वृत्ती-प्रवृत्ती..

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 11:46 am

प्रसंग पहिला

औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली.

वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय. त्यात जोरदार पाऊस सुरू झालेला. त्यामुळे रिक्षावाला बरोबर नेतोय या विश्वासात काही बोललो नाही, पण आत गेल्यानंतर तोही गोंधळलेला दिसला. मग पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभ्या राहिलेल्या काही जणांना आंबेडकर कॉलेज कुठे आहे विचारलंय. त्यांनी गेटमधून बाहेर पडल्यानंतर शेजारीच कॉलेज असल्याचे सांगितले. मी रिक्षावाल्यावर आणि स्वतःवरही चरफडलो. कारण बोर्ड मी पाहिला होता, पण त्याचवेळी त्याला सांगितलं नव्हतं. माझ्या चरफडण्यावर रिक्षावाल्याच्या चेहर्‍यावर अजीजी दिसली. 'साहेब, वाचता येत नाही ना म्हणून गलती झाली.' मला उगाचच कसं तरी वाटलं. मग मी त्याला काही बोललो नाही. त्याने आंबेडकर कॉलेजमध्ये रिक्षा नेली. माझं काम अगदी थोड्या वेळाचं होतं. तिथून आणखी एका ठिकाणी जायचं होतं. पाऊसही सुरूच होता. त्या रिक्षावाल्यालाच विचारलं 'थांबणार का?' त्याने हो म्हटलं. त्याला काही पैसे देऊ केले. पण त्याने नाकारले. 'साहेब, तुम्ही या मी इथेच थांबतो,' म्हणून तो तिथेच थांबला. मी काम आटोपून बाहेर आलो. तिथून आम्ही आणखी दोन तीन ठिकाणी गेलो. तिथं त्याला थांबावही लागलं. शेवटी हॉटेलपाशी येऊन रिक्षा सोडली तोपर्यंत किमान पंधरा-वीस किलोमीटर तरी फिरलो होतो. बिल विचारल्यावर त्याने काही तरी आकडेमोड करून शंभर रूपये बिल झाल्याचं सांगितलं. बिलाचा हिशेब सांगताना रिक्षावाला म्हणाला, 'साहेब, गलतीने विद्यापीठात तुम्हाला घेऊन गेलो. तेवढे पैसे बिलातनं वजा केलेत.' मी त्याच्या त्या बापुडवाण्या पण प्रामाणिकता ओथंबून वाहणार्‍या चेहर्‍याकडे पहातच राहिलो.
------------------------
प्रसंग दुसरा, त्याच दिवशीचा.

