प्रणाम अनाम वीरांना...

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in जनातलं, मनातलं
28 Jun 2012 - 6:32 pm

|| श्री गुरवे नम: ||

शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्‍‍यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही. म्हणूनच, त्यांना प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्यांच्या धैर्याला प्रणाम करायचा, असं ठरवलं.

अविनाश सुर्वे, जगन्नाथ देवकुडे, श्रीधर सुर्वे आणि सुरेश तांबे या चार बहाद्दर पोलिसांना उपचारासाठी जी.टी.हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केल्याची माहिती मिळाली.

सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रुग्णांना भेटायची वेळ सात वाजताच संपली होती. मात्र, माझ्या भेटीमागचा उद्देश सांगितल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकाने उदार मनाने परवानगी दिली आणि मी वॉर्ड ९मध्ये गेलो. चौघांपैकी तिघांना थोड्या वेळापूर्वीच घरी पाठवण्यात आलं होतं, मात्र जगन्नाथ देवकुडेंची भेट झाली. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. त्यांनी त्या दुपारची हकीकत सविस्तर सांगितली.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या स्वागत कक्षामध्ये हे चौघे कार्यरत आहेत. त्या दिवशी दुपारी आग लागल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखून सर्व मंत्र्यांना आणि अभ्यागतांना बाहेर पडायला मदत केली. गोंधळाच्या परिस्थितीत सर्वांना शांतपणे योग्य मार्ग दाखवला. सर्व जण सुरक्षितपणे बाहेर पडल्याची खातरी झाल्यावर त्यांनी आपल्या सुटकेचा विचार केला. तोपर्यंत सगळा मजला काळ्या धुराने भरला होता. त्यामुळे ते चौघे गुदमरले. कसेबसे एका खोलीत गेले आणि खिडकीतून छज्जावर उतरले. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणीही भाजले नव्हते, पण गुदमरल्यामुळे आणि अतिश्रमामुळे गलितगात्र झाले होते. अग्निशमन दलाच्या स्नोर्केल शिडीवरून त्यांची सुटका सर्वात शेवटी करण्यात आली. त्यांच्यावर जी.टी.हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांना रविवारी सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवलं. तिघांना सोमवारी, तर देवकुडेंना मंगळवारी घरी पाठवलं. आता पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर ते कामावर रुजू होतील.

इतक्या लोकांना वाचवणारे हे शूर शिपाई, स्वत: अतिशय नम्र, निगर्वी आणि जमिनीवर पाय असणारे down to earth आहेत. आपण फार मोठं काहीतरी केलंय असं त्यांना वाटतच नाही. आम्ही आमचं कर्तव्य केलं, आणि म्हणूनच ईश्वरी कृपेने वाचलो असं ते म्हणतात. शेवटी निघताना त्यांना सॅल्यूट करण्यासाठी हात वर उचलला, तर त्यांनी मला सॅल्यूट करू दिलं नाही. माझा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन ते म्हणाले, तुमच्यासारख्या सज्जनांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला भीती कशाची ?

अतिवृष्टी, भूकंप, त्सूनामी यासारखी एखादी नैसर्गिक आपत्ती असो, वा दहशतवादी हल्ल्यासारखी युद्धजन्य परिस्थिती; पोलीस, अग्निशामक, सैनिक, असे अनेक अनाम वीर स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता सामान्य जनतेच्या साहाय्यासाठी धावून जातात. सामान्य जनतेच्या मनात मात्र त्यांच्याबद्दल फारशी आपुलकी नसते. आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का ? कृतज्ञतेची भावनाच आपल्या मनातून लोपली आहे का ? माणूस असूनही माणुसकी विसरलो आहोत का आपण ? अशा बहाद्दरांना प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करणं, मृत वीरांच्या कुटुंबीयांना भेटून धीर देणं, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत हा विश्वास देणं हे आपलं सामाजिक कर्तव्यच नाही का ?

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जेव्हा जहाज बुडायला लागतं, तेव्हा सर्वप्रथम उंदीर बाहेर पळतात. (मंत्रालयात आग लागल्यावर मंत्री, सचिव मंडळी, अधिकारी सर्वप्रथम बाहेर पडले, हे उगाचच आठवलं...) जहाजावरच्या सर्वांची सुटका झाल्याची खातरी झाल्यावरच कॅप्टन ते जहाज सोडतो. वास्तव आयुष्यात असं अलौकिक धैर्य दाखवणार्‍या अनेक अनाम ‘कॅप्टन्स’ना मन:पूर्वक अभिवादन !

मुक्तकसमाजप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

शुचि's picture

28 Jun 2012 - 6:45 pm | शुचि

डोळे खरोखर भरून आले.

नमस्कार नूलकर गुरूजी!
खूप दिवसांनी दर्शन दिलंत. जनतेच्या दृष्टीने आता हे वीर अनाम राहिले नाहीत कारण त्यांचं शौर्य आता तुम्ही या लेखनाद्वारे आमच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचवलं आहेच.

या सर्व वीरांना अभिवादन!

बाकी,

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जेव्हा जहाज बुडायला लागतं, तेव्हा सर्वप्रथम उंदीर बाहेर पळतात. (मंत्रालयात आग लागल्यावर मंत्री, सचिव मंडळी, अधिकारी सर्वप्रथम बाहेर पडले, हे उगाचच आठवलं...)

