आज भेटायचे ठरले होते आपले किनार्यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
तुझ्या पायाखालची वाळू
तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती
तुला ती हुळहुळ सतावत होती
वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी
पण इतक्यात तू येणार्या लाटेत
आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच
तिला वाट पाहायला लावत होतो
म्हणून असेल बहुतेक
नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता,
म्हणून कदाचित
माहित नाही नक्की काय ते
पण त्याच्या लाटा अजूनच
उग्रपणे किनार्यावर आदळत होत्या
.
कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो
तुझा हात धरून तुला मागे ओढले
मला पाहताच तू लटक्या रागाने
ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस
.
यु आर लेट यु फुल!!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.
प्रतिक्रिया
4 Mar 2013 - 8:30 am | फिझा
ही कविता खरंच जीवघेणी आहे .....आधी वाचली आहे ....आजही तितकीच नव्याने वाचली ............खुपच सुंदर !!!!शब्द नाहीयेत.... प्रतिसाद काय देऊ कवितेला !!!
4 Mar 2013 - 8:51 am | प्रीत-मोहर
आवडेश :)
4 Mar 2013 - 8:55 am | नगरीनिरंजन
आवडली!
4 Mar 2013 - 8:57 am | किसन शिंदे
यु आर लेट यु फुल!! :)
4 Mar 2013 - 9:18 am | प्रचेतस
जबरी रे मिका
4 Mar 2013 - 9:33 am | अग्निकोल्हा
.
4 Mar 2013 - 10:48 am | अनिदेश
सुन्दर लिहिलय....!!!:)
4 Mar 2013 - 10:56 am | पैसा
मस्त! लै आवडली!
9 Mar 2013 - 10:48 am | अस्मी
खूपच आवडली..!!
4 Mar 2013 - 11:03 am | गवि
लव्हली... झकास.. कविता हा प्रकार न आवडणार्यांनी अशा कविता वाचाव्यात.
बाकी "तुझ्या" आणि "तिच्या"चा नेहमीचा घोळ इथेही घातला आहेसच.. पण कविता सुंदर असल्याने तिकडे दुर्लक्ष..
4 Mar 2013 - 11:02 pm | उगा काहितरीच
+1
4 Mar 2013 - 11:21 am | ई-पूर्वाई
आपण खूपच छान लिहिता.
4 Mar 2013 - 11:38 am | ५० फक्त
चांगली कविता,
ती बहुधा त्याची ऑफिसातली बॉस असावी असा संशय आहे.
4 Mar 2013 - 11:48 am | michmadhura
खूपच आवडली.
4 Mar 2013 - 12:36 pm | संजय क्षीरसागर
मिका, क्या बात है!
तुझमे समाना तो था मेरी जां आखोंके रस्ते
तू मुझमें समा गयी मुझसे पहेले दिलके रस्ते
मैं सोचता रहा ये कैसे अंदाज ये क्या जादू है तू
आशिकीका सिलसिला मुझसे पहलेही पहेचाने है तू
4 Mar 2013 - 12:42 pm | बॅटमॅन
कविर्मिका कविर्मिका कविर्मिका न संशयः!!!!
4 Mar 2013 - 12:48 pm | निवेदिता-ताई
मस्तच
4 Mar 2013 - 12:56 pm | गवि
देवळाच्या थंड काळ्या दगडाने कळ लागलेले पाय
अन कापराअंगार्याचा गंध अंगभर लेवून
मी दगडाच्याच देवाकडे तिला मागितली,
अगदी डोकं टेकून..
एरवी कधी एका शब्दानेही बोलत नाही..
पण आज तोही म्हणाला ... यू आर लेट यू फूल..
.....................
हे आपलं उगीच चांगल्या कवितेला ठिगळ..
4 Mar 2013 - 12:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह, सार्थकी लागली कविता...
4 Mar 2013 - 2:08 pm | दादा कोंडके
मस्त. कविता आणि गवींचं कडवं दोन्ही आवडलं.
4 Mar 2013 - 4:11 pm | अनिदेश
वा गवि...चार चांद लावले कवितेला. :)
4 Mar 2013 - 7:05 pm | सुधीर
हायला! गवी तुम्हीपण शोलीट.
