विषय तसा थोडा नाजुकच. कितीही टाळायचा म्हटला तरी कधी ना कधी त्याला तोंड द्यावे लागणारच याची कल्पना ही होती. पण म्हणुन ती वेळ इतक्यातच येउन ठेपेल असा अंदाज नव्हता.
तस पाहिलं तर मागे 'थ्री ईडियट्स' पहातानाच (टायटलमध्ये स्पर्म्सची कार्टुन रेस दाखवली आहे ती पाहुन ) हे काय म्हणुन तिनं विचारलं. परत त्याच चित्रपटात शेवट जवळ येताना जो धुमाकुळ चालु होता तेव्हा ही चेहेर्यावर बर्याच प्रश्नचिन्हांचं जाळं पसरलेलं होत. त्यावेळी काही तरी थातुर मातुर उत्तर देउन टाळलं होतं. पण नांदी तेव्हाच झाली होती.
गेल्या आठवड्यात एका सॅनिटरी नॅपकीन ची जाहिरात पाहुन बराच काळ तुंबलेला प्रश्न बाहेर आलाच. 'ह्या मोठ्या बायकापण 'डायपर' का घालतात?' त्यावर काही बायकांना कधी कधी एखादा प्रॉब्लेम असतो म्हणुन घालतात असं उत्तर देउन वेळ मारुन नेली होती.
परवा तिनं विचारलं 'बाबा, कौन्सेलिंग म्हणजे काय?' उत्तर देण्या पुर्वी नक्की कसल्या संदर्भात हा प्रश्न आहे हे कळावं म्हणुन मी विचारलं 'कुठे ऐकसलास गं हा शब्द?' तर म्हणे शाळेत नवीन तास चालु होणार आहे कौन्सेलिंगचा. मग तिला समजेल अश्या शब्दांची जुळवा जुळव करत म्हटलं की एखादी अडचण, समस्या वा न समजलेली गोष्ट समजावुन सांगणे, अडचणींवर उपाय सुचवणे म्हणजे कौन्सेलिंग. माझ्या नशिबानं बाईसाहेबांचं तेवढ्याने समाधान झालं आणि माझी सुटका झाली.
काल रात्री झोपताना तिने आईला एक बाउंसर टाकला. 'आई, बाळ आईंच्या पोटात असतं ना?'
'हो' बेसावध सौ उत्तरली.
'मग ते बाहेर येत कुठुन?'
रात्री पांघरुणात शिरण्याची वेळ, त्यात परत सकाळी तांबडं फुटायच्या आत उठायच. शिवाय हा विषयही काही २ मिनिटांत संपणारा नव्हता. त्यामुळे उद्या बोलु आता उशीर झालाय अशी बोळवण करत सौनी झोपण्याचे आदेश दिले. पण लेकीचं समाधान झालं नाही. मग नाईलाजाने म्हणाली 'जाऊ दे. उद्या कौन्सेलिंगच्या तासाला सरांनाच विचारते.'
तिचा तो आवेश पाहुन त्या सरांचा कावरा बावरा झालेला चेहेरा सौच्या डोळ्या पुढेच उभा राहिला. आता हे कुतुहल दडपण्यात अर्थ नाही हे सौला उमजुन चुकलं. झालं... परत मनातल्या मनात शुब्दांची जुळवा जुळव करत बायको म्हणाली. 'आईंच्या पोटात एक पिशवी असते. बाळ त्या पिशवीत असतं. त्या पिशवीला एक ओपनींग असतं, अन योग्य वेळ झाली की त्यातुन बाळ बाहेर येत. आता हेच बघ आपला घाम बाहेर येण्यासाठी कशी त्वचेला लहान लहान भोकं/ पोअर्स असतात की नाही, तसचं काहीसं.'
"पण हे ओपनींग नक्की असते कुठे?" हे लेकीचं पालुपद सारखं चालुच होतं. तिचं कुतुहल काही शमे ना.
किती ही टाळायचं म्हटलं तरी ही हे बुमरँग टाळता येण्या सारखं नव्हतं. शेवटी सौंनी शरणागती पत्करली आणि खरं खरं काय ते सांगण्याचं ठरवलं.
अश्या प्रकारे आमच्या घरात 'सेक्स एज्युकेशनचा' धडा पहिला गिरवायला घेतला आहे.
आता 'ते बाळ आत जातच कसं?' हा पुढचा प्रश्न लवकरच येणार असल्याची पुर्ण खात्री असल्याने त्या दिशेनेही उत्तरांची जुळवा जुळव चालु आहे. जर तुमच्या पैकी कुणी या अश्याच प्रश्नांना सामोरं गेलं असेल तर त्या बद्दल जाणुन घ्यायला नक्की आवडेल.
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 9:14 pm | पैसा
या असल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत किंवा आणखी प्रश्नांना तयार रहायचं हे दोनच पर्याय तुमच्यासमोर असतात. हा पहिला धडा चांगला गिरवा!
"व्हिस्पर म्हणजे मोठ्या माणसांच्या हगीज" ही व्याख्या बर्याच वर्षांपूर्वी ऐकलेली आहे! त्यामुळे "ऑल द बेस्ट" एवढंच म्हणते!
17 Aug 2012 - 9:25 pm | मन१
कठिण आहे.
17 Aug 2012 - 9:29 pm | माझीही शॅम्पेन
बाप रे बाप फारच कठीण काम आहे , खरच इतक्या लहान मुलांवर चहुकडून भडिमार होतोय की बरेचसे प्रश्न चार-पाच वर्ष अगोदरच विचारायला सुरवात होणार अस दिसताय... बराय लिहीत राहा
17 Aug 2012 - 9:39 pm | आनंदी गोपाळ
सोपे आहे.
सगळ्यात पहिले, लाजू नका. दुसरे, ज्ञान मिळवा. तिसरे, सत्य बोला. सरळ, सभ्य भाषेत. समजते ते मुलांना. तुम्ही कोंबडे झाकलेत तरी टीव्ही आहे, मित्र/मैत्रिणी आहेत, इंटरनेट आहे..
दुसरे, कन्येचे वय किती ते सांगा, पुढील सल्ला टंकतो.
