====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
...परत येऊन दमाने जेवण केले आणि केबिनकडे गेलो. आता प्रवासाचा दुसरा, क्रूझचा, टप्पा सुरू झाला होता.
आज सफरीचा पाचवा दिवस आणि हुर्टीग्रूटन क्रूझची पहिली सकाळ. कालचा क्रूझचा सगळा प्रवास रात्रीचा होता त्यामुळे मधून मधून दिसणारे दूर किनार्यावरील लुकलुकते दिवे सोडून इतर फारसे काही दिसले नव्हते. शिवाय दिवसभराच्या धावपळीने आणि काल रात्री चोपलेल्या बोटीवरच्या स्वागताच्या मेजवानीमुळे गाढ झोप आली होती. या अगोदर सगळ्या सफारींच्या सूप-ब्रेड-जॅम-कॉफीने वात आणला होता. मात्र मी ज्या ज्या दिवशी शाकाहारी जेवण सांगितले होते, त्या सगळ्या वेळी ती व्यवस्था झाली होती हे दु:खात सुख होते.
सकाळी प्रसन्न जाग आली आणि सहजच केबिनच्या खिडकीतून बाहेर नजर गेली. समुद्राच्या नितळ निळ्या पाण्यामधून नजरेच्या टप्प्यापर्यंत दिसणार्या असंख्य बर्फाच्छादित बेटांच्यामधून आमचे जहाज चालले होते. मात्र गल्फ स्ट्रीमच्या प्रभावामुळे पाण्यात बर्फाचा एकही तुकडा तरंगताना दिसत नव्हता...
सकाळची नित्यकर्मे आटपून न्याहारी आटपली. पुढचा युरोपच्या अती उत्तर टोकाला भेट देण्याचा कार्यक्रम दुपारी ११:४५ ला होता. त्यामुळे बराच वेळ मोकळा होता. नॉर्वेच्या सागरात असंख्य बर्फाच्छादित बेटे आहेत. क्रूझची जहाजे या बेटांच्या गर्दीमधल्या समुद्राच्या पाण्यामधून जातात... या बेटांच्या मधल्या समुद्राच्या भागाला नॉर्वेजियनमध्ये फ्योर्ड (Fjord) असे म्हणतात. या भूभागाचे दर्शन हे ऑरोरा एवढे नाही तरी नॉर्वेतले दोन क्रमांकाचे आणि खात्रीने दिसणारे (ऑरोरासारखे बेभरवशी नाही) आकर्षण आहे... आणि यावरूनच टूर कंपनीचे नाव फ्योर्डटूर्स आणि आमच्या जहाजाचे नाव ट्रोलफ्योर्ड (फ्योर्डमधला भटक्या) असे होते. हा भाग हिवाळ्यात बर्फाने तर उन्हाळ्यात हिरवळीने भरलेला असतो, त्यामुळे फ्योर्डमधली क्रूझची सहल बारमाही चालू असते. या मनोहर परिसराचे दर्शन घेण्यासाठी बोटीत सगळ्या बाजूंनी फेरी मारायला निघालो.
.
बोटीच्या सगळ्यात वरच्या निरीक्षण मजल्यावरून चारी बाजूला नजरेच्या टप्प्यापर्यंत बर्फाच्छादित बेटेच बेटे दिसत होती... हे सगळे कॅमेर्यात पकडणे केवळ अशक्य.
बोटीचे सर्वात वरचे निरीक्षण डेक...
.
.
बोटीमध्ये लावलेल्या मॉनिटर्सवर बोटीचा या बेटांच्या मधून चाललेल्या प्रवासाचा मार्ग सतत दाखवला जात होता...
मी फेरी मारत असतानाच हुर्टीग्रूटनची दुसरी एक बोट आमच्या उलट दिशेने जाताना दिसली...
थोड्या वेळेने हवॉयसुंड नावाचे आमच्या बोटीचा थांबा असलेले एक बंदर आले. छोटीशी पण टुमदार रंगीत घरांची वस्ती असलेल्या या गावाची आणि त्याच्या परिसराच्या दळणवळणाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी उत्तम सागरी बंदर होते...
.
ट्रुम्सो आणि किर्केनेस या ५५०-६०० किमी सागरी मार्गावर अशी एकूण लहान मोठी १३ सुसज्ज बंदरे आहेत. हुर्टीग्रुटनच्या बोटी माणसांबरोबर सामान व चारचाकीचीही वाहतूक करतात. त्यामुळे काही स्थानिक लोक आपापल्या गाड्या बरोबर घेऊन प्रवास करताना दिसत होते !