4 Mar 2013 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
हलवलेस आतून...
4 Mar 2013 - 1:03 pm | नानबा
भन्नाट रे मिका.. एकेक शब्द वाचताना डोळ्यांसमोर चित्र उभं राहत गेलं. निव्वळ अप्रतिम... :) विशेषतः
हे वाचून माझ्या आयुष्यातला असाच एक क्षण डोळ्यांसमोर तरळला.. कमाल कविता...
4 Mar 2013 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा
या वेळी आंम्हाला समुद्रच जास्त भावला ! :-)
4 Mar 2013 - 1:23 pm | कवितानागेश
आहा! :)
4 Mar 2013 - 5:16 pm | प्यारे१
..........
(आमच्या शब्दांची ठिगळं नकोत) :)
हॅट्स ऑफ!
4 Mar 2013 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
(आमच्या शब्दांची ठिगळं नकोत)
+१०० !
4 Mar 2013 - 5:26 pm | रेवती
क्या बात है| कविता आवडली.
4 Mar 2013 - 5:29 pm | अधिराज
एकदम मस्त! रुमानी!
4 Mar 2013 - 6:32 pm | तिमा
कधीकाळी आपणही तरुण होतो त्याची आठवण झाली.
4 Mar 2013 - 6:58 pm | मस्त कलंदर
झक्कास!!!
4 Mar 2013 - 7:01 pm | सुधीर
आवडली. लाईक करण्याजोगीच आहे. काहीवेळेला वाटलं अरर्! आपल्यावरच तर नाही ना केली? अॅम ऑलवेज लेट एण्ड फूल.
4 Mar 2013 - 7:08 pm | क्रान्ति
कविता कशी असावी?
कविता अशी असावी :)
फुलपाखराच्या पंखांचा निसटता स्पर्श व्हावा, तशी तरल कविता!
4 Mar 2013 - 7:43 pm | मृत्युन्जय
खासच.
4 Mar 2013 - 8:28 pm | मराठे
मस्त! आणि गविंच्या ठिगळाने एक वेगळंच अस्तर उलगडून दाखवलंय!
4 Mar 2013 - 8:39 pm | लौंगी मिरची
सरत्या आयुष्याला मागे वळुन पाहाताना
टोचलेल्या काट्याचं कुरुप झालय आता
सैरभैर होउन तुला पाठमोरी पहात राहिलो
तुला निघुनच जायचं होतं पण तरिहि क्षणभर थांबलीस
डोळ्यात आलेल्या पाण्याशीच कुजबुजलिस
यु आर टू लेट ... यु फुल !
अतिशय सुंदर कविता मिका . लिहित रहा.
4 Mar 2013 - 10:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
वाह, सुंदर...
5 Mar 2013 - 12:14 am | संजय क्षीरसागर
छान.
5 Mar 2013 - 8:56 am | प्रीत-मोहर
मला कवितेइतकच हेही भावल ..
22 Jan 2016 - 2:17 pm | शब्दबम्बाळ
अतिशय सुंदर कविता आणि त्यावर आलेले एक से एक प्रतिसाद...
मझा आ गया! :)
4 Mar 2013 - 8:47 pm | धन्या
कवितेबद्दल काही लिहिण्यासारखं नाही. ही फक्त पोच एका सुंदर कवितेला.
4 Mar 2013 - 8:57 pm | अनन्न्या
वरच्या नंबरवर ठेवण्यासाठी!! खरच खूप सुंदर कविता!!
5 Mar 2013 - 5:16 am | स्पंदना
कितीदा वाचली. पण आत अस काही हुरहुरतय, की काही लिहावसच वाटत नाही.
5 Mar 2013 - 10:03 am | निनाद
तरल गझलेच्या वळणाने जाणारी आहे - मस्त!
खूप आवडली...
5 Mar 2013 - 10:10 am | स्पा
जबराट रोम्यांटिक झालीये राव
हायला कालेजात अशा कविता पोरींना ऐकवल्या असत्यास तर रे .... ;)
5 Mar 2013 - 11:41 am | मोदक
मस्त फोटो रे स्पाऊ.. या घे फोटोवरून काही ओळी..
