मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
26 Feb 2013 - 7:48 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664

तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' .... पुढं

आई तो एकच शब्द बोलुन निघुन गेली, बराच वेळ मी जागी होते पण शेवटी रात्री आईनं जेवणात ज्या औषधी घातल्या होत्या त्यांचा परिणाम मला जाणवायला लागला, मला झोप लागली. पहाटे नुकतंच उजाडायला लागलं तेंव्हाच जाग आली. रात्रभर न हलवल्यानं हात जड झाला होता. मी उठुन माझ्या खोलीच्या गवाक्षात आले, तिथुन मला सुर्योदय दिसत नाही, पण समोर न दिसणा-या सुर्यनारायणाच्या आगमनानं सगळं आकाश रंगुन गेलेलं पहायला मला नेहमीच आवडायचं. आज सुद्धा मी तसंच पाहात उभी होते गवाक्षाजवळ, तेवढ्यात सखीनं बाबा येणार असल्याची सुचना दिली. मी अंगावरचे ओघळलेली वस्त्रं सावरली. केसातली सुरकुतलेली फुलं काढुन टाकली.

बाबा आत आल्यावर त्यांच्या पाया पडुन एका बाजुला उभी राहिले. बाबा एका आसनावर बसुन होते. ' बाळा, आजपासुन मी स्वयंवराची आमंत्रणं करण्यासाठी निघतो आहे. आसपासच्या काही महत्त्वांच्या जनपदांमध्ये प्रत्यक्ष जाणं फार गरजेचं आहे. ' या वर मी काही बोलावं असं काहीच न समजल्यानं मी पलंगाच्या कडेला हात धरुन निश्चल उभी राहिले. दोन क्षणांच्या शांततेनंतर पुन्हा बाबा बोलले ' याच प्रवासात तुझ्यासाठी सुद्धा योग्य वर पहावा अशी माझी इच्छा आहे, आणि एक पिता म्हणुन मी तुझा विचार घेण्यासाठी आलो आहे याबाबतीत, तुझी काही इच्छा किंवा काही अट आहे विवाहासंदर्भात.'

हात पाय थरथरत होते, मैत्रिणिंबरोबर विवाहाबद्दल गुजगोष्टी करणं, आई आणि काकु आमच्या विवाहाच्या चर्चा करत असताना त्यांच्या मागं पुढं फिरुन लाड करुन घेणं अन हे असं बाबांनी स्पष्ट विचारणं, मी तशीच मान खाली घालुन उभी राहिले. भीती, उत्सुकता, आनंद आणि लज्जा ह्या सगळ्या भावना एकदम माझ्या मनात फेर धरुन होत्या. शेवटी सुटका बाबांनीच केली ' बरं, मी समजु शकतो तुझी मनस्थिती, आता निघतो मी पण बरोबर मध्य प्रहराला आम्ही निघणार आहोत, तोपर्यंत काही सांगायचं असेल तर मला सांग, आणि हो काही नसेल तुझ्या मनांत तर तसंही कळव, मग मी माझ्या या लाडक्या लेकीसाठी योग्य असा एक वर निवडुन आणतो. जसं या घरात सुख अनुभवलं आहेस तसंच सगळं आयुष्यभर अनुभवशील याची काळजी तुझा हा पिता निश्चित घेईल, चिंता करु नकोस. ' एवढं बोलुन बाबा आसनावरुन उठले तोच माझ्या तोंडातुन शब्द निघाले 'मला पती क्षत्रियकुळातलाच हवा, आणि तो देखील पराक्रमी, सर्व शस्त्रनिपुण असाच' आपल्या गुड्घ्यांवर जोर देत बाबा उठुन माझ्याकडं आले, डोक्यावर हात ठेवत म्हणाले ' बाळा तुला उदंड आयुष्य लाभो' आणि निघुन गेले.