औरंगाबादला आलोच आहोत, तर पैठणला एकनाथ महाराजंची समाधी पहावी म्हणून तिकडे गेलो. मंदिर बघितल्यानंतर नाथसागर उद्यानात गेलो. रात्रीचे आठ वाजले होते. नाथांचं गावातलं घर पहायचं होतं. ते पाहून मग स्टॅंडवर येऊन एसटी पकडून औरंगाबादला परतायचा इरादा होता. उद्यानाबाहेरच एक रिक्षावाला भेटला. तीस रूपये कबूल करून घेऊनच त्याने रिक्षा सुरू केली. जाता जाता त्याची टकळी सुरू झाली. नाथांच्या आयुष्यातील चमत्कार कुठे घडले, कसे घडले याची माहिती सांगू लागला. ते सगळं माहित होतं. पण पहिल्यांदाच ऐकतोय असा चेहरा करून 'बरं, काय म्हणता, बापरे' अशा प्रतिक्रिया देत होतो. जाता जाता रिक्षावाला म्हणाला, 'बरं झालं, तुम्ही आमच्या गाडीत आलात. मुसलमानाच्या रिक्षात बसला असतात तर त्याने तुम्हाला फक्त नेऊन सोडलं असतं. बाकी काही सांगितलं नसतं. त्यांना फक्त धंद्याशी मतलब.'
'मुसलमान रिक्षावाले आहेत इथे?' मी विचारलं.
'तर, भरपूर आहेत. पण नाथसागर गार्डनला आम्ही त्यांना येऊ देत नाही. इथे सगळे हिंदू रिक्षावाले आहेत. गावात रिक्षा फिरवणार्‍यात मुसलमान आहेत.' त्याने माझ्या माहितीत भर घातली.
'आपल्या धर्माचं त्यांना काय माहित. फिरवायचं म्हणून ते फिरवतात,' त्याने मुक्तपणे आपली मतं उधळली.
मी 'हं' म्हणत होतो.
नाथांच्या वाड्यात गेल्यानंतर त्यांच्या देवघराचं दर्शन घेतलं. तिथेच त्या वाड्यात नाथांचे वंशज रहातात. त्यातले बाराव्या आणि तेराव्या पिढीचे वंशजही भेटले. दोघेही वृद्ध होते. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी एकूणच नाथांविषयी आणि वंशजांविषयी माहिती दिली. आम्हाला बरं वाटलं. रिक्षावालाही बरोबरच होता. 'तुमच्यामुळे मला पण ही माहिती मिळाली. एरवी ही माणसं भेटत नाहीत,' असं म्हणून त्याने आमच्या अंगावर उगीचच मूठभर मांस चढवलं. दर्शन आटोपल्यानंतर जवळच नवनाथांच्या तपर्श्चर्येची जागा आहे, तुम्हाला दाखवतो, असं म्हणून त्याने आम्हाला तिथे नेले. तिथे खाली छोट्या गुहांमध्ये नवनाथांच्या मूर्ती तयार करून नऊ ठिकाणी ठेवल्या होत्या. आम्ही आडवे तिडवे होऊन त्या गुहांमध्ये उतरून प्रत्येक नवनाथाचं दर्शन घेत होतो. खूप भाविक असल्याचं 'बेअरींग'ही सांभाळून होतो. गेल्या गेल्या रिक्षावाल्याने पुजार्‍याला बोलवून त्याच्या 'उत्पन्ना'ची सोय केली होती. त्यामुळे दानपेटीत पैसे टाकणंही आलंच होतं. आम्ही भराभर दर्शन घेऊन तिथून अखेर निघालो. स्टॅंडवर येऊन औरंगाबादची गाडी पकडायची होती. जाता रिक्षावाला म्हणाला, 'सगळ्या नाथांनी इथेच येऊन तपर्श्चर्या केली. फार पवित्र स्थान आहे हे. तुमचं भाग्य म्हणून तुम्ही आज इथे आलात आणि मला भेटलात.' आम्हाला हे दर्शन घडविण्याचे श्रेयही त्याने स्वतःकडे घेऊन टाकले होते. रिक्षा स्टॅंडवर पोहोचली आणि खिशात हात घालून पैसे किती म्हणून विचारलं. त्याने आकडा फेकला 'ऐंशी रूपये'. मी त्याच्याकडे पहातच राहिलो.
म्हटलं, अहो, आपण चार किलोमीटरही फिरलो नाही. आणि ऐंशी रूपये?
तो म्हणाला, 'साहेब, रात्रीच्या वेळी एवढ्या लांब कुणी येत नाही. तुम्हाला बरंच फिरवलं की. शिवाय वेटींगही आहेच ना.'
मी चकीतच झालो. चरफडत ऐंशी रूपये त्याच्या हातावर टेकवले आणि समोर उभी असलेली औरंगाबाद गाडी पकडली. जाता रिक्षावाला म्हणाला, 'साहेब ओळख ठेवा. कुणाला घेऊन औरंगाबादला आला तर आपल्या रिक्षातच या'.
त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या चेहर्‍यावर काही भावच उरले नव्हते.

संस्कृतीधर्मविचारअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

8 Aug 2008 - 12:20 pm | सहज

अनुभव सांगीतलात छानच पण ह्याबाबत मी दोन व्यापारी, व्यवहारी माणसांचे वागणे इतकेच म्हणेन.

पण केवळ धर्मावरुन एकजण असे वागला दुसरा बघा असे जनरलाझेशन सुचवायचे असेल तर बरोबर नाही असे म्हणीन. कारण असा अर्थ निघतो एकजण असा वागला तर दुसर्‍याने तसेच किंवा त्याहून चुकीचे वागायला पाहीजे होते का?

मजहब नही सिखाता जादा का बील मांगना. :-)

असो ह्या सगळ्यात कळिचा मुद्दा हा आहे की मिटरप्रमाणे रिक्षा [बीलींग] का नाही चालत?

मराठी_माणूस's picture

8 Aug 2008 - 12:40 pm | मराठी_माणूस

दोन्हि अनुभवांचे चांगले वर्णन. पण शिर्षक चुकले आहे असे वाटते . चांगुलपणा, सभ्यपणा हा बहुतेक वेळा व्यक्ति सापे़क्ष असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी_माणूस, सहजराव आणि तात्यांच्या विचारांशी सहमत!

