न्यायालयातील साक्षींचा तपशील तिसर्या माणसाला सांगून संपलेला आहे. राशोमोन द्वारावर लाकूडतोड्या अस्वस्थपणे फेर्या घालतो आहे. भिक्षू नि तो माणूस खाली बसून त्याच्याकडे पाहत आहेत. लाकूडतोड्या अस्वस्थपणे द्वाराच्या आतल्या बाजूला चालत जातो, अचानक वळतो नि म्हणतो "हे खोटं आहे. तिथे खंजीर नव्हताच. त्याची हत्या तलवारीने झाली."
तो माणूस तुच्छपणे हसून 'आता हे अपेक्षितच होते' अशा नजरेने भिक्षूकडे पाहतो. लाकूडतोड्या हलके हलके पावले टाकत द्वाराच्या मागच्या बाजूला जातो नि तिथे बैठक मारतो नि मान खाली घालून बसतो. शेकोटीजवळ बसलेला तो माणूस उठतो नि त्याच्या जवळ जातो त्याच्या शेजारी बसतो नि म्हणतो "आता हे सारे मनोरंजक होते आहे. कदाचित तू स्वतः काय घडले ते पाहिले आहेस, हो ना?" लाकूडतोड्या हलकेच मान डोलावतो. "मग तसे तू कोर्टात का सांगितले नाहीस?" तिसरा माणूस विचारतो. "कारण मला यात फार गुंतायचे नव्हते." लाकूडतोड्या ताड्कन उत्तर देतो. "ठीक आहे, पण ते तू इथं तर बोलू शकतोस. चल सांग मला. कदाचित तुझी गोष्ट अधिक मनोरंजक असेल." तो माणूस त्याला म्हणतो. भिक्षू अधिकच अस्वस्थ होतो. त्याच्या विश्वासालाच तडा जाणारे काहीतरी लाकूडतोड्या बोलणार याचा अंदाज त्याला आलेला आहे. "बस्स. आता याहून अधिक भयानक कथा नकोत." तो विरोध करतो. "पण हे आता रोजचेच आहे." त्या माणसातला संशयात्मा/ निराशावादी पुन्हा बोलतो. "मी तर ऐकले आहे की या द्वारावर राहणारा सैतान देखील माणसातील हे क्रौर्य पाहून इथून निघून गेला आहे." मृतात्म्याची कथा सुरू होण्यापूर्वी पडणार्या पावसाने निर्माण झालेल्या एका ओहळाला प्रतिरोध करणारा एक सैतानी चेहरा असलेला दगड आपण पाहिला होता, त्याचे औचित्य इथे समजून येते. भिक्षू हताश होऊन गप्प बसतो.
लाकूडतोड्याची जंगलात पाहिलेला प्रसंग उलगडू लागतो. "त्या झुड्पावर मला ती हॅट मिळाली. मी तिथून पुढे गेलो. सुमार वीस पावलांवर मला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. एका झुडपाआडून मला एका माणसांला बांधून ठेवलेले मला दिसले. जवळच ती स्त्री नि ताजोमारू होते." "म्हणजे तुला मृतदेह दिसला हे तू खोट बोललास तर" माणूस मधेच बोलतो. "मला त्या लफड्यात गुंतायचे नव्हते." लाकूडतोड्या पुन्हा उसळून म्हणतो.
