खूप छान होती ती, गोड होती...
"जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण..
आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ...
कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता. मरीनड्राईव्हला Queen's Neckless म्हणतात आणि 'ती Queen म्हणजे मीच, हा रस्ता म्हणजे माझाच Neckless आहे' असं मात्र ती गंमतीने म्हणायची. मला जर कधी या संदर्भातला निर्णायक अधिकार प्राप्त झाला तर मी मरीनड्राईव्हच्या रस्त्याला तिचं नांव देईन..
फारा वर्षांपूर्वी वरळी सीफेसला बाबूलाल नावाचा एक पाणीपुरीवाला होता. तिला बाबूलालची पाणीपुरी अत्यँत प्रिय होती. बाबूलालच्या मुलाला धंद्यात मुळीच रस नव्हता पण चांगली नौकरीही मिळत नव्हती. His Highness Sir J R D Tata यांना केवळ एक फोन करून तिने बाबूलालच्या मुलाला टाटासमुहात चिकटवला होता अशी आठवण वहिदाजींनी सांगितली होती. मरण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ऑक्सिजनवर असताना तिने बाबूलालची पाणीपुरी खायची इच्छा व्यक्त केली होती...!
मथुरापेढा, अजमेरी कलाकंद, आणि आमच्या मुंबैच्या मेरवनचा मावाकेक तिला खूप आवडत असे. 'मुंबै माझं First Love' असं ती म्हणत असे आणि त्यानंतर तिला लखनऊ आवडत असे. खूप निष्पाप, निर्विष होती ती...
अंथरुणावर खिळण्यापूर्वीची २-३ वर्ष ती स्पूलवरती एकटीच दीदीची गाणी ऐकायची आणि रडायची. अंथरुणावर खिळल्यावर दीदी तिला एकदा भेटायलाही गेली होती तेव्हा दीदीचा हात हातात घेऊन खूप रडली होती ती...
मुंबईत आता बांद्र्याला तिची कबर आहे..तिच्यावर भरपूर धूळ आहे..
खरं तर त्या कबरस्तानातील तिची कबरही आता हरवत चालली आहे..!
खुदा निगेहेबान हो तुम्हारा या गाण्यात
उठे जनाजा जो कल हमारा
कसम है तुमको न देना कांधा...!
हे तिनं म्ह्टलं होतं ते तसं एका अर्थी खरंच ठरलं....
शेवटली काही वर्ष फार एकाकी होती ती.. कुणी भेटायला येईल का? निदान फोनवर तरी कुणी बोलेल का..?
कुठल्याही चित्रपटाच्या शुटींगच्या अखेरच्या दिवशी सर्व कामगारांना भरपूर मिठाई वाटायची ती...
तिचा तो अरेबियन व्हिलाही आता नामशेष झाला.. आम्हाला ती वास्तूही जतन करून ठेवता आली नाही..!
इथे वेळ कुणाला आहे..? शापित का होईना, परंतु मधुबाला नावाची एक कुणातरी यक्षिण होती हे देखील आता आम्ही फार काळ लक्षात ठेवू की नाही, हे माहीत नाही..!
-- तात्या.
प्रतिक्रिया
24 Apr 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
तात्या, मधुबालाची कबर बांद्र्याला कुठे आहे? मुंबैत आल्यावर जमल्यास एकदा पाहीन म्हणतो.
-मधुबालाप्रेमी बॅटमॅन.
24 Apr 2013 - 12:50 pm | विसोबा खेचर
नक्की जाऊया.. रफीसाहेबांची आणि तिची कबर शेजारी शेजारी आहे..!
कधी उदास झालो की एकटाच जातो फुलं घेऊन आणि बसतो दोन घटका तिच्या कबरीपाशी...
24 Apr 2013 - 12:53 pm | बॅटमॅन
नक्कीच!!! रफीसाहेबांची कबरही शेजारीच आहे हे बहुत रोचक.
24 Apr 2013 - 8:45 pm | मोदक
रफीसाहेबांची कबर अजून आहे..?
