मी शक्यतो व्यक्तिचित्रं वगैरे लिहीत नाही....
माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या घटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे अनेक लोक ह्यांबाबत कधी ब्लॊगवर काही लिहीत नाही, मला ते तितकेसे आवडत नाही....
तसेच आपण काम करत असलेल्या जागेबद्दल आणि तिथे घडत असलेल्या घटनांबद्दल ब्लॊगवर लिहणे हे ही मला तितकेसे योग्य वाटत नाही....
पण आज थोडंसं हे सर्व बाजुला ठेऊन ४ शब्द लिहावेसे वाटत आहेत.
सध्या तसं पाहता आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असेल तर ऑफ़िसात. दिवसातले जागेपणातले महत्वाचे निदान ९-१० तास तरी आपण ऑफ़िसात असतो. इथे मग अनेक लोकांशी आपला संबंध येतो. मुळात ऑफिस म्हणजे काय तर जिथे ४ लोक एकत्र जमुन मी जे काही करतो ते सगळ्यात भारी कसे आहे आणि त्यामुळे कंपनीला अमुकतमुक फायदा कसा होतो हे सांगायचा प्रयत्न करत असतात ती जागा, ऑफिस म्हणजे काय तर हेच ४ लोक जरा चान्स मिळाला की भले दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन का होईना पण पदजेष्ठतेच्या वरच्या पायरीवर जायचा प्रयत्न करतात ती जागा .. भले ह्याला मग फास्ट ट्रॅक करियर वगैरे म्हणतही असतील, ऑफिस म्हणजे काय तर ज्याच्याशी आपले पटत नाही किंवा समोरच फारच स्पष्ट आणि खरे बोलतो हे लक्षात आल्यावर इतर ३ जणांनी कंपु करुन त्याला कुठे ना कुठे दाबायला बघणे आणि त्याला होणार्या त्रासात स्वतःला सुख मानुन घेण्याची जागा, ऑफिस म्हणजे काय तर वरच्या पोझिशनसाठी आणि हेवी पे-पॅकेजेससाठी जमेल ती तडजोड करणे आणि त्याला नंतर अॅाजिलीटी/व्हर्साटाईल असल्याचे गोंडस नाव देणे ... असे बरेच काही लिहता येईल आणि ते बहुतांशी खरेच आहे. ऑफिसमध्ये वर लिहले आहे असे काही घडत नाही असे ज्यांना वाटते ते साधुसंत आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते हिमालयात जायचे सोडुन चुकुन ह्या सिमेंटच्या जंगलात आले आहेत असेही मला वाटते.
ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही .. मुखवट्याची कृपा.
एवढी सगळी लफडी असताना आणि स्वतःला प्रोजेक्ट करायचे एवढे काम बाकी असताना ऑफिसात दोस्ती वगैरे करायचा भानगडी हव्यातच कशाला? दोस्ती वगैरे ठिक आहे हो, पण उद्या हाच दोस्त आपल्या प्रमोशनच्या रस्त्यात दत्त म्हणुन उभा राहिला किंवा ह्याच्या तिथे असण्यामुळे आपले एखादे भारी ट्रेनिंग किंवा ऑनसाईट व्हिसिट वगैरे धोक्यात येत असेल तर ह्याचय दोस्तीचे काय लोणचे घालायचे ? बरं, समजा मी ह्याच्यासाठी शक्य त्या तडजोडी केल्या आणि समोरुन त्याने काहीच न करता जिथे चान्स मिळेल तिकडे चान्स मारला तर मी तक्रार तरी कुणाकडे करायची ? एकंदरीत हे रिस्कीच प्रकरण नाही का ?
म्हणुनच बरेच जाणकार सांगतात की ऑफिसात शक्यतो प्रेमाच्या आणि दोस्तीच्या फंदात पडु नये .. पहिले जमले, दुसरे साफच गंडले, असो.
पण काहीही असले तरी मी शक्यतो ऒफ़िसात मित्र बनवत नाही, त्या मित्रांचा त्रास होतो, त्रास होतो म्हणजे असा की त्यांच्या अपरिहार्य असणा-या दुरावण्यामुळे त्रास होतो, असा अनुभव निदान २-३ वेळा घेऊन झाला आहे त्यांमुळे आजकाल जरासा मी सावधच असतो, उगाच पटकन कोणीतरी यायचा आणि दोस्त होऊन जायचा, ही साली दोस्ती नंतर उदाहरणार्थ गंमतच होऊन बसते. त्यापेक्षा आपलं मुन्नाभाईमधल्या जे. अस्थाना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे "We are not here to make friends" हे पाळावे आणि निदान ऒफ़िसात मित्र वगैरे बनवायच्या भानगडीत पडु नये. शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये.
पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे.
आयडियली स्पिकिंग ऑफिसात होणार्या दोस्तीला कुठेना कुठे अंत असतोच, अंत म्हणजे अगदी दी एंड नव्हे पण एखाद्याने काही कारणासाठी दुसर्या ठिकाणी निघुन जाणे हे अगदीच स्वाभाविक आहे. करियर म्हणा, वैयक्तिक तडजोडी म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा पण हे घडतेच, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असणारे आणि पक्के दोस्त असणारे ह्यांचीही उदाहरणे विरळ नाहीत पण आजच्या घडीला हे तितकेसे स्वाभावीक नाही.
