हे जग हा एक नरकच आहे.
"या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?" हा तिसर्या माणसाने विचारलेला प्रश्न हा चित्रपटाचा गाभा आहे. मुद्दा आहे तो प्रत्येक साक्ष देणार्याची विश्वासार्हता निश्चित करण्याचा नि त्या आधारे प्रत्येकाच्या साक्षीतील सत्यांश शोधून त्याच्या आधारे निवाडा करण्याचा. निवाड्यासाठी आधी कळीचे प्रश्न निश्चित करावे लागतील नि साक्षींच्या, अन्वेषणाच्या आधारे त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ताजोमारूने स्त्रीवर केलेला अत्याचार वादातीत आहे. जंगलात त्यावेळी उपस्थित असलेल्या तीनही व्यक्तींनी त्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याबाबत कायदेशीरदृष्ट्या ताजोमारू दोषी आहेच. नैतिकदृष्ट्या किती दोषी आहे हे मात्र सापेक्ष आहे. ताजोमारू तसेच सामुराईच्या साक्षीनुसार ती स्त्री ताजोमारूला वश झालेली आहे तर खुद्द स्त्रीने त्याबाबत मौन बाळगले आहे. परंतु कळीचा मुद्दा आहे तो सामुराईच्या मृत्यूचा किंवा हत्येचा. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे ’त्याचा मृत्यू कोणत्या हत्याराने झाला” नि दुसरा प्रश्न ’ते हत्यार चालवून त्याचा बळी घेणारा कोण?’
पहिलाच प्रश्न आपल्याला लेखमालेच्या पहिल्या भागात उल्लेख केलेल्या अन्वेषण-निकषांपाशी नेतो. कथेतील नि चित्रपटातील न्यायासनासमोर तीन साक्षी झाल्या त्यातील दोघांनी - सामुराई नि त्याची स्त्री- यांनी सामुराईचा मृत्यू खंजिराने झाल्याचा उल्लेख केलेला आहे, तर ताजोमारू त्याची हत्या आपण तलवारीने केल्याचे सांगतो. आता दोन विरुद्ध एक असा निव्वळ बहुमताच्या न्यायाने हत्या खंजिराने झाल्याचा निष्कर्ष काढू शकतो काय? या तीन साक्षींच्या आधारे जरी निर्णय केला तरी तो खंजीर त्या घटनास्थळी कुठेही सापडलेला नाही हे सत्य नाकारता येत नाही. (पोलिस नि लाकूडतोड्याची न्यायासनासमोरची साक्ष याला दुजोरा देते.) शिवाय बहुमताच्या बाजूचे दोघे पती-पत्नी आहेत हे विसरता कामा नये. या नात्यामुळे त्यांच्यात सामायिक असा स्वार्थ असण्याची नि त्याला अनुसरून त्यांनी एक बाजू घेतल्याची शक्यताही ध्यानात घ्यायला हवी. आणखी गोंधळ तेव्हा वाढतो जेव्हा लाकूडतोड्या आपली दुसरी जबानी -राशोमोन द्वारावर देतो- ज्यात तो ताजोमारूने ती हत्या केल्याचा नि तलवारीने केल्याचा उल्लेख करतो. आता हा नवा पुरावा ध्यानात घ्यायचा तर दोन-दोन अशी बरोबरी होऊन गुन्ह्याचे हत्यार नक्की कुठले हा प्रश्न अनिर्णित राहतो.
पण बहुमत हाच अन्वेषणाचा एकमेव निकष नव्हे. एक पर्याय असा असू शकतो की सरळ सामुराईच्या देहावरील जखम पहावी नि ती तलवारीने झाली की खंजिराने याचा तद्न्यांच्या सहाय्याने निर्णय घ्यावा. पण इथेही एक मेख आहे. ताजोमारूने सामुराईची हत्या केली असे सांगणार्या दोन्ही साक्षी - ताजोमारू आणि लाकूड्तोड्याची दुसरी जबानी - जेव्हा हा हत्येचा प्रसंग आपल्याला दाखवतात तेव्हा - आधीच नोंदवून ठेवल्याप्रमाणे - ताजोमारूने तलवारीने पारंपारिक पद्धतीने भोसकून त्याची हत्या न करता तलवार ’फेकून मारण्याच्या’ पद्धतीने केली आहे. अशा प्रकाराने झालेला जखम नि एखाद्या खंजिरासारख्या हत्याराने झालेली जखम एकाच प्रकारची असण्याचा संभव आहे. तेव्हा हा ही पर्याय निर्णायक ठरला नसल्याची शक्यता - जरी चित्रपटात याचा उल्लेख नसला तरी - आहे.