(एकुलत्या कन्येचा बाप, अन डॉ. म्हणून अनुभवी,) आनंदी गोपाळ
17 Aug 2012 - 9:40 pm | रेवती
धडा पहिला गिरवीन...... ;)
तुझ्या मुलीबद्दल काही लिहिलस की तिला भेटावसं वाटतं हे खरं. :)
मागल्या वर्षी झालेल्या भारतवारीत तिकडच्या डॉ. नी मी माझ्या मुलाला सांगायच्या त्या गोष्टी सांगितल्या का? असा सवाल केला. "अहो, अजून लहान आहे तो!" त्यावर काहीतरीच काय? माझी मुलगी सात वर्षांची आहे आणि तिला सगळं सांगावच लागलं म्हणाल्या.
आजकाल हे प्रश्न लवकर उभे ठाकतात आणि खरं ते सांगणं सोपं.
काही दिवसांपूर्वी माझ्या मुलानं एक हिंदी गाणं पाहिलं. त्यातले हिरो हिरवीन जे काय करतात ते पाहून मला विचारलं, " यांचं अफेअर आपल्याला कळलय पण ते त्यांच्या घरी कळलय का?" माझी हसून पुरेवाट झाली.
17 Aug 2012 - 9:41 pm | चित्रगुप्त
या विषयावर एक पुस्तक (मारियो मिरांडा यांची चित्रे असलेले) बघण्यात आले होते, (बहुधा तुमची मुले आणि तुम्ही असे काहीतरी नाव होते) ते एका इंग्लिश पुस्तकाचे मराठी रुपांतर होते. मुलांची जिज्ञासा मारू नये वगैरे.... त्यात या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हे सांगितले होते (अरे, सोपे आहे, बाबांनी आपले शिश्न... वगैरे वाचून कपाळावर हात मारून घेतला होता...)
असो. त्या प्रसंगासाठी शुभेच्छा. झाडाला जशी आपोआप फुले, फळे येतात (ती त्यात घालावी लागत नाहीत), तसे होते... वगैरे प्रयत्न करून बघा.
17 Aug 2012 - 10:00 pm | दादा कोंडके
"...म्हणजे काय रे भाउ" च्या स्टायलीत असले संवाद ऐकायला मजा येइल! :D
17 Aug 2012 - 9:44 pm | यशोधरा
गणपा, उगाच लपवालपवी वा उत्तरे टाळणे हे करण्यापेक्षा साध्या, सोप्या आणि तिच्या वयाला झेपेल अशा भाषेत आणि तितकी माहिती दिलेली उत्तम.
17 Aug 2012 - 9:48 pm | गणपा
खरयं.
सध्या तोच मार्ग अवलंबला आहे. :)
18 Aug 2012 - 4:13 am | स्पंदना
मला सांग साध सोप अन वयाला झेपेल असा विषयच नाही आहे तो. निदान आपल्याला तरी नाही झेपत . मग करायच काय? नक्की काय केलत तुम्ही गणपा? त्यात आणि एक प्रॉब्लेम म्हणजे शाळेत मुलांच्यात हा विषय चर्चीला जातो. मग आपण खोट सांगतोय किंवा काही वेगळ सांगतोय हे नाही का मुलांना कळत?
माझी तर त्यावर गोची झालीय. मुलीशी काहीही बोलताना चिरंजीव मध्ये धडपडतात. अर्थात त्याच्या धडपडण्यान विषय टाळता येतो, पण्.....फार गोंधळ आहे बुवा.
17 Aug 2012 - 9:45 pm | बिपिन कार्यकर्ते
वर्गात किती जागा आहेत? अजून अॅडमिशन ओपन आहे की झाली क्लोज? :ड
17 Aug 2012 - 9:53 pm | मराठे
आमच्या कडेही आज ना उद्या हे बॉम्ब पडणारच आहेत. त्यामुळे तुमचे 'लेसन्स लर्न्ड' इथेही पास करा!
17 Aug 2012 - 11:40 pm | संदीप चित्रे
तुम्ही दोघांनीही विषय टाळून वेळ मारून नेली नाही किंवा आपल्या 'गप्प बस' ह्या परंपरेचा आधार घेतला नाही म्हणून :)
आमच्याकडेही आज ना उद्या ही वेळ येणार आहेच!
18 Aug 2012 - 12:02 am | शिल्पा ब
आमच्या लेकीने ५ वर्षाची असल्यापासुनच बाळ कुठुन येतं वगैरे विचारायला सुरुवात केली होती. शाळेत बाईंना विचार, मोठी झालीस की सांगेन, सायंसच्या पुस्तकात लिहिलेलं असतं आपण पुस्तक आणु यापैकी कशालाही दाद दिली नाही.
मग बाळ आईच्या पोटात असतं सांगितल्यावर बाहेर कसं येतं हा प्रश्न. मग मी " पोटातुन बाहेर येतं" असं सांगितल्यावर "पोट फाडुन येतं का ? " मी " हो". माझं सिझेरीअन झाल्याने मी खोटं बोलले नाही हे समाधान.
हे सांगितल्यापासुन मात्र " मला मुलगा व्हायचंय " असं सुरु झालं . का विचारलं तर " मी आई झाल्यावर बाळ माझं पोट फाडेल, आणि मला ते नकोय" हे उत्तर. आता काय बोलणार?
18 Aug 2012 - 12:28 am | नेत्रेश
शेजारचा ३ वर्षांचा मुलगा ८ महीन्यांच्या प्रेग्नंट स्त्री कडे बोट दाखऊन त्याच्या आईला म्हणतो, "आई, बघ त्या आंटीचे पोट केवढे मोठे झाले आहे". ती आंटी आता त्या मुला़कडे आणी त्याचा आईकडे पाहु लागते.
मुलाची आई त्याला समजावते, "अरे, त्या आंटीच्या पोटात बाळ आहे ना, म्हणुन ते मोठे झाले आहे".
दुसर्या क्षणाला मुलाचा अत्यंत आश्चर्याने पुढचा प्रश्ण "आंटीने बाळाला खल्ले ?"
बाळाची आई आणी ती आंटी दोघीही सपाट...
18 Aug 2012 - 12:37 am | विकास
बाबा, कौन्सेलिंग म्हणजे काय?'
कौन्सेलिंग म्हणजे समुपदेशन! - असे उत्तर देयचे... पुढचे प्रश्न, "yeh... whatever ! " असे म्हणत, आपोआप थांबले असते. ;)
असो. उत्तरे कशी देयची हे काळवेळ (आणि वय) बघून ठरवावे लागते. पण "गप्प बस" अथवा काहीतरी भलतेच मनात बसेल अशा प्रकारची देऊ नये इतकेच म्हणेन.
18 Aug 2012 - 12:43 am | गणपा
हॅ हॅ हॅ... या एकदा. प्रत्यक्ष भेट घालुन देतो. :)
चार वर्षाची असताना पसायदान पाठ करताना त्यातल्या प्रत्येक शब्दा शब्दाचा अर्थ विचारला होता तिने. इंग्रजी माध्यमात असली तरी मराठी भाषे बद्दल विशेष प्रेम आहे. ;)
18 Aug 2012 - 2:49 am | प्रभाकर पेठकर
एवढ्या लहान वयात 'ह्या' माहितीची खरंच मुलांना गरज असते का?
जेंव्हा अशा गोष्टींची गरज उत्पन्न होते तेंव्हा कळतेच कळते. पूर्वीच्या काळी इतक्या लहान वयात काही माहिती नसताना सुद्धा मुलं मुली लग्नाच्या वयाची झाली तेंव्हा त्यांना स्वतःच्या शरीराची आवश्यक ती माहिती मिळालीच होती. आणि लग्न झाल्या नंतर हनिमूनला का जायचं असा प्रश्न कोणालाही पडला नाही. जे हनिमुनला गेले त्यांनाही मुले झाली आणि जे गेले नाहीत ( घरीच हनिमून साजरा झाला) त्यांनाही मुले झाली.
पूर्वीच्या काळी अशी माहिती लहान वयात पुरविली जायची नाही त्याने काय नुकसान झाले आणि आता आपण मुलांची जिज्ञासा पूर्ण करून त्यांच्या नकळत्या वयात ही माहिती देऊन नक्की काय साध्य करतो आहोत असा मला प्रश्न पडतो.
18 Aug 2012 - 4:17 am | स्पंदना
विसरताय की काय? या बॉलीवुडन अन टीवीन मुलांच्यात या जाणिवा लवकर जागृत होताहेत. अन हल्ली लपवुन अस काय राहिलय?
18 Aug 2012 - 10:07 am | प्रभाकर पेठकर
प्रसार माध्यमांकडून त्यांची उत्सुकता वाढते आहे हे मान्य तरीपण पण त्या वयात आवश्यक नसलेलं ज्ञान त्यांना आत्ताच देणे ह्याची काही गरज नाही असे मला वाटते.
सॅनिटरी टॉवेल्स बद्दल असाच प्रश्न माझ्या मुलाने विचारला असता मी त्याला खालील उत्तर दिले होते.
'सर्वच गोष्टी लहानपणी कळत नसतात, कळून घ्यायची गरजही नसते. आत्ताच्या तुझ्या वयात ज्या गोष्टी तुला कळायला हव्यात त्या कळल्याच पाहिजेत. बाकी कित्येक गोष्टी तू मोठा झालास की तुला कळतीलच. नाही कळल्या तर त्या वेळी विचार.'
आमच्या लहानपणी प्रसार माध्यमं वेगळी होती. रेडिओ होते दूरदर्शन अजून आले नव्हते पण आजूबाजूचे पक्षी, प्राणी ही माध्यमं होतीच. आम्हालाही काहि प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरेही मिळाली. पण त्यामुळे आमचे कुठले नुकसान झाले असे वाटत नाही. सेक्स एज्यूकेशन हा विषय पूर्वीच्या काळी नव्हता पण म्हणून कोणाचे काही अडून राहिले आहे असे ऐकिवात नाही. शाळेत प्रजोत्पादनावर धडा होता. वनस्पतींचे प्रजोत्पादन, स्त्री केसर, पुकेसर इ.इ. माहितीतून हे ज्ञान शाळेतूनच दिले जायचे. तेवढे पुरेसे होते/आहे असे मला वाटते.
मग ह्या विषयाबद्दल ज्ञान आत्ताच, शारीरिक गरज (आणि क्षमता) नसलेल्या, मुलांना देण्याची निकड काय? असा मला प्रश्न पडतो.
18 Aug 2012 - 10:13 am | जेनी...
काका ,ज्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं घरातुन मीळत नाहीत ,त्याची उत्तरं बाहेरुन शोधण्याचा प्रयत्न केला जातो .
काही मुलं आईवडीलांच्या धाकाला ,किवा " अजुन हट्ट केला तरी काहि उपयोग होणार नाही " अश्या वातावरणात रहात असतिल तर ,त्यांच्या प्रश्नांची आणि अनुसरुन उत्तरांचीही दीशाभुल होण्याची शक्यता जास्त असते .
असं मला वाटतं .
18 Aug 2012 - 11:12 am | नाना चेंगट
च्च च्च च्च
हीच ती आपली गप्प बस परंपरा ! कधी संपेल आणि आपण मुक्त होऊ या परंपरेच्या जोखडातून देव जाणे !! :)
माझे स्पष्ट मत मुलांना आणि मुलांना भरपूर समवयस्क मित्र मैत्रिणी असले आणि त्यांच्यात गप्पागोष्टी, सुसंवाद असला की असले प्रश्न त्यांना आपल्या आईबापांना विचारण्याची गरज पडत नाही.
आईबाप आपला बाळ अजून लहान आहे या खुषीत आणि मूलं मुली वैचारीक देवाणघेवाणीतून ज्ञानप्राप्त करुन आवश्यकता असल्यास ज्ञानप्रसाराचे मौलिक कार्य करण्यास सिद्ध.
असो.
18 Aug 2012 - 12:47 pm | प्रभाकर पेठकर
सर्वच गोष्टी लहानपणी कळत नसतात........नाही कळल्या तर त्या वेळी विचार.
च्च च्च च्च ...... माझा प्रतिसाद पूर्णपणे तुम्ही वाचलाच नाही. हे ज्ञान सर्वांनाच समवयीनांच्या संवादातून आणि इतर उपलब्ध मार्गांनी येतच असते.
माझा प्रश्न असा आहे की ह्या वयात 'ह्या' ज्ञानाची तेवढी तिव्रतेने गरज असते का? (गणपा ह्यांनी उत्तर दिले आहेच.)
दूसरे, माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढ्यांना हे प्रश्न पडलेच नाही का? त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून ('गप्प बसा' संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांकडून) हे ज्ञान न मिळाल्याने त्यांचे काय नुकसान झाले? तसेच, हे ज्ञान मुलांना, त्याची गरज नसताना, फक्त प्रसार माध्यमं मारा करताहेत म्हणून, आत्ता दिल्याने त्याचे विशेष असे काय फायदे आहेत जे मागिल पिढ्यांना मिळाले नाहीत?
आई-वडीलांकडून हे ज्ञान मिळाले नाही तर मुले बाहेरून हे ज्ञान मिळवतील. ते चुकीचे असू शकेल, भलत्या लोकांच्या नादी लागून त्यांचे शारीरिक-मानसिक नुकसान होऊ शकेल. अशी भिती घातली जाते. पण मागच्या पिढ्यांमध्ये अशा किती केसेस घडल्या आहेत? आणि ह्या-ह्या कारणामुळेच हे -हे घडले असा ठोस काही पुरावा आहे का? इथे, घरातील संस्कारही मुलांना आपल्या मार्गापासून विचलीत न होण्यास सहाय्य करतात. आम्हीही लग्ना आधी चावट पुस्तके वाचली आणि छायाचित्रे पाहिली परंतु म्हणून आम्ही आमच्या मार्गापासून भरकटलो नाही. (माझ्या पाहण्यात तरी कोणी नाही).
शाळेतील वनस्पतीचे प्रजोत्पादनाचे पाठ, निसर्गाचे अवलोकन, समवयस्कांमधील चर्चा आणि निसर्गाने इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्य प्राण्यालाही प्रदान केलेली आकलन शक्ती हे पुरेसे आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
18 Aug 2012 - 1:43 pm | आनंदी गोपाळ
होय, पडले.
तुमच्या अन तुमच्या आगे मागेच्या पिढ्यांतील मित्रांनाच विचारून मागोवा घेतलात, तर लक्षात येईल की सामान्यतः आजची भारतीय स्त्री अन तिची लैंगिकता या अत्यंत रिप्रेस्ड आहेत. कामजीवन हे इतर शारिरिक गरजांसारखेच आवश्यक आहे, त्याचे प्रजननाव्यतिरिक्त अनेक फायदेही आहेत, याची बहुतेकांना कल्पनाही नसते. आजही अनेक पुरुष, पत्नीला सेक्समधे इंटरेस्टच नसतो, म्हणून रडताना दिसतात, अन ज्या स्त्रिया केवळ 'पत्नीकर्तव्य' भावनेतून यात सहभागी होतात, त्यांना त्यातील आनंद किंवा ज्याला स्खलन म्हणतात, ते क्वचितच अनुभवायला मिळते.
तात्पर्य,
नुकसान हे झाले, की कामजीवन निरामय झाले नाही.
टिकून राहिलेले अनेक संसार हे केवळ बाह्य देखावा म्हणून वा सोय्/व्यवहार म्हणून टिकले. अनेकांनी एक जोडपे म्हणून जितकी अनुभवायला हवी, तितकी समरसता अनुभवली नाही. व हे केवळ अज्ञानापोटी. सेक्स हे काहीतरी विचित्र आहे या भितीपोटी.
या व्यतिरिक्त साध्या हस्तमैथून वा स्वप्नस्खलनामुळे (याला स्वप्न "दोष" मी म्हणत नाही.) वैदूंकडून गंडविले जाणारे, अथवा भयगंडाने पछाडून स्वतःला क्लीब समजून समलैंगिकत्वाकडे वळणारेही अनेक आहेत.
पूर्वीच्या पिढ्यांत अशा लैंगिक विकृती/गैरसमज नव्हत्या असे नव्हे. आज आहेत तितक्याच त्या होत्या, किंबहुना जास्त होत्या, फक्त त्यांची वाच्यता आजच्याइतकी नव्हती इतकेच म्हणावेसे वाटते.
एक डॉक्टर म्हणून समाजात या विषयीचे अज्ञान किती आहे, याचा प्रथमपुरुषी, अन सहव्यावसायिकांच्या अनुभवांतूनही विदा मजपाशी बराच आहे. त्याच भरवशावर वरील टंकले आहे.
प्रसार माध्यमे कोणताही माहितीचा वा ज्ञानाचा मारा करताना मला दिसली नाहीत, किंबहुना त्यातून ज्ञान मिळण्याऐवजी अज्ञानच जास्त प्रसारीत होते असे निरिक्षण आहे.
18 Aug 2012 - 3:51 pm | प्रभाकर पेठकर
सामान्यतः आजची भारतीय स्त्री अन तिची लैंगिकता या अत्यंत रिप्रेस्ड आहेत.
मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून लिहीले आहे. स्त्रियांच्या समस्यांबद्दल मला काही अनुभव नाही.
टिकून राहिलेले अनेक संसार हे केवळ बाह्य देखावा म्हणून वा सोय्/व्यवहार म्हणून टिकले. अनेकांनी एक जोडपे म्हणून जितकी अनुभवायला हवी, तितकी समरसता अनुभवली नाही. व हे केवळ अज्ञानापोटी. सेक्स हे काहीतरी विचित्र आहे या भितीपोटी.
असहमत. बायकोबद्दल तक्रार करणे खुपशा पुरुषांचा टाईम पास असतो. तेव्हढा दोष वगळता माझ्या माहितीत असे पुरुष नाहीत.
या व्यतिरिक्त साध्या हस्तमैथून वा स्वप्नस्खलनामुळे (याला स्वप्न "दोष" मी म्हणत नाही.) वैदूंकडून गंडविले जाणारे, अथवा भयगंडाने पछाडून स्वतःला क्लीब समजून समलैंगिकत्वाकडे वळणारेही अनेक आहेत.
अशांची टक्केवारी (भारतिय जनसंख्येच्या तुलनेत) किती आहे? नगण्य असावी असा अंदाज आहे.
एक डॉक्टर म्हणून समाजात या विषयीचे अज्ञान किती आहे, याचा प्रथमपुरुषी, अन सहव्यावसायिकांच्या अनुभवांतूनही विदा मजपाशी बराच आहे.
आपण डॉक्टर आहात मी काय बोलणार? मी सर्वसामान्य (पक्षी: अज्ञानी) माणूस आहे. अनुभवावर बोलतो/लिहीतो.
प्रसार माध्यमे कोणताही माहितीचा वा ज्ञानाचा मारा करताना मला दिसली नाहीत
प्रसारमाध्यमांचा उल्लेख aparna akshay ह्यांच्या ह्या विसरताय की काय? या बॉलीवुडन अन टीवीन मुलांच्यात या जाणिवा लवकर जागृत होताहेत. अन हल्ली लपवुन अस काय राहिलय? प्रतिसादात आला म्हणून मी लिहीला. असो.
माझी मते मांडून झालेली आहेत त्यामुळे हा माझा ह्या विषयावरील शेवटचा प्रतिसाद.
22 Aug 2012 - 6:34 pm | नाना चेंगट
ज्या स्त्रिया केवळ 'पत्नीकर्तव्य' भावनेतून यात सहभागी होतात, त्यांना त्यातील आनंद किंवा ज्याला स्खलन म्हणतात, ते क्वचितच अनुभवायला मिळते.
हम्म. नुकताच एक रोचक धागा वाचायला मिळाला.
22 Aug 2012 - 6:39 pm | बॅटमॅन
बाकी या पाश्च्यात्यांना कैपण कामे नसतात हे पटलं. कैच्याकै सर्व्हेज करून त्याचे तसेच कैच्याकै निष्कर्ष काढणे हा त्यांचा छंद दिसतो. असे कोणीतरी सर्व्हेज काढते आणि दुसर्या दिवशी फेकानंद प्रभृतींच्या बातम्या वाचाव्या लागतात.
22 Aug 2012 - 7:14 pm | नाना चेंगट
पाश्चात्यांना नावे ठेवल्याबद्दल जाहिर निषेध.
22 Aug 2012 - 7:16 pm | बॅटमॅन
या निषेधाचा निषेध.
(देशभक्त)वाल्गुदेय.
18 Aug 2012 - 2:03 pm | नाना चेंगट
>>>च्च च्च च्च ...... माझा प्रतिसाद पूर्णपणे तुम्ही वाचलाच नाही. हे ज्ञान सर्वांनाच समवयीनांच्या संवादातून आणि इतर उपलब्ध मार्गांनी येतच असते.
माझा प्रतिसाद तुमच्या लक्षात आलाच नाही. तुम्ही जे म्हणत आहात तेच मी म्हटले आहे.
(च्च च्च च्च तुम्हाला थेट उद्देशून नव्हते :) )
18 Aug 2012 - 10:54 am | गणपा
एवढ्या लहान वयात 'ह्या' माहितीची खरंच मुलांना गरज असते का?
प्रामाणिक उत्तर 'नाही' असच आहे. पण आता काळ बदललाय. पुर्वी जनरेशन गॅप म्हणजे एका संपुर्ण पिढीच अंतर असायच. हल्ली ते अंतर अगदी ५-१० वर्षांवर येउन ठेपलय असं वाटतं. आपल्या वडिलधार्यांनी आपलं कुतुहलाच दमन केलं म्हणुन आपणही तेचं करावं, असं निदान मलातरी वाटत नाही.
एक वेळ मुलींच ठिक वाढत्या वयात नाईलाजाने का होईना पण त्यांना आई मावशी कडुन शरिरशास्त्रा विषयी घरीच माहिती मिळत असे. मुलांची मात्रं बोंब असायची. मग अडनीड्या वयात अश्या वेळी मित्रं नकोती पुस्तक हाती यायची. बरेच चुकीचे समज निर्माण व्हायचे.
शाळेत हे विषय जेव्हा चर्चीले जातीले तेव्हा जातील पण आपल्या पाल्याची जवाबदारी आपली स्वतःची आहे. त्यांच्या समस्यांचं, शंकांच, त्यांच्या वयाला साजेश्या शब्दांत आपणच निरसन नको का करायला?
18 Aug 2012 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर
पुर्वी जनरेशन गॅप म्हणजे एका संपुर्ण पिढीच अंतर असायच. हल्ली ते अंतर अगदी ५-१० वर्षांवर येउन ठेपलय असं वाटतं. आपल्या वडिलधार्यांनी आपलं कुतुहलाच दमन केलं म्हणुन आपणही तेचं करावं, असं निदान मलातरी वाटत नाही.
जनरेशन गॅप म्हणजे, शारीरिक दृष्ट्या तरी, नविन पिढीला जन्मास घालण्याची सरासरी वयोमर्यादा. गणपा, जर तू बौद्धिक क्षमते विषयी बोलत असशील तर नवी पिढी बौद्धीक पातळीवर पुढारलेली आहेच, ती हे ज्ञानही मिळविलच. आपण ह्या पिढीपेक्षा मागासलेले असूनही आपल्याला काही समस्या आली नाही (आई-वडिलांनी समुपदेशन न करताही) तर ह्या बौद्धीक द्रुष्ट्या पुढारलेल्या पिढीला काही समस्या येईल असे मानणे म्हणजे त्यांच्या बौद्धीक क्षमतेला कमी लेखणे नाही का?
त्यांच्या वयाला साजेश्या शब्दांत आपणच निरसन नको का करायला?
जरूर करावे. सर्व प्रश्नांचे करावे. मुलांबरोबर 'संवाद' हा असावाच. पण त्याच बरोबर, प्रश्न सुद्धा त्यांच्या शारीरिक वयाला आणि गरजेला साजेसे असावेत.
18 Aug 2012 - 1:14 pm | गणपा
काका, हा तुमचा मुद्दा काही अंशी मान्य. मला जनरेशन गॅप म्हणताना बौद्धीक गॅपच अपेक्षीत होती. पण थोडा विचार केल्यावर शारिरिक दृष्टिनेही हे अंतर कमी होत चाललय हे लक्षात येत. नक्की विदा नाही माझ्याकडे. जी आहे ती ऐकीव माहितीच आहे. पुर्वी म्हणे मुली १५-१६ वर्षांच्या झाल्या की वयात येत असत. पण हल्ली हे प्रमाण १० वर्षां पर्यंतही खाली आलय असं काही ओळखींच्या घरांतुन कळलय. काळाची गरज ओळखायलाच हवी.
त्यांच्या मनाला कुठले प्रश्न पडावे हे आपण कसं ठरवणार?
18 Aug 2012 - 1:28 pm | प्रभाकर पेठकर
त्यांच्या मनाला कुठले प्रश्न पडावे हे आपण कसं ठरवणार?
ते आपण ठरवावं असं मी कुठे म्हंटलंय?
प्रश्न त्यांना पडले तरी त्या वयात ते प्रश्न चुकीचे आहेत हे समजावून सांगावे. माझ्या मुलालाही प्रसारमाध्यमांमुळे काही प्रश्न पडले. पण त्याला मी उत्तर काय दिले हे वर दिले आहेच. 'आत्ता ह्या तुझ्या वयात हे प्रश्न अनावश्यक आहेत' एव्हढा संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचवावा.
18 Aug 2012 - 1:50 pm | आनंदी गोपाळ
पेठकर काका,
त्यांच्या अन तुमच्या बोलण्यात मधे बोलतो आहे.
आपण म्हटलात,
नवी पिढी ज्ञान मिळविलच.
मग ते ज्ञान योग्यप्रकारे, शास्त्रशुद्ध रित्या, आईबापांनी किंवा शिक्षकांनी शाळेत दिले तर प्रॉब्लेम कुठे आहे?
मुलांना पडलेले प्रश्न उगाच पडत नसतात, काही कारणे त्यापाठी असतात. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी ते ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांना अॅप्रोच होतात.
त्या व्यक्तीने मुलांच्या शंकांना योग्य उत्तरेच दिली पाहिजेत असे नव्हे, तर ते प्रश्न का आले याचाही थोडा विचार आपल्या मनात केला पाहिजे, अन काही वावगे तर घडलेले नाही ना? याचा धांडोळा घेतला पाहिजे. (आठवा, मा. आमिरखान यांचा चाईल्ड अॅब्यूज एपिसोड)
बघा पटते आहे का मी काय म्हणतो आहे ते.
18 Aug 2012 - 2:00 pm | गणपा
विषय निघालाच आहे म्हणुन...
हा खालील चित्रफीत. जरुर पहावी आणि मुलांसोबत शेयर करावी अशी.
18 Aug 2012 - 3:50 am | अर्धवटराव
मेक्सीको मध्ये काहि शालेय पुस्तकात प्राण्यांच्या जनन पद्धतींची ( अंडज, सस्तन वगैरे...) माहिती छान कार्टुन वगैरे मार्फत दिलेली बघितली आहे. मनुष्य मात्रांची प्रोसेस समजवुन सांगण्याआधी चांगली भुमीका बांधली जाते अशाने...
अर्धवटराव
18 Aug 2012 - 3:54 am | अर्धवटराव
वयात येण्यार्या मुलीला आई म्हणते, "स्विटी, आय थींक वी नीड टु टॉक... इट्स टाईम टु डिस्कस अबाऊट सेक्स".. मुलीचं उत्तत "शुअर मॉम... फील फ्री टु आस्क मी एनि डाऊट्"
अर्धवटराव
18 Aug 2012 - 7:01 am | अत्रुप्त आत्मा
:-)
18 Aug 2012 - 8:40 am | चौकटराजा
लहानपणी आमचे काही सिनिअर मित्र "कुत्र्या़कडे" निर्खून पाहयला सांगत. " नाहीतर तुमचा निर्वंश होईल असे म्हणत. बरेच दिवस बेंबीतून बाळ बाहेर येते असा माझा समज होता. मग मला बेम्बी कशासाठी असाही प्रश्न पडत असे. पुढे सातवीच्या वर्गात " या" विषयावर एक पानाचा धडा होता. पण त्या धड्याची पाळी ( त्यात पाळीचा उल्ल्लेख होता ) आल्यावर देशमुख गुरुजींची तटापलिकडे घोडा फेकला. पुढे " मै अभी बच्चा नही हूं " चे ज्ञान झाले. विशी ओलांडली. youth times नावाच्या मॅग मधून our bodies ourselves या मथळ्याखाली डॉ. मीनाक्षी राव यांचे लेख येत. व डेबोनेर मधे डॉ प्रकाश कोठारी मदतीला होतेच . यामुळे काही संकल्पना क्लिअर होत गेल्या. आजही अनेकाना क्लोनिंग व इन विट्रो फर्टीलायशेशन मधील फरक कळत नाही. माणसा मधे स्त्री पुरूष असे दोनच प्रकार नसून अनेक आहेत हे आता देखील काहीना माहीत नाही.न्यून गंड ,भय, विनाकारण संकोच हे आजही यातील शत्रू अस्तित्वात आहेत. खाण्यापिण्या सारखेच लिंगजीवन हे एक आहे .त्यात वाईट हिडीस मानायचे काही कारण नाही. हे मला तरी वर नमूद केलेल्या लेखकांकडून कळले.
यावेळी पालक म्हणून मला अशा प्रश्नांची उत्तरे द्यायची वेळ आली. त्यावेळी मी कोणतेही उत्तर टाळले नाही.त्यासाठी थोडीफार शाब्दिक कसरत करावी लागली हे मात्र खरे !
18 Aug 2012 - 8:42 am | रामपुरी
टीव्ही आणि सिनेमे कुठल्या वयाच्या मुलांबरोबर कुठले बघायचे हे ज्या पालकांना समजत नाही त्यांनाच असल्या प्रश्नांना नको त्या वयात (मुलांच्या) सामोरे जावे लागते (हे प्रतिसादांवरून पण लक्षात येतंय).. असो ज्याचा त्याचा प्रश्न.