सकाळची आन्हिकं आवरुन आम्ही स्वयंपाकघरात एकत्र येण्याआधी देवघरात जाउन प्रार्थना केल्या. ते धनुष्य कालपासुन देवघरातच ठेवलेलं होतं. त्याच्या दोन्ही वक्रांवर लावलेले चंदन आणि कुंकवाचे पट्टे त्याच्या असामान्यतेत भरच घालत होते. त्याची प्रत्यंचा मात्र एका बाजुला गुंडाळुन ठेवलेली होती. देवासमोर हात जोडताना नकळत त्या धनुष्यासमोर सुद्धा हात जोडले गेले. स्वयंपाकघरात आई आणि काकु, बाबांच्या बरोबर जे पदार्थ द्यायचे होते त्यांची तयारी करत होत्या. ताई, मी आणि धाकट्या दोघी त्यात गुंतलो. मध्य प्रहराला थोडासाच वेळ होता तेंव्हा प्रवासाला दिले जाणारे पदार्थ बाहेर मागवले गेले. थोडा वेळ फार लगबग झाली, आचारी, दास, सखी यांचा थोडा गोंगाट झाला आणि मग सगळंच एकदम शांत झालं. कालचा सोहळा पार पडल्यानंतर कुलगुरुंनी ताईच्या स्वयंवरासाठी दिवस ठरवुन दिला होता. अजुन दोन महिने होते मध्ये. पण घरात सगळीकडं त्याचीच चर्चा चालु होती, दास, सखी, भाट, ब्राम्हण आणि सैनिक सर्वांच्या तोंडी हाच एक विषय होता. ज्यांना ते धनुष्य त्या खोलीतुन देवघरात नेलं जात असताना पाहायची संधी मिळाली होती ते त्याचं वर्णन करुन इतरांना असं काही सांगत होते की बाकीच्यांनी त्यांच्या भाग्याचा हेवा करावा. आणि मग सर्वांनाच याचं आश्रर्य वाटायचं की असं काय आहे त्या धनुष्यात की त्याला प्रत्यंचा चढवणारा एवढा भाग्यवान असेल की तो या घरातल्या ज्येष्ट कन्येशी विवाह करु शकेल.

बघता बघता दिवस सरु लागले, ऋतु बदलत होता. त्या बरोबर आम्हा चौघींचे बोलण्याचे विषय सुद्धा. सुरुवातीला सख्यांकडुन रोज माहिती मिळायची की आज बाबा कोणकोणत्या जनपदांमध्ये जाउन आमंत्रण देउन पुढे निघाले आहेत, कुणी त्या आमंत्रणाचं सहर्ष स्विकार केला तर कुठं त्यांना नकाराला तोंड द्यावं लागलं, आणि मग अशा आमंत्रणं स्विकारलेल्या जनपदांबद्दल आम्ही बोलत असायचो. पण काही दिवसांत जसजसे बाबा बरेच लांब गेले तसतसं त्यांच्याबद्दल काही कळायला वेळ लागायला सुरुवात झाली, मग आमच्या बोलण्याचा विषय असायाचा तो स्वयंवराची तयारी. तशी तर घरात ती सुरु झालेली होतीच पण ते सगळं अगदी शास्त्रानुसार होतं. परंपरेनुसार होतं. काकु बराच वेळा ब्राम्हणांबरोबर बोलताना दिसे, काका मात्र आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या सेवकांना घेउन प्रत्यक्ष स्वयंवराची तयारी करण्यात गुंतलेले दिसत. आईकडं घरातली सगळी कामं होती. लांब लांबुन वेगवेगळ्या प्रकारचं धान्य कोठारांमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. त्या कोठारांच्या जवळुन जाताना एक वेगळाच गोडसा वास भरुन राहिलेला असे. न राहवुन एकदा मी तिथं गेले होते, त्या वासाच्या ओढीनं. तशी ही कोठारं वर्षभर भरलेली असायची, पण आता ती अक्षरशः ओसंडुन वाहात होती.