माझी वाट पाहून नकळत.
तू स्वतःला स्वतःच्या मिठीत घेतलेस..
तिथे रेंगाळणारा वारा थोडासा सुखावला.
ओलसर वाळूमध्ये भिजणार्या तुझ्या नाजूक पाऊलांना पाहून
चुकार लाटा अधीरतेने किनार्याकडे झेपावल्या..
त्या नाजूक ओलसर पाऊलांशी विरणारी एक लाट मागच्या लाटेला म्हणाली..
यु आर लेट यु फुल!
5 Mar 2013 - 2:18 pm | इनिगोय
चेरी आॅन द केक..!
मस्तच मूड पकडलास रे मोदका..
5 Mar 2013 - 2:28 pm | प्रीत-मोहर
मस्तच
5 Mar 2013 - 2:34 pm | अक्षया
अप्रतीम लिहिले आहे.. :)
5 Mar 2013 - 2:51 pm | संजय क्षीरसागर
मोदका, सिरियसली, ...मला वाटलं मिकानंच फोटोवर कविता केली!
5 Mar 2013 - 8:49 pm | मोदक
धन्यवाद हो संक्षी..
:-)
5 Mar 2013 - 11:44 am | स्पा
माय्ला
मोदका ... तू पण
मिका ,माझा पण क्लास घे रे आता
5 Mar 2013 - 2:34 pm | शैलेन्द्र
मस्त , खुप आवडली
5 Mar 2013 - 2:42 pm | शिद
प्रतिसाद देण्यास उशिर केला म्हणुन मीच मला म्हणतोय...यु आर टू लेट...यु फुल!!!
अप्रतिम कविता...!!!
5 Mar 2013 - 3:50 pm | पियुशा
मिकाभाउ तुस्सी छा गये :)
5 Mar 2013 - 4:45 pm | सुहास झेले
भन्नाट....
5 Mar 2013 - 5:00 pm | श्रिया
वाह मिका वाह! काय सुरेख लिहिली आहे कविता.
5 Mar 2013 - 9:13 pm | विलासराव
+१
6 Mar 2013 - 12:31 am | Sujata Kulkarni
मस्त!! खरच छान!
6 Mar 2013 - 12:35 am | अनुजा कुलकर्णी
अप्रतिम. खूप आवडली आहे.
धन्यवाद
6 Mar 2013 - 8:32 am | मनीषा
अतिशय सुंदर .... !
6 Mar 2013 - 10:28 pm | उपास
आवडलीच..
7 Mar 2013 - 12:18 am | मीराताई
आहा. फार सुंदर.
7 Mar 2013 - 11:43 am | तुमचा अभिषेक
7 Mar 2013 - 11:46 am | तुमचा अभिषेक
कविताशी आपले कधी जमलेच नाही, पण असा मूड पकडणारी असेल तर आवडलीच :)
18 Mar 2013 - 1:26 am | पाषाणभेद
खुपच सुंदर काव्य मिका
18 Mar 2013 - 4:34 pm | हरिप्रिया_
मस्त!!
पुन्हा पुन्हा वाचली...
18 Mar 2013 - 5:20 pm | इशा१२३
छानच!
19 Mar 2013 - 11:37 am | हारुन शेख
मनातले तरल भाव व्यक्त करणारी सुंदर कविता. प्रतिसादसुद्धा एकापेक्षा एक अप्रतिम.
19 Mar 2013 - 9:20 pm | यसवायजी
भारी
22 Mar 2013 - 10:18 am | धमाल मुलगा
डिस्क्लेमर : मला काव्यप्रांतातलं शष्प काही कळत नाही हे जगजाहीर आहेच. पण तरीही मताची पिंक टाकण्याचा मोह आवरणं एक मनुक्ष्य म्हणून अशक्य झाले म्हणून पचकत आहे. :)
मिक्या, बेट्या, कविता वाचल्यावर राहून राहून संदीप्-सलीलच्या गाण्यांच्या रचना असतात तशी असल्याचा फील येऊन राहिलाय भैय्या! का कोण जाणे, पण संदीप-सलीलच्या "पाऊस असा...." च्या चालीत ही कविता बसेलसं वाटलं :)
चुभूदेघे!
