दुसरे मरण (पान ३)
लेखक : होर्हे लुईस बोर्हेस
(दुसऱ्या पानाचा दुवा)
...पात्रीसियो गानोनशी माझी गाठ पडली. मी त्याच्याकडे "The Past"च्या भाषांतराबद्दल चौकशी केली. त्याने म्हटले की भाषांतर करायची त्याची मुळी इच्छाच नव्हती. स्पॅनिश वाङ्मय नाहीतरी इतके कंटाळवाणे आहे, त्यात एमर्सनची भर घालण्याची काहीएक गरज नाही, म्हणे. मी त्याला खूणगाठ सांगितली, की ज्या पत्रात त्याने मला पेद्रो दामियान वारल्याचे कळवले होते, त्यातच त्याने मला ते भाषांतर पाठवण्याचा वायदा केला होता. त्याने मला विचारले, की कोण हा पेद्रो दामियान? मी त्याला सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. हा कसला विक्षिप्तासारखा बोलतो आहे, अशी त्याची नजर झाली, ते बघून मला भीती वाटायला लागली. मग पळवाट काढण्यासाठी विषयांतर म्हणून मी एमर्सनच्या समीक्षेकडे चर्चा वळवली - त्या दुर्दैवी पो (६) पेक्षा तोच अधिक कुशल, अर्थगर्भित आणि विलक्षण होता हे निश्चित, वगैरे, वगैरे.
आणखी काही घटना येथे नोंदल्या पाहिजेत. एप्रिलमध्ये मला कर्नल दियोनीसियो तावारेस यांचे पत्र आले. एव्हाना त्यांच्या मनातील धुके विरले होते, आणि मासोयेरच्या हल्ल्याच्या आघाडीतला तो एंत्रेर्रीयोसवाला मुलगा त्यांना चांगला आठवत होता. त्याच रात्री त्यांच्या शिपायांनी टेकडीच्या पायथ्याशी त्याचे दफन केले होते. मग जुलैमध्ये कुठेसे जाताना माझ्या वाटेत ग्वालेग्वाय गाव आले, पण दामियान यांचे शेत काही मला सापडले नाही. कोणाला त्यांची आठवणही नव्हती. वसाहतीतले जाणते दियेगो आबार्को हे त्यांच्या मृत्यूच्या वेळी प्रत्यक्ष हजर होते. त्यांना विचारायला गेलो तर आदल्याच हिवाळ्यात तेही वारलेले होते. दामियान यांचा चेहरा मी आठवायचा प्रयत्न केला. पण मग काही महिन्यांनी मी फोटो आल्बम चाळत होतो, त्यात मला दिसले की ’पेद्रो दामियानचा’ म्हणून माझ्या आठवणीतला जो फोटो होता, तो खरा म्हणजे ऑथेल्लोच्या भूमिकेत तांबेरलिक या प्रसिद्ध संगीत नटाचा होता.
आता मी अनुमानांकडे वळतो. सर्वात सोपे पण तसेच सर्वात असमाधानकारक हे, की दोन वेगवेगळे पेद्रो दामियान होते. पहिला १९४६ च्या आसपास एंत्रेर्रीयोसमध्ये मेलेला पळपुटा, आणि दुसरा १९०४ मध्ये मासोयेर येथे मेलेला वीर. यातील उणीव ही, की यातून सर्वात मोठ्या कोड्याचे स्पष्टीकरण होत नाही - ते म्हणजे कर्नल तावारेस यांच्या स्मृतीचे विलक्षण जाणे-येणे - घरी परतणाऱ्या पेद्रो दामियानचे नामोनिशाण त्यांच्या मनातून इतक्या थोड्या वेळात कसे काय मिटले? (या बुवाचे मला नुसते स्वप्न पडले होते, ही बाळबोध कल्पना मला मान्य नाही, ती मानण्यास माझा इन्कार आहे.)