तिसरा पर्याय राहतो तो साक्ष देणार्याची विश्वासार्हता नि घटनेतील त्याचा सहभाग अथवा भूमिका. या निकषानुसार लाकूडतोड्या हा पूर्णपणे त्रयस्थ असल्याने त्याची साक्ष अधिक विश्वासार्ह मानता येईल. त्याचा कोणताही स्वार्थ गुन्ह्याच्या घटनेत गुंतलेला नाही त्यामुळे तो मूळ घटना यथातथ्य सांगत असावा असे गृहित धरले तर ताजोमारूच गुन्हेगार ठरतो नि हत्या तलवारीने झाल्याचाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो नि सारा गुंता सुटतो. पण घटनेचा साक्षीदार असलेली व्यक्ती खरंच त्रयस्थ राहू शकते? की हे ही एक गृहितकच? समजा तसे मानलेच तर मृतात्मे खोटे बोलत नाही हे गृहितक - भिक्षू तर नक्कीच हे गृहित धरणारा आहे - नाकारले जाते. याच्या उलट भिक्षूच्या या गृहितकाधारे निर्णय घेतला तर कोणताही स्वार्थ न गुंतलेला लाकूडतोड्या खोटं का बोलेल याचा उलगडा व्हायला हवा. एवढेच नव्हे तर या दोनही दृष्टिकोनातून पाहताना सामुराई नि त्याची स्त्री यांनी दिलेल्या साक्षींमधील विसंगत तपशील निर्णायकरित्या खोटा ठरवायला हवा, पण तो कसा ठरवणार? थोडक्यात या नव्या माहितीनेही हा सारा गुंता सहजासहजी निस्तरला जात नाहीच.
राशोमोन द्वारावरील तिघांचे बोलणे आता संपले आहे. त्या तिसर्या माणसाचे कपडेही वाळलेत. एक एक करून शेकोटीची लाकडे विझवण्यासाठी पावसात फेकू लागतो. भिक्षू आणि लाकूडतोड्या अजूनही दिग्मूढ अवस्थेत उभे आहेत. त्या माणसाच्या मनात मात्र कोणताही संभ्रम नाही, कारण त्याला काही समजावून घेण्याची इच्छाही नाही.
अचानक दाराच्या वरच्या बाजूने एका अर्भकाचे रडणे ऐकू येते. तिघेही चपापतात. सर्वप्रथम तो माणूस उठतो नि आतल्या बाजूला जातो. काही क्षण जातात. अचानक लाकूडतोड्या नि भिक्षू चमकून एकमेकाकडे पाहतात नि आत धाव घेतात. अपेक्षेप्रमाणे तो माणूस त्या अर्भकाला बाजूला काढून त्याला लपेटणारा किमोनो काढून घेत असतो. लाकूडतोड्या त्या माणसाला दूर ढकलतो नि भिक्षू त्या मुलाला उचलून घेतो.
अर्भकाला गुंडाळलेला किमोनो हिरावून घेताना तो माणूस
किमोनो हाताभोवती नीट गुंडाळून तो माणूस लाकूडतोड्याला विचारतो
"यात तुझा काय संबंध?"
"हे भयंकर आहे." लाकूडतोड्या ओरडतो.
"कुणीतरी हा किमोनो नेलाच असता, मी घेतला तर काय बिघडलं?" माणूस प्रतिवाद करतो.
"पण हे पाप आहे." लाकूडतोड्या वाद घालू पाहतो.
