घेऊन प्रेमभरे, "बाई, तब्येतीची काळजी घ्या हां!" असे म्हणतात, हा वास्तविक त्या शिक्षिकेकरता जसा कृतकृत्याचा क्षण तसाच त्या विद्यार्थ्यांकरताही अभिमानाचा क्षण, कृतज्ञतेचा क्षण! आणि फक्त हेच मी या लेखात सांगायचा प्रयत्न केला होता/आहे. असे असताना त्यात प्रतिसाद देऊन 'कुपूत्र' किंवा 'कुमाता' हे विषय मुद्दाम आणले गेले या विकृतीकरता राहून राहून वाईट वाटले!

अजून काय लिहू?

तात्या.

नंदन's picture

6 Sep 2008 - 6:00 am | नंदन

अनुभव वाचून छान वाटलं. खरी श्रीमंती ती हीच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

6 Sep 2008 - 7:11 am | धनंजय

खरी श्रीमंती ती अशी.

(त्या विद्यार्थ्यांचेही कौतूक वाटते.)

जैनाचं कार्ट's picture

6 Sep 2008 - 10:38 am | जैनाचं कार्ट (not verified)

अनुभव वाचून छान वाटलं. खरी श्रीमंती ती हीच.
सहमत.

(त्या विद्यार्थ्यांचेही कौतूक वाटते.)
हेच म्हणतो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अवलिया's picture

6 Sep 2008 - 8:00 pm | अवलिया

सहमत

मी पण हेच म्हणतो

नाना

घाटावरचे भट's picture

7 Sep 2008 - 9:10 am | घाटावरचे भट

ऐसेच म्हणतो....

(एखादा दुसराच डिव्होटेड् शिक्षक लाभलेला) भटोबा

पिवळा डांबिस's picture

7 Sep 2008 - 9:36 pm | पिवळा डांबिस

असेच म्हणतो....

(एकसे एक सरस आणि डिव्होटेड शिक्षक मिळायचे भाग्य लाभलेला) पिडां

रामदास's picture

6 Sep 2008 - 7:51 am | रामदास

काल आपल्या मिपाचे लेखक विनायक प्रभू यांचे खास शिक्षक पालकांसाठी व्याख्यान घाटकोपरच्या विद्याभवन शाळेत झाले. पाऊस असूनही दोनशे श्रोते आले होते. त्यात तात्या आपल्या मातोश्रींसारख्या जुन्या शिक्षीका आणि त्यांचे जुने पाल्य आले होते. बाई आणि विद्यार्थीनींची गळाभेट हे बघण्यासारखे दृश्य होते.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सहज's picture

6 Sep 2008 - 7:53 am | सहज

खरी श्रीमंती ती हीच असेच म्हणतो.

आई-वडीलांची पुण्याई तात्याच्या पाठी कायम असणार आहे.

वाचून छान वाटले.

एकलव्य's picture

6 Sep 2008 - 8:08 am | एकलव्य

त्या विद्यार्थांचे, त्या शिक्षिकेचे, तात्यांचे आणि आमचेही.

समयोचित आणि सुंदर आठवण!

(शिष्य) एकलव्य

कोलबेर's picture

6 Sep 2008 - 10:05 am | कोलबेर

समयोचित आणि सुंदर आठवण!

-कोलबेर

गुरवः सन्ति बहवः शिष्यवित्तापहारकः
दुर्लभः स गुरुर्लोके शिष्यचित्तापहारकः

म्हणजे शिष्याचे वित्त अपहरण करणारे गुरू अनेक आहेत, त्यांना तोटा नाही पण.. शिष्यांचे चित्त अपहरण करणारा गुरू दुर्मिळ असतो.

अभ्यंकरकाकूंच्या बाबतीत वरील सुभाषित चपखल लागू पडते. आयुष्यभर काकूंनी ज्ञानदानाचे जे कार्य नि:स्वार्थीपणे केले त्याला याहून मोठी पावती कुठली असू शकते? हा प्रसंग दुर्मिळ आहे.