त्यापेक्षा मला उल्रीक वॉन क्युलमानची "दैवी चमत्कार" ही कल्पना जास्त भावते. उल्रीक म्हणे की पेद्रो दामियान लढाईत पडला खरा, पण मरता-मरता त्याने देवाला साकडे घातले की मला एंत्रेर्रीयोसला परत जाऊ दे. देवाने तथास्तु म्हणण्यात क्षणाचा विलंब केला, त्या क्षणात वर मागणारा मरून गेला. लोकांनी त्याला कोसळतानाही पाहिले. देव घडलेला भूतकाळ बदलू शकत नाही, पण भूतकाळाच्या प्रतिमा जरूर बदलू शकतो. त्याने मृत्यूच्या जागी अवसान गळाल्याची प्रतिमा ठेवली, आणि मेलेल्या माणसाचा आत्मा एंत्रेर्रीयोसला परतला. तो परतला खरा, पण त्याचे छायेसारखे स्वरूप आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. बायको नाही, मित्र नाही, असा तो एकटा राहिला. त्याला सगळे भोग हवे होते. म्हटले तर ते सगळे त्याचे होते, म्हटले तर त्याचे काहीच नव्हते. सगळे काही जणू काचेच्या तावदानापलीकडे असावे. तो "मेला" म्हणजे काय, तर ते अस्पष्ट शरीर पाण्यासारखे पाण्यात विरून गेले.
या कल्पनेत तथ्य नसले, तरी तिच्यातून मला खरे स्पष्टीकरण सुचले. (म्हणजे आज तरी मला ते खरे वाटते.) ते जितके साधे आहे, तितकेच भन्नाट आहे. ते मला कसे कसे सुचले तेही अद्भुतच. Paradiso(७) मधल्या २१व्या सर्गातील दोन ओळींमध्ये पिएर दामियानीचा (८) उल्लेख आला आहे, तो नेमका कोण अशी शंका मला उत्पन्न झाली. ती समजून घेण्याच्या अनुषंगाने पिएर दामियानीचे ’सर्वशक्तिमत्ता म्हणजे काय’ हे पुस्तक माझ्या अभ्यासात आले. त्यातील पाचव्या अध्यायात पिएर दामियानी ऍरिस्टॉटल (९) आणि फ़्रेदेगारियो दे तूरच्या (१०) मतांच्या विरुद्ध वाद घालतो की देव घडलेल्याचे न-घडलेले करू शकतो. हे जुनेपुराणे आध्यात्मिक वादविवाद वाचल्यावर मला पेद्रो दामियानची शोकांतिका कळायला सुरुवात झाली. तिचे रहस्य मी येणेप्रमाणे उलगडले. मासोयेरच्या रणांगणात दामियान भेकडासारखे वागले आणि मग या लाजिरवाण्या दुर्बळपणाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. ते एंत्रेर्रीयोसला परतले. तिथे कोणालाही तोंड वरती करून सलाम केला नाही. कोणाशी विशेष ओळख होऊ दिली नाही. वीर म्हणून प्रसिद्धीचा पिच्छा केला नाही. पण कणखर होऊन न्यान्कायच्या शेतामध्यल्या डोंगराळ जमिनीशी ते झटत राहिले.
चमत्कार होईल हे त्यांना निश्चित माहीत नव्हते, पण तो व्हायची तयारी त्यांच्याकडून होत होती.
(क्रमशः , चवथ्या पानाचा दुवा)
दुवे : पान एक, दोन, तीन, चार (अखेर)
-----
६. तळटीप १ पहा (पान एक वर तळटीप)
७. दांते आलिगिएरी या तेराव्या शतकातील इटालियन कवीने प्रवासवर्णनात्मक शैलीत स्वर्गाविषयी हे अभिजात काव्य लिहिले आहे.
८. अकराव्या शतकातील एक इटालियन संत. तो दांतेच्या पात्राला स्वर्गप्रवासात भेटतो.
९. एक प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता
१०. सातव्या शतकातील एक फ़्रेंच बखरकार
प्रतिक्रिया
26 Nov 2007 - 5:43 pm | आजानुकर्ण
अतिशय सुंदर ओळी...
देव घडलेला भूतकाळ बदलू शकत नाही, पण भूतकाळाच्या प्रतिमा जरूर बदलू शकतो. त्याने मृत्यूच्या जागी अवसान गळाल्याची प्रतिमा ठेवली, आणि मेलेल्या माणसाचा आत्मा एंत्रेर्रीयोसला परतला. तो परतला खरा, पण त्याचे छायेसारखे स्वरूप आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. बायको नाही, मित्र नाही, असा तो एकटा राहिला. त्याला सगळे भोग हवे होते. म्हटले तर ते सगळे त्याचे होते, म्हटले तर त्याचे काहीच नव्हते. सगळे काही जणू काचेच्या तावदानापलीकडे असावे. तो "मेला" म्हणजे काय, तर ते अस्पष्ट शरीर पाण्यासारखे पाण्यात विरून गेले.
-- आजानुकर्ण