"पाप? आणि या पोराच्या आईबापांचे काय? ते पापी नाहीत? स्वतःच्या वासनेसाठी त्यांनी याला जन्म दिला नि उकिरड्यावर असे फेकून दिले. ते पापी आहेत."
"नाही तू चुकीचे बोलतो आहेस. त्या मुलाच्या गळ्यातील ताईत पहा. त्याच्या आईबापांनी जगातीला सार्या दुष्टाव्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठीच तो त्याच्या गळ्यात बांधलेला आहे. तो किमोनोदेखील वार्यापावसापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून त्याच्याभोवती गुंडाळला होता. आपले मूल असे सोडून देताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार कर जरा."
"इतरांच्या भावनांचा विचार करायला मला वेळ नाही." तो माणूस गुरकावतो.
"तू स्वार्थी आहेस." लाकूडतोड्या चिडून म्हणतो.
"मग त्यात वाईट काय आहे?' माणूस ताडकन उत्तर देतो. "या जगात माणसापेक्षा कुत्र्याचे जिणे अधिक सुसह्य आहे. तुम्ही स्वार्थी नसाल तर तुम्ही जगू शकत नाही."
आणि तू? तू स्वार्थी नि अप्रामाणिक नाहीस?
लाकूडतोड्याचा तर्क आता संपला आहे. क्षुब्ध होऊन तो म्हणतो "या जगात सगळेच स्वार्थी नि अप्रामाणिक आहेत, तो डाकू, ती स्त्री, तो तिचा पती आणि तू सुद्धा" "आणि तू? तुझे काय? तू स्वार्थी नि अप्रामाणिक नाहीस?' तो माणूस उलट प्रश्न करतो. "तू कोर्टाला फसवू शकतोस, मला नाही." या शाब्दिक वाराने त्याच्याशी झटापट करत किमोनो काढून घेऊ पाहणारा लाकूडतोड्या स्तब्ध होतो. त्याची नजर खाली झुकते. तो दोन पावले मागे सरकतो. आपला वार वर्मी लागला आहे हे माणूस ओळखतो. लाकूडतोड्याजवळ जातो नि विचारतो "मला सांग त्या खंजीराचं तू काय केलंस? तो अतिशय मूल्यवान होता ना, त्यावर मोती जडवलेले होते म्हणे." लाकूडतोड्याच्या तोंडून शब्द फुटत नाही. माणूस पुन्हा पुन्हा त्याच्यावर त्या प्रश्नाचा भडिमार करीत राहतो. अखेर खदाखदा हसत म्हणतो "एक चोर दुसर्याला चोर म्हणतो आहे. हे स्वार्थी वागणे झाले, नाही का?" असे म्हणत तो त्याला एक जोरदार थप्पड मारतो नि चालता होतो.
लाकूडतोड्याने सामुराईचा मृत्यू खंजिराने नव्हे तर तलवारीने झाला हे सांगण्याची उबळ दाबली असती तर त्याचे त्या घटनेशी असलेला संबंध उघडकीस आला नसता. पण ही अस्थानी सत्यनिष्ठ वृत्तीच त्याचा घात करते. त्या अर्थी तो लाकूडतोड्या अगदी सामान्य माणूस आहे. सामुराईच्या मृत्यूनंतर तिथे पडलेल्या तलवारी नि खंजीर फुकटात पळवण्याची वृत्ती त्याच्यात आहे तसेच आपल्या योग्य साक्षीने सत्य उघड झाले असते ते आपण टाळले हा अपराधगंडही त्याचा पिच्छा सोडत नाही. ’मला काय त्याचे?’ किंवा ’माझ्या सत्य सांगण्याने तो जिवंत थोडीच होणार आहे?’ असे म्हणण्याइतके निर्ढावलेपण त्याच्यात निर्माण झालेले नाही. लाकूडतोड्याची ही दुसरी साक्ष - जी कोर्टात नव्हे तर राशोमोन गेटवर भिक्षू नि त्या तिसर्या माणसासमोर दिली जाते - त्रयस्थाची म्हणून अधिक विश्वासार्ह असे म्हणता येईल का? तर हे गृहितकदेखील चुकीचे असू शकते हे कुरोसावा दाखवून देतो. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसलेला असा एखादा दुय्यम असा स्वार्थ त्या त्रयस्थाची भूमिका प्रदूषित करू शकतो नि म्हणून साक्षीदाराची विश्वासार्हता हा स्वतंत्रपणे प्रस्थापित करण्याचा मुद्दा आहे अधोरेखित करतो.
