उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०४ : ट्रुम्सो – नॉर्दर्न लाइट्स् (ऑरोरा) डिनर क्रूझ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
8 Mar 2013 - 5:52 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

...दोन तास असंच गावभर भटकत राहिलो. जसा सूर्य क्षितिजाखाली गेला तसे तापमान वेगाने खाली येऊ लागले. -२ अंशापर्यंत वर आलेले तापमान आता तीन चार अंशांनी नक्कीच खाली गेलं असणार. कुडकुडणारी पावले आपोआपच हॉटेलच्या दिशेने वळली. रूमवर आलो तेव्हा साडेचार वाजले होते. अजून बराच वेळ मोकळा होता. थोडा थकवा आला होता आणि रात्रीच्या ऑरोरा क्रूझसाठी ताजेतवाने राहता यावे यासाठी दोन तास झोप घेण्याचा निर्णय घेतला.

गजर सातचा लावला होता पण साडेपाचलाच जाग आली. आता ताजेतवाने वाटत होते. येवढ्या लांब फिरायला येऊन उगाच लोळत राहण्यापेक्षा खोलीबाहेर पडा आणि काय ते जिवाचं ट्रुम्सो करून घ्या, इथं काय परत परत येणार आहेस? असं मनाला बजावून पंधरा मिनिटात सगळा सरंजाम पेहरून बाहेर पडलो. थंडीचा जोर वाढला आहे हे हॉटेलबाहेर पहिले पाऊल टाकताच समजलं. अंधारही बराच दाटून आला होता. पण दुपारच्या भटकंतीमुळे ट्रुम्सो आता पहिल्या दिवसाप्रमाणे अनोळखी वाटत नव्हतं. आता उरलेल्या तासाभरात हमरस्ते सोडून फिरायची सुरसुरी आली. हमरस्ता सोडून दोनतीन गल्ल्या आत गेलो की मग कुठल्याही पॉश शहराचा मेकअप केलेला मुखवटा सोडून खरेखुरे दर्शन होते... माझा हा फार जुना छंद आहे...

.

.

.

भटकताना दिसलेली काही विशेष ठिकाणे...

Kulturhuset उर्फ कल्चरल सेंटर

Bibliotek उर्फ वाचनालय

तासभर भटकलो. मग थंडी खूपच वाढली. विचार केला, ऑरोरा बघायचा म्हणजे रात्री बराच वेळ बोटीच्या उघड्या डेकवर राहायला लागणार आहे. चला परत हॉटेलवर थोडा वेळ वातानुकूलित उबदार वातावरणात बसून मग बोटीवर जाऊ. हॉटेलच्या लॉबीत एका बाजूला आर्क्टिकचा राजा उभा होता. आतापर्यंतच्या गडबडीत त्याच्याकडे लक्षच गेले नव्हते. त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही...

Polar Bear (Ursus maritimus) उर्फ ध्रुवीय प्रदेशातले अस्वल हा भूमीवर राहणारा जगातील सर्वात मोठा मांसाहारी प्राणी आहे. पूर्णं वाढीच्या नराचे वजन ३५० ते ७०० किलोपर्यंत असते. ही अस्वले फक्त सतत बर्फाळ प्रदेशातच राहू शकतात आणि आता पर्यावरणाच्या वाढत्या तापमानाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. थंडीच्या दिवसात ती सहा महिने बर्फाच्या गुहेत निद्रिस्त असतात. पण उन्हाळ्यात ती कधीकधी नॉर्वेच्या अती उत्तरेकडील फिनमार्क काऊंटीमध्ये दिसतात.

एवढं सगळं झालं तरी सव्वासातच वाजले होते... मला ऑरोराचे वेध लागले होते आणि वेळ फारच हळू हळू पुढे सरकत होता. मग ठरवले की आता चला बोटीवर... सकाळी कप्तान आणि गाइडची ओळख झाली आहेच. बंदर पाचच मिनिटावर होते. बोटीवर जाताना त्याचे रात्रीचे मनोहारी रूप दिसले...

.