केवळ पाट्या टाकायच्या आणि तास भरायचे म्हणून शिकवणारे रग्गड. आज तसेच लोक सर्वत्र भरलेले आहेत. पण विद्यार्थ्यांना आपुलकीने शिकवणारे फारच कमी. काकूंची आपुलकी आम्ही त्यांच्याघरी गेल्यावर प्रत्येकवेळी अनुभवतो. ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असते. त्या जशा उत्तम शिक्षिका आहेत तशाच उत्तम माणूस आहेत. उत्तम सुगरण आहेत. स्वतःच्या पाकनैपुण्याने बनविलेले उत्तमोत्तम पदार्थ आपुलकीने खाऊ घालणारी माऊली आहेत.

जीवन सार्थकी लागावं, कृतकृत्य व्हावं असा हा क्षण काकूंनी अनुभवला, याचा आम्हांदिकांस अवश्यमेव आनंद आहे. अभ्यंकरकाकूंना आमचा दंडवत.

त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि असाच आनंद मिळत राहो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.

आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 11:58 am | विसोबा खेचर

पंत,

आपण आपल्या अनुदिनीवर अगदी आवर्जून आमच्या म्हातारीबद्दल जे काही आदरयुक्त गौरवोद्गार काढले आहेत त्याकरता आमच्यापाशी शब्द नाहीत!

आहे ती केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना!

आपल्याही मातोश्रींच्या चरणी आमचा दंडवत रुजू करतो!

स्नेहांकित,
तात्या.

यशोधरा's picture

6 Sep 2008 - 11:04 am | यशोधरा

हृद्य अनुभव. तात्या, तुम्ही शब्दबद्धही छान केला आहे.

रामदास's picture

6 Sep 2008 - 10:10 am | रामदास

आपण योग्य असा संदर्भ द्याल असे वाटलेच होते.अपेक्षा पूर्ण.धन्यवाद.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

दत्ता काळे's picture

6 Sep 2008 - 2:06 pm | दत्ता काळे

तात्या
असे गुरू आणि गुरुंची आठवण ठेवणारे शिष्य आजकाल विरळेच.

आपल्या मातोश्रींच्या चरणी माझा दंडवत

स्वाती राजेश's picture

6 Sep 2008 - 3:19 pm | स्वाती राजेश

छान लिहिले आहे, अनुभव शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद...
शिक्षकाच्या आयुष्यात यापेक्षा मोठा आनंद तो काय असावा?
आपल्या मातोश्रींना आमचा नमस्कार सांगा....

ऋषिकेश's picture

7 Sep 2008 - 10:57 pm | ऋषिकेश

असेच म्हणतो. माझाही नमस्कार सांगा.
अतिशय हृद्य प्रसंग तितक्याच ताकदिने मांडला आहे. वाचून अतिशय आनंद झाला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

देवदत्त's picture

6 Sep 2008 - 4:18 pm | देवदत्त

सुंदर अनुभव.
आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद, तात्या.

तुमच्या मातोश्रींना माझाही नमस्कार सांगा :)

झकासराव's picture

6 Sep 2008 - 4:52 pm | झकासराव

तात्या भाय
मस्त अनुभव लिहिला आहे.
समोर विद्यार्थी म्हणुन असलेल्या लोकांचे फोटो पाहिले तर ते जवळपास माझ्या वडीलांच्या वयाचे असावेत.
:)
इतक्या वर्षानी देखील त्यानी केलेल त्यांच्या गुरुप्रती प्रेम उच्चच. आणि हे प्रेम मिळवणारी गुरु देखील.
तुमच्या मातुश्रींच्या चरणांवर आमचा दंडवत घाला आज घरी गेल्या गेल्या. :)

(अवांतर : तेवढाच तात्याचा व्यायामदेखील होइल )

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

कलंत्री's picture

6 Sep 2008 - 5:46 pm | कलंत्री

तात्या,

आपण सगळे आपल्या शैलीत लिहिल्यामुळे खुपच छान आणि मनाला भावणारे झाले आहे. अभिनंदन.

शिक्षकदिवसाला अगदी आवर्जुन येऊन आपल्या शिक्षिकेचा सत्कार करणार्‍या आणि असे विद्यार्थी निर्माण करणार्‍या दोघांनाही माझे मनपूर्वक अभिवादन.

