उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १३ : परतीची कहाणी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 Apr 2013 - 1:11 am

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

हॉटेलमध्ये रूमवर पोहोचलो तर व्यवस्थापनाने ही व्हॅलेंटाइन डे भेट खोलीत ठेवून आमच्यावरील प्रेम व्यक्त केलेले होते.

शेवटचा दिवस लवकरच सुरू झाला कारण अ‍ॅमस्टरडॅमकडे जाणारे विमान पावणेदहाला होते. सहा वीसला स्वागतकक्षात येऊन चेकआऊट केले. निघताना परत एकदा विमानतळावर जाणार्‍या बसच्या थांब्याची खात्री करावी म्हणून विचारणा केली. माझ्या विमानाची वेळ ऐकून स्वागतिकेने सांगितले की आता दहा मिनिटात न्याहारी सुरू होते आहे ती करून सातची बस पकडून जा. आरामात वेळेत पोचाल. आता माझ्याही ध्यानात आले की मी जरी दुसर्‍या देशात (हॉलंड) जात असलो तरी तो शेंगेन देशच आहे म्हणजे ओस्लो विमानतळावर फक्त देशांतर्गत विमानवाहतुकीचे नियम असतील. आंतरराष्ट्रीय सोपस्कार अ‍ॅमस्टरडॅम विमानतळावर पार पाडावे लागतील. म्हणजे केलेल्या हिशेबापेक्षा आता पाऊण ते एक तास जास्त आहे. न्याहारीला मारलेली काट खुशीने पुसून टाकली आणि न्याहारीवर ताव मारायला भोजनकक्षाकडे प्रस्थान केले !

खानसाम्याने आज इडलीसारखी ऑम्लेट्स घाऊक प्रमाणात बनवून ठेवली होती...

पहिल्यांदा ओळखू आली नाहीत. "ऑम्लेट बनवणार का?" असे म्हटल्यावर खानसाम्याने मिश्किल हसत "हे काय" असे म्हणत त्यांच्याकडे बोट दाखवले. जरा भरभर न्याहरी करून भरल्या पोटाने खानसाम्याला आणि स्वागतिकेला धन्यवाद देत बस थांब्याकडे निघालो.

सात वाजले तरी बस आली नाही तेव्हा जरा अस्वस्थ झालो. एक पावणेसात फुटी बाबा बसचे वेळापत्रक झाकून उभा होता आणि विनंती करूनही न ऐकल्यासारखे करून तसाच खांबासारखा उभा राहिला. जरा आवाज मोठा करावा या विचारात असतानाच बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेने माझ्या हातातल्या बॅगेकडे पाहत "विमानतळावर निघालात काय?" अशी विचारणा केली. होकार दिल्यावर म्हणाल्या की, "अजून तीन मिनिटाने बस येईल. सात वाजता ती जवळच्या मध्यवर्ती थांब्यावरून सुटते आणि येथे सात पाचला येते." हायसे वाटले आणि त्या नॉर्वेजियन महिलेचे आभार मानले. या कारणाने बोलणे सुरू झाले आणि विमानतळापर्यंतच्या प्रवासात गप्पा मारायला साथही मिळाली ! मी दम्मामला जाणार असे समजल्यावर त्यांनी सांगितले की त्या विमानतळावरच काम करतात आणि बर्‍याच वर्षांपूर्वी रॉयल जॉर्डेनियन एअरलाईनमध्ये काम केले आहे. वाटेत बर्‍याच गप्पा झाल्या. तसा नॉर्वेच्या तेलसाठ्यांमुळे तो एक वित्तव्यवस्था सुरक्षित असलेला देश आहे आणि तो युरोझोनमध्येही सामील नाही. त्यामुळे त्याची इतर काही युरोपियन देशांसारखी वाईट अवस्था नाही. तरीसुद्धा आजूबाजूच्या देशांवर पडलेल्या वित्तसंकटाची भीती त्यांच्या बोलण्यात सहजपणे आली. शिवाय सुबत्तेमुळे झालेल्या सुखी जीवनाचे परिणाम तरुणाईत शिक्षणाची आवड कमी होण्यात झाले आहे ही चिंताही होतीच. भारताच्या जगातल्या वाढणार्‍या महत्त्वाचे त्यांनी कौतुक केले. नॉर्वेतले बहुतेक सगळे भारतीय उच्चशिक्षित आणि एकंदर नॉर्वेच्या भरभराटीला मदत करणारेच आहेत याचा खास उल्लेख केला. पाऊण तासाचा प्रवास गप्पांत कधी संपला ते कळले नाही. विमानतळावर वेळेत पोहोचलो...

विमानाच्या प्रवेशद्वाराजवळच्या गर्दीत २०-२५ शाळकरी नॉर्वेजियन मुलामुलींचा एक गट होता. तो कसरतपटूंचा संघ अमेरिकेतल्या केंटाकी राज्यात कसरतीचे खास शिक्षण घेण्यासाठी चालला होता. चुळबुळ्या तरुणाईला अर्धापाऊण तास स्वस्थ बसणे शक्य झाले नाही. त्यातल्या काही जणांनी तेथेच प्रवेशद्वारासमोर त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करायला सुरुवात केली...