आमच्या बोटीतून एक खगोलशास्त्रज्ञ आपल्या ५० लोकांच्या जथ्यासह "ऑरोराचा पाठलाग" (Chasing the Lights) नावाची बेर्गन-किर्केनेस-बेर्गन अशी १२ दिवसांची सहल करत होते. त्या खगोलशास्त्रज्ञाचे ऑरोरावरचे एक भाषण बोटीच्या अॅम्फिथिएटरमध्ये झाले. ते सर्व प्रवाशांना खुले होते. त्यांत ऑरोराबद्दलचे बरेच शास्त्रीय ज्ञान मिळाले. त्यानंतर असाच बोटीवर इकडेतिकडे फिरत आजूबाजूचे सौंदर्य बघण्यात वेळ गेला.
हा आहे खास वातानुकूलित निरीक्षण कक्ष. यात आरामात बसूनही आपण बोटीच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहू शकतो...
तेथे बसून वाढत जाणाऱ्या बर्फाच्या पसाऱ्याकडे बघताना वेळ भर्रकन निघून गेला...
इतका गुंगून गेलो होतो की आमच्या युरोपचे अती उत्तरेचे टोक अर्थात नोर्डकाप्प (Nordkapp अथवा North Cape) बघण्याच्या सहलीची वेळ झाली हे बोटीवरच्या घोषणेनेच ध्यानात आले. गडबडीत स्वागतकक्षात आलो आणि मग अचानक ध्यानात आले की कालच्या माहितीसभेत आजच्या सहलीसाठी बर्फात न घसरणारे बूट जरूरी होते. मात्र ते बोटीवर मिळणार नव्हते. याला उपाय म्हणून बोटीवरच्या दुकानांत सामान्य बुटांवर चढवू शकू असे खास स्नो स्पाईक्स होते. स्वागतकक्षात पोचलो तेव्हा तेथे ही म्हणून गर्दी उसळली होती. बोटीवरच्या प्रवाशांपैकी बहुतेक सर्व या सहलीत सहभागी होणार होते असे दिसत होते. याचा अर्थ बोटीवरून सगळ्यांना खाली उतरायला कमीत कमी १५-२० मिनिटे लागणार होती. धावतच दुकानात जाऊन ते स्पाईक विकत घेतले. हेच ते स्पाईक...
मूर्ती लहान पण काम महान असेच त्यांच्याबद्दल म्हणायला लागेल. कारण त्यानंतर चार दिवस अनेक प्रकारच्या बर्फात मी केवळ माझ्या स्निकर्सवर हे स्पाईक घालून हिंडलो आणि एकदाही घसरायला झाले नाही...
हे होनिंग्जवाग बंदर जेथून आमची नोर्डकाप्पची सहल सुरू झाली...
.
.
इतके आधुनिक गाव युरोपातील वस्तीच्या अती उत्तर ठिकाणी पाहून आश्चर्य वाटले पण आतापर्यंतची सगळी बंदरे पाहता हे अपेक्षीतच होते. असो. येथून आम्हा सर्वांना इच्छित स्थळी घेऊन जाण्यासाठी अर्थातच अनेक बसेस उभ्या होत्या. प्रत्येकाची व्यवस्था भाषेच्या निवडीप्रमाणे केली होती. माझी वर्णी इंग्लिश व फ्रेंच भाषेच्या बसमध्ये लागली. आमचा गाइड जेरोम चे इंग्लिश आणि फ्रेंचवरचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे होते. सर्व सहलभर त्याने फिनमार्क काउंटीची (नॉर्वेचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा, ज्यामध्ये आता आम्ही होतो) सर्व वैशिष्ट्ये अशी खुसखुशीत शैलीत, काही खास नॉर्वेजियन किश्श्यांसह, अशी काही सांगितली की नोर्डकाप्पला पोहोचेपर्यंतचा व परतीचा प्रत्येकी एक-दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. अन्यथा डोळ्यासमोर पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या डोंगरदऱ्या सोडून इतर काही नव्हते.
साधारण एक तासानंतर आम्ही एका चेक पॉइंटला पोहोचलो. तेथून पुढे बसेस फक्त पाच-सहाच्या ताफ्यानेच आणि तेही हवामान योग्य असेल तरच जाऊ शकतात. या दर ताफ्याच्या सुरुवातीला स्थानिक प्रशासन एक बर्फ साफ करणारी गाडी पुरवते. गाइडच्या सांगण्याप्रमाणे थंडीच्या दिवसांत दर आठवड्यात तीन सहली तरी इथूनच परत जातात इतके बेभरवशी इथले हवामान आहे. नशिबाने आजचे हवामान ठीक होते आणि आमच्या बसेसची संख्याही ठीक होती त्यामुळे आम्ही दहा मिनिटांतच पुढे मार्गस्थ झालो...
