It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess.-- J.as. Burgess
एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं
यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: |
एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री-
र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति |
भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने-
रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् |
कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी
तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा |
विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही.
प्रस्तुत उल्लेख बडोदे येथे सापडलेल्या राष्ट्रकूटवंशीय राजा कर्क (दुसरा) याच्या शके ७३४ मधल्या ताम्रपटातील आहे. याच ताम्रपटात दंतिदुर्गानंतर आलेल्या कृष्णराजाने (पहिला) हे लेणे कोरविले तसेच यातील शिवलिंग हिरे-माणकांनी सजविले असाही उल्लेख आहे.
राष्ट्रकूटांच्या नंतरच्या पिढीतील अकालवर्ष कृष्ण (तिसरा) याच्या ताम्रपटांतही कैलासचे कर्तृत्व कुष्णराजालाच दिलेले आहे. या ताम्रपटांत म्हटलेले आहे की कृष्णराजाने अशी देवालये बांधली की ज्यामुळे पृथ्वी अनेक कैलासांनी सुशोभित केल्याप्रमाणे शोभायमान दिसते.
वेरूळची जैन आणि ब्राह्मणी लेणी पाहून आम्ही आता कैलास एकाश्म मंदिराच्या पुढ्यात आलो होतो. खरं तर याला लेणे म्हणायचे का मंदिर हा एक प्रश्नच आहे. आधी कळस मग पाया अशा पद्धतीनुसार कोरून हे एकाच कातळात प्रचंड मोठे असे लेणे-मंदिर बांधले आहे. याची बांधणी द्राविड पद्धतीची असून प्रवेशद्वारी दुमजली गोपुर असून त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर दिक्पालांसहित शिवाच्या विविध रूपांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. आतमध्ये मंदिरांच्या दोन्ही बाजूंना दोन प्रशस्त हत्ती झुलत असून प्रत्येक हत्तीच्या बाजूला एक एक भव्य स्तंभ आहे. वाद्यमंडप, नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मुख्य मंदिराची रचना तर बाहेरील दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये खोलवर कोरलेले अनुक्रमे लंकेश्वर लेणे आणि सप्तमातृका असलेली यज्ञशाळा अशी दोन उपलेणी. अर्थात मी येथे लिहितांना कैलासाच्या रचनेविषयी फारसा लिहिणार नाहीच कारण ते लिहिणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, शिवाय बहुतेकांनी कैलास लेणे पाहिलेलेही आहे आणि कैलासाच्या रचनेपेक्षाही इथे असलेल्या मूर्ती कमालीच्या रोचक आहेत. चला तर मग कैलासाची परिक्रमा करायला.
कैलास मंदिरी प्रवेश
प्रवेशद्वाराची रचना गोपुरासारखी असून दोन्ही बाजूच्या भिंतीत देवकोष्ठ आहे आणि त्यात भव्य अशा मूर्ती कोरलेल्या आहेत आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गंगा-यमुनेची मूर्ती आहे.
डाव्या बाजूच्या देवकोष्टातील मूर्ती
१. उर्ध्वशिवतांडव, चतुर्मुखी ब्रह्मदेव, आणि दिक्पाल
२. मयुरारूढ स्कंद, बोकडावर स्वार झालेला अग्नी, हरीण हे वाहन असलेला वायु आणि मकर हेच वाहन असलेला कुबेर
तर गोपुराच्या उजव्या बाजूला विष्णूचे काही अवतार, नागराज आणि त्रिविक्रम आणि शिवतांडव मूर्ती आहेत.
३. वराहावतार
४. नरसिंह अवतार आणि शिवतांडव
५. नागराज, बहुधा इंद्र आणि यम ( हे दिक्पाल भग्न झाल्यामुळे नीटसे ओळखू शकलो नाही)
महिषासुरमर्दिनी
गोपुरातून आत दोन्ही बाजूंना दोन दालने कोरलेली आहेत. त्याच्या पुढे गेल्यावर दोन्ही बाजूंना विविध प्रतिमा बघायला मिळतात. त्यापैकी एक आहे महिषासुरमर्दिनेची
सिंहारूढ दुर्गेने आपला त्रिशुळ क्रोधाने महिषासुराच्या छातीत खुपसलेला आहे. महिषाचे मुंडके उडाल्यामुळे आतला असुर आपल्या मूळ रूपात बाहेर यायचा प्रयत्न करतो आहे पण देवीने त्याला एकाच वेळी त्रिशुळाने तर एक पाय त्याच्या कमरेवर घट्ट रोवून त्याला रोधून धरल्यामुळे तो तशाच अवस्थेत गतप्राण होत आहे. तर महिषासुराच्या एका साथीदारावर देवीच्या सिंहाने हल्ला केला आहे.
