दुसरे मरण (पान ४, अखेर)
लेखक : होर्हे लुईस बोर्हेस
(तिसऱ्या पानाचा दुवा)
चमत्कार होईल हे त्यांना निश्चित माहीत नव्हते, पण तो व्हायची तयारी त्यांच्याकडून होत होती. मनात खोलवर त्यांचा ध्यास होता की "माझ्या भाग्यात आणखी एक युद्ध आले, तर मी आपल्या लायकीला साजेसे वागेन." चाळीस वर्षे त्यांनी या युद्धाची छुपी आस राखली, आणि मरणाच्या घटकेला भाग्याने त्यांना ते युद्ध दिले. ते बुद्धिभ्रमाच्या रुपाने आले, पण तरी काय - प्राचीन ग्रीक लोकांनादेखील ठाऊक होते की आपण तर स्वप्नातल्या केवळ सावल्या आहोत. त्या ग्लानीत ते लढाई पुन्हा जगले, पुरुषासारखे शत्रूला सामोरे गेले, आणि बंदुकीच्या गोळीने थेट त्यांच्या छातीचा वेध घेतला. मासोयेरची लढाई १९०४ च्या हिवाळ्या-वसंताच्या दरम्यान झाली, पण अशा प्रकारे, कित्येक वर्षांच्या दुर्दम्य इच्छेच्या परिणामस्वरूप, १९४६ मध्ये पेद्रो दामियन त्या मासोयेरच्या रणकंदनात मरण पावले. Summa Theologica (११) मध्ये प्रतिपादन केलेले आहे, की जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही. पण त्यात कारणा-परिणामांच्या गुंतागुंतीच्या दुव्यांबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. हे जाळे इतके अफाट आहे, इतके घट्ट विणलेले आहे, की त्यात भूतकाळातली एकही घटना खोडली - ती किती का क्षुल्लक असेना - तर अवघे वर्तमान मिथ्या होण्यास ते पुरेसे आहे. कारण हा बदल केवळ त्या एका तथ्यातला बदल नव्हे. हे म्हणजे त्या घटनेचे सर्व, म्हणजे जवळजवळ अगणित परिणाम नाहिसे करणे होय. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर त्यायोगे दोन वेगवेगळे वैश्विक इतिहास निर्माण होतात. पैकी एकाला (नावापुरता) पहिला म्हणू, त्या पहिल्यात पेद्रो दामियान १९४६ मध्ये एंत्रेर्रीयोस राज्यात मेले, दुसऱ्यात ते १९०४ मध्ये मासोयेरमध्ये मेले. आपण हा दुसरा इतिहास जगतो आहोत, पण पहिला काही सुखासुखी नाही दडपला गेला. त्यातूनच मी सांगितलेल्या विसंगत घटना घडल्या. कर्नल दियोनीसियो तावारेस त्या आदलाबदलीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेले. सुरुवातीला त्यांना आठवले की पेद्रो दामियान भेकडपणे वागले, मग ते त्यांना पूर्णपणे विसरून गेले, त्यानंतर त्यांना त्यांचे धाडसी मरण आठवू लागले. आबार्को यांची बाबही या अनुमानाला जी पुष्टी देते, ती थोडकी नव्हे. श्री. पेद्रो दामियान यांच्याविषयी खूप स्मृती राखल्यामुळे त्यांचे निधन झाले असे मी समजतो.
