आज दिनांक १८ एप्रिल. ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी मास्टरदा उर्फ हुतात्मा सूर्यसेन यांनी भारतीय प्रजासत्ताक सेनेच्या अवघ्या ६४ सैनिकांनासह रात्री ९.५० ला एल्गार केला आणि अगदी काही दिवसांसाठी असेल पण चितगांव स्वतंत्र केले आणि चितगांव वर तिरंगा फडकावला. या सेनेत सर्वात लहान योद्धा होता तो अवघ्या १४ वर्षांचा सुबोध रॉय!
स्वातंत्र्यवेडाने पछाडलेले मूठभर शिपाई विरुद्ध इंग्रजांचे प्रचंड संख्येने आलेले प्रशिक्षित व शस्त्रसज्ज सैन्य या अतिविषम संग्रामात अनेक विरांच्या आहुती पडल्या आणि मास्टरदांना माघार घ्यावी लागली. मात्र सेना विखुरली ती पुन्हा एकदा एकवटण्यासाठीच. जंग जंग पछाडुन व प्रजेवर अत्याचार करुनही मास्टरदा इंग्रजांना सापडले नाहीत, त्यांचा संग्राम सुरूच होता. पुढे १९३३ मध्ये ते इंग्रजांच्या हातात फितुरीमुळे सापडले. मास्टरदा व तारकेश्वर दस्तिदार यांना १२ जानेवारी १९३४ रोजी अमानुष अत्याचाराने ठार मारुन त्यांचे अचेतन देह फासावर लटकावले गेले आणि फाशीची नोंद केली गेली.
सरकारला हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांच्या प्रमाणेच मास्टरदांच्याही मृतदेहाची प्रचंड धास्ती वाटत असावी. त्यांचा मृतदेह लोखंडी पिंजर्यात कोंबुन समुद्रात बुडविण्यात आला.
फाशीच्या आदल्या दिवशी मास्टरदांनी आपल्या सहकार्यांना देण्यासाठी पत्र लिहुन ठेवले - "माझ्या साथिदारांनो, उद्या माझी फाशी आहे, माझ्या आयुष्यातला तो मंगलक्षण आता अगदी जवळ येउन ठेपला आहे. माझे मन आता अनंताकडॆ झेपावत आहे. मृत्युला मिठीत घेउन मी लवकरच माझ्या प्रिय साथिदारांना भेटायला जाणार आहे. या क्षणी मी तुम्हाला काय बरे देऊ शकतो? मी तुमच्यासाठी माझे सोनेरी स्वप्न मागे ठेउन जात आहे. साथींनो, तुम्हे पुढे जात रहा, यश तुमचेच अहे, गुलामीचे पर्व संपत येत आहे आणि स्वातंत्र्याचे सोनेरी किरण मला दिसु लागले आहेत. अंतिम विजय आपलाच आहे"
ज्याने स्वतंत्र हिंदुस्थानात तिरंगा फडकावण्य़ासाठी पूर्वेत ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना’ स्थापन केली, ज्याने अवघ्या ६४ सैनिकांना घेऊन चितगांववर झडप घातली त्या मास्टरदांना व त्यांच्या तमाम साथिदारांना आज चितगांव संग्रामाच्या ८२ व्या स्मृतिदिनी सादर प्रणाम.
मास्टरदा
सुबोध रॉय
जितेन, मधुसुदन आणि पुलिन
नरेश, त्रिपुरा आणि बिंदु
हरिगोपाल आणि मतिलाल
प्रतिक्रिया
19 Apr 2012 - 1:40 am | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षीजी, हुतात्मा सूर्यसेन आणि सुबोध रॉय आणि त्यांच्या साथीदारांची नांवे देखिल मला माहित नव्हती. ती नांवे, त्यांचे कार्य आणि त्यांची जीद्द ह्या सर्वांची ओळख तुमच्या लेखमालीकेतून होत असते. धन्यवाद.
स्वातंत्र्यासाठी आत्मार्पण केलेल्या त्या अनंत हुतात्म्यांना अभिवादन. मृत्यूच्या छायेतील, अगदी आदल्या दिवशीचे, विचारही फार उद्दात्त आणि धैर्याचे आहेत. स्व विसरून एका महान कार्यात स्वतःला सर्वस्वाने झोकून दिलेले हे धैर्यवान 'महापुरुष' आदरास पात्र आहेत.
19 Apr 2012 - 3:35 am | विकास
असेच म्हणतो.
चित्तगावच्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...
19 Apr 2012 - 6:17 am | सहज
देशासाठी प्राण वेचणार्या सर्व वीरांना प्रणाम.
सर्वसाक्षी न चुकता असे समयोचित लेख देतात त्यांनाही अनेक धन्यवाद.
19 Apr 2012 - 9:00 am | प्रचेतस
अत्यंत समयोचित लेख.
19 Apr 2012 - 6:48 am | ५० फक्त
विनम्र अभिवादन आणि आदरांजली.
19 Apr 2012 - 11:44 am | सस्नेह
सत्वर वंदन त्या माहिती असलेल्या अन अनामिक दोन्ही शहीदांना !
भारताला लुबाडणाऱ्या इंग्रजांना शर्थीने प्रतिकार करून यांनी अन राष्ट्रपित्याच्या अनुयायांनी पिटाळून लावले पण आज अजूनही देशाला लुबाडणाऱ्या भ्रष्ट स्वकीय राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आम्हा देशवासियांना या शहीदांपासून काही धडा घेता येईल का ?
19 Apr 2012 - 1:41 pm | पक्या
आशुतोश गोवारीकरचा ह्या संग्रामावर २०१० मध्ये आलेला खेले हम जी जान से हा सिनेमा ही छान आहे. अभिषेक ने मास्टरदांचे काम केले आहे.
सर्वसाक्षीजी छान लेख ..देशासाठी प्राणपणाने लढणार्या सर्व हुतात्म्यांना प्रणाम.