तात्या, आपणही मिपानिर्माण करुन मराठीची अमुल्य अशी सेवाच केली आहे. यात आपल्या आईचा वाटा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा दिसतच आहे.

भारतीय संस्कृतीचे गुरु आणि शिष्य असे अभिन्न आणि सुंदर असे अंग आहे त्याचा प्रत्यय आला आहे.

द्वारकानाथ

चित्रा's picture

11 Sep 2008 - 1:22 am | चित्रा

शिक्षकदिवसाला अगदी आवर्जुन येऊन आपल्या शिक्षिकेचा सत्कार करणार्‍या आणि असे विद्यार्थी निर्माण करणार्‍या दोघांनाही माझे मनपूर्वक अभिवादन.
असेच म्हणते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2008 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
मनाला भावणारा अनुभव आवडला. शिक्षकांना आपल्या श्रमाचं खरं चीज अशा घडलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीनेच होते.
विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतलेल्या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेला, माझ्याही शिक्षणदिनाच्या शुभेच्छा !!!

-दिलीप

मीनल's picture

6 Sep 2008 - 6:42 pm | मीनल

छान लेख!

का कुणास ठाऊक ?
पु ल .देशपांडेची `चितळे मास्तर` कथा आठवली .
http://www.marathifm.com/Marathi%20Kathakathan/Chitale%20Mastar.htm

मीनल.

स्वाती दिनेश's picture

7 Sep 2008 - 12:20 am | स्वाती दिनेश

वा तात्या,मनाला स्पर्शून जाणारा अनुभव! काकूंना इतके जुने विद्यार्थी आवर्जून भेटायला आल्याचे पाहून धन्य वाटलं असेल आणि त्या हृद्य क्षणांचा साक्षीदार म्हणून तुलाही ..
आपली पिढी खरंच भाग्यवान की आपल्याला असे डिव्होटेड शिक्षक लाभले,
स्वाती

मृदुला's picture

7 Sep 2008 - 3:30 am | मृदुला

चाळीस वर्षांपूर्वीचे विद्यार्थी शोधाशोध करून आपल्या बाईंना शोधायला आले याचे कौतुक वाटले. विद्यार्थ्यांच्या आठवणीत अनेकानेक वर्षे राहणार्‍या बाईंचेही.

गोष्ट वाचून परवा एक आज्जी भेटल्या होत्या त्याची आठवण झाली. दुपारी कुठे चाललात म्हटलं तर 'चष्मा दुरुस्तीला टाकलाय, तो घ्यायला' म्हणाल्या. नंतर चष्मा कसा मोडला वगैरे गोष्ट सांगून म्हणाल्या, "आता तो चष्म्याच्या दुकानातला मुलगा, सेल्समन गं, मला म्हणाला, 'मिस, या वेळेला दुरुस्त करून देतो पण परत मोडून नका.' 'मिस' म्हणतो अजून. तो प्राथमिक शाळेत माझ्या वर्गात होता. वय सहा ते दहा. चार वर्षं. आणि म्हणाला, 'परत मोडू नका, पुढच्या महिन्यात निवृत्त होतो आहे मी.' हा मुलगा, मुलगा कसला आजोबाच! अजून मला मिस म्हणून हाक मारतो." आजींच्या डोळ्यासमोर तो आठ नऊ वर्षाचा मुलगा दिसत असणार. त्या तृप्त चेहर्‍यानी स्वत:शीच हसत होत्या. मी मात्र मुलगा (!) ६५ वर्षांचा म्हणजे या टुणटुणीत आ़ज्जी कितीच्या असा हिशोब करत होते.

मृदुला's picture

7 Sep 2008 - 3:33 am | मृदुला

शीर्षकातले ५०/५० :
सुरुवातीला, मला लाभलेल्या चांगल्या नि न-चांगल्या शिक्षकांचे प्रमाण ५०/५० असा काहीसा प्रतिसाद द्यायचा विचार होता. लिहिता लिहिता तो किस्सा आठवला आणि मूळ वाक्य विसरलेच.