18 Aug 2012 - 9:23 pm | रेवती
हे काही पटले नाही. मुलांना घरी सिनेमे पाहू दिले नाहीत तरी बाहेर अनेक मार्ग उपलब्ध असतात.
सर्वसाधारणपणे आईवडीलांनाही समजतं की मुलांना कोणते चित्रपट दाखवावेत ते!
आजकाल जसं कोणत्या उमेदवाराला मत द्यावं? सगळेच महान असतात हा प्रश्न पडतो तरी त्यातल्यात्यात बरा वाटेल अश्याला अपण निवडतो (किंवा तसा प्रयत्न तरी करतो). तसंच मुलांबरोबर सिनेमे पाहताना त्यात काही गोष्टी नसतील किंवा कमीतकमी असतील याचेही भान राखतो. धागाकर्त्याला आणि कुटुंबीयांना हा प्रश्न पडण्याइतकी जाणिव आहे म्हणूनच तर धागा सुरु केला नाहीतर "जाऊ दे राव!" म्हणून झटकले असते.
18 Aug 2012 - 8:52 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या लहान पणी असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारल्यावर आईचे समंजस उत्तर असे "बाळ काही गोष्टी मोठा झाल्यावर आपोआप कळतात". मला वाटायचे आपोआप कशा कळणार? पण त्या कळल्यावर 'आपोआप'चा अर्थ कळला.
बाकी माध्यमे वगैरे तेव्हाही होतीच फक्त आता इतका भडीमार नव्हता. परंतु आताइतके सेक्सचे उदात्तीकरण देखील नव्हते. "आता तू मोठा झाला आहेस मुलींच्या अंगचटीला जायचे नाहीस. भांडणे वगैरे काय ती तोंडाने बोलून दुरुन करायची" अशीही समज मिळाल्याचे आठवते आहे .
18 Aug 2012 - 11:14 am | नाना चेंगट
गप्प बस संस्कृतीचे पाईक आहात तुम्ही
18 Aug 2012 - 1:10 pm | आनंदी गोपाळ
गप्प बस! संस्कृतीचे पाईक आहात तुम्ही...
की
'गप्प बस संस्कृती'चे पाईक आहात तुम्ही..
18 Aug 2012 - 2:01 pm | नाना चेंगट
जसा तुमचा चश्मा असेल तसे दिसेल. :)
18 Aug 2012 - 10:03 am | जेनी...
मला वाटतं ,तीला जे आहे ते सगळं विस्त्रुत रीत्या सांगावं .
माझ्या लहानपणी मीही आईला विचारलं होतं " एवढं मोठं बाळ आईच्या पोटात जातच कसं ?"
त्यावर आईने उत्तर दीलं होतं ," देवबाप्पा ठेवतो पोटात बाळ ,आणि योग्यवेळ आली की डॉक्टर बाहेर काढतो .
आईचं सीझेरीअन असल्यामुळे डॉक्टर पोटाचं ऑपरेशन करुन बाळ बाहेर काढतात असं उत्तर मीळालं होतं मला .
पण मी आत्ता असं म्हणेन ,की जर तीचे सहा वर्ष पूर्ण असतील तर तीला रोजच्या काही संबंधीत चर्चेतुन स्त्रीच्या शरीराबाबत पूर्ण माहिती द्यायला काय हरकत आहे?.
मासिक पाळी बद्दल आई आधीच का नाहि सांगत? किती प्रॉब्लेम होतो जेव्हा अचानक ह्या गोष्टी समोर येतात तेव्हा .
महत्वाचं म्हणजे .आईने मुलीला सर्वप्रथम ' स्त्री ' च्या शरीराबाबत ,तीच्यात होणार्या बदला बाबत पूरेपूर माहिती द्यायला हवी तेही शास्त्र्शुद्ध पद्धतीने .
स्त्री च्या शरीरात होणारे बदल हे तीच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे तिला समजेल अश्या भाषेत सांगण महत्वाचं आहे .
थोडक्यात , बाळ बाहेर कुठुन येतं ? ह्या प्रश्नासाठी तुम्ही जीवशास्त्राच्या पूस्तकातल्या डायेग्राम चा उपयोग करा .
शरीरात एक जीव निर्मान होतो ,तो कुठे असतो ,कसा सर्व्हायव्ह करतो ...मग तो हळु हळु मोठा होतो ,जसे तु दर वर्शी
वाढदीवसाला इन्चाने वाढते तसं बाळ दर महिन्याला वाढतं .जेव्हा आईच्या पोटातल्या पिशवीत ते मावेनासं होतं ते बाहेर
यायला बघतं .आईच्या पोटातल्या पिशवीचं तोंड कुठे असतं हे तिला त्या डायेग्राममधुन स्पष्ट करता येईल .
अर्थात ह्यासाठी तिच्या आईचं बौद्धिक बळ पणाला लागेल ह्यात वाद नाहि ..पण त्यामुळे आई लेकीत ' मैत्रीनीचं ' नातं घट्ट होइल .
माझ्या आईने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सहवीत असताना दीली होती . तेव्हा मी १० ते ११ वर्षांची असेन ..
पण त्यानंतर नातं इतकं घट्ट झालं की कुठल्या मुलाने प्रपोझ केलं, कोण आवडतो ,का आवडतो ? ह्या असल्या गोष्टीही मी तिच्यापासुन कधीच लपवल्या नाहित .
माझी आई जगातली सगळ्यात बेस्ट आई आहे ,आई पेक्षाही एका मैत्रीनीच नातं तीने छान निभावलं आहे.
एक अशी मैत्रीन ,जीच्यापासुन आयुष्यातल्या छोट्यमोठ्या घटनाही कधीच लपून राहील्या नाहित
माझी जीवलग मैत्रीन ..माझी आई .
18 Aug 2012 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
देव पोटात बाळ ठेवतो आणि पोटाचं ऑप्रेशन करुन बाळ बाहेर येतं असं म्हटल्याचं आठवतं.
पण, ऑप्रेशन म्हटल्यावर पोटातुन रक्त-बिक्त बाहेर येत असेल या उपप्रश्नाबरोबर बाळापेक्षा रक्ता-बिक्ताचं लेकीला टेन्शन आल्याचंही आठवतं.
