पिउनी अमृत घेउनी संचित...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 Apr 2011 - 7:16 pm

गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार..

पाखरा जा.. (येथे ऐका)

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे..

'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं. मुळातच या गाण्याचा असलेला नंदसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा मुखडाच मन प्रसन्न करून जातो. राग नंद, छान-सुंदर अध्धा ताल, पुलंचा लडिवाळ आवाज, आणि तेवढीच उच्च गायकी. फारा वर्षापासून लिहायचं होतं मला या गाण्यावर..!

हे गाणं ऐकताना खरंच खूप कौतुक वाटतं पुलंचं. कारण हे गाणं ऐकायला जितकं साधं-सोपं वाटतं तेवढंच ते गाण्याकरता तसं सोपं नाही. पुलंच्या अनोख्या आणि उच्च दर्जाच्या गायकीचं दर्शन होतं आपल्याला. उभ्या महाराष्ट्राचं आणि खास करून पुलंचं दैवत असलेल्या नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार आणि त्यांची गायकी आपल्याला पुलंच्या या गाण्यात पुरेपूर दिसते. सुरेलपणा, लडिवाळपणा ही बालगंधर्वांच्या गायकीची ठळक वैशिठ्ये आणि तीच आपल्याला पुलंच्या या गायकीत दिसतात. नारायणराव बालगंधर्वांचा प्रभाव कुमारजी, मन्सूरअण्णा, भीमण्णा यांच्यासारख्या भल्याभल्या गायकांवर झाला; पुलंही त्याला अपवाद नाहीत.

प्रेमळ, शीतल छाया हे शब्द अगदी खास करून कान देऊन ऐकण्यासारखे. कुठेही उगाच खटका नाही, आघात नाही. 'छाया' शब्दातलं 'छा' हे अक्षर आणि त्या उच्चार अगदी मुद्दाम आवर्जून ऐकण्यासारखा..! नारायणराव असते तर त्यांनी 'छाया' हा शब्द अगदी अस्साच म्हटला असता!

हरितात्या मला सांगत होते,

"अरे हा पुरुषोत्तम पक्का गवई बरं का! गिरगाव ब्राह्मण सभेतल्या हरी केशव गोखले हॉलमध्ये असे आम्ही गाणं ऐकायला बसलेले. आमच्या शेजारी कोण बसलं होतं सांग पाहू? साक्षात नारायणराव बालगंधर्व! आणि हा देशपांड्यांचा पुरुषोत्तम गात होता. नारायणराव थक्क होऊन त्याचं गाणं ऐकत होते आणि तुला सांगतो तात्या, 'प्रेमळ शीतल छाया..' हे शब्द घेऊन पुरुषोत्तम 'पाखरा जा..' च्या समेवर असा काही आला की नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं हो! ते म्हणाले, 'देवा, पुरुषोत्तमा, काय सुरेख समेवर आलास..!'

'खोटं नाही, अगदी पुराव्याने शाबीत करीन..!' :)

पसरले विश्व अपार..

भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!

सुंदर शब्द, सुरेख अर्थ..!

रे पाखरा, नंदच्या स्वरांवर स्वार हो झकासपैकी, आणि घे पाहू भरारी या अफाट पसरलेल्या विश्वात! नंदची लडिवाळता, प्रसन्नता तुला साथ करील. जा जरा देवलोकात आणि त्यांनाही ऐकव जरा नंद! त्या बदल्यात परत घेऊन ये देवलोकातलं ते अमृताचं संचित..!

व्वा भाईकाका, 'भेदुनी गगनाला..' हा अंतरा रंगवतानाची तुमची गायकी मस्तच, अगदी कसदार! खरं सांगतो भाईकाका, तुम्ही खरे तर एक उत्तम गवईच व्हायचात. अजून काही काळ हिंदुस्थानी गायकीत पर्फॉर्मर म्हणून का नाही रमलात? अगदी भीमण्णांसारखा बडा ख्यालिया राहू देत परंतु मध्यलयीतल्या काही प्रचलित, अप्रचलित रागरागिण्या का नाही रंगवल्यात? अजून काही काळ तालिम का हो घेतली नाहीत कागलकरबुवांकडून, मंजिखांकडून वा मन्सूरअण्णांकडून? बेळगाव लौकर सोडलंत म्हणून, की लेखनामध्ये आणि एकपात्रीमध्येच अधिक रमलात म्हणून? :)

असो. तरीही खूप बरं वाटलं ती नंदतली तुमची लै भारी गायकी ऐकून. जीव तृप्त झाला. तुमच्या स्वभावानुसार एखाद्याला अगदी सहज प्रेमाने पाठीवर हात ठेऊन काही सांगावं, त्याच साधेपणानं आणि त्याच सात्त्विकतेनं तुम्ही पाखराशी साधलेला संवाद मनापासून आवडून गेला.

अजून काय लिहू? तुम्ही आयुष्यभर नारायणरावांच्या, मन्सूरअण्णांच्या गायकीचं भरभरून कौतुक केलंत. पण आज म्या पामराने तुमच्या गायकीचं हे मनमोकळं कौतुक करण्याचं हे धाडस केलं आहे, तेवढं गोड मानून घ्या इतकंच सांगायचं होतं..!

तुमचा,
तात्या.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

26 Apr 2011 - 10:14 pm | सुधीर१३७

वा, तात्या............. मस्तच लिहिलेत..................... भरुन पावलो. :)

वाटाड्या...'s picture

26 Apr 2011 - 11:12 pm | वाटाड्या...

वा..क्या बात है...

पु.लंचा आवाज आहे ? विश्वासच बसत नाहीये....पिऊनी अमॄतवर तर कडेलोट झाला असच म्हणावं लागेल...सहजगत्या आलेली तान तर खुपच सुरेख.

छान वाटलं बर्याच दिवसांनी ...दिवस कसा अगदीच रिकामा नाही गेला....

धन्यवाद तात्या...का धन्यवाद भाईकाका, पुल, पी.ल :)

- वाट्या

गणपा's picture

26 Apr 2011 - 11:54 pm | गणपा

टिपीकल तात्या टाइप. :)

प्राजु's picture

27 Apr 2011 - 8:41 am | प्राजु

तात्या इज ब्यॅक!!
नेहमीप्रमाणेच उच्च!! :)

किसन शिंदे's picture

27 Apr 2011 - 9:06 am | किसन शिंदे

गाणं ऐकायचयं तात्या..... घरी जाऊन निवांत ऐकेन.

आणी लेखाबद्दल बोलायचं झालचं तर मी काही बोलूचं शकत नाही. :)

धन्यवाद तात्या...

स्पंदना's picture

27 Apr 2011 - 11:39 am | स्पंदना

गाण आवडल.

पुलंसारखा अभिजात कलावंत आन तात्यांचे शब्द! सुन्दर!
मधीच घेतलेला हरी तात्यांचा आवेश ही अप्रतिम !

__/\__ तात्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Apr 2011 - 12:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नि:शब्द!! तात्या, आज मिपावर आल्याचे सार्थक झाले.

प्रास's picture

27 Apr 2011 - 12:49 pm | प्रास

तात्या, आज दिवस घडवलात बघा!

पुलंचं गारुड तसंही आमच्या मनातून उतरत नाही आणि त्यात हे असलं काहीतरी भन्नाट तुम्ही दिलंत तर...... पुढे काही बोलवतच नाही.

लेखाबद्दल तुमचे आणि गाण्याबद्दल श्री. रमताराम यांचे मनापासून आभार!

दिवसभर पुलंच्या आवाजातील पाखरासोबत भिरभिरणारा :-)

रमताराम's picture

27 Apr 2011 - 10:49 pm | रमताराम

जी.एं.चे शब्द चोरून सांगायचे तर अतिशय 'आतड्याने केलेले' लेखन. पु.ल. या माणसाबद्दल मला नेहमीच एक प्रकारचा हेवा वाटत आलेला आहे. एकाच वेळी भीमसेन, कुमार, वसंतराव, मन्सूर-अण्णा यासारख्या गायकांचे, बोरकरांसारख्या सौंदर्यवादी कवीचे, माधव आचवलांसारख्या पारखी व्यक्तीचे मैत्र लाभलेल्या या माणसाला पाहून एखाद्याच्या वाट्याला एवढे सुख यावे याचा हेवा वाटल्याखेरीज रहात नाही. अशा दिग्गजांच्या संगतीत राहिलेला हा माणून संगीत अक्षरश: जगला असावा. पण एक प्रकारच्या असुरक्षिततेची भावना असावी काय न कळे, ज्यामुळे सतत लोकसंग्रह करत राहिला. त्यासाठी काही स्वार्थांना नजरेआड करत राहिला. यात त्यांच्यातला परफॉर्मर उजळून गेला तरी त्यांच्यातील संगीतज्ञ कायम मागेच राहिला. पण जेव्हा तो समोर आला तेव्हा त्याने मला स्तिमित केले आहे. म्हणूनच त्यांचे 'रसिक हो' हे संगीतविषयक भाषणांचे/लेखांचे पुस्तक माझ्या दृष्टीने त्यांचे सर्वात आपुलकीने, ओलाव्याने केलेले लेखन आहे. It is not something played to the gallary, rather something germinated out of that covered seed which didn't prosper yet developed into most heavenly flower.

अवांतरः लेखामुळे आमचे आणखी एक अज्ञान दूर झाले. आम्ही हे गीत 'नट' रागातले आहे असे समजत होतो.

श्रावण मोडक's picture

27 Apr 2011 - 11:20 pm | श्रावण मोडक

प्रतिसाद आवडला!

विजुभाऊ's picture

27 Apr 2011 - 10:59 pm | विजुभाऊ

तात्या छान लिहीलेत.
पुलंची गाणी वाजवायला सुद्धा अवघड असतात.
वरवर सोप्पे वाटणारे " बाई या पावसाने" सारखे गाणे वाजवताना त्यातली खुमारी कळून येते.
तीच गोष्ट "इथेच टाका तंबू" या गाण्याची.
या दोन्ही गाण्यांबद्दल लिहा ना कधी तरी

रमताराम's picture

27 Apr 2011 - 11:10 pm | रमताराम

या गाण्याचे संगीत पुलंचे नाही, 'श्रीधर पार्सेकर' यांचे आहे.

बबलु's picture

28 Apr 2011 - 3:14 am | बबलु

उत्तम लेख.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2011 - 9:25 am | विसोबा खेचर

सर्व रसिक प्रतिसादींचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..

तात्या.

चौकटराजा's picture

29 Oct 2012 - 6:14 pm | चौकटराजा

११९२ साली मी सपत्निक दक्शिण भारताच्या सहलीला गेलो होतो. आमच्या बसमधे पुलंचे निकटचे मित्र वि भा देशपांडे हो होते. त्यानी पुलंच्या काही आठवणी कन्याकुमारी मुक्क्कामी मस्त रंगलेल्या "गच्चीवरील गप्पा" मधे सांगितल्या . त्याला एक प्रतिसाद म्हणून कोडईकॅनल च्या वाटेवर मी हे गीत " पाखरा जा त्यजूनिया " पुलंच्या लगावाची नक्क्ल करीत म्हटले होते.बसमधे या गीतात न रमणारी एक पिढी ही होती. त्यानी गाणे संपताच गलका केला "काका, काही तरी फास्ट म्हणा ! " मी लगेच चालू केले " हाय लाखों है निगाहोमे जिंदगीकी राहोमे सनम हसीन जवां " हे ही गीत संपल्यावर एक जण म्हणाला हे तर जुनेच आहे हो ... एक नवीन,,,,,, घ्या, मग "
सामने ये कौन आया दिलमे हुई हलचल हे गाणे म्हणावे लागले.

मैत्र's picture

29 Oct 2012 - 6:32 pm | मैत्र

तात्या. दिवस सार्थकी लागला. सगळ्या कटकटीतून अचानक मो़कळं आणि हलकं व्हावं तसं आनंदी वाटलं.

पुन्हा लिहिते व्हा.. अशा बहारदार मनस्वी लेखांची परत सवय लागू दे मिपाकरांना..