या सार्या संवादाला साक्षी असणारा तो भिक्षू हतबुद्ध झाला आहे. इतकावेळ ज्याच्याशी संवाद साधला, ज्याला समानधर्मा समजलो त्याचेही पाय अखेर मातीचेच निघाले हे पाहून तो सुन्न झालाय. बराच वेळ दोघे एकमेकाशी न बोलता स्तब्ध उभे आहेत. पाऊस आता थांबलाय. भिक्षूच्या हातातील ते मूल रडू लागतं. या अशा जगात त्याच्यावर आलेल्या या अनाहुत जबाबदारीचे काय कराचे हे त्याला समजत नाही. एवढ्यात लाकूडतोड्या पुढे होतो नि त्याच्याकडून ते मूल घेऊ पाहतो. इतका वेळ माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे असे निक्षून सांगणार्या भिक्षूचा आता माणुसकीवरील विश्वास उडाला असावा. त्याला लाकूडतोड्याचा हेतू लक्षात येत नाही. त्याला वाटते आता जे काही लहानसे धडुते त्या पोराला गुंडाळले आहे ते ही तो हिरावून घेऊ पाहतो आहे. आपल्यावर त्याने दाखवलेल्या अविश्वासाने लाकूडतोड्या विकल होतो. करूण आवाजात तो सांगतो "मला सहा मुले आहेत हो. अजून एक जड नाही मला."
सहा मुले आहेत मला, आणखी एक जड नाही - लाकूडतोड्या भिक्षूला आश्वस्त करतोय
भिक्षूला आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप होतो. लाकूडतोड्याची क्षमा मागून तो ते मूल त्याच्याकडे सुपूर्द करतो आणि म्हणतो "मला वाटतं, आता मी माणसावर श्रद्धा ठेवू शकेन." लाकूडतोड्या ते मूल घेतो, भिक्षूला अभिवादन करतो (इतका वेळ कळवळून रडणारं ते मूल लाकूडतोड्याचा हाती येताच शांत होतं) नि द्वाराच्या पलिकडे निघून जातो. इथे तो माणूस प्रेक्षकांच्या दिशेने अर्थात द्वाराच्या अलिकडच्या बाजूने निघून गेला होता हा एक तपशील जाताजात नोंदवून ठेवायला हवा. दोघे परस्परविरुद्ध दिशेने गेले आहेत हे महत्त्वाचे. कॅमेरा फिरवून आता द्वाराच्या मागच्या बाजूला गेलाय. लाकूडतोड्या पायरी उतरून खाली येतो नि चालू लागतो. आता त्याच्या चेहर्यावर समाधान आहे ते हाती काही निर्मळ, अनघड असे काही असल्याचे. ज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपण ती नक्कीच पार पाडू असा विश्वासही त्याच्या चेहर्यावर पसरलेला दिसतो.