६. महिषासुरमर्दिनी
गजान्तलक्ष्मी
महिषासुरमर्दिनेच्या अतिशय आवेशपूर्ण शिल्पाच्या समोरच शांत, संयत असे गजान्तलक्ष्मीचे शिल्प आहे.
सरोवरातील कमलासनावर लक्ष्मी बसलेली असून तिच्या दोन्ही बाजूस असलेले गजराज आपल्या सोंडेने पाण्याच्या कळश्या भरून ते वरच्या बाजूस असलेल्या हत्तींकडे देत आहेत आणि ते हत्ती त्या कळश्या उपड्या करून लक्ष्मीच्या मस्तकी त्या पाण्याचा अभिषेक करत आहेत. त्याहीवर हा सोहळा देव गंधर्व मोठ्या कौतुकाने बघत आहेत.सरोवरातील पाणी, मधूनच डोकावणारी कमलपुष्पे आणि सरोवरातील पक्षी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत. शिवाय दोन्ही बाजूंना दोन भव्य द्वारपाल आहेत.
७. गजान्तलक्ष्मी
हे शिल्प बघून बाहेर आलो आता कैलास लेण्याच्या आतल्या पटांगणात आमचा प्रवेश झाला. येथे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रचंड मोठे पण आता भग्नावस्थेतील हत्ती झुलत आहेत. तर ह्या हत्तीच्या बाजूंनाच उंचच उंच असे दोन स्तंभ आहेत.
८. हत्ती आणि स्तंभ
सरितादेवतांचे मंदिर
आता आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूने परिक्रमेस सुरुवात केली.
ह्याच डावीकडच्या हत्तीच्या बाजूच्या भिंतीत आहे ते गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांचे मंदिर. हे एक स्वतंत्र लेणेच असून आतमध्ये ह्या तीनही नद्या मूर्तस्वरूपात तीन कोनाड्यांमध्ये कोरलेल्या आहेत.
मध्यभागी आहे ती गंगा व तिच्या दोन्ही बाजूंना यमुना आणि सरस्वती आहेत.
मकरावर आरूढ गंगेची ही मूर्ती पहा. अतिशय सुडौल आणि प्रमाणबद्ध अशा ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजवांस लहानसे स्तंभ कोरलेले आहेत. त्या स्तंभावंर पुन्हा मकर कोरलेले असून मकराच्या मुखांतून निघालेल्या नक्षीने गंगेच्या मस्तकी एक कमानच तयार केली आहे. त्या कमानीचे नाव मकर. आज आपण ज्या देवांच्या सभोवती असलेल्या नक्षीदार कमानीला मखर म्हणतो ते हे मखराचे मूळरूप. मगराच्या मुखातून निघालेले ते मखर.
९. गंगा
ह्याच त्रिवेणी लेणीच्या डावीकडे (ही बाजू म्हणजे प्रवेशद्वाराबाजूकडील देवकोष्ठाचा आतील भाग) विविध मूर्ती कोरलेल्या आहेत त्यापैकी एक आगळेवेगळे शिल्प आहे ते महिषासुरमर्दिनीचे
महिषासुरमर्दिनी (परत एकदा)
यात दुर्गाभवानी सिंहावर बसून महिषासुराचा नि:पात करायला जात आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे महिषासुर हा त्याच्या महिष रूपातच न दाखवता मूळ असुर रूपातच दाखवला आहे. महिषाचे प्रतिक म्हणून त्याच्या आसुरी मस्तकावर दोन शिंगे कोरलेली आहे. हातातील गदा मोठ्या त्वेषाने उगारून तो दुर्गेवर आघात करण्यासाठी सरसावत आहे. तर देवीनेही हाती शस्त्रे धारण करून धनुष्याची प्रत्यंचा आकर्ण खेचलेली आहे. तिच्या धनुष्यातून सुटलेले बाण महिषासुराच्या शरीरात घुसलेले आहेत. तर त्याच्या साहाय्यक असुरावर सिंह त्वेषाने झडप घालत आहे. महिषासुरवधाचे हे अनुपम कृत्य आकाशातून देव गंधर्व मोठ्या नवलाने पाहात आहेत.
