शांत स्वरात मिसळावा,अन एकच तरंग कानात घुमावा,
इतका सुरेख प्रवास व्हायचा शब्दांचा !
कधी तोच शब्द, तुझ्या माझ्यात ओठांचा आधार घेऊन,
अस्तित्व सिद्ध करायचा !
तर कधी, अबोल डोळ्यातल्या भावनेच्या स्वरूपात,
स्वता:ला पहायचा !
मी खरच हरवून जायची ,उताविळ नजरेनं,
तुझ्या नकळत तुझाच पाठलाग व्हायचा !
तुझ्या एकेक हालचालीवर,
शांत नजरेन लक्ष ठेवायची मी,
तुझं बोलन तुझं चालणं,
अगदी तुझं माझ्याकडे चोरून बघणं हि
मी मनमुराद लुटायची,पण मग कळलं,
कि तुलाही शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचाय !
तुझ्याही डोळ्यात, त्या अर्थाचे भाव तयार झालेत,
तुझ्याही ओठांवर त्या शब्दांना,
स्पर्शाच्या खुणा ठेवायची इच्छा आहे !
बाहेरच्या जगापासून, अलिप्त राहून बघ कधी कधी,
फक्त स्वता:तच गुरफटून बघ स्वता:ला !
मिटलेल्या डोळ्यात एक आकृती असते,
तिला माझं रूप देऊन बघ !
पडलेल्या प्रश्नाचं उत्तर ठरवून बघ मला !
ढगात लावलेली शून्यातली नजर, त्या नजरेच्या किनार्यावर,
फेसाळलेल्या पाण्यावर ,रुतलेल्या लाटांवर,
हलकेच खेळताना बघ मला !
शोधतानाही शब्द म्हणूनच शोध,
त्या शब्दात निसरड्या वाटेवरून,
घसरत जाणारी सळसळहि शोध !
काहीच नाही जमलं,
तर सरळ पाण्यात प्रतिबिंब बघ स्वता:च,
त्यावर बोटानी स्पर्श कर ,
एकामागुन एक तरंग उठतील,
थोडफार त्याना ऐकण्याचा प्रयत्न कर,
काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होतो त्यांच्याकडून ,
पण आपल्यालाच जमत नसतं, त्याना अनुभवणं.
निरागस असतो त्यांचा स्वर !
आणखी शब्दाना अनुभवायचं असेल,
तर ओलसर हिरव्यागार कांतीच्या पानावर,
थांबलेला एक शांत नितळ थेंब
एकटक एक नजर लाव त्याच्याकडे,
तो तुलाच आपला हात देईल ,
" घे ! एकदा स्पर्श कर ! सहवासाचे क्षण मलाही हवेत !
तुझ्या स्पर्शाने मीही ते अनुभवेन,
मलाही तुझ्या उबदार तळहाताच्या त्वचेशी बोलायचय
तुझ्या हातांच्या मुठीत,
क्षणभर स्वताहाला सगळ्यांपासून लपवून घ्यायचय !
थेंबांचे हेच शब्द तुझ्या कानावर पडतील,
त्यासाठी फक्त तुला,
डोळ्यांची भाषा वापरावी लागेल ,
तिला समजावी लागेल ,
डोळ्यानीच समजून द्यावी लागेल !
जमेल,
तुला नक्की जमेल !
शब्दांच्या पावसात भिजायला,
शब्दांवर प्रेम करायला,
तुला नक्की जमेल !!
प्रतिक्रिया
6 Sep 2012 - 8:17 pm | किसन शिंदे
निशब्द झालोय हे मुक्तक वाचून.!
7 Sep 2012 - 12:23 am | मोदक
किसन काका नि:शब्द का हो झालात? :-p
6 Sep 2012 - 9:50 pm | तर्री
अतिशय तरल व सुंदर !
6 Sep 2012 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा....बालिके...व्वा...!![](http://www.mimarathi.net/smile/congrats.gif)
7 Sep 2012 - 9:27 am | प्रचेतस
छान मुक्तक.
आवडले.
7 Sep 2012 - 9:31 am | अक्षया
छान मुक्तक..:)
आवडले..
7 Sep 2012 - 3:21 pm | मी_आहे_ना
आवडले
7 Sep 2012 - 9:22 pm | जेनी...
वाचक , सभासद , मुकवाचक सर्वाना धन्यवाद :)
7 Sep 2012 - 9:28 pm | पैसा
यावेळेला पूर्ण शुद्ध कविता पाहून आधी बरं वाटलं. मग कविता पण आवडली
7 Sep 2012 - 9:54 pm | जेनी...
शुद्ध क्यु ना हो मास्टरजी ...
एक पेपर के उपसंपादक ने एडिट करके जो दी हैं | ;)