पण खुद्द मी तशा कुठल्याही धोक्यात नाही, असे मी समजतो. मनुष्याच्या झेपेबाहेरच्या या रहस्याचा मी भेद केला आहे - म्हणजे तर्कबुद्धीचा भ्रष्टाकारच म्हणा - पण माझ्या परिस्थितीचे काही तपशील या खुनशी सनदीच्या खतऱ्यापासून माझे रक्षण करतात. पहिली गोष्ट ही की मी जे लिहिले ते सगळेच सत्य आहे याची मला खात्री नाही. माझ्या वृत्तांतातल्या काही आठवणी चुकीच्या असाव्यात, अशी मला शंका आहे. मी सांगितल्यासारखा कोणी माणूस खराच होऊन गेला असेल तर त्याचे नाव पेद्रो दामियानच होते, का दुसरेच काही होते, अशी मला शंका वाटते. कदाचित पिएर दामियानीच्या ऊहापोहामुळे मला ही कथा सुचली असा बहाणा करता यावा, म्हणून त्याच्याच स्पॅनिश-केलेल्या नावाने मी या माणसाला ओळखत असेन. पहिल्या परिच्छेदात मी ज्या कवितेचा उल्लेख केला आहे, तिचाही विषय "भूतकाळ कधी बदलत नाही" असाच आहे - कदाचित तिच्यावरून मला ही कथावस्तू स्फुरली असेल अशी रदबदली मी करू शकतो. १९५२ साल उलटेल तोवर मला असे वाटू लागेल की ही मी एक अद्भुत कहाणी लिहिली, आणि अशा प्रकारे मी तथ्याला कल्पितात बदलून टाकेन. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्हर्जिललाही (१२) अशाच प्रकारे वाटले की तो एका मनुष्याच्या जन्माचे वृत्त सांगत होता, पण खरे तर तो देवाचा अवतार वर्तवत होता. गरीब बिचारे दामियान! वयाच्या विसाव्या वर्षी, कुठल्याशा केवीलवाण्या गृहयुद्धातल्या कोणत्यातरी अनामिक लढाईत मृत्यूने त्यांना जगातून नेले. पण त्या प्रकारे काळाला खूप उशीराने का होईना, त्यांच्या हुरहुरणाऱ्या हृदयाची आस पूर्ण करता आली. कदाचित त्याहून मोठे कोणतेच सुख नाही.
***
El Aleph (१९४९) कथासंग्रहामध्ये प्रकाशित, तत्पूर्वी La Nación नियतकालिकात प्रसिद्ध झाली.
अनुवादक : धनंजय
-----
११. तेराव्या शतकातील संत थॉमस आक्विनास यांचा धर्मशास्त्रावरचा ग्रंथ
१२. इ.स.पूर्व पहिल्या शतकातील एक रोमन कवी. त्याच्या Eclogues या काव्यात "शांतिदूत येणार" अशी कल्पना आहे. अनेक ख्रिस्ती लोक त्या कल्पनेला येशूच्या जन्माची व्हर्जिलला लागलेली चाहूल मानतात.
प्रतिक्रिया
26 Nov 2007 - 11:58 am | दिगम्भा
ही चमत्कारिक व मजेदार आणि /किंवा अतिगंभीर कथा पहिल्या वाचनात अर्धवट समजूनदेखील आवडली. (धनंजयांना का आवडली असावी याचाही अंदाज करू शकतो असे वाटले.)
आता पुन्हा एकदा-दोनदा पारायणे करतो व बदललेला किंवा बदलण्याची शक्यता असलेला अभिप्राय नोंदवीन म्हणतो.
सध्या तरी फारसा धोका वाटत नाही या योजनेत, आणि तशीही माझी स्मरणशक्ती जरा अधूच आहे त्यामुळे चिंता नाही :)
- (धनंजयांचा फ्यान) दिगम्भा
26 Nov 2007 - 5:54 pm | आजानुकर्ण
हा भाग दोन तीनदा वाचूनही स्पर्शिकास्वरुप डोक्याला घासून गेला. बर्याच गोष्टी समजल्या नाहीत. तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल.
>>जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही>> हे वाक्य आपण मुद्दाम असे रचले आहे का? न-घडवू शकणे असा वाक्यप्रयोग वेगळा वाटतो.
-(धनंजयांचा अजून एक फ्यान) आजानुकर्ण
26 Nov 2007 - 7:24 pm | धनंजय
"ऐकल्याचे न ऐकल्यासारखे केले" वगैरे शब्दप्रयोगांच्या धर्तीवर
"जे घडले त्याचे न-घडले केले" असा नवीन शब्दप्रयोग केला.
यात त्या काळातल्या दोन धार्मिक विचारवंतांच्या मतातील फरक दिसतो.