१०. महिषासुरमर्दिनी
ह्या शिल्पपटाच्या शेजारी उजव्या बाजूला गोवर्धन गिरीधारी, श्रीकृष्ण रूक्मिणी आणि रती मदन आणि गरूढारूढ श्रीविष्णू अशी शिल्पे आहेत.
११. शिल्पपट
कृष्णाने इन्द्राच्या कोपापासून वाचण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरीला आहे. बाजूलाच गोकुळातील खिल्लारे दाखवली आहेत.
१२. गोवर्धन गिरीधारी
मदन रती
श्रीकॄष्ण रूक्मिणी शिल्पाच्या शेजारीच रती मदनाचे शिल्प आहे. ही दोन अतिशय सुरेख शिल्पे आहेत. मदनाचा मकरध्वज त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस उंचावलेला असून मदन व रती ह्या दोघांच्याही मध्ये उस (इक्षुदंड) कोरलेला आहे. जणू दोघांमधल्या प्रेमाच्या गोडीचे प्रतिकच उसाद्वारे दाखविले गेले आहे.
१३. मदन - रती
या शिल्पपटाच्या पुढेच सुरु होते ते कैलासातील डाव्या बाजूच्या भिंतीत खोलवर कोरत नेलेले उपलेणे, लंकेश्वर
लंकेश्वर
गंगा, यमुना, सरस्वती लेणी मंदिराच्याच शेजारी असलेल्या एका ओसरीतून लंकेश्वर गुंफेत जायचा मार्ग आहे. उंच उंच अशा पायर्या अंधारातच चढत आपला प्रवेश लंकेश्वर लेणीमध्ये होतो.
बाहेरच्या बाजूस असलेली लांबलचक ओसरी, प्रशस्त सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी याची रचना. लंकेश्वर लेणीतील सभामंडपातील कलाकुसर बरीचशी जैन लेणीतील स्तंभांसारखी आहे त्यामुळे याचे बांधकाम त्या सुमारास झाले असावे असे वाटते.
१४. लंकेश्वर लेणीचा बाह्यभाग
१५. लंकेश्वराची ओसरी आणि त्यातले स्तंभ
आतमध्ये बराच अंधार आहे तसेच वटवाघुळांचा प्रचंड बुजबुजाट त्यामुळे इथे जास्त वेळ काढणे तसे त्रासदायकच ठरते. अंधारामुळे बर्याच मूर्ती दिसतही नाहीत. तरी त्यातल्यात्यात पुढील काही मूर्तींची छायाचित्रे घेता आली
१६. हिरण्यकश्यपूचा वध करतांना नरसिंह
१७. ब्रह्मदेव, महेश आणि विष्णू हे तीन प्रमुख देव
१८. एका बाजूच्या कोपर्यात त्रिमुखी शिवाची भव्य प्रतिमा कोरलेली आहे.
इथेच एका बाजूला भूवराहाची मूर्ती कोरलेली आहे. समुद्रात बुडालेल्या स्त्रीरूपी पृथ्वीला याने आपल्या दंतांच्या साहाय्याने बाहेर काढले असून पृथ्वी त्याला नमस्कार करत आहे. त्याच वेळेस वराहाने आपला पायाने असुर दाबून धरीले आहेत.
१९. भूवराह
याच्या जवळच शिवाची तांडव नृत्य करत असलेली अत्यंत देखणी मूर्ती आहे. शिवमूर्ती सालंकृत असून नृत्यमुद्रेद्वारे तांडव विलक्षणपणे रेखाटले आहे. नाग, त्रिशुळ धारण करून त्यांसहित तो नृत्य करत आहे.
२०. शिवतांडव
२१. सभामंडपातील स्तंभ
२२. सभामंडपाच्या छतावर कमल कोरलेले असून त्यात नटराज शिवाची नृत्यमग्न मूर्ती आहे.
ह्याशिवायही लंकेश्वरात देवी, शिव, विष्णू, चंद्र, सूर्य, द्वारपालादिकांच्या कित्येक मूर्ती कोरलेल्या आहेत पण त्या पुरेशा सुस्पष्टतेअभावी आणि विस्तारभयास्तव येथे देता येत नाहीत.
प्रदक्षिणापथ
लंकेश्वर बघून परत आल्या मार्गाने प्रांगणात उतरलो आणि पुढेच असलेल्या कैलासाच्या डाव्या बाजूस असलेल्या भिंतीतील दालनांकडे वळलो.