चाळीस एक मिनिटे अगोदर बोटीवर पोचलो. पण कप्तान आणि गाइडने स्वागत केले आणि गरमागरम कॉफीही दिली. नॉर्वेजियन लोक एकदम साधे आणि दिलखुलास आहेत. बर्‍याच पश्चिम युरोपीय देशांत दिसणारी आढ्यताखोरी किंवा वरचढपणा नावालाही नाही. मला भेटलेले सारेच नॉर्वेकर हसरे, मनमिळाऊ आणि मैत्रिपूर्ण स्वभावाचे होते. इतर प्रवासी यायला लागेपर्यंत तीस पस्तीस मिनिटे आम्ही मोकळेपणाने गप्पा मारल्या. दहापर्यंत एकदोन करत सगळे सोळा प्रवासी जमा झाले. आमचे जहाज शहराच्या दिव्यांपासून दूर समुद्राच्या मार्गाने जाऊ लागले...

गाइड-कम-शेफने जेवण वाढायला सुरुवात केली. म्हणाली लवकर जेवून घ्या नंतर ऑरोरा दिसायला लागला तर उपाशी राहाल किंवा एखादा महत्त्वाचा क्षण निसटून जाईल. जेवण सकाळी पकडलेल्या माश्यांचेच होते आणि मेन्युही तोच होता. सकाळच्या सफरीतला मी एकटाच या सफरीत होतो. पण मासे चवदार असल्याने काही वाटले नाही...

जरा मोठा समुदाय असल्याने अर्थातच आपापल्या जेवणाच्या टेबलावरच्या प्रवाशांचे गट पडले आणि खेळीमेळीत जेवण सुरू झाले. जेवण संपत आले होते तेवढ्यातच कप्तान ब्रिजवरून खाली आला आणि म्हणाला, "चला, चला, लवकर. ऑरोरा दिसायला सुरू झाला आहे." सगळेजण जेवण सोडून धावतच निरीक्षण टेरेसवर गेलो. ऑरोराचा पहिला फराटा सुरू झाला होता...

क्षितिजापासून आकाशाच्या साधारण २५-३०% टक्के उंचीपर्यंत एक हिरवट झाक असलेला पांढऱ्या प्रकाशाचा फराटा तयार झाला होता. हळू हळू तो वाढत जवळजवळ डोक्यावरून पलीकडच्या क्षितिजाकडे पसरू लागला. त्याच वेळेस विरुद्ध दिशेने तसाच एक फराटा क्षितिजावर अवतरून पहिल्याच्या दिशेने वर येत होता. साधारण १०-१५ मिनिटांत ते एकमेकाला भिडले आणि आकाशात आमच्या डोक्यावर एक कमान तयार झाली !

सूर्य ही एक अणुभट्टी असून तिच्यात चार हायड्रोजन अणूंचा संयोग करून एक हेलियमचा अणू बनण्याची क्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर अव्याहत चाललेली आहे. दर मिनिटाला हजारो टन हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेत इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते की सूर्याच्या अंतरंगाचे तापमान दीड कोटी अंश सेल्सियस पेक्षा जास्त असते आणि पृष्ठभागावरचे ६००० अंश सेल्सियस पेक्षा जास्त असते. थोडक्यात सूर्यामध्ये सतत लक्षावधी अणूसंयोगी अणुस्फोट होत असतात. या प्रक्रियेत वेगळे झालेले भारीत इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स प्रचंड वेगाने सूर्यांभोवतीच्या अवकाशात सौर वाऱ्यांच्या स्वरूपात पसरतात. जेव्हा हे कण पृथ्वीच्या वातावरणात घुसतात आणि प्राणवायू व नत्रवायूच्या अणूंवर आदळतात तेव्हा प्रकाशाच्या वेगवेगळ्या आकृत्या तयार होतात... हे आहे ऑरोराचं अत्यंत सोपे स्पष्टीकरण.

नंतर बराच वेळ तो प्रकाशझोत आकार बदलत राहिला आणि त्याच्या बाजूला तसलेच पण त्याच्या मानाने बरेच छोटे फराटे निर्माण होत राहिले...

.

.

ऑरोराच्या उजेडाची प्रखरता कमी असते तसेच त्याचा आकार सतत बदलत असतो त्यामुळे त्याचा पॅनोरामिक व्ह्यू घेणे शक्य नसतो ह्याचे फार दुःख झाले. मात्र कॅमेऱ्यामधल्या काही सोयींनी हे रंग नीट पकडता येतात. साधारणपणे ISO १६०० पेक्षा जेवढा जास्त व अ‍ॅपरचर जेवढे जास्त तेवढे चांगले. ट्रायपॉड वापरून एक्सपोजर १० ते ३० सेकंद ठेवून जास्त चांगली चित्रे येतात. एक्सपोजरची वेळ प्रकाशाच्या प्रखरपणावर व फोटो काढण्याच्या जागेवर अवलंबून असते: कमी प्रखर ऑरोराला जास्त वेळ; हालणाऱ्या बोटीवर असल्यास शक्य तेवढी कमी वेळ, इ… हे सगळे जरा प्रयोग करूनच ठरवावे लागते. खूप जास्त एक्सपोजर ठेवल्यास बदलणाऱ्या प्रकाशझोतांचे फोटो फज होतात. मानवी डोळ्यांच्या जडणघडणीमुळे रेटायनामधले रंग दाखवणारे शंकू कमी उजेडातले रंग नीट पाहू शकत नाहित. त्यामुळे प्रकाशाचे रंग फोटोत (अधिक वेळेच्या एक्सपोजरमुळे) डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसतात. मात्र प्रकाशाचा नाट्यमय नाच डोळ्यांनी बघायला जी मजा येते ती केवळ अवर्णनीय आहे.

पाऊण तास हा ऑरोराचा खेळ पाहून समुद्रावरच्या वार्‍याने सगळेच कुडकुडू लागले होते. खाली केबिनमध्ये कॉफी घ्यायला गेलो आणि साहजिकच सहप्रवाशांच्या बरोबर थोड्या गप्पा सुरू झाल्या. वीसेक मिनिटे झाली असतील तेवढ्यात कप्तान परत केबिनमध्ये आला आणि म्हणाला, "टेरेसवर चला. ऑरोराचे नवीन प्रकाशझोत तयार झाले आहेत." सगळे परत आपली थंडीनिरोधक आयुधे चढवून परत वर गेलो... आणि काय सांगावे... केवळ अत्यानंद ! आम्ही खाली गेल्यामुळे बहुतेक ऑरोरा रागावला असावा... त्याने आकाशात नुसता रोषणाई सुरू केली होती...पुढच्या तासाभरात पुर्वी फोटोत बघितलेल्या प्रकाशांच्या जवळ जवळ सगळ्या आकृत्यांचे त्याने प्रदर्शन मांडले आणि आकाशाचा अर्धा भाग पूर्णपणे भरून टाकला. आम्ही सगळे बोचरी थंडी आणि सागरी वाऱ्याचे झोत विसरून निसर्गाचा हा चमत्कार बघत आणि सहप्रवाशांचे वेगवेगळ्या चमत्कारिक आकारांकडे लक्ष वेधत राहिलो. काही निवडक फोटो खाली देत आहे...

.

.

.

.

.

.

.

यातले काही फोटो आम्ही सहप्रवाशांनी एकमेकाशी देवाणघेवाण केलेल्यापैकी आहेत. कारण आकाशाच्या एवढ्या मोठ्या भागावर चालणारा निसर्गाचा एवढा मोठा खेळ एका कॅमेर्‍यात पकडणे मानवी आणि कॅमेर्‍यांच्या शक्तीबाहेरचे होते. कप्तानानेही सांगितले की त्याने अनेक वर्षांत इतका दमदार ऑरोरा बघितला नव्हता. अनेकदा आठवडाभर वाट पाहूनही एखादा फुसका प्रकाशझोतही न पाहता परत गेलेले लोकांची उदाहरणेही त्याच्या अनुभवात होती. या पार्श्वभूमीवर मला दुसर्‍या दिवशीच माझे या सहलीतील एक नंबरचे आकर्षण पुरेपूर दिसले होते यासारखी आनंदाची गोष्ट अजून काय असणार?

जे काय बघितले ते अवर्णनीय होते... अनेक वर्ष टोचणी देणारे मन तृप्त झाले आणि आज पूर्ण समाधानाने झोप आली.

(क्रमशः)

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Mar 2013 - 6:05 pm | प्रचेतस

कळस आहे हा भाग.
जगातील सर्वात सुंदर प्रकाश तुम्ही बघितलात.

सुहास झेले's picture

10 Mar 2013 - 4:42 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... _/\_ _/\_

अप्रतिम फोटो.... पुढच्या वर्षी नॉर्वेला जायचा प्लॅन फिक्स झाला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या नॉर्वेप्रवासासाठी शुभेच्छा !

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2013 - 5:28 pm | सानिकास्वप्निल

फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटले:)
बस्स मृणाल म्हणते तसे नॉर्वेचा प्लॅन नक्की :)

nishant's picture

8 Mar 2013 - 6:29 pm | nishant

जबरदस्त ... या वर्षाअखेरीस आमचा स्केन्डेनेव्हियाचा दौरा पक्का!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या स्कॅन्डेनेव्हिया दौर्‍यासाठी शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या स्कॅन्डेनेव्हिया दौर्‍यासाठी शुभेच्छा !

रेवती's picture

8 Mar 2013 - 7:12 pm | रेवती

नि:शब्द!

सव्यसाची's picture

8 Mar 2013 - 7:15 pm | सव्यसाची

जबरदस्त..!

आदूबाळ's picture

8 Mar 2013 - 7:25 pm | आदूबाळ

__/\__ आणि टाळ्या!

शेवटचा फोटो तर अवर्णनीय.

अरोरा बोरिआलिस फक्त ध्रुवीय प्रदेशांत का दिसतं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौरवार्‍यांच्याबरोबर आलेले प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि इतर कण हे विद्युतभारीत (व म्हणूनच चुंबकीय गुणधर्म असणारे) असतात. त्यामुळे ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राने दूर ढकलले जातात व पृथ्वीच्या पलिकडे जाऊन एकत्रीत येतात आणि परत मागे खेचले जातात व पृथ्वीच्या वातावरणातील अणूंवर आदळून प्रकाश निर्माण होतो.

नदीच्या प्रवाहात असलेल्या दगडाभोवती जसा पाण्याचा प्रवाह वाहतो व दगडाच्या मागच्या बाजूस पाणी दगडाच्या दिशेने खेचले जाते तसेच होते. त्यामुळे ऑरोरा हा दोन्ही ध्रुवप्रदेशातच आणि तेही जास्तकरून ६५ ते ७५ अक्षांशाच्या मधील पट्ट्यामधे दिसतो. परंतू अधिक प्रबळ सौरवार्‍यांमुळे तो उत्तर ब्रिटनपर्यंत दिसल्याची क्वचीत उदाहरणे आहेत.

उत्तर ध्रुवाजवळ दिसणार्‍या प्रकाशाला ऑरोरा बोरियालीस व दक्षिण ध्रुवाजवळ दिसणार्‍या प्रकाशाला ऑरोरा ऑस्ट्रॅलीस अशी नावे आहेत.

अधिक माहिती येथे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 12:54 am | डॉ सुहास म्हात्रे

या चित्रात पृथ्वीचे विद्युतचुंबकीय क्षेत्र दिसते आहे... सौरवारे याला वळसा घालून पलिकडे जातात आणि त्यांच्या उर्जेने पलिकडचा भाग चपटा होत होत सौरवारे पृथ्वीकडे खेचले जाऊन वातावरणात घुसले की त्यांचे हवेतल्या अणूंबरोबर होणार्‍या टकरीने ऑरोरा निर्माण होतो.

आदूबाळ's picture

9 Mar 2013 - 4:39 pm | आदूबाळ

__/\__

मनःपूर्वक धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 5:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

या सगळ्या गडबडीत हे खालचे टंकायचे राहीलेच की...

सौरवार्‍यातले कण विद्युतचुंबकीय तत्वांनी भारीत असतात म्हणून ते पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांकडे (जे भौगोलीक ध्रुवांच्या जवळपास आहेत) प्रामुख्याने आकर्षीत होतात. त्यामुळे ऑरोरा फक्त ध्रुवीय प्रदेशात डोळ्यांनी नीट दिसण्याएवढा प्रभावी असतो.

पैसा's picture

8 Mar 2013 - 7:41 pm | पैसा

फोटोवरून कल्पना येते आहे. पण प्रत्यक्ष पाहून देहभान विसरायला होत असेल! तुम्हाला हे सगळे इथे आणल्याबद्दल अगणित धन्यवाद!

चौकटराजा's picture

8 Mar 2013 - 8:08 pm | चौकटराजा

आरोराचे फोटो जालावर पाहिले आहेत पण आपल्यातला माणूस ते पाहून आलाय याचे खास कवतिक आहे.आता आपल्याला रोअरिंग फोर्टीज ओलांडून जायला हरकत नाही दक्षिण गंगोत्री बोलावीत आहे. त्यासाठी शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते विरुद्ध टोक मास्टर प्लॅनमध्ये आहेच +D

मोदक's picture

8 Mar 2013 - 9:07 pm | मोदक

ज ह ब ह रा!!!!!!

टिवटिव's picture

8 Mar 2013 - 9:22 pm | टिवटिव

स्वर्गिय अनुभव असणार हा!!!

नन्दादीप's picture

8 Mar 2013 - 9:28 pm | नन्दादीप

निव्वळ अप्रतिम.......

बाकी ते भारताविषयीच काय ते सांगा लवकर.... ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 9:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतीय नौदलाच्या "सिंधुरक्षक" पाणबुडीने उत्तर ध्रुवीय प्रदेशातील ट्रुम्सोच्या बंदरात तिरंगा फडकवल्याचे सचित्र वर्णन अगोदरच्या (तिसर्‍या) भागात आले आहे.

दिविजा's picture

8 Mar 2013 - 9:30 pm | दिविजा

अहाहा!!!!केवळ अप्रतिम

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

वल्ली, Mrunalini, nishant, रेवती, सव्यसाची, पैसा, मोदक, टिवटिव आणि दिविजा : आपल्या सुंदर प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

स्मिता.'s picture

8 Mar 2013 - 9:57 pm | स्मिता.

हा भाग बघून काय लिहावं सुचत नाहीये... भावना समजून घ्या!
प्रत्यक्ष असा अनुभव घेणं हे स्वर्गात आल्यासारखं वाटत असेल ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरंच फारच वेगळा अनुभव असतो... विशेषतः ऑरोराचा मोठा उद्रेक असेल तर तो तुम्हाला खिळवूनच ठेवतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Mar 2013 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शहराच्या आतल्या भागाचे फोटो आवडले. तिथे चर्चेस फार दिसली का, नावापुरतीच होती?

एवढी थंडी सहन करण्याचा फायदा झाला तर!

---

ऑरोरा फक्त ध्रुवीय भागात दिसतात याचं कारण पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र. हे भारीत कण चुंबकीय क्षेत्रामुळे चुंबकीय ध्रुवांकडे फेकले जातात. तिथे वातावरणातले ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे अणू या कणांमधली ऊर्जा शोषून घेतात. ही उसनी ऊर्जा बाहेर टाकली जाते तेव्हा असा प्रकाश दिसतो. या प्रकाशाचा रंग सूर्याकडून येणार्‍या कणांच्या ऊर्जेवर आणि कोणते अणू ही ऊर्ज शोषून घेत आहेत त्यावर अवलंबून असतो.

सुदैवाने किंवा दुर्दैवाने पृथ्वीचे चुंबकीय आणि भौगोलिक ध्रुव एकमेकांपासून फार लांब नाहीत. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातच ऑरोरा दिसतो. क्वचितच कधी सूर्यातून फार प्रमाणात भारित कण बाहेर फेकले गेले तर खालच्या अक्षांशांनाही ऑरोरा दिसतो. पण ते प्रमाण फारच कमी आणि रंगही एवढे दर्शनीय नसतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

नॉर्वेकर फार देवभोळे नाहीत. चर्चेस आहेत पण लोक लिबरल आहेत व धर्माचा फार पगडा नाही. ट्रूम्सोमध्ये एक आधुनीक स्थापत्यशास्त्राचा दावा सांगणारे त्रिकोणी आकाराचे एक चर्च आहे. पण इतर गोष्टींमुळे तेथे जाण्यासाठी वेळ मिळाला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे ट्रुम्सो शहरातले ट्रॅडिशनल चर्च...

हेच ते आर्क्टीक चर्च (आंतर्जालाच्या सौजन्याने)...

आनन्दिता's picture

8 Mar 2013 - 10:05 pm | आनन्दिता

बापरे काय जबरदस्त अनुभव घेतलाय तुम्ही!! इथे फोटो पहाताना अंगावर शहारे येतायत! केवळ अप्रतिम,,,,

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2013 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी

अधिक काय लिहू? नि:शब्द!!

अगोदरच्या प्रतिसादातील शास्त्रीय माहितीबद्दल अदिती यांना धन्यवाद!!

जुइ's picture

8 Mar 2013 - 10:07 pm | जुइ

अप्रतिम!!! खुपच सुंदर फोटो आहेत. आलास्का वारी करायेला हवी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या आलास्का वारीसाठी शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

आनन्दिता, श्रीरंग_जोशी आणि जुइ : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

प्रकाश गूढ वाटला. लार्जर दॅन लाईफ अनुभव.

सस्नेह's picture

8 Mar 2013 - 11:11 pm | सस्नेह

फोटो पाहून या पृथ्वीतलावरचे आहेत असे वाटत नाही.
अद्भुत !

वाटाड्या...'s picture

9 Mar 2013 - 12:12 am | वाटाड्या...

आयला काका,

चीन काय आरोरा काय...साष्टांग आहे हा तुम्हाला..आयुष्य असं असावं..लै जगावं तुमच्य सारखं.

फार छान सफर आणि वर्ण्न...मानलं बुवा तुम्हाला...

- वाटाड्या...

मिहिर's picture

9 Mar 2013 - 12:13 am | मिहिर

कसला खतर्‍या अनुभव असेल! लेखमाला मस्त चालू आहे एकदम.

राघवेंद्र's picture

9 Mar 2013 - 12:36 am | राघवेंद्र

मित्रा, एक्दम मस्त अनुभव आहे. धन्यवाद आमच्या बरोबर शेयर केल्याबद्दल.

धन्या's picture

9 Mar 2013 - 1:16 am | धन्या

फोटो प्रचंड आवडले.

एक आगाऊ शंका : तुम्हाला फोटोवर वॉटरमार्क नाही का टाकावासा वाटत? ईंटलेक्च्युअल प्रॉपेर्टीच्या बाबतीत तुम्ही अगदीच अडाणी दिसता ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

एक आगाऊ शंका : तुम्हाला फोटोवर वॉटरमार्क नाही का टाकावासा वाटत? ईंटलेक्च्युअल प्रॉपेर्टीच्या बाबतीत तुम्ही अगदीच अडाणी दिसता :))

फोटोपेक्षा जास्त महत्वाचा माझ्या सहलीचा आनंद मी मिपावरच्या मित्रांशी वाटून घेत आहे (आणि त्यामुळे तो द्विगुणित पण होत आहे हा आपला एक गुप्त फायदा :) , कोणाला सांगू नका बरं का)... त्यापुढे या फोटोंची काय पत्रास ! ;)

फारच सुरेख! अरोरा भारी आहे! प्रत्यक्ष पाहताना काय वाटलं असेल!
आणि ते भल मोठ्ठं वाचनालय पाहून जीव वेडा झाला! :) तिथे किती पुस्तकं असतील?

मृत्युन्जय's picture

9 Mar 2013 - 11:02 am | मृत्युन्जय

सुरेख. फारच सुरेख.

jaypal's picture

9 Mar 2013 - 11:12 am | jaypal

ते ऑरोरा चे फोटो बघुन येडा झालो.
ह्यो पार्ट बी लैभारी हाय राव

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

शुचि, स्नेहांकिता, वाटाड्या..., मिहिर, राघव८२, यशोधरा, मृत्युन्जय, jaypal : आपल्या सर्वांना उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !

नंदन's picture

9 Mar 2013 - 2:08 pm | नंदन

अद्भुत, अप्रतिम! हे ऑरोरा प्रत्यक्ष पाहण्याच्या जुन्या इच्छेने डोके वर काढले हे फोटो पाहून :)

चेतन माने's picture

9 Mar 2013 - 2:43 pm | चेतन माने

नि:शब्द
फक्त धन्यवाद

प्यारे१'s picture

9 Mar 2013 - 2:54 pm | प्यारे१

आ ई श प्प त !

क स लं भा री आ हे हे.

बॅटमॅन's picture

9 Mar 2013 - 3:12 pm | बॅटमॅन

आधीचे भाग भारीच पण हा भाग मात्र कळस झालाय एकदम!!!!! फोटो पुन्हा एकदा मनात साठवतो आणि मगच प्रतिक्रिया देतो :)

धनुअमिता's picture

9 Mar 2013 - 3:49 pm | धनुअमिता

अप्रतिम..... खुप छान फोटो आहेत ऑरोरा चे.......
शब्द अपुरे पडत आहे. काय लिहावे हे सुचत नाही आहे.
धन्यवाद हे आमच्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल.

५० फक्त's picture

9 Mar 2013 - 4:17 pm | ५० फक्त

लई भारी, हे असले फोटो आंतरजालावर ब-याच वेळा पाहिले होते, पण आपल्यापैकी कुणीतरी काढलेले फोटो पाहायला जास्त मजा आली धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Mar 2013 - 4:30 pm | निनाद मुक्काम प...

ऑरोरा
इतके दिवस मलायका , व अमृता ह्यांना प्रत्यक्ष पहिले होते ,
पण तुम्ही पाहिलेल्या ऑरोरा ची सर त्यांना नाही.
स्तिमित होऊन पाहणे हा अनुभव नुसत्या फोटो मुळे मला आला, तेव्हा तुम्हाला हा अनुभव प्रत्यक्ष पाहणे ,म्हणजे स्वर्गीय आनंदाचा क्षण होता.
असेच क्षण उतारवयात जेव्हा आपला पैसा ,यश ,कीर्ती व आपली प्रकृती जेव्हा आपल्याला साथ देत नाही तेव्हा साथ देतात ,
आयुष्य उपभोगलेल्या सार्थ समाधान देतात.
असेच क्षण मनमुराद उपभोगा व आम्हाला घरबसल्या उपभोगू द्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

असेच क्षण उतारवयात जेव्हा आपला पैसा ,यश ,कीर्ती व आपली प्रकृती जेव्हा आपल्याला साथ देत नाही तेव्हा साथ देतात ,

सहमत... पण यापुढे जाऊन मी तर म्हणेन की हे असे क्षण आपले कायम सखे-सोबती बनून राहतात... वय, पैसा ,यश ,कीर्ती व प्रकृती यांच्या कोणत्याही स्थितीत. आणि ते क्षण हीच खरी साठवण !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

नंदन, चेतन माने, प्यारे१, बॅटमॅन, धनुअमिता, ५० फक्त : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

कवितानागेश's picture

9 Mar 2013 - 5:59 pm | कवितानागेश

पहिल्या फोटोपासून सगळे बघत बघत तोंडाचा मोट्ठा 'आ' झालाय... अप्रतिम आहेत दृष्य. :)

अनन्न्या's picture

9 Mar 2013 - 6:40 pm | अनन्न्या

ही स्वर्गीय फोटोग्राफी पहायला!! दिसले एकदाचे!! मिपा सारखे गायब का होत आहे? तुम्हाला ऑरोरा जेवढ्या सहज दिसले ते पहायला किती वाट पहावी लागली.

वैशाली हसमनीस's picture

10 Mar 2013 - 1:56 pm | वैशाली हसमनीस

छान फोटो व छान लेखन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

लीमाउजेट, अनन्न्या व वैशाली हसमनीस : प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

विलासराव's picture

10 Mar 2013 - 7:35 pm | विलासराव

झक्कास्स!!!!!!!!!!!

रणजित चितळे's picture

10 Mar 2013 - 7:44 pm | रणजित चितळे

लेख छान. फोटो अप्रतीम.

खंत हीच की उत्तर धृवावर सुद्धा इतके निटनेटके सुबक रस्ते व ओळीत आखलेल्या इमारती. आपल्याकडे आपण कायदा धाब्यावर बसवून बसवून काय केलेल आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

खंत हीच की उत्तर धृवावर सुद्धा इतके निटनेटके सुबक रस्ते व ओळीत आखलेल्या इमारती. आपल्याकडे आपण कायदा धाब्यावर बसवून बसवून काय केलेल आहे.

आपल्याकडे सगळे* आहे फक्त कमी आहे ती राजकीय इच्छाशक्तीची... आणि जोपर्यंत जनता अगतीकपणे आपले शासक निवडण्याऐव़जी खंबीरपणे लोकसेवक निवडून द्यायला शिकत नाही तोपर्यंत काहितरी चांगले निर्माण निर्माण करण्याची राजकीय इच्छाशक्ती निर्माण होणार नाही... ना जगात इतर कुठे असे झाले आहे, ना भारतात होईल.

* तांत्रीक कौशल्य आपल्याकडे भाराभर पडलेले आहे... खाडी देशातले उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात भारतीय अभियंत्यांचा सिंहाचा वाटा होता आणि अजून चालू आहे. ७० सालांत बनवलेला पुणे कँपातल्या म. गांधी रस्त्याला आणि डेक्कनवरच्या जंगली महाराज रस्त्याला पंधराच्यावर वर्षे एकही खड्डा पडला नव्हता... त्या कॉन्ट्रॅक्टरला परत काम मिळाले नाही अशी वदंता ऐकली आहे. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे रस्ते फक्त उत्तम बांधणिचे आहेत असे नाही तर ते त्याप्रकारच्या वातावरणात १२ ही महिने वाहतूकीला खुले असतात. तेच विमान वाहतूकीचे आहे.

एकच शब्द, अप्रतिम... आम्ही तर तुमच्या लिखाणाचे जब्राट फ्यान झालोय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

विलासराव व प्रथम फडणीस : आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

अनिवासि's picture

11 Mar 2013 - 12:47 am | अनिवासि

खरोखरच भग्यवान आहात! मी तीन वेळा Iceland ला गेलो आणि अरोरा बघणे हा एक भाग होता पण एकदाही तो योग आला नाही. एका रात्री गाढ झोप लागली असताना म्हणे अतीसुंदर अरोरा दिसला पण माझ्या यजमानाना मला उठवण्याचे धैर्य झाले नाही असे ते दुसरे दिवशी म्हणाले. मनातल्या मनात त्याना खुप शिव्या दिल्या. पण त्यांचे इतर आदरातिथ्य इतके प्रचंड होते की काय बोलणार? समुद्रात जाउन whales मात्र दाखवुन आणले. फोटो पाहुन आनंद वाटला. बघु परत एखादी ट्रीप करता आली तर.

सुमीत भातखंडे's picture

12 Mar 2013 - 1:11 pm | सुमीत भातखंडे

काय बोलणार...नि:शब्द झालो

चाणक्य's picture

15 Mar 2013 - 8:52 pm | चाणक्य

मस्त वाटलं फोटो बघून

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिवासि, सुमीत भातखंडे आणि चाणक्य : आपल्या प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

चिगो's picture

15 Mar 2013 - 11:16 pm | चिगो

पारणे फिटले डोळ्यांचे.. ह्याला म्हणतात जगणं. .
(जग फिरण्याची इच्छा असलेला) चिगो

किसन शिंदे's picture

16 Mar 2013 - 7:10 am | किसन शिंदे

निव्वळ जबराट फोटो आहेत ऑरोराचे.! फोटोच इतके भारी आहेत मग प्रत्यक्षात तर किती सुंदर दिसत असावं ते.

राजासाब.. हॅट्स ऑफ टु यू!! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2013 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे

चिगो आणि किसन शिंदे : आपल्या सुंदर प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !

अनिवासि's picture

26 Mar 2013 - 6:10 pm | अनिवासि

आजच्या गार्डीअन मध्ये अरोरावरची एक चित्रफीत दिलेली आहे. guardian.co.uk 26-3-2013
faarach masta aahe.

मालोजीराव's picture

26 Mar 2013 - 7:30 pm | मालोजीराव

हीच ती वेळ हाच तो क्षण :)
(ऑन-साईट कॉल ला धक्क्याला लावून घाईघाईत धागा उघडला)
नॉर्वे सफारीचा खर्या अर्थाने सार्थक करणारा लेख…याची आतुरतेने वाट पाहत होतो…एकच लंबर फोटो हायेत राव !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिवासि आणि मालोजीराव : अनेक धन्यवाद !

अप्रतिम!! ऑरोराचे फोटो बघून प्रत्यक्ष पाहण्याची खूप इच्छा होत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2013 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या ऑरोरा सहलीला शुभेच्छा !

रुपी's picture

4 Aug 2017 - 4:13 am | रुपी

वा वा सुंदर!
तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालेले दृश्य अजून कैक पटींनी सुंदर असणार!
छान आहे ही मालिका.. प्रतिसाद वाचून समजले की चीनवरची मालिकाही वाचायची राहिली आहे. ही संपवल्यावर तिकडे मोर्चा :)

भटक्या फोटोग्राफर's picture

9 Dec 2017 - 12:37 am | भटक्या फोटोग्राफर

सुंदर वर्णन आणि फोटोसुद्धा

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2017 - 11:16 am | मार्मिक गोडसे

सफर आणि फोटो दोन्हीही सुंदर.
अवांतर: लहानपणी एकदा घरातील एक शक्तिशाली चुंबक मी टीव्ही चालू असताना पडद्याजवळ नेले असता अगदी असेच ऑरोरा सारखे रंगीबेरंगी पट्टे पडद्यावर दिसू लागले. मजा वाटायला लागली व हा खेळ मी बराचवेळ खेळलो, नंतर चुंबक दूर ठेवले परंतू पडद्यावर रंगीत पॅच दिसू लागला,काही केल्या तो जात नव्हता. शेवटी मॅकॅनिकला आणले, त्याने एक मिनिटात 'जादू' ने तो पॅच हटवला. ऑरोराशी साम्य वाटले म्हणून आठवले व लिहिले.