थॉमस आक्विनास (हा अजून प्रसिद्ध आहे) असे म्हणतो की जे एकदा की घडले आहे ते "कधी घडलेच नव्हते" अशी सोय देवही करू शकत नाही.
पिएर दामियानी (हा आता तितका प्रसिद्ध नाही) असे म्हणतो की सर्वशक्तिमान देव भूतकाळ बदलू शकतो.
पिएर दामियानीच्या म्हणण्यानुसार भूतकाळातली घटनाच जर बदलली, तर गडबड होईल, असा या कथेचा रोख आहे. कारण क्षणाचा भेकडपणा खोडला जाऊन तो मुलगा वीरमरण खरोखर प्राप्त झाला तर त्याच्या पुढील आयुष्यात त्याच्या संपर्कात आलेल्या कित्येक लोकांच्या आयुष्यातील तपशील खोटे होऊ लागेल. म्हणजे गानोनने घेतलेला फोटो "न-घेतलेला" व्हावा लागेल, गानोनचे पत्र लिहिलेले होते, ते "न-लिहिलेले" व्हावे लागेल, इ.इ. (हे कारणा-परिणामांचे अगणित तपशील आहेत.)
पिएर दामियानीचे म्हणणे वेगळ्या एका प्रकारे खरे होऊ शकते - भूतकाळाची सर्वांची स्मृती बदलू शकते - म्हणजे तथ्यातल्या पुढील घटना तपशीलवार खोट्या होत नाही. त्या तपशिलांना साक्षी असलेल्या ठोस वस्तू हरवल्या तरी चालतील - तो फोटो, ते पत्र - तितकेही पुरे. ज्यांच्या स्मृती खूप थोड्या आहेत, त्यांच्या तेवढ्या बदलल्या तर पुरे. पण ज्यांच्या स्मृती खूप अधिक आहेत, ते त्या सर्व बदलू शकणार नाहीत. ते मरण पावतील तेव्हाच इतिहास पूर्ण बदलेल. आपली स्मृती स्खलनशील आहे असे ठोस पुराव्यांसकट मान्य केल्यामुळे लेखक बोर्हेस हा मरण पावण्याची गरज नाही.
या प्रकारे दामियानी आणि आक्विनास या दोन्ही विचारवंतांचे म्हणणे खरे ठरू शकते. (सकृद्दर्शनी परस्परविरोधी वाटले तरी.)
27 Nov 2007 - 9:23 am | आजानुकर्ण
विश्लेषण समजले पण हे वाचूनदेखील कथेचा चौथा भाग समजला असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. मूळ कथा स्पॅनिश असल्याने तिचा तसा उपयोग आम्हाला नाही. ह्या कथेचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे का?
- आजानुकर्ण
27 Nov 2007 - 9:52 am | धनंजय
याचा इंग्रजी अनुवाद न्यू यॉर्करमध्ये १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला होता (दुवा).
पण मी तो अनुवाद वाचलेला नाही. पूर्ण लेख जाळ्यावर नाही, विकत घ्यावा लागेल :-(
{म्हणून विकत घेणार नाही, ते आलेच!}
कुठल्या एखाददुसर्या वाक्याचा इंग्रजी अनुवाद हवा असेल तर तो मी करून देऊ शकतो. दोन्ही युरोपियन भाषा असल्यामुळे, "शिघ्र-अनुवाद" पुष्कळदा जमतो. पण पूर्ण कथेचा इंग्रजी अनुवाद करायची इच्छा नाही...
27 Nov 2007 - 9:00 am | विसोबा खेचर
हद्द आहे रे बाबा तुझी! खूप कठीण कठीण विषयांवरचं वाचतोस आणि स्वत:ही तेवढंच कठीण लिहितोस...
मला तर बुवा फारच जड गेलं हे सगळं वाचायला!
आपला,
(सामान्य) तात्या.