ही दालने म्हणजे वेरूळ लेण्यांच्या कडेच्या भिंतीत कोरलेला एक दोन्ही बाजूंनी काटकोनात असलेला एक प्रदक्षिणापथच आहे. या प्रदक्षिणापथात समान अंतरावर खण अथवा कोनाडे खोदलेले असून यात शैव आणि वैष्णव अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती अथवा पौराणिक कथांतील प्रसंग येथे कोरलेले आहेत.
२३. प्रदक्षिणापथ
२४. प्रदक्षिणापथ आणि त्यातील खणांतील मूर्ती
रावण शिरकमलार्पण
पहिल्या खणामध्ये शिवपिंड कोरलेली असून तिच्या भोवताली नऊ मुंडकी आहेत. तर पिंडीच्या खालच्या बाजूला रावण आपले उरलेले शेवटचे मस्तक कापण्याच्या तयारीत असून शिवाला प्रसन्न करण्यासाठी तो हे दिव्य करण्यास सज्ज झाला आहे. रावणाच्या ह्या घोर भक्तीने शंकर प्रसन्न होऊन रावणाला वरदान देतो अशी पौराणिक कथा.
२५. रावण शिरकमलार्पण
२६. पुढिल एका शिल्पपटामध्ये शिव पार्वतीसह अर्धालिंगनावस्थेत बसला असून खालच्या बाजूस एक शिवगण आहे तर बहुधा रावण शंकराची प्रार्थना करण्यासाठी आल्याचा प्रसंग कोरलेला आहे.
२७. यानंतरच्या शिल्पपटामध्ये शिवपार्वती कैलासावर शिवलिंग मध्ये घेऊन बसल्याचे दाखवले आहे तर शंकराचा एक पाय नंदीच्या मस्तकी आहे. जणू नंदीला तो आशिर्वाद देतो आहे.
यानंतर काही खणांमध्ये शिवपार्वतीच्या अक्षक्रीडा, रावणानुग्रह, रावण कैलास उत्थापन वगैरे प्रसंगाच्या मूर्ती आहेत. इथून पुढे एका खणात मार्कंडेयानुग्रहाचा प्रसंग कोरलेला आहे.
मार्कंडेयानुग्रह
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव असेही म्हटले जाते.
२८. मार्कंडेयानुग्रहमूर्ती (कालारी शिव)
अंधकासुरवध
इथून पुढे गेल्यावर एका खणात परत अंधकासुरवधाची मूर्ती सामोरी येते. याचे सविस्तर वर्णन वेरूळ लेणीवरील आधीच्या भागात केलेच आहे. इथेही ती मूर्ती थोड्याफार फरकाने तशीच असून त्रिशुळावर अंधकासुराला लटकवला असून त्याचे रक्त जमिनीवर पडून त्यापांसून असुर निर्माण होऊ नयेत म्हणून त्याखाली दुसर्या हाताने वाडगा धरलेला आहे. ह्या शिल्पातील शिवाच्या चेहर्यावरील भाव मात्र तुलनेने सौम्यच भासतात. इथे मात्र अंधकासुराच्या खालच्या बाजूला उग्र चेहर्याची भयानक कालीची मूर्ती आहे. जणू हा अंधकासुराचा मृत्युच.
२९. अंधकासुर वध
त्रिपुरातंक
यापुढच्या शिल्पपटात त्रिपुरांतक शिवाची मूर्ती आहे.
शिवाने आपल्या हाताने धनुष्याची प्रत्यंचा आकर्ण तानून धरलेली असून एका हाताने तो विष्णूरूपी बाण धनुष्याला जोडण्याच्या तयारीत आहे. एका हातात नंदीध्वज असून मागच्या हाताने त्याने त्रिशुळ धरीला आहे.
३०. त्रिपुरांतक शिव
पुढे एका खणांत शिवतांडव कोरलेले आहे.
३१. शिवतांडव
इथून पुढच्या शिल्पपटांतही पौराणिक कथांमधील काही शिल्पपट कोरलेले आहेत. इथून पुढे जाता आता कोनाड्यात शिवमूर्तींबरोबरच वैष्णव मूर्ती सुद्धा कोरलेल्या दिसून येतात.