घराच्या मागच्या अंगणाला लागुनच असलेल्या गोशाळेजवळ अजुन एक मोठी गोशाळा उभी केलेली होती. जवळपासच्या ब-याच गावांतुन गाई आणि वासरं आणुन तिथं बांधलेली होती, दिवसभर त्यांच्या ग़ळ्यात बांधलेल्या घंटांचा किणकिणाट सगळीकडं भरुन राहायचा. त्यात देखील दोन भाग होते. एका बाजुला फक्त पांढ-या शुभ्र गाई अन त्यांची तशीच शुभ्र वासरं होती. तर दुस-या भागात सगळ्या वेगवेगळ्या गाईंचा गोंधळ असायचा. आम्ही रोज सकाळी देवघरातुन थेट तिथंच यायचो. प्रहरभर तिथं गाईंना चारा खाउ घालुन मग पुन्हा घरात परतायचो. एकदा विचारणा केल्यावर असं समजलं की त्या पांढ-या गाई या भेट देण्यासाठी आणलेल्या आहेत तर बाकीच्या दुध दुभतं पुरवण्यासाठी. नगरात सगळीकडंच अशी गडबड होती. सगळ्या उद्यानात वेगवेगळ्या आकाराचे अन रंगाचे मांडव उभे केले जात होते. स्वयंवराला येणा-या सर्वांसाठी ही राहण्याची व्यवस्था केलेली होती. या स्वयंवराच्या निमित्तानं आमची मिथिला हे आमचं एकच मोठं घर झालेली होती. नगरात प्रत्येक जण प्रत्येकाला सुचेल ते, सांगेल ते काम करत होता. नगरातल्या रंगमंदिरात दिवसभर नृत्य आणि गाण्यांचा सराव सुरु होता. दोन-तीन दिवसातुन एकदा तरी आम्ही तिकडं जायचो, पण तिथं जास्त वेळ थांबता येत नसे. त्या गणिकांच्या मे़ळ्यात आम्हाला कुणी पाहिलं तर काय ही भीती सगळ्यात आधी मलाच वाटायची.

अशातच एका स्वयंवराला मोजकेच दिवस बाकी होते, एका सकाळी आम्ही नगरदेवतेच्या मंदिरात एका पुजेसाठी निघालो होतो. मंदिर फार लांब नव्हतं. तेंव्हा नगराच्या एका बाजुस फार मोठा कोलाहल ऐकु येत होता. रणवाद्यं, माणसं आणि शस्त्रं सर्वच कसं भयकारी होतं. रथाच्या बाजुला असलेल्या सिंह प्रतिमेला मी गच्च धरुन उभी राहिले. रथाचे घोडे देखील एकदम बेचैन झाले, सारथ्यानं त्यांना चुचकारत तिथुन पुढं काढलं ' गेल्या आठ दिवसांत हा गोंधळ फारच वाढला आहे' सारथी सांगु लागला, ' स्वयंवराच्या वेळी जर कुणी काही आगळीक केली, आणि युद्ध प्रसंग उभा राहिला तर, त्याची तयारी सुरु आहे इथं ' मी ताईला विचारलं ' खरंच असं होईल का गं, स्वयंवराच्या वेळी येईल असा काही प्रसंग, की ज्याचा सामना करण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करावा लागेल आपल्याला.' रथाच्या अग्रभागी उभी राहिलेली ताई हसत होती ' एकतर त्या धनुष्याला प्रत्यंचा न चढवता आल्यानं होणारा अपमान आणि जनकासारख्या पराक्रमी राजाशी नातेसंबंध जुळवण्याची हुकलेली संधी एखाद्या क्षत्रियाला कोणत्याही थराला नेईल, म्हणुन ही तयारी केलेली बरी '