28 Nov 2007 - 1:29 am | धनंजय
In the Summa Theologica, it is denied that God may make it so that the past not have been, but nothing is said of the intricate concatenation of causes and effects, which is so vast and so intimate, that perhaps it would not admit of the annulment of a single fact, no matter how remote it may be, without invalidating the present. To modify, is not just to modify a single fact; it is to annul its consequences, which tend to be infinite. To be said in other words; it is creating two universal histories. In the first (let us say) Pedro Damián died in Entre Ríos in 1946, in the second, in Masoller, in 1904. This is the one that we live today, but the suppression of the previous one was not immediate and produced the incoherences to which I have referred. In Colonel Dionisio Tabares the various stages were achieved: at first he remembered that Damián behaved as a coward; later he forgot him completely; later he remembered his impetuous death. The death of the outpost-chief Abarco is no less corroborative; he died, I understand, because he had too many memories of Pedro Damián.
Summa Theologica (११) मध्ये प्रतिपादन केलेले आहे, की जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही. पण त्यात कारणा-परिणामांच्या गुंतागुंतीच्या दुव्यांबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. हे जाळे इतके अफाट आहे, इतके घट्ट विणलेले आहे, की त्यात भूतकाळातली एकही घटना खोडली - ती किती का क्षुल्लक असेना - तर अवघे वर्तमान मिथ्या होण्यास ते पुरेसे आहे. कारण हा बदल केवळ त्या एका तथ्यातला बदल नव्हे. हे म्हणजे त्या घटनेचे सर्व, म्हणजे जवळजवळ अगणित परिणाम नाहिसे करणे होय. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर त्यायोगे दोन वेगवेगळे वैश्विक इतिहास निर्माण होतात. पैकी एकाला (नावापुरता) पहिला म्हणू, त्या पहिल्यात पेद्रो दामियान १९४६ मध्ये एंत्रेर्रीयोस राज्यात मेले, दुसऱ्यात ते १९०४ मध्ये मासोयेरमध्ये मेले. आपण हा दुसरा इतिहास जगतो आहोत, पण पहिला काही सुखासुखी नाही दडपला गेला. त्यातूनच मी सांगितलेल्या विसंगत घटना घडल्या. कर्नल दियोनीसियो तावारेस त्या आदलाबदलीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेले. सुरुवातीला त्यांना आठवले की पेद्रो दामियान भेकडपणे वागले, मग ते त्यांना पूर्णपणे विसरून गेले, त्यानंतर त्यांना त्यांचे धाडसी मरण आठवू लागले. आबार्को यांची बाबही या अनुमानाला जी पुष्टी देते, ती थोडकी नव्हे. श्री. पेद्रो दामियान यांच्याविषयी खूप स्मृती राखल्यामुळे त्यांचे निधन झाले असे मी समजतो.
28 Nov 2007 - 1:40 am | सर्किट (not verified)
मी ही पूर्ण कथा एका दमात वाचून काढली. आवडली.
मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात.
सर्व पात्रांची, गावांची नावे अस्सल मर्हाटी असती, तर कथा वाचायला अधिक सोपी गेली असती.
पानपताच्या लढाईचा सुंदर उपयोग करता आला असता.
- सर्किट
28 Nov 2007 - 2:30 am | मनिष
"मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात."
मला वाटले माझेच असे होते का!! :) त्यांच्या आया "अनिल, सुनिल" अशी सोपी नावे का ठेवत नाही? ;)
28 Nov 2007 - 2:32 am | मनिष
अशीच एक कथा मराठीत वाचल्याची आठवते - शक्यतांचे जग ह्याविषयी. त्या कथेत पानीपत, पेशवे यांचा उल्लेख असल्याचे आठवते, पण बाकी काहिच संदर्भ आठवत नाही. कोणई वाचली आहे का ती कथा?
28 Nov 2007 - 2:50 am | धनंजय
या कथेत एका व्यक्तीचा पूर्वेतिहास बदलला. पण सामाजिक स्मृती भरकटली तर देशाचा ज्ञात इतिहास बदलू शकतो. पूर्वीचे दस्तऐवज हरवलेत म्हणजे पुरे - उदा. गानोनचे पहिले पत्र. नवीन दस्तऐवज निर्माण होतात - उदा. कर्नल तावारेसच्या नव्याने गवसलेल्या आठवणींचे पत्र.
या कथेवरून हा विचार सुद्धा करता येतो.