३२. शंख व चक्र धारण करणार्या विष्णूचे विनयशाली रूप
३३. कोनाड्यांतील शिल्पपट
रावण गर्वहरण
पुढील एका शिल्पपटात गोकर्ण महाबळेश्वराची कथा कोरलेली आहे. रावण शिवलिंग उचलण्याच्या प्रयत्न करतो आहे पण ते न उचलेले जाता अधिकाधिकच मोठे होऊन रावणाचे गर्वहरण होते.
३४. रावणगर्वहरण
त्यापुढे एका खणात विष्णूचा नरसिंहावतार कोरलेला आहे. अगदी दक्षिण भारतीय शैलीतील ही मूर्ती आहे.
३५. नरसिंहावतार
यानंतरच्या एका शिल्पपटात शेषशायी विष्णूच्या नाभीतून उमललेल्या कमलावर झालेला ब्रह्मदेवाचा जन्म कोरलेला आहे.
३६. शेषशायी विष्णू
त्रिविक्रम
यापुढे एका शिल्पपटात गोवर्धन गिरीधारी दाखवला असून त्यापुढील खणात विष्णूची देखणी त्रिविक्रम मूर्ती आहे. अर्थात वामनावतार.
खालच्या बाजूला बटूरूपातील वामन उभा असून त्याच्या हातावर उदक सोडून तीन पावले मावतील इतकी भूमी देणार्या बळीराजाची ऊर्ती कोरलेली आहे तर त्याच्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य उभा असून तो बळीला त्यापासून परावृत्त करतो आहे. पण बळीने अखेर दानाचे उदक सोडल्यावर विष्णूने आपले त्रिविक्रमाचे मूळ रूप प्रकट केले. एक पाय अतिशय उंच करून त्याने जणू स्वर्गच पादाक्रांत केला आहे तर दुसर्या पायाने त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकिली आहे आता जणू तो बळीला तिसरा पाय कुठे ठेऊ असे विचारत आहे.
३७. त्रिविक्रम मूर्ती (वामनावतार)
३८. यानंतरच्या शिल्पपटात गरूढारूढ विष्णू दाखविला आहे.
यानंतरच्या शिल्पपटात वराहवतार कोरलेला आहे. वराहाने आपल्या दंतांवर पृथ्वी तोलून धरलेली असून तो हिरण्याक्षाचा वध करताना दाखविला आहे.
३९.वराहावतार
याच्या शेजारी आहे कालियामर्दन. इथे कालियानाग मनुष्यरूपात दाखवला असून विष्णू त्याचे मर्दन करत आहे. ही बहुधा कालियामर्दनाची मूर्ती नसूही शकेल. कदाचित विष्णू दुसर्याच एका नागाचे दमन करताना कोरलेला असेल.
४०. कालियामर्दन
यानंतरच्या शिल्पपटात विष्णूची मूर्ती कोरलेली असून उजव्या हातात कौमोदकी गदा येथे स्त्रीरूपात दाखवली आहे. अर्थात गदेवर स्त्रीमूर्ती कोरलेली आहे. एक हात अभयमुद्रेत असून तिसर्या व चौथ्या हातांत अनुक्रमे चक्र व शंख कोरलेले आहेत.
४१. विष्णू आयुधमूर्ती
ह्या प्रदक्षिणापटाच्या शेवटच्या खणांत अन्नपूर्णेची मूर्ती आहे. तिच्या एका हातात कमंडलू तर दुसर्या हातात धान्याचे कणीस असून तिसर्या हाती जपमाला तर चौथा हात अभयमुद्रेत आहे.
४२. अन्नपूर्णा
४३. प्रदक्षिणापथ
कैलास एकाश्म मंदिराच्या डाव्या बाजूकडून, पाठीमागून व उजवीकडच्या अशा एकसलग असलेल्या प्रदक्षिणापथामधून आपण आता बाहेर येतो. याच बाजूला भिंतीत आतल्या बाजूस कोरलेले आहे एक दुमजली लेणे अर्थात यज्ञशाळा.
यज्ञशाळा
बाहेरील बाजूस कोरलेला उंचच उंच पायर्यांचा जीना चढून जाताच आपला प्रवेश यज्ञशाळेत होतो.
