गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे. जगभरात स्थित असलेल्या मित्रमंडळाच्या सान्निध्यात राहून, त्यांच्याशी विविध प्रकारे गप्पा-टप्पा करत त्यांच्याबरोबर विचार-भावना-ज्ञान वाटून घ्यायची जी सोय आहे त्याबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाची मी कायम ऋणी राहिन.
असंच एकदा पुण्यात असणार्या एका मैत्रिणीसोबत जीमेलवर लिखित गप्पा चालू असतांना पुण्यातच वास्तव्याला असणार्या दुसर्या, तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीविषयी सहज चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की दोघीही आपापल्या नोकरी-संसारात गुरफटून गेल्याने वेळेअभावी आता पहिल्यासारखे नियमित भेटायला जमत नाही. त्यानंतर आणखी काही हवा-पाण्याच्या, आणखी चार मित्रमैत्रिणींच्या चौकश्या करून आमच्या गप्पा संपल्या पण तिचे हे वाक्य मात्र मनात घर करून बसले आणि मग ते आणखीच घोळत राहिले.
आपल्या आयुष्यात आपण केव्हातरी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ येतो, तिच्यासोबत हिंडण्या-फिरण्यात, हितगुज करण्यात त्या कालावधीतला भरपूर वेळ घालवतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनून जाते. तेव्हा आजूबाजूचे इतर लोकही आपल्याला आणि त्या व्यक्तीला परस्परांचे सोबती म्हणूनच ओळखतात. ही व्यक्ती मग कोणी मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक किंवा ऑफिसातले सहकारी किंवा आणखी कोणी असू शकते किंवा अशीही व्यक्ती असू शकते जी आपल्या फार जवळची नसतानाही मनावर ठसा उमटवते. पण कालचक्र फिरते तशी आजूबाजूची परिस्थितीही बदलते. गरजा, जबाबदार्या बदलतात आणि हळूहळू, आपल्याही नकळत आपण त्या अविभाज्य असलेल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जायला लागतो. सुरुवातीचे काही दिवस संपर्क ठेवण्याचा प्रयत्नही होतो पण त्यात काही राम नसतो. लवकरच ते प्रयत्नही आटतात आणि त्या व्यक्तीची आठवणही आटत जाते, पुढे ती स्वतःहून कधी होतही नाही. चुकून त्या काळात आपल्याला ओळखणारी कोणी तिसरी व्यक्ती या जवळच्या व्यक्तीबद्दल चौकशी करते तेव्हा आपण थोडं ओशाळून 'सध्या बर्याच दिवसात संपर्क नाही पण पुण्याला/मुंबईला/कॅलिफोर्नियाला आहे असं वाटतं' असं सांगतो. अश्या प्रसंगानंतर त्या व्यक्तीची, तिच्यासोबत घालवलेल्या दिवसांची आठवण होते. मनात दु:खाची हलकीशी कळ येते आणि थोड्याच वेळात विरूनही जाते. खरंच, अश्या किती जणांच्या आठवणींचं दु:ख करत बसणार? जवळ येऊन दूर गेलेल्या व्यक्ती अगणित असतात.
कधी कधी भावनेच्या भरात वाटतं, "आपणच हलगर्जीपणा केल्यामुळे त्या नात्यापासून, त्या व्यक्तीपासून दूर गेलो का? थोडे प्रयत्न केले असते तर आजही त्या व्यक्तीच्या जवळ असतो का?" पण थोड्या विचाराअंती उत्तर मिळतं, 'नाही'. नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये. तसे प्रयत्न कधी हास्यास्पद तर प्रसंगी तिरस्कारासही पात्र होतात. बरं प्रत्येक वेळी आपणच त्या व्यक्तीपासून दूर जात असतो असं नाही. कधी दोघंही एकमेकापासून लांब जात असतो तर कधी दोघांतली एक व्यक्ती तिथेच असते आणि दुसरी दूर जात असते. अश्या वेळी 'त्या' आपल्या जवळच्या व्यक्तीला तिथेच ठेवून आपणच दूर निघून आलो ही बोच मनाला लावून घेणं फारसं व्यवहार्य नाही. आठवणी या येणारच, मानवी अस्तित्वाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यांचा क्लेश करून घ्यायचा नाही.