गणा मास्तर's picture

7 Sep 2008 - 12:37 pm | गणा मास्तर

उत्तम अनुभव तात्या
शाळेत मलाही असेच तळमळीने शिकवणारे शिक्षक लाभले.
तुमच्या आईला माझा नमस्कार कळवा.

आपला
(तासिका तत्वावर मास्तरकी केलेला आणि 'सर तुमच्यामुळे प्रॅक्टीकल चांगले गेले' हे ऐकल्यावर अपार आनंदी झालेला) गणा मास्तर

मन's picture

7 Sep 2008 - 12:41 pm | मन

आणि हृदय्स्पर्शी अनुभव.
लेख आवडला. मनापासुन आवडला.
दोन्ही; ते शिक्षक/शिक्षिका आणि विद्यार्थी ह्यांचं कौतुक आणि आदर वाटतो.
अवांतरः- माझी म्हातारी आजही दटावुन "वेळेवर झोपत जा. आणि खाण्याची हेळसांड करुन घेउ नकोस." हे जेव्हा दर वेळेला( ती स्वतःच दवाखान्यात ऍड्मिट असताना!)
घरी गेल्यावर सांगते; तेव्हाच खरी अशी दटवुन घेण्याची मजा कळते.

आपलाच,
मनोबा

सुनील's picture

7 Sep 2008 - 5:28 pm | सुनील

चाळीस वर्षांनी आपली आठवण काढीत आपले तेव्हाचे विद्यार्थी आवर्जून घरी येतात, भेटतात, बोलतात हा कोणत्याही शिक्षकासाठी असणारा आनंदाचाच क्षण. दिलेल्या भेटवस्तूंचे मूल्य ही बाब गौण.

प्रसंग हृदयस्पर्शी आणि तो मांडला आहे तोही सुंदर रीतीने.

(सद्गदित) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2008 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझी आईपण शिक्षिका होती. माझ्या आणि आईच्या चेहय्रात अगदी चित्रपटात शोभेलसं साम्य आहे. अजूनही मला रस्त्यात अचानक माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठे, अनोळखी लोक थांबवतात, चौकशी करतात माझी, घरच्यांची आणि नंतर जोशीबाईंच्या आठवणी सांगतात, छान वाटतं. नंतर मला माझा आणि आईचा एक संवाद आठवतो.

आम्ही, मी आणि भाऊ, शाळेतल्या बय्राच शिक्षकांना नावं ठेवायचो. आई म्हणायची, "तुमचे आई-वडील शिक्षक आहेत, त्यांना कुणी नावं ठेवली तर?" त्यावर माझं उत्तर तयार होतं, "तुम्ही दोघं वाईट शिकवत असाल तर तुमचेही विद्यार्थी नावं ठेवतील तुम्हाला!" आणि ती त्यावर शांत बसायची, नुसतं हसायची!

आज त्यांच्या शाळा-कॉलेजात गेलं, त्यांचे माजी विद्यार्थी भेटले की जाणवतं त्या नकळत्या वयात आमचा त्यांच्यावर असलेला विश्वास किती सार्थ होता ते!

शाळा-कॉलेजात नाही पण सुदैवाने पुढे विद्यापीठात शिकताना मला खूप चांगले शिक्षक भेटले, आणि आजही माझा त्यांच्याशी इ-संपर्क आहे.

आपल्या मातोश्रींना शिक्षिकेच्या भूमिकेचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले! :)
आपल्या शिक्षिकेची मनापासून आठवण ठेवणार्‍या त्या विद्यार्थ्यांचेही कौतुक

(आमच्या चौथीतल्या रसाळ बाईंची आठवण झाली. दरवर्षी त्यांच्याकडून तीळगूळ घेत होतो गेल्या दोन भारतवार्‍यांमधे भेट झालेली नाही. जवळ घेऊन, "कसा आहेस रे बाळा? आयुष्मान भव." म्हणून त्यांनी प्रेमाने डोक्यावरुन फिरवलेला हात हा जन्माची शिदोरी आहे!)
तात्या, आपल्या पिढीला डेडिकेटेड शिक्षक/शिक्षिका लाभले हे खरे आहे. आता ते प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

(वालचंद इंजिनियरिंगला मास्तरकी केलेला आणि मायक्रोप्रोसेसर शिकवून विद्यार्थांकडून कौतुकाचे चार शब्द घेतलेला)
चतुरंग

सर्किट's picture

8 Sep 2008 - 9:44 pm | सर्किट (not verified)

(वालचंद इंजिनियरिंगला मास्तरकी केलेला आणि मायक्रोप्रोसेसर शिकवून विद्यार्थांकडून कौतुकाचे चार शब्द घेतलेला)

रंगराव !!