हा रस्ता खरेच खतरनाक होता. बर्फामध्ये लोक हरवतात ते कसे याची अगदी उत्तम निगा राखलेल्या रस्त्यावरून जात असतानाही बऱ्यापैकी कल्पना आली...
नोर्डकाप्प जरी मानवी वस्तीपासून खूप दूर होते तरी तेथे अत्याधुनिक व्यवस्था होती. वातानुकूलित प्रशस्त इमारतीत बसण्याची सोय, उपाहारगृहे, स्वच्छ रेस्टरूम्स, दुकाने, इ. इ. तेथे एक थिएटरही होते. त्यामध्ये या भूभागाच्या विविध ऋतूंमधील देखाव्यांचे आणि जनजीवनाचे चलतचित्र दर अर्ध्या तासाने दाखवत होते.
हे नोर्डकाप्पचे पहिले दर्शन...
हे नोर्डकाप्पच्या स्वागतगृहाचे प्रवेशद्वार. या भागाचे टोक ७१ अंश १०' २१" अक्षांशावर आहे, जो युरोप खंडाचा सर्वात उत्तर भूभाग आहे. याच्या पलीकडे फक्त समुद्रच आहे आणि जसजसे उत्तर ध्रुवाच्या जवळ जाऊ तसा तो नुसता बारमाहीच नव्हे तर अनेक हजार वर्षे बारमाही गोठलेला समुद्र आहे.
या इमारतीतून पलीकडे गेलो की आपण नोर्डकाप्पवर पाय ठेवतो...
.
या भूभागाच्या उत्तर टोकावर एक पृथ्वीचा लोहगोल उभारलेला आहे. साहजिकच तेथे फोटो काढण्यासाठी सर्व प्रवाशांची झुंबड उडते...
संपूर्ण नोर्डकाप्प म्हणजे एक उंच कडा आहे त्याला मजबूत कुंपण घालून फेरी मारण्यासाठी सुरक्षित बनवले आहे. त्या सगळ्या परिसराला एक फेरी मारली. नवीनच पडलेल्या भुसभुशीत बर्फामध्ये पाय २०-३० सेंमी खोल रुतत होते. पण त्या कड्याच्या सर्व बाजूंनी खालचा नॉर्वेजियन सागर बघण्याचा मोह त्यावर मात करत होता...
.
.
अर्धा तासच फिरलो असेन. नंतर अगदी पाच मिनिटांतच हवामान इतके पटकन बदलले की बर्फाचे वादळ सुरू झाले. चालणे कठीण झाले आणि इमारतीत परत येणे भाग पडले. निघायची वेळ ४५ मिनिटांनी होती. तेवढ्यात इमारतीतील थिएटरमधले चलतचित्र बघून घेतले.
परत निघालो तेव्हा हवा खूपच खराब झाली होती. दहा पंधरा मिटरच्या पुढचे काही दिसत नव्हते. सगळ्या बसेस डिस्ट्रेस सिग्नल लावून बर्फ साफ करणार्या गाडीच्या मागे कमीत कमी अंतर ठेवून एकामागे एक हळू हळू चालत होत्या. मगाशी चेक पॉइंट पासून १५ मिनिटांत नोर्डकाप्पपर्यंत पोहोचलो होतो. परतताना त्याच अंतरास ४५ मिनिटे लागली. येताना आजूबाजूच्या पांढर्या दर्या खतरनाक दिसत होत्या. आता त्या दिसत नव्हत्या म्हणून अधिकच खतरनाक झाल्या होत्या...
.
येताना गाइडने सांगितलेली 'आठवड्यातून तीनदा हवामानामुळे सहल बाद होते' ही गोष्ट आम्हाला खूश करण्यासाठी केलेली अतिशयोक्ती वाटली होती. आता मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला ! आमचे नशिब खरेच जोरावर होते. आम्ही जर तास दोन तास उशीरा आलो असतो तर नक्कीच चेक पॉइंटवरून परत जायला लागले असते.
जसे आम्ही चेक पॉइंट सोडून होनिंग्जवागकडे निघालो तसे हवामान सुधारण्यास सुरुवात झाली. गावात शिरताना उत्तम नाही तरी छान म्हणायला हरकत असे वातावरण झाले होते...
.
बंदरात उभी असलेली आमची बोट...
रात्री आमची बोट चर्चचा आकार असलेल्या नैसर्गिक शीला असलेल्या टेकडी जवळून गेली. या शिलेला सामी चर्च असेही नाव दिलेले आहे. पण काळोखामुळे काही फारसे बघायला मिळाले नाही. त्यानंतर स्थानिक कोळी राजखेकडे (King Crabs) घेऊन बोटीवर आले आणि त्यांच्या प्रदर्शनाचा एक कार्यक्रम निरीक्षण डेकवर झाला तो मात्र मजेदार होता...
.
ही जगातील सर्वात मोठी खेकड्यांची जात आहे. रशियन शास्त्रज्ञांनी नॉर्वेच्या सरहद्दीजवळच्या मुरमान्स्कफ्योर्ड या ठिकाणी हे खेकडे रशियन कोळ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सोडले. त्यांची लाखोंमध्ये पैदास होऊन ते इतरत्र पसरले आणि आता फिनमार्कमधल्या कोळ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला आहे ! या खेकड्यांचे मधले कवच रिकामे असते पण प्रत्येक पायात एका माणसाचे पोट भरेल इतके मांस असते ! आजच्या रात्रीला हे खेकडे आणि कोळ्यांनी पकडून आणलेल्या इतर खास सागरी खजिन्याची मेजवानी होती. ओळखीचे आणि अनोळखी अनेक प्रकार होते. त्यावर आडवा हात मारला आणि केबिनमध्ये येऊन आडवा झालो.
(क्रमशः )
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
17 Mar 2013 - 1:23 am | मोदक
व्वा..!!
चित्र समोर उभे करत आहात. भन्नाट वर्णनशैली!!!!!!!
17 Mar 2013 - 2:39 am | रेवती
युरोपाच्या उत्तर टोकाला आधुनिक गाव बघून छान वाटले. तिथल्या बर्फाळ हवामानात घेतलेली काळजी योग्यच आहे. सगळ्या व्यवस्थेचे कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. उत्तरटोकावरचा पृथ्वीचा गोल, तिथले फिरणे कायमचे लक्षात रहावे असे आहे. आम्ही बर्फवृष्टी होणार्या ठिकाणी रहात असूनही उत्तर टोकावर जाऊन छायाचित्र काढणे रोमांचकारी वाटले. स्निकर्सना लावायचे स्पाईक्स आवडले कारण उपयोगी आहेत.
17 Mar 2013 - 2:41 am | बॅटमॅन
अतिशय देखणे फटू आणि तितकीच मस्त वर्णनशैली. तोंपासू अक्षरशः!!!!
(तोंपासू खेकडे बघितल्याने नाही, तर जण्रल फटू बघून :) )
18 Mar 2013 - 5:38 pm | मालोजीराव
च्यामारी एव्हड्या उन्हाळ्यात इतका बर्फ आणि पाणी बघून… महाराष्ट्रातल्या दुष्काळाची आन चारा छावण्यांची आठवण झाली :(
17 Mar 2013 - 4:52 am | सानिकास्वप्निल
खूप हेवा वाटतोय तुमचा :)
नोर्डकाप्पचे फोटो आवडले
कोळी राजखेकडे बघून गमंत व आश्चर्य वाटले
पुभाप्र
17 Mar 2013 - 7:28 am | सव्यसाची
तुमचे अभिनंदन कारण प्रत्येक वेळी तुम्ही थोडे तरी भाग्यवान असता आणि जी गोष्ट तुम्ही पाहायला निघता ती तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळते. :)
पुढचा भाग येउद्यात. खुपच सुंदर होते आहे ही पण लेखमाला. अनेक धन्यवाद..!
17 Mar 2013 - 8:25 am | ५० फक्त
लई भारी, तुमच्या या प्रवासवर्णनामुळं आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षात काय करायचं याचा माझा प्रश्न निकालात निघाला आहे.
17 Mar 2013 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्या प्रवासांसाठी अनेक शुभेच्छा !
पण प्रवासासाठी इतक्या उशीरा न जाता आतापासूनच व्यवस्थापन करून एक एक भाग चविनं पाहिलात तर अजून मजा येईल. शिवाय अनेक आकर्षक पण शारिरीक कष्टांच्या प्रवासात प्रकृती छान असणे ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. जशी वर्षे वाढतात तसे हे गणित कठीण होत जाते.
तुमची इच्छा लवकरात लवकर प्रत्यक्षात यावी यासाठीही शुभेच्छा !
17 Mar 2013 - 9:24 am | प्रचेतस
फोटो बघूनच अतिशय थंडगार वाटलं. वर्णन तर सुरेखच.
17 Mar 2013 - 9:31 am | आतिवास
रोचक लेखमाला. वाचते आहे.
17 Mar 2013 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो आणि वर्णन केवळ सुरेख.
-दिलीप बिरुटे
17 Mar 2013 - 11:16 am | कवितानागेश
मस्त सुरु आहे सहल आणि वर्णन. फोटो तर फार छान आलेत. :)
17 Mar 2013 - 11:25 am | दिपक.कुवेत
आधि चायनाच्या हिरव्यागार फोटोनी वेड लावल आणि आता हे बर्फाच्छादित फोटो. नुसत्या बर्फाचे फोटोदेखील कसे देखणे असतात हे तुमच्या लेखमाले वरुन कळत. पुढिल भागाच्या प्रतीक्शेत.
17 Mar 2013 - 3:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
मोदक, रेवती, बॅटमॅन, सानिकास्वप्निल, सव्यसाची, ५० फक्त, वल्ली, आतिवास, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, लीमाउजेट आणि दिपक्.कुवेत : आपल्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी अनेकानेक धन्यवाद !
17 Mar 2013 - 8:26 pm | नानबा
आधीच्या सर्व भागांवरील प्रतिक्रियेप्रमाणेच प्रतिक्रिया - एकदम भन्नाट लेखन, जब्राट प्रवास, अप्रतिम फोटो, सगळंच कमाल.. :)
18 Mar 2013 - 1:21 am | डॉ सुहास म्हात्रे
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !
18 Mar 2013 - 9:50 am | मदनबाण
जबराट !
तुम्ही तर लयं लकी बाँ... :)
18 Mar 2013 - 11:44 am | स्पंदना
ही लेखमाला झाली की एक लेख तुम्ही हे कस मॅनेज करु शकलात त्याचा ही टाका.
आम्ही आपले घर, भविष्यातली बचत, मुलं अन बाळ यात इतके गुरफटलो आहोत की हे अस काही असाध्य वाटत.
फार छान सफर ही सुद्धा. तेव्हढच पण मार्मिक निवेदन तर छानच.
18 Mar 2013 - 2:31 pm | अस्मी
खरंच भन्नाट लेखन!! नोर्डकाप्पला जातानाचे ते पांढर्याशुभ्र दुलईचे फोटो खूपच आवडले.
एकदम सुंदर लेखणशैली आणि जोडीला तितकेच सुंदर फोटो..!!
18 Mar 2013 - 2:44 pm | अक्षया
+ १
18 Mar 2013 - 5:23 pm | चेतन माने
बहुतेक सहलींमध्ये कुठल ठिकाण लेखमालेत लिहायचं राहू नये म्हणून कि काय हवामानाने तुम्हाला बरीच साथ दिली.
लेख वाचताना इकडच्या गर्मीचा चांगलाच विसर पडतो, काय टायमिंग साधलाय तुम्ही !!!
फोटू एकदम शुभ्र आलेत, झक्कास :)
आपल्या भारतीय खेकड्या पेक्षा हा राजखेकडा चविष्ट होता काय ??
18 Mar 2013 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
हवामानाने तुम्हाला बरीच साथ दिली.
हे मात्र अगदी खरं. ट्रुम्सोमधला ऑरोराचा दुसरा दिवसही (ऑरोरा बेल्टमध्ल्या एकूण सहा दिवसातला एकुलता एक दिवस) असाच. नोर्डकाप्पला तर एक दोन तासभरच हवामान बरे झाले होते आणि कर्मधर्मसंयोगाने ती वेळ आमच्या सहलीने साघली होती !खूपच चवदार असतो राजखेकडा... आपल्याकडच्या मोठ्या आकाराच्या आणि उत्तम चविच्या समुद्री खेकड्याइतका किंवा कांकणभर सरस.
18 Mar 2013 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण, aparna akshay, अस्मी आणि अक्षया : आपल्या सर्वांना अनेक धन्यवाद !
18 Mar 2013 - 6:41 pm | प्यारे१
अॅज युज्वल.... मस्तच!
19 Mar 2013 - 10:46 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
19 Mar 2013 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमचा प्रतिसाद की तुमची सही??? :)
19 Mar 2013 - 2:51 pm | पैसा
मस्त वाटलं! इतका बर्फ पाहून एकदम गारेगार!!
20 Mar 2013 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !