ट्रेडींग करताना स्टॉपलॉस कसा लावावा?
शेअरबाजारात होणारे संभाव्य नुकसान कमीतकमी राखण्यासाठी अनुभवी ट्रेडर्स स्टॉपलॉसचा प्रभावी वापर करतात- हे आपणाला माहितच आहे. एकाच ट्रेडमध्ये मोठे नुकसान करून घेवून बाजाराला रामराम ठोकणा-या ट्रेडरपेक्षा अनेक ट्रेडमध्ये किंचित नुकसान घेणारा ट्रेडर बाजारात अधिक काळ टिकून राहू शकतो. मोठ्या फायद्याची संधी त्यालाच मिळत असते. साधारणपणे डे-ट्रेडच्या बाबतीत जास्तीत जास्त १% ते २% नुकसान ही मर्यादा पाळण्याची पद्धत आहे. मात्र हा स्टॉपलॉस नेमका कसा आणि कुठे लावावा याबाबत मात्र काही जणांच्या मनात शंका वा अस्पष्टता असल्याचे जाणवते. अनेक प्रकारे स्टोपलॉस लावता येतो मात्र सर्वात सोपा प्रकार आधी बघुया -
स्टॉपलॉस लावण्याचे कारण म्हणजे आपले नुकसान मर्यादित ठेवणे - हे कारणच आपल्याला स्टॉपलॉस कुठे लावावा याविषयी मार्गदर्शन करत असते. समजा आपण १०० रु.चे १००० शेअर डॆ-ट्रेडिंग करण्यासाठी घेतले म्हणजेच या सौद्यामध्ये एक लाख रु.लावले आहेत. अर्थातच शेअरची किंमत वाढून किमान २ ते ५ रुपयांची वाढ आपल्याला अपेक्षीत आहे. म्हणजेच २००० ते ५००० रु.चा फायदा अपेक्षीत आहे. मात्र बाजार हा बेभरवशी असल्याने काही वेळाने त्या शेअरची किंमत घसरू लागते. आपण काही वेळ वाट बघण्याचे ठरवतो. काही वेळाने किंमत अधिकच कमी होवू लागते. एव्हाना फायदा सोडाच पण नुकसान कमी कसे करता येइल हेच आपले उद्दिष्ट बनते. या मानसिक आंदोलनांमध्ये नुकसान वाढत जाते आणि आपले भांडवल कमी होत जाते. हा सर्व प्रकार (विशेषत: मानसिक) टाळण्यासाठी खरेदी वा विक्रीच्या वेळीच स्टॉपलॉस लावणे अति-आवश्यक आहे. ट्रेड करण्याआधी, किती नुकसान झाल्यास आपण आणखी व्यवहार करण्यासाठी (आर्थिक व मानसिकदृष्ट्या) सक्षम राहू हे ठरवावे लागेल.
समजा एक लाखाच्या व्यवहारात आपल्याला १००० रु. ते १५०० रु.पेक्षा जास्त नुकसान परवडणार नसेल, तर व्यवहाराचे वेळीच ९९ वा ९८.५० येथे स्टॉपलॉस लावावा. येथे फक्त आपल्या नुकसान झेलण्याच्या मर्यादेचा विचार करण्यात आला आहे. मात्र काही वेळेला इतका कमी स्टॉपलॉस लावून चालत नाही, कारण त्या विशिष्ट शेअरची सामान्य हालचालच २ ते ३ रु.ची असू शकते- अशा वेळी ९९ रु.चा स्टॉपलॉस हिट होवून नंतर किंमत परत वाढू शकते. अशा वेळी काय करावे? याकरता आपण ज्या शेअरमध्ये ट्रेडींग करणार आहोत त्या शेअरची किंमत ही सामान्यपणे किती मर्यादेत वर-खाली होत असते, त्याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. बाजारात ज्यांचे मोठ्या संख्येने शेअर्स आहेत म्हणजेच ज्यांची इक्विटी जास्त असून शेअरची दर्शनी किंमत १ रु. असेल तर अशा शेअरमध्ये होणारी हालचाल मंद असते. मात्र असे शेअर सुरक्षीत असले तरी त्यात फायदा मिळण्याची शक्यताही कमी असते.
स्टॉपलॉसचा दुसरा प्रकार म्हणजे सपोर्ट लेवलवर आधारित स्टॉपलॉस होय. यात त्या शेअरच्या त्यादिवशीची, अथवा आधल्या दिवशीची किंवा आठवड्याची सपोर्ट लेवल ठरवली जाते. ही लेवल निरीक्षणाने वा पिवोटपॉइन्ट वा ट्रेन्डलाईन्सच्या आधारे ठरवता येते, समजा वरील उदा.मध्ये ही सपोर्ट लेवेल ९८ रु. आहे तर त्यावेळी स्टॉपलॉस त्याखाली म्हणजे ९७.५० असा गरजेप्रमाणे लावता येइल. स्टॉपलॉस किती जवळ (TIGHT) लावायचा हे त्या शेअरच्या हालचालीवर आणि अनुभवाद्वारे ठरवता येते.
स्टॉपलॉस लावला आणि समजा काही वेळाने त्या शेअरची किंमत १०२ रु. झाली. ती किंमत १०३ अथवा १०४ होण्याची शक्यता दिसत आहे, मात्र खात्री नसल्याने मिळणारा फायदा काढून घ्यावा कि अधिक फायद्याची वाट बघावी हा नेहमी पडणारा प्रश्न ! अशा वेळी ट्रेलींग स्टॉपलॉस लावण्याची गरज असते. म्हणजेच शेअरची किंमत १०३ रु. झाली तर आपला स्टॉपलॉस हा १०२ वा १०२.५० असा सरकवावा, म्हणजे मिळालेल्या फायद्याचे संरक्षण करूनही अधिक फायद्याची वाट बघता येते.