आणि मग अचानक कळायला लागलेल्या वयापासून तर आतापर्यंत आपल्या आयुष्यात येऊन गेलेले आणि त्या क्षणाला आठवणारे कितीतरी चेहरे एकदम डोळ्यासमोर येतात. त्यातले काही इतके धूसर असतात की नाकी-डोळी ओळखूही येत नसतात पण त्यांचं अस्तित्व मनाला माहिती असतं. त्यात असतात... ३-४ वर्षाची असतांना आणि तोपर्यंतच भेटलेली माझ्यासोबत खेळणारी शेजारची मुलगी, प्राथमिक शाळेत असतांना रोज सोबत डबा खाणारी आणि नंतर शाळा/गाव बदलणारी मैत्रीण, प्राथमिक शाळेतल्या बाई, शाळेचे दहा वर्ष आपल्याच वर्गात असणारी पण मध्येच एखादे वर्षच 'चांगली' असणारी मैत्रीण, शाळेत ८वी ते १०वीत असतांना रोज संध्याकाळी फोन करून गप्पा मारणारा वर्गमित्र, त्याच काळात जिच्यासोबत रोज शाळेत आणि प्रत्येक शिकवणीला गेलो ती मैत्रीण, आजीच्या भजनी मंडळातल्या हज्जार प्रश्न विचारणार्या आज्या, क्लासवरून घरी येतांना रात्र होते म्हणून रोज ज्याच्यासोबत सायकल पिटाळत यायचे तो वर्गमित्र, शाळेत मराठीचा प्रत्येक धडा आणि कविता कळकळीने शिकवणारे सर, दररोज सकाळी डोक्यावर भलं मोठं भाजीचं टोपलं घेऊन येणारी भाजीवाली, कळायला लागल्यापासून तर उच्च शिक्षणाकरता घराबाहेर पडेपर्यंत पाहिलेला दुपारी लोटगाडीवर डाळ्या-मुरमुरे विकायला येणारा मुरमुरेवाला, घरी आल्यावर कौतुक करणारे बाबांचे मित्र, कॉलेजात गेल्यावर पहिल्याच वर्षी आणि आयुष्यात पहिल्यांदाच 'प्रपोज' करणारा तो, कॉलेजात असतांना आपल्याच वर्गात असलेली -सोबत प्रोजेक्ट करणारी - पुन्हा सगळीकडे सोबत असणारी मैत्रीण, ज्याच्याकरता कॉलेजच्या दिवसात काळजाचं भिरभिरं व्हायचं तो, याच कॉलेजच्या दिवसात आपलं कुटुंबच असलेल्या रूममेट्स, ऑफिसातली रोज चहा-कॉफी-जेवणाला-गप्पांना सोबत असणारी मैत्रीण, अनोळखी शहरात ४ वर्ष जिच्या घरात राहिलो ती मायाळू घरमालकीण, जिमचा इन्स्ट्रक्टर, आणि... आणि.... आणि..... अजून कितीतरी......
बरोबर आहे, माझा एवढासा मेंदू काय काय आणि किती ते लक्षात ठेवणार. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. तरी सध्या फेसबूकमुळे एक बरं झालंय की आधीच्या लक्षात राहिलेल्या आणि आता नव्याने होणार्या ओळखी, नाती त्यात नोंदवली जातायेत. कधीतरी एखाद्या विस्मृतीत गेलेल्या मित्र-मैत्रिणीची पोस्ट आली की प्रतिक्रिया उमटते, "अर्रे, ही/हा सुद्धा आहेच की!, हिचं लग्न झालं वाटतं, त्याने होंडा सिटी घेतली!, हल्ली सिंगापूरला सेटल झालेले दिसताय, बाळ कसलं गोड आहे, काका किती वयस्कर दिसायला लागले, आजी गेल्या???, ......." पुन्हा मन या सर्वांना आठवणींच्या लांबच लांब रस्त्यावर शोधायला धावतं आणि जिथे त्यांच्यापासून वेगळे झालो त्या वळणावर जरा वेळ घुटमळतं.
म्हणूनच आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाची ऋणी आहे. ते नसते तर चुकून केव्हातरी या आठवणी आल्यावर फक्त प्रश्नच पडला असता की हे सगळे गेले कुठे?
प्रतिक्रिया
16 Jul 2012 - 1:56 pm | sneharani
सुंदर लिहलय!!
:)
16 Jul 2012 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार
लिखाण एकदम सुरेख.
अशा काही काही ओळी तर खासच.
16 Jul 2012 - 2:38 pm | सस्नेह
>>>नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये.<<<
मनापासुन पटलं.
याबाबतीत अगदी ताजे दोन अनुभव सांगते.
दाताच्या दवाखान्यात गेले होते. मुख्य डॉक्टरांचे काम झाल्यावर एक शिकाऊ मुलगी 'मागचे आवरायचे' काम करायला आली. म्हटलं आतापर्यंत काही दुखलं नाही, पण आता काही खरं नाही. ती शिकाऊ मत्र माझ्याकडे पाहून तोंडभर हसली अन म्हणाली 'ओळखलं का ताई, मी ****, १२ वर्षापूर्वी तुमच्या समोर राहत होते. तेव्हा कॉलनीत फक्त तुमच्याचकडे टीव्ही होता अन आम्ही सगळे पाहायला यायचो..' अन मग तिने बोलता बोलता सफाईने तिचे काम आवरून टाकले. नंतरही खूप अगत्याने बराच वेळ बोलत होती.
दुसरा अनुभव एकेकाळच्या जीवाभावाच्या सखीचा.
एका लग्नासाठी साताऱ्याला गेले असता तिथेच माझी होस्टेलमधली रूममेट राहते असे समजले. ते भन्नाट दिवस, जागवलेल्या रात्री, गप्पा अन भटकंती, सारे डोळ्यासमोर आले अन लग्न उरकल्यावर मी आवर्जून, आसुसून तिच्याकडे गेले. गप्पा तर राहिल्याच, पठ्ठी 'माझा बंगला, माझा नवरा अन माझी मुलं, यापलीकडे एक शब्द बोलेना.
१० मिनिटे झाल्यावर चहा विचारला. मी नाही म्हटल्यावर निवांत आपल्या उद्योगाला लागली. 'जाते' म्हटलं.
'बरं' म्हटली. 'पुन्हा ये' तर नाहीच, माझ्या आमंत्रणालाही थंडा प्रतिसाद ! 'छे, ही नव्हेच माझी मैत्रीण ' असं वाटलं.
16 Jul 2012 - 2:51 pm | मी_आहे_ना
सुंदर लिखाण. बरोबरच्या वयाचे मित्र्-मैत्रिणी ऑर्कुट/चे.पु.मुळे संपर्कात आहेत/असतात, पण बाकी, आधिच्या 'जनरेशन'चे फक्त आठवणीत आहेत... तसंच 'स्नेहांकिता' ह्यांनी म्हणल्याप्रमाणे 'अनपेक्षित भेटीचा/ ओळखिचा आनंद' आणि 'अपेक्षाभंगाचे दु:ख'...दोन्ही मनाला चटका लावणारेच...
16 Jul 2012 - 2:59 pm | पियुशा
सुरेख !!
लिखाण आवडल :)
हल्ली माझ्या( काही )जुन्या मैत्रीणी भेटुच नयेत अस वाटत राहत सारख सारख ;)
" चुकुन भेटल्या तरी एकच प्रश्न " लाडु कधी खायला घालतेस " ;)
16 Jul 2012 - 3:49 pm | ५० फक्त
लाडु कसले ?
बारश्याचे (बेसनाचे /डिंकाचे ), लग्नाचे (बुंदीचे) का आंतरजालीय बाराव्याचे (रव्याचे) / का तुमचं दुकान आहे लाडवाचं ?
बाकी लेखण फार मस्त झालं आहे, आहेत अशी बरीच माणसं,
शाखेतले पहिले शिक्षक, ज्यांनी भगव्याबद्दलचं प्रेम आणि अभिमान मनात रुजवला, आणि बरेच आहेत.
16 Jul 2012 - 4:03 pm | पियुशा
@ ५० फक्त
आधी लग्नाचे मग बारशाचे मग आं.जा वर च्या बाराव्याचे ,आमच्याकडॅ तरी हा क्रम आहे :)
16 Jul 2012 - 3:39 pm | प्रीत-मोहर
मस्तच ग स्मिता. आवडल आणि पटल.
16 Jul 2012 - 3:40 pm | सविता००१
छानच लिहिलं आहेस. एकदम आवडेश!
16 Jul 2012 - 4:29 pm | प्रेरणा पित्रे
खरंच आवडलं आणि पटलं...
16 Jul 2012 - 4:37 pm | चित्रगुप्त
छानच लिहिले आहे.
फेसबुक मुळे मधली अनेक वर्षे संपर्कात नसलेल्या मित्रांशी, परिचितांशी पुन्हा संपर्क करता येऊ लागला, हे तर छानच झाले.
याशिवाय मी आता जेंव्हा इंदूरला जातो, तेंव्हा बालपणी वर्गात/शाळेत असणार्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन भेटतो. मध्यंतरीच्या चाळीसेक वर्षात त्यातील प्रत्येकाचे आयुष्य किती किती वेगवेगळ्या तर्हेने व्यतीत झालेले आहे, आणि आता ते कश्या मनस्थितीत आहेत, हे बघून गंमत वाटते, काहींच्या बाबतीत दुर्दैवाने अघटित घडले असल्याचेही जाणवते...
एकंदरित जुन्या लोकांशी पुन्हा संपर्क, हा प्रकार बरेच काही शिकवून जातो.
16 Jul 2012 - 4:54 pm | किसन शिंदे
व्वा!! अतिशय सुंदर लेखन!!
16 Jul 2012 - 4:57 pm | किसन शिंदे
प्र का टा आ
16 Jul 2012 - 6:19 pm | पैसा
वाचल्यावर गदिमांच्या या ओळीच आठवल्या.
फेसबुकवर आपल्याला २५ वर्षांनी कोणीतरी मैत्रीण शोधून काढते आणि तेव्हा अतिशय आनंद होतो, पण ते तेवढंच असतं. मग २//४ वेळा गप्पा मारून झाल्या की ती पण इतर फेसबुक फ्रेंड्समधे सामील होऊन जाते. प्रासंगिक 'लाइक्स', कॉमेंट्स, अपडेट्स. झालं. गेलेला काळ परत येत नाही आणि त्याबरोबरच मागे राहिलेली नाती पण. हे असंच व्हायचं, व्हायला हवं. नाहीतर भूतकाळात कैद होऊन जगावं लागेल.
16 Jul 2012 - 11:28 pm | सुधीर
म्हणूनच सोशल नेटवर्कींगचा मोठा फॅन नाही. गदिमांची कविता ग्रेटच आहे.
क्रिकेट हा आमच्या शाळेतल्या वर्गमित्रांना एकत्रित गुंफणारा धागा होता, काही मित्रमंडळी परदेशी/दुसर्या शहरात स्थायिक झाली, काही बाबा झाले आणि मणी विस्कटले. उरलेले आम्ही, खेळण कधीच बंद झालंय तरीही कट्ट्यावर दर विकांताला इतकी वर्ष भेटतो आहोत, पण सोशल नेटवर्कींगवर एकमेकांना अजुनही अॅड केलेलेच नाही. :)
लेख आवडला.
16 Jul 2012 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा
फार छान...!
16 Jul 2012 - 6:39 pm | स्वाती दिनेश
फार छान लिहिले आहेस स्मिता,
स्वाती
16 Jul 2012 - 6:46 pm | मराठमोळा
कोण म्हणतं की भावनांना शब्दात बांधता येत नाही.. तर लिहिताही येतं याचं प्रतिक आहे हा लेख!!
साध्या सोप्या शब्दात बरंच काही सांगून आणि शिकवून जाणारं एक मुक्तक आहे हे. सुंदर
धन्यवाद. :)
16 Jul 2012 - 7:05 pm | चौकटराजा
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते. काही रक्ताच्या नात्यासारखी दीर्घायुषी नाती कायम सोबत असतात. काही नातीच अल्पायुषी असतात आणि ती या काळाच्या प्रवाहात केव्हाच विरून जातात. त्यांना ओढून ताणून तगवत ठेवण्याचा प्रयत्नही करू नये.<<<
काही वेळेस जुनी नाती फिरून ताजी होतात पण नोकरी-व्यवसायामुळे जमलेली नाती मात्र तेवढ्यापुरतीच
असतात. संबंध संपला की नाते संपते ( रात गयी बात गयी ! ) मी पूर्वी सर्वच मैत्र्या नाती यांच्या बाबतीत
कमालीचा प्रामाणिक व भाबडा होतो.आत प्रत्येक नवा सोयरा मिळाला की जुन्या सोयर्याशी नाते पातळ होते .त्यात गैर काही नाही हे मला पटलेय ! त्यामुळे कोणतीच रिलेशनशीप मी स्वत: हून कधी वाढवत नाही. समोरच्यालाच जर हवे असेल तरच मी पुढे होतो.
16 Jul 2012 - 8:53 pm | रेवती
लेखन खूपच मनापासून केलेले जाणवते आहे.
मला आवडले.
नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते.
फारशी ओळख नसलेलीने हे बोलताबोलता सहज सांगितले होते आणि मला एकदम बरे वाटले होते.
आयुष्यात पुढे जाताना आपली परिस्थिती, नाती, विषय सगळे बदलत जाते आणि पूर्वी ज्यांच्याशी घट्ट नाते होते तेही बदलत जाते. मधूनच आठवण येते.
फेसबुकामुळे बरीच सोय झाली आहे हे खरे. नवर्याचे चेपुचे खाते मी जास्त वापरते हे माहित असल्याने प्राजु आणि स्वातीताई तिथेच बोलायला, निरोप द्यायला आल्या होत्या. ;) मला फारसे मित्र मैत्रिणी नाहीत म्हणून चेपुची तेवढी गरज वाटत नाही.
16 Jul 2012 - 10:00 pm | कौशी
फार मस्त लिहिलय..
16 Jul 2012 - 10:22 pm | भारद्वाज
हा धडा मी नुकताच शिकलोय. अगदी ताजा आहे.
लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत.
16 Jul 2012 - 10:43 pm | प्राची
अतिशय सुंदर लेख आहे.
17 Jul 2012 - 3:51 am | बहुगुणी
खूपशी वाक्यं आतपर्यंत पोहोचली, त्यांतल्या अनुभवाच्या जवळीकेने......
थोडे प्रयत्न केले असते तर आजही त्या व्यक्तीच्या जवळ असतो का?" पण थोड्या विचाराअंती उत्तर मिळतं, 'नाही'...........नात्यांचीही वेगवेगळी आयुष्यं असतात. या नात्यांना काळाच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते......कितीतरी चेहरे एकदम डोळ्यासमोर येतात. त्यातले काही इतके धूसर असतात की नाकी-डोळी ओळखूही येत नसतात पण त्यांचं अस्तित्व मनाला माहिती असतं.....काका किती वयस्कर दिसायला लागले, आजी गेल्या???
17 Jul 2012 - 4:03 am | सुनील
सुरेख लेखन. खूप आवडलं!
17 Jul 2012 - 7:36 am | चतुरंग
काळाच्या ओघात ओळखींचे धागे आपसूक मागे सुटत जातात. कधीमधी ते आठवून अस्वस्थपणा येतोही पण ते तेवढ्यापुरतेच. बाकी दूरपर्यंत साथसोबत करणारे मैत्र थोडेच. ते कुठेही असले तरी जेव्हा कधी संपर्क होईल तेव्हा मागील पानावरुन पुढे चालू इतका सहज संवाद सुरु होतो.
अशा लंगोटीयारांपैकी एकजण येत्या आठवड्यात अम्रिकेला येतोय. सध्या तो कधी येतोय आणि त्याच्याशी फोनवरुन बोलतोय अशी वाट बघतोय. लवकरच प्रत्यक्ष भेटही होईलच. तब्बल सहा वर्षांनी भेटणार आहोत!
-रंगा
17 Jul 2012 - 10:55 am | स्पा
ललित आवडल :)
17 Jul 2012 - 1:06 pm | ढब्बू पैसा
छान लिहीलं आहेस. एकदम 'क्यूट' ;).
डिटॅच्ड अटॅचमेंटने लिहीलेलं वाटलं. काही वाक्य खरंच दाद देण्यासारखी.
+१
17 Jul 2012 - 1:53 pm | दिपक
सुंदर लिखाण. अगदी मनातले बोल्लात.
ह्या लेखाची लिंक गायब झालेल्या सगळ्यांना पाठवतोय. :-)
--
राह पे रहते हैं यादों पे बसर करते हैं
खुश रहो अहले वतन हो हम तो सफर करते हैं!! :-)
17 Jul 2012 - 2:31 pm | जातीवंत भटका
पटलं आणि आवडलंही !
हे कितीही क्लेषदायक वाटत असलं, तरी खरं आहे !
17 Jul 2012 - 3:14 pm | प्यारे१
एवढं चांगलं लिहीते तरी.....
असो.
17 Jul 2012 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
असो.
***
लेखन परत एकदा वाचलं. तितकंच आवडलं. 'प्रत्येक नात्याचं एक आयुष्य असतं' सारखी काही वाक्यं खूपच आवडली. लेखिकेची ताकद त्यातून जाणवली. नेहमी असंच वाचायला मिळावं ही इच्छा आहे.
17 Jul 2012 - 3:53 pm | चावटमेला
सुंदर लेख..
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..
17 Jul 2012 - 6:37 pm | आत्मशून्य
स्टीव्ह जॉब भारतात अध्यात्मीक कुतुहलापोटी धावत आला पण येउन इथली परीस्थीती बघुन म्हणाला की मानवी जीवन सुंदर बनवायचे इतर अनेक चांगले मार्ग उपलब्ध आहेत... तंत्रज्ञान त्यातीलच एक.
अती अवांतरः- टायटल वाचुन धागा उघडताना जरा धाकधुक झाली कारण चटकन सर ऑथर कोनान डॉयलेंची तुनळीवरची मुलाखत आठवली होती, तो व्यवसायाने डॉक्टर व वृत्तिने संशोधक होता त्याच्या तर्कशुध्द विचारसरणीवर शंका म्हणजे आपली बुध्दी भ्रश्ट झाली असल्याचा निसंधीग्द पुरावाच पण अजुन एक गोश्ट म्हणजे तो परामानस शास्त्र , अतिद्रीय शक्ती वगैरेंचा गाढा अभ्यासकही होता त्याची सुरुवात कशी झाली याचे कारण देताना तो म्हटला की हे जे महायुध्द झालय यात आपल्या केवळ आजुबाजुची न्हवे तर गावातील देशातील व शेजारच्या देशातलीही अनेक तरुण मेले. एकाच वेळी आपल्या लाडक्या अशा इतक्या तरुणमुलांचा मृत्यू हा संपुर्ण मानवजतीला नवीन अनुभव होता म्हणूनच त्याच्या मनात प्रश्न आला काल परवा तर आपल्यात असणारे हे सगळे गेले कुठे.... ?
19 Jul 2012 - 4:07 pm | स्मिता.
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. काही प्रतिसादकांनी त्यांच्या बाजूने जे मोलाचे चार शब्द लिहिलेय त्याने याविषयीच्या विचारांना आणखी योग्य दिशा मिळाली. धन्यवाद!
21 Jul 2012 - 3:02 pm | निनाद मुक्काम प...
स्मिता
अफलातून लिहिले आहेस-
काही वाक्य काळजाचा ठाव घेतात. तर काही गतकाळातील स्मृतीला उजाळा देतात.
चेपू माझ्यासाठी तरी सोन्याची खाण आहे.
आपल्या भूतकाळात आपणास कोणत्याही कारणास्तव माहीत असलेली व्यक्ती आपल्या संपर्कात जेव्हा येते तेव्हा बरोबर गतकाळातील स्मृतींचे गुलाबपाणी आपल्या भावविश्वात शिंपडून जाते.
कितीतरी व्यक्तींशी भूतकाळात काही कारणास्तव आपली जवळीक निर्माण होत नाही. किंवा जास्त परिचय नसतो. मात्र चेपुवर अनेक वर्षानंतर भेटल्यावर त्या व्यक्तींच्या अंतरीच्या नाना कळा दिसून येतात.
मात्र अजूनही कातरवेळी मनात आठवणींचा भुंगा पिंगा घालतो.
वाटते.
गेले कुठे ही लोक
मग स्वतःचे सांत्वन स्वतः करून घेणे एवढेच आपल्या हातात उरते.
अश्याच विषयांवर लिहित रहा.
21 Jul 2012 - 2:32 pm | विशाखा राऊत
एकदम एक नंबर आहे बघ सगळे.. मी पण बर्याच वेळा असेच अनुभवले आहे..
पहिल्यांदा रत्नागिरीमधुन मुंबईला आले तेव्हा हा अनुभव घेतला पण जेव्हा भारत सोडुन आले तेव्हा तर ती जाणीव जास्तच झाली...
असो इतक्या गर्दी मधुन एक जण निघाले तर कोणाला फरक पडतो पण आपल्यासाठी सगळेच बदलते.
भरपुर मैत्रिणीतर सरळ बोलल्या काय कराय्चे आहे तुला कोण कुठे.. तुझे बघ आता.. मला तर हा सगळा विचार करायला वेळच मिळत नाही बघ.. मी बिझी इतकी असते की काय सांगु..
असो अशा सगळ्या रोचक संवादानंतर परत काय बोलायचे असा प्रशन असतो. पण आपले मन मात्र तिथेच अडकते..
24 Jul 2012 - 12:29 am | राघव
सुंदर लिहिलंय. खूप आवडले.
"आठवणी.. कधीही न रिता होणारा खजिना".. असं कुठंतरी वाचल्याचं आठवतं!!
मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं आयुष्यात एक विशिष्ट प्रयोजन असतं. ते आपल्याला कळो अथवा न कळो. प्रयोजन संपलं की बर्याचदा अशा गोष्टी आपोआप दूर होतात. विस्मरणात जातात. ज्यांचं प्रयोजन अजून पूर्ण व्हायचं आहे अशाच गोष्टी टिकतात.
राघव