राशोमोनचा मुख्य सूत्र हे की एखाद्या व्यक्तीचा अनुभव हे त्याच्यापुरते सत्य असते, जे अर्थातच त्याच्या जाणीवांच्या मर्यादेनुसार, दृष्टिकोनानुसार वेगवेगळे असू शकते. आता हा अनुभव जेव्हा निवेदनस्वरूपात इतरांसमोर येतो तेव्हा तो यथातथ्य येईलच असेही नाही. कारण इथे अपरिहार्यपणे आत्मसमर्थनाचा, स्वत:ला झुकते माप देण्याचा प्रयत्न होतो. अगदी ज्याचा प्रत्यक्ष स्वार्थ ज्यात गुंतलेला नाही अशा व्यक्तीकडूनही प्रामाणिक सत्यकथन - त्याच्या जाणीवेतले का होईना - होईलच याची खात्री देता येत नाही. अन्वय नि उहापोह याच्या पलिकडे प्रश्न उरतो तो त्यातून निर्माण झालेल्या भविष्याचा, त्या बालकाच्या भवितव्याचा. मुलाचे रक्षण/पोषण हे एकप्रकारे ढासळत्या नीतीमूल्यांच्या जगात निर्मळतेचे, पूर्वग्रहरहित विचारांचे संगोपन करणे आहे. भविष्याचे संरक्षण करणे आहे. आयुष्यभर कृतिशून्य चांगुलपणा जपत आलेल्या भिक्षूपेक्षा स्खलनशील पण चांगुलपणावरचा, मूल्यांवरचा विश्वास टिकवून धरणार्या लाकूडतोड्याच्या हातीच माणसाचे भविष्य सुरक्षित राहू शकते. चित्रपटाची सुरुवात धर्मगुरूच्या माणसावर विश्वास ठेवण्याबाबत साशंकता व्यक्त करून होते तर शेवट या सामान्य लाकूडतोड्याने भविष्याबद्दल धर्मगुरूला आश्वस्त करण्याने होते. जीएंच्या ’माणसे: आरभाट नि चिल्लर’ या पुस्तकाचा शेवट " 'समजत नाही, समजत नाही’ हेच सार्या बाबतचे अखेरचे शब्द असतील? ते देखील समजत नाही." या वाक्याने होतो. कुरोसावाचा राशोमोन पाहिल्यावर असेच काहीसे मनात येते. फारसे समजले नाही पण थोडीफार उमज पडली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.
उपसंहार:
राशोमोनला परदेशात बरेच नावाजले गेल्यानंतर बर्याच काळानंतर तो तेथील दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आला. चित्रपटापूर्वी त्या चित्रपटाच्या निर्मात्या 'डेई' कंपनीच्या अध्यक्षांची एक मुलाखत दाखवण्यात आली. याच माणसाने राशोमोन प्रथम प्रकाशित झाल्यावर त्यावर 'अर्थशून्य' असल्याची कडक टीका केली होती, कंपनीतील ज्या अधिकार्यांनी त्या चित्रपटाला मदत केली त्यांची पदावनती केली होती. त्या मुलाखतीत मात्र चित्रपटाच्या यशाचे सारे श्रेय त्याने स्वतःकडे घेतले. चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच कॅमेरा सूर्याकडे रोखण्यात आला याचा प्रौढीने उल्लेख केला. फक्त तो कॅमेरा लावणारा नि त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारा दिग्दर्शक यांची नावे मात्र सांगण्यास सोयीस्करपणे विसरला. राशोमोनने जे सांगण्याचा प्रयत्न केला त्या अंशत: सत्याचा पडताळा खुद्द त्याच्या दिग्दर्शकाच्या संदर्भातच सामोरा यावा हे चित्रपटाचे आत्मप्रतारक सामर्थ्य म्हणावे का?
(समाप्त)
प्रतिक्रिया
24 Apr 2012 - 7:52 pm | अन्या दातार
छान उपसंहार. कथा खूप मस्त उलगडून दाखवलीत ररा!
24 Apr 2012 - 7:53 pm | पैसा
सुरू केलेली लेखमालिका नीट शेवटपर्यंत गेल्याबद्दल! हे खरं परीक्षण झालंय. चित्रपटाची फक्त गोष्टच नव्हे तर त्याबद्दल नेमकं भाष्य. आता चित्रपट पाहिला तर जास्त व्यवस्थित समजेल.
निर्मात्या कंपनीच्या अध्यक्षाचं वागणं हे प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या आणि आपल्याला पाहिजे तेवढंच निवडून घेतलेल्या सत्याचा अजब नमुना आहे. चित्रपटाबद्दल बोलायचं तर कुरोसावाने मूळ सशक्त कथेला आणखी चांगल्या प्रकारे सादर केलंय. एखादा सामान्य दिग्दर्शक याच कथेवर मारामार्यानी भरलेला गल्लाभरू सिनेमा सहज तयार करू शकला असता!