सर्व गोष्टी बरोबर वेळेवर होऊन विमानात बसलो. पण वेळ झाली तरी विमान जागेवरून हालेना तसे प्रवासी अस्वस्थ होऊन हवाई सुंदर्‍यांकडे चौकशी करू लागले. शेवटी पंधरावीस मिनिटांनी विमानाच्या कप्तानाने जाहीर केले की विमान रात्रभर हँगरमध्ये उभे होते त्यामुळे त्याच्या पंख, शेपटी आणि नाकावर बरेच बर्फ जमले आहे तेव्हा डि-आइसिंग प्रक्रिया करणे जरूरीचे आहे आणि त्या रांगेत आपला क्रमांक तिसरा आहे. अजून पंधरावीस मिनिटात आपण डि-आइसिंग एरियात जाऊ आणि तासाभरात उड्डाण करू. म्हणजे तास-दीड तास उशीरा उडणार हे नक्की झाले. पण चिंता नव्हती. मूळ हिशेबाप्रमाणे अ‍ॅमस्ट्रडॅममध्ये पुढचे विमान पकडायला साडेतीन तास मिळणार होते ते आता दोन-अडीच झाले... पूर्वीचा अ‍ॅमस्टडॅमचा अनुभव पाहता इतका वेळ पुरेसा होता. काळजीचे काहीच कारण नव्हते. विमान चालू लागले आणि विमानतळावर काल रात्री किती बर्फ पडले होते त्याची झलक बघायला मिळाली...

विमान बर्फ साफ करायच्या जागी पोचले आणि वीसेक मिनिटाने जेव्हा बर्फ साफ करणार्‍या गाड्या बाजूचे विमान संपवून आमच्या विमानावर खास रसायनांचा मारा करू लागल्या तेव्हा जरा बरे वाटले कारण आता प्रत्येक जास्त मिनिट माझा अ‍ॅमस्टरडॅम मधला अडीच तासांचा वेळ आणि माझे मन कुरतडू लागले होते :(...

.

बर्फ साफ करणाऱ्या गाड्या त्यांचे काम करून बाजूला झाल्यावर अर्धा तास झाला तरी आमचे विमान हलेना तशी प्रवाशांमध्ये परत चुळबूळ सुरू झाली. माझी तर खात्री होऊ लागली की आता अ‍ॅमस्टरडॅमहून पकडायचे पुढचे विमान काही चमत्कार झाला तरच मिळेल. प्रवाशांचा आवाज वाढू लागला तसा हवाई सुंदर्‍याही आत जाऊन कप्तानाशी बोलू लागल्या. मग मात्र कप्तानाने घोषणा केली की, बर्फ साफ करताना विमानाच्या पुढच्या बाजूची एक काच तडकली आहे. त्यामुळे विमान उडविण्यास धोकादायक झाले आहे. त्याने व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे. जर ओस्लोतच नवीन काच मिळाली तर तास दीड तासाने विमान उडू शकेल. तोपर्यंत आम्ही असेच विमानात बसणे योग्य आहे. जर काच अ‍ॅमस्टरडॅमहून मागवावी लागली तर मात्र बराच वेळ लागेल आणि मग आम्हाला विमानातून उतरवण्यात येईल. काही प्रवाशांनी निषेध नोंदवला. पण सगळ्यांनाच कल्पना होती की अशा अवस्थेत विमान उडवणे शक्य नाही तेव्हा फारसा गदारोळ झाला नाही.

शेवटी अजून अर्धा तास विमानात काढल्यावर ओस्लोमध्ये काही व्यवस्था होणार नाही असे कळले आणि आम्ही सगळे ज्या दाराने बाहेर गेलो होतो त्याच दाराने विमानतळाच्या निर्गमन विभागात परत आलो. या अचानक झालेल्या अपघाताने विमानकंपनीच्या कर्मचार्‍यांतही जराशी अव्यवस्था पसरली आणि अर्धा तास सर्व प्रवासी तसेच दाराच्या आसपास चडफडत तरंगत राहिले. नंतर सगळ्यांना एका बाजूच्या पडीक असलेल्या द्वाराजवळ नेऊन प्रत्येकाची तिकिटे तपासून कोणाकोणाचे कुठले पुढचे विमान चुकले हे नोंदवून घेतले आणि जेवणाचे माणशी १२० क्रोनरचे कूपन देऊन विमानतळावर कोणत्याही रेस्तरॉमध्ये वापरून जेवून घ्या म्हणून सांगितले. विमान अंदाजे पाच वाजता सुटेल असे कळले.

वेळ घालवायला मी निर्गमन विभागात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चार चकरा मारल्या, सगळ्या छानछान दुकानांची नावे वारंवार वाचून काढली. काचेतून दिसणारी उडून जाणारी विमाने पाहून अजूनच राग येत होता आणि कंटाळाही वाढत होता...

.

.

शेवटी एक पिझ्झ्याचे रेस्तरॉ पकडून कूपन खर्च करून टाकले. एका जागेवर बसून डुलकी घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नाही जमत म्हटल्यावर परत चार फेर्‍या मारल्या :(. चार वाजत आले तसे आमच्या दाराजवळ जाऊन चौकशी केली. या वेळेस तेथे दक्षिण आशियाई चेहेरपट्टीचा माणूस बसला होता. गेल्या गेल्या काही न विचारता त्याने माझ्या हातात एक १२० क्रोनरचे कूपन दिले. लगेच मनात संशयाची पाल चुकचुकली. आणि ते खरेच ठरले. "आप कहासे? इंडिया या पाकिस्तान? " असे त्याने विचारले. भारतीय आहे असे सांगितल्यावर म्हणाला, "अपनी भाषामे बताते है आपको. फ्लाईट और दो घंटे लेट है. सात बजेके पहले नही जा सकती." पाकिस्तानी मूळाचा माणूस होता. माझी थोडी चौकशी केली. स्वतःहून आपली थोडीबहुत माहिती सांगितली. इथले सगळे छान आहे पण आयकर आणि महागाई फार आहे म्हणून तक्रारही केली. नॉर्वेचा आयकराचा दर हा बहुतेक जगात सर्वात जास्त आहे. पण त्या बदल्यात शिक्षण, सार्वजनिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, म्हातापणाची काळजी, इत्यादिची जी सोय नॉर्वे शासन करते त्याला जगात तोड नाही. अर्थात नॉर्वेमधील महागाईचा चटका मलाही गेल्या आठ दिवसात बसला असल्याने या मुद्द्यावर मी त्याची जोरदार री ओढली.