एक उदाहरण बघुया. समजा माझ्याकडे एक लाख एवढे भांडवल आहे. एका १०० रु. किंमतीच्या शेअरमध्ये मी ट्रेड करण्याचे ठरवले. उपलब्ध भांडवलात मी एकूण १००० शेअर्सचे ट्रेडींग किंवा प्रत्येकी १०० शेअर्सचे १० ट्रेड करू शकतो.
( येथे मार्जिन ट्रेडींगचा विचार त्यातील धोक्यामुळे मुद्दामच केलेला नाही ) १% नुकसानाच्या मर्यादेनुसार मी प्रत्येक ट्रेडसाठी ९९ रु.चा स्टॉपलॉस लावला, तर ? हा छोटासा स्टॉपलॉस बरेचदा हिट होइल आणि माझे जवळ जवळ सगळेच ट्रेड नुकसान दाखवतील. मग मी काय करायला हवे ? मग मी १% ऐवजी २%चा म्हणजेच (९८ रु.ला) स्टॉपलॉस लावण्याचे ठरवले, मात्र माझी एकूण नुकसान झेलण्याची क्षमता १% एवढीच ठेवून हे कसे साध्य केले ? यावेळी हिशेब थोडा वेगळ्या पद्धतीने केला.-
१ लाख भांडवलाच्या १% नुकसान क्षमता म्हणजे १००० रु. नुकसान होय. म्हणून प्रतिशेअर २ रु. नुकसानाची मर्यादा लक्षांत घेऊन मी किती शेअर्सचे ट्रेड करु शकतो ते ठरवण्यासाठी १०००/२ = ५०० असा हिशेब केला. म्हणजे १लाख रु. भांडवल असताना आणि २% स्टॉपलॉससह मी जास्तीत जास्त ५०० शेअर्स चे ट्रेड करावे, त्यापेक्षा जास्त नाही. अशा पद्धतीने नुकसान मर्यादित राखूनही स्टॉपलॉस हिट होण्याचे प्रमाणही कमी होइल. परिणामी मी बाजारात अधिक काळ टिकून राहू शकेन. या उदाहरणात ब्रोकरेजचा विचार केलेला नाही. वरील उदाहरणात समजा प्रतिट्रेड फिक्स २५ रु.एवढे ब्रोकरेज असेल तर १०० शेअर्सच्या एका ट्रेडसाठी स्टॉपलॉस हा ९८.२५ येथे लावावा लागेल. ब्रोकरनुसार जे पर्सेन्टेज असेल त्याचा विचार करून प्रतिशेअर ब्रोकरेज काढावे.
हे उदाहरण डे-ट्रेडींगच्या संदर्भातले आहे. शोर्टटर्म ट्रेडींगसाठी स्टॉपलॉस हा साहजिकच थोडा मोठा असणार आहे आणि फायद्याचे प्रमाणही अधिक असणार आहे. अशाप्रकारे आपले संभाव्य नुकसान मर्यादित ठेवणारे ट्रेडर्सच यशस्वी होवू शकतात.
जागतिक किर्तीचा प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट याने सांगितलेले दोन नियम आपल्याला कायम मार्गदर्शन करणारे आहेत.-
नियम क्र.१) कधीही आपले नुकसान होवू देवू नका.( म्हणजेच मर्यादित ठेवा) नियम क्र.२) पहिला नियम कधीही विसरू नका.
प्रतिक्रिया
8 Nov 2012 - 4:13 pm | बॅटमॅन
मिपावर लेख लिहिताना संयम कसा ठेवावा?
8 Nov 2012 - 4:16 pm | संदीपसाठे
आभार ब्याटम्यान ! आपली ब्याटींग आम्हाला चकटफू पब्लिशिटी देतेय...
8 Nov 2012 - 4:31 pm | श्री गावसेना प्रमुख
ते बॅटींग नाय बॉलींग करतात्,समोरच्याला आउट करण्यासाठी.
तुमचा गोंधळ उडावा म्हणुन त्यांनी बॅटमन नाव ठेवलय.
8 Nov 2012 - 4:35 pm | संदीपसाठे
पयल्यांदाच आलोय हतं...कोन ब्याटमन आनि कोन बोलिन्गर ते कलेलच हलूहलू. कसा का अशेना आपल्याला ग्येम हवा.
9 Nov 2012 - 11:47 am | आप्पा
आवडले. असेच लिहित जा.
9 Nov 2012 - 4:15 pm | निश
संदीपसाठे साहेब, अतिशय अप्रतिम माहिति आहे हि.
खरच सुंदर लेख आहे. सर एक विनंती आहे टेक्निकल व फंडामेंटल ऐन्यालिसिस कस म्हंजे काय व ते कस कराव हे आपण सांगाल का? आणि परत ऐकदा फार सुंदर माहिती.
11 Nov 2012 - 11:38 am | वेताळ
धन्यवाद
11 Nov 2012 - 2:52 pm | ५० फक्त
मस्त माहिती, पण खरं सांगु एकदा बाजारात उतरलं, विशेषत डे ट्रेडिगला आणि त्याची चटक लागली की असल्या गोष्टी लक्षातच येत नाहीत. टेक्निकल अॅनॅलिसिसचा थोडा अभ्यास करुन त्यातुन बाहेर पडलो. पुन्हा एकदा त्या दिवसांची आठवण झाली. धन्यवाद.