मुळ ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र आलेलो असतो त्या ऑफिसला ह्या मुव्हमेंटमुळे काही फरक पडत नाही (निदान वरकर्णी असे म्हणायची पद्धत आहे). कारण एक गेला की त्याला जागा घ्यायला इतर ४ जण तयार असतात, इनफॅक्ट त्याच्या जाण्याची वाटच बघत असतात. पण इथे प्रत्येकजण निराळा आहे आणि कुणीच कुणाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे सत्य आहे तेच बर्याचदा लोकांना कळत नाही.
रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते?
नाही .. सगळ्याच गोष्टींना रिप्लेसमेंट देता येत नाही म्हणुनच अशा मुव्हमेंट्स जस्टिफाईड नसतात .. समाजासाठी आणि त्या त्या ग्रुपसाठी.
हे ही सर्व एक वेळ जमुन जाईल, पण ह्याचा परिणाम जो पर्सनल लेव्हलला होतो त्याचे नुकसान मात्र कधीही भरुन ने येण्यासारखे असते. डिटेल लिहायची गरच नाही पण अगदी छोट्याछोट्या गोष्टीतही एखाद्याच्या असण्याची सवय झाली असते, आता त्याचे इथे नसणे एवढे रिप्लेसेबल नक्कीच नसते.
पण अपरिहार्य आहे हे सगळे .. हे सगळे करावेच लागते.
तुमची अगदी लाख इच्छा नसली तरी ह्या गोष्टी घडतात आणि त्यातुनच माणुस पुढे जातो, आता किंचित लांब असल्याने दोस्ती अजुनही गहिरी होत जात असते कदाचित, निदान अशा अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ?
'अतिपरिचयात अवज्ञा' टाळावी असे म्हणतात, म्हणजे असे की एखाद्याशी फारच घसट वाढली की त्यातुन मानापमानाचे प्रसंग उद्भवतात असा मानवी स्वभाव आहे. परिचय कधी 'अति' झाला असे वाटलेच नाही, अवज्ञेचा तर प्रश्नच येत नाही, तरीही ह्या उपरोक्त वचनाची प्रचिती कशी येते ते बघु येत्या काळात ...
असो, फारच तात्विक आणि काहीसे सेन्टीमेन्टी टाईपचे लिखाण झाले.
असे काही होण्याचा अन असे काही लिहण्याचा माझा स्वभाव नाही, एकंदरीत भावनांचे प्रदर्शन न करण्यातच मला जास्ती सुख वाटत आले आहे. खुद्द माझ्या बाबतीतच सांगायचे म्हटले तर बेंगलोरच्या ३ वर्षापेक्षा जास्त सहवासानंतर ते सोडायची जेव्हा वेळ आली होती तेव्हा भावना ह्यापेक्षा जास्त उत्कट झाल्या होत्या, मात्र काळ हेच औषध ठरले, असो.
आता हे सर्व उकरुन निघण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचा एक दोस्त ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला, त्याच्या सेन्डॉफसदृष्य कार्यक्रमाला माझ्या सुभाग्याने मी हजर नव्हतो, जरी हजर असतोच तरी हेच बोललो असतो (बोलता आले असते का नाही ते माहित नाही), पण नसल्याने हे राहुन गेले होते, आता तेच इथे उतरले आहे ...
काटेकोर नियम असा नाही पण आंतरजालावर शक्यतो मी मित्रांबाबत लिहीत नाही ... पण हे खास श्रीकांतसाठी !!!
प्रतिक्रिया
15 Apr 2013 - 3:12 pm | नाना चेंगट
लेखन केल्याबद्दल अभिनंदन
सविस्तर प्रतिक्रिया लेख वाचून
15 Apr 2013 - 3:20 pm | पैसा
बरेच दिवसांनी लिहिलेले सुरेख प्रकटन. कधीतरी असे व्यक्त होणे चांगले असते. सगळ्याच भावना नेहमी लपवून ठेवू नयेत.
15 Apr 2013 - 6:05 pm | ऋषिकेश
अगदी +१
फक्त हल्ली कम्युनिकेशची खूप साधने आहेत त्यामुळे ऑफिसेस बदलली तरी मैत्री साफ तुटते असे अनुभवास आलेले नाही हीच काय ती चंदेरी किनार, अर्थात संपर्क कमी होणार/ प्रत्यक्ष समोरा समोर संपर्क होणार नाही यामुळे मन तुटत राहते हे ही तितकेच खरे!
15 Apr 2013 - 6:12 pm | मनराव
तुटत राहते ते सुद्धा काही काळा पुरता..... नंतर मागे उरतात त्या कडु/गोड आठवणी.....
15 Apr 2013 - 3:23 pm | यशोधरा
चांगले लिहिलेस डान्या.
15 Apr 2013 - 3:27 pm | अद्द्या
आवडेश
डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढण कठीण
त्यातल्या त्यात मित्रांच्या बाबतीत . तर महाकठीण . .
असो . . "टच " मध्ये राहण्याचा प्रयत्न तर होईलच . .
तो सुटू नये अशी अशा . .
15 Apr 2013 - 3:30 pm | अद्द्या
आयला इथे एडीट कसं करतात!!
वाक्य असं होतं >>>
डोक्यातल्या गोष्टी बाहेर काढणे कठीण
15 Apr 2013 - 3:32 pm | स्पंदना
आयला नका एडीट करु.
केलयं! :-)
15 Apr 2013 - 3:50 pm | अद्द्या
:D
ठ्यांक्स
15 Apr 2013 - 3:36 pm | पिंपातला उंदीर
एका विशिष्ट टप्प्यानांतर एकूणच मित्र बनवणे जमत नाही. आपण आपल्या प्रकाराने मानसिक दृष्ट्या सेट झालेले असतो. अड्जस्टमेंट करायला जमत नाहीत. लेख आवडला
-२८ व्या वर्षी पोक्त पणा आलेला अमोल
15 Apr 2013 - 3:37 pm | शुचि
ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो - हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
15 Apr 2013 - 4:03 pm | छोटा डॉन
शुचि, असहमत आहे तुझ्या वाक्याशी.
बाकी असो.
- छोटा डॉन
15 Apr 2013 - 6:22 pm | शुचि
मी तर ऑफीसमध्ये "आवर्जून असं" गुड-मॉर्निंगही करायच्या भानगडीत पडत नाही. दिसले .... केलं पण मुद्दाम शेजार्याला कधीच करत नाही. यामागे कारण आहे. समजा रोज विश केलं तर मग ती सवय अन ऑब्लिगेशन होऊन बसतं. कधी त्याच्याबरोबर थोडं (किंचीत) बिनसलं की मग आपण विश करत नाही आणि ते मग खुपतं. त्यापेक्षा "इनडिफरंट" फसाड बरा वाटतो.
सर्व्हायव्हल आणि मैत्री दोघी एकत्र राहू शकत नाही हे माझे मत झाले. डॉन यांचा अनुभव सुदैवाने वेगळा आहे त्याबद्दल आनंदच आहे.
15 Apr 2013 - 6:41 pm | बॅटमॅन
सहमत आहे. हपिसात शक्यतोवर मित्र वैग्रे बनवू नयेत. त्यातही रोज रोज संपर्क येणारे तर नकोतच.
17 Apr 2013 - 12:20 pm | चावटमेला
१००१% सहमत. ऑफिसमध्ये असतात ते फक्त कलीग्ज, सहकर्मचारी, बास्स. मित्र वगैरे बनविण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं
(अनुभवाने शहाणा झालेला) चावटमेला
17 Apr 2013 - 8:13 pm | शुचि
पण या वृत्तीमुळे माझी ऑफीसात घुसमट होते हेही तितकेच खरे आहे. आपण उस्फूर्तपणे काही सांगू इच्छितो अन एक मन म्हणतं "हूम आर यु टेलींग? इझ ही/शी योर फ्रेंड? A BIG NOOOO!!!!" अन मग आपण गप्प बसतो.
पण एकवेळ घुसमट परवडली पण कावेबाज मैत्री नको असे वाटते.
17 Apr 2013 - 9:26 pm | चावटमेला
एकदम बरोब्बर..
18 Apr 2013 - 1:30 am | रेवती
पण तुला अनुभव आलाय का शुचीतै, आजकाल मैत्रीमध्येही मुखवट्याचा कली शिरलाय!
18 Apr 2013 - 11:02 pm | शुचि
सुदैवाने अनुभव नाही गं.
19 Apr 2013 - 11:03 am | विश्वनाथ मेहेंदळे
ऑफिस बद्दल बोलताय की रोडीज बद्दल ??
19 Apr 2013 - 6:59 pm | शुचि
रोडीज काय असतं?
19 Apr 2013 - 8:17 pm | श्रीरंग_जोशी
भारततल्या पश्चिमी सभ्यतेवरचा एक रिअॅलिटी शो (एम टिव्ही). संवादात सतत बीप वाजत असते.
मला तर एकदाच पाहून किळस वाटली होती. बरेच लोक चवीने बघतात. एकाने सांगितले होते की लिडरशीप क्वालिटी वगैरे डेवलप होते म्हणे ;-).
19 Apr 2013 - 10:48 pm | बॅटमॅन
हिंदाळलेपण पाहून डोळे पाणावले. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, श्रीरंगराव :)
19 Apr 2013 - 11:02 pm | श्रीरंग_जोशी
'पश्चिमी सभ्यता' चा उपयोग करण्यामागे एक कथा आहे.
अमेरिकेत मी तसा नवा असतानाचा हा प्रसंग. काही सहकारी अमेरिकेत आलोच आहोत तर स्ट्रीपक्लबला जाऊन दौलतजादा करून पुण्य कमवावे म्हणून आसूसले होते. माझ्याही फारच मागे लागले होते. त्यापैकी एक जण हिंदी भाषक असल्याने त्यास रंग दे बसंती चित्रपटातील शब्दांचा वापर करून 'मै पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं रखता' असे ऐकवले होते.
अन त्या संध्याकाळी तीन लोक मोठ्या उत्साहाने कामगिरीवर निघाले. तेव्हा कुणाचकडे चतुरभ्रमणध्वनी नव्हते. चांगले कपडे घालून, फवारे मारणे वगैरे सुरू असताना एकाने घाईघाईत स्ट्रीपबार चा पत्त्ता शोधला अन नोंदवून घेतला.
जिपिएस वापरून त्या ठिकाणी पोचल्यावर एक हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली कसले तरी मेटॅलिक स्ट्रीप बार्स बनवणारी ;-).
तेव्हापासून मी त्यांना 'कैसी रही पश्चिमी सभ्यता' व ते मला 'क्यो तुम्हे तो पश्चिमी सभ्यता में दिलचस्पी नहीं हैं ना?' असे चिडवत असत.
बाकी मागाहून कळले की मिसूरी राज्यात त्या प्रकारावर बंदी आहे व त्यासाठी नदीपलिकडे इस्ट सेंट लुईसला जावे लागते जे इलिनॉय राज्यात आहे.
19 Apr 2013 - 11:16 pm | प्यारे१
>>>त्यासाठी नदीपलिकडे
इकडे पण आहे का नदीअलिकडे नि पलिकडे? कोण रे तो अमेरिका वर्गविरहीत आहे म्हणणारा/री/रे? ;)
19 Apr 2013 - 11:19 pm | बॅटमॅन
सभ्यतेचा इतिहास बाकी असभ्य आहे मोठा ;) =))
19 Apr 2013 - 11:54 pm | कपिलमुनी
हसत फार मोठे सत्य सांगितलेस
20 Apr 2013 - 3:53 am | रेवती
हार्डवेअर ची फॅक्टरी निघाली
ख्या ख्या ख्या.
21 Apr 2013 - 2:50 am | विश्वनाथ मेहेंदळे
एक अत्यंत मजेदार प्रतिक्रिया सुचली होती.... पण जाऊ दे :-)
21 Apr 2013 - 2:56 am | श्रीरंग_जोशी
भापो.
यदाकदाचित 'केवळ पुरूषांसाठी' असा विभाग सुरू झालाच तर असे बरेच किस्से टंकता येतील :-).
15 Apr 2013 - 3:37 pm | सुमीत भातखंडे
लेख डॉनराव
15 Apr 2013 - 3:40 pm | नगरीनिरंजन
अगदी वैश्विक अनुभव लिहिला आहे. छानच!
सगळे कडू-गोड अनुभव आठवून गेले.
15 Apr 2013 - 3:42 pm | मूकवाचक
+१
15 Apr 2013 - 3:48 pm | मन१
डॉन लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला.
लेखन/प्रकटन जे काही आहे ते आवडले/भावले.
15 Apr 2013 - 3:54 pm | गुलाम
श्रीकांतचा हेवा वाटला!!!
21 Apr 2013 - 11:54 am | कोमल
खरोखर...
लेख आवडला.. पण असे कलिग्ज कम मित्र/मैत्रिणी मिळणे फारच अवघड असते बॉ...
15 Apr 2013 - 4:27 pm | प्रभाकर पेठकर
७३ ते ८१ एवढ्या प्रदीर्घ कालात एकाच कंपनीत नोकरी करून कांही मित्र जमवले होते. ते सर्व चांगले होते. कदाचित त्या काळात आणि माझ्या व्यवसायात एवढी चढाओढ नव्हती. पण, मला तरी माझ्या सर्व मित्रांचा चांगलाच अनुभव आला. अगदी शिक्षणात मार्गदर्शन करण्यापासून ऑफिसमध्ये तात्पुरता होणारा फायदा सोडून देऊन दूरदृष्टीने 'अनुभव' मिळविण्याचा सल्ला मला ह्या मित्रांकडून मिळाला. त्या सर्व मित्रांचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहे.
15 Apr 2013 - 4:54 pm | मैत्र
फार दिवसांनी लिहिते झाले डानराव याबद्दल आनंद आहे. थोड्या धुसर गोष्टी झकास नेमक्या पद्धतीने मांडल्या आहेत.
खूप आवडलं ते हे -- "ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते ...तर दुसरीकडे एखादा अगदी आपल्यासारखाच आहे आणि तो आपला परफ़ेक्ट दोस्त बनु शकतो हे कळत असतानाही काही अलिखित ऒफ़िशियल कारणांमुळे आपण त्याच्याशी हवे तेवढे मोकळेपणाने वागु शकत नाही "
15 Apr 2013 - 5:20 pm | आनंद घारे
माझी एक पेट थिअरी अशी आहे की माणसाचे मन जन्मतः मातीच्या गोळ्याप्रमाणे ओलसर असते आणि त्याला विशिष्ट आकार आलेला नसतो. दोन मुलांची गट्टी लगेच जमते. वय वाढत जाते तसतसे मन सुकत आणि कठीण होत जाते. दोन मने जुळण्यासाठी समान आवडी किंवा लाभ वगैरे गोंदाची गरज पडते. उतारवय येईपर्यंत ते शुष्क झालेले असते आणि त्याला अनेक कंगोरे आलेले असतात. त्यानंतर फेविकॉल सुद्धा लावता येत नाही.
डॉनच्या वयामध्ये असतांना दिवसाचा बहुतेक सगळा वेळ ऑफिसमध्ये जात असल्यामुळे त्या वेळात ज्या व्यक्ती संपर्कात येतात, त्यांच्यातल्या कोणाकोणाशी आपण काही ना काही शेअर करत असतो, त्या निमित्याने जोडले जात असतो. पण जेंव्हा लाभ किंवा हानी याचा प्रश्न येतो तेंव्हा तो जोड निखळतो. ते होतांना थोडे कष्टही होतात. आपसानध्ये काही वितुष्ट नसतांना बाह्य कारणांमुळे दूर जावे लागले तर जास्त दु:ख होते.
आज संपर्कसाधनांमुळे जग इतके जवळ आले आहे की शरीराने दूर गेले तरी एकमेकांना स्क्रीनवर पाहू शकतो, बोलू शकतो, वाटल्यास मैत्री राखू शकतो.
15 Apr 2013 - 5:36 pm | शिद
+११११११११११
अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे असे वाटते...पहिल्या कंपनीमध्ये अख्खी प्रोजेक्ट टीम ३ वर्षांत एकमेकांची जिवलग बनली होती पण तो जॉब सोडताना डोळ्यातुन पाणी वहायला लागले होते :( ...म्हणुन आता वर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे ऑफिसात यारी-दोस्ती टाळतो.
15 Apr 2013 - 5:48 pm | नि३सोलपुरकर
वाह ...डॉन राव ,
मस्त लिहलय..आणी हेवा वाटतोय श्रीकांतचा (तुमच्या सारखा मित्र मिळाल्यामुळे).
कुठेतरी वाचलेय " If friendship is your weakest point then you are the strongest person in the world"..
जियो यार
(असेच जिवाभावाचे मित्र लाभलेला)
15 Apr 2013 - 6:36 pm | सुबोध खरे
ऑफिसात मैत्री असू नये किंवा ऑफीसच्या आवारात शिरले की कोणी कोणाचा मित्र नसतो. मी सरकारी नोकरीत होतो २३ वर्षे किंवा कोर्पोर्रेट हॉस्पिटल मध्ये ४ वर्षे तेथे झालेली माझी मैत्री अजून टिकून आहे. कितीतरी मित्र जरी वर्षात एकदा किंवा दोनदा भेटलो तरी पूर्वीसारखाच जिव्हाळा कायम आहे. प्रत्येक माणूस हा तुमच्या बढती किंवा पगाराच्या स्पर्धेत असतो असे नाही. माझे मित्र हे वेगवेगळ्या शाखेत असल्यामुळे असा कधीही प्रकार घडला नाही. कोणी पैथोलोजीस्ट कोणी हृदयविकार तज्ञ कोणी प्रशासकीय अधिकारी असे असले तरी समान विचार सरणी मुळे झालेली मैत्री आजही कायम आहे. लष्करातील पायलट पाणबुडी अधिकारी असेही लोक आम्ही आवर्जून भेटतो. यात एक फरक आहे तो नुसते आम्ही नव्हे तर आमच्या बायकांची तर जुळली तर मैत्री पुढे चालू राहते नाहीतर ती हळूहळू कमी होते.
even if you win the rat race you're still a rat हे तत्व ठेवून चालणारे आम्ही बरेचसे मित्र हे नंतरच्या काळात मैत्री झालेले आहोत. बालमित्र नव्हे
समानशीले व्यसनेषु सख्यम यामुळे असेल
15 Apr 2013 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
डान्या लिहिता झाला ते एक बरे झाले.
मी स्मशानात काम करत असल्याने ओळखी फारशा टिकतच नाहीत, किंवा लोक टिकवायला बघत देखील नाहीत.
15 Apr 2013 - 7:00 pm | तिमा
आत्तापर्यंत जास्तीतजास्त मित्र ऑफिसातच मिळाले आहेत. अगदी ज्यांच्याशी तात्विक कारणांवरुन कडाकडा भांडलो तेही शेवटी जवळचे मित्र झाले. तुलनेने मैत्री न करण्यासारखे लोक अगदी तुरळक भेटले. जे सोडून गेले ते अजूनही संपर्क ठेवतात.
संपूर्ण नोकरीत कधीही स्पर्धा करणारे कोणी भेटले नाही. कदाचित माझेच स्टार उच्चीचे असावेत.
15 Apr 2013 - 7:55 pm | रमताराम
डान्राव, लैच आतड्याने लिवलं राव. बर्याचशा मुद्द्यांशी सहमत. फक्त दोस्त बनवू नयेत हे चूक. आमचे जगण्याचे तत्त्वज्ञान साधे सोपे आहे. जिवाभावाचे मित्र करावेत पण जगण्यातील इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीबाबतही चिरंतनाची आस ठेवू नये. ती कधी ना कधी संपणारच आहे याची खूणगाठ बांधून ठेवावी. पण हरकत नाही, जे काही मैत्रीचे क्षण तुम्ही जगलात ते छोटे असतील, खोटे तर नसतील? मग जेवढे मिळाले ते पुरेपूर उपभोगावे नि हरवले की शक्य तितक्या लवकर त्यातून आतडे सोडवून घ्यावे नि खुल्या दिलाने त्या मैत्रीला टाटा करून पुढे चालते व्हावे. हीच गोष्ट डोक्यावर पाय देऊन जाऊ पाहणार्या तथाकथित मित्रांची. मित्रांना आपल्या कुवतीच्या मर्यादेत शक्य ती सारी मदत करावी पण एकदा दगा दिला (चूक वेगळी नि जाणीवपूर्वक दिलेला दगा वेगळा) की दोन द्यावे दोन घ्यावे याच न्यायाने वागावे. आजवर आमचे उत्तम चालले आहे.
15 Apr 2013 - 7:57 pm | शुचि
वा! खूप संतुलित वृत्ती (अॅटिट्यूड). प्रतिसाद आवडला.
15 Apr 2013 - 8:14 pm | सुहास झेले
शब्दशः सहमत.... :) :)
डान्रावांचे लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन... :)
15 Apr 2013 - 10:07 pm | श्रावण मोडक
हेच स्मिता.नं वेगळ्या शब्दांत इथं चौथ्या परिच्छेदात म्हटलं आहे. तिचेच शब्द:
ऑफिसातला दोस्त असा काही प्रकार आपल्याला कधीच कळला नाही. दोस्त हा दोस्त. ऑफिसात तो झाला म्हणून ऑफिस त्याच्यात सामावत नाही, की तो ऑफिसातच रहात नाही.
16 Apr 2013 - 12:04 am | बिपिन कार्यकर्ते
चोक्कस!
15 Apr 2013 - 8:23 pm | प्यारे१
>>>>पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे.
>>>रुटिन कामाचे एक ठिक आहे हो ते कसेही होऊन जाते, पण निघुन गेलेला माणुस त्याच्याबरोबर जी एनर्जी घेऊन गेला ती कुठुन आणणार? इथुन निघुन गेलेल्या माणसाचा समंजसपणा आणि कामे करुन घेण्याचे व त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे कामे करण्यास माणुस तयार करण्याचे स्कील कुठुन आणणार? एखाद्याचे डेडिकेशन आणि कमालीचा आत्मविश्वास ह्यामुळे इथे दिसणारा परिणाम असा सहजासहजी रिप्लेस करता येतो? एखाद्या इव्हेंटवेळी त्याच्याकडुन येणार्या क्रिएटिव्ह आयडियास अशा सहजासहजी रिप्लेस करता येतात? वरुन कितीही दडपण आले तरी त्याची झळ खालच्या लेव्हलपर्यंत येऊ न देता मधल्यामध्ये सर्व काही शांत करण्याची खुबी अशी जादुसारखी उभी करता येते?
खूपच छान लिहीलंय.
15 Apr 2013 - 8:45 pm | राजेश घासकडवी
मित्राचं नाव शेवटच्या शब्दात टाकण्याचा ड्रामॅटिक टच आवडला. पण त्यामुळे पहिले काही परिच्छेद वाचताना गोंधळ झाला. कारण मी 'ऑफिस'च्या जागी 'मराठी आंतरजाल' हा शब्द टाकून बघत होतो, आणि बऱ्याच गोष्टी जुळल्यासुद्धा. :)
15 Apr 2013 - 10:14 pm | रेवती
चांगलं लिहिलय. आवडलं. हे असं बर्याच बाबतीत असतं असं मला वाटतं.
15 Apr 2013 - 10:42 pm | अमोल खरे
अप्रतिम लेख. परम्तु अनेकदा अतिपरिचयात अवज्ञा होतेच, माझ्या बाबतीतही झाली आहे. पण हा लेख फार फार आवडला.
15 Apr 2013 - 10:53 pm | मुक्त विहारि
ऑफीस मधील अति सलगी बाहेरचा रस्ता दाखवते..
15 Apr 2013 - 11:14 pm | उपास
ऑफीसमध्ये मैत्री हा कळीचा मुद्दा बनू शकतो. मुळात तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड असला तरी तुम्ही त्याचे 'बेस्ट फ्रेंड' असालच असे नाही. हे एकदा डोक्यात घोळवले की सगळ्यांपासून सारख्या हातावर राहाणे सोप्पे जाते.
In our life, few people come for season and few for reason असं म्हणतात. ह्यांच्यापलिकडे जे टिकतात ते आपले. 'काही नाही रे उगाच फोन केला..' असं म्हणून जो अगदी अनपेक्षितपणे फोन करतो/ इमेल टाकतो तो शरिराने दूर असला तरी मनाने जवळच :)
16 Apr 2013 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते
फार सुंदर लिहिलं आहेस भावा! क्या बात है! हेच श्रीकांतपंत आमचेही मित्र आहेत आणि खरंच, माणूस मस्त आहे... फक्त तुमच्यासारखाच वायदेआझम असल्यामुळे आम्ही त्याला प्रेमाने शिव्याही घालतो! ;)
17 Apr 2013 - 11:37 am | जे.पी.मॉर्गन
क्या बात है! The more personal it gets the more universal it becomes - म्हणतात तसं प्रत्येकाच्याच मनातलं लिहिलं आहेस. अगदी मनापासून लिहिलेलं प्रकटन. हा श्रीकांत नशीबवान आहे तुझ्यासारखा दोस्त मिळायला :)
जे.पी.
17 Apr 2013 - 3:14 pm | वात्रट
काहि काहि वाक्य तर अगदी मनापसुन पटली.
उदा " ऑफ़िसमध्ये शक्यतो एक समंजसपणाचा मुखवटा चढवुनच रहावे लागते, ह्याची गंमत अशी की ह्यामुळे समोर पाहताच मुस्काटात मारावी अशी इच्छा होत असुनसुद्धा एखाद्याशी उगाच गोडगोड बोलावे लागते "
17 Apr 2013 - 6:43 pm | शुचि
=))
17 Apr 2013 - 4:03 pm | स्मिता.
अनेक वर्षांनंतर ;) डॉनरावांचा आणि तोही असा भावपूर्ण, सुरेख लेख वाचून छान वाटलं.
मला वाटतं मैत्रीचं प्रेमासारखंच असतं. ती ठरवून होत नाही तर मनाच्या तारा जुळल्या तशी आपोआप होत असते, त्याकरता शाळा, कॉलेज, ऑफिस, इ. क्रायटेरियाची गरज नसते. त्यामुळे वर ररा, श्रामोंनी आणि इतर समविचारी लोकांनी लिहिलेलं अगदी पटलं!
17 Apr 2013 - 11:21 pm | श्रीरंग_जोशी
वर अनेकांनी मांडलेल्या मुद्द्याशी सहमत की मैत्री ठरवून करता येत नाही. करियरच्या सुरूवातीला जे मित्र बनले ते आजही जवळचे मित्र आहे.
करियरच्या सुरूवातीखेरीज भारतात काम न केल्याने अन परदेशात आल्यापासून फार मोठ्या आकाराच्या टिममध्ये काम न केल्याने मित्र की पदोन्नतीची संधी या धर्मसंकटात कधीच पडलो नाही.
18 Apr 2013 - 12:04 am | कवितानागेश
छान लिहिलय. :)
18 Apr 2013 - 6:51 pm | आदिजोशी
लै भारी रे डाण्या. आवडला लेख. मित्र बनायला आणि मैत्री टिकायला भेटणेच आवश्यक असतेच असे नाही. तू, धम्या, अभ्या, अबब, बिका आणि अजून कैक, ही सगळी भुतावळ भेटण्याआधीच माझ्या मित्रपरिवारात सामील होती. नंतर भेट फक्त उपचारापुरती राहिली.
18 Apr 2013 - 11:29 pm | तुमचा अभिषेक
वाचताना अगदी अगदी वाटले तरीही.... माझे मत मांडतो..
मैत्री असो प्रेम असो वा कोणतेही नाते असो, शाळा-कॉलेज-ऑफिस वा आपले हे आंतरजाळ हे फक्त एक नवीन नवीन माणसे भेटायचे अन नाते जुळायचे माध्यम असते असा साधासोपा आणि सकारात्मक विचार करणे केव्हाही चांगले.. मग जिथे सूर जुळेलसे वाटताहेत तिथे जुळवून टाकावेत..
एखाद्याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक असाल तर तुमच्या स्वताच्या मनातच मैत्रीची प्रामाणिक भावना कधी उपजणार नाही, अन जी भावना तुमच्या स्वत:च्या मनात उपजू शकत नसेल तिची तुम्ही समोरून अपेक्षा करणे म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे..
होते काय माहितेय, कॉलेजच्या पहिल्या वर्षाला पहिल्याच दिवशी आपल्यासाठी सारेच नवीन असतात, मग ज्यांचे आचार विचार अन कॉलेज लाईफ एंजॉय करायच्या पद्धती जुळतात त्यांचा एक ग्रूप बनतो.. प्रत्येक जण त्यामध्ये फिट असतो.. दुर्दैवाने ऑफिसमध्ये असे ग्रूप बनत नाहीत.. कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या मित्राच्या बरोबर बसायचे स्वातंत्र्य असते, ऑफिसमध्ये जो तुमच्या जवळ बसतो त्याला मित्र बनवावे लागते. :)
19 Apr 2013 - 2:05 pm | देशपांडे विनायक
खालील ओळी वाचल्या आणि प्रतिक्रिया लिहिणे अपरिहार्य झाले
शाळा / कॊलेजात बनणारे मित्र हे शक्यतो आपल्यासारखे येड** असल्याने त्यांचा कधी त्रास होत नाही पण ऒफ़िसात बनणारे मित्र उगाच समंजस वगैरे असतात. काही लफ़डे किंवा वादविवाद झाले तर शाळा/कॊलेजातल्या मित्रांशी कसे ’तु आधी *कात जा अन मी पण इकडे भ*त जातो’ म्हणुन प्रश्न मिटवता येतो, पण हे ऒफ़िसातला मित्र साले उगाच समंजस वगैरे असल्याने स्वत:ही भो*त जा नाहीत आणि समोरच्यालाही जाऊ देत नाहीत, म्हणुन सांगत असतो की शक्यतो ऒफ़िसात दोस्ती वगैरे करु नये.
पण ही दोस्ती पण अशी नाठाळ चीज आहे की साली उगाच होऊन जाते, झालेलीही कळत नाही. रितसर चेतावणी वगैरे देऊन दोस्ती होत असली तर आपली काय हरकत नाय, निदान सावध होऊन सेफ़ होण्याचा चान्स मिळतो, पण हे असे अचानक दोस्त होऊन जाणे म्हणजे आफ़तच आहे.
सन १ ९ ५ ९ ला SSC ला असलेले आम्ही वर्ग मित्र आणि मैत्रिणी महिन्यातून एकदा एकत्र येऊन भोजन करतो
ज्या घरी भोजन असते त्या घरातील मुले ,सुना,नातवंडे यांचे चेहरे पाहणेही आनंददायी असते
आजी आजोबा अरे तुरे कसे करत आहेत याचे नवल नातवंडाना वाटते
मुले सुना हिरवट पणा डोळ्याआड करताना दिसतात
आम्ही हे सगळे ENJOY करत असतो कारण त्या वेळी आमच्या तोंडी शाळा कॉलेज मधील भाषा असते
महानगरपालिकेतील आणी कोर्टातील हेलपाटे अचानक दोस्त मिळण्याचे कारण झाले
छान लेख लिहिलात . धन्यवाद !!
20 Apr 2013 - 12:09 am | कपिलमुनी
१९५९ च्या कॉलेजची भाषे मध्ये *कात जा.. येड** असे शब्द वापरायचा का तुम्ही ?
भलतेच असंस्कृतपणा हो !! ते सुद्धा मित्र मैत्रीणीमध्ये..
20 Apr 2013 - 2:34 am | बॅटमॅन
पोरींसमोर शिव्या दिल्याने कोणी असंस्कृत होतो असे मानणार्यांना एक सलाम आणि :|
20 Apr 2013 - 5:38 am | शुचि
बरोब्बर आई-बहीणींसमोरही शिव्या दिल्याने कोणी असंस्कृत होत नाही. आज मुली आहेत उद्या आई आहे बहीण आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही.
