दुसरे मरण (पान २)
लेखक : होर्हे लुईस बोर्हेस
(पान एक चा दुवा)
... एखादा भित्रा वाटणारा शूर निघतो, दुसर्या एखाद्याचे नेमके उलट होते. हा बिचारा दामियान बाजारहाटात 'ब्लांको' सरकारचे छापलेले पैसे टिकवत आधी ऐटीत फिरायचा, पण मासोयेरला त्याची घाबरगुंडी उडाली. म्हणजे, आधी दुश्मनांशी टाकटूक गोळीबार झाला, तेव्हा तो धीटपणे वागला. पण फौजा आमोरासमोर तोफांचा भडिमार करायला लागल्या, तेव्हा प्रत्येकालाच वाटले की पाचपाच हजार माणसे आपल्या एकट्याला मारायला उठली आहेत. गरीब बिचारं पोरगं, आयुष्यभर शेळ्या धूत होतं, आणि ही क्रांतीची लाट काय आली, वाहून नेलं त्याला!"
तावारेसनी सांगितलेल्या वृत्तांताने खुळ्यासारखा मीच शरमलो. घडले ते असे नसते घडले तर मला बरे वाटले असते. कित्येक वर्षांपूर्वी मी म्हातार्या पेद्रो दामियानशी बोललो, तेव्हा मुद्दामून नव्हे, पण मनातल्या मनात मी त्यांची वीरमूर्ती घडवली होती, तावारेसच्या कहाणीने तिचा चक्काचूर केला. क्षणार्धात मला पेद्रो दामियानच्या अबोलपणाचे आणि हट्टी एकलकोंडेपणाचे गुपीत समजले. तो निगर्वीपणा नव्हता, ती शरम होती. मी स्वतःला पुन्हा पुन्हा पटवले, की इरेला पेटलेल्या वीरापेक्षा, एखाद्याच भित्रट कृतीने अंतःकरण त्रस्त झालेला माणूस गुंतागुंतीचा असतो - कुतूहलाचा विषय असतो. मी विचार केला, की काऊबॉय मार्तीन फिएर्रो(३) पेक्षा लॉर्ड जिम किंवा राझुमोव्ह ही पात्रेच (४) आपल्या स्मरणात अधिक राहातात... असेल ते खरे! पण पेद्रो दामियान काऊबॉय होता, मार्तीन फिएर्रो सारखे होण्याची त्याची जबाबदारी होती. कमीतकमी या उरुग्वाय-वाल्या काऊबॉय लोकांच्या पुढ्यात तरी! तावारेसनी जे काही शब्दांत सांगितले, आणि जे काही शब्दांविना सांगितले, त्यात मला एका प्रकारची उरुग्वाय-प्रौढी ऐकू आली. म्हणजे ती जी ही ठाम कल्पना असते, की उरुग्वायच्या अस्मितेची आर्जेंटीनाला काहीच सर नाही, आणि म्हणून शौर्याच्या खर्याखुर्या कसोटीला उरुग्वायचेच लोक उतरतात. माझ्या आठवणीनुसार आम्ही त्या रात्री आपुलकीचा फाजील दिखावा करून एकमेकांचा निरोप घेतला.
माझी अद्भुतरम्य कथावस्तू मठ्ठपणे रुसून आकारच घेईना. म्हणून दोनेक तपशील मिळवण्यासाठी मला कर्नल तावारेसकडे परत जावे लागले. त्या वेळी त्यांच्याबरोबर दुसरे एक वृद्ध गृहस्थ होते. हे पायसांदू येथील डॉक्टर हुवान फ्रान्सिस्को आमारो. हेसुद्धा सारावीयाच्या बंडाच्या बाजूने लढले होते. अपेक्षेप्रमाणे तेही मासोयेरविषयी बोलले. "आम्ही सांता इरेना येथे राहुटी ठोकली. तिथे आणखी थोडे लोक आमच्यात सामील झाले. एक फ्रेंच पशुवैद्य होता, तो लढाईच्या दिवशी भल्या पहाटे मेला. आणखी एक धनगर पोरगा पण होता - एंत्रेर्रियोसचा - पेद्रो दामियान..."