इतक्या सगळ्या गोंधळात विमानतळ व्यवस्थापनानेही भर घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते माहिती देणार्‍या पाट्यांवर विमानाची सुटण्याची वेळ पाच, साडेपाच, साडेसहा आणि सरते शेवटी नऊ वीस अशी सतत बदलती ठेवून प्रवाशांना टांगणीवर ठेवत होते. आणखी दरवेळेस वेळ बदलली की निर्गमन द्वार क्रमांकही बदलता ठेवून आमच्या सहनशीलतेची कसोटी पाहत होते.

अजून दोन तास कसे घालवायचे आणि नवीन कूपनाची विल्हेवाट कशी लावायची असा विचार करत परत निर्गमन विभागात फेर्‍या मारू लागलो. भूक तर नव्हती आणि कूपन फक्त खाण्यापिण्यासाठीच वापराचे होते. मग येथे येऊन बसलो आणि बार टेंडरला तुझ्याकडे असलेल्या सगळ्यात चांगल्या शँपेनचा एक प्याला दे म्हणालो...

त्याने "मार्ली ग्रां क्रू ब्रू रिझर्व" आणून दिली...

अगदी शंपेनचा दर्दी असल्यासारखे सगळे नखरे (प्रथम रंग न्याहाळणे, नंतर वास घेणे, किंचित गुळणी करणे, इ. इ.) करत एक ग्लास पिण्यात अर्धापाऊण तास घालवला. पूर्वीच्या सफरींत वायनरींच्या भेटींत मिळालेले मोफत शिक्षण आज कंटाळवाणा वेळ घालवण्यासाठी कामी आले ;) बार टेंडरचा माझ्याबद्दलचा आदर वाढल्यासारखा वाटला. पण, दुसरा ग्लास नको म्हणाल्यावर लगेच दुसर्‍या गिर्‍हाईकाकडे निघून गेला आणि ध्यानात आले की तो प्रभाव माझ्या दर्दीपणाचा नसून एका ग्लासच्या १४५ क्रोनर किमतीमुळे त्याच्या वाढलेल्या विक्रीचा होता !

परत दाराजवळ आलो तर कसरतपटूंनी बसून बसून कंटाळल्याने त्यांचा खेळ परत जोमाने सुरू केला होता...

 ..................

.

 .................

.

शेवटी साडेसहाला कप्तान विमानातल्या सगळ्या कर्मचार्‍यासह आला. सगळ्या प्रवाशांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर त्यांनी त्याला घेराव घालण्या अगोदर त्याने काउंटरवरचा माइक पकडला आणि जाहीर केले की विमान दुरुस्त झाले आहे आणि साधारण सव्वासातला ते दाराजवळ येईल आणि लगेचच प्रवाशांना आत घेऊन जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या वेळात उड्डाण केले जाईल. कप्तान कसलेला खेळाडू दिसत होता. चेंडू अंगावर येण्याअगोदर त्याने पुढे पाऊल टाकून षटकार मारला होता. कितीही रागावलेले असले तरी आता प्रवासी अजून काय बोलणार !? त्याने सांगितल्याप्रमाणे विमान सव्वासातला आले पण ते दूर टारमॅकवर उभे राहिले होते. आम्ही सगळे बसने तेथे निघालो. बस चालत असताना अचानक मागून खणाखणीत मराठी आवाज ऐकू आला, "हो, हो काळजी करू नकोस. आता इतक्या उशीरा अ‍ॅमस्टरडॅमला पोचतोय म्हणजे हॉटेल रूम देतीलच. नाही दिली तर त्याच्या पुढे मांडी घालून बसेन आणि रूम घेईन. तू काळजी करू नकोस." मागे वळून पाहिले तर विशीतले मुलगा-मुलगी उभे होते आणि त्यातली मुलगी मोबाइलवर बोलत होती. विमानात बसलो तर नेमकी त्या दोघांची जागा माझ्या पुढच्याच रांगेत होती. न राहवून स्वतःच चौकशी केली तर कळले की मूळ पुण्याच्या असलेल्या पण गेली १२ वर्षे नॉर्वेत स्थायिक झालेल्या कुटुंबातील ते भाऊ-बहीण होते. जिवाचं ओरलँडो करायला अमेरिकेत चालले होते.

प्रवासी बसले आणि पंधरावीस मिनिटे झाली तरी विमान हलेना. आता अजून काय म्हणून प्रवाशांत परत चलबिचल सुरू झाली. कप्तानाने घोषणा केली की अजून जरा वेळ लागेल कारण दोन प्रवासी विमानात परत आलेले नाहीत त्यांचे सामान बाहेर काढल्याशिवाय विमानाला उड्डाणाची परवानगी मिळणार नाही. पूर्वीच्या अशाच एका अनुभवामध्ये सर्व सामान विमानाच्या पोटातून बाहेर काढून बाजूला मांडून ठेवले होते आणि सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर पडून आपापले सामान ओळखायला सांगितले होते. न ओळखलेले सामान बाजूला काढून, आमचे सामान परत विमानात भरून, मगच विमान उडाले होते. या सगळ्या व्यापात दीड तास गेला होता.