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 12:44 pm | विसोबा खेचर

भोचक गुरुजी,

सुरेख अनुभवकथन! आपल्या शब्दांसोबत आम्हालाही एक लहानशी सफर घडली. अजूनही असेच लेखन येऊ द्या...

परंतु, शीर्षक मात्र खटकले. आपल्याला जो अनुभव आला तो दोन वेगळ्या वृत्तींचा अनुभव आला. यात हिंदू किंवा मुसलमान असा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही! प्रत्येकच जातीधर्मात चांगली-वाईट, सज्जन-संधीसाधू माणसं असतात..!

असो,

तात्या.

सहज's picture

8 Aug 2008 - 12:47 pm | सहज

>>परंतु, शीर्षक मात्र खटकले.

तात्या यावर काय करता येईल. लेखकाचा खुलासा लवकर अपेक्षीत मग पुढचा विचार की आताच पुढाकार घेउन बदल.

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 12:53 pm | विसोबा खेचर

बघुया!

भोचकगुरुजी हे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं काय ते उत्तर येऊ दे. तोपर्यंत त्यांच्या शीर्षकात असा तडकाफडकी बदल करणे मला योग्य वाटत नाही!

मिसळपाववर धर्म, जातपात, पंथ यावरून चर्चा करण्यास बंदी आहे याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. त्यांच्या शीर्षकावरून विनाकारणच हिंदु-मुस्लिम हा वाद निर्माण होऊ शकतो!

असो, लेटस् वेट!

तात्या.

मनिष's picture

8 Aug 2008 - 12:51 pm | मनिष

दोन वेगवेगळ्या रिक्षावाल्यांचे दर्शन घडले असे म्हणा!!
पुणे/मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रात मीटर नाही फारसा!

मराठी_माणूस's picture

8 Aug 2008 - 1:01 pm | मराठी_माणूस

पुणे/मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रात मीटर नाही फारसा!

अति स्पर्धेचा परिणाम

भोचक's picture

8 Aug 2008 - 2:09 pm | भोचक

तात्या,
तुमच्या आणि इतरांच्या मताशीही सहमत. शीर्षक खरोखरच आयत्यावेळी काही सुचत नव्हते. म्हणून ते दिले. ते बदलायला हवे. आपल्या अधिकारात ते बदलले तरी चालेल. दोन व्यक्तिंच्या वागण्यात धर्माचा संबंध असत नाही, हे मला पण मान्य. मला फक्त मानवी वृत्ती दाखवायच्या होत्या. त्यातल्या एका रिक्षावाल्याने धर्माचा उघड उल्लेख केल्याने मी लेखाची धाटणी तशी ठेवली.

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 11:15 pm | विसोबा खेचर

तुमच्या आणि इतरांच्या मताशीही सहमत. शीर्षक खरोखरच आयत्यावेळी काही सुचत नव्हते. म्हणून ते दिले. ते बदलायला हवे. आपल्या अधिकारात ते बदलले तरी चालेल.

समजून घेतल्याबद्दल धन्यवाद भोचकराव! अन्य कुठले शीर्षक द्यायचे ते कृपया खरडीतून अथवा पोष्टकार्ड पाठवून कळवा, म्हणजे त्याप्रमाणे मी मूळ शीर्षकात बदल करेन...

मला फक्त मानवी वृत्ती दाखवायच्या होत्या. त्यातल्या एका रिक्षावाल्याने धर्माचा उघड उल्लेख केल्याने मी लेखाची धाटणी तशी ठेवली.

येस्स! आय गॉट युवर पॉईंट! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2008 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे औरंगाबादचे लोक आहेतच प्रामाणिक !!!

अवांतर : शिर्षक आवडलेच नाही, रिक्षावाल्यांचा तो व्यवहाराचा भाग झाला.

-दिलीप बिरुटे
(प्रामाणिक औरंगाबादकर )

कोणताही धर्म मानवाला अप्रामाणिकपणे वागणे शिकवत नसतो, शेवटी ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते.

प्राजु's picture

8 Aug 2008 - 11:05 pm | प्राजु

साजिद यांच्याशी सहमत आहे..
कोणताही धर्म मानवाला अप्रामाणिकपणे वागणे शिकवत नसतो, शेवटी ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/