हे दालन अतिशय प्रेक्षणीय असे आहे. दालनाच्या सुरुवातीला दोन्ही स्तंभांसमोर दोन स्त्रीप्रतिमा उभ्या आहेत. तर आतल्या दालनात सप्तमातृकांबरोबरच वीरभद्र शिव आणि गणेशाची मूर्ती कोरलेली. या अतिशय सुंदर मूर्ती मूर्तिभंजकांच्या प्रहारामुळे आज भग्नावस्थेत आहेत तरीही त्यांचे मूळाचे सौंदर्य आजही लपत नाही. यज्ञशाळेतील मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती भिंतींवर उठावात कोरलेल्या नाहीत तर त्या भिंतीपासून अलग अशा कोरलेल्या आहेत.
दालनाच्या डाव्या बाजूला भिंतींसमोर तीन स्त्रियांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यात मध्यभागी असलेल्या एका स्त्रीला दोन्ही बाजूंच्या दासी चवर्या ढाळतांना दाखवल्या आहेत. ही मधली स्त्री कोण याचा उलगडा होत नाही. एका दासीला टेकून एक बटू बसला आहे.
४४. यज्ञशाळेतील डावीकडील शिल्प
सप्तमातृका
तर यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेल्या आहेत त्या सप्तमातृका, वीरभद्र शिव आणि गणेश
या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या ह्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतिकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. प्रत्येक मूर्तीच्या खाली तीचे वाहन कोरलेले आहे. हंस, नंदी, मोर, गरूड, घुबड, हत्ती आणि कोल्हा अशी ती वाहने. सप्तमातृकांची वाहने पुरांणांमध्ये भिन्न भिन्न अशी दाखवलेली आहेत.
४५. सप्तमातृका शिल्प
४६. सप्तमातृकांची वाहने
४७. सप्तमातृकांची वाहने
काल, काली आणि दुर्गा
सप्तमातृकांच्याच उजवया बाजूच्या भिंतीत कोरल्या आहेत तीन मूर्ती. त्यातली एक मूर्ती आहे सर्वभक्षक कालाची अर्थात साक्षात मृत्युची.
जराजर्जर, अस्थिपंजर अशा ह्या मूर्तीच्या मांडीवर एक प्रेत आहे. मृत्यु जणू त्या प्रेताला आधार देत आहे. तर दुसरा पाय अजून एकाच्या मस्तकी ठेवलेला आहे. कालाच्या शेजारीच डावीकडे त्याचा एक सहाय्यक गण कोरलेला आहे. या मूर्तीवरील कालाच्या चेहर्यावरील भाव भयानक न रेखाटता अतिशय निर्विकार रेखाटले आहेत. जणू मृत्यु हे एक अटळ्सत्य असल्याचे तो दाखवून देत आहेत.
कालाच्याच शेजारी उजवीकडे एक स्त्रीमूर्ती दाखवली आहे ती कोण याचा उलगडा मला झाला नाही बहुधा कालीची ती प्रतिमा असावी तर सर्वात शेवटी उजवीकडे दुर्गाभवानीची मूर्ती कोरलेली आहे. सिंहारूढ आणि हाती त्रिशुळ धारण करणारी ही मूर्ती कमालीची देखणी आहे.
एकाच ठिकाणी सप्तमातृका आणि काल, काली मूर्ती म्हणजे जीवन आणि मृत्युचे प्रतिकच.
४८. काल, काली आणि दुर्गा
४९. यज्ञशाळा बाहेरील बाजूने
यज्ञशाळेचा जिना उतरून परत खालच्या प्रांगणात आलो. आता इथे परत दुसर्या बाजूचा स्तंभ आणि गजराज आहे तर समोरीला बाजूस भितींवर काही प्रसंग कोरलेले आहेत.
आता वेरूळच्या कैलास एकाश्म मंदिरातील बाहेरील भिंतीकडील बाजूची प्रदक्षिणा आता पूर्ण झाली. कैलास लेणीच्या ह्या भागात असंख्य शिल्पाकृती आहेत, इतक्या की त्यांची मोजदाद करणेही जवळपास अशक्य आहे, तरिही जितक्या मूर्ती इथे देणे शक्य आहे तितक्या त्या मी घेतल्या. तरीही येथल्या शिल्पपटांमधील गंगावतरणासारखे रोचक प्रसंग माझ्या केमेर्यातून निसटून गेलेच.
आता पुढच्या भागात आपला प्रवेश होईल तो कैलास शिवमंदिरात.
क्रमश:
प्रतिक्रिया
17 Apr 2013 - 3:47 pm | स्पा
जबराट झालाय हा पण भाग
फोटो खलास
पुढील भाग लवकर टाकस
17 Apr 2013 - 4:33 pm | किसन शिंदे
प्रत्येक शिल्पावर अगदी बारकाईने लिहलंय.!
17 Apr 2013 - 4:42 pm | प्यारे१
+१
२०१० च्या दिवाळीनंतर वेरुळचे फोटो स्वतःच काढले. पण वेरुळ 'बघितलं' ते आत्ताच वल्लीच्या लेखातूनच.
अवांतरः शिल्पावर अगदी बारकाईने लिहलंय पण शमितावर काहीच नाही . ;)
18 Apr 2013 - 10:41 am | ज्ञानोबाचे पैजार
+१
वल्ली बुवांच्या नजरेतुन हे सगळे पहाताना फार आनंद होतो.
20 Apr 2013 - 3:30 am | पाषाणभेद
सहमत.
वल्लींच्या नजरेतून लेणी पाहण्याचा आनंद काही निराळाच आहे.
21 Apr 2013 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा
प्लश...प्लश..प्लश वन..वन..वन...!!! :)
17 Apr 2013 - 4:37 pm | यशोधरा
लेखाबद्दल धन्यवाद.
17 Apr 2013 - 4:41 pm | नि३सोलपुरकर
मस्त लिह्लेस वल्ली.
खुपच छान्,
पुढील भागाची वाट पाहतो आहे.
17 Apr 2013 - 4:43 pm | लॉरी टांगटूंगकर
नेहमीप्रमाणे झकासच!!
निवांतपणे अजून एक-दोनदा वाचावा लागणारे :)
17 Apr 2013 - 4:43 pm | आतिवास
माहितीपूर्ण लेख; वाचायला वेळ मात्र लागला थोडा जास्त!
नंतर लक्षात आलं की प्रकाशचित्रं अप्रतिम आली आहेत, ती पाहण्यात जास्त वेळ गेला - बारकावे चांगले टिपले आहेत.
गेलेल्या वेळेबद्दल अजिबात तक्रार नाही, मजा आली :-)
17 Apr 2013 - 5:06 pm | जोशी 'ले'
+ मस्त
17 Apr 2013 - 6:54 pm | पैसा
कॅमेरा बोलत आहे तुझ्या हातात! अवर्णनीय सुंदर फोटो आणि माहिती. एक सांग, काही मूर्त्या छिन्नभिन्न दिसत आहेत. सगळीकडे मूर्तीभंजनाचे काम मुस्लिम सैन्यांनी केले असे दिसते. पण ही लेणी बराच काळ जंगलात लपली होती ना? की इस्लामी आक्रमणे होत असतानाच्या काळात ती लोकांना माहिती होती?
17 Apr 2013 - 8:02 pm | प्रचेतस
जंगलात लपली होती ती अजिंठा लेणी. वेरूळ नव्हेत.
अजिंठा लेणी खोल दरीत आणि झाडोर्यात लपली होती तर वेरूळ मात्र जमिनीच्या पातळीवरच आहेत त्यामुळे ती लपणे शक्यच नाही.
यादवकाळापर्यंत वेरूळ लेणींमध्ये शिल्पकाम चालूच होते. जैन लेणींमधला एक देवनागरी शिलालेख त्याचा पुरावाच. रामदेवराय यादव पण कैलास लेण्यातील महादेवाच्या दर्शनाला यायचा असे उल्लेख आहेत. शहाजीराजांचे पिता मालोजीराजे ह्यांचे वडील बाबाजी भोसले वेरूळ गावचे पाटील होते. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार तर खुद्द मालोजीराजांनीच केला. साहजिकच वेरूळची लेणी पूर्णकाळ ज्ञात होतीच. वेरूळ लेण्याचा पहिला विध्वंस अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या कारकिर्दीत झाला असावा. तर नंतर औरंगजेबानेही वेरूळ लेणी बरीच भग्न केली.
औरंगजेबानंतर मात्र ही वेरूळची लेणी बेवसाऊ झाली.
जेम्स फर्ग्युसनच्या १८४५ साली 'रॉक कट टेम्पल्स ऑफ इंडिया' ह्या पुस्तकात वेरूळ लेण्यांची तत्कालीन छायाचित्रे आहेत त्यात त्यांची बरीच पडझड झाल्याचे दिसते.
17 Apr 2013 - 8:13 pm | पैसा
अजिंठाबद्दल ऐकलेले असल्यामुळे वेरूळही जंगलात लपले होते असा माझा समज झाला.खुलाशाबद्दल धन्यवाद!