आता होणार्‍या उशीराचे काहीही वाटेनासे झाले होते कारण माझे अ‍ॅमस्टरडॅमचे विमान तर कधीच सुटून गेले होते आणि पुढच्या विमानाचा पत्ता नव्हता... आता काळजी करून काय फायदा? मग डोळे मिटून विमानातून उतरायची वाट पाहत राहिलो. अर्ध्या तासाने कप्तानाचा आवाज ऐकू आला तेव्हा मनात म्हटले, "चला तयार व्हा खाली उतरायला". तर तो म्हणाला, "सगळे काम झाले आहे. विमानतळावरच्या कुशल कर्मचार्‍यांनी विमानाच्या पोटात जाऊन गैरहजर प्रवाशांचे सामान त्यांच्या ओळखपट्टीका पडताळून काढून घेतले आहे. तुम्हाला खाली उतरायची गरज नाही. आता आपण उडायला मोकळे आहोत. फक्त नियंत्रण मनोर्‍याची परवानगी मिळाली की आपण लगेच निघू" . "हे तरी खरे ठरू दे!", मी आपला मनातच म्हणालो. मनाचा आवाजपण आतापर्यंत बराच क्षीण झाला होता !

परत विमान धुण्याचे (डि-आइसिंग) सोपस्कार झाले...

 ..................

मला उगाचच काच तडकल्याचा आवाज ऐकू येत राहिला. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही आणि आम्ही हॉलंडच्या दिशेने भरारी घेतली.

अ‍ॅमस्टरडॅममध्ये मात्र KLM ने चांगली व्यवस्था ठेवली होती. गेल्या गेल्या प्रथम सगळ्यांसाठी चेक-इन मशीनमधून पुढच्या प्रवासाची बोर्डिंग कार्डस् काढायची वेगळी व्यवस्था केलेली होती. ते झाल्यावर एका काऊंटरवर हॉटेल बुकिंगची कागदपत्रे आणि टूथब्रश, दाढीचे सामान, इत्यादिची एक पिशवी दिली. बसने आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. हॉटेलवर चेकइन काऊंटरवरच डिनर पॅक दिला त्यामुळे पोटोबाची व्यवस्था रूममध्येच झाली. नाहीतर आता खास श्रम करून रेस्तरॉत जेवायला जायची इच्छा उरली नव्हती. तसाच झोपलो असतो. जेवण मात्र भरपूर होते. फळे सढळ हाताने दिली होती त्यामुळे भरल्यापोटी, 'हे तरी ठीक केलेत.' असा KLM ला आशीर्वाद देऊन झोपी गेलो.

====================================================================

दुसरा दिवस उजाडला. आजचे विमान दुपारी दोन पस्तीसला होते म्हणजे सकाळी भरपूर वेळ मोकळा होता. जरा उशीराच उठलो आणि रमत गमत सकाळची कामे उरकली. खोलीला मोठी गॅलरी होती. जवळच कार पार्कापलीकडे ग्रीनहाऊसेस होती. शेतातील जमीन नवीनच नांगरलेली होती. बहुतेक नजीकच आलेल्या वसंत ऋतूत टुलीप लावण्याची तयारी सुरू झाली असावी.

न्याहारीसाठी बाहेर पडलो. काल इकडे तिकडे बघण्याचा फारसा मूड नव्हता. आता जाणवले की हॉटेल छान होते किंबहुना फारच प्रशस्त होते. जमिनीची प्रचंड चणचण असलेल्या हॉलंडमधल्या या हॉटेलमध्ये असलेले लांब रुंद व्हरांडे आणि बैठकीच्या जागा बघून मजा वाटली...

.

न्याहारी छान होती. चीजचे अनेक प्रकार ही नेदरलँडची खासियत. फळेही छान होती. शनिवारची शाकाहारी न्याहरी मनपसंत झाली. खोलीवर येऊन सगळ्या समानाची आवराआवर केली तरी १२ वाजताची बस पकडायला तासभर बाकी होता. मग कॅमेरा घेऊन सगळ्या हॉटेलला एक फेरी मारली.

दर्शनी भागातला विशाल लाकडी गरुडराज...

समोरची डच बाग...

बागेतली हॉलंडच्या राष्ट्रीय खूणेची... पवनचक्कीची... प्रतिमा..

बस आली आणि आम्ही विमानतळाकडे निघालो. आमचा रस्ता एका विमानांसाठी बनवलेल्या पुलाखालून जात होता. हा पूल विमाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार्‍या विमानतळाच्या भागांत इकडून तिकडे नेण्यासाठी करतात. आमची बस त्याच्याखालून जाण्यापूर्वी एक फिन एअरचे विमान त्या पुलावरून गेले...

विमानतळावर आप्रवास अधिकार्‍याने परत जाण्याचा शिक्का मारताना, "कैसा हो रहा है साब?" अशी हिंदीची मोडतोड करत आश्चर्याचा धक्का दिला. मागची मोठी रांग बघता त्याच्याशी संवाद शक्य नव्हता. तेव्हा "अच्छा हूँ" असे म्हणून पुढे निघालो. या विमानतळावरची विमानाचे दार चालत किती मिनिटांत गाठता येईल हे सांगायची ही पद्धत आवडली...

विमानाच्या दाराकडे जाताना हा हॉलंड कसीनो दिसला...