नगरदेवतेच्या देवळातली पुजा आटोपुन परत येताना देखील माझ्या मनात ह्या एका नविन भितिनं घर केलं होतं, क्षत्रिय, हा शब्द त्या रात्रीपासुन मला छळत होता. मी जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करायचे तेवढाच तो कोणत्यातरी अनपेक्षित दिशेनं येणा-या बाणासारखा माझ्याकडे यायचा. आणि तरी ही मला माझ्यासाठी क्षत्रिय पती हवा होता. आम्हां चौघींच्या शिक्षणात शस्त्र सिक्षणाचा भाग होताच पण गेली काही वर्षे त्याकडं दुर्लक्षच झालेलं. मुळात आजुबाजुच्या प्रदेशात तशी शांतताच होती, आमच्या राज्याच्या उत्तर पुर्वेच्या सिमांवर काही किरकोळ कुरबुरी सोडल्या तर फारशी युद्धजन्य परिस्थिती उदभवलेली नव्हती. त्यामुळंच तर हा युद्ध सराव आयोजिला होता. पुन्हा त्या सरावक्षेत्राजवळुन येताना मला जाणवलं. स्वयंवराच्या आधी चार दिवसांपासुन आम्हां चौघींना घराबाहेर जाण्याची बंदी घातली गेली, वाड्याला जास्तीचा पहारा बसवला गेला. अगदी देवघराच्या आजुबाजुला शस्त्रसज्ज सख्या दिसायला लागल्या, हे सारं पाहुन आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. बाहेरुन आत येणा-या सख्या आणि मैत्रिणिंच्या कडुन नगरात पोहोचलेल्या राजे आणि राजकुमारांच्या कथा कानावर यायच्या. कुठल्या मांडवात कोणत्या जनपदाचा राजा आहे, त्याचं वय काय, त्याचा तोरा कसा, त्याच्या सख्या कशा आहेत, त्याचे रथ कसे आणि किती, अश्वांचा रंग कसा आणि बरंच काही. आम्ही आमच्या दालनांतच दिवसभर बसुन असायचो. सगळी गवाक्षं तृणांच्या पडद्यांनी झाकुन घेतली गेली होती.

त्या दिवशी, त्या स्वयंवराच्या दिवशी मात्र सकाळपासुनच एक मोकळेपणा जाणवत होता, सगळं घर कसं आनंदलं होतं, आई, काकु, काका आणि बाबा सगळेच सकाळपासुन गडबडीत होते. आम्ही चौघी सख्यांकडुन श्रुंगार करुन घेण्यात गुंग होतो. ताईनं तिच्यासाठी सुवर्णरंगी वस्त्रं निवडली होती, माझ्यासमोर एकच पर्याय होता निलवर्णी रंवाची वस्त्रे नेसायचा. माझी तयारी त्यानुसारच चालु होती. हे सगळं चालु असताना आई माझ्या दालनात आली, तिच्या बरोबर आमच्या घरातली सर्वात वृद्ध दासी होती, पांढरे केस आणि सुरकुतलेली त्वचा, तरी देखील या समारंभासाठी गळ्यात घातलेले अलंकार हे थोडंसं विचित्रच वाटलं मला तरी. सनिष्ठा तिचं नाव. मी आईच्या पाया पडले, तिनं मला जवळ घेतलं अन बाकी सख्यांना दालनाबाहेर जाण्यास सांगितलं. मग मला एका चौरंगावर बसवुन स्वतः एका कोप-यात जाउन थांबली. सनिष्ठा माझ्यासमोर येउन, दोन्ही हात वरखाली झटकत माझ्या भोवती गोल फिरु लागली, दोन आवर्तनं झाल्यावर तिनं आपल्या मुठी उघडल्या, एका मुठीत काहीतरी होतं, दुस-या हातानं तिनं माझ्या चेह-यावरुन तिचा तो खरखरीत हात फिरवला अन पुन्हा दोन्ही हात एकमेकांवर ठेवुन दालनाबाहेर निघुन गेली. ती गेल्यावर आई, माझ्याकडं आली आणि पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, मी गोंधळलेल्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं हसत हसत ती म्हणाली ' कळेल तुला तु आई झालीस म्हणजे ' तेवढ्यात बाहेर गेलेल्या सख्या आत येत होत्या त्यांचं बोलणं ऐकु आलं ' फार वेळ लागेल त्याला, एवढं सोपं नसतं ते '

कथासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Feb 2013 - 11:54 am | प्रचेतस

मस्त हो ५०.
खिळवून ठेवणारी लेखनशैली. इतका वेळ लावू नका हो एकेक भाग टाकायला.