इतर नव्या शवांना जागा देण्यासाठी ती उकरण्यात आली असे वाचण्यात आले आहे!
24 Apr 2013 - 11:31 pm | बॅटमॅन
काय की बॉ. मला माहिती नाही काही. ती उकरली असेल तर दुर्दैवी आहे खरेच.
24 Apr 2013 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले.
शमशाद बेगम यांचं आज निधन झाल्याची बातमी वाचली त्यांच्याबद्दलही तात्यांशिवाय कोण लिहिणार. :(
तेरी महेफिल मे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे हे त्यांचच ना...?
-दिलीप बिरुटे
25 Apr 2013 - 11:03 pm | शुचि
शमशाद बेगम यांचे माझे अतिशय आवडते गाणे - सैंय्या दिलमें आना रे....
26 Apr 2013 - 11:48 am | विसोबा खेचर
मस्त..:
24 Apr 2013 - 2:03 pm | पैसा
खरीच राजकुमारी होती ती. पण शेवटच्या वर्षांत एकाकी का होती? किशोरकुमार बरोबर लग्न झालं होतं ना? मधुबालाची कबर आहे ते कबरस्तान आता कोणत्या तरी कामासाठी नाहीसं होणार आहे असं काहीतरी वाचलेलं आठवतंय.
24 Apr 2013 - 3:06 pm | लाल टोपी
खरोखरीच हिंदि चित्रपट्सृष्टीला पडलेले गोड स्वप्न होतं.. कालचे कलाकार आज विस्मरणात जातात तिथे तिची आठवण काढणारे आजही तीन चार दशकांनंतर आहेत यातच सर्वकाही आले. तात्यासाहेब फारच छान लेख लिहीला आहे.
24 Apr 2013 - 3:28 pm | भावना कल्लोळ
अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना .. हे गाणे पहिल्यादा पहिले होते तिचे आणि तिथेच आवडुन गेली ती मला, आज हि तिच्या तोडीस तोड नाही. खरेच एक देखणी आणि गुणी कलावंत होती ती तात्या.
24 Apr 2013 - 3:58 pm | चौकटराजा
सहज आठवले म्हणून सांगतो.. एकदा रसरंगने भारतीय पडद्यावरचे स्त्री सौंदर्य असा काहीसा विषय घेऊन पहाणी केली. मधुबालाला ११९ मते पडली, दुसर्या क्रमांकाची मते ड्रीम गर्ल हेमामालिनीला पडली, ती किती तर ५७ . या आकड्यात थॉडा फरक असू शकेल पण प्रमाण असेच होते.
मधुबाला म्हणजे नय्यरचे पडद्यावरचे रूप तर नय्यर म्हणजे मेलडी व रिदम यांच्या संगमाने कर्णेन्द्रियाचा ठाव घेणारी मधुबाला. विसरू कसे आम्ही तिला ? तिच्या पेक्षा सुंदर चेहरे येतील्ही पण तिची " अदा " ?????
24 Apr 2013 - 4:39 pm | मी_आहे_ना
तात्या अहो असे कसे विसरू तिला... लहानपणी आठवतंय आमच्या घरी एक मोठ्ठं पोस्टर होतं तिचं, तिचे सिनेमे पहायच्या आधीपासूनच आवडते ती. शिवाय, तुम्ही पहिल्यांदा (कधी ते आठवत नाही) लिहिले तेव्हा पासून १४ फेब्रु. म्हणजे मधुबालाचा जन्मदिन आधी आणि व्हॅलेंटाइन-डे नंतर आठवतो.
25 Apr 2013 - 1:25 am | मुक्त विहारि
शक्य नाही..
25 Apr 2013 - 3:52 pm | स्पंदना
इथेसुद्धा काही वाचायला मिळेल.
बाकी तात्या खरच एक सुंदर व्यक्ती होती मधुबाला. फक्त ती एकटी का होती शेवटी ते नाही कळल.
26 Apr 2013 - 1:26 pm | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी मनापासून आभारी आहे..