शेवट नक्कीच आशादायक आहे आणि महायुद्धात होरपळलेल्या जपानी नागरिकाना परत उभं रहाण्यासाठी अशा आशेचीच गरज होती. मरणाला घाबरलेला सामुराई, नवर्याच्या मरणाला कारणीभूत ठरणारी पत्नी, कोणतीही कृती न करणारा पण मनाने चांगला भिक्षु आणि मुलाला गुंडाळलेला कपडा काढून घेणारा सामान्य माणूस या पार्श्वभूमीवर गरीब आणि परिस्थितीवश खोटं बोललेला लाकूडतोड्या. पण हा लाकूडतोड्याच त्या मुलाचा सांभाळ करायला नेतो हे कोणत्याही स्थलकालात माणुसकीवर विश्वास मजबूत करणारं आश्वासक चित्र आम्हाला दाखवल्याबद्दल र रा तुमचे आभार मानावे तितके थोडेच!
24 Apr 2012 - 11:34 pm | गणपा
+१
24 Apr 2012 - 7:53 pm | रेवती
सिनेमा पूर्ण न बघताही तुम्ही केलेल्या वर्णनावरून सगळा पाहिल्यासारखे वाटले.
इतक्या बारकाईने पाहणे मला जमले नसते.
25 Apr 2012 - 8:50 pm | कवितानागेश
मला तर पूर्व आशियाई देशातले लोकपण वेगवेगळे ओळखू येत नाहीत. मी कपड्यांवरुन ओळखते! :P
ररा तर त्यांच्या चेहर्यावरचे भाव वगरै वाचतात. कमाल आहे!! ;)
24 Apr 2012 - 8:21 pm | रमताराम
लेखाचा विस्तार पाहूनच बंद करावेत एवढे मोठे भाग टाकत असूनही लेखमालेचे अखेरपर्यंत वाचक असलेले अन्या, पैसातै, रेवती तै आणि गणपा यांचे आभार मानतो.
24 Apr 2012 - 9:31 pm | पैसा
एवढ्या सुंदर मालिकेला कोणी दृष्ट लावू नये म्हणून आपणच "मोठे बिठे" नावं ठेवताय काय? पण वाचायला एकदा सुरुवात केली की किती लांबीचा भाग आहे याचा मी विचारही कधी केला नाही, म्हणजे तसा अवसरही दिला नाहीत तुम्ही!
24 Apr 2012 - 11:31 pm | गणपा
ओ ररा सहजमामा रागावतील हा. ;)
तस नाही हो. वाचणारे बरेच असतात पण काही माझ्यासारखे आळशीपण असतात.
प्रतिसाद देताना कंजुशी करतात. ;)
25 Apr 2012 - 10:19 am | रमताराम
सहज माझे कितीही फुटकळ लिखाण असलं तरी आवर्जून वाचतोच, पटले न पटले त्याबाबत कळवतोच. अगदी टीआरपीचे धागे टाकल्याचा अगोचरपणा केल्याबद्दल तो माझे कान उपटू शकतो. घरचा माणूस आहे, त्याचे आभार मानून माझा दुसरा कान त्याच्या हाती द्यायची इच्छा नाही.
25 Apr 2012 - 12:04 am | पिंगू
ररागुर्जी, उपसंहार आणि इतर भाग ह्यांनी डोळे दिपवले.
- पिंगू
25 Apr 2012 - 1:40 am | यकु
मुजरा मालक. मिथकाचा इतका सुंदर वापर नि इतका सुरेख सूचक शेवट, वर्तमानाची नि भूतकाळाची अलवार गुंफण. क्या बात है. टोपी काढली आहे.
अवांतरः कथेचा अर्थ लावू पाहणारे बहुतेक सर्व प्रतिसाद ( इथे या लेखमालेचे सर्व भाग असे वाचावे) वाचून ह. ह. पु. वा. विशेषतः पुढे मुग्धाचे काय झाले हा प्रश्न वाचून तर ( इथे खरा खूनी कोण असा प्रश्न वाचून तर असे वाचावे ) लेखकाने बिचार्याने आत्महत्या वगैरे केली नाही ना या विचाराने धास्तावलो आहे. त्याची उत्तरे देण्याच प्रयत्न तर हिट्ट विनोदी. असो.