पैसा's picture

26 Feb 2013 - 12:24 pm | पैसा

पुढचा भाग पटापट लिही!

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2013 - 12:25 pm | संजय क्षीरसागर

वेगळं वातावरण निर्माण करणारी शैली आवडली!

अग्निकोल्हा's picture

26 Feb 2013 - 1:45 pm | अग्निकोल्हा

घटना जणु नुकत्याच घडल्यात असंच वाटत राहतं. लेखनशैली युगंधर, मृत्युंजय पध्दतिने व्यक्तिरेखांच्या मनामधुन सभोवताली घडणार्‍या घटनेचा मागोवा घेत घेत पुढं सरकणारी... लेखन प्रयोगशिलता मस्तच.

सस्नेह's picture

26 Feb 2013 - 1:51 pm | सस्नेह

वाचतेय...येउद्या.

हा भागही उत्तम जमलाय एकदम. पुढच्या भागाची उत्सुकता मस्त वाढलीय!!!

घडणार्‍या प्रत्येक घटनेचे आपण मूक साक्षीदार आहोत, असं वाटतं वाचताना. उर्मिला छान उलगडतेय.

किसन शिंदे's picture

26 Feb 2013 - 4:04 pm | किसन शिंदे

मस्तच!!

एवढा वेळ का लावताय हो ५० राव?

आणि खाली ते क्रमशः का बरं नाहीये.??

अनन्न्या's picture

26 Feb 2013 - 4:29 pm | अनन्न्या

पुढचा भाग यायला!!

प्यारे१'s picture

26 Feb 2013 - 7:33 pm | प्यारे१

टप टप येऊ द्या हो! वाचतोय

प्यारे१'s picture

1 May 2013 - 12:01 am | प्यारे१

@ डिअर ५० फक्त राव,

यु आर हिअर बाय जेन्टली रिमाईन्डेड टु प्लिज रीलिज द नेक्स्ट पार्ट ऑफ द सेरिज अ‍ॅट अर्लिएस्ट.

विथ वॉर्म रिगार्ड्स,

प्यारे१

चित्रपट चालू असावा असे वाटत आहे. अगदी गुंतवून ठेवणारी लेखनशैली.

स्पंदना's picture

27 Feb 2013 - 4:26 am | स्पंदना

हात पाय थरथरत होते, मैत्रिणिंबरोबर विवाहाबद्दल गुजगोष्टी करणं, आई आणि काकु आमच्या विवाहाच्या चर्चा करत असताना त्यांच्या मागं पुढं फिरुन लाड करुन घेणं अन हे असं बाबांनी स्पष्ट विचारणं, मी तशीच मान खाली घालुन उभी राहिले. भीती, उत्सुकता, आनंद आणि लज्जा ह्या सगळ्या भावना एकदम माझ्या मनात फेर धरुन होत्या

बरेच खोलवर शिरलात स्त्री मनाच्या. एकुण लेखात, लेखकाची काळाच्या पडद्याआड पहायची ताकद जाणवते.
सुरेख!

इनिगोय's picture

30 Apr 2013 - 11:40 pm | इनिगोय

तीसी ताकु ठेगे लीहो??

इनिगोय's picture

30 Apr 2013 - 11:41 pm | इनिगोय

तीसी ताकु ठेगे लीहो??

मस्त झालाय हा पण भाग... पुढचा भाग लवकर टाका...

कविता१९७८'s picture

3 Mar 2017 - 4:02 pm | कविता१९७८

खुपच छान लेखन