17 Apr 2013 - 7:02 pm | स्मिता.
प्रत्येक वेळी वेगळं काय लिहिणार? हासुद्धा भाग सुरेख आणि माहितीपूर्ण. पुभाप्र.
17 Apr 2013 - 7:12 pm | चित्रगुप्त
वाहवा. अतिशय सुंदर फोटो आणि तितकेच सुंदर, अभ्यासपूर्ण लेखन. संग्रहणीय आणि पुन्हा पुन्हा बघणीय लेख.
17 Apr 2013 - 7:29 pm | सूड
मस्त !!
17 Apr 2013 - 8:40 pm | बॅटमॅन
वेरूळवरच्या बर्जेसच्या टिप्पणीप्रमाणेच म्हणावे वाटतेय की वल्लीचा हा लेख आत्तापर्यंतचा सगळ्यात भव्यदिव्य लेख आहे. मान गये साहब _/\_
(नित्यनूतनस्तुतिशब्दशोधविवंचनाग्रस्त) बॅटमॅन.
18 Apr 2013 - 2:12 am | अभ्या..
अत्यंत सुरेख वर्णन आणि प्रकाशचित्रे.
धन्यवाद वल्ली. :)
18 Apr 2013 - 8:16 am | स्पंदना
आपण काय पहातो आहे ते तुमच्या लेखांमुळे कळत जातं वल्ली. आताप्र्यंतचे भाग वाचणखुणा म्हणौन साठवायचा प्रय्त्न आहे.
18 Apr 2013 - 11:04 am | सुमीत भातखंडे
हे लेख म्हणजे एक पर्वणीच असते आमच्यासारख्यांसाठी
इथल्या इथे राहूनही साला खूप काही मिस करतोय असं वाटत राहातं
बाकी काय बोलणार...नेहमीचीच प्रतिक्रिया - फोटो आणि वर्णन दोन्ही लाजवाब
18 Apr 2013 - 12:15 pm | चौकटराजा
कैलास पेक्षा उच्च दर्जाचे कोरीव काम असणारी मंदिरे भारतात सर्वत्र आहेत. पण कोरीव भारताची ओळख जागतिक पातळीवर कैलासनेच होते. ते भारताच्या पुरातन वास्तूकलेच्या मेरूमणि पदी बसवलेले शिल्प आहे.कितीही वेळा पहा देवगिरीचा किल्ला व कैलास ! संतुष्ट होउनही पुन्हा पाहावेसे वाटते. एका प्रामाणिक अभ्यासकाने धागा काढून कैलासची शोभा वाढविलीच आहे. वल्ली बुवा धन्यवाद !
18 Apr 2013 - 8:21 pm | प्रचेतस
सहमत आहे.
कर्नाटकातील हळेबीडू, बेल्लूर, महाराष्ट्रातील खिद्रापूर, भुलेश्वर इत्यादी मंदिरांतील शिल्पकाम (शिल्पकामापेक्षाही मूर्तीकाम हा शब्द इथे जास्त योग्य आहे) कैलासापेक्षा निर्विवादपणे उच्च दर्जाचे आहे. पण ही सर्व मंदिरे बांधीव आणि कैलासाच्या मानाने बरीच लहान आहेत. कैलासातील सर्व शिल्पकाम एकाच अखंड खडकातून कोरलेले आहे जो आजही एक चमत्कार आहे.
18 Apr 2013 - 10:25 pm | कवितानागेश
मस्त झालाय हा भाग पण.
20 Apr 2013 - 1:57 am | मोदक
पुढचा भाग कधी..?
20 Apr 2013 - 10:12 pm | महेश नामजोशि
अतिशय सुन्दर असे विवेचन केले आहे. खुप वर्षापुर्वि हि लेणि पाहिलि होति. आता आठवतहि नव्हति. पण आता नव्याने बघुन खुपच आनन्द झाला. माहिति तर अप्रतिम आहे.
20 Apr 2013 - 11:35 pm | सुहास झेले
नेहमीप्रमाणे जबरी.
एक एका शिल्पाची माहिती वाचून खऱ्या अर्थाने लेणी बघितल्या.... पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)
21 Apr 2013 - 1:46 pm | गणपा
वल्ली तुला दंदवत घालायला आलो होतो.
तु पुरातत्व खात्यात कामाला आहेस काय रे?
26 Apr 2013 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका अप्रतिम कलाकृतिची अप्रतिम ओळख ! अजून काय लिहिणार ?