१९८९ साली पायात स्निकर होते म्हणून एटिकेट्सच्या नावाखाली याच कसीनोच्या अ‍ॅमस्टरडॅममधल्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला नव्हता आणि हॉटेलात जाऊन चामड्याचे बूट घालून यायला लावले होते त्याची आठवण झाली. आणि आता विमानतळावरच्या निर्गमन विभागात त्याच कसीनोची शाखा... म्हणजे "कसिनोंच्या बाबतीत हॉलंड बरेच पुढे गेलेले दिसते" असे मनातल्या मनात म्हणत आत शिरलो ;). खिशातले शिल्लक उरलेले सगळे नॉर्वेजियन क्रोनर बदलून युरोची नाणी घेतली आणि नशिबाचा खेळ सुरू केला. पहिल्या वीस मिनिटात माझे पैसे अधिक ५०-६० युरो जिंकले. नंतरच्या दहा मिनिटात सगळे हरलो ! तोपर्यंत विमानाची वेळ होत आली होती. बाहेर पडलो आणि विमानाच्या दाराकडे गेलो.

विमानाची वाट बघताना ध्यानात की माझे विमान कुवेतमार्गे आहे... म्हणजे दोन तास जास्त लागणार. कुवेतमध्ये विमानबदल नसल्याने बोर्डिंग पासवर कुवेतचा उल्लेख नव्हता. तडक दम्मामला जाणारे आणि हे, अशी दोन्ही विमाने एकाच वेळेस सुटणार होती. कालच्या रात्रीच्या गडबडीत हा फरक ध्यानात आला नव्हता. 'चला अजून एक छोटासा सेटबॅक' असे म्हणत बसून राहिलो... तसेही आता काही करण्यासारखे राहिले नव्हतेच. विमानात जाण्याची घोषणा झाली. सगळे रांगेत उभे राहिले आणि स्वागतिका येऊन म्हणाली, "सगळे बसून घ्या, विमान उशीरा सुटणार आहे". आता मात्र हद्द झाली. 'कोणाशी भांडून राग हलका करावा बरे ?' असा विचार करतच होतो तेवढ्यात ती स्वागतिका परत येऊन म्हणाली, "माफ करा. हे नाही तर ते दुसरे, दम्मामचे, विमान उशीरा सुटणार आहे. दोघांची सुटण्याची वेळ एकच आहे म्हणून थोडा घोळ झाला." तिच्यावर चडफडत, पण, काल चुकीने या विमानाचा बोर्डिंग पास घेतल्याच्या आनंदाने परत रांगेत उभा राहिलो !

आता मात्र अपघातांची मालिका संपली होती. अ‍ॅमस्टरडॅममधून बरोबर एक दिवस उशीरा निघालो आणि कुवेतमार्गे आल्याने दोन तास अधिक यामुळे एकूण २६ तास उशीरा, पण धडधाकट अवस्थेत आणि गाठीशी भरपूर अनुभव, स्मृती आणि आनंद बांधून परतलो.

(समाप्त)

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

=====================================================================

शेवटचे पान...

नमस्कार, रसिक वाचकहो.

ही आपली सफर आज संपली. आपल्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही सहल परत जगताना मला फार मजा आली. बर्‍याच जणांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिले. त्याबद्दल त्यांना जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.

इतर वाचकांनाही हे प्रवासवर्णन आवडले असावे अशी आशा आहे. त्यांनाही माझे लिखाण वाचनयोग्य समजल्याबद्दल धन्यवाद.

सर्वांनी असाच लोभ असू द्यावा. काही काळाने अजून एक सफर करायची तयारी ठेवा.

तोपर्यंत अनेक उत्तम शुभेच्छा !

....इस्पीकचा एक्का

प्रतिक्रिया

खुप सुंदर प्रवास झाला आमचा पण तुमच्या सोबत. धन्यवाद मस्त सफरी साठी :)

मोदक's picture

4 Apr 2013 - 1:40 am | मोदक

झक्कास!!!!!

खूप खूप धन्यवाद.

पुढील सफरीस शुभेच्छा. :-)

श्रीरंग_जोशी's picture

4 Apr 2013 - 1:56 am | श्रीरंग_जोशी

हि स्वप्नवत सहल यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.

अन या सहलीचे विस्तृत व रोचक वर्णन बहारदार चित्रांसकट आमच्यासाठी या लेखमालिकेद्वारे उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

या व याअगोदरच्या चीनच्या प्रवासवर्णन लेखमालिकेद्वारे आपण अनेकांना नेहमीपेक्षा वेगळ्या स्थळी सहलीला जाण्यास उत्तेजन दिले आहे याबद्दल मी आपला ॠणी आहे.

या लेखमालिकेत चौरा यांनी जी प्रतिक्रिया लिहिली होती की 'हाती असलेला पैसा कसा खर्च करावा ते इस्पिकचा एक्का यांचेकडून शिकावे' तिला पुन्हा अनुमोदन.

मागे मी खफवर एक विडंबनात्मक प्रसंग लिहिला होता त्यामधली एक ओळ आठवली. तुम्हारा भाग्य उस लेखक का है, जो अपनी लेखमालिका पूरी कर लेता है. खरे तर तुमच्या बाबतीत भाग्याऐवजी कर्तृत्व हा शब्द अधिक संयुक्तिक आहे.

आपण जेथे राहता त्यावरही लिहावे हि विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 12:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद ! आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळेच हे सगळं करायला उत्साह येतो. असाच लोभ असू द्यावा.

शिल्पा ब's picture

4 Apr 2013 - 2:07 am | शिल्पा ब

झकास.

झक्कास!!!! सर्व अनुभव खतराच. हीही सफर बहुत बहुत आवडली :) अजून येऊद्या लौकरच!!!!

खूपच सुंदर सफर झाली. आपल्याला अनेक धन्यवाद. लेखनशैली मस्तच आहे. पुढच्या सफरीसाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती.
परतीच्या प्रवासात जो उशीर झाला आणि त्यावेळी मनात जे जे विचार आधी उफाळून येतात आणि नंतर बोथट होत जातात याचा अनुभव तर अगदी चांगला रंगवलाय. तो वाचून माझ्याही अश्याच डिलेड फ्लाईटांच्या आठवणी आल्या.

