मागून पुढे क्रमश:
अप्पा दांडेकर काही वेळेस तत्त्वज्ञासारखे काही बोलत.एकदा त्यानी एक आकाशगंगेचा फोटो दाखविला.म्हणाले हा फोटो पहा यात काय दिसतेय. यात तुला अप्पा दांडेकर दिसतोय का ? माझे उतर अर्थाच नाही होते , मग म्हणाले" अफाट विश्वात ही एक यः कश्चित आकाशगंगा त्यात ही यः कश्चित सूर्यमाला. त्यात ही यः कश्चित पृथ्वी ,त्यात हा यः कश्चित भारत देश, त्यात हा यः कश्चित महाराष्ट्र् त्यात हे यः कश्चित तळेगाव आणि त्यात हा ( स्वता: कडे हात करून) यः कश्चित अप्पा. एका बाजूला अप्पांना स्तुति प्रिय असे तर एका बाजूला आपले मानवाचे अल्पत्व ते असे विशद करून सांगत.
गोनिदानी ज्ञानेश्वरीचाही आपला स्वतंत्र असा अभ्यास केला. एकदा त्यांच्या गॅलरीत ते मी बोलत असताना कर्मकांडाचा विषय निघाला असावा. तर ज्ञानेशवरीतील एका ओवीचा संदर्भ देत ते म्हणाले "अरे तुझ्या त्या एवड्याशा प्रसादाने ज्याला जगाचा रथ चालवायचा आहे तो तुला एकट्याला प्रसन्न् होईल काय?" मला एकदम त्यांचा लंगोटी लावलेला हातात काठी असलेला जुना फोटो डोळ्यासमोर आला.
गाडगेबाबा गोनिदानी किती समजून घेतले होते याचा प्रत्यय येत होता.
आप्पा हिरव्या शाईने लिहित .कधी म्हणत हे पत्र एवढे पोस्टात टाकून येतोस का ? त्यावर रेखीव हस्ताक्शरात पत्ता टाकलेला असे. काही वेळेस ते लेखनिकाला येरझार्या घालीत लेखनाचा भाग सांगत. माझी जर आठवण दगा देत नसेल तर त्यांचेकडे लिहिण्याचे एक उतरते मेज होते. त्यावर कागद ठेवून हिरव्या शाईत ते काही वेळा स्वत: लिहित.त्याना जो विषय भूल घालील असाच विषय त्यानी लेखनास निवडलेला आहे. हे चालते खपते म्हणून आपणही लिहून बघू असे त्यानी केले नाही. मी दुर्बीण हा प्रकार आयुष्यात वापरला तो त्यांच्या कडे.
एकदा त्यांच्या पत्नी नीराबाई यानी चिवडा पुढे केला. 'बाहेर नको खाउ तिकडे आत स्वय़ंपाक घरात जाउन पटकन संपव .इथे यांच्याकडे कुणीतरी टपकायचं एकदम. माझ्याकडे एवढा चिवडा नाही रे बाबा ! " असे त्यांचे उदगार आजही आठवतात. एकदा त्या उण्यापुर्या स्वय़ंपाक घरात गोनिदा मी व त्यांची पत्नी असा जेवण्याचा प्रसंग आला. बेत काय तर मेथीची भाजी व भाकरी. त्यावेळी असेच स्वयंपाक असत. त्यात
गोनिदा साधे रहाणारे. पण तुम्ही म्हणाल काय भाग्य गोनिदाकडे जेवला. पण तळेगावतील दहा पोरे तरी निघलीत हा आनंद घेणारी.
अप्पांनी "अरण्येर कथा" असा एक वृत्तपत्रात लेख लिहिला.आमचे मूळ गाव आंदरमावळात. आमच्या घराच्या परसदारी आंबे , आळू ,बकुळ , बोरे, बांबू ई झाडे होती. त्या परसदाराचे वर्णन करणारा लेख माझ्या भावाने लिहिला व त्याना नेउन दाखविला. शीर्षक तेच ठेवले " अरण्येर कथा" त्यावर त्यानी वाचून अत्यंत आनंद व्यक्त केला. तळेगावात एका संस्थेने सर्वांसाठी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. त्यात मी भाग घेतला. त्यावेळी मी २७ वर्षाचा होतो. एका जागी मी लिहिली होते महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती... माउलीनी म्हटलेच आहे. गोनिदा परिक्षक होते. त्यांच्या व्यासंगी नजरेला ही चूक लगेच लक्षात आली नाही तरच नवल. माउली .....? कधी म्हणाले असे असा शेरा मारून त्यानी बाकी मजकूर पारितोषिकास योग्य असल्याने मला विजेता करून टाकले.
छायाचित्रण हा त्यांचा आणखी एक छंद ! हंपी येथील धोंड्यांचे त्यानी घेतलेले अविस्मरणीय मोठे केलेले फोटू मला त्यांनी दाखविले. केरळची कालव्यांची दुनिया ,दुर्गांचे फोटो.( राजगड त्यांचा आवडता) सिल्होटी प्रकारचे , निरनिराळे प्रयोग केलेले असे फोटो आवडीने ते दाखवत. सगळी एनलार्जंमेंट्स ! मला पहायची व त्याना दाखवायची आवड असल्याने व माझी पूर्वीची भीड चेपल्याने मला त्यांचा थोडाफार सहवास मिळाला. त्यांच्या घरी जाताना एक चिंचोळा जिना त्यातील दोराला पकडत चढून जावा लागे. त्याच दोराला लताबाई, आशाबाई, पुलं , दमा, बाबासाहेब पुरंदरे ( कोकणस्थ अप्पांचे देशस्थ मित्र) यांचे हात लागलेले होते. त्याच दोराने आपण गोनीदा नावाचा एक गड चढून जात आहोत याचा रास्त अभिमान त्यावेळी वाटे आजही वाटतो.
क्रमश: (पुढील लेख ओपी नय्यर यांच्या सहवासाचा आस्वाद देणारे ! )
प्रतिक्रिया
18 Apr 2012 - 8:53 pm | प्रचेतस
सुंदर आठवणी.
ओपींच्या आठवणी येऊ द्यातच . पण गोनीदांबद्दल अजूनही लिहा.
19 Apr 2012 - 6:44 am | जयंत कुलकर्णी
छान आठवणी !
19 Apr 2012 - 12:58 pm | मनराव
प्रतिसाद आणि तुमची सही अगदी विरुद्ध विचार आहेत.........
18 Apr 2012 - 10:15 pm | बहुगुणी
गोनीदांबद्दल आणखीनही वाचायला आवडलं असतं. तसंच ओपींबद्दल लिहाल त्यानंतर आशाताई, बमों, पुलं , दमा, यांच्या संपर्कातल्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही द्या.
19 Apr 2012 - 9:55 am | चौकटराजा
आशाताई चिंचवड येथे आल्या होत्या. त्यांचे एक स्नेही ज्याना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे असे माझे एक स्नेही आहेत. पण मी आशाताईना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. त्याना १९७१ साली एक खुशीपत्र लिहिले होते मात्र. माझ्या दुसर्या एक स्नेही ज्यानी सेंसर बोर्डावर दोन
वर्षे काम केले त्यांच्याकडे आशाबाईंचा खाजगी टेलीफोन नं होता पण तो ही मी मागितला नाही.
पुलंना लांबून पाहिले आहे. पण पुलंचे एक जवळचे स्नेही वि भा देशपांडे यांचे बरोबर दक्षिण भारताची सहल केली. पुलंशी त्यांच्या वाढदिवसाबद्द्ल पाच सहा वेळा अभीष्टचिंतन करणारा फोन केला आहे. माझा वाढदिवस ७ /११ व त्यांचा ८ /११ म्हणून एकदा त्यानी मलाच
नमस्कार केला व म्हणाले आशीर्वाद द्या कारण काय तर ते माझ्या पेक्षा एक दिवसाने "लहान " आहेत. बमो शी संवाद झाला नाही पण त्यांचे
भारावून टाकणारे आख्यान शिवचरित्र सलग सात दिवस ऐकले आहे. दमा मिरासदारांचे कथा कथन ऐकले आहे. पण त्यांच्या प्रेमात वगैरे पडलो नाही .आदर आहे.
मी सहा वर्षे वाईला होतो . त्या काळात गोनीदांशी संपर्क नव्ह्ता. लहानपणीची काही वर्षे अप्पा फार मोठे या कारणाने त्यांच्या पासून दूर रहाण्यात गेली. व नंतर मी तळेगावी असलो तरी त्याना आजार झाल्याने ते जावयांचे घराजवळ पुणे येथे स्थायिक झाले.सबब संपर्क तुटला.
18 Apr 2012 - 10:52 pm | संजय क्षीरसागर
आतुरतेनं वाट पाहतोय.
19 Apr 2012 - 12:26 pm | सस्नेह
आजवर एक महान साहित्यिक म्हणून गोनीदांची ओळख होती.
पण व्यक्ती म्हणूनही ते असेच महान होते हे आपल्या लेखामुळे समजलं. साहित्यातले जीवन व्यक्त जगातही जगणारे गोनीदा बहुधा एकमेव असावेत. किती प्रांजळ अन सरळ माणूस !
प्रसंग अगदी मार्मिक आहेत. गोनीदांच्या या पैलूचे दर्शन घडवल्याबद्दल आभार, चौकटभाऊ !
19 Apr 2012 - 4:19 pm | चौकटराजा
"घनु वाजे घुणघुणा " अशा शीर्षकाचा एक लेख अप्पांनी लिहिला होता. त्यात काही उच्चार वगैरे कसे करावेत याच्या मार्गदर्शनासाठी गोनीदा ना
लताबाईंच्या घरी बोलाविले होते. अप्पा गेले. लताबाईंनी विचारले " अप्पा, जेवायला काय करायला सांगू? " या फकीराने काय सांगावे ? फक्त पिठले
भात करा ! "
गोनीदांचा साधेपणा त्यांच्या घराण्यातील माणसांचा रसरशीत पणा हा किती झिरपला आहे याचे उदाहरण म्हणजे मृणाल कुलकर्णी ! त्यांची नात !
आपल्या मानासाठी हा एक किस्सा !
20 Apr 2012 - 12:47 pm | सस्नेह
मस्त !
हा किस्सा म्हणजे प्रतिसादाचं बक्षिस समजू का ? धन्यवाद !
19 Apr 2012 - 12:58 pm | मनराव
सुंदर...
19 Apr 2012 - 1:47 pm | इरसाल
पुढचा भाग लवकर टाकावा.
19 Apr 2012 - 4:26 pm | यकु
>>>> 'बाहेर नको खाउ तिकडे आत स्वय़ंपाक घरात जाउन पटकन संपव .इथे यांच्याकडे कुणीतरी टपकायचं एकदम. माझ्याकडे एवढा चिवडा नाही रे बाबा ! "
असले प्रसंग कितीही खरे असले तरी ते ज्याप्रकारे लिहिले जात आहेत त्यातून मनात केवळ उदासी येते आहे.
जरा आब राखून लिहिल्यास बरे.
20 Apr 2012 - 9:07 am | चौकटराजा
यकु साहेब , गोनी कोकणस्थ तर बाबासाहेब देशस्थ . दोघेही मित्र . पण एका पळीवरून काहीतरी माप बमो नि टाकल्याचा किस्सा आहे. मृण्मयी
पारितोषिक मिळंण्याचे वेळी मीना प्रभु पुण्यात आल्या होत्या, त्यानी त्यांचे तब्बल पंचवीस मिनिटाचे भाषण मला फोनवरून ऐकविले.त्यात तो किस्सा आला होता. अप्पांच्या मुलीने एक पुस्तक लिहिले आहे. मला वाटतं त्याच नाव 'आशक, कलंदर फकीर' आहे. त्यात घराचे, अप्पांचे वर्णन तर अधिक वास्तव् पणे आले असावे. मी ते पुस्तक वाचून फार वर्षे झाली.पुलंच्या टेबल मॅनर्स विषयी सुनिताबाईंनी लिहिले आहेच ना?
सत्तरीतही पत्नीकडून शरीरसुखाची अपेक्शा करणारा लिओ टोलस्टोय आपल्याला उलटा जवळचा वाटतो हे अनंत काणेकरांचे निरिक्षण आहे.
अखेर आप्पांचे घर माणसाचेच ना ? माझी प्राप्ती जेमतेमच असणार आहे अशी कल्पना आप्पांनी पत्नीला लग्नाअगोदर दिली होती असे कोणत्यातरी लेखात वाचल्याचे पुसट आठवतेय.
20 Apr 2012 - 9:39 am | प्रचेतस
'आशिक मस्त फकीर' असे नाव आहे त्या पुस्तकाचे.
20 Apr 2012 - 10:11 am | चौकटराजा
मला त्या तिन्ही शब्दांचा क्रम ही आठव्त नाही पण शेवटी फकीर हा शब्द असावा बौतेक !
20 Apr 2012 - 12:58 pm | सस्नेह
असं नसतं हो यक्कूशेठ.
'बाहेर नको खाउ तिकडे आत स्वय़ंपाक घरात जाउन पटकन संपव’ हीपण प्रेम व्यक्त करायची एक रीत आहे.
आमच्या लहानपणी आजी हापूस आंबा हातात देऊन असंच म्हणायची. पण आत जाऊन पाहिलं तर आंबे हातात घेतलेल्यांची रांगच असायची ! सगळेच प्रेमाचे. पण आपली म्हणायची रीत.. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी, हे आपण समजून घ्यायचं असतं बरं लाडक्या नातवा !
20 Apr 2012 - 5:18 pm | चौकटराजा
माझ्या मते या प्रकाराला सात आंबोळ्यांची गोष्ट असे म्हणतात . अन आप्पांना व नीराबाईंना सारी पोरं सारखीच लाडकी मग इतका चिवडा आणायचा कोठून ?
19 Apr 2012 - 4:28 pm | प्यारे१
चांगलं लिहीता की चौरा काका!
स्वगत : लेखकाच्या भूमिकेत चान चान असलेले चौकटराजा काका प्रतिसादकाच्या भूमिकेत चौकस (चौकटकट) राजा काका का होतात???
20 Apr 2012 - 5:09 am | चौकटराजा
कारण लेखकच काही मजबूरी वाचकावर टाकत असतो. मी ओपींचा निस्सीम चाहता आहे पण त्यांचे हर एक गीत जमलेच आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः ला फसविण्यासारखेच आहे ना ?(व ओपीच्या आत्म्यालाही ) ती तर अंध भक्ती झाली. असे अनेक ओपी भक्त आहेत व त्यांचे माझे वाजलेले ही आहे.
20 Apr 2012 - 12:53 am | चिंतामणी
हे समजले नव्हते. पण आता लक्षात आले की तुम्ही अजून एक धागा टाकणार आहात.
असो.
छान लिहीले आहे.
माझी आणि गोनीदांची एकदा भेट झालेली होती. तीसुद्धा राजगडावर. त्याबद्दल लौकरच लिहीन
20 Apr 2012 - 7:10 am | ५० फक्त
पुन्हा एकदा मस्त आठवणी, धन्यवाद.
20 Apr 2012 - 12:19 pm | संजय क्षीरसागर
आणि सविस्तर लिहा मग तीन पोस्टची एक पोस्ट झाली तरी हरकत नाही
20 Apr 2012 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा काका, सुंदर आठवणी आणि लेखनशैलीही छानच आहे. वाचतोय.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
21 Apr 2012 - 8:58 am | डॉ.प्रसाद दाढे
अजुन येऊ दे..
25 Apr 2012 - 11:33 am | विटेकर
मी गो नी दांचा भक्त आहे !
मला एक प्रश्न सतत छळत असतो..
भ्रमण गाथेतील यशोदा आप्पांना पुन्हा भेटली असेल का?
असे ऐकून आहे की आशाताईंनी हा प्रश्न विचारला होता .. तेव्हा आप्पांनी टाळाटाळ केली.. खरे आहे का? तुमचे कधी बोलणे झाले का? अप्पांच्यावर माझी इतकी भक्ती आहे की केवळ कथेसाठी पात्रनिर्मिती आहे असे मला म्हणवत नाही.
याच पुस्तकात ( किंवा स्मरण गाथा असेल ) गाडगे बाबा अवतारात असताना कोकणांत एका ब्राह्म्णाच्या घरी गेले होते .. त्यावेळी एका परकरी मुलीचा उल्लेख आला आहे .. त्याच नीराताई का?
तसे नसेल तर त्यांची गाठ कोठे पडली? या भणंगाबरोबर संसार करणे म्हणजे ... धन्य माऊली !
मला वाट्ते ... आपल्या प्रत्येकाच्या मनांत एक आप्पा दांडेकर लपलेला असतो.. सरस्वतीचे देणे कमी जास्त असेल पण असे स्वच्छंदी आयुष्य जगावे , आयुष्याचा असा चहुबाजूंनी आनंद घ्यावा अशी प्रत्येकाची सुप्त अकांक्षा असते .. माझी तरी आहेच .. त्यामुळे मला आप्पांचा हेवा वाट्तो.. आणि मी पुन्हा स्मरण गाथा हातात घेतो.. मी त्यांच्या लेखनापेक्षा त्यांचा ( व्यक्ती म्हणून) चाहता आहे ... ! असे थोडेबहुत जरी जगता आले तर मी स्वतःला धन्य समजेन !
25 Apr 2012 - 7:36 pm | चौकटराजा
अप्पांचा सहवास मिळणारा मी एक नाही. अनेक आहेत. खरे तर मी दुर्ग भ्रमण वाला असतो तर मी त्यांच्या अधिक जवळ गेलो असतो. गोनीदांचे लग्न बहुदा अरेंज मॅरेज असावे. त्यांच्या मुलीशी संपर्क साधल्यास काही माहिती मिळू शकेल. मी त्यांच्याकडून काय शिकलो असेल तर समृद्ध आयुष्यासाठी खूप श्रीमंत असावे लागत नाही. कारण काही प्रकारची श्रीमंती ही आपण जन्माला येतानाच आणत असतो. उदा. आपले आरोग्य रूप वगैरे !
14 Jan 2023 - 6:16 pm | चित्रगुप्त
पुन्हा एकदा नवीन मिपाकरांसाठी.