च्यायला, या प्रसार माध्यमांनी आपली लैच गोची करुन ठेवली आहे,इतकं मात्र खरं आहे. आता ते किती योग्य आणि अयोग्य याचा लेखाजोगा मांडणंही अवघड आहे.
-दिलीप बिरुटे
18 Aug 2012 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार
संपादक कुठल्याही प्रश्नातून मार्ग काढतातच. ;)
21 Aug 2012 - 7:45 pm | रमताराम
सुधारणार नाहीस लेका.
22 Aug 2012 - 7:48 am | रेवती
असंच काही नाही अगदी! ;)
तू मिपावर असणे हाही मोठ्ठा प्रश्न आहे.
काढता आला का मार्ग आम्हाला? नाही ना? ;)
20 Aug 2012 - 3:06 pm | इरसाल
आम्ही सुपात आहोत तर.
सांभाळा गणपाशेट.तुमचा अनुभव आमच्या कामास येईल. वाखु साठवत आहे.
20 Aug 2012 - 4:22 pm | कवितानागेश
आमच्या वेळेस 'वयात येताना' हे विठ्ठल प्रभूंचे पुस्तक वाचायला द्यायचे.
पण ते १३-१४व्या वर्षी.
माझी ही अशी परीक्षा माझ्या ५ वर्षाच्या भाचीनी मी कॉलेजात असताना घेतली होती.
22 Aug 2012 - 1:22 pm | सुहास..
ओव्हर फ्रॅन्कनेस !!
काही गोष्टी 'आपोआप ' कळण्यात ही गम्मत असते :)
( उगा कॅलरीज मोजुन जेवण्यात मजा नसते तशीच ;) ) *
श्रेयअव्हेर : पाषाणभेद
22 Aug 2012 - 7:18 pm | मदनबाण
काकाश्रींशी सहमत !
निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे,त्याची किमया घडताच योग्य ज्ञान मिळते.
लहानपणातील निरागस प्रश्नांना उगाच कुतुहल अजुन वाढवणारी उत्तरे देउ नयेत ! त्यांच्या विश्वात त्यांना रमुदे,उगाच आपण त्यांना मोठे करण्याची घाई करु नये ! जसे वय तसेच त्या वयाला साजेसे उत्तर.
अवांतर :--- प्राण्यांना सेक्स एज्युकेशन द्यायची गरज भासत नाही पण माणसाला वाटते, सांगा हुशार कोण ? ;)
22 Aug 2012 - 7:22 pm | बॅटमॅन
समाजदेखील तितकीच मोठी किमया आहे. सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे समाजाकडून शिकावे.
अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, कारण योग्य त्या वयातसुद्धा समाजाकडून योग्य ते ज्ञान मिळत नाही म्हणून.
22 Aug 2012 - 7:34 pm | मदनबाण
अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, कारण योग्य त्या वयातसुद्धा समाजाकडून योग्य ते ज्ञान मिळत नाही म्हणून.
वटवाघुळमानवा,तूझी तळमळ कळली मला ! आजच्या घडीला याच मानवाने या ग्रहावर इतर प्राण्यांना मागे टाकुन त्याची प्रजा अमाप वाढवली आहे,हा त्याचा मूर्खपणाच आहेच ! ज्ञान न मिळाल्याचा हा परिणाम ?
22 Aug 2012 - 7:40 pm | सुहास..
कारण योग्य त्या वयातसुद्धा समाजाकडून योग्य ते ज्ञान मिळत नाही म्हणून. >>>
अरे रे ! ;) आपली कळकळ समजली . बोळा लवकर निघो ही सदिच्छा !!
बाणा , पेस्ट कन्ट्रोल युवरसेल्फ !!
22 Aug 2012 - 7:41 pm | बॅटमॅन
अर्थातच. झेपतील इतकीच पोरे पैदा करावी हे ज्ञान बहुत लोकांना नाहीये. पण गरिबांच्या दृष्टीने तो निव्वळ मूर्खपणा देखील नाही. असो. पण माझा मुद्दा तो नाही.
योग्य त्या वयात योग्य ते ज्ञान मिळाले नाही तर नैसर्गिक क्रियेबद्दल अनावश्यक भीती/किळस वाटू शकते, कित्येकांना वाटतेदेखील. असे होऊ नये म्हणून निकोप पद्धतीने योग्य वयात ज्ञान दिले पाहिजे, या मताचा मी आहे.
22 Aug 2012 - 7:27 pm | तर्री
खेड्यात लहानपण घेल्याने निसर्गाने लैगिक शिक्षण केले.
काही प्रसंग :
१.रानात चरायला घेवून गेलेली गाय विताना पहिली आणि मूल जन्माला कसे येते ते समजले.
२.बैल - गाय , बोकड - बकरी व कुत्रे ( भाद्रपद आलाच आहे ) यांचे मैथुन नेहमी पाहायला मिळे. त्यातून मूल पोटात कसे जाते ते ही समजले.
३. काही अवयव भेदक शिव्या ही उपयोगी आल्या!
निसर्ग राजा सांगतो ! सगळे सांगतो !!
22 Aug 2012 - 7:29 pm | सुहास..
सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे समाजाकडून शिकावे >>
=)) =)) =))
चुकुन सहजराव एखाद्या/ च्या प्रेरणेला धरून दाबत आहेत असे चित्र समोर उभे राहिले =))
22 Aug 2012 - 7:32 pm | प्रभो
=)) =)) =))
22 Aug 2012 - 7:40 pm | गणपा
हा धागा मिपावर टाकावा की नाही असा एक विचार आधी मनात शिवुन गेला होता. (नाही मिपाकरांच्या प्रगल्भतेबद्दल शंका नव्हतीच, पण काही पुर्वानुभवां मुळे म्हणा धाकधुक होती इतकच.)
पण आज धागा टाकल्याचे समाधान झाले. माझ्या सारख्याच 'पालक'अवस्थेतुन जाणार्या आणि गेलेल्यांचे अनुभव भविष्यात निश्चीतच उपयोगी पडतील.
तस्मात सर्व सहभाग नोंदवलेल्यांचे मनपुर्वक आभार. :)