हे त्या इंग्लिश म्हणीमागचं अधोरेखित सत्य व्यवस्थित पोहोचवलंत.
धन्यवाद!

मोदक's picture

29 Jun 2012 - 12:39 am | मोदक

+१११११

सुधांशुनूलकर's picture

29 Jun 2012 - 5:54 pm | सुधांशुनूलकर

सर्वांना धन्यवाद.
प्रासभाऊ, नमस्कार.
माझ्या (घरच्या) संगणकाचा मातृपाट (मदरबोर्ड) निधन पावल्यामुळे इतके दिवस मिपावरून अदृश्य होतो.

जामोप्या :
>>आग लागल्यानंतर सामान्य सामान्य माणसानी लवकर बाहेर पडावं हेच अपेक्षित असते. ज्या लोकाना आगीचे खास ट्रेनिंग आहे, सुरक्षित पोषाख आहे, त्यानीच तिथे रहावे हेच अपेक्षित असते.. त्यासाठी खास फायर सेफटी ट्रेनिंग करावे लागते. त्यामुळे नेते आणि इतर लोक बाहेर पडले, हे योग्यच झाले... तुमची तुलना चुकीची आहे.<<

तुमचं हे म्हणणं बरोबरच आहे, पण अशा आपत्तीच्या वेळी मंत्री-अधिकार्‍यांनी इतर सामान्यजनांनाही आपल्याबरोबर घेऊन जायला हवं. या मंत्री-अधिकार्‍यांनी फक्त स्वतःच्या सुटकेचा विचार केला, त्यावर हा उपहासिक शेरा होता. (तुलना नव्हती). दुसर्‍या दिवशीची वर्तमानपत्रं पाहा, अनेकांनी हीच तक्रार केली आहे.

प्रेरणा पित्रे's picture

28 Jun 2012 - 7:07 pm | प्रेरणा पित्रे

असे लेख वाचल्यावर मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो...

JAGOMOHANPYARE's picture

28 Jun 2012 - 10:43 pm | JAGOMOHANPYARE

छान

अर्धवटराव's picture

28 Jun 2012 - 10:55 pm | अर्धवटराव

जे काहि बरं चाललय ते सिस्टीम मधल्या अश्या अनाम लोकांमुळेच.
एक नागरीक म्हणुन तुम्ही आवर्जुन देवकुडेंना भेटुन आलात, आपुलकीने विचारपुस केलीत. तुम्हाला देखील अभिवादन.

अर्धवटराव

मराठमोळा's picture

29 Jun 2012 - 7:59 am | मराठमोळा

अर्धवटरावांशी पुर्ण सहमती.

दिपक's picture

29 Jun 2012 - 9:44 am | दिपक

जे काहि बरं चाललय ते सिस्टीम मधल्या अश्या अनाम लोकांमुळेच.
एक नागरीक म्हणुन तुम्ही आवर्जुन देवकुडेंना भेटुन आलात, आपुलकीने विचारपुस केलीत. तुम्हाला देखील अभिवादन.

अगदी असेच म्हणतो. तुम्हालाही सॅल्युट.

मुक्त विहारि's picture

29 Jun 2012 - 1:18 am | मुक्त विहारि

नूलकर साहेब, आपला अभिमान वाटला.

आणि त्या पोलीसांबद्दल... अपार आदर..

स्पंदना's picture

29 Jun 2012 - 6:40 pm | स्पंदना

हेच म्हणेन.

नुलकर साहेब तुम्हाला आणि त्या चौघाना अतिशय धन्यवाद. हा धागा फेसबुकावर शेअर करत आहे, अर्थात तुमची परवानगी गृहित धरुनच.

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जेव्हा जहाज बुडायला लागतं, तेव्हा सर्वप्रथम उंदीर बाहेर पळतात. (मंत्रालयात आग लागल्यावर मंत्री, सचिव मंडळी, अधिकारी सर्वप्रथम बाहेर पडले, हे उगाचच आठवलं...)

आग लागल्यानंतर सामान्य सामान्य माणसानी लवकर बाहेर पडावं हेच अपेक्षित असते. ज्या लोकाना आगीचे खास ट्रेनिंग आहे, सुरक्षित पोषाख आहे, त्यानीच तिथे रहावे हेच अपेक्षित असते.. त्यासाठी खास फायर सेफटी ट्रेनिंग करावे लागते. त्यामुळे नेते आणि इतर लोक बाहेर पडले, हे योग्यच झाले... तुमची तुलना चुकीची आहे.

विकास's picture

29 Jun 2012 - 6:48 pm | विकास

आपण कायमच पोलीसांबद्दल आणि एकूणच सरकारी कारभाराबद्दल उलटसुलट ऐकत असतो. भ्रष्टाचार ह्या शब्दाचे गांभिर्य तर सतत ऐकून विसरून गेलेलो असतो. हे असेच चालायचं असेच कळत नकळत निराशावादी होत असतो. मात्र त्यामागे जरी खरी कारणे असली तरी ते आजही "अर्धसत्य"च आहे, हे वर दिलेल्या घटनेमधून वाचताना समजते.

श्री. सुधांशुंना ही घटना येथे सांगितल्याबद्दल आणि तसेच पुढाकार घेऊन या पोलीसांना भेटल्याबद्दल धन्यवाद!