7 Aug 2015 - 3:20 pm | अर्थहीन
अहाहह... क्या बात है... हलुवार प्रवेश केला कवितेने मनात...
7 Aug 2015 - 3:35 pm | प्यारे१
पुन्हा एकदा कट्यार काळजात घुसली!
गवि, मोदक नि आणखी कुणीतरी ती आणखी आत रुतवली.
ते मिक्या कवितासंग्रहाचं कधी डोक्यात घेतंय कुणाला माहिती.
अर्थहीन या आयडीचे कविता वर काढल्याबद्दल आभार.
22 Jan 2016 - 1:00 pm | प्रमोद देर्देकर
अरे वा इतकी सुंदर कविता. अप्रतिम.
गविंप्रमाणेच चांगल्या कवितेला आमचंही ठिगळ..
प्राजक्त सड्यावर तु अस्ताव्यस्त पहुडलेली,
ओंजळी भर फुलं तुझ्यावर उधळण्यासाठी हळुवार पावलांनी पुढे झालो,
पण तिथेच रेंगाळणार्या वार्याने जोर केला अन्
झाडावरची सगळी फुले तुझ्यावर बरसली,
तुझ्या तनुवर विसावलेल्या ,
त्या फुलांनी हसुन वेडावत मला म्हंटले ,
यु आर लेट यु फुल!
22 Jan 2016 - 1:44 pm | प्राची अश्विनी
छान कविता, आवडली.
22 Jan 2016 - 2:30 pm | रातराणी
!!!
22 Jan 2016 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता वाचली होती, आवडलीही होती, पण प्रतिसाद द्यायला लेट झाला.
मिका लिहितोच जीवघेणे.
आजकाल मिकाशेठ कुठे गायबलेत कोणजाणे?
पैजारबुवा,
22 Jan 2016 - 4:24 pm | बोका-ए-आझम
कविता करण्याजोग्या अनेक भेटल्या
पावसातही अनेक विकल्या
पण जेव्हा ती भेटली तेव्हा मी नि:शब्द झालो
काहीच न बोलता स्तब्ध झालो
भानावर आलो तेव्हा ती निघून गेलेली
अाणि उदासवाणा अासमंत मला म्हणाला
यू आर लेट यू फूल!
- (काव्याळलेला मिसळप्रेमी) बोका
22 Jan 2016 - 4:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
जेवढ्या भेटल्या त्या सगळ्या का विकल्या? एखादी स्वत:साठी ठेवायची ना.
व्याजासकट डबल, ट्रिपल झाली असती आतापर्यंत गुंतवणुक.
मराठी माणुस इथेच मार खातो
पैजारबुवा
23 Jan 2016 - 8:29 pm | मित्रहो
सुंदर कविता
28 Jan 2022 - 9:47 pm | सनईचौघडा
आज पुन्हा पाच वर्षांनी ही कविता वर काढतोय.
जे मीपावर नवी आहेत त्यांना वाटायला नको की
"यु आर लेट यु फुल "
सध्या मिकाभाऊ कुठं गायबलेत कुणास ठाऊक?
29 Jan 2022 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार
हा इसम सध्या कविता का बरे लिहीत नाही? लिहित असेल तर इकडे का टाकत नाही? हा प्रश्र्ण मलाही बरेच दिवसांपासून पडला आहे
पैजारबुवा,
29 Jan 2022 - 2:30 pm | श्रीगणेशा
खूप सुंदर!
उशीरा का होईना पण वाचायला मिळाली.
धन्यवाद सनईचौघडा, धागा वरती आणल्याबद्दल!
30 Jan 2022 - 1:55 am | मिसळलेला काव्यप्रेमी
८ - ९ वर्षांनंतरही आपली एखादी कविता आपल्या मित्रांच्या लक्षात राहिलीय ह्याच खरंच खूप समाधान वाटतं.
आताशा इतकं तरल सुचत नाही, पण सुचलं तर प्रथम इथेच घेऊन येणार मी.