मालिका संपल्याचे वाईट वाटले, पण आता नवीन मालिका लवकरच लिहाल, अशी आशा व्यक्त करते.
सुरेख झाली ही मालिका.

प्रचेतस's picture

4 Apr 2013 - 9:21 am | प्रचेतस

खूप सुंदर मालिका.

आता 'बाली' भटकंतीच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाली बद्दल लिहिलं नाही तर मलाच चुकल्या चुकल्या सारखं वाटेल !

खूप अप्रतिम प्रवास घडला तुमच्यामुळे. स्वप्नवत दुनियेची मनमोहक सफर करून आणल्याबद्दल धन्यवाद. :)
आता पुढील प्रवासाच्या प्रतिक्षेत.

सुज्ञ माणुस's picture

4 Apr 2013 - 9:57 am | सुज्ञ माणुस

मस्त ! किती कौतुक करावे आपले तेवढे थोडेच आहे.
पुढील खेपेस "Grand Canyon" ला पण जाऊन या. तो अनुभव तुमच्या शब्दात ऐकायला ( वाचायला :) ) आवडेल.

नानबा's picture

4 Apr 2013 - 10:17 am | नानबा

सहमत. एक्का राव, ग्रँड कॅनायन कराच. तुमच्या शब्दात वाचायला आणि कॅमेर्‍यातून बघायला खूप आवडेल. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुज्ञ माणुस आणि प्रथम फडणीस : धन्यवाद !

ग्रँड कॅनन बघितलीय... पण खूप पूर्वी. त्याकाळी डिजीटल फोटोग्राफी नव्हती. त्यामुळे त्या कागदी फोटोंची अवस्था आता प्रसिद्ध करण्याइतकी बरी राहिली नाही.

झकासराव's picture

4 Apr 2013 - 10:39 am | झकासराव

अप्रतिम :)
तुमच्या प्रवासवर्णन लेखमाला आदर्श आहेत :)

दिपक.कुवेत's picture

4 Apr 2013 - 11:28 am | दिपक.कुवेत

एकाच वेळि आनंद आणि दु:ख अशा समिश्र भावना दाटुन आल्यात. अप्रतीम फोटो/वर्णन वाचायला/पहायला मिळत होते त्याचा आंनद मानु कि हि लेखमाला ईतक्यात संपली त्याचं दु:ख करु हे कळत नाहिये. पुढ्ल्या वेळेस कुवेत मधला स्टॉप/ट्रांझीट टाईम जरा जास्त घ्या. तुम्हाला भेटायला आवडेल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या आमंत्रणाबद्दल आभार ! मागे एकदा (मार्च २००९) कुवेतला व्यावसायीक कॉन्फरन्सनिमित्त आलो होतो. तेव्हा जास्त वेळ काढून सहा दिवस राहिलो होतो. देश आवडला. परत येण्याचा योग आल्यास तुम्हाला भेटायला जरूर आवडेल.

धनुअमिता's picture

4 Apr 2013 - 12:25 pm | धनुअमिता

झक्कास!!!! खुप छान झाली सफर. सगळे भाग खुप आवडले.अशाच अनेकोनेक सफरी करा व आम्हांलाही करवा.

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

Mrunalini, मोदक, शिल्पा ब, बॅटमॅन, रेवती, यशोधरा, झकासराव आणि धनुअमिता : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेकानेक धन्यवाद !

प्यारे१'s picture

4 Apr 2013 - 1:13 pm | प्यारे१

संपली मालिका? :(
फुल्ल धमाल ट्रीप संपवून घरी जाताना उगाच हुरहूर वाटते असं वाटतंय.

>>>पाकिस्तानी मूळाचा माणूस होता.
हे वाक्य दोन तीन वेळा वाचलं तेव्हा समजलं.
'पाकिस्तानी मूळचा माणूस होता' असं वाचलं गेलं आधी. असो. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

'पाकिस्तानी मूळचा माणूस होता' :)

=)) =))

"क्योंकी पाकी भी कभी इन्सान था" अशी मालिका कल्पून डॉळे पाणावले.

स्मिता.'s picture

4 Apr 2013 - 1:32 pm | स्मिता.

नॉर्वे ट्रिप आणी त्याचं प्रवासवर्णन छानच झालं. परतीचा प्रवास म्हणजे थोडं गालबोट लागल्यासारखं झालं. पण तेवढं ठिकच आहे. तो सगळा ताप सुरुवातीच्या प्रवासात होवून मूड बिघडण्यापेक्षा शेवटून झाला हेच काय ते समाधान :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

परतीचा प्रवास म्हणजे थोडं गालबोट लागल्यासारखं झालं.

त्यात काही फार नाही. कुठलीही सहल अगदी १००% ठरवल्यासारखी होत नाही. पण मुख्य उद्देश सफल झाला की अशा गोष्टी काय फार त्रास देत नाहीत. पण नुसत छान छान न लिहिता सर्व अनुभव जसा होता तसा लिहिण्याचा प्रयत्न करतोय म्हणून याही गोष्टीचा उल्लेख आला, इतकेच.

स्मिता.'s picture

4 Apr 2013 - 2:29 pm | स्मिता.

तुम्ही अनुभव जसेच्या तसे लिहिताय म्हणूनच वाचायला मजा येतेय. नाहितर नुसतंच छान छान वाचायला ढिगाने पर्यटनविषयक संकेतस्थळ आहेत.

असेच आणखी अनुभव आमच्यासोबत शेअर करा. पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत.

मालोजीराव's picture

4 Apr 2013 - 2:50 pm | मालोजीराव

आमच्यासारख्या अनेक दुष्काळग्रस्तांना घर बसल्या परदेशी सफारी घडवताय…पुण्य लागेल तुम्हाला !

पुढच्या प्रवासाची हिंट द्या कि राव, म्हणजे आम्हीपण आत्तापासूनच सीट-बेल्ट बांधून बसतो

मस्त मस्त घडवलीत ट्रीप एकदम. धन्यवाद एक्कासाहेब.
वल्लीसाहेब म्हणतात तसे बालीचे पण येऊ द्या लवकर हिरवेगार फटू आणि रंगीत वृत्तांत.

श्रिया's picture

4 Apr 2013 - 3:19 pm | श्रिया

खूपच छान होती हि सफर! ह्या मालिकेतला प्रत्येक भाग आवडला. आता कोणत्या नवीन सफरीवर जायला मिळणार त्याची उत्सुकता आहे.

nishant's picture

4 Apr 2013 - 3:45 pm | nishant

मस्त सफर झाली .. तुम्हि इतक्या लांब दमाम वरुन युरोपात इतक्या थंडित आलात, हेच खरे कौतुकास्प्द आहे!! उत्तर व पश्चिम युरोपा सार्खेच मध्य-पुर्व युरोप (चेक रीपल्बीक, स्लोवाकिया, हंगेरी, र्कोएशिया, ल्युथेनिया ई..) देखिल फारच सुंदर देश आहेत. क्मुनिस्टाच्या पकडीतुन सुट्ल्या नंतर येथे झालेली प्रगती मी स्वतहा डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे अता एकदा मध्य-पुर्व युरोपाचि सफर होउन जाउ द्या. आपली त्या निमीत्ताने भेट होउन जाइल... ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2013 - 4:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या भागात आल्यावर आपल्याला भेटायला नक्कीच आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2013 - 4:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या भागात आल्यावर आपल्याला भेटायला नक्कीच आवडेल.

लई भारी लिहिलंत आणि खुप खुप धन्यवाद. पुन्हा एकदा पहिल्या सारखीच विनंती, या सगळ्याच्या खर्चाच्या बाबतीत काहि माहिती, अगदी इमेल वर दिली तरी चालेल.

खुपचं सुंदर्...मज्जा आली सगळे फोटो आणि संपुर्ण वृत्तांत वाचुन...धन्यवाद.

आता पुढील प्रवासाच्या प्रतिक्षेत.

नि३सोलपुरकर's picture

4 Apr 2013 - 7:01 pm | नि३सोलपुरकर

स्वप्नवत दुनियेची मनमोहक सफर करून आणल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर ;मालोजीरावांशी १०० % सहमत आहे आणी सीट बेल्ट बांधून आता पुढील प्रवासाच्या प्रतिक्षेत.

चौकटराजा's picture

4 Apr 2013 - 7:50 pm | चौकटराजा

हातात आला पैसा. मग केसरी नाहीतर सचिन बरोबर वार्‍या करायची आली उर्मी. पण काय मस्त ब्रेकफास्ट असतो हो त्यांचा ! या पलीकडे कुणास काही सांगू शकत नाही " अशा केसेस पाहिल्या होत्या. (अपवाद आपलेच मिपावरचे आनंद घारे
यांचे ब्लॉग पहा ! ) .आपण केलेले अप्रतिम प्रकाशलेखन व रिपोर्टिंग दोन्ही भारी.त्यामुळे मालिका संपल्याने चुकचुकल्या सारखे होतेय. आपला आनंद वाटल्याबद्द्ल ऋणी आहे.

उदय's picture

4 Apr 2013 - 8:04 pm | उदय

तुमचा हा लेख आणि आधीचे सगळे लेख वाचले. सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं केलत तुम्ही. खूपच छान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मालोजीराव, अभ्या.., श्रिया, nishant, ५० फक्त, शिद, नि३सोलपुरकर, चौकटराजा आणि उदय : आपल्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद !

मिसळ's picture

4 Apr 2013 - 9:07 pm | मिसळ

आणखी एका उत्तम सफरीचा अनुभव आणि सुंदर चित्रे. धन्यवाद.

राघवेंद्र's picture

4 Apr 2013 - 9:38 pm | राघवेंद्र

एक्का साहेब मस्त ट्रिप झाली. खुप चान्गल्या प्रदेशाची सविस्तर माहिती व फोटो दाखविल्याबद्दल धन्यवाद.

पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा !!!

राघवेन्द्र

मराठे's picture

4 Apr 2013 - 10:23 pm | मराठे

खूपच छान सफर घडवलीत.

अनन्न्या's picture

4 Apr 2013 - 10:24 pm | अनन्न्या

म्हणजे आमचेही सामान तयार करू. वेळ, प्रतिक्रिया, आणि आंतरजालाची कृपा!! शुभेच्छा!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2013 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिसळ , राघव८२, मराठे आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !

गौरव जमदाडे's picture

5 Apr 2013 - 2:36 pm | गौरव जमदाडे

सुंदर मालिका.
धन्यवाद , आपण आम्हास छान सफर घडवून आणत आहात. अगदी स्वतः फिरल्यासारखे वाटते .

सस्नेह's picture

5 Apr 2013 - 4:08 pm | सस्नेह

पु. ले. प्र.

आपण जेथे राहता त्यावरही लिहावे ही विनंती.

आणखी एका उत्तम सफरीचा अनुभव आणि सुंदर चित्रे. धन्यवाद.

चेतन माने's picture

5 Apr 2013 - 4:47 pm | चेतन माने

मज्जा आली पूर्ण सफर वाचताना.पुढच्या सहलीच्या लेखमालेची वाट बघतोय, धन्यवाद !!!
:):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2013 - 4:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

गौरव जमदाडे, स्नेहांकिता, स्नेहांकिता आणि चेतन माने : अनेक धन्यवाद !

हरिप्रिया_'s picture

6 Apr 2013 - 1:42 pm | हरिप्रिया_

अतिशय सुंदर लेखमाला !!!
घरबसल्या आम्हाला फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद :)

मनराव's picture

15 Apr 2013 - 5:45 pm | मनराव

सगळी सफर वाचुन काढली........ झक्कास अनुभव.....

मालोजीराव's picture

17 Apr 2013 - 3:30 pm | मालोजीराव

नवीन प्रवासवर्णन ल्याह्याला घ्या राव आता

कोमल's picture

20 Apr 2013 - 5:12 pm | कोमल

:( :'(
पूढची ट्रिप कधी घडवताय??

वाचनाला आणि फिरायला भुकेली

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2013 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे


भन्नाट स्मायली... खूप आवडली ! धन्यवाद !!

सुहास झेले's picture

20 Apr 2013 - 6:43 pm | सुहास झेले

जबरी...एकदम मस्त सफर झालीय :) :)

विलासराव's picture

21 Apr 2013 - 12:34 am | विलासराव

आत्ताच वाचुन काढली.
अफलातुन झालीये.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

सगळ्या भागांसाठी धन्यवाद. छान सफर घडवून आणलीत.

एकदम सुंदर लेखमालिका..!! सर्व भाग अगदी एकामागोमाग आणि वेळेत टाकल्याबद्ल आभार :)
अगदी तिथे जाऊन हे सगळं बघितल्याचा अनुभव मिळाला..अनेक धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2013 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

हरिप्रिया_, मनराव, मालोजीराव, कोमल, सुहास झेले, पाषाणभेद आणि अस्मी : आपल्या सर्वांना सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद ! नविन सफरीला गेल्याने धन्यवाद देण्यास जरा उशीरच झाला, पण लवकरच नविन प्रवासवर्णन लिहून ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न करेन. असाच लोभ असू द्यावा.

Rajkumar4545's picture

5 Jul 2015 - 5:29 pm | Rajkumar4545

आपल्या ह्या सफरीला येकुन किती खर्च आला. ते सागितले असते तर बरे झाले असते.

हा धागा काल बघितला आणि तेव्हा पासून सर्व भाग एकामागून एक वाचून काढले. अप्रतिम, अद्भुत हे शब्द फार फिके पडतील अशी ही लेखमलिका झाली आहे.
उत्तर ध्रुवीय प्रदेश हा मला नेहमीच अतिशय आकर्षक पण जायला कठीण, हवामान अती थंड या सर्व प्रकारांमुळे जरासा फॉरबिडन असा वाटत आलाय. इथे कधी जाण्याची गोष्ट तर खूप दूर पण या विषयी इतके सुरेख प्रवासवर्णन आणि तेही मराठीमधून वाचायला मिळेल हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. अलिबाबाची ची ही गुहा आमच्यासाठी खुली करण्यासाठी डॉ. म्हात्रे, तुमचे शतश: आभार.

मस्त सफर. ही भटकंती पहायची कशी काय राहून गेली!

उत्कृष्ट लेखमाला डॉ म्हात्रे !
बऱ्याच दिवसांपासून ही लेखमाला वाचत होतो, आज पूर्ण झाली.

स्वीडन सोडला तर ह्या बाजूचे बाकी देश काही नशिबात नाहीत, मुद्दाम ठरवूनच जावे लागेल. तुमच्या ह्या लेखमालेमुळे बकेट लिष्टीतला त्यांचा क्रम वर आला हे निश्चित :-)

सर्वांग सुंदर लेखमालेसाठी आभार.

दिपस्तंभ's picture

7 Aug 2017 - 12:47 pm | दिपस्तंभ

आपल्या प्रवास वर्णनाची शैली खूपच छान आहे. मलाही एकदा तरी नॉर्वे ला जायचंय. तिथला निसर्ग आपण छानच टिपलाय आणि शब्दबद्ध केला आहे. युरोप मध्ये नॉर्वे देशाची सर्वच बाबतीत आघाडी आहे.

जेम्स वांड's picture

7 Aug 2017 - 2:18 pm | जेम्स वांड

पूर्ण मालिका झपाटल्यागत वाचली, एकच विनंती तुमच्या समृद्ध अनुभवांची पोतडी कायम मिपा अन मिपाकरांकरता तुम्ही उघडून ठेवताच, त्याची सुबक बांधणी करून प्रकाशित केलेलं एखादं पुस्तक नक्की काढा, संग्राह्य ठेवावा असा ठेवा होईल, पुस्तक काढलेच तर ते माझ्या बुकशेल्फ मध्ये ठेवणं माझा मानबिंदू असेल :)

रुपी's picture

7 Aug 2017 - 11:52 pm | रुपी

सुरेख!!

पूर्ण लेखमालिका वाचली. खूप छान झालीये. धन्यवाद.
सर्व फोटो आणि लेखनशैली फारच मस्त.

भटक्या फोटोग्राफर's picture

9 Dec 2017 - 2:16 am | भटक्या फोटोग्राफर

सर्व भाग एका दमात वाचून काढले वर्णन फार छान virtual ट्रिप झाली वाचून आता प्रत्यक्ष बघायची इच्छा होत आहे

मार्गी's picture

12 Dec 2017 - 9:07 am | मार्गी

काल सगळे लेख एका दमात परत वाचले!!! जबरदस्त!!! भयानक!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 2:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळ्या नवीन वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद !