तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे.
श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं. तर इतरही शौकांप्रमाणं पुरेसे पैसे असले, की ते घालवायचे मार्गही आपोआप निघतात; ह्या समजुतीप्रमाणेच घडू लागलं. बर्यापैकी पैसा घेउन दोन अंगरक्षक हे काम करण्यास तयार झाले. शिवाय लगलच तर त्याचं मनोरंजनही ते करुन देत.
असेच काही दिवस गेले. ते त्याचं रंजन करत; त्याला गुंगी येइपर्यंत. गुंगीलाच झोप समजून तो झोपी जाइ. गुंगीबाहेर आला की त्याला फार त्रास होइ. पण ते पुन्हा त्याला गुंगीयेइपर्यंत जादुई कला सादर करीत. नंतर रक्षणासाठी उभे ठाकत.
.
एकदा बाहेरच्या आवाजाने तो गोंधळून उठला; दचकून अंथरुणात बसला. आसपास आग लागल्याचं त्याला तुटक्या खिडकितून दिसू लागलं. पण इतक्यात रक्षकांनी त्याला "असं काहीही होत नाहिये. बहुदा आपल्याला दु:स्वप्न पडले असावे. किंवा आता उठल्यावरही तोच भास होतोय." असं समजावलं. दुसर्या कुशीवर झोपायला सांगितलं. आणि काय गंमत! तो तसा दुसर्या कुशीवर झोपल्यावर आग कशी एकदम गायब झाली! समोर नुसतीच भिंत! काही चिंताच नाही. आगीच्या ज्वाळाही नाहित.
फक्त काही किंकाळ्यांचा वगैरे त्रास होत होता. तेवढ्यापुरता तो त्रास त्याने स्वतःपुरता मिटवला. कानात बोळे घालून!
.
आता कसं सारं शांत शांत होतं!कुठे आगही नाही आणि कुठे किंकाळ्याही नाहित. सारं कसं शांत शांत.
स्मशानशांततेकडे वाटचाल करणारं!
--मनोबा
प्रतिक्रिया
16 Mar 2013 - 5:23 pm | दादा कोंडके
छान.
हे वाचून एक शेर आठवला,
किस कदर खुश नजर आते है मेरे शहर के लोग,
शायद किसीने अखबार अखबार पढा न हो जैसे.. (चुभूदेघे)
16 Mar 2013 - 6:44 pm | पैसा
माणसाला अस्वस्थ वाटायला देत नाही!
16 Mar 2013 - 6:47 pm | आतिवास
तोही एक उपाय असतो - अज्ञानातून म्हणा की हतबलतेतून म्हणा की 'मला काय त्याचे' या गुर्मीतून म्हणा, की सवयीने म्हणा - पण जाणता-अजाणता स्वीकारला जाणारा! त्याचा शेवट मग असाच ठरलेला असतो!
20 Mar 2013 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
@'मला काय त्याचे' या गुर्मीतून म्हणा,>>> +++१११
16 Mar 2013 - 8:22 pm | राही
स्वप्न,सुषुप्ती,जागृती अशा तीन अवस्था आहेत म्हणे. सर्वांना जागृती हवीच असते,पण ती सुषुप्तीत पाहिलेल्या स्वप्नातली आहे की जागृतीत पहात असलेले स्वप्न आहे हे न कळल्यामुळे ते सदैव निद्रेत असल्यासारखेच वागत असतात.
20 Mar 2013 - 10:07 pm | मन१
@दादा कोंडके :- शेर भारिच.
@पैसा तै :- यप्स. गुंगीत सारेच क्से खुश. सारेच कसे शांत.
@ आतिवास तै :- निरुपाय :(
@राही :- काहिंना जाग आल्यावरही कानात बोळे घालायला आवडतात.