साधारणपणे ९० चं दशक असेल..
ठाणे स्थानकावर एक वेडसर भिकारीण दिसायची.. नेहमी तिच्या हातात एक तान्हं मूल असे..तिच्या हावभावावरून, वागणुकीवरून ती वेडसर होती हे निश्चित.. रहायचीही स्थानकाच्याच परिसरात..
आता सतत अगदी जातायेता तिच्यावर लक्ष जायचं असं नव्हे..परंतु ती दिसायचीच.. ती दिसली की माझ्यासारखे अनेक जण कदाचित तिला नोटीस करत असतील आणि अनेक जण नसतीलही..
या गोष्टीला, म्हणजे तिच्या अशा नेहमी दिसण्याला माझ्या आठवणीप्रमाणे ५-६ वर्ष तरी सहज झाली असतील..
त्यानंतर एकदा केव्हातरी देवेन्द्र मिश्राशी बोलताना अगदी सहजच तिचा विषय निघाला होता.. तो सुद्धा समोर ती होती म्हणून..
देवेन्द्र मिश्रा हा यूपीचा एक भैय्या जो रेल्वेचं जे स्वत:चं असं खास 'भैय्या पोलिस' खातं आहे..त्या पैकी एक..
ठाणे स्थानकातला पूर्वीचा वसंता नीरावाला हा माझा दोस्त. वसंतामुळेच देवेन्द्रशीही माझी ओळख झाली होती..
"आओ तात्या, पान खाएंगे.."
असं म्हणून फलाट क्रमांक दोनच्या बाहेर मी आणि देवेन्द्र पान खात उभे होतो..
तेवढ्यात समोर ती आली..माझ्या अगदी पुढ्यातच आली..वेडसर, लाचार हसली..हातात तान्हं मूल होतंच..
खूप दया आली मला तिची त्या क्षणी.. मी शेजारच्याच स्टॉलवरून तिला एक कपभर चहा आणि बिस्किटाचा पुडा घेऊन दिला..
"तात्या, इसकी स्टोरी जानते हो..?"
"नही.. लेकीन हमेशा दिखती है..पागल है बिचारी..बहोत टाईम से इसे यहा देख रहा हू. आप बताईये, आप तो यही पे ड्युटी करते है.."
माझा आणि देवेन्द्रचा संवाद सुरू झाला..
"तात्या, एक बात बताओ. इसके हात मे इस वक्त जो बच्चा है, उसकी उमर कभी बढी हुई दिखी है..?"
???
पुढल्या क्षणीच मला देवेंन्द्रच्या प्रश्नातलं भयानक गांभिर्य जाणवलं..!
"तात्या, जवान औरत है.. इसके पागलपन का कोई ना कोई फायदा उठाता है.. हसी-मजाक मे कोई ना कोई सोता है इसके साथ.. अन्जानेमे बेचारीपर मानो बलात्कारही होता है..!"
"आज तक तीन बच्चोंको जनम दे चुकी है हमारेही रेल्वे अस्पताल में..! अब दिन भर जाते है बेचारीके, तो भर्ती करनाही पडता है..पैसावैसा कहासे लाएगी बेचारी..?!"
"हमारे बडे साब और उनके भी बडे साब, दो चार एन जी ओ मे इसके लिये बात कर चुके है.. लेकीन पता नही क्या कानूनी अडचने है..कोई रखताही नही इसे अपने पास.."!
"बस.. महिना-पंधरा दिन होने के बाद हम इसकी अस्पताल से छुट्टी कर देते है.."
"नये बच्चे को लेकर दुबारा यहावहा भटकने लगती है..भीक मांगना शुरू करती है.."
अब हम भी कहा तक इसका खयाल रखेंगे..? रात देर रात.. न जाने कौन राक्षस इसे बहेला-फुसलाकर ले जाता है..?"
"बेचारी सही क्या गलत क्या, ये तो समझती नही.. लेकीन शरीर की भूख तो जाग जाती होगी..!"
"और इसके पहले दो बेटे..?"
"पता नही तात्या, सचमुच पता नही..!"
----------------------------------------------
खूप वर्ष झाली आता या गोष्टीला..
आता ती कुठेच दिसत नाही...
गाडीखाली वगैरे येऊन मेली असेल का..?
तिची मुलं..? किती असतील? ३? ४ ? ५..? नक्की किती असतील आणि ती सगळी कुठे असतील..? जीवंत असतील की मेली असतील..?
ही मुलं मोठी झाल्यावर त्यापैकी एकाला तरी आपल्या वेडसर आईची आठवण येईल का..?
अशी आई, जिच्या पदरात दुर्दैवाने मुलांचं दान पडत गेलं.. आणि ते दान कसं पडलं, कोणत्या रितीने पडलं.. हे न समजता त्या वेडीने त्या पैकी प्रत्येकाला घेऊन भीक मागितली..!!!
दूध पाजलं असेल का हो तिनं त्या प्रत्येकाला..? वेडसरबाईच्या मातृत्वाचा पान्हा..!!
जिच्या वेडेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणारे ते नराधम अद्याप मोकाटच असतील..त्यांना कोण शोधणार, कोण जाब विचारणार, कोण शिक्षा करणार..? अशक्यच आहे सगळं..!
देवेंन्द्र पुढेही बराच वेळ काही बोलत होता..मी मात्र जागीच थिजत होतो..
आज अनेक वर्षांनंतर त्या वेडीच्या आठवणीने डोळ्याच्या कडा थोड्या ओलावल्या इतकंच..!
एरवी मला तरी वेळ कुठाय म्हणा..!!!
-- तात्या.
प्रतिक्रिया
10 Apr 2013 - 8:12 pm | जेनी...
:( .. क्रांतीची एक कविता आठवली ... हाच आशय ....
तात्या वेल्कम बॅक आणि रोशनी पूर्ण करा ...विनंती नाहि .. एक वाचक म्हणुन हक्काने सांगतेय .
10 Apr 2013 - 8:17 pm | सूड
मनमानी
10 Apr 2013 - 9:06 pm | जेनी...
ह्म्म ! हीच ती कविता ... थँक्स सूड ..
10 Apr 2013 - 8:23 pm | प्यारे१
वाचलंय हे!
तेव्हाही काय लिहावं म्हणून गोंधळलेलोच !
10 Apr 2013 - 8:36 pm | शुचि
प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार सात्विक, राजस अथवा तामसिक कर्म करत असतो व त्याची फळे भोगत असतो. आपण, संवेदनशील लोक डिस्टर्ब व्हायचे ते होतोच. जेवढं होईल तेवढं पुण्य करायचं, अपूर्ण सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करायचा. बाकी काय करु शकतो? होणारा उद्वेग रास्तच आहे.
एक किस्सा आठवतो - एक लहानसा (८ वर्षांचा), बारीक खंगलेला मुलगा माझ्या बाबांपाशी येऊन दीनवाणेपणे म्हणाला होता "खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या (घाला)" बाबांनी त्याला एका टपरीत की हॉटेलात नेऊन पोटभर खाऊ घातले. पण ते आठवले की इतकं वाईट वाटतं - त्या लहान मुलाच्या भूकेचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतं
:( लाईफ इज एव्ह्रीथिंग (ग्लोरियस, गुड, बॅड , समटाइम्स डाऊनराईट अग्ली).
10 Apr 2013 - 9:14 pm | अत्रुप्त आत्मा
महाभयंकर........ :(
10 Apr 2013 - 9:54 pm | आदूबाळ
तात्याबा, हा काय प्रकार असतो?
11 Apr 2013 - 2:41 pm | मुक्त विहारि
झक्कास..
छान लिहिले आहे..
11 Apr 2013 - 3:01 pm | खबो जाप
please नका लिहित जावू असले काही, डोक्याला शॉट लागतो राव .
एकतर असले काही होते चीड आणि यावर आपण काही करू शकत नाही ह्याबद्दल स्वताचा स्वतावरचा राग.
खरच डोक्याला शॉट लागून जातो राव.
11 Apr 2013 - 3:44 pm | स्पंदना
सहमत!
असहाय्यपणे सहमत!
11 Apr 2013 - 7:31 pm | अश्फाक
वेलकम बैक तात्या
11 Apr 2013 - 10:34 pm | सुबोध खरे
दुर्दैवाने मनोरुग्णालयातही (आणि अनाथालयात) असे प्रकार वारंवार होतात आणि ती दुर्दैवी मनोरुग्ण गरोदर झाली कि गर्भपातसुद्धा उरकला जातो. मुकी बिचारी कुणीही हाका.
12 Apr 2013 - 2:49 am | प्रभाकर पेठकर
मनोरुग्ण स्त्रीयांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया का करीत नाहीत?
जशी तात्यांची कथानायिका. सामाजिक दृष्ट्या आणि जन्मणार्या मुलांच्या अनाथ भवितव्याचा विचार करून, तिलाही शारीरीक त्रासातून मुक्त नाही का करता येत?
12 Apr 2013 - 9:11 pm | दादा कोंडके
म्हणजे मूळ प्रश्न बाजूला ठेउन भलताच उपचार करण्यासारखं आहे. कितीही सोपी शस्त्रक्रिया असली तरीही ती त्या व्यक्तीने का करून घ्यायची, केवळ आपल्याला रुग्णाला सुरक्षीत वातावरण देता येत नाही म्हणून? किरण बेदींच्या पुस्तकातला प्रसंग आठवला. त्यात तिहार मध्ये कैद्यांमध्ये असलेल्या समलैंगिक संबंधांतून एडस पसरू नये म्हणून प्रशासन कोंडोम वाटणार असतं.
12 Apr 2013 - 9:16 pm | शुचि
मला पेठकर यांचा उपाय पटतो. तिहार मधील निर्णय उल्लेखनिय व स्तुत्य वाटला.
11 Apr 2013 - 10:35 pm | शुचि
तात्या आत मस्तपैकी एखाद्या गाण्याचे रसग्रहण टाका पाहू. डोस्क्याला लै शॉट लागला बगा.
12 Apr 2013 - 1:45 am | अभ्या..
+१
अगदी सहमत. डोकं किर्र होतं असले वाचून :(
12 Apr 2013 - 7:52 pm | अनन्न्या
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..........अशी बाई आपल्या घरात असेल तर मात्र तिला सोडून देणाय्राना यासाठी कशीही बाई चालते.
13 Apr 2013 - 6:39 pm | एस
अशाच एका वेडीची कथा आमच्या तीर्थक्षेत्री पाहिली आहे. याहून जास्त काही लिहिवत नाही.