ही प्रतिक्रिया येथून साभार.
ररांचे उत्तर अपेक्षित आहे.
हम करे तो साला कॅरेक्टर ढिला है ;-)
25 Apr 2012 - 1:25 pm | संजय क्षीरसागर
>राशोमोनचा मुख्य सूत्र हे की एखाद्या व्यक्तीचा अनुभव हे त्याच्यापुरते सत्य असते, जे अर्थातच त्याच्या जाणीवांच्या मर्यादेनुसार, दृष्टिकोनानुसार वेगवेगळे असू शकते.
सत्य म्हणजे घटनेचं आकलन, यथार्थ निवेदन किंवा सर्वसंमत निवाडा नाही .
सत्य म्हणजे कोणत्याही घटनेत अनाबाधित राहणारी स्थिती.
25 Apr 2012 - 7:08 am | सहज
फार छान समजवून सांगीतलेत आता ते बरोबर सांगीतलेत की कसे याचा विचार करतो. :-)
25 Apr 2012 - 7:38 am | ५० फक्त
आता पुन्हा पहिल्यापासुन वाचायला सुरुवात करतो आणि मगच प्रतिक्रिया देतो,
एक प्रश्न मात्र आहे - जंगलवाटांवरचे कवडसे, असं नाव का दिलंत हे कळालं नाही, बहुधा पुन्हा वाचुन समजेल.
25 Apr 2012 - 7:50 pm | कवितानागेश
जंगलवाटांवरचे कवडसे-
मला वाटते की यातून 'अर्धसत्य' दिसतंय.
प्रत्येकाच्या नजरेतून आणि दिलेल्या साक्षीतून फक्त 'कवडसेच' हाती लागतायंत.
पूर्ण सूर्य (सत्य) कुणालाच दिसलेला नाही आणि कुणी दाखवायचा प्रयत्नही करत नाही.
एक शंका: ही गोष्ट ज्या काळात लिहिली गेली, त्या वेळेस 'बलात्कार' हा गुन्हा नव्हता का?
फक्त खून झाला की आत्महत्या केली यावरच 'न्याय' ठरणार होता का?
25 Apr 2012 - 8:29 pm | रमताराम
'कवडसे' शद्बाबाबत तुमचा तर्क बरोबर आहे.
एक शंका: ही गोष्ट ज्या काळात लिहिली गेली, त्या वेळेस 'बलात्कार' हा गुन्हा नव्हता का?
बलात्काराची घटना निर्विवाद होती, त्याबाबत कोणतीही अनिश्चितता नसल्याने त्यात सिद्ध करण्याजोगे शिल्लकच नव्हते. खुद्द ताजोमारूनेच आपण जबरदस्ती केल्याचा तपशील दिलेला आहे नि सामुराई व त्याची स्त्री या दोघांच्याही साक्षींमधे 'जमिनीत रुतलेला खंजीर' येतोच. याचा अर्थ तिथपर्यंतचा जो तपशील ताजोमारूने सांगितला त्याबाबत ते दुमत व्यक्त करीत नाहीत.
त्यामुळे गुन्हा होता की नव्हता हा मुद्दाच गैरलागू आहे. गुन्हा असेल तर त्याला त्या गुन्ह्याबाबत शिक्षा होणार हे निश्चितच होते. अन्वेषणाचा मुद्दा हत्येबाबतच शिल्लक राहिला होता कारण ती हत्या आहे की आत्महत्या नि हत्या असल्यास नक्की कोणी केली हा संदिग्धतेचा मुद्दा आहे.
पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल.
25 Apr 2012 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार
सगळे भाग परत एकदा नीट वाचले. आता हा सिनेमा पहाण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय ररांनी उपलब्ध ठेवलेला नाही. ईतकी सुंदर लेखमाला न कंटाळता पुर्ण केल्या बद्दल अभिनंदन.