"ठाऊक आहे मला." कडवटपणे मी त्यांचे वाक्य तोडले. "गोळीबारापुढे भेदरलेला तो आर्जेंटिनियन माणूस..." मी एकदम थांबलो. ते दोघेही कोड्यात पडल्यासारखे माझ्याकडे बघत होते. शेवटी आमारो म्हणाले, "अहो, तुमचा काही गैरसमज होतो आहे. मर्दाला हेवा वाटावा असे मरण त्याला मिळाले. शत्रूच्या पायदळाची भक्कम फळी टेकडीच्या माथ्यावरती होती. आमच्या बाजूने संगिनी उभारून चाल केली. नारे देत पेद्रो दामियान सगळ्यांच्या पुढे होता. बंदुकीची गोळी आली, आणि थेट त्याच्या छातीत घुसली. आपल्या रिकिबीत तो थिजला - मग तोंडचा नारा संपवून तो खाली जमिनीवर, घोड्यांच्या टापांच्या मध्ये पडला. तो मेला आणि मासोयेरची अखेरची चढाई त्याच्या अंगावरून पुढे गेली. वयाची विशी उलटली नव्हती, पण केवढे हे शौर्य!" हे तर निश्चित कुठल्यातरी वेगळ्याच पेद्रो दामियानविषयी बोलत होते. कोणास ठाऊक का, पण मी विचारले की तो पोरगा कुठले नारे ओरडत होता? "अहो, शिव्यागाळ असणार," कर्नल म्हणाले. "हल्ला करताना असल्याच गोष्टी ओरडतात." पण आमारो म्हणाले, "ओरडत असेलही तसले काहीतरी, पण तो असेही ओरडला की उर्कीसाचा (५) विजय असो!"
आम्ही गप्प बसून राहिलो. शेवटी कर्नल पुटपुटले, "अरे, तो मागच्या शतकातली, कुठलीतरी भलतीच कागांचा किंवा इंदिया मुएर्ताची लढाई लढत होता की काय?"
मग खरेच गोंधळात पडल्या सारखे ते पुढे म्हणाले, "या फौजा माझ्या हाताखाली लढत होत्या... पण या पेद्रो दामियान विषयी आजच्या आधी मी एक शब्द ऐकला असेल तर शपथ!" त्यांची आठवण जागवायच्या आमच्या प्रयत्नांना काही यश आले नाही.
मी आर्जेंटीनात बुएनोस आएरेसला परतलो - पण कर्नलांच्या स्मृतिभ्रंशाने माझे डोके बधिर झाले होते. मग एके संध्याकाळी मी मिचेल इंग्लिश बुकस्टोरमध्ये गेलो होतो. तळघरात एमर्सनच्या संकलित साहित्याचे अकरा लोभस खंड ठेवले होते, त्यांच्या पुढेच पात्रीसियो गानोनशी माझी गाठ पडली. ...
(क्रमशः, पान ३ चा दुवा)
दुवे : पान एक, दोन, तीन, चार (अखेर)
----
तळटिपा :
३. मार्तीन फिएर्रो : आर्जेंटीनाच्या १८०० काळातल्या अभिजात काव्यातला दिलदार काऊबॉय वीर
४. ही दोन्ही जोसेफ कॉनराड यांची पात्रे आहेत. लॉर्ड जिम बुडत्या बोटीत प्रवाशांना सोडून, स्वतः लाईफबोट घेऊन पळून जाणारा कप्तान होता. राझुमोव्हच्या घरी त्याचा क्रांतिकारी विद्यार्थी मित्र लपायला आला, त्याला त्याने झारच्या गुप्त पोलिसांच्या हवाली केले. प्रत्येकाचे एकच भ्याड कृत्य उरलेले आयुष्यभर त्याला आतून खात राहिले.
५. उर्कीसाने १८४५ साली आर्जेंटीनामध्ये एंत्रेर्रियोसप्रांतात बंड केले होते. त्यात कागांचा आणि इंदिया मुएर्ता येथे लढाया झाल्या.
प्रतिक्रिया
21 Nov 2007 - 3:44 pm | आनंदयात्री
वाढते आहे धनंजयराव, थोडे मोठे भाग टाकलेत तर अजुन मजा येइल वाचायला.
27 Nov 2007 - 4:09 am | धनंजय
पण तळटिपा सहज एका नजरेत वाचता याव्यात म्हणून भाग छोटे केलेत.
(कथा पूर्णपणे संकेतस्थळावर चढवली आहे, त्यामुळे मूळ प्रतिसादातील अवांतर भाग काढून टाकला आहे.)
25 Nov 2007 - 9:52 pm | आजानुकर्ण
मस्त. पुढील भाग वाचतो.