ताजोमारू गुडघ्यावर बसून त्या स्त्रीची विनवणी करताना दिसतो. तो तिची माफी मागत असतो. तो म्हणतो "मला आजवर जे जे अयोग्य असे ते करावेसे वाटले ते मी बिनदिक्कत केले. त्यामुळे माझ्या मनात त्याबद्दल कोणतीही अपराधभावना कधी आली नाही. पण आज वेगळे घडते आहे. मी तुझा भोग घेतला आहे. पण का कुणास ठाऊक मला आज तुझ्याकडून अधिक काही हवेसे वाटते आहे. मी तुझ्याकडे माझी पत्नी होण्याची भीक मागतो आहे." त्याला उत्तर न देता जमिनीवर पडून ती रडतेच आहे. "खुद्द ताजोमारू तुझ्या हातापाया पडून विनंती करतो आहे. तुझी इच्छा असेल तर मी दरोडे, लुटालूट बंद करेन, डाकू म्हणून जगणे थांबवेन. सुदैवाने मी आजपर्यंत इतके कमावले आहे की तुझे उरलेले आयुष्य सुखात जाईल. आणि माझा पापाचा पैसा तुला नको असेल तर मी कष्ट करेन नि पुन्हा पैसा कमावेन. तू माझ्याबरोबर आलीस तर मी तुझ्यासाठी काहीही करेन." ताजोमारू आपल्याशी लग्न करावे असे पुन्हा पुन्हा विनवित राहतो. ती बधत नाही असे दिसताच अखेर "तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला ठार मारण्याखेरीज मला गत्यंतर नाही" अशी धमकीही देतो. पण काहीही उत्तर न देता ती मुसमुसत पडून राहते. अखेर एका निर्धाराने ती उठते नि म्हणते "हे शक्य नाही. एक स्त्री याचा निर्णय करू शकत नाही." सामाजिक संकेतानुसार पुरूषांनीच तिच्याबाबत निर्णय घेतला पाहिजे याची जाणीव तिला आहे. ती उठते, दूरवर जमिनीत रुतलेला खंजीर काढून घेते नि धावत जाऊन आपल्या पतीचा दोर कापून त्याला मोकळे करते. एकप्रकारे तुम्ही दोघांनी मिळून आता याचा निर्णय करावा असे सुचवते.
ताजोमारू तिचे हे आव्हान स्वीकारतो नि तलवार उपसतो. पण सामुराई मात्र घाईघाईने हाताने खूण करून ताजोमारूला थांबवतो. "थांब. या 'असल्या' स्त्रीसाठी माझे आयुष्य पणायला लावायची माझी इच्छा नाही."
त्याला बंधमुक्त करण्यासाठी हाती घेतलेला खंजीर अजूनही हातातच असलेली ती स्त्री अजूनही मुसमुसत असते. आपल्या पतीचे ते शब्द ऐकून ती अचानक स्तब्ध होते. अतिशय तीव्र नजरेने ती त्याच्याकडे पाहते. ताजोमारूदेखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहतो. सामुराई दोन पावले पुढे येतो नि आव्हानात्मक स्वरात तिला म्हणतो "तू दोन पुरुषांशी रत झालेली स्त्री आहेस. आपले आयुष्य संपवून टाकत नाहीस तू?" पुढे ताजोमारूकडे वळून तो म्हणतो "माझे आता या निर्लज्ज वेसवेशी काही देणेघेणे नाही. तू तिला घेऊन जाऊ शकतोस. तिची किंमत आता मला माझ्या घोड्याइतकीही नाही." हे ऐकून ती स्त्री आशेने ताजोमारूकडे वळते, त्याची प्रतिक्रिया अजमावू पाहते. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल थोडी कणव दिसते. पण कदाचित सामुराईच्या युक्तिवादाचा परिणाम म्हणा किंवा रतिसुखाचा आवेग ओसरून वास्तवाची जाणीव झाल्याने म्हणा, आता त्यालाही तिच्यामधे रस उरलेला नाही. तो तिथून निघून जाऊ पाहतो.
लाकूडतोड्याच्या नि सामुराईच्या जबानीत बरेचसे साम्य आहे. ताजोमारूने त्या स्त्रीला लग्नाची मागणी घालण्यापर्यंत दोघांचे वर्णन सारखेच आहे. पण तिची त्यावरील प्रतिक्रिया मात्र दोघांनी भिन्न प्रकारे नोंदवली आहे. ताजोमारूने दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावाबाबत तिची प्रतिक्रिया दोघांच्या सांगण्यानुसार वेगळी आहे. सामुराई सांगतो ’ती त्याला म्हणत होती, मला कुठेही घेऊन चल.’ म्हणजेच ती ताजोमारूला पूर्णपणे वश झाली असल्याचा दावा तो करतो आहे. याउलट लाकूडतोड्याच्या जबानीत ती म्हणते की "हे मी कसे ठरवू?". नीतिनियमांनी बद्ध असलेल्या स्त्रीच्या बाबत हा विचार अधिक विश्वासार्ह वाटतो. आधीच्या स्त्रीच्या वाटचालीवरून ती स्वतःला ज्या व्यवस्थेत बसवते आहे त्यात याबाबतचा निर्णय पुरुषानेच घ्यायचा असतो. सबब त्या दोन पुरूषांनी तो निर्णय घ्यायला हवा असे ती सुचवते. इथे लाकूडतोड्याच्या म्हणण्यानुसार सामुराई लढण्याचे नाकारतो. हे एकप्रकारे स्वतःचे सामुराईपण नाकारणे आहे. जर हे खरे असेल तर सामुराईच्या दृष्टीने हे लांच्छनास्पद आहे नि म्हणूनच तो हे कबूल करू शकत नाही नि त्याच्या साक्षीमधे त्याला स्त्रीवरच दोषारोप करून स्वत:ची पत जपण्याचा प्रयत्न करावा लागतो. इथे सामुराई म्हणतो "मी स्त्री पेक्षा घोड्याला वाचवेन वा त्याच्यावर अधिक विश्वास ठेवेन." इथे पुन्हा एकदा सुरवातीलाच आपण पाहिलेल्या ’बांधून ठेवलेला घोडा नि स्त्री’ चे चित्र डोळ्यासमोर येते. सामुराई लढण्यापासून स्वत:ला वाचवू पाहतो तर तो जिवंत असेपर्यंत ती ताजोमारूची होऊ शकत नाही हा सामाजिक संकेत ती मोडू शकत नाही नि म्हणूनच ताजोमारूच्या प्रस्तावाला ती रुकारही देऊ शकत नाही. त्यातच ’असल्या भेकडाला मी एकतर्फी मारणार नाही’ तसेच नि ’स्वत:च्या पतीला ठार मारावे असे म्हणणारी स्त्री’ आपल्याला नकोच अशी भूमिका आता ताजोमारू घेतो आहे. थोडक्यात सांगायचे तर ती स्त्री आता दोन्ही पुरूषांकडून धुडकावली गेलेली आहे नि त्यामुळे नीतिनियमांनी करकचून बांधलेल्या समाजात त्या स्त्रीला आता काहीही भवितव्य नाही. सामाजिक नियमांनी मालकी हक्क प्रस्थापित केलेला पती नि बळजोरीने हक्क दाखवणारा ताजोमारू या दोघांनाही त्या स्त्रीबाबत कोणतीही अभिलाषा उरलेली नाही. जिची अब्रू आपण वाचवू शकलो नाही ती आपल्या नामर्दपणाची आठवण करून देणारी ती स्त्री आता पतीला अजिबात आपल्या आसपास नको आहे. याउलट, मुळातच स्वच्छंद आयुष्य जगायची सवय असलेल्या ताजोमारूला संसारसुखाची वाटलेली क्षणिक ओढही आता विरून गेली आहे. त्यामुळे या दोन्ही पुरुषांच्या दृष्टीने आता ही स्त्री म्हणजे एक लोढणे झाले आहे.
निघून जाऊ पाहणार्या ताजोमारूला ती स्त्री अडवू पाहते. (इथे कॅमेरा ताजोमारूच्या दोन पायातून त्याच्यासमोर पडलेल्या त्या स्त्रीकडे पाहतो आहे, पार्श्वभूमीवर तो सामुराई.) ताजोमारूनेही तिला धि:कारल्याने उसने बळ आणून सामुराई तिला धमकावू पाहतो. तिच्या रडण्याभेकण्याचा काहीही उपयोग नाही असे सांगतो. पण ताजोमारू त्याला तसे न करण्याबद्दल सांगतो. तो म्हणतो 'स्त्रिया जात्याच दुबळ्या असतात." हे ऐकून ती उसळते.
"खरे दुबळे तर तुम्ही आहात." ती आपल्या पतीकडे वळून ती म्हणते. "तू माझा पती आहेस ना, मग तुझ्या पत्नीची अब्रू लुटणार्या या नराधमाला तू का ठार मारत नाहीस? त्याला ठार मार नि मग मला सांग माझे आयुष्य संपवून टाकायला. ही खरी मर्दानगी म्हणेन मी." ताजोमारूकडे वळून ती म्हणते "तूही खरा मर्द नाहीसच. तू ताजोमारू आहेस हे ऐकून मी रडायचे थांबले. या दुबळ्या नि दिखाऊ जगण्याचा मला कंटाळा आलेला होता. यातून ताजोमारू मला बाहेर काढेल असं मला वाटलं. त्याने जर मला यातून वाचवलं तर त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं मी स्वत:शीच ठरवलं होतं." असं म्हणून ती त्याच्या तोंडावर थुंकते. थोडी हिस्टेरिक होऊन खदाखदा हसत सुटते. 'पण तू ही माझ्या पतीसारखाच क्षुद्र माणूस आहेस." तिच्या या हल्ल्याने ताजोमारू गांगरलेला. 'लक्षात ठेव. स्त्री त्याच्यावरच प्रेम करते जो तिच्यावर जीव तोडून प्रेम करतो. पुरूषाने आपली स्त्री तलवारीच्या धारेच्या बळावर जिंकून घ्यायला हवी. तुम्ही नेभळट कसले पुरुष," तिच्या या निर्भर्त्सनेने ते दोघेही पेटून उठतात नि ’नको असलेल्या स्त्री’ साठी एकमेकांशी लढू लागतात.
आता ही जी लढाई होते ती ताजोमारूच्या साक्षीमधील लढाई पेक्षा अगदी वेगळी आहे. इथे दोघांचेही लढणे सफाईदार नाही. एकमेकांवर हल्ला करताना ते अडखळून पडतात, झुडपात अडकतात, समोर न पाहता आंधळेपणाने वार करतात. ताजोमारू सामुराईवर चालून जाताना कापतो आहे, त्याच्या हातातील तलवार थरथरते आहे. सामुराईची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकमेकांसमोर येऊन ते वार करणार इतक्यात ती स्त्री घाबरून किंचाळते, ते ऐकून दोघेही सैरावैरा पळत सुटतात. एकदा ताजोमारू खाली कोसळतो नि त्याची तलवार हातून निसटते नि जमिनीत रुतते. सामुराईचे वार चुकवत तो त्या ठिकाणाहून दूरही जातो. अनेक प्रयत्नांनंतरही त्याला ती हस्तगत करता येत नाही. तरीही सामुराईला या संधीचा फायदा उठवता येत नाही. तो फक्त वेडेवाकडे वार करत राहतो. एकुण त्यांची एकाग्रताही फारशी चांगली नाही वा शौर्यही. केवळ आवेगाची, नवशिक्या शिपायांची लढाई ते लढत आहेत. दरम्यान एका वारामुळे सामुराईची तलवारही एका तोडलेल्या झाडाच्या कुजलेल्या बुंध्यात अडकते. तो ती काढण्याचा प्रयत्न करीत असताना इकडे जमिनीत रुतलेली आपली तलवार काढून घेण्यात ताजोमारू यशस्वी होतो नि सामुराईवर हल्ला चढवतो. तलवार गमावलेला ताजोमारू ज्या चापल्याने सामुराईच्या वारांना चुकवत होता ते चापल्य सामुराईकडे नाही. याशिवाय त्वेषाने केलेल्या त्या वारांमुळे तो अधिकच थकलेला आहे. थरथरत्या हाताने तलवार घेऊन त्याच्या दिशेने येणार्या ताजोमारूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पळण्याइतके त्राण त्याच्यात नाही. जमिनीवरून खुरडतच तो ताजोमारूपासून दूर सरकू पाहतो.
ताजोमारूचेही त्याला भोसकण्याचे धैर्य होत नाही. तो हळूहळू पुढे सरकत सामुराईच्या जवळ जातो पण हल्ला करीत नाही. तो बराच जवळ आल्यावर सामुराई गर्भगळित होतो नि 'नाही, मला मरायचे नाही.' असे ओरडतो. मरणाचे नाव ऐकून ताजोमारूतला डाकू जागा होतो नि आपल्या तलवारीने भोसकून तो सामुराईला ठार करतो. (ही भोसकण्याची क्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. एरवी वक्राकार पात्याच्या तलवारीने वरून खाली अथवा पोटात खुपसून हत्या केली जाते. सरळ पात्याच्या तलवारीने भोसकून वार केला जातो. दोन्ही प्रकारात तलवारीची मूठ वार करणारा हाती ठेवूनच वार करतो नि वार केल्यानंतर तलवार पुन्हा ओढून बाहेर काढली जाते. तिच्यावरील पकड कधीच सोडली जात नाही. इथे ताजोमारू - त्याच्या स्वतःच्या साक्षीत असो की या शेवटच्या लाकूडतोड्याच्या साक्षीत असो - एखादा सुरा जसा दुरून फेकून मारला जातो तसे एका हाताने पाते नि दुसर्या हाताने मूठ धरून एकाच वेळी दोन्ही हातांनी गती देऊन तलवार 'फेकून मारतो' नि सामुराईची हत्या करतो.) इतक्या वेळ त्या दोन पुरूषांच्या द्वंद्वात सूडाचे समाधान पाहणारी ती स्त्री आपल्या पतीचा वध पाहून किंचाळते. ते ऐकून ताजोमारूचा त्वेषही सरतो नि तो भानावर येतो. आपण केलेली हत्या पाहून तो स्वतःच भयचकित होऊन मागे सरतो आणि नि:त्राण होऊन खाली कोसळतो. तो कोसळतो ते थेट त्या स्त्रीच्या पुढ्यात. अचानक त्याला आपल्या विजयाची जाणीव होते. आपले बक्षीस - ती स्त्री - तिच्यावर आता तिचा हक्क प्रस्थापित झालेला असतो. तो तिला हाताला धरून उठवू पाहतो. ती त्याला झिडकारते. थोड्या झटापटीनंतर ती मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत सुटते. सामुराईची तलवार उचलून ताजोमारू तिचा पाठलाग करू पाहतो, पण अर्ध्या वाटेवर तो कोसळतो. पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याच्या अंगात तिचा पाठलाग करण्याइतके त्राण नाही. थकून तो तिथेच पडून राहतो. काही वेळाने थोडा सावरलेला ताजोमारू उठतो. सामुराईचे धनुष्यबाण, तलवार नि स्वतःची तलवार उचलून लंगडत खुरडत निघून जातो.
ताजोमारू आणि सामुराई यांचा प्रत्यक्ष संघर्ष संपूर्ण घटनाक्रमात दोनदा येतो. स्त्रीवर अत्याचार होण्यापूर्वी त्यांच्यात झालेला पहिला नि अत्याचार-पश्चात झालेले द्वंद्व हा दुसरा. पहिल्याचा तपशील केवळ ताजोमारूने आपल्या साक्षीमधे दिला आहे. सामुराई नि त्या स्त्रीने अधिक तपशील पुरवला नसला तरी हा संघर्ष झाला याबाबत दुमत नाही. परंतु दुसया द्वंद्वाबाबत या तिघांपैकी फक्त ताजोमारू बोलतो आहे. या द्वंद्वातच आपण त्या सामुराईला वीराचे मरण दिल्याचा त्याचा दावा आहे. परंतु इतर दोघे या तपशीलाबाबत ताजोमारूशी आणि परस्परांशीही सहमत नाहीत. स्त्रीच्या मते सामुराईचा मृत्यू हा खून आहे की अपघात हे ठाऊक नसले तरी तो खंजिराच्या वाराने झाला एवढे नक्की. तसेच त्याचा मृत्यू झाला तेव्हा ती त्याच्या जवळच बेशुद्धावस्थेत पडलेली होती. सामुराई मृत्यू खंजिराने झाला या तपशीलाबाबत आपल्या पत्नीशी सहमत आहे. परंतु ती स्त्री तिथे उपस्थित असल्याचे नाकारतो. ती आणि ताजोमारू घटनास्थळापासून निघून गेल्यावरच आपण हाराकिरी केली असे ते सांगतो.
आता नव्यानेच समोर आलेल्या माहितीनुसार ताजोमारूच्या दाव्याला लाकूडतोड्या बळ देतो आहे, सामुराईची हत्या ताजोमारूनेच केली नि तलवारीनेच केली असा दावा लाकूडतोड्याने केला आहे. परंतु तपशीलाबाबत तो ही ताजोमारूशी असहमती दाखवतो. ताजोमारूच्या जबानीत हे समसमा युद्ध आहे. सारखाच त्वेष, डावपेच करण्याची दोघांची प्रवृत्ती सारे काही तुल्यबल, कोणी डावे नाही की कोणी उजवे नाही. ताजोमारू सामुराईचे कौतुक करताना म्हणतो की तो शौर्याने लढला कारण त्याने माझ्यावर तेवीस (२३) वार केले. यापूर्वी कोणीही वीस(२०) पेक्षा जास्त वार करू शकले नव्हते. यात एक आत्मप्रौढीचा धागाही मिसळून दिलेला आहे. याउलट लाकूडतोड्याच्या कथनावरून दोघेही पुरूष आपापल्या शौर्याच्या मारत असलेल्या बढाया या फुकाच्याच होत्या असे दिसून येते. हे द्वंद्व नाईलाजाने लढलेले असल्याने पुरेशा त्वेषाने लढले जात नाही. मारण्यापेक्षा स्वतःला वाचवण्याकडेच दोघांचा कल अधिक दिसतो. शिवाय एकाचवेळी दोघांच्याही हाती शस्त्र आहे असा काळ फार थोडा आहे. थोडक्यात इथे समसमा द्वंद्व नाही, पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकते आहे, आंदोलित होते आहे. त्या द्वंद्वात सामुराई ठार झाल्यानंतर ती स्त्री घटनास्थलापासून पळून जाते. ताजोमारू पूर्ण थकलेला आहे तो तिचा पाठलाग करू शकत नाही. एका कचखाऊ सामुराईशी झालेल्या लढाईनंतर तो इतका थकला आहे. यावरून कदाचित तो स्वत:देखील फारसा लढवय्या वगैरे नसावा असा तर्क करण्यास जागा राहते. किंवा त्याने द्वंद्वापूर्वीच म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या पतीच्या मृत्युंनंतर मी तुझी होईन म्हणणार्या - त्याला पाषाणहृदयी वाटणार्या - त्या स्त्रीबद्दलचे आकर्षण, अभिलाषा आता ओसरून गेली असावी. कदाचित त्या स्त्रीचा उपभोग घेतल्यानंतर उसळून आलेले तात्कालिक प्रेम नि लग्न करण्याची इच्छाही आता मरून गेली असेल नि मूळचा स्वच्छंद स्वभाव पुन्हा जागा झाला असेल. कारण काहीही असले तर दृष्य परिणाम म्हणजे तो तिला अडवू शकत नाही नि ती सहजपणे त्याच्या हातून निसटून जाते.
हे सारे नाट्य आपण झुडपाआडून पाहिले असे लाकूडतोड्या सांगतो.
तिसरा माणूस हे सारे ऐकून खदाखदा हसतो. 'ही खरी गोष्ट आहे?" त्याच्या प्रश्नात उपहास डोकावतो आहे. लाकूडतोड्या चिडतो, त्या माणसावर धावून जात तो म्हणतो "मी खोटे बोलत नाही. हे सारे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे." माणूस हसतो "मला पटत नाही." लाकूडतोड्या पुन्हा पुन्हा ठासून सांगतो की हे खरे आहे. सारे असेच घडले होते. माणूस हसतो "माणसे मी आता खोटे बोलतो आहे असे सांगून थोडीच खोटे बोलतात." "हे सारं भयंकर आहे." इतका वेळ या दोघांचे संभाषण ऐकणारा भिक्षू न राहवून बोलतो "माणसे परस्परांवर विश्वास ठेवित नसतील तर या जगाचा नरक झालेला काय वाईट." तो त्वेषाने म्हणतो. 'अगदी बरोबर. हे जग एक नरकच आहे." तो माणूस म्हणतो. "नाही! माझा माणसावर विश्वास आहे." भिक्षू ठासून म्हणतो. " या जगाचा नरक व्हावा असं मला वाटंत नाही." माणूस खदाखदा हसतो. "तूच विचार कर आता. या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?" "मला ठाऊक नाही." भिक्षूऐवजी लाकूडतोड्याच परस्पर उत्तर देतो. "थोडक्यात काय तर माणसे कशी वागतील हे तुम्ही कधीच समजावून घेऊ शकत नाही." पुन्हा एकवार खदाखदा हसून तो त्याचा अधिक्षेप करतो.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
24 Apr 2012 - 3:01 pm | सहज
वाचतोय...
24 Apr 2012 - 4:04 pm | sneharani
वाचते आहे! पुढचा भाग येऊ दे!!
24 Apr 2012 - 5:12 pm | स्पंदना
हं!
खुप सार काही आतपर्यंत भिडतय. हे जस पिक्चरच्या कथानकाच यश आहे तेव्हढच तुमच्या शैलीच ही आहे. वाचता वाचता मध्येच वाद घालायची खुमखुमी उसळी मारते आहे, पण वाद घालणार कोणाशी? तुम्ही तर फक्त पिक्चर जस आहे तस पण उलगडुन एक एक पदर खुलवत वर्णत आहात.
24 Apr 2012 - 5:25 pm | सहज
>एक सैतानी चेहरा असलेला दगड आपण पाहिला होता, त्याचे औचित्य इथे समजून येते.
नो स्टोन लेफ्ट अनटर्न्ड असे सत्यखोदन, शोधन चालले आहे.
अजुन एक दोन भाग क्रमशः करत शेवटी चिकाटीने जो प्रतिसादक राहील तोच खुनी आहे असे सिद्ध ररा व कुरासोवा सिद्ध करणार!
24 Apr 2012 - 5:27 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
एकाच घटनेवरील वेगवेगळ्या दृष्टीकोनांच्या विवर्तामुळे मी तर मूळ घटना काय होती तेच विसरुन गेलो आहे.
24 Apr 2012 - 6:20 pm | गणपा
सहमत. ;)
24 Apr 2012 - 7:24 pm | पैसा
हाही भाग उत्तम झालाय. त्रयस्थाची साक्ष खरी असेल का?
24 Apr 2012 - 7:47 pm | रेवती
वाचत आहे.
24 Apr 2012 - 10:34 pm | अशोक पतिल
उत्कंठा वाढतच चाललीय ...........