21 Apr 2013 - 4:34 pm | बॅटमॅन
प्रतिसादातला अस्थानी उपरोध एक महत्वाचा फरक नजरेआड करत आहे. आई-बहीण यांसमोर शिव्या देणे आणि कसलेही नाते नसलेल्या मुलींसमोर शिव्या देणे यात लै मोठा फरक आहे. दोन्ही केसेस आजिबात सारख्या नाहीत याची नोंद घेणे. मित्रांत पाहिजे त्या शिव्या देणारे इन जण्रल वडिलांसमोर शिव्या देत नाही. तीच गोष्ट आई किंवा बहिणीसमोर शिव्या न देण्याची. तो नात्याचा मान आहे, लिंगाचा नाही.
सोयीस्कर ठिकाणी "स्त्री" कार्ड वापरणे ही फेव्हरीट रडी खेळी आता जुनी झालीये. तिचा उबग आलाय हेवेसांनल.
21 Apr 2013 - 6:30 pm | शुचि
बर्याचशा शिव्या या "स्त्री"च्या शारीरीक ठेवणीवर बेतलेल्या असतात असे एके नीरीक्षण. "जा भोकात" वगैरे तुम्ही जर बायका/मुलींसमोर बोलत असाल तर इतर पुरुष खिदळू शकतात परंतु स्त्रियांना कानकोंडे झाल्यासारखे वाटू शकते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आपल्या भावनांपेक्षा कणभर अधिक महत्त्व देणे म्हणजे "मॅनर्स" अशी काहीशी व्याख्या का वाक्य वाचले होते. अर्थात सर्वांना मॅनर्स असावेत किंवा असतात असा आग्रह/ग्रह प्रत्येक वेळी करताच येत नाही हेदेखील माहीत आहे.
21 Apr 2013 - 7:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अशा वाक्यांनी कानकोंडे होणारे पुरुष आणि अशी वाक्ये चार चौघात बोलणाऱ्या स्त्रिया हे दोन्ही स्वतः पाहिले आहेत.मूळ मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात हे भेद पाळावेत का?
अदितीचे म्हणणे या मुद्द्यावर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एक टक्क्याचाही तिरकसपणा नाही या वाक्यात. खरेच इच्छा आहे.
21 Apr 2013 - 11:46 pm | बॅटमॅन
परत एकदा अतिशय सोयीस्कर विधान. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती इतकेच म्हणतो.
22 Apr 2013 - 12:35 am | बॅटमॅन
स्त्रीशरीरावर बेतलेल्या प्रत्येक शिवीसाठी पुरुषशरीरावर बेतलेली एक शिवी मिळेल. आणि मी उगी तयार करून सांगत नाहीये. "मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार" या पुस्तकात सुमारे ८०० असभ्य म्हणी व वाक्प्रचार दिलेले आहेत. ते पाहिल्यास याचा पडताळा येईल. संभोगक्रियेवर आधारित बर्याच शिव्या असता, पण त्या दोहोंपैकी कुणालाही लागू शकतात अशा आहेत फॉर द मोस्ट पार्ट.
इथे त्या विशिष्ट शिवीचा अर्थ तुम्ही जो घेतला आहे तोच दरवेळेस घेतला जातो असे नाही. कानकोंडे होण्यासाठी गृहीत धरलेला अर्थच सर्व ठिकाणी घेतला जात नसल्याने हा मुद्दा गैरलागू आहे.
पण पुरुषांच्या भावनांचा काडीमात्र विचार न करता भसाभस समस्त पुरुषांवर मुक्ताफळे उधळली की स्त्रीवादी म्हणवून घेणे हे मॅनर्समध्ये मोडते ना!! शिवाय जाल-कूल पॉइंट्स मिळतात ते वेगळेच. पण पुरुषांनी मात्र बायकांच्या तथाकथित भावनांचा विचार करायचा आणि चुप्प रहायचे. भावनांची गळवे फुटतील ना !! पुरुषांच्या भावना काय भावना असतात? आहार-निद्रा-धन-मैथुन या पलीकडे पुरुषांना नाहीतरी कळतेच काय म्हणा.
22 Apr 2013 - 1:53 am | बॅटमॅन
शेवटची पुरवणी: जुन्या पिढीतल्या पुरुषांच्याच नव्हे, तर बायकांच्याही तोंडी शिव्या सर्रास असत. त्याचे कुणाला गैरही विशेष वाटत नसे. ते सर्व लोक म्यानरलेस आणि आत्ताचे लोक तेवढे म्यानरफुल असे तुमचे म्हण्णे आहे काय? व्हिक्टोरियन काळात बेगडी सभ्यतेचे दवणीय काढे भारताला पाजले गेले आणि आपण उग्गीच सोवळे झालो. हा इतिहास विसरून सद्यस्थितीचं जस्टिफिकेशन देण्यासारखा तर्कदुष्टपणा दुसरा नाही.
असो. आता मात्र थांबतो.
20 Apr 2013 - 9:25 am | देशपांडे विनायक
मी माझ्या शाळेतील,माझ्या त्या दिवसातील भाषा वापरणार हे आपण समजून घ्याल असे वाटले
पण मलाच का असे वाटते हे समजत नाही
आणि हो संस्कृती दुसरी किव्हा निराळी असू शकते
असंस्कृत संस्कृती असते?
20 Apr 2013 - 5:42 am | इन्दुसुता
लेख/ प्रकटन आवडले.
21 Apr 2013 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा...! मन की बाते आवडली.
-दिलीप बिरुटे
21 Apr 2013 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे
आलसस्य कुतो विद्या|
अविद्यस्य कुतः धनम|
अधनस्य कुतः मित्रं|
अमित्रस्य कुतः सुखं||
भाकित- भविष्यात ऑफिस मधले मित्रच डॉन्याच्या प्रसंगी उपयोगाला येतील