वालचंदला मीही पार्ट टाईम मास्तरकी केलेली आहे !!! (तशी मास्तरकी आमच्या रक्तातच आहे गेल्या चार पिढ्या ).

व्यनि पाठवतो.

-- सर्किट

म्हणजे आपण एकाच गुरुकुलात राहून गेलोय की?
पाठवा, व्य. नी. ची वाट बघतोय.

चतुरंग

सर्वसाक्षी's picture

7 Sep 2008 - 10:49 pm | सर्वसाक्षी

एक अभिमान वाटावा असा अनुभव!

शिक्षक विद्यार्थी हे नाते असेच असते. आज कधी कधी वाटते की जर शाळेतले शिक्षक आज भेटले तर तेव्हा केलेल्या उपदव्यापांबद्दल, टिंगली बद्दल ठेवलेल्या टोपण नावांबद्दल चक्क पाय धरुन माफी मागावी आणि म्हणावे की चूक झाली, आमच्या मनात असे काही नव्हते पण त्या वयाचा दोष म्हणून हातुन असे घडले.

चित्तरंजन भट's picture

8 Sep 2008 - 2:16 pm | चित्तरंजन भट

एक अभिमान वाटावा असा अनुभव!
साक्षी महाराजांशी पूर्णपणे सहमत आहे. तुमच्या मातोश्रींपर्यंत सा॰ न॰ पोचवावा तात्याबा.

संदीप चित्रे's picture

8 Sep 2008 - 4:53 am | संदीप चित्रे

तात्या -- ह्या बाबतीत आपण दोघे एकाच नावेचे प्रवासी आहोत. माझीही आई निवृत्त शिक्षिका आहे आणि कुठून कुठून जुने विद्यार्थी भेटायला येतात.
आई अमेरिकेत आली की इथल्या विद्यार्थ्यांचे ही फोन येतात, शाळेच्या आठवणी काढतात.

आता आई शाळेत शिकवत नाही पण काही जुने विद्यार्थी त्यांच्या मुलांना घरी ट्यूशनला घेऊन येतात की तुम्ही घरी तरी ह्याला / हिला शिकवाच :)

श्रीकृष्ण सामंत's picture

8 Sep 2008 - 6:54 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या आईचा फोटो पाहिल्यावर मला माझ्या आईची आठवण आली.

"असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तू असता आम्हा काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

वैशाली हसमनीस's picture

8 Sep 2008 - 7:11 am | वैशाली हसमनीस

तात्या,आपण आपल्या आईचा अनुभव सुंदर शब्दात सांगितलात.शिक्षकदिनानिमित्त माझ्यातर्फे त्यांना माझ्याही शुभेच्छा द्या !असे अनेक क्षण माझ्याही आयुष्यात आले आहेत.अश्यावेळी असे वाटते की सर्व काही पैशानी विकत घेता असे मानणार्‍यांना तुच्छतेने म्हणावे,'पहा,हे सुख तुम्हाला मिळते कां ते?'आयुष्य धन्य मानावे असे वाटणारा तो क्षण !

ऋचा's picture

8 Sep 2008 - 10:23 am | ऋचा

माझी आई पण शिक्षिका आहे.
आईच्या हाताखालुन गेलेले विद्यार्थी आजही घरी येतात आणि तीला शिक्षक दिनाची भेट देऊन जातात.
त्यातील काही विद्यार्थी खुप मोठे झालेत पण वाकुन नमस्कार करतात(लाज वाटुन न घेता) खुप छान वाटत ते पाहुन.
:)

तात्या खरच खुप छान आहे हो हा अनुभव तुमच्या आईचा.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"