25 Apr 2012 - 10:33 am | sneharani
शेवटचा भाग अगदी मस्त जमलाय, चित्रपटाची कथा खूप सुंदर पध्दतीने उलगडून सांगितलीत!
:)
25 Apr 2012 - 12:35 pm | मृत्युन्जय
संपुर्ण मालिका वाचली. उत्कृष्ट असे विवेचन केले आहे कथेचे आणि चित्रपटाचे. अभिनंदन आणि धन्यवाद
25 Apr 2012 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुरेख अशी मालिका ररा.
चित्रपट कसा पहावा आणि कसा उलगडावा हे ही लेखमाला वाचल्यावरती उमजले.
25 Apr 2012 - 4:27 pm | स्पंदना
खुपच छान. उपसंहार अन शेवटी ज्या माणसान या चित्रपटाची निंदा केली तोच त्याच श्रेय उपटुन रिकामा होणे हे ही जणु चित्रपटाचाच भाग झाल्या सारख.
ररा इतक उलगदुन सांगितल्या बद्दल तुमचे नुसते आभार मानण ही खर तर आमची कंजुषी पण या क्षणी तरी तेव्हढच एक हातात आहे.
या पुर्वी एका दिवाळी मासिकात या पिक्चरच परिक्षण वाचल होत, पण बिलिव्ह मी तुमच्या लिखाणाच्या जवळपास ही पोहोचु शकत नव्हत ते. आता निवांत बसुन पिक्चर पाहेन.
25 Apr 2012 - 5:18 pm | रमताराम
या पुर्वी एका दिवाळी मासिकात या पिक्चरच परिक्षण वाचल होत, पण बिलिव्ह मी तुमच्या लिखाणाच्या जवळपास ही पोहोचु शकत नव्हत ते. आता निवांत बसुन पिक्चर पाहेन.
आभार. परंतु एक मुद्दा इथे मुद्दाम नोंदवून ठेवतो. तो म्हणजे चित्रपटाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन. मला राशोमोन आवडला तो त्याच्या कथेमुळे नि सादरीकरणामुळे. कोणत्याची चित्रपटामधे माझा दृष्टीने निम्म्याहुन अधिक महत्त्व पटकथेला आहे नि उरलेले बाकीचे घटक राहिलेला पन्नास टक्क्यांमधे बसवतो मी. चित्रपट अभ्यासकाच्य दृष्टिने संकुचित किंवा असमतोल असलेला दृष्टिकोन आहे नि हे मला मान्यच आहे. मी चित्रपटाचा अभ्यासक नाही. एका प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातूनच मला चित्रपट पहायला आवडतो. परंतु राशोमोन वर बहुतेक लेखन हे चित्रपटाच्या अभ्यासकांनी केलेले आहे ( पाडळकरांचे 'गर्द रानात भर दुपारी' अपवाद समजायचा). त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. या निमित्ताने इथे एक महत्त्वाचा तपशील नोंदवून ठेवतो तो म्हणजे राशोमोन हा चित्रपटमाध्यमाच्या दृष्टिने एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाच्या निमित्ताने कुरोसावाने विकसित केलेले तंत्र नि चित्रभाषा पुढील कित्येक दशके नव्या चित्रपट दिग्दर्शकांना मार्गदर्शक ठरली आहे. तुम्ही वाचलेले परिक्षण कदाचित या दृष्टिकोनातून लिहिल्यामुळे तुम्हाला भावले नसावे.
छपाई माध्यमाची आणखी एक मर्यादा म्हणजे शब्दसंख्येवरचे बंधन. हे अपरिहार्य असते. काही मुद्दे टाळल्यामुळे लेखन घट्ट विणीचे रहात नाही. याउलट संस्थळावर अथवा जालावर लिहित असताना असले कोणतेही बंधन नसल्याने आपले समाधान होईपर्यंत तपशील त्यात लिहिता येतो. हा फायदा मला उठवता आला. कदाचित म्हणून हे लेखन तुम्हाला अधिक भावले असावे.
25 Apr 2012 - 7:17 pm | आदिजोशी
शॉल्लेट